Friday, December 11, 2009

आकाशवाणीच्या 'जयमाला'चे गाणे

निधड्या छातीला
नसे काळाची भीती
खेळ खेळतो रोजचा
जगण्याशी अन् मरण्याशी

ही धरणी अमुची आई
हा अम्हांस अभिमान
मातृभूमीच्या प्रेमापोटी
उधाळलो बेभान
परमशक्तीचे अम्हां लाभले
तिरंगी वरदान

. निधड्या छातीला......


थरथर कापे हरेक शत्रू
ऐकून जयनादा
अमुच्या शौर्यापुढती उडते
सा-यांची त्रेधा
अजिंक्य आम्ही अमर्त्य आम्ही
लिहितो प्रारब्धा


. निधड्या छातीला......


....रसप....
०९ डिसेंबर २००९

Tuesday, December 08, 2009

हैं कोई दिलवाली?

कुणी घेता का हो हाती
झाला भार मला फार
किती दिवस हे मन
माझे मलाच बेजार

किती समजावू आता
देऊ सबुरीचा धीर
झाले प्रेमाच्या भुकेने
कासावीस उतावीळ

माझा खिसाही फाटका
आणि थोडका पगार
परि मनात बांधला
सोन्या-चांदीचा महाल

नको मला परी कुणी
नको राजकुमारीही
मज बापुड्याला शोभे
अशी असावी कुणीही

मागू नका मोबदला
प्रेम शोधून देण्याचा
करा पुण्याची शिदोरी
जीव वाचे गरीबाचा


....रसप....
०८ डिसेंबर २००९

अंडरडॉग.... चावरा

काळ्या चौकडीचा चष्मा
एका बाजूस वाकलेला
बाटलीभर तेल ओतून
चापून भांग पाडलेला

नाकावरची माशी
शांत बसलेली
स्पोर्टस शूज वरती
formal pant घातलेली
(बरेचदा मोज्यात अडकली..!)

कर्रकर्र वाजणारी प्लास्टिकची पिशवी
..नावं पुसून गेलेली
अर्धवट दाढी..
ना वाढलेली ना कापलेली
....भादरलेली

एकंदरीतच तो
unpresentabale होता
आमच्याशी कोणताच
"गुण" जुळता नव्हता

त्याला आम्ही "चावरा" म्हणायचो
दुधात पडल्या माशीसारखा
बाजूला काढायचो

पिकनिक असो, पार्टी असो
Canteen मधली मैफल असो
'चावरा' नेहमी वेगळा असायचा
कुणालाच बोअर व्हायचा मूड तेव्हा नसायचा

जुने दिवस सरून
बरीच वर्षं झाली
नुकतीच मला एक
नवीन नोकरी लागली
इथे माझ्यासमोर आज पुन्हा चावरा होता
कंपनीचा जी. एम्. - माझा बॉस - बनला होता
माझ्या चौपट पोझीशन आणि पगार त्याला होता
अंगापिंडानेही माझ्या चौपट वाढला होता

ससा-कासवाच्या शर्यतीत
ससा हरला होता
'अंडरडॉग' चावरा
जोरदार धावला होता..!!


....रसप….
७ डिसेंबर २००९

Friday, December 04, 2009

मरणाशी लढाई.... सर्वात सोपी?

मरणाशी लढाई.... सर्वात सोपी!
निकाल निश्चित असतो..
पण जगण्याशी लढाई.... लढावी कशी?
शत्रूच दिसत नसतो..!

एकेक पाऊल.. एकेक विजय
अन् आत्ताचा विजय..
क्षणात… पराजय….??


....रसप....
०४ डिसेंबर २००९

आम्ही सारे कवय्ये

कुणी यावे कुणी जावे कुणी इथे रेंगाळावे शब्दामध्ये इथे सारे गुरफटले
आम्ही साsssरे कवय्ये, आम्ही साsssरे कवय्ये
साsssरे कवय्ये, आम्ही साsssरे कवय्ये..!

इथे-तिथे पाहताना
नवे काही जाणवावे
कुणालाही दिसेना जे
जगाला त्या भासवावे
एक संध्याकाळही आम्ही ना झोपी जावे
हल्के-फुल्के फटके-चिमटे घ्यावे अन् सोसावे
आम्ही साsssरे कवय्ये, आम्ही साsssरे कवय्ये
साsssरे कवय्ये, आम्ही साsssरे कवय्ये..!

....रसप....
३० नोव्हेंबर २००९
मूळ गीत : आम्ही सारे खवय्ये (झी मराठी)

Saturday, November 07, 2009

आरसा मला हसला....

आरसा मला हसला तेव्हा
माझी मला लाज वाटली
माझ्याच गुलामासमोर मी
माझी मान खाली घातली

"तोच तुझा रे अहंकार
तुला तळाला घेऊन आलाय
मागे-पुढे पाहा जरा
तुझा रस्ता ओस पडलाय

दिशाहीन भटकंती
आता तुझी सुरु झालीय
आजूबाजूस घोडे धावातायत
तुझी फक्त फरफट चाललीय

कसा होतास टेचामध्ये
ताड्ताड चालायचास
छाती पुढे काढून कसा
रूबाबात राहायाचास

तेव्हा नाही माझ्याकडे
ह्या तळमळीने पाहिलंस
मला सोड, तू तेव्हा
प्रत्येकाला झिडकारलंस

आता काळ पुरता बदललाय
नेहमीच बदलत असतो
त्याची ज्याला कदर नाही
त्यालाच आपटत असतो

अजूनही वेळ आहे
जमिनीवर राहा
खोल घट्ट पाय रोवून
स्थिर होऊन पाहा

पहा तुझ्या डोळ्यांमध्ये
पुन्हा आकाश भरेल
भरकटलेलं तारू तुझं
तुफानांतून तरेल

कितीही उंच उडी घे
शेवटी खालीच येते
म्हणून आपली उंचीच वाढव
सारं मुठीत येते"

आरसा माझ्याशी बोलला तेव्हा
माझी मला शुद्ध आली
जणू काळी रात्र सरून
नवी पहाट झाली..


....रसप....
६ नोव्हेंबर २००९

Wednesday, November 04, 2009

....पाडा

एक काळा नाला
न वाहाणारा.. न तुंबणारा
मुठीतलं नाक सोडून श्वास घेणं अशक्य
तिथे दोन-दोन, तीन-तीन मजली खुराडी..
माणूस डुक्कर झाला की डुक्कर माणूस..
कुणास ठाऊक!
ढुंगण धुतल्यावर हात धुवायचे माहीत नाही
अत्तरांची दुकानं मांडून बसलेत
काय कपडे, काय भाषा
काय खाणं.... कसलं जीणं..!
संवेदनांची गाठोडी त्या नाल्याताच फेकलीत सा-यांनी

खोल शिरलेला विजेचा खांब सांगतो..
इथे आधी फूटपाथ होता
मग पलीकडची खाडी अजून बुजवून
फूटपाथच्या पुढ्यात फूटपाथ आला
पण तोही ह्यांच्या घश्यात गेला..
शेवटी हवेतच रस्ता बांधला
तर तिथे चरस-गांजा फुंकला..

झोपड्यांच्या पोटात काय काळं-पांढरं चालतं..
तो उपरवालाच जाणो..
लोक म्हणतात, इथे साबण बनतात..
कशापासून?
गायीच्या चरबीपासून..?
की नाल्याताल्या गाळापासून..??
काहीही असो..
एक मात्र नक्की..
एक दिवस इथेही एक SRA येईल
आणि नाकपुडीएव्हढ्या खुराड्यांचे कोट्यावधी देईल..


....रसप....
३ नोव्हेंबर २००९

प्रतिज्ञा

खांद्यावरले ओझे खाली ठेवणार नाही
ना मोडेन ना वाकेन, सहजी मरणार नाही

पाठुंगळी कालचा काळ बांधतो आहे
क्षितीजापलीकडे नजर ठेवून आहे
ठेचाळलो, भेंडाळलो, सरभरलो तरी
सावरून माझे होश उभा आहे


दगडांना, खळग्यांना जुमानलो नाही
डोंगरद-यांना पार करणार आहे
मनातल्या नभाला स्वप्नांचे कोंदण
सत्याच्या चौकटीत उतरवणार आहे


लेखणीस माझ्या धार लावणार आहे
लखलखत्या पात्याने रण जिंकणार आहे
गर्वाने माझा ऊर फुलणार आहे
मराठीत एकदा नोबेल आणणार आहे..!!




....रसप....
२६ ऑक्टोबर २००९

Sunday, September 27, 2009

शोध - २

शब्द शब्द गुंफलेला हार सांडला जिथे
रत्न रत्न तोलताना मी तिथे, तू कुठे?

सूर सूर ओतलेले गान गायिले जिथे
षड्ज षड्ज लावताना मी तिथे, तू कुठे

खोल खोल बोचणारे घाव लाभले जिथे
सुन्न सुन्न राहिलेला मी तिथे, तू कुठे?

पीळ पीळ सोडताना पाश तोडले जिथे
घाव घाव जाळलेला मी तिथे, तू कुठे?


....रसप....
२७ सप्टेंबर २००९

Friday, September 25, 2009

शोध

थेंब थेंब प्यायलेला अभ्र पांढरा जिथे
अंश अंश पोळलेला मी तिथे, तू कुठे?

उंच उंच खॆळणारा चंद्र वाहतो जिथे
स्वप्न स्वप्न वेचणारा मी तिथे, तू कुठे?

अंग अंग रंगलेली सांज थांबली जिथे
खंड खंड भंगलेला मी तिथे, तू कुठे?

रंग रंग माळलेला बाग हासतो जिथे
गंध गंध शोधणारा मी तिथे, तू कुठे?

दूर दूर धावणारी वाट संपते जिथे
श्वास श्वास मोजताना तू तिथे, मी कुठे?


....रसप....
२५ सप्टेंबर २००९

Wednesday, August 19, 2009

असाही पोळा


सण माझ्या राजाचा
राजा माझ्या शेताचा

आज त्याच्या रूपाला
चौपट खुलवायचं
हिरव्यागार शिवारासारखं
सुंदर सजवायचं

पण राजा तुला माझी
काय सांगू व्यथा..
'आ' वासल्या आभाळाचा
पोटात गोळा मोठा..!

वस्त्र तुला माझं देईन
स्वत: नागवा होऊन
रंग तुझ्या शिंगांना
आपलं रक्त देऊन

तरी पांढ-या आभाळाला
रडू फुटत नाही
नदीमधून धूळ उडते
विहिर भिजत नाही

पिण्यासाठी पाणी नाही
आंघोळ कशी घालू..?
मरण तुझ्याच शेताचं
सण कसा करू..??


....रसप....
१९ ऑगस्ट २००९

Friday, August 07, 2009

का जळले दीप

का-जळले दीप ज्योती प्रकाशताना
का-जळल्या ज्योती अंधार लोपताना

हे-लावले तरू माझ्याच अंगणात
वारा ईथेच का वाही उदासवाणा

हासू-न,का कुणी उपहास भासतो
हे भाव ना खरे मी खुद्द हासताना

"जा-ऊन पावसा", सांगे कुणी न का
हा खेळ थांबवा ते थेंब बोचताना

ना-सूर जाहले, शब्दांत मांडलेले
कोणास ना कळे, दुखते कशास त्यांना


....रसप....
७ ऑगस्ट २००९

Saturday, July 25, 2009

my best friend..!!

 

आपल्याच मनचे बोलण्यासाठी
शब्द पारखे होतात
आपलेच शब्द उमटण्यासाठी
तुझ्यात आधार शोधतात
शुद्ध हरपून खरं बोलणं
नेहेमीसाठीच झालंय
जड डोक्याने हलकं होणं
आता आवडीचं झालंय
ऐकून घेतो प्रत्येक जण
माझं बोलणं तेव्हा
तारवटलेल्या डोळ्यांनी मी
बरळत असतो जेव्हा
एरव्ही मला श्रोता नसतो
ऐकून घेतोच कोण?
दोन पेले प्यायल्यानंतर
मला भिडतोच कोण?


....रसप....
२५ जुलै २००९


my best friend - II

.
एक ग्लास भरलेला
माझा मीच रंगवलेला
बाहेर डबडबलेला
आत फसफसलेला
देखणा, ऐटदार
टेचात उभा ठाकणारा
मिटल्या कळ्या सुद्धा
झटक्यात खुलवणारा....



....रसप....
२६ जुलै २००९

my best friend - III

.
ती कधीच बोलत नाही
मीच बोलत असतो
"ती बोलतेय" असं म्हणून
बरंच खपवत असतो..

न गाता येणारी
गाणी गात असतो
न वाचता येणारे
काव्य लिहित असतो

तरी सगळे सहन करतात
कारण मी "मी" नसतो
"ती बोलतेय" असं म्हणून
बरंच खपवत असतो..


....रसप....
२७ जुलै २००९

my best friend - IV

.
उदास मी होत नाही
त्याची दोन कारणं
एक म्हणजे गाणं
आणि दुसरं...पिणं

गाता गाता पीत असतो
पीता पीता गात असतो
"ती बोलतेय" असं म्हणून
बरंच खपवत असतो..


....रसप....
२७ जुलै २००९

my best friend - V

.
थंड शांत निश्चल पेला
स्थितप्रज्ञ वाटतो
स्वत:मधल्याच आवर्तांना
अनभिज्ञ भासतो

उसळणा-या लाटांना
घोटामध्ये बांधून
वणव्यांना विझवतो
थेब थेब सांडून

"साकी के नाम से" थेंबभर
नेहेमी शिंपडत असतो
"ती बोलतेय" असं म्हणून
बरंच खपवत असतो..


....रसप....
२८ जुलै २००९

my best friend - VI

.
माझ्या मयकशीला अय्याशी म्हणतात सारे
पण उत्तर द्यायला ईथे शुद्धीत कोण असतो..?
कोणी काही म्हणो आपल्याच धुंदीत राहातो
"ती बोलतेय" असं म्हणून बरंच खपवत असतो..

....रसप....

my best friend VII

.
काही गोष्टी ओठांवर बोचणा-या
काही आतल्या आत खुपणा-या
काही गोष्टी साफ विसरलेल्या
काही अगदी आत्ताच घडलेल्या
काही गुपचुप लपवलेल्या
काही आपणच लपलेल्या
काही झोंबणा-या
काही सुखावणा-या
काही उगाच
काही म्हणून..
बरंच आहे माझ्याकडे..
पाहा कधी जाणून
कुठलाही क्षण कधीही
पुन्हा उकरून काढतो
"ती बोलतेय" असं म्हणून
बरंच खपवत असतो..

....रसप....
१ ऑगस्ट २००९

my best friend VIII

.
तिला मझ्या डोळ्यातलं
बॉसला माझ्या डोक्यातलं
आणि दुनियेला मनातलं
कधीच सांगू शकलो नाही

आपलाच आपण
मनामध्ये चरफडत असतो
“ती बोलते” असं सांगून
बरंच खपवत असतो


....रसप....
२३ फेब्रुवारी २०११

Friday, July 17, 2009

आयुष्य एक मैफल

 

आयुष्य एक मैफल दिस-रात चाललेली
कधी धुंद दंगलेली, कधी ध्वस्त भंगलेली

जिंकून मैफलींना जाई खुशाल कोणी
उधळून मैफलींना बदनाम होई कोणी

मांडून मैफलींना रममाण होई कोणी
सोडून मैफलींना जाई उठून कोणी

जमवून मैफलींना होई उदार कोणी
उठवून मैफलींना उन्मत्त होई कोणी

रंगून मैफलीत परक्याच गाई कोणी
अपुल्याच मैफलीत बेसूर होई कोणी


....रसप....

Thursday, July 16, 2009

अर्थ.... नाही

काल केलेल्या चुकांच्या बोचण्याला अंत नाही
आज केल्या व्यक्त ज्या त्या भावनांना अर्थ नाही

डोलत्या फांदीतूनी सांडून झाला जो सडा हा
वेचलेल्या त्या फुलांच्या हासण्याला अर्थ नाही

कोण जाणे पाखरे येतात येथे खेळण्याला
संभ्रमी कोलाहलाच्या गायनाला अर्थ नाही

प्रेय माझे ध्येय माझे चार बाजू मांडलेले
भौतिकाशी गुंतलेल्या वासनेला अर्थ नाही

दाटुनी आभाळ येता प्राण डोळां आणलेले
मेघ जाता वाहुनी त्या दाटण्याला अर्थ नाही


....रसप....
१५ जुलै २००९

(दुसरा व तिसरा शेर: "स्वामी निश्चलानंद" ह्यांच्या लेखणीतून उतरला.. )

Wednesday, July 15, 2009

पहिलं प्रेम - चौथीमधलं


पहिलं प्रेम - चौथीमधलं
पुन्हा एकदा करायचंय
पुन्हा एकदा माझ्यावर
तिला हसताना पाहायचंय
काही गोष्टी चुकून सुटतात
आणि काही सुटून चुकतात
चुकलेलं, सुटलेलं बरंच काही
पुन्हा एकदा जमवायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्हायचंय

तिची हुशारी अभ्यासातली
माझी होती खोड्यांमधली
तिला मिळती शाबासक्या
मला नेहमी उठा-बश्या
पहिला नंबर दोघांचाही
तिचा वरून, माझा खालून
- एकदा तरी बदलायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्हायचंय

मागल्या बाकावरची माझी
जागा होती ठरलेली
तिरका कोन साधून गुपचुप
नजर तिला भिडलेली
सर मला नेमके तेव्हाच
प्रश्न काही करायचे
- आणि नंतर झोडायचे
एकदा तरी मला त्यांना
उत्तर चोख द्यायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्हायचंय


अजून पाचवीतला पहिला दिवस
मनात तसाच आहे
नवे शहर, नवी शाळा
सारं नवीन आहे
एकदाही तिच्याशी
बोललो सुद्धा नाही
आज सुद्धा त्याची
बोच मनात आहे

गाव माझे सोडण्याआधी
एकदा तिला भेटायचंय
काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्हायचंय

काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्हायचंय


....रसप....
१४ जुलै २००९



Tuesday, July 14, 2009

the Last Resort..


तूच असशी सूर्य माझा तूच माझा चंद्रमा
रंग तू दिधलास आणि गंध माझ्या जीवना

तापलेल्या पायवाटा पोळलेली पावले
थेंब एक चाखण्याला थेंबही नाही कुठे
संग ना लाभे कुणाचा साथही ना लाभली
तूच शीतल थंड छाया तूच माझी सावली

मी भणंग जाहलो हा सर्व मी गमावलो
खेळलो जो डाव एक स्वत्त्वसुद्धा हारलो
फाटक्या झोळीत माझ्या त्यागलेली कापडे
तूच एकमेव आशा तूच पुसशी आसवे

वेचणारा आठवांना आसवांना वेचतो
गुंतणारा भूतकाळी आज रस्ता सोडतो
कर्म-धर्म मर्म तूच संचिताची ठेवही
तूच माझे श्वास आणि तूच आता ध्यासही....


....रसप....
१४ जुलै २००९

Saturday, July 04, 2009

अजेय


दु:ख माझे शांत केले वेदनांना पोसूनि
'मार' म्हटले वेदनेला जोर सारा लावूनि

चेतना उरलीच नाही दर्द इतका जाहला
मुक्त केले पाश सारे वासनेला त्यागुनि

गोंधळूनि स्तब्ध झाली दाहणारी वाटही
फाटले आभाळ जेव्हा थांबलो मी पेलूनि

संगतीचा हात मजला आज तु देऊ नको
पाहता यमदूत तुजला चालले कि परतुनि


....रसप....
४ जुलै २००९

Friday, June 12, 2009

मिशीत सारे दडले आहे







मिशीत सारे दडले आहे
मिशी ठेवतो तोच भला रे
साफ करवली मिशी जयाने
पाप त्याच्या मनात आहे





मूर्ख असे जो वेळ घालवी
छंदांमध्ये ऐन उमेदी
तारुण्याचे दिवस खरे ते
कामासाठी केवळ असती
जो न जाणतो ह्या मर्मा रे
नाश तयाचा निश्चित आहे

मिशीत सारे दडले आहे
मिशी ठेवतो तोच भला रे


नाव आपले पूर्ण लिहावे
'उर्फ' सोडूनी पूर्ण वदावे
नाव स्वत:चे अर्धे करितो
काम कोणते पूर्ण करावे?
तुकडे करितो जो नावाचे
चरित्रात त्यां गडबड आहे

मिशीत सारे दडले आहे
मिशी ठेवतो तोच भला रे


कपडे ज्याचे रंगबिरंगी
केस विहरती विमुक्तछंदी
डोळे लपवी चष्म्यामागे
तो नर जाणा पक्का फंदी
केले त्याला निकट जयाने
घात त्याचा तिथेच आहे

मिशीत सारे दडले आहे
मिशी ठेवतो तोच भला रे



....रसप....
१२ जून २००९

Friday, May 29, 2009

तुझं आपलं......काहीतरीच..!!


लाडे लाडे गोंजारित
हळूच कवेत कवटाळित
तुझं आपलं......काहीतरीच..!!

मी हसतां.. फुले-मोती
म्हणे मूर्तिमंत प्रिती
अमर्याद माझी स्तुती
शब्द न् शब्द माझ्यासाठी
दीपासारखा ओवाळित

हळूच कवेत कवटाळित
तुझं आपलं......काहीतरीच..!!


मी येता येई बहर
म्हणे सौंदर्याचा कहर
सुगंधाची उठे लहर
क्षण न् क्षण माझ्यासाठी
जीवन तुझे गंधाळित

लाडे लाडे गोंजारित
हळूच कवेत कवटाळित
तुझं आपलं......काहीतरीच..!!



....रसप....
२९ मे २००९

Wednesday, May 20, 2009

..जगणं.. तुझ्याविना

चंद्र सूर्यात पाठशिवणी दिवसेंदिवस चालते
रात्र दिवसा डोळ्यांमध्ये वणव्यासारखी जळते
तांबुस झोंब-या नजरेला सारं भकास दिसते
तुझ्याविना सखे मला जगणं सज़ा वाटते

कुठून कुठे माहित नाही माझाच मला प्रवास
रखरखत्या वाटेवरती म्रुगजळाचे आभास
आठवणीन्ची लाळ गिळून तहान थोडीच भागते
तुझ्याविना सखे मला जगणं भाजून काढते

मनामध्ये प्रेमाचे मी आज थडगे बांधले
पण मानेवरती हव्यासाचे भूत बसून राहिले
पुन्हा पुन्हा झटकूनही पुन्हा पुन्हा पछाडते
तुझ्याविना सखे मला जगणं भयाण करते

भळभळणारी जखम माझी खपलीच धरत नाही
घावावरती मुतायलाही कुणी ठाकत नाही
माझी हाक मलाच साद फिरून फिरून घालते
तुझ्याविना सखे मला जगणं बधीर भासते....


....रसप....
२० मे २००९

Tuesday, May 12, 2009

फेफे


रोज वेगळी असती
जिंदगी भावली असती
एकेक नवी शिक्षा
हासून भोगली असती

पण रोज तोच घाणा
ओढून मोडा कणा
गाढव-बैल बना
ह्याला काय म्हणा?

राग कधी येतो..
तसाच निघून जातो
जाता जाता चिमट्याची
खूण सोडून जातो

चरफडतो.. जळफळतो..
तळमळतो.. कळवळतो..
ऊतू गेल्या दुधासारखा
नुसता उकळत राहातो

पृथ्वी गोल फिरते
घड्याळ पुढेच चालते
काट्यासोबत पळून पळून
रोजच फेफे उडते..


....रसप....
११ मे २००९

Monday, May 04, 2009

मी चर्चा केली नाही

एक प्रयत्न.. संदीप खरे ह्यांच्या "मी मोर्चा नेला नाही"च्या विडंबनाचा..


मी चर्चा केली नाही
मी वाद घातला नाही
विधिनिषेधसुद्धा साधा
मी मुळी ठेवला नाही

भवताली गोंधळ चाले
तो निर्ढावुन बघताना
पोटातुन ओरडताना
अन् सभात्याग करताना
निर्लज्जपणे मी हसलो बरखास्ती केली जेव्हा
कर्तव्यपूर्तीला माझ्या मी कधी जाणले नाही

मी सुस्त वडाचे झाड
पारंब्या अपरंपार
पावसात, दुष्काळात
नेमेचि राहतो गार
ह्या मस्तवाल फुगलेल्या पोटात कितीश्या ढोल्या
त्यां द्रव्य दडवले इतके, मोजाया पुरले नाही

दिसण्या हा सात्विक सदरा
कोल्ह्याची वरती मुंडी
देशाला लावत आलो
ही समाजसेवी शेंडी
मी जनतेला ना भ्यालो, मी देवाला ना भ्यालो
मी भ्रष्टाचाराखेरिज कधी धंदा केला नाही

मज जन्म मनाचा मिळता
मी पंतप्रधानच असतो
देशाचे तोडून लचके
मी तृप्त जाहलो असतो
मज निवडून द्यावे ज्यांनी अन् सत्ता द्यावी ज्यांनी
मी सर्पासम त्यांनाही दंशलो, सोडले नाही


....रसप....
०३ मे २००९

Sunday, April 26, 2009

OUT of COVERAGE


सारं काही मनात ठेवायला
माझं मन लहान
भावनांना आवरायला
मी न कुणी महान

कुठे काढू कशी काढू
भडास सांग माझी
तुझ्याशिवाय ऐकतंय कोण
वटवट कटकट माझी?

शेवटी तळ्याकाठचा दगड घेतला
समोर त्याला ठेवला
म्हटलं बोलू ह्याच्याशीच
तर तो स्वत:च बोलला..!!

"माणसासारखा माणूस तू
कसा मूर्ख इतका?
सावली कधी तुटेल काय
पायांस देऊन झटका?

मातीशिवाय झाड नाही
वेगाशिवाय वारा
सूराविना गीत नाही
धाग्याविना माला

आज मी दगड आहे
कारण शेंदूर फासला नाही
मूर्ती आणि माझ्यामध्ये
दूसरा फरक नाही

तुझा सुद्धा दगड झालाय
शेंदूर तूच पुसलास
माझं तरी नशीब आहे
तुझा तूच फसलास.."

दात विचकून हसू लागला
मला संताप आला
माझा की त्याचा, माहीत नाही
पण फेकून त्यालाच दिला

त्याने सुद्धा पङता पङता
पाणी थोडं उडवलं
गाठण्याआधी तळ त्याने
तरंगांना फ़ुलवलं..

खिशातून मोबाईल काढला
नेटवर्क मध्ये नव्हता
पण तू नसशील "OUT of COVERAGE"
विश्वास मला वाटला..


....रसप....
२४ एप्रिल २००९

Friday, April 24, 2009

टून् झाल्यावर

फुंकून पीतो बियर
टून् झाल्यावर
जीभ सुटे मोकाट
मी आरूढ़ ढगांवर

खेकड्यासारखा वाकडा
टून् झाल्यावर
डावं-उजवं सारं एक
चालतो अधांतर

मला म्हणतात बेवडा
टून् झाल्यावर
सारे पीवट पेताड
खुद्द झोक्यावर

फास्ट रिवाईंड सिनेमा
टून् झाल्यावर
प्रश्न करा काहीही
उत्तर माझ्यावर

उद्धार सा-या जगाचा
टून् झाल्यावर
मीच भाई, सारं काही
एका इशा-यावर

BMW, फेरारी
टून् झाल्यावर
रात्र जाते सुपर फास्ट
चंद्र घोड्यावर

तारवटलेले डोळे
शुद्धीत आल्यावर
मेंदू गोटा २५ किलो
फिरतो गरगरगर.....



....रसप....
२४ एप्रिल २००९

Saturday, April 11, 2009

बंध रेशमाचे


जरी गेय नाही तरी बोल काही
तुला मी असे हे ना कधी पाहिले
असे सांजवेळी तुझे लाजणे हे
जणू पाकळ्या येथ खुल्या सांडणे

ठेविले जपूनी मनाच्या तळाशी
इथे आज माझे-तुझे तेच गाणे
कधी सूर माझा तुझ्या सूरताली
कधी अन् तुझाही एकरूप होणे

नदीच्या किनारी जसे झाड वेडे
तुझ्या खोल नेत्री तसा मुग्ध झालो
कुणाला कळावे मला काय झाले
जगाचा न माझा असा मी राहिलो

प्रिये ना कधी आपले दूर जाणे
बंध रेशमाचे कधी ना तुटावे
भले दूर होवो नदी अन् किनारा
तुला मी मला तू सदा सावरावे


....रसप....
११ एप्रिल २००९

Tuesday, April 07, 2009

अंगूर (चित्रपट कविता)




घोळात घोळ झाला
बट्ट्याबोळ झाला
सरळ साध्या आयुष्यात
केव्हढा गोंधळ झाला

कुणास काही कळण्या आधी
गडबड झाली सारी
पडल्या होत्या बुचकळ्यात
मोठ्या मोठ्या स्वारी

देवाच्या करणीलाही
काही तोड नाही
जोड्या सुद्धा अश्या ज्यांना
काहीच विजोड नाही!!

ह्याच्या जागी तो
आणि त्याच्याजागी हा
सज्जन होते सारे तरी
कसे फसले पाहा


सरतेशेवटी नशीबानेच
सोडवला तो गुंता
एकमेकासमोर आणली
गोंधळलेली जनता

चूक भूल देऊ घेऊ
हसण्यावारी नेऊ
भले-बुरे विसरून जाऊ
म्हणती जुळे भाऊ

....रसप....
०७ एप्रिल २००९

Monday, April 06, 2009

येशील जेव्हा स्वप्नात माझ्या

येशील जेव्हा स्वप्नात माझ्या
दूर दूर जाऊ
संपेल जेथे नभाचा किनारा
गोड गाणी गाऊ


डोळ्यातले, हृदयातले..
श्वासातले, भासातले..
क्षण हे सारे
हसरे तारे
वेचून मोजून ठेवू..

संपेल जेथे नभाचा किनारा
दूर दूर जाऊ


फुलता फुले पवनामुळे
उधळीत गंध चोहिकडे
गंधात न्हाले
गंधीत झाले
मनधुंद बेधुंद होऊ

संपेल जेथे नभाचा किनारा
दूर दूर जाऊ


ही रात चाली हळुवार चाली
निश्चिंत मी हा असा
पाहून तुजला तो चंद्र मजला
निस्तेज वाटे कसा
नयनाताले चांदणे त्यास थोडे
देऊन उजळून जाऊ

येशील जेव्हा स्वप्नात माझ्या
दूर दूर जाऊ



....रसप....
०६ एप्रिल २००९

Sunday, March 29, 2009

आमिर (चित्रपट कविता)




आमिर (चित्रपट कविता)
ही उलझन वाढे पुन्हा पुन्हा
मी वणवण करतो सुना सुना
निष्पाप प्राण का येथ पणा
मी वणवण करतो सुना सुना

मनात आशा हजार घेऊन
परतुनी आलो परदेशातून
काय योजले कुणी कशाला
अलगद फसलो स्वत:च होऊन
परतीच्या ना दिसती खुणा
मी वणवण करतो सुना सुना

इच्छित, ईप्सित काय कुणाचे
मला गोवले कशास येथे
पापभिरू मी सज्जन शिक्षित
मला न कळते काय चालले
सोडून माझ्या आप्तजना
मी वणवण करतो सुना सुना

एकच क्षण जो मला लाभला
क्षणात सारा डाव उलटला
नावाचा मी खराच आमिर
मुक्त जाहलो पाश खुला
ना वणवण आता येथ पुन्हा
ना वणवण आता येथ पुन्हा


....रसप....
२९ मार्च २००९

Saturday, March 28, 2009

हेतु नव्हता माझा..

माझं बोलणं तुला
आज काल आवडत नाही
खरं सांगायचं तर
ब-याचदा मलाही आवडत नाही..
पण बाहेर पडला शब्द
थांबवता येत नाही
अन् ओठ माझेच असले तरी
नेहमी मीच बोलत नाही
कधी माझी भीती बोलते
कधी बोलते हूरहूर
कधी जुन्या आठवणींचे
नुसतेच वाहतात पूर
कधी असतो पूर्वानुभव
तर कधी निखळ प्रेम
मनात असतं तेच बोलेन
काहीच नसतो नेम

वाळलेलं पान मी
वा-यावरती उडतोय
कधी इथे कधी तिथे
निष्कारण फिरतोय
कधी कुठे कशी माझी
भटकंती संपणार
ही असली फरफट तरी
कुठवर चालणार….??

चिडू नकोस सखे
सोड रुसवा तुझा
तुझ्या डोळ्यांत पाणी...
हा हेतु नव्हता माझा..


याचक..
....रसप....
२८ मार्च २००९

Sunday, March 15, 2009

आनंद

क्षणही आयुष्याचा
मी उगाच रडलो नाही
नियतीशी असेन हरलो
मृत्यूशी हरलो नाही

एकेक घाव तो जपला
जो खोल-खोल मज रुतला
झेलले उरावर सारे
मी पाठ फिरवली नाही

मावळत्या सायंकाळी
रंगांची उधळण झाली
मी कुठल्या एका रंगी
हटकून रंगलो नाही

प्रत्येक रंग मी ल्यालो
अन् सर्व रसांना प्यालो
आनंद वाटला येथे
दु:ख़ास दावले नाही


.…रसप….
१५ मार्च २००९ 

Tuesday, March 03, 2009

आशिर्वाद देहि

हा जीव ना जळावा
अमृतास प्याया
हे घोट जीवनाचे
मजला मधुर व्हावे

मी घोट-घोट घ्यावे
जे प्राशले, पचावे
रानात मोर नाचे
ते वागणे असावे

कोणास ना कधीही
फसवून मी हसावे
अन् भाट होउनीही
मी ना कधी झुकावे

उधळीत रंग यावे
उधळून तृप्त व्हावे
जिंकून मैफलींना
मागे सुखी उरावे

ना संत मी न थोर
बाहूंत क्षीण जोर
लाटांवरी तरुनी
मी फक्त पार व्हावे

देवा तुझ्या कृपेने
सुखवंत आज आहे
शब्दांस एकदाही
वाया न घालवावे

आयु सरून जाई
नच मित्र एक लाभे
मज लाभले परि जे
कश्चित् न दूर जावे

आशीर्वाचास देहि
तुज सर्वदा स्मरावे
माणूस तू घडवले
माणूस मी रहावे

….रसप….
०१ मार्च २००८

Sunday, February 15, 2009

हे असेच येथे


हे असेच येथे पर्वतशिखरी उंच उंच पोहोचणे
क्षणभर लावून हात नभाला पुनरपि गडगडणे

हे असेच येथे वा-यावरती उडून हलके होणे
उधळून टाकून वसने सारी सर्वदूर भरकटणे

हे असेच येथे पाण्याभवती स्तब्ध तीरही बनणे
फुले फुलवणे, पूल पोसणे यत्किंचित ना ढळणे

हे असेच येथे खुरडत खुरडत गर्दीमधून जाणे
भवतालीच्या कल्लोळातही अपुल्या विश्वी रमणे

हे असेच येथे लाज सोडुनी व्यभिचारी वागणे
'सब करतें हैं' म्हणून खापर परमाथी फोडणे

हे असेच येथे सीमारेषा आखून झुंजविणे
दोन्हीकडचे खाऊन लोणी 'सम-वाटप' करणे

हे असेच येथे प्रेमदिनी प्रेमाला लाजविणे
संस्कृतीरक्षण करण्याकरता गुंडच माजविणे!!

हे असेच येथे पाहून-साहून दगडासम जगणे
येती लाटा, जाती लाटा शुष्क तीरी वसणे

हे असेच येथे आव आणूनी काही-बाही लिहिणे
अपुली मैफल अपुले गाणे स्वत:च टाळ्या पिटणे


....रसप....
१५ फेब्रुवारी २००८

Sunday, January 25, 2009

कॉलेज....गेले ते दिवस

सहा चोपन्नची चर्चगेट
सात सव्वीस बान्द्र्याला
'मॉर्निंग मीटिंग' टपरीवर
भेटत असू चहाला
ग्रुपमध्ये आल्याबरोबर
चढे मस्तीची झिंग
गेले ते दिवस जेव्हा
चहाला म्हणायचो 'कटिंग'

इकोनॉमिक्सच्या लेक्चरला
वर्ग रिकामा करायचो
चार मुलं मागे ठेवून
'मास बंक' पाळायचो
गप्पाष्टकांत रंगवायचो
कँटीन आणि कट्टा
गेले ते दिवस जेव्हा
सिगरेटला म्हणायचो 'सुट्टा'

'भाई' नव्हतो कुणी तरी
तसं वागायला जमत होतं ..
कॉलेजमध्ये आमचंच तेव्हढं
नाणं खपत होतं..
नजर कुणी दिलीच तर -
"देखता क्या हैं? चल फूट..!!"
गेले ते दिवस जेव्हा
बावळ्यांना म्हणायचो 'चिरकूट'

एका हाकेसरशी सारे
कुठेही पोहोचत होतो
दोस्तीखातर कुणालाही
बिनधास्त 'भिडत' होतो
कधी दिले, कधी घेतले
आम्ही 'पाहुणचार'
गेले ते दिवस जेव्हा
दोस्ताला म्हणायचो 'यार'

सुट्टा विझला, कटिंग निवला
सुटले-तुटले यार
गेले ते दिवस आता
चुकावायचेत उधार..


....रसप....
२५ जानेवारी २००८

Friday, January 23, 2009

बंध पडतील तोकडे..



बेछूट मी बेफाम मी मजला कुणी रोखायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे

श्वासात स्वप्ने पाहतो मी
मुक्त जगणे जाणतो
वाट कुठली चालणे ना
निर्झरासम वाहतो
भावनांचे गाठोडे माझे कुणी सोडायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे

हातावरी जो आज आहे
तो सुखाने भोगतो
अन् उद्याच्या जीवनाची
मी तमा ना ठेवतो
तमस की उजळून आहे भाग्य ना जाणायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे

मी द्वेष ना केला कुणाचा
शत्रु ना झाले कुणी
तेथ जुळले सूर माझे
जेथ हो संवादही
गुंतणे ठाऊक ना जे जोडले राखायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे


....रसप....

Thursday, January 22, 2009

हे असे अन् ते तसे....


हे असे अन् ते तसे परि कोण जाणे का असे
वाहूनी जे जातसे परतूनी ना ते यायचे

जो न थांबे पळभरी तो काळ संगे चालतो
अडखळे पाऊल ज्याचे खेळ त्याचा संपतो
जो न जाणे सत्य हे तोचि भिकारी होतसे
वाहूनी जे जातसे परतूनी ना ते यायचे

वाल्मिकी देऊन गेला खुद्द अपुला दाखला
बदलतो तो जीव आहे हे मनासी जागवा
वैध जाणावे जे काज तेचि मोठे होतसे
वाहूनी जे जातसे परतूनी ना ते यायचे

जन्म मनुजाचा मिळाला भाग्य अपुले जाणतो
प्रेम-श्रद्धेला उराशी ठेवितो अन् वाटतो
तुच्छ ना लेखी कुणाला तो महंत होतसे
वाहूनी जे जातसे परतूनी ना ते यायचे


....रसप....
२२ जानेवारी २००८

Tuesday, January 20, 2009

सिगरेट उवाच


मला दु:ख जळण्याचे नाही
धुरामध्ये विरण्याचेही नाही
दु:ख एव्हढंच की,
तू मला फक्त जाळलेच नाहीस
जाणलेही नाहीस
आठव कधी मी तुझी साथ सोडली?
कधी मी तुझी कांस सोडली?
प्रेमात पडल्याच्या आनंदातही
तू माझी राख केलीस
प्रेमात आपटल्याच्या नैराश्याताही
तू माझीच राख केलीस..!!
धावपळीतला विसावा म्हणून
मला रोज जाळतोस
निश्चिंत शांत एकांतातही
फक्त मलाच जाळतोस
तो तुझा पेला कसा नेहमी विसळून स्वच्छ करतोस..
मला मात्र कुठेही बेदरकार भिरकावतोस..
मान मुरगाळून चुरगाळतोस..
गटांगळ्या खायला बुडवतोस..
काहीच नाही तर चक्क, चिरडूनही टाकतोस..
अरे, दुनियेत तुला ज्याने-त्याने फक्त 'बनवलं' आजवर
एक मीच जी जळायलाही तयार असते तुझा इशा-यांवर
मी जळले तेव्हढाच धूर तरी झाला
तुला तर लोकांनी धूर न काढताच जाळला..


....रसप....
२० जानेवारी २००८


Saturday, January 17, 2009

"तो"


असामान्य नव्हता तो
पण वेगळा मात्र होता
पहिला-दुसरा यायचा नाही
पण हुशार मात्र होता

संगीताचा छंद त्याला
बुद्धिबळाचा नाद
मी मात्र उडाणटप्पू
अंगात फक्त माज

मध्यमवर्गीय कुटुम्बातला
काकांकडे राही
काका होते अब्जाधीश
काहीच उणे नाही

दूजाभाव नव्हता तरी
बंधनं तर होती
चुलत भावा-बहिणीसोबत
तुलना होत होती

माझी सुद्धा व्यथा हीच
कथा वेगळी होती
घरीच होतो स्वत:च्या
पण तुलना 'मारत' होती..

पर्यावरण सहल आम्ही
'माथेरान'ला नेली
तिथंच जुळलं सूत आमचं
जवळीक निर्माण झाली..

कैंटीनमध्ये जोडगोळी
आमची फेमस झाली
हळूहळू स्वारी माझ्या
'कंपू'तही आली

माथेरानवर प्रेम त्याचं
अगदी जीवापाड
सहलींवर सहली केल्या
नव्हता पारावार

'फुंकणं-पिणं' आम्ही दोघं
एकत्रच शिकलो
कितीतरी बैठकिंना
मनसोक्त झिंगलो..

वर्ष होते चौदावीचे
मला पनौतीचे
हरवलेल्या प्रेमाचे अन्
भरकटलेल्या तारूचे..

इथून पुढे तो अन् मी
आयुष्याशी खेळलो
आत्ता कुठे कळतंय
जिंकलो की हरलो..

अभ्यासाच्या नावाखाली
कधी कट्टे झिजवले..
गुंड पोरांमधले सभ्य
एव्हढं नाव कमावलं

पदवीच्या निकालाने
पुन्हा सारे पालटले
काठावरती तरलो मी
त्याचे वर्ष बुडाले

व्यवसायाच्या निमित्ताने
मुंबई माझी सुटली
मैत्री राहिली कायम तरी
जोडी मात्र तुटली..

ऑक्टोबरला त्याने त्याची
पदवी पूर्ण केली
योग्य वेळी योग्य अशी
नोकरी सुद्धा 'धरली'

मला फक्त 'नाद' होते
व्यसनं नव्हती कसली
त्याच्या मात्र छंदांची
जागा व्यसनांनी घेतली

मला एक हात होता
उभं करण्यासाठी
त्याच्यासमोर पेला होता
बुडून राहण्यासाठी..

नोकरीत त्याने मेहनतीने
खूप प्रगती केली
पण गलेलठ्ठ पगाराची
फक्त दारू प्याली..

मित्राच्या ह्या अवस्थेने
मला अपराधी वाटे
त्याच्या दिवाळखोरीत मला
माझेच भांडवल दिसे

पाच वर्षे चालू होतं
त्याचं बेवडेपण
नसानसात दारूच त्याच्या
अगदी कण अन् कण

फलाटावर, ट्रेनमध्ये
जिन्यात कधी बारमध्ये
न्हाऊन न्हाऊन पडून राही
फक्त अन् फक्त दारूमध्ये

अनेक दिवस अनेक रात्री
"ब्लैक आउट" मध्ये गेल्या
माझ्यासकट सा-यांनी
सा-या आशा सोडल्या..

आई-बाबांचा एकुलता
मुलगा लाडका होता
पिळून गेल्या काळजामध्ये
नुसता गलका होता

अनेक महिन्यात त्याचा माझा
संवाद झाला नव्हता
मीच शेवटी फोन केला
चक्क शुद्धीत होता..!!

म्हटलं,"मी मुंबईला येतोय"
खूप खूष झाला
भेटण्याचा बेत ठरवून
फोन ठेवता झाला..

पोचल्या दिवशीच भेटलो त्याला
काय सांगू कथा..?
माझ्या डोळ्यासमोर त्याचा
नवाच अवतार होता

"मी दारू सोडली आता"
अभिमानानं बोलला
"कितीक वेळा सोडलीस अशी"
मी टोला हाणला

मंद स्मित करून त्याने
पुन्हा तसंच म्हटलं
'खरंच सोडली की काय'
मला सुद्धा वाटलं

खरंच माझा मित्र आता
त्यातून बाहेर पडला होता
पेल्यापाठचं जग आता
हासून पाहात होता

आनंदाने माझ्या अगदी
सीमा गाठली होती
मनामधाली उभारी त्याच्या
डोळ्यात साठली होती

डोक्यावरती कर्ज होतं
पण खांदे ताठ होते
मनामध्ये शल्य होतं
डोळ्यात पाट होते

दिसत होतं मला आता
नवं तांबडं फुटतंय
विश्वासाने बोलला "तो",
"आता जगावंसं वाटतंय.."




....रसप....
१७ जानेवारी २००८

Friday, January 16, 2009

छंद जमत नाही


चिलटाच्या प्रेमाबद्दल सारं माहित आहे
आगीमध्ये स्वत:हून जळलो सुद्धा आहे
पण प्रेमामध्ये 'पडणं' असतं, 'उठणं' असत नाही
पावलं आपली असली तरी चाल कळत नाही..
.
.
.
.
आजकाल लिहिताना यमक जुळत नाही
ताल कधी चुकतो, कधी छंद जमत नाही

शिवशिवणारे हात, त्यांना आवरणं होत नाही
शब्दांच्या कारंज्यांनी नेम साधत नाही

लिहायचं असतं एक, लिहितो मी भलतंच
विचारचक्र फिरून फिरून तुझ्यापाशी थांबतंच

खूप ठरवलं, तुझ्याबद्दल काहीच नाही लिहायचं
ह्रदय ठेवून बाजूला, डोक्यानं चालायचं

पण मेंदूसुद्धा फितूर, तुझाच विचार करतो
'नाही नाही' म्हणता सारा कागद भरून जातो

कुठून सुचलं, कसं लिहिलं; काहीच कळत नाही
ताल कधी चुकतो, कधी छंद जमत नाही



....रसप....
१६ जानेवारी २००८

Thursday, January 15, 2009

????????


भिजूनदेखील चंद्र उजळत का राहतो?
कुजून गेलं प्रेम तरी बोचत का राहतं?

सरून गेली मैफल तरी घुमत का राहते
सोडून गेलेली संगत भासत का राहते?

संपत आलेला प्रवास असा लांबत का जातो?
सादेविना प्रतिसाद कुठून ऐकू येतो?

ओसाड माळावरती गुरं काय चरतात?
हिरवीगार शिवारं मात्र टोळ फस्त करतात..



....रसप....
१५ जानेवारी २००८

भाऊ, ताण नको घेऊ


भाऊ, ताण नको घेऊ;
सोड चिंता कामाची, साडे-सातला जाऊ..!

कामाला "नाही" नाहीच कधी म्हणायचं
अरे, बॉसला नकार देणं कसल्या उपयोगाचं?
कारण एखादं काम नाकारणं
म्हणजे नंतर तेच जबरदस्तीने करणं!
म्हणूनच बरं असतं आधीच "हो" म्हणणं..
"हो" म्हणायचं आणि
आपलंच गाडं रेटत राहायचं
"मार धक्का बोलेश्वर" म्हणायचं

एकदा पाणी डोक्यावर गेलं
की काय फरक पडतो
दोन फूट गेलं की वीस फूट गेलं
ओतेनात का बापडे अजून चार-दोन बादल्या
बिनधास्त डूंबायचं

भाऊ, ताण नको घेऊ
प्रेशर कुकर बनायचं
वाढलेलं प्रेशर दाबून नाही ठेवायचं
शिट्टी मारून मोकळं व्हायचं
अगदीच आल्या डोक्याला मुंग्या
तर एकच सांगतो
डोक्यावरती हात अन् टेबलाखाली पाय..
एकशे अंशी अंशात यायचं
डोळे मिटून "खड्ड्यात गेली कंपनी" म्हणायचं..

भाऊ, प्रेशर कुकर बनायचं
एक्स्टर्नल प्रेशर मुळे इंटर्नल प्रेशर नाही वाढवायचं..


....रसप....
१५ जानेवारी २००८

Saturday, January 10, 2009

सांज-रागिणी


रंग रंग उधळले क्षितिज माखले
विसावली मनोमनी सांज-रागिणी

तप्त भूस शांतवूनि वृक्ष निजवुनी
मंद चाल चालली सांज-रागिणी

धुंद कुंद पश्चिमेशी खेळ खेळशी
स्वप्रकाशी उजळशी सांज-रागिणी

सौन्दर्य-परमोच्चता क्षणैक साधतां
मनमोहक दिलखेचक सांज-रागिणी

गडद शाल ओढूनी लुप्त होई ही
भैरवीस गाऊनी सांज-रागिणी


....रसप....
१० जानेवारी २००८

Friday, January 09, 2009

प्रवास..

सुन्नाट वाटेवरी अंधार दाटलेला
मोकाट या मनीचा अंगार सोबतीला

निर्जीव प्रवाहाला आकार लाभलेला
ओसाड किना-याचा श्रुंगार सोबतीला

माझ्याच भावनांचा बाजार मांडलेला
ही लाख राख स्वप्ने लाचार सोबतीला

उत्तुंग पोचूनीही उद्धार राहिलेला
भन्नाट वादळान्ची झनकार सोबतीला

हा प्रश्न-उत्तरांचा भडिमार चाललेला
कधी मूक स्पंदनांचे हुंकार सोबतीला


....रसप....
०९ जानेवारी २००८

शब्द

उरी साठलेले जुने शब्द होते
जुन्या भावनांना नवे शब्द होते

मस्त प्रीतवेडा बेधुंद जाहलो
रूप वर्णियाला कुठे शब्द होते?

शब्दखेळ सारा हात फक्त माझे
गीत जाहले जे तुझे शब्द होते

चंद्र लाज लाजे रात सुस्त वाटे
नाभी तारकांच्या सवे शब्द होते..


....रसप....
०९ जानेवारी २००८

Sunday, January 04, 2009

पुन्हा एकदा..


बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा
पुन्हा एक चेहरा खुणावतोय

डोळे मिटले की
पापण्यांमध्ये लपतोय
डोळे उघडले की
नजरेसमोर तरळतोय..
हसरा, लाजरा, साजिरा
मूकपणे बोलणारा...
.. हरवून टाकणारा

सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ डोळे
त्यावर लपलपणाऱ्या पापण्या
गुलाबाच्या पाकळ्याच..
बाकी काहीच नाही
मी इतकंच पाहिलं.. 
मला इतकंच दिसलं..
इतकंच पुरलं.. पुरून उरलं..!!

पुन्हा एकदा..
काळजाचा ठेका काही मात्रा थांबलाच
आणि नंतर लागली लग्गी
दिडपट की दुप्पट..
तालात आहे की नाही..
माहीत नाही
पण मी मुग्ध आहे
मी धुंद आहे.. पुन्हा एकदा.

पुन्हा एकदा साचलेल्या डोहाला
वाट मिळाली आहे..
वाहायला, खळखळायला
.. मनसोक्त नाचायला
आता मी वाहणारच,
प्रश्न इतकाच..
असाच वाहाणार की पुन्हा एकदा..
साचणार..
आटणार..
शेवाळणार..
हिरवटणार.
बघू या..!!

एक मात्र नक्की.
माझी जागा बदलणार
अन् मागे एक खळगा राहणार..
.. इथे मी साचलो होतो....


....रसप....
०३ डिसेंबर २००८

Saturday, January 03, 2009

असे शब्द होते

असे शब्द होते
तसे शब्द होते
जसा अर्थ घ्यावा
तसे शब्द होते

कुणा ना कळावे
खरे काय होते
असे मुक्त वेडे
तुझे शब्द होते

श्रवून जाहले ते
लिहून घेतले ते
जपून ठेवले ते
खुळे शब्द होते

जगी जाणकार
कुणी ही असू दे
कविता म्हणाया
खुजे शब्द होते

प्रतिभेस माझे
साष्टांग नमन
समजलेच नाही
कसे शब्द होते

अनुवाद व्हावा
जरा इंग्रजीत
मराठीत बहुदा
न हे शब्द होते

ऐकता वाचता
जाहलो "आडवा"
तरीही उरावर 
उभे शब्द होते..!!


....रसप....
०३ जानेवारी २००९  

माझ्यात वेगळे काय..??

दोन डोळे दोन कान
एक तोंड एक नाक
दोन हात दोन पाय
माझ्यात वेगळे काय?

कधी थंड कधी तप्त
धमन्यांमध्ये माझ्याही रक्त
हाडा-मांसाचा गोळा फक्त
अजून दुसरं काय?

मित्रांमध्ये रमतो तसा
एकट्याने दंगतो
आला दिवस जगतो
अन् स्वप्नांमध्ये रंगतो
जगणं माझं ओघानेच
दुधावरची साय

मातीचाच बनलो तरी
रोज अंघोळ करतो
अस्ताव्यस्त आतून तरी
कपडे इस्त्री करतो
काय करतो कशास करतो
मलाच ठाऊक कुठाय?

चष्मा लावून बघतो जणू
चष्म्याविना दिसत नाही
रक्त जरी उसळलं तरी
डोळ्यांमधून पाझरत नाही
आवळलेल्या मुठी माझ्या
ठोसे मारत नाहीत
बुरसटलेले शब्द माझे
क्रांती आणतील काय??

.....जगणं माझं ओघानेच
दुधावरची साय
......हाडा-मांसाचा गोळा फक्त
माझ्यात वेगळे काय..??



....रसप....
३० डिसेंबर २००८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...