Showing posts with label गझल - मात्रा वृत्त. Show all posts
Showing posts with label गझल - मात्रा वृत्त. Show all posts

Wednesday, August 05, 2020

एकटा असतो

झुंडीत एकटा असतो, वस्तीत एकटा असतो
मी सरकारी नोंदीच्या यादीत एकटा असतो

एखादा शेर तुझ्यावर लिहिल्याचे वाटत असते
पण शब्द तुझ्या नावाचा ओळीत एकटा असतो

खिडकीतुन पाहत बसतो बाहेर रिमझिमे कोणी
पाऊस रोजचा येथे गच्चीत एकटा असतो

औरंगाबादमधे मी एकटाच गर्दी करतो
मुंबईत येतो तेव्हा गर्दीत एकटा असतो

सांगीन तुला मी माझी एखादी प्रेमकहाणी
सांगीन तुला मी कुठल्या धुंदीत एकटा असतो

मिणमिणत्या निरांजनाची देवळास सोबत असते 
कंदील ओसरीवरचा वाडीत एकटा असतो 

....रसप....
५ ऑगस्ट २०२०

Wednesday, January 25, 2017

बाबा

नसेल काहीही बोलत पण समजत असतो बाबा
आई जर का चिडली तर समजावत असतो बाबा

नेहमीच हळवेपण त्याचे लपवत असतो बाबा
पाकिटातला फोटो चोरुन पाहत असतो बाबा

क्षणाक्षणाला नोंदवून टिपणार कधीही नसतो
हिशोब गेलेल्या वेळेचा मांडत असतो बाबा

सहा वाजता गेल्यानंतर दहा वाजता येतो
पोरांना रविवारी केवळ भेटत असतो बाबा

घोडा बनतो, लपून बसतो, पकडापकडी करतो
आपल्याच तर बालपणाशी खेळत असतो बाबा

धडपडण्याची भीती गोंधळ उडवत असते तेव्हा
सायकलीला धरून मागे धावत असतो बाबा

दूर पसरल्या माळाच्या खडकाळपणाचे जीवन
एकटाच गुलमोहर होउन डोलत असतो बाबा

रणरणती दुनियादारी मन रुक्ष कोरडे करते
एक कोपरा मनात गुपचुप भिजवत असतो बाबा

....रसप....
२४ जानेवारी २०१७

Thursday, October 29, 2015

आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती

आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती
कुणास माझी इतकी किंमत मुळीच नव्हती

आयुष्या, मी तुझ्या मनाचे केले असते
प्रामाणिक, आग्रही भूमिका तुझीच नव्हती

दर वर्षी सांगतो कहाणी दुष्काळाची
तरी तुला वाटते कधी ऐकलीच नव्हती

पुढच्या जन्मी दगड बनव गंगेघाटीचा
ह्या जन्मी राखेसाठीही नदीच नव्हती

पायाखाली जितके गाडू तितकी उंची
अस्मानी कळसाची शोभा अशीच नव्हती

रस्त्यावरती, लोकलमध्ये, बाजारांतुन
त्याला जी शांतता मिळे, ती घरीच नव्हती

दिवा नि वातीसमान नाते तिचे नि माझे
भोवतालची हवा तापली उगीच नव्हती

अर्ज लिहा अन् प्रती पाठवा मागितल्यावर
पुरस्कार मिळणेही का चाकरीच नव्हती ?

....रसप....
२८ ऑक्टोबर २०१५

ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद

Wednesday, April 22, 2015

मावळलेला दिवस रात्रभर जागवतो

आयुष्याला नवी कहाणी सांग 'जितू'
रोज तेच ते जगून कंटाळा येतो

-------------------------------------

मावळलेला दिवस रात्रभर जागवतो
आणि नव्याने अंधारच मग उजाडतो

माझ्यासोबत कधीच नसतो आनंदी
तुझ्या संगतीने मी इतके विस्मरतो

येणारा क्षण म्हणतो 'क्षणभर जगून घे'
मी गेलेल्याच्या वाटेवर घुटमळतो

अर्धा पेला नेहमीच बाकी माझा
पापणीत अव्यक्तपणे मी साठवतो

देवासाठी जिथे तिथे मंदिर बांधा
आई-बापासाठी वृद्धाश्रम असतो

तुला यायचे असेल तेव्हा ये कविते
तोपर्यंत मी गझलेवरती भागवतो

....रसप....
०९ एप्रिल २०१५ 

Wednesday, February 04, 2015

व्यसन लागले

तू गेल्यावर मला स्वत:चे व्यसन लागले
माझ्यामध्ये तू मिळण्याचे व्यसन लागले

तुझा अबोला इतका झाला सवयीचा की
माझ्या मनासही मौनाचे व्यसन लागले

वेगवेगळे खेळ खेळलो नशिबासोबत
इतका हरलो की हरण्याचे व्यसन लागले

कोणे एके काळी सुंदर लिहित असे तो
नंतर टाळ्या कमावण्याचे व्यसन लागले

निजायला ती जाते एका विशिष्ट वेळी
म्हणुन जगाला अंधाराचे व्यसन लागले

अनेकदा मी कुणीच नसतो असतानाही
पूर्णत्वाला शून्यत्वाचे व्यसन लागले

नात्यामधला हरेक जण सोडुन जातो, जर
जिवास म्हाताऱ्या जगण्याचे व्यसन लागले

....रसप....
०३ फेब्रुवारी २०१५

ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद

Sunday, October 12, 2014

ती माझ्याशी बोलत नाही

ती माझ्याशी बोलत नाही
मी माझ्याशी बोलत नाही

तिची छबी दाखवा मलाही
जी माझ्याशी बोलत नाही

देव मुका अन् बहिरा आहे
की माझ्याशी बोलत नाही ?

छत्रपती मावळ्यांस म्हणतो
श्री माझ्याशी बोलत नाही

स्वप्न एव्हढे रोज पाहतो
'ही' माझ्याशी बोलत नाही ! :P

....रसप....
११ ऑक्टोबर २०१४

Tuesday, March 25, 2014

बाबाही होता झिजलेला..

सुन्या मंडपातला देवही दिसतो थोडा भेदरलेला
जुन्या घराच्या भिंतीवरचा जणू पोपडा फुगारलेला

उमलावे की गळून जावे द्विधेत दिसते कळी निरागस
फूल तोडण्यासाठी आहे माळीसुद्धा हपापलेला

'विठ्ठल-विठ्ठल नकोस बोलू तो आहे भक्तांचा वेडा'
तिने ऐकले नाही माझे तोही होता आसुसलेला

एकदाच केवळ बाबाची चप्पल मी वापरली होती
सोल फाटका सांगत होता बाबाही होता झिजलेला

तू असताना माझ्या हृदयाची माझ्याशी गट्टी होती
आता तर प्रत्येकच ठोका पुढच्या ठोक्यावर रुसलेला

तूही ये अन् मीही येतो पाहू भेटुन पुन्हा एकदा
डाव असाही तुझा नि माझा सुरुवातीपासुन फसलेला

मारत असते कधी धपाटा जेव्हा पाठीमध्ये आई
तिच्याच डोळ्यांमध्ये तेव्हा दिसतो मोती साठवलेला

तू वापरलेलीच पुस्तके वाचुन शाळा शिकलो होतो
आयुष्याच्या काही पानांचा कोना अजुनी मुडलेला

....रसप....
२५ मार्च २०१४
(Edited - ८ ऑक्टोबर २०१६)

Tuesday, February 18, 2014

अपूर्ण आयुष्यगान

तुझा कळस आकाश असो, मला एक चौथरा हवा
जिथे तुझी सावली वसे, तिथे मला आसरा हवा

तुझ्या कलाने हळूहळू जगायचे मी शिकीनही
जमून येईल तोवरी, जगायला कोपरा हवा

जुन्या जीन्सच्या खिश्यातुनी, जशी मिळावी नोट जुनी
तसाच आनंद लाभतो, तुझा शोध पण खरा हवा

जुळून आल्या सुरावटी, जमून आलेत शब्दही
अपूर्ण आयुष्यगान हे, तुझा एक अंतरा हवा

कसे टाळलेस तू प्रिये मला पाहणे शिकव जरा
नको चेहरा जुना मला नवा नवा चेहरा हवा

जराजरासे जगायला, जराजरासे मरायचे
अशी व्यथा अनुभवायला शहर नाम पिंजरा हवा

नवीन क्षितिजांस शोधण्या उडत रहा तू पुढे पुढे
तुझी स्वत:ची अशी नसे कुठेचही पाखरा हवा

सुचेल थोडे कधी तरी, 'जितू' आस ही असे खुळी
खरी शायरी सुचायला हृदयपटावर चरा हवा

....रसप....
१८ फेब्रुवारी २०१४ 

Thursday, November 21, 2013

तू आवडण्याला नव्हते काही कारण..

तू आवडण्याला नव्हते काही कारण
तू नावडण्याला देखिल नाही कारण

मी झुरलो प्रेमाच्या ह्या नजरेसाठी
उपकारालाही असेल काही कारण

साचला बर्फ भवताली आयुष्याचा
दे सुटकेसाठी एक प्रवाही कारण

जो योग्य ठिकाणी पोचवायचा रस्ता
आता चकवा देण्याला पाही कारण

लागावा पैसा तिला पाहण्यासाठी
बरबादीला मग मिळेल शाही कारण

तू कितीकदा येण्याचे टाळुन झाले
बघ सुचेल जाण्याचे आताही कारण

....रसप....
२१ नोव्हेंबर २०१३  

Thursday, August 08, 2013

हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी..

'मराठी कविता समूहा'च्या 'अशी जगावी गझल - भाग २९' मध्ये माझा सहभाग -

ती नसल्याच्या दु:खाला आनंदी किनार आहे
स्वप्नामध्ये भेटण्यास ती रोजच तयार आहे

भिंतीवरचे घड्याळ माझी वेळ दाखवत नाही
हृदयी टिकटिकणारा काटा बहुधा चुकार आहे

दाढ्यांना कुरवाळुन जो तो 'हांजी-हांजी' करतो
मलाच केवळ खरे बोलण्याचा हा विकार आहे

हो, मी करतो तिची चाकरी इमान-इतबाराने
बस प्रेमाचा कटाक्ष एकच माझा पगार आहे

हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी
एकदा तरी 'तू' बनण्याचा माझा विचार आहे

------------------------------------------------------

कविता लिहिणे, पोळ्या करणे एकसारखे असते
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे

....रसप....
७ ऑगस्ट २०१३ 

Tuesday, July 09, 2013

पाऊस नसे हा पहिला..

पाऊस नसे हा पहिला पण भिजणे बाकी आहे
मी तिच्या लोचनांमधुनी पाझरणे बाकी आहे

विश्वास कसा ठेवावा तू आसपास असल्याचा
माणूस माणसामधला सापडणे बाकी आहे

मी लिहिल्या अनेक कविता संतोष वाटला नाही
नुकतेच मला कळले की, 'तू' सुचणे बाकी आहे

सत्यास शोधले होते, सत्यास मांडलेसुद्धा
पण सत्य नग्न असते हे आवडणे बाकी आहे

माझ्यात राम आहे अन् माझ्यामधेच रावणही
चेहरा तुम्हाला दुसरा दाखवणे बाकी आहे

आईस फसवुनी 'जीतू' मी अनेक पाउस भिजलो
ती ओल मनातुन अजुनी वाळवणे बाकी आहे

....रसप....
८ जुलै २०१३  

Wednesday, June 19, 2013

कंटाळ्याचाही कंटाळा !

कधी तरी दु:खांनो माझेही घर टाळा
आता आला कंटाळ्याचाही कंटाळा

जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुलाच बघणे
खिन्न मनाला सुन्न क्षणी हा सुचतो चाळा

एक दिवस नोकरी अचानक जेव्हा सुटली
छोट्या शिक्षा करणारी आठवली शाळा

जे म्हटले ना कळले, जे कळले ना म्हटले
नजर भिडवली नजरेला अन् हा घोटाळा ?

एकाही शेरातुन जेव्हा निघेल ज्वाला
तेव्हा माझ्या अवशेषांना खुशाल जाळा..

अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
खेळातून मला ह्या देवा कृपया गाळा

एकदाच मी हवे तसे रस्त्यास वळवले
पुन्हा पुन्हा वळण्याला त्याच्या बसला आळा

शेर विठ्ठलाबद्दल होता, त्याचा नव्हता
तरी 'जितू' लोकांस दिसे माझ्यातच 'काळा'

....रसप....
१९ जून २०१३

-----------------------------------------------

अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
देवा, तुमचा डाव रडीचा तुम्हीच खेळा

....रसप....

Saturday, June 15, 2013

पाऊस आवडत नाही

पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही

सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही

ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !

मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही

मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही

ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही

बन देव, दगड वा श्वापद
माणुसपण सोसत नाही

....रसप....
१४ जून २०१३

Monday, April 29, 2013

आजही..


पहिल्या स्पर्शाला ओझरते आठवतो आजही
शेवटच्या स्पर्शास विसरताना रडतो आजही

सोबत असते निरिच्छ काळी रात्रच ही नेहमी
मी पणतीसम शांतपणे जळतो विझतो आजही

कुणीच फिरकत नाही येथे, भेटणार ना कुणी
माझ्या अस्तित्वाची आशा बाळगतो आजही

कुठे झोपड्या, इमारती वा महाल वा बंगले
माणुस असलेला माणुस ना आढळतो आजही

एक महात्मा जो सत्याच्या कामी आला कधी
नोटेवरचा फोटो सारे आठवतो आजही

झळा सोसतो, वार झेलतो, कधी न हरतो 'जितू'
आशिक़ केवळ नकार ऐकुन तडफडतो आजही

 ....रसप....
२८ एप्रिल २०१३

Monday, March 04, 2013

तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे..


किती धावलो तरी सावली येते मागे-मागे
तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे

मेहनतीच्या पैश्यासाठी कुणी न झिजतो आता
चोर झोपतो निवांत रात्री धनी बिचारे जागे

विठ्ठलदर्शन घेण्यासाठी अनवाणी मी गेलो
तिथे पाहिले रखुमाईशी तोही फटकुन वागे !

'गजानना*ने कधी फुंकली चिलीम होती' कळता
श्रद्धा-भक्ती चुलीत जाते, व्यसन तेव्हढे लागे

खोऱ्याने ओढावा पैसा तरी पुरे ना पडतो
आणि कुणाचे भिक्षा मागूनही व्यवस्थित भागे !

….रसप....
४ मार्च २०१३

*गजानन महाराज - शेगांव 

Wednesday, February 13, 2013

शेर तुझ्यावर जेव्हा एकच सुचला होता..


शेर तुझ्यावर जेव्हा एकच सुचला होता
थवा आठवांचा डोळ्यातच दडला होता

रोज सकाळी जगास वाटे 'उजाडले की!'
लपलेला अंधार तेव्हढा दिसला होता

छान वाटले आरश्यास बोलून तुझ्याशी
तो माझ्याशी गप्पा मारुन थकला होता

मनात नसतानाही रडलो आज सकाळी
अर्घ्यासाठी सूर्य कधीचा अडला होता

कधीच माझे दु:ख कुणाला सांगत नाही
कारण पूर्वी ऐकुन जो-तो हसला होता

नकोस पाहू 'जितू' चेहरे हरलेले तू
हरलेलाही हरण्याआधी लढला होता


....रसप....
१३ फेब्रुवारी २०१३

Monday, November 26, 2012

तुलना

जगणे म्हणजे रोजरोजच्या पराभवाची तुलना
माझ्याशी मी करून हरतो रोज स्वत:ची तुलना

जागृत आहे कुणी तर कुणी नवसाचाही आहे
पिढ्या-पिढ्या देवासोबत चाले देवाची तुलना

तू असल्याची खात्री पटते डोळे मिटल्यानंतर
परिस्थितीशी नकळत होते मग स्वप्नाची तुलना

हात पकड, चल तुझ्या मंदिरी आज तुला मी नेतो
होउन जाऊ दे देवासोबत भक्ताची तुलना

ह्या येणाऱ्या क्षणात आहे बरेच जगण्यासाठी
वाया जाइल क्षण करण्याने आज-उद्याची तुलना

....रसप...
५ नोव्हेंबर २०१२

Tuesday, October 30, 2012

वळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू?


वळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू?
सरूनही पायी घुटमळणाऱ्या रस्त्यांचे काय करू ?
 
दुरून माझ्या प्रश्नाचे उत्तर डोळ्यांनी तुझ्या दिले
आज तुझ्या स्पर्शाने पडलेल्या प्रश्नांचे काय करू ?

एक गुन्हा केला प्रेमाचा, दुसरा हा की सांगितले
तुला भेटलो पुन्हा पुन्हा त्या अपराधांचे काय करू ?

तुझ्या सोबतीने सुचलेल्या कवितांना विसरुन झाले
विरहाच्या दु:खातुन फुलणाऱ्या गझलांचे काय करू ?

स्वप्नामधले अनेक क्षण अवतरले होते खरेखुरे
अजून डोळ्यावर फिरणाऱ्या मोरपिसांचे काय करू ?

खळकन तुटता पापणीमधे पाण्यासोबत स्वप्न झरे
काळजात रुतलेल्या खुपणाऱ्या काचांचे काय करू ?

आजकाल मी महत्प्रयासाने नजरेला आवरतो
मनामधे दाटुन येणाऱ्या उचंबळांचे काय करू ?  

असे एकटे जगणेसुद्धा अशक्य नाही, कठिण जरी
गजबजलेल्या घरात माझ्या, एकांतांचे काय करू ?

....रसप....
२९ ऑक्टोबर २०१२  

Tuesday, October 02, 2012

तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते


चर्चा करण्यासाठी नविन विषयही होते
त्यांना चर्चा हरण्याचे पण भयही होते

ज्यांना माफी मिळते ज्यांची गयही होते
त्यांच्या दानाची देवास सवयही होते

जखमच होते गेलेल्या प्रत्येक क्षणाची
क्वचितप्रसंगी एक लाघवी सयही होते

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

तिच्या गुंतण्यावरची बंदी गळ्यातले सर..
पण नजरेला होकाराचे भयही होते

सुरुवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो
हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते

तिला पाहिल्यावर हृदयाची साद वाढली
धडधडते ठोके मग चुकले लयही होते

नाक कान डोळे अन होते हात-पायही
प्रेमानंतर कळले एक हृदयही होते

त्या काळी मी विचारले तर 'नको' म्हणाली
तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते

....रसप....
२७ सप्टेंबर २०१२

Saturday, September 29, 2012

मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर..


मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर
तुझ्याचसाठी शब्द जन्मला 'नितांतसुंदर'!

क्षितीज म्हणजे भास असावा, मला न वाटे
तुला पाहण्यासाठी झुकते खाली अंबर

प्रचंड दुखते हृदयामध्ये तुला पाहता
पण आवडतो उरामधे शिरलेला खंजर !

सारी दुनिया त्याची जिंकुन झाली होती
तुला भेटला नव्हता कारण कधी सिकंदर

तुझ्यात हरवुन 'जीतू' लिहितो कविता - गझला
वेडी दुनिया म्हणते त्याला 'मस्त कलंदर' !

....रसप....
२८ सप्टेंबर २०१२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...