Saturday, June 25, 2016

रमन राघव २.० - Welcome back Anurag Kashyap ! - (Movie Review - Raman Raghav 2.0)

इतर लोकांनी काय व कसं लिहिलं आहे मला माहित नाही. पण ह्या सिनेमाबद्दल लिहित असताना मी जाणीवपूर्वक त्याच्या कथानकाबद्दल लिहिणे टाळणार आहे. कारण जर कथानकाची तोंडओळख जरी करून दिली, तरी सिनेमाचं वेगळेपण समजून येऊ शकेल आणि ते होऊ नये, प्रत्यक्षात पाहत असतानाच हे वेगळेपण आश्चर्याचा धक्का देऊन जावं, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे जर कुणाला स्टोरी जाणून घ्यायची असेल, तर मी आधीच क्षमा मागतो !

वरील प्रास्ताविकातून हे तर समजून आलंच असेल की 'रमन राघव २.०' म्हणजे अनुराग कश्यप व कंपनीने टाकलेली कुप्रसिद्ध सिरीयल किलर रमन राघव उर्फ सिंधी दलवाई वर बेतलेली बायोपिक टाईप पाटी नाही. ती तशी नसणार हे मला त्याचे ट्रेलर पाहूनच वाटलं होतं. ट्रेलरमध्ये नवाझुद्दिन एका लहान मुलाला बांधून ठेवून त्याला बोलत असतो की, 'क्या नाम है तेरा ? 'पाकिट !' तू छोटा है ना, इस लिये पाकिट. कल आपन कोई पुछेगा की तेरेकू क्यू मारा. तो आपन बोलेगा, आपन ने सिरफ पाकिट मारा!' १९६५-६६ च्या आसपास मुंबईत अनेक खून केलेल्या रमन राघवने कधी कुणाला ओलीस धरलं नव्हतं. सिनेमा मूळ रमन राघवपेक्षा वेगळा आहे ह्याचा ह्याहून मोठा क्ल्यू हा की ट्रेलरमधून समजून येतं की ही कहाणी जुन्या काळातली नसून आजची आहे आणि सिनेमाच्या शीर्षकात '२.०' सुद्धा आहे.

मग 'रमन राघव २.०' काय आहे ? कशाबद्दल आहे ?

हा सिनेमा म्हणजे केवळ एक कथन नाही. ते एक विश्लेषण आहे. एक थिअरी त्यात मांडली आहे.
मानसिक अस्थैर्यामुळे खून करत सुटणे, ही आपल्या अंत:प्रेरणेसमोर आपल्याच सद्सद्विवेकाने पत्करलेली बिनशर्त शरणागती असते. ही प्रेरणा जितकी प्रखर असेल, तितकंच तिला शरण जावं लागणं हे अटळ असतं. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाची एक अंत:प्रेरणा (Drive) असतेच. ती जर सकारात्मक, कलात्मक, रचनात्मक, विधायक वगैरे असेल आणि वेळीच तिला ओळखलं तर उद्धार होतो. पण जसं प्रकाशाचं अस्तित्व मान्य करणं म्हणजेच अंधाराचंही अस्तित्व स्वीकारणं आलं, तसंच हीच अंत:प्रेरणा नकारात्मक, विध्वंसक वगैरेही असू शकते, हेही मान्य करायला हवं. भले, ते अमानुष असेल, मानसिक अस्थैर्य असेल, तरी 'आहे' व 'असू शकतं' हे सत्य बदलत नाही. मग अश्या अज्ञात, अनाकलनीय, विचित्र प्रेरणेपासून दूर जाण्यासाठी एक दुबळं मन इतर काही पर्याय शोधत राहतं. नशा, सेक्स, वगैरे. ते मन खरं तर 'आपली प्रेरणा काय आहे' ह्याचा शोध घेत असतं.

कई चेहरे हैं इस दिल के न जाने कौनसा मेरा

अशी काहीशी त्याची अवस्था, समस्या असते.
सरतेशेवटी, अटळ विधिलिखिताप्रमाणे जेव्हा आपली अंत:प्रेरणा समजून येते आणि तिला मन शरण जातं, तेव्हा कुणी 'ऑटो शंकर' बनतो, कुणी स्टोनमॅन आणि कुणी 'रमन राघव'.

'रमन राघव २.०' ह्या मानसिकतेचा ठाव घेतो. Which is like never before.


अनेक कारणं, वैशिष्ट्यं आहेत, ज्यामुळे 'रमन राघव २.०' एक खूपच वेगळा सिनेमा ठरतो.

१. वर सांगितल्याप्रमाणे त्या मानसिकतेचा ठाव घेणं.

२. हे कथानक त्रयस्थ व तटस्थपणे केलं गेलं आहे. सांगणारी व्यक्ती कोण चांगलं, कोण वाईट हे सांगत बसत नाही. कोण कसं आहे, हे फक्त दाखवून दिलं जातं.

३. सिनेमा थरकाप उडवेल, पण त्यासाठी नग्न हिंसाचार दाखवत नाही. जसा अनुराग कश्यपनेच 'गँग्स ऑफ वासेपूर १ आणि २' मध्ये दाखवला होता.

४. 'कहानी'मध्ये बकाल कोलकाता जितकं प्रभावीपणे दाखवलं होतं, तितक्याच प्रभावीपणे इथे 'मुंबई' दिसते. 'आमीर'मध्ये मुंबईचा हे कळकट चेहरा दाखवला होता. इथलं मुंबई चित्रण फक्त कळकटपणावर न थांबता कळकटपणाच्याही आत शिरुन त्याची व्याप्ती दाखवतं. ही मुंबई ह्या कथानकातलं एक महत्वाचं पात्र आहे. ती नसेल, तर ही कहाणीही नसेल.

५. 'बॉम्बे वेलवेट' मधून अनुराग कश्यपला नक्की काय म्हणायचं होतं, ते समजलं नव्हतं. तो एक धक्काच होता. फियास्को होता. त्यानंतर 'रमन राघव २.०' येतोय. पीछेहाट होत चाललेल्या सैन्याने निकराने जोरदार मुसंडी मारुन शत्रूची दाणादाण उडवावी, त्या जिद्दीने अनुराग कश्यपने पुनरागमन केलं आहे.

६. 'बॉम्बे वेलवेट'चा सहलेखक 'वासन बाला' इथलाही सहलेखक. कश्यपप्रमाणे 'बाला'चंही हे एक प्रकारे रिडम्प्शनच. सिनेमात मांडलेल्या थिअरीची कल्पना करणं, तिच्यावर बुद्धीनिष्ठ विचार करुन तिला मूर्त स्वरुपात आणणं ह्यासाठी कश्यप-बाला ह्या लेखकद्वयीला सलाम !

७. हा सिनेमा एक जबरदस्त थ्रिलर असला तरी मांडणीत कुठलीही गुंतागुंत नाही. सुटसुटीत मांडणी नेहमीच बाळबोध नसते आणि क्लिष्ट मांडणी नेहमीच वैचारिक नसते. कथा वाहत्या पाण्यासारखी अगदी नैसर्गिक प्रवाहीपणे पुढे सरकत जाते.

८. नवाझुद्दिन सिद्दिकी जेव्हा वाईट काम करेल तेव्हा ती बातमी असेल. ट्रेलरमधूनच त्याने त्याच्या भूमिकेची सायकोगिरी दाखवून दिली आहे आणि सिनेमातून तर सप्रमाण दाखवून देतो की 'आत्तापर्यंत जे पाहिलंत ते तर फक्त ट्रेलरच होतं !' त्याची भूमिका अमानुष, कपटी आणि विकृत व्यक्तीची आहे. हे सगळं सादर करताना he leaves no stone unturned.

९. 'मसान'मधून आपली छाप सोडलेला 'विकी कौशल' आपल्या दुसऱ्या सिनेमात पुन्हा एकदा दमदार काम करतो. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या नवाझुद्दिन सिद्दिकीसारख्या ताकदीच्या अभिनेत्यासमोर ह्या अननुभवी नवोदिताचा कसा टिकाव लागेल, ह्याचं उत्तर सिनेमा देतो. लोक बहुतेक तरी ह्या सिनेमाला 'नवाझुद्दिनचा सिनेमा' म्हणून लक्षात ठेवतील आणि विकी कौशल अनसंग राहील. पण माझ्या मते 'रमन राघव २.०' चे नवाझुद्दिन आणि विकी हे दोन पाय आहेत आणि सिनेमा लंगडा नाही.

१०. बॉक्स ऑफिसवर जमवलेला गल्ला हे दर्ज्याचं द्योतक असत नाही. कुठलाही पुरस्कारसुद्धा दर्ज्याची हमी देत नाही. 'खानावळी'चे आचरट चाळे बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवत असले आणि अनाकलनीय व कंटाळवाणे 'कोर्ट'सारखे रटाळ सिनेमे पुरस्कारांची लूट करत असले तरी इथेच अगदी वेगळा विचार करुन त्यालाही प्रभावीपणे मांडणारे कलंदरही आहेत. असे सिनेमे खोऱ्याने पैसा ओढणार नाहीत किंवा पोत्यात पुरस्कार भरून घेऊन जाणार नाहीत. ते फक्त बराच काळ लक्षात राहतील आणि ते लक्षात राहावेत इतकीच त्यांची अपेक्षाही असेल.

'रमन राघव २.०' एक असा थरार आहे, जो मी विसरू इच्छित नाही. बहुतेक तरी मी परत तो पाहणार नाही कारण पहिल्यांदा पाहतानाचा जो जबरदस्त धक्का आहे, तो दुसऱ्यांदा पाहताना कदाचित बसणार नाही.
मला डायल्युशन नकोच आहे.

रेटिंग (द्यायचंच असेल तर) - * * * * *

- रणजित पराडकर

Saturday, June 18, 2016

निवडक वास्तवाचं प्रभावी सादरीकरण - 'उडता पंजाब' (Movie Review - Udta Punjab)

राजकीय नेते, उच्चपदस्थ पोलीस, सरकारी अधिकारी, समाजातील इतर काही बडी धेंडं वगैरेंच्या आशीर्वाद व सहभागाने चाललेला ड्रग्सचा बेकायदेशीर व्यापार, त्याच्या आहारी गेलेली एक तरुण पिढी, ह्या सगळ्याविरुद्ध एखाद्या तत्वनिष्ठ सामान्य व्यक्तीचं किंवा व्यक्तींचं उभं राहणं, कुणी सुधारणं, कुणी बरबाद होणं कुणी संपणं असं सगळं कथानक आपण ह्यापूर्वीही अनेक सिनेमांत पाहिलं आहे. 'उडता पंजाब'चं कथानक ह्याहून वेगळं असं काही सांगत नाही.
पण फरक आहे.

विशाल भारद्वाजसोबत अनेक सिनेमांवर दिग्दर्शन व लेखणासाठी काम केल्यावर दिग्दर्शक म्हणून अभिशेष चौबेने इश्क़िया आणि डेढ इश्क़िया हे दोन वेगळ्याच धाटणीचे जबरदस्त सिनेमे केले आणि त्यानंतर आता 'उडता पंजाब'. ही ड्रग्सच्या बोकाळलेल्या व्यापाराची ह्याआधीही सांगून झालेली कहाणी चौबे स्वत:च्या शैलीत सांगतात. ह्या सादरीकरणात कुठलेही अशक्य योगायोग, अचाट शक्तीप्रदर्शनं आणि इतर 'अ व अ' गोष्टींना बिलकुल स्थान नाही. नाही म्हणायला जेव्हा काही पात्रांचं मनपरिवर्तन होतं, तेव्हा ते जरा अतिसहज, अतिसुलभ वगैरे वाटतं. पण नंतर हळूहळू त्यांच्यातला तो बदल जस्टीफाय होत जातो. कहाणी वास्तवाशी फटकून वागणार नाही, ह्याची पुरेपूर खरबरदारी घेतलेली जाणवते.
पण म्हणून ह्याला 'वास्तववादी' म्हणता येईल का ? - असा 'सैराट'ने पाडलेला प्रश्न मला परत पडला.

एक कथानक ज्याला वास्तवाची जोड आहे, ते वास्तववादीच असतं का ? नक्कीच नाही. आज पंजाबची जी अवस्था आहे, ती ह्याहून खूप भयंकर आहे. ड्रग्समुळे कुटुंबंच्या कुटुंबं उध्वस्त झाली आहेत. किरकोळ १२००-१५०० च्या लोकसंख्येच्या गावांतही लाखो रुपयांचे ड्रग्स नियमित विकले जात आहेत. काही हजार कोटींची उलाढाल हा धंदा करतो आहे. 'मकबूलपुरा' सारखी गावं 'विधवांची गावं' बनली आहेत. कित्येक तरुण मुलं, घरातली करती पुरुषमंडळी ड्रग्सच्या विळख्यात येऊन संपली आहेत. फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रियांतही ड्रग्सचं प्रमाण प्रचंड आहे. किती तरी ठिकाणी सर्व कुटुंबीय एकत्र मिळून हा आहार करत आहेत ! बहुतांश तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी गेलेली आहे. 'पंजाब'चं जे 'सुजलाम सुफलाम' चित्र आपल्यासमोर वर्षानुवर्षं आहे, ते झपाट्याने बदलत चाललं आहे.
ही सगळी अत्यंत चिंताजनक परिस्थिती 'उडता पंजाब'मध्ये व्यवस्थित सादर केली गेलेली नाही. इथे फक्त ड्रग्सचं एक भलंमोठं रॅकेट चालवणारे राजकीय नेते, त्यांच्या व्यवसायात सहभागी भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि आहारी गेलेली तरुण व अल्पवयीन पिढी इतकंच चित्र दिसतं. प्रत्यक्षात ही वाळवी फक्त एखाद-दुसरी पिढीच पोखरत नसून तिने एक संपूर्ण समाज पोखरायला घेतलेला आहे. ज्याला वय, ऐपत, लिंग, शिक्षण वगैरे असे कुठलेच अडसर नाहीत. इतकी व्यापकता 'उडता पंजाब'च्या कथानकात दिसून येत नसली, तरी असलेले कथानक अस्वस्थ करणारे नक्कीच आहे.

ही कहाणी असिस्टन्ट सब-इन्स्पेक्टर सरताज सिंग (दिलजित दोसांझ), डॉक्टर प्रीती साहनी (करीना कपूर), रॅपर टॉमी सिंग (शाहीद कपूर) आणि एक गरीब मुलगी जिचं नाव उघड होतच नाही (आलिया भट्ट) ह्यांची आहे. सरताज आणि डॉ. प्रीती ह्यांची कहाणी एकत्र सुरु आहे तर टॉमी आणि 'ए.ग.मु.' च्या कहाण्या स्वतंत्र सुरु आहेत. पण पुढे जाऊन ह्या तीन कहाण्या एकत्र येतात आणि तिन्हींचा शेवटही एकत्रच होतो. सरताज भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग आहे, प्रीती व्यसनाधीन व्यक्तींना मदत करणारी एक कार्यकर्ती आहे, व्यसनाधीन तरुण पिढीचा 'टॉमी सिंग' हा आदर्श आहे आणि 'ए.ग.मु.' अपघाताने ह्या सगळ्या व्यापारात ओढली जाऊन भरडली जात आहे.


एका राजकीय नेत्याने चालवलेला हा कारभार असला, तरी त्याला एक-दोनदा नुसता चेहरा दाखवण्याशिवाय फारसं काम नाही आणि इतर लोक तर त्याची प्यादी म्हणूनच आहेत. हा लढा कुणा व्यक्तीविरोधात नसून, एका व्यवस्थेविरोधात आहे आणि व्यवस्थेला चेहरा नसतो. म्हणूनच ह्या कहाणीतल्या खलप्रवृत्तीला एरव्हीप्रमाणे ठसठशीत चेहरा-मोहरा नाही.

दिलजित दोसांझ हिंदी सिनेमात अभिनेता म्हणून प्रथमच झळकतो. एक पूर्ण लांबीची मुख्य व्यक्तिरेखा साकारताना तो कुठेच कमी पडत नाही. करीनासारख्या 'सीझन्ड' अभिनेत्रीसमोरही तो टीकाच आश्वासक वाटतो. 'आप इतना.. परफेक्ट हो.. की..... टाटा !' असं अर्धवट वाक्य बोलतानाचा सरताज खूपच आपलासा वाटतो. करीना काही ग्रेट अभिनेत्री वगैरे नाही, पण तिची डॉ. प्रीती साहनीसुद्धा लक्षणीय आहे. बऱ्याचदा असते, तशी ओव्हर अ‍ॅक्टिंग तिच्याकडून झालेली नाही. 'चंदिगढला गेल्यावर सीसीडीमध्ये जाऊ या' असं ती जेव्हा म्हणते, तेव्हा मनात नकळतच कालवाकालव होते.
शाहीदचा ड्रग अ‍ॅडिक्ट टॉमी जबरदस्त झाला आहे ! गेल्या काही वर्षांत एक अभिनेता म्हणून शाहीद कपूरने खूप प्रभावित केलं आहे. सणकी व थोडासा सटकलेला टॉमी भरपूर धमाल करतो.
मात्र सगळ्यात दमदार आहे आलिया भट्ट. ह्या भूमिकेसाठी तिला कळकट दिसणं खूप गरजेचं होतं. मुळात अत्यंत गोड चेहरा असताना असा कळकटपणा वागवणं, खूप कठीण असावं. मेक अपमुळे एखादा 'लूक' येईल पण तो 'लूक' खरा वाटावा ही जबाबदारी तर तिचीच ना ? तिचा निर्दोष निरागसपणा रगडला आणि भरडला जात असताना आपल्यालाच असह्य होतं. त्यातून येणारा बंडखोर संताप व त्या संतापाचे होणारे उद्रेक तिने ताकदीने सादर केले आहेत.

अमित त्रिवेदीचं संगीत सिनेमाला साजेसं आहे. 'इक कुडी' मध्ये टिपिकल अमित त्रिवेदी स्टाईल मेलडी आहे. इतर गाणी बेतास बात आहेत.

अर्ध्याहून अधिक सिनेमा पंजाबीत आहे. त्याला 'हिंदी सिनेमा' म्हणावं का, असाही एक प्रश्न आहे. हे ठरवण्याचे मापदंड काय असतात किंवा असतात तरी का, समजत नाही. माझ्या मते तरी हा एक पंजाबी सिनेमा आहे, हिंदी नाही. कारण ह्याच न्यायाने 'फोबिया' इंग्रजी सिनेमा होऊ शकतो. 'वेटिंग' तर नक्कीच इंग्रजी समजायला हरकत नाही.

सेन्सॉरशिपमुळे 'उडता पंजाब' ने बरंच वादंग माजवलं आहे. ह्या प्रसिद्धीचा उपयोग चित्रपटाला होणार आहे. एरव्ही ह्याहून जास्त भडक वास्तवदर्शन करणारे गँग ऑफ वासेपूर सारखे चित्रपट शांतपणे आले आणि माफक यश मिळवून गेले. 'उ.पं.' मध्ये धक्कादायक असं काहीच चित्रण नाही. किंबहुना, जितकं वास्तव त्याने दाखवायला हवं होतं तितकं दाखवलेलंच नाही, असंच मला वाटलं.

मात्र, 'वास्तवदर्शन' किंवा 'वास्तववाद' हा काही चांगल्या चित्रपटाचा एकमेव निकष होऊ शकत नाही. उत्कृष्ट अभिनय, परिणामकारक हाताळणी, अर्थपूर्ण लेखन, श्रवणीय संगीत, उत्तम तांत्रिक मूल्ये वगैरे अनेक निकष असू शकतात आणि त्या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास 'उ.पं.' एक लक्षवेधी सिनेमा ठरतो.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

Sunday, June 12, 2016

अमितुद्दिन सिद्दिकी (Movie Review - Te3n / Teen)

क्रिकेटचं भूत मानगुटीवर बसलेलं असतानाच्या काळातली गोष्ट. भारतीय संघ परदेशात (खासकरून भारतीय उपखंडाबाहेर) खेळायला गेला की पानिपत ठरलेलं असायचं. 'हे हरणार आहेत' हे इतकं व्यवस्थित माहित असायचं की वाटायचं, 'जातात कशाला तिथे खेळायला ?'
पण 'निकाल लागणार' हा निकाल माहित असतानासुद्धा सामन्याची वेळ लक्षात ठेवून मी बरोब्बर तेव्हा टीव्हीसमोर बसायचोच. कधी कधी पहाटे लौकरही उठायचो त्यासाठी. त्यामागे विचार हाच की, 'फाईट किती देतात पाहू !'
'फाईट'.
जिंकणार नाहीत, ह्याची खात्रीच. फक्त 'फाईट'.

'तीन' (TE3N) बद्दलची उत्सुकताही अशीच काहीशी. ही बच्चन वि. नवाझुद्दिन अशी लढत होती. निकाल काय लागणार हे मला आधीच माहित होतं. पण 'फाईट' किती दिली जातेय, हे पाहायचं होतं. अपेक्षेनुसारच निकाल लागला. पण फाईटही चांगली दिली.
बच्चनने नवाझुद्दिनला.

बच्चन हा माझ्या मते एक चांगला अभिनेता आणि महान सुपरस्टार आहे आणि नवाझुद्दिन स्टारही नाही, पण एक महान अभिनेता ! बच्चन पडद्यावर येतो तेव्हा त्याच्या स्टारपणाचं वलय पडदा व्यापून उरतं. नवाझुद्दिन जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा त्याचं काम पडदा व्यापून उरतं. एखादा महासागर किनाऱ्यावरच्या दगडासमोर जसा धडका देऊन देऊन निष्प्रभ ठरतो, तसं बच्चनचं महास्टारपण नवाझुद्दिनच्या खमक्या अभिनयासमोर उसळ्या खाऊन खाऊन कमी पडलं. मला ह्याचाच सगळ्यात जास्त आनंद झाला. 'काव्यात्मक न्याय' दिसला की आपल्यातल्या न्यूनपिडीत सामान्य माणसाला उगाच स्वत:च जिंकल्यासारखं वाटतं, तसंच काहीसं मला वाटलं. 'गडगंज श्रीमंतीपुढे एक मध्यमवर्गीय जिंकला' असा एक भास मला झाला.
मी खूष ! पिक्चर कसा आहे, हा भाग पुढचा !

'तीन' बद्दलची उत्सुकता त्याच्या शीर्षकापासूनच सुरु झाली. अनेक दिवस हे 'टीईथ्रीएन' असंच वाटत होतं. अजूनही काही जणांना तसंच वाटतही असावं. हा पांचटपणा असला, तरी मला आवडला ! पण मुळात सिनेमाचं नाव 'तीन' का असावं, हे नाही आवडलं. 'तीन मुख्य व्यक्तिरेखा असणं', ह्या फुटकळ कारणाशिवाय ह्या शीर्षकाला दुसरं काहीही समर्थनीय मला तरी गवसलं नाही. ह्यापेक्षा तर 'जजबा' शीर्षक चांगलं होतं. ('जजबा'कारांना जर हा व्यक्तिरेखांचा हिशोब मांडायचा असता तर 'देढ' करावं लागलं असतं आणि ते D3DH असं लिहिता आलं असतं. अर्र्र.. कुठे भरकटतोय मी !)

'मॉन्टाज' (Montage) ह्या कोरियन (अर्थातच दक्षिण) चित्रपटावर 'तीन' अधिकृतपणे आधारला आहे.
कोलकात्यात घडणारं हे कथानक. जॉन बिस्वास (अमिताभ बच्चन) ची नात आठ वर्षांपूर्वी अपहृत होऊन नंतर मृतावस्थेत सापडलेली असते. गुन्हेगाराचा छडा लावण्यात यंत्रणा अपयशी ठरलेली असते. मात्र म्हातारा जॉन चिवटपणे रोज पोलीस स्टेशनात येऊन तपासकार्याची चौकशी करत असतो. आठ वर्षांपूर्वी ही केस ज्याने हाताळली असते, तो पोलीस अधिकारी आलेल्या अपयशामुळे निराश होऊन नोकरी सोडून एका चर्चमध्ये पाद्री बनलेला असतो. (फादर मार्टिन/ इन्स्पेक्टर मार्टिन - नवाझुद्दिन सिद्दिकी). तर आता पोलीस ठाण्याचा व पर्यायाने ह्या आठ वर्षं जुन्या केसचा चार्ज सरिता (विद्या बालन) कडे आलेला असतो.
चिवट जॉन, निराश मार्टिन आणि अननुभवी सरिता आपापल्या पद्धतीने ह्या आठ वर्षं जुन्या घटनेच्या स्मृती उगाळत, जपत किंवा दुर्लक्षित करत असतात आणि तेव्हाच अजून एक अपहरण घडतं. ह्या नव्या अपहरणात आणि त्या जुन्या केसमध्ये काही साधर्म्य असतं का ? दोन्हीच्या मागे एकच व्यक्ती असते का ? खरं काय आहे ? ह्या प्रश्नांची उत्तरं सरिता आणि मार्टिन शोधायला लागतात, तर दुसरीकडे जॉन मात्र जुन्या केसचा छडा स्वत:च लावत असतो. अश्या ह्या तिघांची कहाणी म्हणजे 'तीन.'


मांडणी जराशी, नव्हे, बऱ्यापैकी संथ आहे आणि जराशी गुंतागुंतीचीही. दोन कहाण्या एकत्र दाखवत असताना, जी एक विशिष्ट पद्धत वापरली आहे (ह्याविषयी मी नेमकं लिहू शकत नाही कारण त्यामुळे विचका होऊ शकतो.), ती पटेलच असं नाही. कदाचित काही जणांना चटकन लक्षातही येणार नाही. मला ती पटली नाही, पण तरी आक्षेपार्ह काहीच नाही. एक वेगळा प्रयोग आहे असं म्हणू. आपण आजपर्यंत तसं पाहिलेलं नसल्यानेही खटकणं स्वाभाविक आहे. मात्र चित्रपटाची लांबी तरी कमी करता आलीच असती. थ्रिलर आहे, तर पसारा असू नये हा एक अलिखित नियम आहे, असं मी मानतो. अनेक दृश्यांना सरसकट कात्री लावताच आली असती.

'कहानी'ने कोलकात्याचं जे जबरदस्त चित्रण केलं होतं, त्यामुळे आता मी कुठल्याही चित्रपटात 'कोलकाता' पाहिलं की थेट त्याच्याशीच तुलना होते. त्यात हाही सुजॉय घोषचीच निर्मिती असलेला सिनेमा. त्यामुळे तर तुलना अपरिहार्यच ! नाही दिसलं कोलकाता ! हे 'दिसणं' म्हणजे शहराचं पर्यटन नव्हे, ते 'कहानी'तही नव्हतंच. 'कोलकाता' माणसांत दिसायला हवं होतं. ते नाही दिसलं.

विद्या बालनने पोलीस अधिकाऱ्याची देहबोली उत्तम दाखवली आहे. ती दाखवण्यासाठी तिला दृश्यममधल्या तब्बूसारखी 'युनिफॉर्म' आणि विझलेल्या डोळ्यांची गरज पडली नाही. (तब्बूला तर त्यासहसुद्धा जमलं नव्हतंच !) विद्याने स्वत:च्या एकंदरच हालचालीत एक पुरुषीपणा जबरदस्त दाखवून दिला आहे. तिच्या बोलण्यातूनही 'खाक्या' जाणवतो.
तिची व्यक्तिरेखा 'सहाय्यक' म्हणून आहे. मुख्य पात्रं 'जॉन' आणि 'मार्टिन'च आहेत.
'जॉन बिस्वास' हा घटनेला आठ वर्षं उलटून गेल्यावरही रोज पोलीस स्टेशनात येणारा, आजही पुन्हा पुन्हा आपल्या नातीच्या जुन्या ऑडियो व व्हिडियोंना पाहणारा, झोप हरवलेला आणि चोवीस तास फक्त 'तो गुन्हेगार कोण आहे' हाच विचार करणारा एक वयोवृद्ध मनुष्य आहे. त्याच्या मनावर झालेल्या आघातामुळे त्याच्या डोक्यावरही थोडासा परिणाम झालेला आहे म्हणूनच तो इतक्या चिवटपणे एकाच गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे. त्याची पत्नी आणि मित्र (मार्टिन) सुद्धा त्याला टाळत आहेत. हा जो एक प्रकारचा वेडगळपणा आहे, तो बच्चनला दाखवता आलेला नाही. बच्चनचा 'जॉन' फक्त करुण दिसतो. त्याची दया येते, वाईट वाटतं त्याच्याकडे पाहून. पण 'जॉन'चं कारुण्य इतकं मर्यादित नाहीय. त्याच्या कारुण्याला असलेली वेडसर छटा समोर यायला हवी होती. ती आली नाही. तो खिन्नतेचा झाकोळलेला चेहरा ओढून अख्खा सिनेमाभर वावरतो.
दुसरीकडे, निराश होऊन नोकरी सोडून पाद्री बनलेला 'मार्टिन'. He is basically trying to run away from his failure. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी असतो तो. त्याला आलेलं अपयश त्याचा पिच्छा इतक्यात सोडणार नसतंच. तो जितका त्यापासून पळायचा प्रयत्न करतो आहे, तितकंच ते त्याला जवळ ओढत असणार. ही जी एक प्रकारची कुतरओढ आहे, ती नवाझुद्दिनने जाणवून दिली आहे. ठळकपणे दाखवून देण्याची संधी कथानकात त्याला नाही मिळालेली. पण आतल्या आत ही घुसमट त्याला छळते आहे, हे मात्र तो व्यवस्थित जाणवून देतो.
सव्यसाची चक्रवर्तीला लहान भूमिका आहे. ती त्याने चोख निभावली आहे.

बच्चनने स्वत:च गायलेलं 'क्यूँ रे' हे गाणं लक्षात राहतं. इतरही २-३ गाणी आहेत. त्यांचा कथानकात अडसर होत नाही आणि टिपिकल आजच्या गाण्यांसारखी उच्चस्वरात जाणारी असली, तरी 'गोंगाट' नसल्यामुळे त्रास तरी देत नाहीत.
संवादांबाबत, काही 'वन लायनर्स' चांगले आहेत.
पण संगीत आणि संवादांपेक्षा पार्श्वसंगीत जास्त महत्वाचं होतं आणि ते प्रभावी झालं आहे.

थोडीशी वाढीव लांबी, थोडीशी गुंतागुंत हे जर स्वीकारलं, तर नवाझुद्दिनचं (पुन्हा एकदा) उत्तम काम आणि बच्चनचा (पुन्हा एकदा) जबरदस्त 'स्क्रीन प्रेझेन्स' असा एक मस्त अनुभव 'तीन' देतो.
'फाईट' लक्षात राहते ! सोप्या शब्दांत सांगायचं तर नवाझुद्दिन बच्चनला 'खातो' !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Friday, June 03, 2016

फोबिया (Movie Review - Phobia)

'फोबिया' गेल्या आठवड्यात रिलीज झाला होता. २७ मे ला. पण त्या सुमारास सिनेमा पाहायला वेळ नव्हता. सहसा मी पहिल्या दोन-तीन दिवसांत पाहता आला तरच थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहतो, नंतर जायचा मला कंटाळा येतो. पण 'फोबिया' वेगळा वाटत होता आणि एक-दोन जणांनी चांगलंही म्हटलं. To add to it, त्यात राधिका आपटे मुख्य भूमिकेत. राधिका आपटे मला आवडतेच. तिच्यात अल्लडपणा आणि जबरदस्त आत्मविश्वास असं एक वेगळंच मिश्रण मला जाणवतं. तिचा चेहरा मला एकाच वेळी मिश्कील, विचारी, सुंदर आणि मादक असा वाटतो. एक समर्थ अभिनेत्री तर ती आहेच. तरीही मांझी, लै भारी मधलं तिचं काम मला विशेष आवडलं नव्हतं. 'फोबिया'मध्ये ती कसं काम करते, हे म्हणूनच औत्सुक्याचं वाटत होतं. 

'Psychological Thriller' भारतीय चित्रपटांत आजकाल वरचेवर दिसायला लागले आहेत. मात्र बहुतेक वेळा त्यांत मानसिक स्थैर्य बिघडलेली व्यक्तिरेखा नकारात्मक भूमिकेत असते. 'फोबिया' त्याला सन्माननीय अपवाद आहे. 

महेक देव (राधिका आपटे) ही एक मुंबईस्थित तरुण चित्रकार आहे. बिनधास्त आणि मुक्त स्वभावाची महेक तिच्या स्वभावाप्रमाणेच आयुष्यही जगते आहे. बिनधास्त आणि मुक्त. वयाची तिशी गाठूनही ती लग्नाच्या बंधनात अडकलेली नाही. शान (सत्यदीप मिश्रा) हा तिचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्याच्याशी तिचं नातं मित्रत्वाचंच आहे. त्या नात्याला प्रेमाचं नाव ती देत नाहीय. एकंदरीतच आपलं आयुष्य ती पूर्णपणे आपल्या मर्जीनेच जगते आहे. तिच्या चित्रांत मात्र एक प्रकारची असुरक्षितता, अनिश्चितता आपल्याला दिसून येते. मोजक्या, हव्या तेव्हढ्याच प्रतिमा व रंग त्यांत दिसत असले, तरी त्यांची गुंफण जराशी गुंतागुंतीची, गूढ किंवा अनाकलनीयही वाटते. कदाचित तिच्या व्यक्तिमत्वाचा एक असा कोपरा, जो अजून तिला स्वत:लाही गवसलेला नाही, तिच्या कलाकृतींतून आपल्याला दिसतो आहे. एखाद्या कलाकाराच्या कलंदर, लहरी स्वभावाचंच कदाचित हे दर्शन असावं.
स्वत:च्या अश्याच काही आत्ममग्न चित्रांचा प्रदर्शन सुरु असताना ती अर्ध्यातूनच तिथून निघते. नशेच्या बेधुंद अवस्थेत टॅक्सीत एकटी जात असताना तिच्यासोबत एक घटना घडते. ह्या घटनेमुळे मनात खोलवर दडलेली असुरक्षिततेची भावना जागृत होऊन तिच्या व्यक्तित्वावर परिणाम होतो. लोकांमध्ये बिनधास्त वावरणारी महेक घराबाहेरही पडेनाशी होते. तिची चित्रकला बाजूला पडते. 'Agoraphobia' नामक मानसिक असंतुलानाने ग्रासलेल्या महेकला पूर्वपदावर आणण्यासाठी तिची बहिण अनु (निवेदिता भट्टाचार्य) आणि शान खूप प्रयत्न करतात. जरासा बदल म्हणून शान तिला एका नव्या घरात घेऊन जातो. इथली नवीन कॉलेजवयीन शेजारीण निकी (यशस्विनी दायमा) महेकची चांगली मैत्रीणही होते. 
पण काहीच पूर्वीसारखं होत नाही. उलटपक्षी परिस्थिती बिघडतच जाते. निकी, अजून एक शेजारी मनू मल्होत्रा (अंकुर विकल), शान आणि स्वत: महेक ह्या बदलत्या आणि बिघडत्या परिस्थितीत ओढले जातात. उत्तरोत्तर भयंकर रुप धारण करत जाणाऱ्या एकाद्या वणव्याप्रमाणे ही कहाणी पेटत आणि पसरत जाते. अखेरीस एका विशिष्ट ठिकाणी येऊन शांत होते. ह्या शेवटालाही आग विझलेली नसतेच. धुमसत असते.



राधिका आपटेने जबरदस्त काम केलं आहे. सध्या जे भयपटांचं पीक आलं आहे, त्याची सुरुवात राम गोपाल वर्माच्या 'भूत'पासून झाली होती. 'भूत'मधल्या उर्मिला मातोंडकरच्या कामाने जो प्रभाव पाडला होता, तसा प्रभाव थेट 'फोबिया'मधल्या राधिका आपटेने पुन्हा एकदा पाडला आहे. आत्तापर्यंत हिंदीमध्ये तिला मिळालेली ही सगळ्यात आव्हानात्मक भूमिका. ह्या संधीचं तिने सोनं केलं आहे. इतकं की काही काळासाठी ती आपल्याला तिच्यासारखा विचार करायला भागही पाडते. 
'बॉम्बे वेल्वेट', 'फेरारी की सवारी' सारख्या सिनेमांत छोट्या भूमिकांत दिसलेल्या सत्यदीप मिश्राला इथे चांगल्या लांबीची भूमिका मिळाली आहे. महेक काधीच समजून न घेत असलेल्या एका मित्राची व तिच्या प्रियकराची घुसमट त्याने चांगली दाखवली आहे. त्या व्यक्तिरेखेची प्रामाणिक कळकळ तोही तितक्याच प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. 
जराश्या पोरकट 'निकी'च्या भूमिकेत 'यशस्विनी दायमा' लक्षात राहते. तिचा वावर आपल्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उमटवतोच. 
तर, अंकुर विकलने सादर केलेला विक्षिप्त मनूसुद्धा जबरदस्त झाला आहे. अनुक्र विकलचा चेहरा ओळखीचा वाटत होता. जरा शोध घेतल्यावर लक्षात आलं, '24' (हिंदी) मालिकेत त्याने मुख्य दहशतवाद्याची भूमिका केली होती. 

दिग्दर्शक पावन क्रिपलानी भयपट स्पेश्यालिस्ट असावेत. 'फोबिया'द्वारे त्यांनी भयपटांची हॅट ट्रीक केली आहे. चित्रपटाची लांबी जेमतेम पावणे दोन तासांचीच आहे. ह्यामुळेच असेल, पण कहाणीची गती कमी होत नाही आणि त्याच वेळेस दिग्दर्शकाची पकडही सुटत नाही. गच्च बांधलेली पटकथा (क्रिपलानी, पूजा लाढा सुरती, अरुण सुकुमार) देखील अनावश्यक पसारा अजिबात होऊ देत नाही. 
  
'एक थी डायन'ने खरीखुरी भीती दाखवली होती. 'फोबिया'सुद्धा तसाच घाबरवतो. भयपट पाहणं आणि 'फन फेअर्स' मधल्या विविध 'राईड्स'मध्ये बसणं एकसारखंच. आपण स्वत:ला घाबरवण्यासाठी उत्सुक असतो. जर भीती वाटली नाही, तर तो सिनेमा आणि ती राईड बकवास ठरते. ज्यांना ही अशी विचित्र उत्सुकता आहे, त्यांनी 'फोबिया' जरूर पाहायला हवा. हे लिहायला मला खूपच उशीर झाला आहे कारण आता सिनेमागृहातून तो गेला आहे. तरी कुठे एखादा शो उरला असेलच तर नक्की पाहून घ्या किंवा जेव्हा कधी टीव्हीवर येईल, तेव्हा तरी अवश्य पाहाच ! भीती अनुभवणं ही काही विकृती नाही. 'भय' हासुद्धा नाट्याच्या नऊ रसांपैकी एक आहे. कुणाला दचकवणं सोपं असतं, घाबरवणं अवघड. जी तऱ्हा सध्या विनोदनिर्मितीची झाली आहे, तितकी वाईट भयनिर्मितीची नाही. तरी अनेकदा घाबरवण्याऐवजी दचकवलंच जातं.  

'फोबिया' घाबरवेल, एव्हढं नक्की. 

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...