Sunday, March 29, 2009

आमिर (चित्रपट कविता)




आमिर (चित्रपट कविता)
ही उलझन वाढे पुन्हा पुन्हा
मी वणवण करतो सुना सुना
निष्पाप प्राण का येथ पणा
मी वणवण करतो सुना सुना

मनात आशा हजार घेऊन
परतुनी आलो परदेशातून
काय योजले कुणी कशाला
अलगद फसलो स्वत:च होऊन
परतीच्या ना दिसती खुणा
मी वणवण करतो सुना सुना

इच्छित, ईप्सित काय कुणाचे
मला गोवले कशास येथे
पापभिरू मी सज्जन शिक्षित
मला न कळते काय चालले
सोडून माझ्या आप्तजना
मी वणवण करतो सुना सुना

एकच क्षण जो मला लाभला
क्षणात सारा डाव उलटला
नावाचा मी खराच आमिर
मुक्त जाहलो पाश खुला
ना वणवण आता येथ पुन्हा
ना वणवण आता येथ पुन्हा


....रसप....
२९ मार्च २००९

Saturday, March 28, 2009

हेतु नव्हता माझा..

माझं बोलणं तुला
आज काल आवडत नाही
खरं सांगायचं तर
ब-याचदा मलाही आवडत नाही..
पण बाहेर पडला शब्द
थांबवता येत नाही
अन् ओठ माझेच असले तरी
नेहमी मीच बोलत नाही
कधी माझी भीती बोलते
कधी बोलते हूरहूर
कधी जुन्या आठवणींचे
नुसतेच वाहतात पूर
कधी असतो पूर्वानुभव
तर कधी निखळ प्रेम
मनात असतं तेच बोलेन
काहीच नसतो नेम

वाळलेलं पान मी
वा-यावरती उडतोय
कधी इथे कधी तिथे
निष्कारण फिरतोय
कधी कुठे कशी माझी
भटकंती संपणार
ही असली फरफट तरी
कुठवर चालणार….??

चिडू नकोस सखे
सोड रुसवा तुझा
तुझ्या डोळ्यांत पाणी...
हा हेतु नव्हता माझा..


याचक..
....रसप....
२८ मार्च २००९

Sunday, March 15, 2009

आनंद

क्षणही आयुष्याचा
मी उगाच रडलो नाही
नियतीशी असेन हरलो
मृत्यूशी हरलो नाही

एकेक घाव तो जपला
जो खोल-खोल मज रुतला
झेलले उरावर सारे
मी पाठ फिरवली नाही

मावळत्या सायंकाळी
रंगांची उधळण झाली
मी कुठल्या एका रंगी
हटकून रंगलो नाही

प्रत्येक रंग मी ल्यालो
अन् सर्व रसांना प्यालो
आनंद वाटला येथे
दु:ख़ास दावले नाही


.…रसप….
१५ मार्च २००९ 

Tuesday, March 03, 2009

आशिर्वाद देहि

हा जीव ना जळावा
अमृतास प्याया
हे घोट जीवनाचे
मजला मधुर व्हावे

मी घोट-घोट घ्यावे
जे प्राशले, पचावे
रानात मोर नाचे
ते वागणे असावे

कोणास ना कधीही
फसवून मी हसावे
अन् भाट होउनीही
मी ना कधी झुकावे

उधळीत रंग यावे
उधळून तृप्त व्हावे
जिंकून मैफलींना
मागे सुखी उरावे

ना संत मी न थोर
बाहूंत क्षीण जोर
लाटांवरी तरुनी
मी फक्त पार व्हावे

देवा तुझ्या कृपेने
सुखवंत आज आहे
शब्दांस एकदाही
वाया न घालवावे

आयु सरून जाई
नच मित्र एक लाभे
मज लाभले परि जे
कश्चित् न दूर जावे

आशीर्वाचास देहि
तुज सर्वदा स्मरावे
माणूस तू घडवले
माणूस मी रहावे

….रसप….
०१ मार्च २००८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...