Sunday, June 27, 2010

पावसाळा

खिडकीतून फांदी तुला
वाकून पाहते का गं?
टपटप थेंबांत तुझं नाव
ऐकू येतं का गं?

स्वच्छ चिंब भिजरा रस्ता
माझ्या घरचा का गं?
फेसाळलेला सागर तुला
नाराज वाटतो का गं?

रिमझिम पाऊस गालांवरती
स्पर्श माझा का गं?
निथळणारे कपडे जणू
माझी मिठी का गं?

अंगावरची शिरशिरी ती
पहिली भेट का गं?
पावसानंतर गार हवा
माझी चाहुल का गं?

दिवसा ढवळ्या काळोख होणं
माझं रुसणं का गं?
स्तब्ध ओघळणारा पिंपळ
माझं असणं का गं?

खळखळ ओढ्यासारखं माझं
निघून जाणं का गं?
जवळ आल्या क्षितिजासारखं
तुझं जगणं का गं?

दर वर्षी पावसाळा
असाच असतो का गं?
कधी उन्हाळा कधी हिवाळा
मनात दाटतो का गं?


….रसप….
२४ जून २०१०
Related Posts Plugin for WordPress, Blogger...