Monday, June 16, 2008

"वेळ"

कधीही थांबत नाही ती "वेळ" म्हणतात
पण स्तब्ध, निश्चल क्षणांचा
मी साक्षीदार आहे..

अगणित क्षण अनुभवले आहेत
ज्यांना हाताने पुढे ढकलले मी
काहींना तर तसेही
करता आले नाही..
आहेत अजून तसेच
रुतलेले... खुपलेले..
मधूनच अडवू पाहतात
पुन्हा माझी वाट
कारण त्यांना गाडूही शकलो नाही..

ह्या पेल्याचे अन् त्या आठवणींचे
नाते तरी काय आहे,
खरंच कळत नाही
जणू काही सावलीच असाव्यात
तशा आज्ञाधारक..
खोलवर मनात अर्धवट गाडलेले
ते क्षण... त्या आठवणी
मुंग्यांसारख्या येतात बाहेर..
.. घोटा-घोटाला..
आणि चावत बसतात अंगभर
अन् मी.. दुबळा लाचार..
पुन्हा केविलवाणा प्रयत्न करतो
वेळेला धक्का देऊन पुढे ढकलण्याचा..

कुणास ठाउक कधीपर्यंत
चालू राहणार हा खेळ
अन् म्हणे..
..थांबत नाही कुणासाठी
त्यालाच म्हणतात "वेळ"..!!


....रसप....
१६ जून २००८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...