Thursday, December 29, 2011

मैत्रिण माझी


सुगंध यावा प्राजक्ताचा अशी बोलते मैत्रिण माझी
रंग उडावे इंद्रधनूचे तशीच रुसते मैत्रिण माझी

माझे सारे माझे असते, तिचे तिचे पण तिचेच नसते
माझ्यासाठी मनास अपुल्या मुरड घालते मैत्रिण माझी

मनात काहुर दाटुन येता, फक्त निराशा समोर असता
हळवी फुंकर घालुन सारे मेघ उडवते मैत्रिण माझी

वाट बदलता पाउल माझे, रस्ता चुकतो मी भरकटतो
पुन्हा एकदा हात धरूनी दिशा दावते मैत्रिण माझी

शिंपल्यातला मोती तैसा तिच्या पापण्यांमधला अश्रू
थेंब सांडण्याआधी माझे काळिज पिळते मैत्रिण माझी

रूक्ष कोरडा असाच मी अन् दुखावते ती अनेक वेळा
पुन्हा पुन्हा मी क्षमा मागतो, पुन्हा मानते मैत्रिण माझी  

तिच्याचसाठी मनामधे मी खास वेगळी जागा केली
आता मजला भेटत नाही, मनात वसते मैत्रिण माझी

ती नसताना आरश्यातल्या प्रतिबिंबाला छेदच जातो
माझ्यापासुन माझ्याकडचा पूल तोडते मैत्रिण माझी


....रसप....
२९ डिसेंबर २०११

Wednesday, December 28, 2011

जिवंत आहे तोवर मेलो नाही.. (आनंद)


रडू कशाला कुढू कशाला
मनसुमनाला खुडू कशाला
अजून मी मातीस मिळालो नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

पाउल थकले चालुन चालुन
डोळे शिणले जागुन जागुन
अजून माझे रक्त गोठले नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

मी श्वासाला उधार माझ्या
प्रारब्धाची शिकार माझ्या
अजून बाजी तरी संपली नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

मृत्यूशी संवाद रोजचा
आयुष्याशी वाद रोजचा
अजून उर्मी, माज सोडला नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

उद्यास आहे वेळ जरासा
आज खेळतो खेळ जरासा
अजून मी हसण्यास विसरलो नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

मित्रांचा आनंद पाहतो
कातरवेळी रंग रंगतो
अजून मी सोहळ्यास जगलो नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही


....रसप....
२८ डिसेंबर २०११
जब तक ज़िंदा हूँ, मरा नहीं 
जब मर गया तो साला मैं ही नहीं 
- आनंद (गुलज़ार - हृषिकेश मुखर्जी - राजेश खन्ना)

Tuesday, December 27, 2011

ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो



ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो
आज तुझा बाबा अंगाई म्हणतो

एक होता राजू, भलताच गोड
पण त्याला चिडायची वाईट होती खोड
आईवरती चिडे कधी बाबावरती चिडे
कोपऱ्यात तोंड लपवून मुसूमुसू रडे
नेहमी त्याची समजूत काढून थकून जाई आई
त्याला हसवताना बाबा घामाघूम होई!
शहाणा मुलगा आहे तरी असा का वागतो?
आई-बाबांना नेहमी हाच प्रश्न पडतो
............ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो
............ आज तुझा बाबा अंगाई म्हणतो

एके दिवशी काय झालं, राजू खूप चिडला
"शाळेत जायचं नाही" म्हणून कोपऱ्यात रुसून बसला
त्याने आईचं ऐकलंच नाही
शाळेत काही गेलाच नाही
संध्याकाळी बाबाला आईने सांगितलं,
"आज माझं राजूने काहीच नाही ऐकलं
आजपासून आपणही त्याचं ऐकायचं नाही
रुसला तर त्याच्याशी बोलायला जायचं नाही"
असं ऐकून राजूला अजून राग येतो
आतल्या खोलीत पलंगावर, एकटाच जाऊन झोपतो
............ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो
............ आज तुझा बाबा अंगाई म्हणतो

स्वप्नामध्ये येतो बाप्पा, राजूला म्हणतो -
"तुझे आई-बाबा आता चिंटूला देतो.."
राजू म्हणतो "नको, नको... असं नको करूस!
माझी आई, माझे बाबा त्याला नको देऊस!
माझी आई कित्ती गोड, बाबा सुद्धा छान
आता त्रास देणार नाही, पकडतो मी कान!"
राजू आईबाबांकडे धावत धावत जातो
आई असते चिडलेली, बाबासुद्धा चिडतो!
"आई बाबा, माझ्यावरती चिडू नका तुम्ही
मला सोडून चिंटूकडे जाऊ नका तुम्ही!"
असं म्हणून छोटा राजू आईजवळ जातो
गच्च मिठी मारून तिच्या कुशीमध्ये शिरतो
आतापासून चिडका राजू अगदी शांत होतो
आकाशातून बघून बाप्पा गालामध्ये हसतो
............ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो
............ आज तुझा बाबा अंगाई म्हणतो


....रसप....
२६ डिसेंबर २०११


पार्श्वभूमी -

रोज 'ऑफिसहून लौकर येईन' असं म्हणून रोज उशीर करणारा आणि धावत पळत घरी पोहोचणारा एक टिपिकल नवरा - "श्रीकांत".

'लौकर येतो' म्हणाला असला तरी उशीराच येणार आहे, हे व्यवस्थित माहित असलेली एक टिपिकल बायको - "गीतांजली".

रोजच बाबांची वाट पाहून जेवायचा थांबणारा आणि नंतर आईची बोलणी खाऊन एव्हढंसं तोंड करून आईकडून भरवून घेणारा टिपिकल चार वर्षांचा चिमुरडा - "वरद".

बाबांने रोज उशीर करणं आता वरदच्या 'सहनशक्ती'च्या बाहेर गेलंय. आज तो निक्षून सांगतो की मी बाबा आल्याशिवाय जेवणार नाही म्हणजे नाssssssssही! गीतांजलीचे सगळे उपाय थकतात, ओरडून - 'वा' करूनही - काही उपयोग होत नाही. कुठे तरी आत तिलाही त्याचं वागणं पटतही असतं!

अखेरीस लेटलतीफ बाबाला आई फोन करते आणि 'कमीत कमी' उशीरा यायला सांगते. श्रीकांत घरी येतो.. खिडकीत तोंड फुगवून बसलेल्या वरदला बघतो आणि खिश्यातून लाच म्हणून आणलेलं चॉकलेट त्याच्यासमोर धरतो.. लगेच त्याची कळी खुलते.

पण ही माफी इतकी सहज मिळणार नसते. जेवण होतं.. वरद झोपायला तयार नसतो. गीतांजलीसुद्धा 'लाचार' नवऱ्याला चांगली अद्दल घडवायच्या मूडमध्ये येते.. आणि "आज त्याला तुम्हीच झोपवा" म्हणते.

श्रीकांत वरदसाठी अंगाई गातो. 

("मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत - भाग क्र. २१" साठी लिहिलेलं गीत.)

Monday, December 26, 2011

बात निकलेगी तो फिर... (भावानुवाद - २)


मूळ गीताच्या चालीवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे -

नको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही

लोक "अकारण अबोला कशास?" पुसतील
"कसली चिंता तुला वाटे" असे विचारतील
दावतील अंगुली पाहून त्या केसांस खुल्या
आणि उलटून बघतील काळास सरल्या
कांकणांना बघुन होतील आरोप किती
कापरे हातही ठरतील गुन्हेगार किती

लोक निष्ठूर हे सुनवतील खड्या बोलांनी
माझ्या विषयास छेडतील विषय फिरवूनी
लावुनी घेऊ नको मनाला जरासेही तू प्रिये
तुझ्या चेहऱ्याची चलबिचल टिपून घेतील ते
साहुनी घे परि, पलटून प्रश्न मांडू नको
माझ्या नावाला त्यांच्यासमोरी घेऊ नको

नको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही

मूळ कविता - "बात निकलेगी तो फिर.."
मूळ कवी - कफील आजेर
भावानुवाद - ....रसप....
२५ डिसेंबर २०११

बात निकलेगी तो फिर... (भावानुवाद -  १)

मूळ कविता-


बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी

लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे
ये भी पूछेंगे के तुम इतनी परेशां क्यूँ हो
उंगलियां उठेंगी सूखे हुए बालों की तरफ़
एक नज़र देखेंगे गुज़रे हुए सालों की तरफ़
चूड़ियों पर भी कई तंज़ किये जायेंगे
काँपते हाथों पे भी फ़िकरे कसे जायेंगे

लोग ज़ालिम हैं हर एक बात का ताना देंगे
बातों बातों में मेरा ज़िक्र भी ले आयेंगे
उनकी बातों का ज़रा सा भी असर मत लेना
वरना चेहरे की तासुर से समझ जायेंगे
चाहे कुछ भी हो सवालात ना करना उनसे
मेरे बारे में कोई बात न करना उनसे

बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी

- कफील आजेर


Sunday, December 25, 2011

अंगणातली रातराणी.. (उधारीचं हसू आणून)



अंगणातली रातराणी
चिंब दहिवरात न्हाली
अन् डोळ्यांत साखळलेल्या रक्ताला
आज पहिल्यांदाच जराशी ओल आली

वाटलं, तू नाहीस,
तर तुझा आभास तरी ओंजळीत घ्यावा
आज अंमळ जास्तच
हा सुवास रेंगाळावा

झुपका तोडून ओंजळीत घेतला
आणि एक शहारा उठला
तुझ्या केसांचा स्पर्श
परत एकदा स्मरला..

रातराणी ओंजळीत होती
पण गंध हरवला होता
कागदाच्या फुलांसारखा
एक झुपका समोर होता..

मीही बहुतेक ह्या फुलांसारखाच झालोय
तुझ्यापासून विलग होऊन गंधाला मुकलोय

हिरमुसलेली फुलं मला
पाहात होती टक लावून
मोठ्या मनाने त्यांनी माफ केलं
उधारीचं हसू आणून.....


....रसप....
२४ डिसेंबर २०११

उधारीचं हसू आणून...

Saturday, December 24, 2011

"डॉन - दोन" - Don 2 (चित्रपट परीक्षण)



'ग्यारह मुल्कों'च्या 'पुलिस'ला अजूनही ज्याची 'तलाश' आहे, तो डॉन आता युरोपात आपलं साम्राज्य बनविण्याच्या प्रयत्नात आहे. तिथले ड्रग स्मगलर्स डॉनच्या ह्या 'डायव्हर्सिफिकेशन प्लान'मुळे चिंताक्रांत होतात. कारण त्यांच्यापेक्षा कमी किंमतीत डॉन ड्रग्स देऊ शकणार असतो.. अर्थातच डॉनचा 'गेम करण्या'वाचून दुसरा पर्याय नसतो आणि एरव्ही एकमेकांचे कट्टर शत्रू असणारे हे सगळे माफिया एकत्र येऊन डॉनसाठी 'फिल्डिंग' लावतात. पण डॉन 'डॉन' आहे. तो (त्याच्यापेक्षा चौप्पट धिप्पाड) मारेकऱ्यांना मारून उरतो!
- अशी सिनेमाची सुरुवात होते. पण ह्याचा पुढील कथानकाशी काही संबंध आहे, असं वाटत असेल तर गंडलात!

'इंटरपोल'मध्ये सदतीस वर्षं नोकरी करून 'मलिक' आज निवृत्त होतोय.. त्याच्या भल्या मोठ्या आणि यशस्वी कारकीर्दीत एक डॉनच असा गुन्हेगार आहे, जो त्याच्या हाताला लागला नाही (आणि लागला तर टिकला नाही). "ही जबाबदारी आता तुझी" असं तो 'रोमा'ला (हो.. तीच जंगली बिल्ली! तीसुद्धा आता इंटरपोलमध्ये आलीय!) सांगून ऑफिसमधून बाहेर पडत असतानाच समोर साक्षात डॉन स्वत:ला इंटरपोलच्या ह्या - मलेशियामधील - टीमच्या स्वाधीन करतो. त्याला अटक करून कोठडीत टाकण्यात येतं.. इथेच त्याचा जुना शत्रू 'वर्धान' असतो. वर्धानशी हातमिळवणी करण्यासाठीच डॉन इथे आलेला असतो. डॉनच्या प्लाननुसार दोघं कारागृहातून पलायन करतात.

पण डॉनला 'वर्धान'ची गरज का भासावी? कारण -
जर्मनीच्या राष्ट्रीय बँकेच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी म्हणून आत्ताच्या अध्यक्षाने कोणे एके काळी एका अधिक लायक उमेदवाराची 'सुपारी' 'सिंघानिया'ला (ज्याला आधीच्या डॉनमध्ये वर्धानने विष पाजून मारलं असतं - आठवा, "आज की रात होना ही क्या....") देऊन त्या उमेदवाराचा काटा काढलेला असतो. आणि ह्या कामात त्याची मदत केलेली असते सध्याचा उपाध्यक्ष 'दिवाण' ह्याने... पार्टनर इन क्राईम! तर हा दिवाण आणि सिंघानिया ह्यांच्यातील संभाषणाची चित्रफीत 'बॉईस'ने (अगदी पूर्वीचा वर्धान व सिंघानिया चा बॉस) त्याच्या एका लॉकरमध्ये ठेवलेली असते, ज्याची एक किल्ली सिंघानियाकडे (जी त्याच्यानंतर डॉनकडे आलेली असते) आणि दुसरी 'वर्धान'कडे असते. 'डॉन'ला ती किल्ली हवी असते. कारण  लॉकरला दोन्ही किल्ल्या आवश्यक असतात. त्या चित्रफितीकरवी तो 'दिवाण'ला ब्लॅकमेल करून जर्मन राष्ट्रीय बँकेस लुटून 'युरो' छपाईचे साचे पळवणार असतो.
सिनेमातील एकेक थरारदृश्यं बघा, 'प्रियांका चोप्रा'ला बघा, कॅमेऱ्याच्या अप्रतिम हालचाली टिपा, कारचेस चालू असताना तोंडातला पॉपकॉर्न चावायचं लक्षात ठेवा.. पण इतक्या मोठ्या राष्ट्रीय बँकेला लुटण्याइतका डोकेबाज असतो, तर 'बॉईस'च्या लॉकरला तोडू का नाही शकत? वर्धानशी हातमिळवणी हवीच कशाला? माणसं तर कुठूनही मिळू शकली असती! - असले डोकेबाज प्रश्न विचारू नका.
डॉन बँक लुटून ते साचे मिळवतो का?
वर्धानला ह्या सगळ्या उपद्व्यावातून काय मिळतं ?
दिवाणचं काय होतं?
रोमाचा बदला (भावाच्या खुनाचा - विसरलात ना?) पूर्ण होतो का?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी इथेच दिली तर तुम्ही सिनेमा बघाल का? कशाला उगाच कुणाच्या पोटावर पाय? ही उत्तरं जाणून घेण्यासाठी हा सिनेमा अवश्य पहा... एकदा पाहण्याच्या लायकीचा निश्चितच आहे.

अधिक - उणे:


अधिक -
१. शाहरुख खान. डॉनची व्यक्तिरेखा मूलत:च अतिआत्मविश्वास असलेली असल्याने तिथे जरा ओव्हर ॲक्टिंग करणं 'कहाणीची गरज' आहे. त्यामुळे शाहरुख खान पुन्हा एकदा (मागील डॉनप्रमाणे) फिट्ट बसला आहे.
२. प्रियांका चोप्रा. 'झीरो फिगर' म्हणजे हाडाडणं नव्हे, हे हिच्याकडून शिकावं. एकदम फिट्ट दिसते आणि जीव ओतून काम करते.
३. बोमन इराणी व ओम पुरी - वाया गेले... काही 'स्कोप'च नाही.
४. कुणाल कपूर - छाप पाडतो.
५. इतर - प्रत्येक छोट्या नटाकडूनही फरहान अख्तरने काम करवून घेतलं आहे.
६. संगीत - विनाकारण गाण्यांची भरमार नाही, हे अत्युत्तम झालंय. शीर्षक गीत हे एकच फक्त पूर्ण लांबीचं गीत आहे... जे सुंदर आहे.
७. थरारदृश्यं मस्त जमली आहेत.

उणे -
१. पटकथा - सुरुवातीला दाखवलेल्या युरोपियन माफियांशी संभाव्य संघर्षाला पुढे कहाणीत कुठेच स्थान नाही.
२. मारामाऱ्या - चांगल्या आहेत. पण - हा बहुतेक वेशभूषेचा दोष असावा - कोण कुणाला मारतंय हे कळतच नाही !
३. इतका मोठा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार... ज्याला 'ग्यारह मुल्कों'ची 'पुलिस' शोधून थकली आहे, त्याने असा ब्लॅकमेल करून बँक लुटून नोटांचे साचे पळवून नकली नोटा छापायचा प्लान करणे म्हणजे 'बिलो डिग्निटी' वाटते.. त्यापेक्षा सुरुवातीस युरोपियन माफियांशी संघर्षाचा होऊ घातलेला प्लॉट जास्त 'जस्टीफाईड' वाटला असता. किंबहुना सुरुवातीस तशी अपेक्षा निर्माण झाल्याने नंतर जेव्हा डॉन त्याचा प्लान मांडतो, तेव्हा हिरमोडच होतो!
४. उत्तरार्ध जरा रेंगाळला आहे.
५. रोमाचं डॉनवर भाळणं हास्यास्पदच.. आपल्या भावाच्या खुनाचा तिला (आणि लेखक- दिग्दर्शकालाही) पूर्णपणे विसर पडला आहे.
६. डॉन हातात आल्यावर त्याला रेस्क्यू ऑपरेशनच्या टीमसोबत जोडणं अविश्वसनीयच!
७. कितीही मोठी असामी का असेना, त्याच्या एका शिफारसीवर डॉन सारख्या 'ग्यारह मुल्कों'च्या 'पुलिस' शोधून थकलेल्या अट्टल गुन्हेगारास 'इम्युनिटी' दिली जाईल, हे तर्कशून्य वाटतं.
८. शाहरुख!! अक्षरश: पाप्याचं पितर वाटतो हो! त्याने आडदांड धटिंगणांना मारणं म्हणजे केवळ शाहरुख पूजकांनी विश्वास ठेवावा इतपतच... बाकी थिएटर चक्क हसतं!

असो.
एकूण सिनेमा 'बरा' आहे. बाकी समीक्षकांनी ५ तारेही दिले आहेत.. मी ३ नक्कीच देईन.

एक अनाहूत सल्ला - थ्रीडी वगैरे बघण्याच्या फंदात पडू नका.. काही विशेष नाही.

....रसप....
२४ डिसेंबर २०११

Friday, December 23, 2011

ह्या जगण्यावर जीव जडावा..


नव्या पहाटे नव्या दिशेने नवीन वाटा चालुन पाहिन
ह्या जगण्यावर जीव जडावा जगास 'जगणे' असे दाखविन

उरात आशा स्वप्नं उशाशी
हिंमत भिडेल आकाशाशी
वाटेवरती पाउल माझे
वाट दावण्या छापुन ठेविन
ह्या जगण्यावर जीव जडावा जगास 'जगणे' असे दाखविन

सावट दु:खाचे आल्यावर
हताश माझे मन झाल्यावर
झटकुन साऱ्या नैराश्याला
स्वत: आपली पाठ थोपटिन
ह्या जगण्यावर जीव जडावा जगास 'जगणे' असे दाखविन

प्रवास माझा क्षितिजापुढचा
असेल रस्ताही खडतरसा
क्षणोक्षणी आनंद वेचुनी
शब्दफुलांना उधळुन जाइन
ह्या जगण्यावर जीव जडावा जगास 'जगणे' असे दाखविन


....रसप....
२३ डिसेंबर २०११

Wednesday, December 21, 2011

टाईम हील्स एव्हरीथिंग (उधारीचं हसू आणून)


"टाईम हील्स एव्हरीथिंग"
ती म्हणाली होती सोडून जाताना
स्वत:च केलेल्या घावावर फुंकर घालताना..
मी मूर्खच होतो..
आधी विश्वास ठेवला प्रेमावर
आणि नंतर ह्या फसव्या मलमावर !

तिने सिद्धांत मांडला.. तिचंही काय चुकलं?
"अपवादही आहेत" इतकंच सांगायचं राहिलं!
'आफ्टर ऑल, एक्सेप्शन्स प्रूव्ह अ लॉ !'

लाखातला एक मी
लाखातलंच माझं दु:ख...
उरलंय अपवाद बनून
काळाला पुरून
पण मी अजूनही प्रयत्न करणार आहे
.... उधारीचं हसू आणून.......


....रसप....
२१ डिसेंबर २०११

उधारीचं हसू आणून...

Tuesday, December 20, 2011

वाहवा


काफिया चुकला तरी म्हणतात ते शेरास वाह्वा
जाहलो वेडा तरी म्हणतात ते प्रेमास वाह्वा

'वाट चुकणे' पावलांचा नेहमीचा छंद झाला
एकटा पडलो तरी म्हणतात ते वेगास वाह्वा

आजतागायत मला ना भेटला सज्जन कुणीही
भ्रष्टही झाला तरी म्हणतात ते देशास वाह्वा

जाळ त्या नजरेत होता झेलली जी आवडीने
राख मी झालो तरी म्हणतात ते तेजास वाह्वा

तत्वं माझी राखली मी अन पहा झालो भिकारी
फाटले कपडे तरी म्हणतात ते वेषास  वाह्वा

लाभण्या स्वातंत्र्य कोणी खर्चले प्राणास अपुल्या
त्याग तो वाया तरी म्हणतात ते वेडास वाह्वा

स्वप्न झाले भंग नामुष्कीसही घेऊन आले
संघ तो हरला तरी म्हणतात ते एकास वाह्वा

....रसप....
२० डिसेंबर २०११

Monday, December 19, 2011

तुम्ही रस्ते मागू नका..


तुम्ही रस्ते मागू नका
तुम्ही पाणी मागू नका
तुम्ही वीजही मागू नका
तुम्ही फक्त मताला विका || धृ. ||

बाजार मांडला आहे हा चढणाऱ्या भावाने
विकण्यास मांडल्या खुर्च्या त्या मावळत्या राजाने
लावेल चोख जो बोली त्यानेच बूड टेकले
आपल्या भाकरीसाठी सारेच इथे जुंपले
तुम्ही गप्प बसाया शिका
तुम्ही फक्त मताला विका
....................... तुम्ही रस्ते मागू नका || १ ||

ओशाळला न कोणीही बेधुंद मस्त होताना
ना लाज वाटली आम्हा बेताल गुन्हे करताना
ह्या उडदामाजी सारे आहेतच काळे-गोरे
सारेच हात रंगले देताना अन् घेताना
तुम्ही मूग गिळाया शिका
तुम्ही फक्त मताला विका
....................... तुम्ही रस्ते मागू नका || २ ||

ह्या सफेद टोपीखाली रंगेल चेहरा आहे
कुडत्यात ह्या साध्याश्या शौकीन दांडगा आहे
करण्यास ऐश आम्हाला जन्मास घातले आहे
"चारित्र्य" शब्दही आता आम्हा अजाणता आहे
तुम्ही विसरुन जाया शिका
तुम्ही फक्त मताला विका
....................... तुम्ही रस्ते मागू नका || ३ ||


....रसप....
१९ डिसेंबर २०११

Wednesday, December 14, 2011

कळले नाही कुणास काही....


कळले नाही कुणास काही उगाच टाळ्या पडल्या
भळभळणाऱ्या जखमा माझ्या कुणास नाही दिसल्या  

अरे आरश्या पहा जरा तू उघडुन डोळे आता
तुझ्या चेहऱ्यावरतीसुद्धा कश्या सुरकुत्या पडल्या ?

कधीच माझ्या बंदिशीस तू पूर्ण ऐकले नाही
मनात माझ्या अर्ध्या-मुर्ध्या किती मैफली उरल्या

माझ्यासोबत दोन पावले तरी चाल जीवना
माझ्या वाटा सरळ चालती, तुझ्याच वाटा वळल्या

इथेच होते तुझे नि माझे घरटे छोटेखानी
स्वप्नांच्या फुटक्या काचा मी कालच येथे पुरल्या

कोरुन माझ्या मीच घेतल्या हातावरती रेषा
फसव्या वळणावरती त्याही माझ्यावरती हसल्या

लाज सोडुनी जेव्हा झाला रूक्ष कोडगा 'जीतू'
तिरकस नजरा पुन्हा पेटल्या राख होइतो जळल्या


....रसप....
१४ डिसेंबर २०११

Monday, December 12, 2011

ते राजे औरच होते..


ते राजे औरच होते जे जगले लढण्यासाठी
आता खुर्च्या खुर्च्यांशी लढतात 'कमवण्या'साठी

जिकडे तिकडे ज्ञानाचा धंदा करण्याला बसले
येणार कसा विद्यार्थी प्रामाणिक शिकण्यासाठी ?

जमवून घोळके म्हणती "अवतार मीच देवाचा!"
ते भोंदू ना कामाचे धर्माला जपण्यासाठी

व्रतबंध सोहळा झाला, खुंटीस जानवे त्याचे
शहरात  पुरोहित शोधे, पूजेस सांगण्यासाठी !  

नुसत्याच चाचण्या करती, आजारच समजत नाही!
वैद्यांचे डॉक्टर झाले तुंबड्यांस भरण्यासाठी

वर्षानुवर्षं त्यालाही नवसांची सवयच झाली
आता ना फुरसत त्याला दु:खाला हरण्यासाठी....


....रसप....
१२ डिसेंबर २०११

Sunday, December 11, 2011

शांततेचा आवाज..


शांततेचा आवाज..
ऐकलायस कधी?
जाणाऱ्या क्षणांच्या पावलांना
मोजलंयस कधी ?

एक अशी निवांत वेळ..
जेव्हा कुणीच बोलणारं नसतं
आणि शब्दच श्रोते बनून असतात
आपल्याच मनाचं.. आपल्याच मनाशी
व्यक्त केलंयस कधी?

एक मंद खर्जातला सूर..
मिटलेल्या डोळ्यांच्या आकाशात घुमत असतो
हळूहळू क्षितीजाकडून आकाश उसवत जातं
मग अनंत अवकाशात, स्वत:च्या आकाशासह
मुक्त विहार सुरू होतो..
हव्या त्या दुनियेत..
हलकं हलकं होऊन..
शेवटी परत यावं लागतंच..
जबाबदारीच्या दुनियेत..
पण आता बळ आलेलं असतं
वास्तवाचं ओझं पेलायचं!

शांततेचा आवाज..
ऐकलायस कधी?
जाणाऱ्या क्षणांच्या पावलांना
मोजलंयस कधी ?

....रसप....
११ डिसेंबर २०११

Saturday, December 10, 2011

ती लिहिते तेव्हा...


ती लिहिते तेव्हा नभपटलावर तारे अक्षर बनती
लेऊन तेज त्या शब्दांचे ते चमचम करून हसती

ती लिहिते तेव्हा निर्झर गातो गाणे झुळझुळवाणे
अन् हळूच फुलते फूल मनाचे दिसते गोजिरवाणे

ती लिहिते तेव्हा इंद्रधनूच्या रंगांना गंधवते
हर एक फुलावर पानावर दवबिंदू बनून सजते

ती लिहिते तेव्हा ललनेचा शृंगार कुणी ना पाही
त्या पंक्तींच्या मदमस्त नशेने दिशा डोलती दाही

ती लिहिते तेव्हा फूलपाखरू अलगद चिमटित घेते
भावूक मनाच्या शब्दांचे ती सप्तसूर ऐकवते  

ती लिहिते तेव्हा तिला शारदा शब्दसंपदा देते
रत्नांच्या राशी कविता रचते मूल्य न करता येते

ती लिहिते तेव्हा पिळून काळिज अशी वेदना उठते
वाचून मुक्याने नयनांमधुनी प्राजक्तासम झरते


....रसप....
१० डिसेंबर २०११

 

Tuesday, December 06, 2011

मराठी


भले थोरले पंत पंडीत झाले
जणू शारदेच्याच शब्दांस ल्याले
मधाहूनही गोड भाषा निराळी
मराठीस आहे रवीची झळाळी

निती सांगते संतवाणी जगाला
मिळे वाट अंधारलेल्या मनाला
घडे थेट वारी जशी पंढरीची
मराठी जणू पावरी श्रीहरीची

कधी गर्जला फाकडा तो शिवाजी
पुरा खर्चला शंभु लावून बाजी
अधर्मास तोडायला शूर झाले
मराठी पुन्हा ते उगारेल भाले

जसा दुग्धरंगी झरा कोसळावा
किनाऱ्यावरी फेन लाटांस यावा
सुगंधात घोळून यावी हवाही
मराठीत उत्साह तैसा प्रवाही

कलासाधनेला इथे अंत नाही
नव्या लेखणीला जुना रंग नाही
गिरी पश्चिमेचा पहावा करारी
मराठी तशी उंच घेते भरारी

....रसप....
६ डिसेंबर २०११

Sunday, December 04, 2011

आजचा दिवस सुगंधी आहे.. (Tribute to Dev Anand)

A Tribute to Dev Anand..the great Evergreen Star of Bollywood....

मृत्यूलाही लाजवीन असा माझा रुबाब असेल
तो टेचात समोर येईल
पण हात पसरून भीक मागेल

मी नाही म्हणणार नाही
कारण तो माझा शेवट नसेलच
तुमच्या मनात माझं नाव
कोरून उरलं असेलच

माझ्या जाण्यानंतर थोडाच वेळ टिपं गाळली जातील
मला जाणणारे पुढेच चालत राहतील
कारण मी कधीच थांबलो नाही, थांबणार नाही
निघून जरी गेलो तरी मी कधीच संपणार नाही

उद्या मी पंचत्त्वात विलीन झाल्यावर
प्रत्येक जण म्हणेल
आजचा दिवस सुगंधी आहे..
आजचा दिवस सुगंधी आहे.....


....रसप....
४ डिसेंबर २०११


भूछत्र !


मुक्त विहरण्यासाठी सांगा अंबरचौकट हवी कशाला?
उधळुन वारू देण्यासाठी दिशा नेमकी हवी कशाला?

मस्तीच्या साजास लेउनी अक्षर-अक्षर माज करू द्या
तर्क लावुनी ज्याचा त्याला जसा हवा तो अर्थ कळू द्या

भाषेचे अन् व्याकरणाचे लचके तोडा, तुकडे पाडा
ऱ्हस्व-दीर्घ द्या सोडुन केवळ यमक पाळुनी ठिगळे जोडा

अलंकार अन् वृत्त-छंद ते कृत्रिम साचे फेकुन द्यावे
बदाबदा ओतून भावना पसरुन सारे वाहुन जावे

'उदो' कुणाचा करा कुणाला लाखोल्या शिवराळ वहाव्या  
उगाच खरडुन काही-बाही विटक्या झोळ्या व्यर्थ भराव्या

माझा मी हा असाच आलो असाच आणिक येथुन जाइन
भूछत्रासम कोरा-पिवळा पुन्हा पुन्हा मी उगवुन येइन


....रसप....
३ डिसेंबर २०११

Wednesday, November 23, 2011

मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया - अनुवाद


मी जीवनास साथ देत धुंद चाललो
चिंता धुरात उडवुनी मी मुक्त चाललो

राखेस चाळणे पुन्हा असेच ना वृथा
शिशिरातुनी वसंत शोधुनी मी चाललो

जे लाभले मला मी त्यात हर्ष मानला
जे हरवले तयास विस्मरून चाललो

सुख-दु:ख हा फरकही जेथ जाणता न ये
माझ्या मनास तेथ घेउनी मी चाललो

मूळ गीत - साहीर लुधियानवी
अनुवाद - ....रसप....


मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुए में उडाता चला गया

बरबादियो का सोग मनाना फजूल था
बरबादियो का जश्न मनाता चला गया

जो मिल गया उसी को मुक्कदर समझ लिया
जो खो गया मैं उसको भूलता चला गया

गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहां
मैं दिल को उस मक़ाम में लता चला गया

- साहीर लुधियानवी

Tuesday, November 22, 2011

मीही बोलावे आता हा विचार आहे


मीही बोलावे आता हा विचार आहे
ऐकुन घ्या वा सोडुन द्या की, "सुमार आहे"
कितीक वर्षांपासुन तुमचे ऐकत आलो
आता मजला चुकते करणे उधार आहे

बालवयाचा असताना मी 'लहान' म्हटले
पोरवयाचा होता होता 'जवान' म्हटले
कधीच काही बोलायाला दिलेच नाही !
हुकूमशाहीला तुमच्या मी 'महान' म्हटले

जिकडे तिकडे तुम्हीच खुर्च्या धरून बसता
माझी तत्त्वप्रणाली ऐकुन खोचक हसता
तुमच्यामागे देश चालवुन काय साधले ?
चला, उठा, ना अडणे काही तुम्ही न असता

दमेकऱ्या, तू खोकुन घे जा तोंड दाबुनी
मधुमेह्या, तू अगोड हो जा सुया टोचुनी
लटपट लटपट पाय कापती बसल्या बसल्या
कसे जगाच्या याल तुम्ही जोडीस धावुनी ?

केवळ माझ्यासाठी आहे वेळ आजची
नको मला ती जीर्ण-शीर्णशी झूल कालची !
नसांत माझ्या सळसळते चैतन्य वाहते
बघुन थांबली मलाच दुनिया भोवतालची

मनात आता चंग बांधला, झुकणे नाही
खुरडत खुरडत असे चालणे जमणे नाही
आता घेतो उंच भरारी आकाशी मी
तुम्हासारखे कूपमंडुकी जगणे नाही  


....रसप....
२१ नोव्हेंबर २०११

Monday, November 21, 2011

मुर्दाड जीवनाला माझी दया न आली


मयुरेशच्या गझलेतील "मुर्दाड जीवनाला माझी दया न आली" ह्या मिसऱ्यावरून काही सुचलं - 

मुर्दाड जीवनाला माझी दया न आली
मी हार मानुनीही केल्या कितीक चाली

माझ्यासमोर गेली वस्ती जळून सारी
त्यानेच जाळले अन् बनला स्वत:च वाली

अंधार सांडलेला वाटेवरी कधीचा
माझीच सावलीही आता फितूर झाली

मी ऐकला पुन्हा तो हुंकार ओळखीचा
आनंद शोधताना ही वेदना मिळाली

पूर्वी इथेच होती छाया निवांत थोडी
आता जमीनही का अंगार तप्त व्याली ?

....रसप....
२१ नोव्हेंबर २०११

Saturday, November 19, 2011

गुज़ारिश - चित्रपट कविता


काजळकाळ्या रात्रीला चांदण्याचं स्वप्न
स्वप्नातल्या चंद्राला डागांचं खुपणं
निद्रिस्त शरीराची अस्वस्थ कुरबुर
पुन्हा एकदा मनामध्ये अव्यक्त हुरहूर

गिरवलेल्या नशीबानं फुटलेलं ललाट
उगाचच उजळणारी निर्लज्ज पहाट
लादलेलं अस्तित्त्व जगण्याची सक्ती
पुन्हा एकदा व्यापून उरलेली विरक्ती

दैवासमोर गुडघे टेकून थकलेले उपाय
चेहरा फक्त उरलेला, ना हात ना पाय
सुटकेच्या शेवटासाठी मिनतवाऱ्या करणं
पुन्हा एकदा क्षण क्षण जगून जगून मरणं

करोडोंतल्या एकाला करोडोंतला रोग
असामान्य कर्तृत्वाला गलितगात्र भोग
बुरसटलेल्या क्षितिजाची आभाळाला किनार
पुन्हा एकदा चुकवायचे अंधाराचे उधार ...

....रसप....
१९ नोव्हेंबर २०११

Thursday, November 17, 2011

सखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..


'त' वरून 'ताक-भात' तू झटक्यात ओळखायचीस
वाक्य संपायच्या आधीच पूर्णविराम द्यायचीस
पण आजकाल मी नवीन नवीन भाषा शिकलोय !
सखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..

दोन-तीन दिवसांचा चलपट डोळ्यात तू पाहायचीस
एक क्षण बघून, माझं स्वगत तूच म्हणायचीस
पण आजकाल मी काळा चष्मा लावायला शिकलोय !
सखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..

'सिनेमा मला आवडला का?' तूच मला सांगायचीस
हॉटेलमध्ये माझी ऑर्डर देऊन मोकळी व्हायचीस
पण आजकाल मी आवडीही नाकारायला शिकलोय !
सखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..

आता तू माझ्याकडून वदवून घेऊ शकत नाहीस
माझ्या मनातलं जाणून घेऊ शकत नाहीस
तुझ्यापासूनही बरंच काही लपवायला शिकलोय..
सखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..


....रसप....

Wednesday, November 16, 2011

गे माय मराठी..


गे माय मराठी शब्दफुलांचे हार तुला वाहतो
पदकमलांना क्षीरस्नान जणु नित्य तुझ्या घालतो
प्रसन्न होशी अम्हा पामरां आशिर्वच देऊनी
असेच राहो सदासर्वदा शब्दबहर उधळूनी

सह्याद्रीची भूमी नटली अभंग साहित्याने
शिवरायांनी येथ शिकवले जगणे अभिमानाने
वीर जाहले शूर जाहले रणांगणी जिंकले
विद्वानांचे ज्ञानदीपही चहूकडे उजळले

वसा घेतला जन्म आमुचा तुजसाठी वेचण्या
पाऊल येथून मागे नाही फक्त पुढे चालण्या
तुकाराम-ज्ञानबा माऊली अमुची श्रद्धास्थाने
आम्ही चालवू थोर वारसा नित्य पुढे "नेटा"ने

महाभागांनी अपुली वचने तशीच मागे घ्यावी
नवी पिढी ही फुसकी नाही उभी पाय रोवुनी
कंबर कसली रक्षण करण्या भाषा-साहित्याचे
समर्थ आम्ही नसांत अमुच्या तप्त रक्त वाहते


….रसप….

Tuesday, November 15, 2011

गीत मनाचे गात रहावे..


गीत मनाचे गात रहावे वेदनेतही पुन्हा नव्याने
चिंब भिजावे दु:ख बरसता पावसातही पुन्हा नव्याने
दु:खाला घेऊन सोबती पचवुन ठिणग्या दीप बनावे
तोच जिंकला पेटुन उठला जिद्दीने जो पुन्हा नव्याने

आयुष्याशी स्पर्धा करतो हरूनही जो पुन्हा नव्याने
वार झेलुनी उभा राहतो छाती काढुन पुन्हा नव्याने
दीप्ती ज्याच्या पराक्रमाची दिपवुन टाके आकाशाला
त्याच्यासाठी पहाट होते मावळूनही पुन्हा नव्याने

घसरण होता चालुन जातो शिखरावरती पुन्हा नव्याने
अभिमानाने पाय रोवुनी उभा राहतो पुन्हा नव्याने
डगमगतो ना यत्किंचितही वादळवाऱ्यांना खेळवतो
अघटित हरते, विजयपताका त्याची फडके पुन्हा नव्याने

काटा रुतता काढुन त्याला पुढे चालतो पुन्हा नव्याने
रक्ताळुनही पाउल ज्याचे वेग पकडते पुन्हा नव्याने
छायेखाली रमतच नाही मार्ग खुणावे सदैव ज्याला
त्याच्या पाउलखुणा उमटती वाटेवरती पुन्हा नव्याने

रंग-रंग लेऊन बघावा, रंग रंगतो पुन्हा नव्याने
गंध-गंधही टिपून घ्यावा, गंध गंधतो पुन्हा नव्याने
षड्जाच्या परमोच्च बिंदुला जपून घ्यावे अंत:करणी
चित्रमनोहर सुरेल गाणे जीवन बनते पुन्हा नव्याने


....रसप....
१४ नोव्हेंबर २०११

Saturday, November 12, 2011

रोजच उशीर होतो..!


किरकिर किरकिर गजर वाजतो भल्या पहाटे 'पिडतो'
'स्नूझ' करुन मी परत झोपतो रोजच उशीर होतो..!
खडबडून मग उठतो आणिक किती धावपळ करतो
नाश्ता सोडुन देतो कारण रोजच उशीर होतो..

कापुन घेतो हनुवटीस मी पटपट दाढी करतो
पाणी ओतुन बदाबदा मी 'बुडबुड गंगे' म्हणतो!
इस्त्री करतो शर्टाला अन तशीच पँट चढवतो
सॉक्स घालतो पुन्हा कालचे, रोजच उशीर होतो !

खिश्यात केवळ चिल्लर असून रिक्शाला थांबवतो
पुन्हा पुन्हा मी घड्याळ बघतो अन सुस्कारे देतो
कसाबसा तो चुकवून ट्रॅफिक स्टेशनला पोचतो
रुपया-रुपया मोजुन देता रोजच उशीर होतो

तोबा गर्दी भरलेली, मी पुन्हा पुन्हा चेंगरतो
गाडी माझी निघून जाते हताश मीही बघतो
लगडुन येते पुढची गाडी मीही तिला लगडतो
मुठीत घेतो जीव तरीही रोजच उशीर होतो  

सरतच नाही काम जराही फुरसत मला न मिळते
कँटिनमधल्या अड्ड्यांनाही मला न जाता येते
उगा जरासे गिळून तुकडे माझा लंच उरकतो
अड्डे जाती उठुन मला तर रोजच उशीर होतो

रात सावळी उरते माझा दिवस सुना मावळतो
पुन्हा लगडण्या गाडीला मी उलटपावली येतो
किती रिकामी गाडी असते चौथी जागा घेतो !
तिसऱ्या प्रहरी घरी पोचतो, रोजच उशीर होतो

असाच माझा रहाटगाडा थोडा कुरकुर करतो
पोटासाठी सगळी मरमर, मरत मरत मी जगतो
पेरुन स्वप्ने मिटतो डोळे, ग्लानी येउन निजतो
किरकिर किरकिर गजर वाजतो, रोजच उशीर होतो......

किरकिर किरकिर गजर वाजतो, रोजच उशीर होतो......!

....रसप....
१२ नोव्हेंबर २०११

Friday, November 11, 2011

.... असले काही उरले नाही.

तळमळ वाटुन जळजळ व्हावी असले काही उरले नाही
सुकी पापणी भिजून जावी असले काही उरले नाही

कधीकाळचा वैभवशाली देश भासतो अता भिकारी
गौरवगीते स्फुरून गावी असले काही उरले नाही

खड्ड्यांमधुनी रस्ता शोधू, नळास पाणी कुठून आणू?
उजेड पडुनी वाट दिसावी, असले काही उरले नाही

नाही ज्याला लाज मनाची, करेल सेवा काय जनाची?
भल्या-बुऱ्याची समज असावी, असले काही उरले नाही  

करांस साऱ्या मीच भरावे, सवलत घेउन कुणी खुलावे
श्रमांस माझ्या किंमत यावी, असले काही उरले नाही

"माझे-माझे" करता करता, मस्त तुंबड्या भरता भरता
गरिबाचीही व्यथा कळावी, असले काही उरले नाही

शिवबा व्हावा पुढच्या दारी, अम्हां मिळावा फक्त पुढारी
उत्क्रांतीची कास धरावी, असले काही उरले नाही   

डौल तिरंग्याला ना दिसतो, रंग-रंग का भिन्न वाटतो?
एकजूट ती पुन्हा बनावी, असले काही उरले नाही   

....रसप....
२० नोव्हेंबर २०११

Thursday, November 10, 2011

तुझ्या पत्रातला मजकूर..


लिफाफा पापण्यांच्यासारखा पाणावला होता
तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता

अहाहा ! वार तू सारे किती केलेस प्रेमाने
तुझा प्रत्येक वर्मी घाव मी लाडावला होता

कुणाला दु:ख ना झाले अरे मेलीच म्हातारी
खरे तर आज माझा काळही सोकावला होता

मनाचे मागण्याला हात जोडूनी किती आले
असा कोणीच नाही देव ज्याला पावला होता

कधी आयुष्य झाले शर्यती ठाऊक ना कोणा
इथे जो तो जगामागे अधाशी धावला होता

मला ज्यांनी दिले होते धडे बेताल होण्याचे
जगाला सांगती वेडा उगा नादावला होता

मलाही जीवघेणा छंद जोपासायचा होता
तुझ्या बाणांस झेलूनी 'जितू' वेडावला होता


....रसप....
९ नोव्हेंबर २०११

Wednesday, November 09, 2011

हार ना मी मानली


झेलताना वादळाला हार ना मी मानली
लोटले मी सागराला, हार ना मी मानली

पाठ माझी पाहुनी हल्ल्यास तो सरसावला
माफ केले भेकडाला, हार ना मी मानली

मी जिथे गेलो तिथे काटेच होते सांडले
पाहुनी एका फुलाला हार ना मी मानली

हा नशीबाचा रडीचा डाव आयुष्यासवे
जिंकुनीही हारण्याला हार ना मी मानली

चेहरा ओढून घे वा सजवुनी भांगास घे
पाळताना बंधनाला हार ना मी मानली

बोल तू बिनधास्त 'जीतू' शब्द होऊ दे सुरे
ऐकुनी निर्ढावण्याला हार ना मी मानली


....रसप....
८ नोव्हेंबर २०११

Tuesday, November 08, 2011

पैशासाठी अमेरिकेला इतके गेले - (विडंबन)


समाज अमुचा इतका पुढारलेला आहे
रॉक गायकाच्या डोईला शेला आहे

मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
हरकत नाही, "मंदिर" नामक ठेला आहे

पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
कर्जामध्ये गोराही बुडलेला आहे !

जेव्हा मिळते दर्शन नेत्यांचे जाणावे
निवडणुकीचा काळ नजिक आलेला आहे

गाडी माझी रोज थांबते बारसमोरी
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे

वाट पाहतो आहे, त्याने फोन करावा
यमास माझा मिस्ड कॉल गेलेला आहे

दुनिया इतकी कष्टी का हे विचारले मी
पुन्हा 'जितू'चा जन्म म्हणे झालेला आहे

मूळ रचना - 'बेफिकीर !'
विडंबन - ....रसप....
५ नोव्हेंबर २०११

मूळ रचना - "पैशासाठी अमेरिकेला इतके गेले.."

Monday, November 07, 2011

अशी वेदना माझी सुंदर !



अशी वेदना माझी सुंदर
मनात जपतो तिला निरंतर
बंद कुपी ही कस्तूरीची
दरवळते जणु सुगंध अत्तर

हिची कहाणी कुणा न कळली
जिथे पेटली तिथे उजळली
तिमिरशांततेला भेदूनी
पवित्र ज्योती कशी उमलली

डोळ्यांमधले अमृत टिपते
घावांतुन मकरंद प्राशते
काळाच्या झळयांना सोसुन
कनकासम ही चमचम करते

पाहुनिया स्वप्नांची शकले
नजरेचे ह्या पाउल थिजले
पुढे वेदना सरली माझी
तुकड्यांना त्या पुन्हा जोडले!

एकांताचे गाणे बनते
नभास साऱ्या व्यापुन उरते
जीवनवाटेवरी कोरड्या
रिमझिम रिमझिम कधी बरसते


....रसप....
१७ ऑक्टोबर २०११

"मराठी कविता समूहा"च्या "कविता-विश्व"च्या दिवाळी अंक - २०११ मध्ये प्रकाशित.

Sunday, November 06, 2011

एका दुपारी..


दिवाळीची सुट्टी..!!
मी टीव्हीवर मॅच पाहात बसलो होतो.
जेवण आटोपून..
तोच.. “काकू..” हाक आली..
घराबाहेरून
पाठोपाठ बेलही वाजली,
“टिंग टॉंग”
दुपारी २:३० ला कोण आलंय..??
मी परेशान !

दार उघडून पाहिलं..
गेटबाहेर दोन मुलं..
८-१० वर्षांची मुलगी अन् ५-६ वर्षांचं दूधखुळं
मळकट कपडे अन् कळकट अवतार
अनवाणी पाय अन् डोळे लाचार ..!

“काय हवंय?”.. माझा प्रश्न
ताबडतोब उत्तर - “फटाके द्या ना..!!”
“फटाके..?? आम्ही आणत नाही.
आमच्याकडे कुणीच फोडत नाही”
“एक तरी द्या ना..!!”, लहानगं बोललं.
“खरंच नाहीयेत..”
पण त्यांना ना ते पटलं..
प्रश्नार्थक नजर अपेक्षेने बघत होती
आणि मी दार लावून घेतलं

मॅचमधलं लक्ष लगेच उडून गेलं
खिडकीमधून पुन्हा मी घराबाहेर पहिलं
दोन्ही मुलं गेटबाहेर तशीच उभी होती
माझं दुमजली घर निरखून पाहात होती

“माजोरडा कुठला....एवढं खोटं बोलतो..??
द्यायचे नाहीत म्हणून "आणलेच नाहीत" सांगतो..!!
दोन-चार फटाक्यांनी काय फरक पडला असता..
ह्यांच्या डबल बार मध्ये एक सिंगल आमचाही असता..”
- मला त्यांचं स्वगत ऐकू येत होतं
ती पुढच्या घराकडे गेली
पण माझं मन त्याच विचारात होतं

“घरी काय जेवली असतील??
चकली-चिवडा-लाड़ू..??
की फटाके मागितले म्हणून 'धम्मक लाडू'..?
दिवाळीचे फटाकेच मागावेसे वाटावे..??
फराळाचे पदार्थ त्यांना मिळत असावे?
शाळेला दिवाळीची सुट्टी असेल की-
अजून हातात पुस्तकच घेतलं नसेल..??

अनेक प्रश्नांनी घेरलं.. पण सत्य एकच होतं-
घृणास्पद प्रदर्शन आपण मांडत असतो लोकांसमोर ..
खऱ्या/ खोट्या ऐश्वर्याचं..
आसमंत दणाणून काय साधत असतो..??

दिवाळी म्हणजे फटाके हा समजच आता रुढ झालाय का??
पोटची आग शमवण्यापेक्षा ती दारू जाळण्याची हौस का?


....रसप....
६ नोव्हेंबर २०११

Saturday, November 05, 2011

उत्तरांचं दुकान!!


कधीही.. कुठेही.. कसेही..
प्रश्न उपलब्ध आहेत;
अगदी विनामूल्य....
मुबलक प्रमाणात
तुमचा साठा संपायच्या आत
अगदी घरपोच....दारात..
"फ्री होम डिलिव्हरी..!!"
पण शोधूनही सापडत नाही
ते उत्तरांचं दुकान....
उणीव नाही माझ्याकडे उत्तरांची
पण ती जुळत नाहीत पडलेल्या प्रश्नांशी....
आहे का कुणाला ठाऊक
असं एखादं दुकान
जिथं उत्तरं बदलून मिळतील..?
किंवा नवीन विकत मिळतील....?
जी आपल्या प्रश्नांशी जुळतील!
बंद कुलुपाची किल्ली बनवतात ना,
अगदी जुळवून.. तसं..!

नाही ?
मग ते प्रश्नांचं दुकान कुठे आहे सांगा...
च्या मारी.. आगच लावून टाकतो....!!

....रसप....
५ नोव्हेंबर २०११

Thursday, November 03, 2011

माजं साजरं शिवार



काली काली माजी माय
माजा येकला आधार
मनामंदी डोले माज्या
माजं साजरं शिवार

क्येला रगुताचा घाम
जाली खरीपाची ज्वार
दानं तांबडं पिकवी
माजं साजरं शिवार

कपाशीचं श्येत पहा
ढगावानी मऊशार
फुलाफुलाला हासवी
माजं साजरं शिवार

मोट पानी देई धो-धो
जनू अमृताची धार
सोन्या-चांदीनं सजलं
माजं साजरं शिवार

बैलजोड ऐटबाज
ज्वोर पावलात फार
येका दिसात नांगरी
माजं साजरं शिवार

डोईवर उन्हं येता
आंब्याखाली वाटे गार
कसं निवांत दिसतं
माजं साजरं शिवार

येता कापनीची येळ
माज्या डोळां लागे धार
दिसे कोरडं बोडकं
माजं साजरं शिवार

माजं साजरं शिवार
करी सपान साकार
भुलवितं दुख सारं
माजं साजरं शिवार


....रसप....
३ नोव्हेंबर २०११

Wednesday, November 02, 2011

कधी ना बोललो जे मी..


कधी ना बोललो जे मी तुला थोडे कळावे का ?
मुक्याने एकटे माझ्या मनाशी मी जळावे का ?

कितीही धावला पाहून येत्या वादळाला तू
नशीबी जे तुझ्या आहे कधीही ते टळावे का ?

किती साऱ्या अपेक्षांना दिली नावे सिताऱ्यांची
तुझ्या नावासवे प्रत्येक ताऱ्याने गळावे का ?

उभे तारुण्य नजरेला कधीही फेकले नाही
अरे आता पिकाया लागल्यावरती चळावे का ?

तुझ्यासाठीच खोळंबून होती रात्र ही वेडी
जराश्या चाहुलीला ऐकुनी आता ढळावे का ?

तुला मी शोधतो येथे-तिथे नाहीस कोठेही
तरीही साद तू देऊन स्वप्नांना छळावे का ?

जिवाची काहिली होते तुझ्या अश्रूंस पाहूनी
मिनतवाऱ्या करूनीही निखारे ओघळावे का ?

तुझ्या शौर्यापुढे 'जीतू' जगाने हार मानावी
प्रियेला पाहुनी पुरते असे तू पाघळावे का ?


....रसप....
२ नोव्हेंबर २०११

Monday, October 31, 2011

तिच्या डोळ्यात ओलावे..



तिच्या डोळ्यात ओलावे जरासे बोचरे होते
कधी खोटे कुणासाठी कधी थोडे खरे होते    

असा का पारखा झाला मला हा आरसा माझा
मला पाहून का त्याने उठवले हे चरे होते?

मनाचे खेळ हे सारे मनालाही न समजावे
पराभूतासमोरी का विजेते बावरे होते ?

नव्या देशात माणुसकी नसावी ईश्वरालाही
नव्याने ते पुन्हा माझे जुने होणे बरे होते

तिच्या हातून मरण्याची मजा ती वेगळी होती
तिच्या ओठावरी मी रंगणेही साजरे होते


....रसप....
३१ ऑक्टोबर २०११

Monday, October 24, 2011

मोडला “कणा”

सर्वप्रथम कवीवर्य कुसुमाग्रजांना अभिवादन.
क्षमस्व.


"सोडताय का सर मला"
-जोडून हात दोन्ही
इस्त्री उतरल्या कपड्यांमधली
मूर्ती केविलवाणी

पळभर श्वास रोखून बॉस
बोलला वरती पाहून,
"Reports अजून दिले नाहीस
चाललास कुठे पळुन ?

सकाळपासून PC तुझा
मांडीत घेउन बसलास
काम अर्धे आहे तरी
येऊन उभा ठाकलास?

जबाबदारीची जाण नाही
घड्याळ बघत बसतोस
F.T.R. "झीरो" तुझा
नुसतेच दिवस भरतोस ..!!

बैलासारखी कामं करता
डोकं जरा वापरा
५:३० ला घोड्यावर बसता
आधी खाली उतरा..!!"

'बैल' म्हणताच शेळीच्या त्या
डोक्यात तिडीक गेली
कुणास ठाऊक त्याच्यात इतकी
हिंमत कुठून आली....!

झटक्यासरशी जीभ उचलून
त्याने टाळुस लावली
"रेकॉर्ड्स काढून पाहा माझे
सुट्टी कधी घेतली ?

सहा महीन्यात घरी,
मी वेळेत गेलो नाही
बायको-मुलं रुसून बसलीत
घरात संवाद नाही

मंद झाली बुद्धी आता
राब राब राबुन
लक्ष्मी माय देई आम्हा
तरी दर्शन दुरून..!!

दिवस दिवस झिज-झिज झिजून
मोडला जरी कणा
पाठीवरती हात ठेवून
नुसते "मर" म्हणा..!!"


....रसप....

Sunday, October 23, 2011

प्रवासी


लेउनी रंगांस तिन्हीसांज झाली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

मी मनाशी दु:ख जपावे कशाला
पाहिले येथेच सुखाच्या उद्याला
वेदना आनंद मला देत गेली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

बंधने तोडून असा व्यक्त झालो
त्या पतंगाच्या सम मी मुक्त झालो
झुळुक आली तीच खरा जोर झाली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

जोखले वाटांस नव्या आवडीने
अन् प्रवासी मी बनलो आवडीने
पावले माझी इथली खूण झाली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

....रसप....
२३ ऑक्टोबर २०११
(गालगागा गाल लगा गालगागा)

(मला अनुभव नाही... पण सन्यासाश्रमाकडची वाटचाल काहीशी अशीच असावी..) 

Saturday, October 22, 2011

वाट प्रकाशात न्हाली........!!


मिट्ट काळोखी रात्र
ओघळणाऱ्या प्राजक्तासारखी हळूहळू सरली..
आणि पोपडे निघालेली कोरडी पापणी
नकळतच मिटली

आजचा पहाटवारा नेहमीसारखा बोचत नव्हता
भयाण शांततेचा सूर शूलासारखा टोचत  नव्हता

आजची रात्र शेवटची होती
आणि होणारी सकाळ पहिली होती
सगळे पाश आपोपाप... स्वत:च गळून पडले होते
संवेदनांच्या सुन्नतेपुढे दु:खसुद्धा हरले होते

पुन्हा एकदा मी बोलू शकत होतो
मनातलं... मनालाच सांगू शकत होतो
डोळ्यात रुतलेल्या काचा
आणि हृदयात फुलेल्या जखमा
आता किरकोळ होत्या
आजच्या अधांतरी विहरण्याच्या आनंदापुढे
त्या फुटकळ होत्या !!

तांबड्या कोवळ्या अंधारात
माझी दृष्टी स्पष्ट झाली..
आणि क्षितिजापुढे जाणारी ती
वाट प्रकाशात न्हाली........!!


....रसप....
२० ऑक्टोबर २०११

Thursday, October 20, 2011

बेसन की सोंधी रोटी पर.... - भावानुवाद


"निदा फाजली" ह्यांची एक अप्रतिम कविता वाचनात आली. कविता इतकी सुंदर आहे की अनुवाद करावा की नाही असा प्रश्न पडला. गेले दोन-तीन दिवस पुन्हा-पुन्हा वाचली.. किमान २५ वेळा तरी.. तेव्हा कुठे जराशी हिंमत आली अनुवादाचा प्रयत्न करायची. मला जाणीव आहे की माझा प्रयत्न अगदीच बाष्कळ असेल.. तरी मूळ कवितेचा अंशभर सुगंधही माझ्या अनुवादात उतरला तर मी समजेन की मी ह्या प्रयत्नात यशस्वी झालो!

बेसन की सोंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ ,
याद आता है चौका-बासन, चिमटा फुँकनी जैसी माँ ।

बाँस की खुर्री खाट के ऊपर हर आहट पर कान धरे ,
आधी सोई आधी जागी थकी दुपहरी जैसी माँ ।

चिड़ियों के चहकार में गूँजे राधा-मोहन अली-अली ,
मुर्गे की आवाज़ से खुलती, घर की कुंड़ी जैसी माँ ।

बीवी, बेटी, बहन, पड़ोसन थोड़ी-थोड़ी सी सब में ,
दिन भर इक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी मां ।

बाँट के अपना चेहरा, माथा, आँखें जाने कहाँ गई, 
फटे पुराने इक अलबम में चंचल लड़की जैसी माँ ।


- निदा फाजली

भावानुवाद :

पोळी-चटणीची आंबटशी गोडी भासे माझी आई
पाहुन चिमटा चौरंगाला मज आठवते माझी आई

पहुडुन खाटेवर काथ्याच्या खुट्ट वाजता खुले पापणी
श्रांत दुपारी अर्धी-मुर्धी सावध निजते माझी आई

चिवचिव चिमण्या साद घालती "राधा-मोहन अली-अली" ची
पहाटवेळी आरव ऐकुन कवाड उघडे माझी आई

कितीक नाती वेगवेगळी, कितीक रूपे तिने वठवली
तारेवरची रोजरोजची कसरत जगते माझी आई

तुकड्यांमध्ये वाटुन उरली कुणास ठाउक कुठे कितीशी?
जुन्या फाटक्या छबीत अल्लड मजला दिसते माझी आई


मूळ कविता - "बेसन की सोंधी रोटी पर...."
मूळ कवी - निदा फाजली
भावानुवाद - ....रसप....
२० ऑक्टोबर २०११

Wednesday, October 19, 2011

"लेक लाडकी " - एक अभूतपूर्व ई-पुस्तक



जग पुढारलं आणि पृथ्वी म्हणजे एक लहानसं खेड झालं. आंतरजालासारखी जादूची कुपी हाती आली. एका क्लिकवर सगळं समोर यायला लागलं. मराठी साहित्यही याला अपवाद राहीलं नाही. मराठी कविता, मराठीतलं उत्तमोत्तम साहित्यही नेटवर उपलब्ध होऊ लागलं. 

जागतिकीकरण झालं आणि मराठीचा वारू काहीसा थंडावला. पण अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या मायमराठीचे शिलेदार लेचेपेचे नव्हते, होणाऱ्या बदलाच्या झंझावातात वाहून न जाता त्याच्यासमोर उभे राहून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मराठी साहित्याने कात टाकली. अश्याच बदलाच्या कालखंडात "ऑर्कुट" या सोशल नेट्वर्किंग साईट वर जन्म झाला "मराठी कविता समुहाचा". अल्पावधीतच हा समूह लोकप्रियही ठरला. यामागे मुख्य कारण होते ते या समूहावर चालणारे सर्वसमावेशक उपक्रम. लोकांना लिहितं आणि हो, वाचतंही करणारं दर्जेदार साहित्य.
या दर्जेदार लिखाणाचं चीज व्हायला हवं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले प्रयत्न आणि ही प्रतिभा पोचायला हवी. म्हणून मग संकल्पना पुढे आली ती "ई-बुक" ची. जास्तीत जास्त लोकांपुढे, विशेषतः तरुण लोकांपर्यंत पोचण्याचा हा अतिशय प्रभावी मार्ग!!


 "लेक लाडकी "

                       आपल्या घराची लेक, हा प्रत्येक घराचा एक हळवा कोपरा असतो, लेक घराची  मर्यादा असतेच पण घराचा अमर्याद आनंदही असतो.

                       मुलीची नाळ घराशी दोनदा तुटूनही घट्ट बांधलेली असते, दोनदा ती नाळ तोडली जाते. एकदा जन्म घेतल्यावर अपरिहार्य असते म्हणून आणि दुसरी लग्न करून ती दोन घर सजवणार असते म्हणून. पण कसेही, कस्सेही असले तरी आयुष्याच्या कुठच्याही टप्प्यावर तिला "माहेर" ही तीन अक्षरं मोहिनी घालतात, हळवं करतात म्हणून घराला मुलगी हवीच ! आज मुलींची चिंताजनक संख्या, आणि स्त्री भ्रूण हत्ये विरोधात इंटरनेटच्या प्रभावी माध्यमातून काहीतरी करता याव, प्रत्येकाच्या मनातला एक हळवा धागा पकडून मुलगी ही उद्याच्या समाजाचा मुलभूत आधार आहे हे सांगावं ह्यासाठी "मराठी कविता समूहा"ने राबवलेला अजून एक दर्जेदार उपक्रम "लेक लाडकी ". ज्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला, म्हणूनच ई- बुक क्षेत्रात आम्ही उतरायचं ठरवलं ते "लेक लाडकी "या ई बुकच्या  रूपाने.

ह्यात मिळतील, लेकीच्या भावविश्वात रममाण झालेले, तिच्या पंखात ताकद देणारे, तिच्या कर्तृत्वावर कौतुकाची झळाळी चढवणारे आणि सासरी चालेल्या तिला पाहून हळूच डोळे टिपणारे "असंख्य लेकींचे आई बाबा "

तुम्हाला ते नक्की आवडतील ही खात्री वाटते, तरीही या प्रयत्नात काही कमी-अधिक झाल्यास किंवा न्यून राहिल्यास तुम्ही ते निदर्शनास आणून द्याल ही अपेक्षा. 


या अंकाचा आनंद घ्या.  इथे - 

आणि 



अभिप्राय द्यायला विसरू नका. 
इथे - "मराठी कविता समूह" संचालक मंडळ.

शब्दांकन - अनुजा मुळे 

Tuesday, October 18, 2011

मनात स्वत:शीच हसता का?


रोज सकाळी तुम्ही स्वत:ला आरश्यात बघता का?
आरश्याकडे बघून मनात स्वत:शीच हसता का?

पुन्हा एकदा एक नवीन सूर्य तुमची वाट पाहात असतो
तुमच्या रस्त्यावरती उजेडाच्या पायघड्या पसरून बसतो
नवीन फुललेल्या कळ्यांसारखी डोळ्यांत स्वप्नं माळता का?  
सूर्याकडे बघून मनात स्वत:शीच हसता का?

गरम चहाच्या घोटासोबत सुस्ती उतरत जाते
कुठलंसं गाणं डोक्यात रुंजी घालत असते
शब्द काही आठवत नाहीत, पण गाणं पूर्ण करता का?
चहाकडे बघून मनात स्वत:शीच हसता का?

नेहमीच तुमची ऑफीससाठी टंगळमंगळ असते
ढकलत ढकलत बायको तुम्हाला बाथरूममध्ये लोटते
नाईलाजाने का होईना, चकाचक तयार होता का?
बायकोकडे रागाने बघून मनात स्वत:शीच हसता का?

"आपल्याएव्हढं अख्ख्या जगात कुणीच सुखी नाही"
इतकं ज्याला कळलं त्याला काहीच कमी नाही!
कुणा दु:खी मित्राच्या खांद्यावर हात ठेवता का?
त्याचं हसू बघून मनात स्वत:शीच हसता का?

खूप थकता, खूप झिजता, आजचा दिवस कठिण जातो
पण बायको-मुलं पाहताक्षणी पुन्हा एकदा उत्साह येतो
मेहनतीच्या थकव्याने शांत झोपी जाता ना?
रोज सकाळी तुम्ही स्वत:ला आरश्यात बघता ना ?
आरश्याकडे बघून मनात स्वत:शीच हसता ना ?


....रसप....
१५ ऑक्टोबर २०११

Monday, October 17, 2011

बिन फटाक्यांची अजून एक दिवाळी



खात्यामध्ये खडखडाट
तरी दारामध्ये दणदणाट
इंव्हर्टरच्या वीजेचा
गल्लोगल्ली लखलखाट

झगमगाट.. दणदणाट..
आनंद साजरा करणं हेच का..?
अरे.. कानाचे पडदे फाडणं
ह्यात कसला आनंद??
हा कोणता सण..??

पणत्यांच्या माळांचा सण हा
रोषणाईचा नव्हे..
उत्साहाचा..फराळाचा सण हा
आतषबाजीचा नव्हे..

दरवर्षी वाटतं..
चार दिवस फिरायला जावं
कोलाहलापासून दूर राहावं..

पण...
माझंही घर झगमगतं..
अन् मला अडवून ठेवतं..

बिन फटाक्यांची अजून एक दिवाळी
मी साजरी करतो
आणि चार दिवस ऑफीस नाही
ह्याच आनंदात डुंबतो..!!


....रसप....

Sunday, October 16, 2011

अशीच येते उडुन कुठुनशी !


अशीच येते उडुन कुठुनशी समोर माझ्या बसती होते
माझ्या हातुन कविता माझी खुद्द स्वत:ला लिहिती होते


कधी सुरावट गुणगुणते ती खुदकन हसते जशी पाकळी
कधी मोहिनी पाडुन मजला डौलदार चालते सावळी


चिमटीत जैसे फुलपाखरू तसे जाणते भाव मनाचे
मायेच्या एका शब्दाने ताण हारते जणू तनाचे


सदैव असते सोबत माझ्या श्वासांमधुनी तीच वाहते
तिला ऐकतो, तिला पाहतो, स्पर्शातुनही ती जाणवते


गडगडत्या मेघांत नाचते खळखळत्या पाण्यात खेळते
चिंब भिजविण्या पाउस बनुनी कविता माझी धुंद बरसते



....रसप....
१६ ऑक्टोबर २०११

Saturday, October 15, 2011

शौर्यप्रभू


रणशिंग फुंकले ठाण मांडले घोडखिंड अडवुनी
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी

अस्मान फाटले तरी न ढळता थोपवून ठेवू
अंश अंश लढवुनी भूवरी रुधिराला शिंपडू
खान न जाऊ शकतो येथून आम्हा ओलांडुनी
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी

जन्म वाहिला तव सेवेला मान प्रार्थनेला
वडील आम्हा जाणुन माना अमुच्या आज्ञेला !
भले थोरले स्वराज्य आहे अमुच्या प्राणाहुनी
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी

अपुली भूमी अमुचा राजा प्राणाहुन प्रियतम
हेच आमुच्या बुलंद भक्कम मानाचे उद्यम
हर हर हर हर महादेव जयघोष भरू गगनी
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी

रात ही काळी तलवारीच्या पातीने उजळवू
यमदेवाही क्षणभर अमुचे रौद्ररूप दाखवू
अमुची छाती भेदून जाईल बाण तो बनला नाही
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी


....रसप....


Thursday, October 13, 2011

मी नसतो तेव्हा.. (थोडासा "माज"..!! )



मी नसतो तेव्हा पाउल माझे शोधत सारे फिरती
पाउलरेषा पोहोचवती त्या अनंत क्षितिजापुढती


मी नसतो तेव्हा सारे माझ्या जागी बसून बघती
अन जमलेल्या मैफलीतसुद्धा रंग-जान ना मिळती !


मी नसतो तेव्हा तप्त कोरडे वारे जळजळ करती
खदखदत्या संतापाला उधळत दिशा-दिशांना फिरती


मी नसतो तेव्हा नकली हासुन कळ्या उदासी फुलती
दवबिंदू म्हणते दुनिया पण ते अश्रू चमचम सजती


मी नसतो तेव्हा शब्दच माझे सर्वदूर दरवळती
हे खुळे-दिवाणे शायर त्यांना गुंफुन कविता म्हणती


....रसप....
१३ ऑक्टोबर २०११

Wednesday, October 12, 2011

ह्या पहाटेच्याच वेळी रोज माझी रात होते


आठवांची आठवांशी भेट आवेगात होते
ह्या पहाटेच्याच वेळी रोज माझी रात होते


दो घडीचा खेळ माझा मांडला रंगून येथे
हारणेही जिंकल्याच्या खास आवेशात होते


वाचले होते कधी तू सांग डोळ्यातील माझ्या
बोललो तर वाटते की ही फुकाची बात होते ?


संपला हकनाक तू देशावरी ह्या भेकडांच्या
ती स्मृती प्राणार्पणाची साजरी गावात होते  


जे कधी जमलेच नाही तेच करणे भाग झाले
सत्य झाकावे किती जे समजणे ओघात होते


ध्वस्त झाले सर्व काही वेचतो अवशेष आता
वाटले जे झुळुकवारे तेच झंझावात होते


भोगले ऐश्वर्य ज्याने पाहिला तो खंगलेला
हाल कुत्रे खाइना त्याचे असे हालात होते


मैफली होऊन गेल्या पण अशी झालीच नाही
ऐकणारे सोबतीने भैरवी ही गात होते 


चूक झाली हीच माझी ठेवला विश्वास 'जीतू'
दावले ते वेगळे हे चावण्याचे दात होते


....रसप....
१२ ऑक्टोबर २०११ 

Tuesday, October 11, 2011

जगजीत सिंग Jagjit Singh

स्वराधीन आरास जगजीत होता
मनातील आवाज जगजीत होता


दुखी जीवनाचा कधी भार होता
पुन्हा आस देण्यास जगजीत होता


जसा धुंद वारा सुगंधास उधळी 
नशीली तशी बात जगजीत होता 


कधी चांदण्याची, कधी आवसेची
कधी दाटली रात जगजीत होता 


जगावी गझल जीवनाची सुरीली
तुला अन मला गात जगजीत होता


जलोटा असो वा हसन वा अलीही
परी एकटा खास जगजीत होता



....रसप....
११ ऑक्टोबर २०११

Monday, October 10, 2011

जरी म्हणालो सुखात आहे..



जरी म्हणालो सुखात आहे, तरी वेदनेस काय सांगू
मनात माझ्या कितीक जपल्या, नवीन जखमेस काय सांगू


नकोच होती सहानुभूती मला जगाची उधार म्हणुनी
झुगारले मी तरी पाहती, खजील नजरेस काय सांगू?


इथेच होता मला लाभला निवांत वेळी कधी निवारा
पोखरलेल्या अवशेषांच्या सुन्या शांततेस काय सांगू ?


बंध रेशमी जपण्यासाठी झटलो होतो मीच नेहमी
निर्विकारतेने तू धागे कसे तोडलेस काय सांगू?


उगाच खोटा करुन चेहरा मला हासणे जमतच नाही
खोड जित्याची ना सरणारी, अश्या उणीवेस काय सांगू?


....रसप....
१० ऑक्टोबर २०११

Saturday, October 08, 2011

ती बघते तेव्हा..!



ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे
अंतरात माझ्या श्याम बोलतो "राधे... राधे.. राधे...!"


ती बघते तेव्हा गंध प्यायले रंग उधळती वारे
मज वाटे रंगित, गंधित, धुंदित भवतालीचे सारे


ती बघते तेव्हा असे वाटते बघून बघतच राहो
क्षण एक आज हा इथेच ऐसा क्षणभर थांबुन राहो


ती बघते तेव्हा विशाल अंबर पायी लोळण घेते
प्राशून सागराला मी उरतो मुठीत धरणी येते


ती बघते तेव्हा लाजलाजरे गाल गुलाबी होती
मधुशाला सारी जणू मांडली लाल रसील्या ओठी


ती बघते तेव्हा हृदयामधुनी तीर पार तो जातो
मी 'हाय' बोलुनी पुन्हा पुन्हा तो छातीवरती घेतो


ती बघते तेव्हा शब्दांचाही गोंधळ थोडा उडतो
अर्थास शोधणे व्यर्थच होते, फक्त पसारा उरतो !



....रसप....
८ ऑक्टोबर २०११


"ती रुसते तेव्हा.." 
"ती रुसली तेव्हा.." 
"ती हसते तेव्हा"
"ती नसते तेव्हा.."

Wednesday, October 05, 2011

तुझे ते मला पाहणे काय सांगू?


तुझे ते मला पाहणे काय सांगू?
गुलाबापरी लाजणे काय सांगू ?

तुझा तीर मी झेलताना हसावे
असे वार सांभाळणे काय सांगू?

मिळावा जरासा मलाही दिलासा
अबोला तुझा साहणे काय सांगू?

कधी मोरपंखी तुझा स्पर्श होता
शहारा उठे! कारणे काय सांगू?

मधू अमृताला जणू प्यायलो मी
तुझे ओठ गंधाळणे काय सांगू!!


....रसप....
५ ऑक्टोबर २०११

Monday, October 03, 2011

ती भेटते, हरवून जाते



एकट्याने आठवांना चाळवूनी जागतो मी
रातराणी माळुनी ती रात गंधाळून येते
"थांब रे थोडे क्षणा तू", आपल्याशी बोलतो मी
तार स्वप्नी छेडुनी ती भेटते, हरवून जाते

सागराच्या हासण्याला अर्थ होता गूढ काही
एक वेडी लाट माझी पावले स्पर्शून जाते
वाटते की स्पर्श ओला हा तिचा, पण तीच नाही
पापणी ओलावुनी ती भेटते, हरवून जाते

शब्द माझे सूर माझे साज गातो ही विराणी
ऐकुनी माझ्या व्यथेला वेदनाही दाद देते
पण कधी गाणार मी ती धुंदशी शृंगारगाणी
प्रश्न करण्या हाच का ती भेटते, हरवून जाते ?

थांबल्या नाहीत वाटा  मीच आहे थांबलेला
ह्या पहाटेच्याच वेळी रोज माझी रात होते
जीवनाशी पाठशिवणी खेळ माझा चाललेला
आस देण्याला मला ती भेटते, हरवून जाते..


....रसप....
३ ऑक्टोबर २०११



Saturday, October 01, 2011

ती नसते तेव्हा..



ती नसते तेव्हा नजर बावरी होते, भिरभिर करते
मी माझा हसतो, बसतो, बघतो; लक्ष कशातच नसते


ती नसते तेव्हा अंगावरती भिंती धावुन येती
पाहून उंबरा उदासवाणा बंद कवाडे होती


ती नसते तेव्हा गुलाबगाली दहिवर का चमचमते?
का सुगंध शोधत झुळुक मंदशी एकटीच झुळझुळते?


ती नसते तेव्हा मनात माझ्या खळकन काही तुटते
पण कुणास माझी वेडी तळमळ बघूनही ना दिसते


ती नसते तेव्हा वाळूवरती नाव तिचे मी लिहितो
तो खळखळ करुनी धावत येतो, सारे मिटवुन जातो


ती नसते तेव्हा रात्र गोठते, सरूनही ना सरते
आकाश सांडते भवताली काहूर दाटुनी येते


ती नसते तेव्हा मिटता डोळे समोर येवुन बसते
ती बोलत काही नाही मजला क्षणभर हसवुन जाते


....रसप....
१ ऑक्टोबर २०११

"ती रुसते तेव्हा.." 
"ती रुसली तेव्हा.." 
"ती हसते तेव्हा"
ती बघते तेव्हा..!

Thursday, September 29, 2011

माता न तू वैरिणी !! (सुनीत)


माते जन्म दिलास तू परि तुला होती कधी काळजी
माया ना ममता कधी न दिधली सोडून गेलीस जी
लोकांनी मज बोल येथ कसले होते बहू लावले
का नाही वदलीस तू परतुनी की मी न होते तुझी


त्यावेळी मज वाटले नशिब हे आहे अता भोगणे
आशाही नव्हती मला पुसटशी संपून गेले जिणे
अंधारात मला तिरीप दिसली होते कुणी लाभले  
बोटाला पकडूनिया शिकविले त्यांनी मला चालणे  


आता मी परिपूर्ण खास बनले जिंकून साऱ्या व्यथा
देती लोक पहा उदाहरण हे सांगून माझी कथा
सारे श्रेय परी नसेच मम ही त्या सज्जनांची कृपा
ते होते झिजले मला घडविण्या, होतेच मीही वृथा


दावा का करतेस तू फुकटचा 'माझीच कन्या गुणी'
नाही प्रेम मनी तुझ्या फसविशी, माता न तू वैरिणी !!


....रसप....
२९ सप्टेंबर २०११

"मराठी कविता समूहा"च्या "काव्य छंद - भाग ३ (सुनीत)" साठी सुनीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
वृत्त - शार्दूलविक्रीडित

Wednesday, September 28, 2011

बिजली (आयटम साँग)

पार्श्वभूमी -

डि'मेलो गँग चा वाढता उपद्व्याप सुरक्षा यंत्रणेसाठी एक मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. मुंबईचे पोलीस कमिशनर अरविंद मोहिते गृहखात्याला आश्वासन देतात की लौकरात लौकर ह्या गँगच्या मुसक्या बांधण्यात येतील. एसीपी जयराज शिर्के, मोहितेंच्या टीममधील एक तडफदार ऑफिसर. त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाते. एका स्पेशल टास्क फोर्स ची स्थापना होते. ह्या एसटीएफ ला काही विशेष अधिकार, खास शस्त्रास्त्रं दिली जातात. मोहीम कशी राबवायची हे सर्वस्वी जयराज ठरवणार.
जयराज डि'मेलो गँगबाबत खडान् खडा माहिती गोळा करतो.
डि'मेलो, अंमली पदार्थ आणि हत्यारांच्या स्मगलिंग मध्ये मुरलेला एक 'मुरब्बी' डॉन. ह्याचे तीन एक्के आहेत. पुष्कर, अश्विन आणि जेम्स. तसं पाहता डि'मेलो गँगचे सगळे धंदे हेच तिघं सांभाळतात. सर्व निर्णयसुद्धा हेच घेतात. आतली खबर ही असते की हे तिघेही डि'मेलो चा काटा काढायचं ठरवून असतात. "सगळा कारभार आपण सांभाळायचा आणि डि'मेलोने थायलंड मध्ये बसून ऐश करायची? चालायचं नाही." प्लान ठरवला जातो. पुष्कर एका महत्त्वाच्या डीलिंगबाबतच्या चर्चेसाठी थायलंडला जाणार असतो. तिथेच एक खोटं गँगवॉर घडवून डि'मेलोचा काटा काढायचा. दाखवायचं असं की, प्रतिस्पर्धी अक्रम गँगने हे सगळं घडवून आणलं. पुष्कर रवाना होतो.
पण ह्या प्लान मध्ये एक छुपा प्लानही असतो.. डि'मेलो सोबत पुष्करलाही उडवायचा!
आपल्या जबरदस्त 'खबरी नेटवर्क' साठी प्रसिद्ध असलेला जयराज, ही सगळी माहिती मिळवतो आणि एक तिसराच प्लान शिजवतो! ह्या गँगमध्ये अंतर्गत बंडाळी माजवायची.. आपसांत लढवायचं, एकमेकांना मारू द्यायचं आणि उरलेल्यांना आपण टिपायचं! अश्विन आणि जेम्स च्या 'छुप्या प्लान'बाबत पुष्करपर्यंत माहिती पोचवली जाते. डि'मेलो मारला जातो आणि शातीर दिमाग पुष्कर मरायचं ढोंग करतो. जयराज, अश्विन आणि जेम्स सकट साऱ्या जगासाठी पुष्कर मरतो. डि'मेलो गँगची सर्व सूत्रे आता अश्विन आणि जेम्स कडे येतात.
जयराज आणि त्याची टीम एक एक करून डि'मेलो गँगच्या महत्त्वाच्या लोकांना टिपायला सुरू करतात. त्यांच्या काही महत्त्वाच्या सौद्यांनाही मोडून काढतात.
आणि एक दिवस जयराजला समजतं की 'तारांगण' बारमध्ये एक खूप मोठा सौदा होणार आहे, त्यासाठी स्वत: अश्विन व जेम्स येणार आहेत.
बस्स.. धिस इस द डि-डे!


प्रसंग -

साध्या वेषातील पोलीस 'तारांगण' मध्ये फिल्डिंग लावतात. पण ही बातमी खुद्द अशीन-जेम्सनेच पाठवली असते. जेणेकरून अजून एक खोटी चकमक घडवून ह्या 'जयराज शिर्के'चाही काटा काढावा.
अश्विन-जेम्स च्या ह्या प्लान बाबत पुष्करला समजतं आणि तो ठरवतो की एसटीएफ वि. अश्विन-जेम्स गँगच्या ह्या चकमकीत बाजी आपण मारायची!

अश्याप्रकारे, 'तारांगण' मध्ये सगळे जण एकमेकाला 'टिपायला' जमतात.. आणि सुरू होते एका थराराच्या अंताची सुरुवात!!


ह्या ठिकाणी सिनेमात एक आयटम साँग हवं आहे.




आली आली आली आली बिजली आली!!
मी झटका देते, मी फटका देते
हात नको लावु मला, धक्का देते
छन छनना छनक छनक
चाल तुझी ठुमक ठुमक
आज कशी रात अशी 'आयटम' झाली
ए..... बिजली आली, ए..... बिजली आली
आली आली आली आली बिजली आली !!


असा केला शृंगार, डोळ्यामधे अंगार
चमचमते मीच खास, बाकी इथे अंधार
दूर दूर राहूनी एक नजर फेकूनी
उभ्या उभ्या किती किती टाकलेत जाळूनी!
छन छनना छनक छनक
चाल तुझी ठुमक ठुमक
आज कशी रात अशी 'आयटम' झाली
ए..... बिजली आली, ए..... बिजली आली
आली आली आली आली बिजली आली !!


दबा धरुन बसणार, तोच आज फसणार
खेळतो कुणी आणि कोण इथे हरणार
आज रोखठोक सारे होऊ दे
फैसला इथेच आज होऊ दे
अरे नजर फिरवूनी पहा इथे तिथे
तुझा राहिला नसे कुणीच रे इथे
छन छनना छनक छनक
चाल तुझी ठुमक ठुमक
आज कशी रात अशी 'आयटम' झाली
ए..... बिजली आली, ए..... बिजली आली
आली आली आली आली बिजली आली !!



....रसप....
२८ सप्टेंबर २०११

Tuesday, September 27, 2011

तीळ तीळ मरण अन् दैव हताश.....



शरीर जखडलेलं
हात-पाय-मान..
बोटही हलवणे अशक्य
आणि--
मधोमध छातीच्या
काहीतरी रुततंय..
ना टोक ना धार
..बोथटच
पण हळूहळू घुसतंय
क्षणाला कणाच्या जोराने....

ओरडून ओरडून कंठ फाटला
आवाजही निघेना
वेदना अशी… की
मरेना.... मारेना

तुटून फुटून कोसळतंय
बदाबद आकाश
तीळ तीळ मरण
अन्
दैव हताश.....


....रसप....

Monday, September 26, 2011

अशी लाडकी लेक माझी असावी....


कळी मोहरावी तशी ती हसावी      
तिची पापणी अमृताने भिजावी
गुलाबी खळी लाल गाली पडावी
अशी लाडकी लेक माझी असावी



तिचे हट्ट सारे पुरे मी करावे
मला आवडीने तिनेही छळावे
तिचे त्रास देणे, मजा खास यावी
अशी लाडकी लेक माझी असावी


 
तिचा राग नाकावरी रंग घ्यावा
मला पाहुनी तो जरा ओघळावा
व्यथा गोड माझी तिला आकळावी
अशी लाडकी लेक माझी असावी


तिचे बोलणे आरश्याला कळावे!
तिचे लाजणे पाकळीने पहावे
नटावे तिने चांदणी अन् झुकावी
अशी लाडकी लेक माझी असावी


पुढे काळ जाता असा काळ यावा
नको वाटुनीही बनावा दुरावा
शिवाच्या घरी पार्वती ती निघावी
अशी लाडकी लेक माझी असावी


कधी ह्या मनाशी निराशा उरावी
जरा आस थोडी मला ना दिसावी
तिला पाहता अन् उभारी मिळावी
अशी लाडकी लेक माझी असावी









....रसप....
२६ सप्टेंबर २०११
("राष्ट्रीय कन्या दिन - २५ सप्टेंबर" विशेष "मराठी कविता समूहा"चा उपक्रम "लेक लाडकी" साठी) 
सर्व छायाचित्रे - सौ. रश्मी सुळे 

Thursday, September 22, 2011

जो बीत गई सो बात गई.. - भावानुवाद


आशा आणिक स्वप्नांचा हा
जीवनातला प्रियतम तारा
मावळला तर मावळला
प्रसन्नवदनी आकाशाला पहा जरा
कितीक तारे निखळुन गेले
आवडतेही निघून गेले
सांग निखळल्या ताऱ्यासाठी
शोक कधी आकाश करे का?
झाले-गेले विसरुन जावे!


मधूर संतोषाचा प्याला
तना-मनाला रिझवुन गेला
जरी तडकला, तडकू द्यावा
मधुशालेच्या अंगणास तू पहा जरा
कितीक प्याले डगमग करती
धडपडती अन् धुळीस मिळती
पडल्यावरती कधी न उठती
तुटल्या-फुटल्या प्याल्यांसाठी
मधुशाला ना कुंथत बसते
झाले गेले विसरुन जावे


नाजुक मातीचे हे बनती
मधुघट सारे हटकुन फुटती
अल्पायुष्यच घेऊन येती
सारे प्याले तुटती फुटती
असे असूनीही मधुशालेमधे पहा
मधुघट असती, मधुप्यालेही
मादकतेने रंगलेलेही
मधुरस लुटुनी दंगलेलेही


जीव जडवितो घट प्याल्यांवर
रसप असा तो कच्चा असतो
खऱ्या रसाने जो जळतो तो
कधी न रडता, प्रसन्न दिसतो
झाले गेले विसरुन जावे!





मूळ कविता - जीवन में इक सितारा था...
मूळ कवी - हरिवंशराय बच्चन
भावानुवाद - ....रसप....
२२ सप्टेंबर २०११



मूळ कविता -


जीवन में एक सितारा था
माना वह बेहद प्यारा था
वह डूब गया तो डूब गया
अम्बर के आनन को देखो
कितने इसके तारे टूटे
कितने इसके प्यारे छूटे
जो छूट गए फिर कहाँ मिले
पर बोलो टूटे तारों पर
कब अम्बर शोक मनाता है
जो बीत गई सो बात गई

जीवन में मधु का प्याला था
तुमने तन मन दे डाला था
वह टूट गया तो टूट गया
मदिरालय का आँगन देखो
कितने प्याले हिल जाते हैं
गिर मिट्टी में मिल जाते हैं
जो गिरते हैं कब उठतें हैं
पर बोलो टूटे प्यालों पर
कब मदिरालय पछताता है
जो बीत गई सो बात गई

मृदु मिटटी के हैं बने हुए
मधु घट फूटा ही करते हैं
लघु जीवन लेकर आए हैं
प्याले टूटा ही करते हैं
फिर भी मदिरालय के अन्दर
मधु के घट हैं मधु प्याले हैं
जो मादकता के मारे हैं
वे मधु लूटा ही करते हैं

जिसकी ममता घट प्यालों पर
वह कच्चा पीने वाला है
जो सच्चे मधु से जला हुआ
कब रोता है चिल्लाता है
जो बीत गई सो बात गई।।

- हरिवंशराय बच्चन

Monday, September 19, 2011

तू एक गझल !



पाकळ्यांसमान ओठ मुडपणे गझल
पापण्यांत सागरास हसवणे गझल


शेर गुंफले हजारही कुणी इथे
शब्द तो तुझा निवांत बहरणे गझल


भिन्न वृत्तं चालती लयीत डोलुनी
तू सुगंध सहजताच उधळणे गझल


ल्यायली सुरूप साज धुंद पश्चिमा
तू क्षितीज लोचनांत सजवणे गझल


काफिये, रदीफ अन् अलामती जुन्या
आज तू नवी जमीन बनवणे गझल


लक्ष तारकांस माळुनी निशा खुले
चंद्रकोर तू कुशीत फुलवणे गझल



....रसप....
१९ सप्टेंबर २०११

Friday, September 16, 2011

पुन्हा पुन्हा वाटतं.. (पहिलं प्रेम - चौथीमधलं - ३)


पुन्हा पुन्हा वाटतं,
घड्याळाचे काटे उलटे फिरावे.. 
रात्रीआधीचे दिवस पुन्हा उजाडावे..
कॅलेंडरच्या पानांनी मागे उडावे..
आणि चौथीतल्या प्रेमाला परत जगावे..!

ह्या वेळी मी पेपर जरा तरी चांगले लिहीन
तुझ्या बाजूचा, पुढचा बाक मिळवीन
ह्या वेळी मी थोडा तरी धीट बनीन
तुझ्यासमोर येऊन माझं नाव तरी सांगीन

माझ्या वाढदिवसाचं चॉकलेट तुला नक्की देईन
आणि तू फेकलेला रॅपर खिश्यात जपून ठेवीन
तुझा खाली पडलेला रुमाल, तुला परत मिळणार नाही
माझ्याशिवाय कुणाचीच त्यावर नजर पडणार नाही

एका तरी पावसाळी दिवशी तू तुझी छत्री विसरशील
मलासुद्धा तुझ्यासोबत उगाच भिजताना बघशील

वर्षभरात माझ्याकडे बघून एकदा तरी हसशीलच
कधी पेन, कधी रबर, कधी पेन्सिल तरी मागशीलच!
तेव्हढ्यातच मला अगदी धन्यता वाटेल
पुन्हा पुन्हा मनामध्ये काही तरी दाटेल..
कुणास ठाऊक मला नक्की काय बोलायचं असेल?
"तुलासुद्धा मी आवडतो ना?" असंच काहीसं असेल..

पण असं काही होणार नाही, माहित आहे
काळ उलटा फिरणार नाही, माहित आहे

म्हणूनच,
पुन्हा पुन्हा वाटतं की तुझी भेट व्हावी,
बघताक्षणी तुझ्यासाठी एक कविता सुचावी..
भिरभिरत्या नजरेतून तूच तिला टिपावी..
आणि माझ्या पहिल्या प्रेमाची कहाणी,
तुझी तुलाच कळावी.. तुझी तुलाच कळावी...



....रसप....
१५ सप्टेंबर २०११

पहिलं प्रेम - चौथीमधलं - १
 

Thursday, September 15, 2011

उरलो, रिताच उरलो..

उरलो, रिताच उरलो
उगाच झिजलो
झिजून उरलो.. उरलो

इथे कुणाचे नसे कुणाला
कवडीचेही मोल
हसरा चेहरा समोर दिसतो
डाव शिजवती खोल
फसलो, पुराच फसलो
रस्ता चुकलो
चुकून उरलो.. उरलो
रिताच उरलो
उगाच झिजलो
झिजून उरलो.. उरलो

डोक्यावरती फुटके अंबर
पायी डळमळ धरती
दिशाहीनतेला वा~याच्या
सोसाट्याची भरती
विरलो, हवेत विरलो
स्वत:स भुललो
भुलून उरलो.. उरलो
रिताच उरलो
उगाच झिजलो
झिजून उरलो.. उरलो

पाठीवरचे घाव मोजता
त्वेष उरी संचारे
कुणाकुणाला सोडून द्यावे
माफ करावे सारे?
लढलो, मनात लढलो
क्षणात हरलो
हरून उरलो.. उरलो
रिताच उरलो
उगाच झिजलो
झिजून उरलो.. उरलो

....रसप....

१४ ऑक्टोबर २००९

Wednesday, September 14, 2011

'मजला महाग पडले'

अविनाश काकांच्या 'मजला महाग पडले' वरून स्फुरले....
रदीफ सुचविल्याबद्दल धन्यवाद, अविनाश काका..!!



नयनी तुझ्या हरवणे, मजला महाग पडले
नखरे बघून झुरणे, मजला महाग पडले


हृदयास पार करती तिरक्या मदीर नजरा
जखमा उरात जपणे, मजला महाग पडले


कळले कधीच नव्हते, हसणे तुझे सुरमयी
जळलो तरी न शमणे, मजला महाग पडले


हळवी कळी उमलते, भ्रमरास मुग्ध करण्या
समजूनही बहकणे, मजला महाग पडले


पचवून दु:ख हसलो, बदनाम मीच ठरलो
हकनाक जीव जडणे, मजला महाग पडले


....रसप....
१३ सप्टेंबर २०११

Monday, September 12, 2011

राहिल्या खुणा आता..


राहिल्या खुणा आता, गाजले समर होते
या इथे कधीकाळी देखणे शहर होते


मी कसे कुणा सांगू खास का जखम आहे?
घाव खोल देणारे सोवळे अधर होते!


देव मानले होते ती प्रिया बदलली का?
अंतरी तिच्यासाठी साजिरे मखर होते


बाग का फुलावा हा ती न ये फिरकण्याही..
येउनी किती गेले कोरडे बहर होते


वाटते जगी नाही 'देव' नामक कुणीही
की तुझ्याच मर्जीने जाहले कहर होते?


पाहिले 'जितू' येथे वासनांध नजरांना
लाज झाकण्यासाठी तोकडे पदर होते



....रसप....
१२ सप्टेंबर २०११

Saturday, September 10, 2011

ज्याचं त्यानं ठरवायचं....

रोज लौकर भल्या पहाटे
गजर लावून उठायचं
आपलं आपण आवरून
आपल्या मार्गाला लागायचं

दिवसभर घाम-रक्त
एकत्रच आटवायचं
कीडा-मुंगी सारखं बनून
फरफटत रांगायचं

दिवस संपला म्हणून
शेवटी नाईलाजाने परतायचं
आठ बाय दहाच्या त्या
खुराड्यात शिरायचं

चार आकडी पगारात
अर्धपोट जेवायचं
बाकी अर्ध्या पोटाऐवजी
मुलांकडे पाहायचं

"काही शिल्लक राहणार का?"
कुढत नाही बसायचं
शरीराच्या वळकटीला
कोप-याकडे लोटायचं

जगून जगून मरायचं की
मरून मरून जगायचं..
ज्याचं त्यानं सोसायचं..
ज्याचं त्यानं ठरवायचं....


....रसप....

Friday, September 09, 2011

तुझी भेट व्हावी..

तुझी भेट व्हावी म्हणूनी जरासा
पुन्हा त्या किनाऱ्याकडे चाललो
जिथे पावलांची दिसे रोज नक्षी
पुन्हा त्याच वाटेत रेंगाळलो


तुझी भेट व्हावी क्षणाएव्हढीही
पुरे ती मला, जन्म सोसेन मी
तुझे रूप डोळ्यामध्ये साठवूनी
तुझा शब्द हृदयात कोरेन मी


तुझी भेट व्हावी कधी चांदराती
दिसावे मला चंद्र दोन्ही जुळे
मला एक वेडी नशा होत जावी
तुझ्या चांदण्याच्या सुवासामुळे


तुझी भेट व्हावी अशी चिंब ओली
मिळावी जरा ऊब श्वासांतुनी
मुकी आसवे वाहुनी तृप्त व्हावे
कळे ना कुणा धार डोळ्यांतुनी


तुझी भेट व्हावी सुटे बंध होता
मिटावी न माझी दुखी पापणी
तुला आकळावी नसे बोललो जी
मनाची कहाणी सुन्या जीवनी


....रसप....
८ सप्टेंबर २०११

Thursday, September 08, 2011

आता नको


खाक होऊनी नव्याने भडकणे आता नको
जीव घे प्रेमा मनाला खुणवणे आता नको


मी नको झालो जगाला, बोलले नाही कुणी
सांत्वनाच्या सोहळ्यांचे भरवणे आता नको


जोडले होते कुणाला? तोडण्याचे दु:ख का?
ओढलेल्या चेहऱ्याला चढवणे आता नको


ती फिरूनी ना इथे आली कधी गेल्यावरी
रातराणी मोगऱ्याचे बहरणे आता नको


द्या सुखांनो सोडुनी थोडे मलाही एकटे
हुंदके दाबून खोटे हसवणे आता नको


सांडलेली अक्षरे वेचून घ्यावे वाटते
व्यर्थ ताज्या पाकळ्यांचे उधळणे आता नको


जीवनाशी सख्य होते ना तुझे जीतू कधी
'ऐकुनी घ्यावे मनाचे' समजणे आता नको



....रसप....
८ सप्टेंबर २०११

Monday, September 05, 2011

ती हसते तेव्हा..

"ती रुसते तेव्हा.." आणि "ती रुसली तेव्हा.." ला माझ्या आंतरजालीय मित्रांनी खूप छान प्रतिसाद दिला. म्हणूनच अजून थोडं लिहावंसं वाटलं -


ती हसते तेव्हा मोत्यांची सर हळूच तुटली वाटे
चांदण्यात भिजला चिंब चिंब तो चकोर नयनी दाटे


ती हसते तेव्हा हृदयाच्या ठोक्यांची गडबड होते
क्षण एक थांबुनी तिला बघाया गुलबकावली खुलते


ती हसते तेव्हा मनात "येथे स्वर्ग असावा" येते
ही हवा सुगंधी मल्मल होते मला मिठीशी घेते


ती हसते तेव्हा डोळ्यांमधला सागर खळखळ करतो
मी पुन्हा एकदा खुळ्यासारखा तळास शोधत बसतो


ती हसते तेव्हा गंधर्वांचे गान थांबते थोडे
तो सूर आठवा इथे राहतो सुटते त्यांना कोडे


ती हसते तेव्हा मरगळ सरते दूर उदासी उडते
ना दु:ख राहते, चैतन्याने अंतरंग मोहरते



...रसप....
५ सप्टेंबर २०११

Sunday, September 04, 2011

शेवटी संपायला आलीच ही एकांकिका

राहुनी गेली जगायाचीच माझी भूमिका
शेवटी संपायला आलीच ही एकांकिका


मोजक्या श्वासांत मोजावे किती कोणी कसे?
राहिली कोरीच पाटी अन् गुणांची तालिका 


बोलक्या डोळ्यांत होती मूक वेडी आसवे
चंद्र तो ओथंबलेला साचलेल्या चंद्रिका


व्यक्त झालो मी तरी अव्यक्त काही वाटते
घ्या लिहा पुढचे तुम्ही अन् भावना माझ्या विका !


हार मी मानीन ऐसा काळही बनलाच ना
क्रुद्ध होऊनी फुलविता व्यर्थ का हो नासिका?


ठेच तुजला लागता जे हासले होते 'जितू'
पाहुनी शिकले तुला ते बोलती मजला "शिका"!



....रसप....
४ सप्टेंबर २०११ 

Saturday, September 03, 2011

जीवनाचा आब राखावा कसा?



जीवनाचा आब राखावा कसा?
मोडलेला साज छेडावा कसा?


भोग सारे साहिले हासून मी
पापण्यांना आज ओलावा कसा?


मी सुखाची मागणी केली कधी?
वेदनांचा भार सोसावा कसा?


लाभले जे वाटले सारे इथे
एकट्याने हुंदका द्यावा कसा?


"हे न माझे, ते न माझे" मानले
अश्रुही माझा न मानावा कसा?


बोचलेले सर्व काटे वेचले
पार गेला तीर शोधावा कसा?


बोलुनीही ना कळे त्याला तरी?
सांग आता देव जाणावा कसा?


कर्ज श्वासांचे इथे झाले 'जितू'
एकही तू श्वास फेडावा कसा?


....रसप....
३ सप्टेंबर २०११
प्रेरणा - "या जिण्याचा आब राखाया हवा.." (स्वामीजी)" 

Friday, September 02, 2011

ती रुसली तेव्हा..!


ती रुसली तेव्हा प्राजक्ताला गंध येइना झाला
आकाश ओढुनी गाढ झोपला चंद्र दिसेना झाला


ती रुसली तेव्हा आकाशी तो व्याकुळ घन गलबलला
अलगद येऊनी कानाशी तो "थांबव रे" कुजबुजला


ती रुसली तेव्हा गाण्यामधला सूरच हरवुन गेला
अन जाता जाता क्षितिजलोचनी काजळ देउन गेला


ती रुसली तेव्हा घरच्या पाउलवाटा त्या अडखळल्या
मी पुन्हा पुन्हा त्या चालत गेलो, पुन्हा पुन्हा त्या फिरल्या


ती रुसली तेव्हा ती न राहिली, होती केवळ छाया
तो दिवस उदासी मनी ठेवुनी असाच गेला वाया 



....रसप....
३१ ऑगस्ट २०११

"ती नसते तेव्हा..
"ती रुसते तेव्हा.." 
"ती हसते तेव्हा"

Thursday, September 01, 2011

ती रुसते तेव्हा..



ती रुसते तेव्हा अजून थोडे गाल गुलाबी होती
अन् अधरपाकळ्या किंचित मुडपुन लाल मोगरा होती!


ती रुसते तेव्हा सुगंध वारा शांत शांतसा होतो
तो रेंगाळुन मग इथे तिथे का बावरलेला होतो ?


ती रुसते तेव्हा मधुघट डोळ्यामधले झरझर भरती
मी "नको नको" म्हणतानाही ते थेंब थेंब पाझरती


ती रुसते तेव्हा नाकावरती चढते रक्तिम लाली
मग एक मोकळी मुजोर बट ती भिरभिर करते भाली


ती रुसते तेव्हा फक्त बोलतो सागर खळखळणारा
त्या लाटांवरती शब्द मनाचा झुरतो कळवळणारा


ती रुसते तेव्हा उठे वेदना कुठे तेच ना कळते
मी उदासडोही विरघळतो अन् बोच अनामिक छळते



....रसप....
३० ऑगस्ट २०११

"ती नसते तेव्हा..
"ती रुसली तेव्हा.." 
"ती हसते तेव्हा"
Related Posts Plugin for WordPress, Blogger...