Showing posts with label गझल. Show all posts
Showing posts with label गझल. Show all posts

Friday, August 08, 2025

संपलो.. संपून उरलो तर ?

संपलो.. संपून उरलो तर ? 

जिंकलो मीमीच हरलो तर ? 

 

वाटते भीती मला माझी

मी खरोखर मीच असलो तर ? 

 

ह्याच रस्त्याने पुढे गेलो 

ह्याच रस्त्याने परतलो तर ?

 

नेहमी बाबाच असतो की !

एकदा आई समजलो तर ?

 

खूप भक्ती चांगली नाही 

मी तुझी मूर्तीच बनलो तर ?

 

जीवनाची धून आठवली 

नेमके शब्दच विसरलो तर ? 

 

आतला अंधार आवडतो

पण असा अव्यक्त विझलो तर ?

 

झोप आता यायची नाही

मी मला स्वप्नात दिसलो तर ?

 

भेटलो असतो तुलासुद्धा

आरश्यातुन आत शिरलो तर 

 

हा दिवस सरलाबरे झाले

जर उद्या नाही उगवलो तर ?

 

....रसप.... 

०८ ऑगस्ट २०२५

Wednesday, August 05, 2020

एकटा असतो

झुंडीत एकटा असतो, वस्तीत एकटा असतो
मी सरकारी नोंदीच्या यादीत एकटा असतो

एखादा शेर तुझ्यावर लिहिल्याचे वाटत असते
पण शब्द तुझ्या नावाचा ओळीत एकटा असतो

खिडकीतुन पाहत बसतो बाहेर रिमझिमे कोणी
पाऊस रोजचा येथे गच्चीत एकटा असतो

औरंगाबादमधे मी एकटाच गर्दी करतो
मुंबईत येतो तेव्हा गर्दीत एकटा असतो

सांगीन तुला मी माझी एखादी प्रेमकहाणी
सांगीन तुला मी कुठल्या धुंदीत एकटा असतो

मिणमिणत्या निरांजनाची देवळास सोबत असते 
कंदील ओसरीवरचा वाडीत एकटा असतो 

....रसप....
५ ऑगस्ट २०२०

Monday, March 12, 2018

तसा मी स्वत:च्या घरी राहतो

तसा मी स्वत:च्या घरी राहतो
तरी मी मला पाहुणा वाटतो

उश्याशी कधी रात्र माझी निजव
तुझी शाल ओढून मी जागतो

बहरणार होतीच माझी जखम
तिचा घाव आहे, तिचा शोभतो

नको फोन लावूस आता मला
जुना रिंगटोनच पुन्हा वाजतो

नवा एकही शब्द नाही सुचत
जगाला तरी मी नवा वाटतो

मला हाक देतेस तू, मुंबई
तुझाही अश्याने लळा लागतो

तुला अन् मला सोबतीने बघुुन
म्हणू दे जगाला 'पहा.. हाच तो !'

तुझा जन्म झालाय माझ्यामुळे
तुझ्यातून मी कैकदा जन्मतो

पुन्हा एक गाडी निघाली भरुन
पुन्हा रूळ रूळास न्याहाळतो

तिच्या एक नजरेस व्याकूळ तो
तिच्या एक नजरेत व्याकूळतो

....रसप....
९ मार्च २०१८

ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद

Saturday, December 16, 2017

जगाला तू हवा आहेस बहुधा (तरही)

तरही - जगाला तू हवा आहेस बहुधा 
(ओळीसाठी श्री. भूषण कटककर 'बेफिकीर' ह्यांचे आभार)

गझलचा पाचवा आहेस बहुधा
जगाला तू हवा आहेस बहुधा

तुझा आवाजही संतृप्त करतो
यमन वा मारवा आहेस बहुधा

कशासाठी तुला त्यांनी निवडले ?
लुटारू, पण नवा आहेस बहुधा

जवळ येताच तू येतो शहारा
उन्हाळी गारवा आहेस बहुधा

तुझ्याहुन सर्व तेजस्वीच असती
चमकता काजवा आहेस बहुधा

कधी येणार तू नाहीस नक्की
उद्याचा तेरवा आहेस बहुधा

तुझ्या नशिबात बदनामीच दिसते
मराठा पेशवा आहेस बहुधा

....रसप....
१६ डिसेंबर २०१७

Wednesday, July 05, 2017

एक कविता अर्धवट होती

भाळलो पण थांबलो नाही
मुंबईला समजलो नाही

एक कविता अर्धवट होती
रात्रभर मी झोपलो नाही

शांत हो तू, मग पुन्हा बोलू
मी पुरेसा भांडलो नाही

जागतो आहेच म्हणजे, मी
खूप काही प्यायलो नाही

ती मनापासून आवडली
पण तिला मी भावलो नाही

पाठ दुखते फार कारण की
आजवर मी वाकलो नाही

ती कधी कवितेत ना आली
आणि मी गझलाळलो नाही

....रसप....
५ जुलै २०१७

Thursday, March 09, 2017

विठ्ठल गवसला घरी

धुंडाळली पंढरी
विठ्ठल गवसला घरी

डोळे तुझी आरती
ओंजळ बनो कोयरी

चित्तास व्याधी तुझी
अन् तूच धन्वंतरी

केलेस तू पांगळे
चढलो तरी पायरी

उद्ध्वस्त झाली धरा
सुखरूप तू अंबरी

जगतो मनापासुनी
मज्जाव आहे.. तरी

सोबत इथे फक्त मी
का यायचे ह्या घरी ?

तू बोल, थांबीन मी
मृत्यू मिळाला तरी

बोटावरी मोजल्या
मी पावसाच्या सरी

आवळ स्वत:चा गळा
घे फास काळेसरी

जन्मास येती असुर
पोटात मरते परी

पाषाण काळा 'जितू'
अन् रेघ तू पांढरी

....रसप....
९ मार्च २०१७

Wednesday, January 25, 2017

बाबा

नसेल काहीही बोलत पण समजत असतो बाबा
आई जर का चिडली तर समजावत असतो बाबा

नेहमीच हळवेपण त्याचे लपवत असतो बाबा
पाकिटातला फोटो चोरुन पाहत असतो बाबा

क्षणाक्षणाला नोंदवून टिपणार कधीही नसतो
हिशोब गेलेल्या वेळेचा मांडत असतो बाबा

सहा वाजता गेल्यानंतर दहा वाजता येतो
पोरांना रविवारी केवळ भेटत असतो बाबा

घोडा बनतो, लपून बसतो, पकडापकडी करतो
आपल्याच तर बालपणाशी खेळत असतो बाबा

धडपडण्याची भीती गोंधळ उडवत असते तेव्हा
सायकलीला धरून मागे धावत असतो बाबा

दूर पसरल्या माळाच्या खडकाळपणाचे जीवन
एकटाच गुलमोहर होउन डोलत असतो बाबा

रणरणती दुनियादारी मन रुक्ष कोरडे करते
एक कोपरा मनात गुपचुप भिजवत असतो बाबा

....रसप....
२४ जानेवारी २०१७

Sunday, January 15, 2017

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक' - श्री. अक्षयकुमार काळे

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक'

सध्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. अक्षयकुमार काळे ह्यांचे हे वक्तव्य. ह्यावरुन सोशल नेटवर्कवर खूप गदारोळ चालू आहे. ह्या गदारोळात हा थोडासा आवाज माझाही !! :D

माझ्या मते, संख्यात्मक वाढ गझलेपेक्षा खूप जास्त पसरट कवितांत झालेली असून त्यांत दर्जाही वाढलेला नाहीच. कवितेतला जो 'तेच-ते'पणा आहे, त्यामुळे झालं असं आहे की वेगवेगळ्या गावांतले आघाडीचे सगळे कवी एकसारखेच लिहितात. त्यांचे विषय व व्यक्त होण्याची पद्धत इतकी तीच ती असते की एका रचनेतल्या दोन-चार ओळी दुसऱ्या रचनेत टाकल्या किंवा अगदी गाळूनही टाकल्या तरी चालून जावं !

अक्षयकुमार काळे साहेबांचं उपरोक्त विधान कदाचित अगदीच गैरलागू नसेलही. गझल क्षेत्रात दर्जात्मक वाढीपेक्षा जास्त वाढ संख्यात्मक होते असेलही. पण हे निरीक्षण तर कुठल्याही क्षेत्रात असंच असेल ना ?
आणि जर मराठी साहित्याबाबत बोलायचं झालं तर हे गझलेपेक्षा कवितेबाबत जास्त लागू नाही का ? नक्कीच आहे. पण ते छातीठोकपणे बोलायचा दम कुणाच्याही फेफड्यांत नाही !

बोला की कुणी तरी की, 'उथळ विद्रोहाचा भडकपणा आणि अट्टाहासी मुक्ततेचा भोंगळेपणा ह्यामुळे अधिकाधिक विद्रूप होत जात असलेल्या मराठी कवितेची फक्त संख्यात्मक वाढ होते आहे!'
हे कुणी बोलणार नाही. कारण त्यामुळे बहुसंख्यांचा रोष ओढवला जाईल ना !
कुणाच्या तरी छाताडात दम आहे का बोलायचा की, जोपर्यंत कविता ओढून ताणून आंबेडकरांपर्यंत आणली जात नाही, तोपर्यंत कवी 'पुरोगामी' आणि म्हणूनच पुरस्कारयोग्य मानला जात नाही?
कुणाला तरी हे खटकतंय का की, 'वृत्तात लिहिणं' ही गोष्ट सपशेल त्याज्य मानली गेली असून आजच्या काळात अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके (तथाकथित 'मुख्य धारेतले') लोकही वृत्तात लिहित नाहीत?

पूर्वी एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या घरातही कवितांची पुस्तकं असत. त्याच्या तोंडी कवितेच्या ओळी असत. आज 'कविता' हा शब्द जरी उच्चारला तरी दूर पळतात लोक ! आजच्या पिढीचे कवी कोण आहेत, कुणाला माहितही नसतं आणि त्यांच्या तथाकथित कविता तर त्यांच्या व त्यांच्या काही चेल्या-चपाट्यांशिवाय कुणाला ठाऊकही नसतात. एक काळ असा होता की इंजिनिअरिंग, मेडिकल, अकौंटन्सी वगैरे साहित्याशी संबंध नसलेली क्षेत्रं निवडणाऱ्या लोकांनाही कित्येक कविता मुखोद्गत असत. कवितेवर त्यांचं मनापासून प्रेम असे. आज असे किती लोक आहेत ?

अनियतकालिक व नियतकालिक आणि दिवाळी अंकांतून छापून येणाऱ्या कविता तर कुणी वाचतही नाही, ही शोकांतिका माहित आहे का ? एक तर त्या कविता आहेत, हेच अर्ध्याहून जास्त लोकांना पटत नसतं. त्यात त्यांच्यातला दुर्बोधपणा व पसरटपणा अजून दूर लोटतो.
सामान्य माणसाला 'कविता' श्या शब्दाची अक्षरश: एलर्जी व्हायला लागली आहे.

Why is this apathy ? ह्यामागची कारणमीमांसा कोण करणार आणि कधी ?
कविता सामान्य लोकांना इतकी नकोशी का झाली आहे ? का ती सामान्य लोकांच्या ओठांवर जराही रुळत नाही ? का त्यांच्या मनात अजिबात वसत नाही ?
ह्या मागचं कारण तिच्यातला रसाळपणा हरवला असण्यात नाहीय का ? कवितेची जी काही वाढ झाली व होते आहे, ती संख्यात्मक नाहीय का ?

ह्या उलट, जे काही 'काव्य' सामान्य माणसाला आकर्षित करून घेत आहे, ते सामावलं आहे 'गझल' ह्या प्रकारात. लोक गझलेचे शेर आपलेसे मानतात, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आवडलेले शेर नोंद करून ठेवतात. सामान्य माणूस आणि कविता (गझल हीसुद्धा एक कविताच) ह्यांना जोडणारा जो एक अगदी शेवटचा धागा सद्यस्थितीत आपले अस्तित्व टिकवून आहे, तो म्हणजे 'गझल'.

साहित्य संमेलनात जो 'कवी कट्टा' म्हणून बैलबाजार भरतो, त्यांत मीही एकदा मिरवून आलो आहे. त्या शेकडो लोकांच्या गर्दीत श्रोता एकही नव्हता. सगळे आपापली बाडं घेऊन आलेले कवीच होते. ह्यांच्या कविता कुणीही ऐकत नाही.

एक असं करून पाहावं.
एखाद्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोन सभागृहांत एकाच वेळी दोन कार्यक्रम ठेवावे. एकीकडे, आजच्या मान्यवर, प्रथितयश कवी/ कवयित्रींचे 'कवी संमेलन' आणि दुसऱ्या सभागृहात एक 'केवळ संख्यात्मक वाढ झालेल्या लोकांचा' 'गझल मुशायरा'. मी ग्यारंटीने सांगतो, सेलेब्रेटेड कवींकडे न जाता तमाम आम जनता, ह्या अ-प्रसिद्ध गझलकारांना ऐकायला जाईल.
ही परिस्थिती आहे सध्याच्या कवितेची. तिला नागवलं आहे तिच्या ठेकेदारांनी आणि समीक्षकांनी. तिला इतकं भ्रष्ट केलं आहे की ती त्यांच्याशिवाय कुणालाही हवीहवीशी वाटत नाही.

हे सगळं चित्र विदारक वाटत नसेल आणि गझलेतर काव्यक्षेत्राची वाढ अगदी योग्य प्रकारे चालली आहे, असं जर वाटत असेल, तर मग बोलायलाच नको !

साहित्य संमेलनवाल्यांनी गझल व गझलकारांना नेहमीच दूर ठेवलं आहे, हा तर उघड इतिहास व वास्तव आहे. मराठी गझलेचे सम्राट सुरेश भटांना ह्यांनी कधी अध्यक्षपद दिलं नाही आणि आता गझलेच्या उत्कर्ष व वाढीबद्दल टिपं गाळायला पाहतायत !
वाह रे वाह !

तुम्ही गझल नाकारणार, वृत्तबद्धता नाकारणार, आंतरजालीय साहित्य नाकारणार आणि संख्यात्मक वाढ प्रत्यक्षात तुमच्याच कंपूत होत असताना दुसरीकडे बोट दाखवून दिशाभूल करायला पाहणार?

साहित्य संमेलनाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने केलेलं विधान अभ्यासपूर्ण तर असायला हवंच. पण ते नाही तर नाही, पण किमान जबाबदार तरी असावं !
मी फेसबुकवर ज्या अनेक गझलकार मंडळींशी कनेक्टेड आहे, ज्यांना मी वाचत असतो, त्यांच्यापर्यंत काळे साहेब बहुतेक पोहोचलेले नसावेतच. कारण त्यांतल्या ९९% लोकांनी आपली गझल पुस्तकरूपी प्रकाशित केलेली नाहीय. ते लोक ब्लॉगवर, फेसबुकवर लिहितात, मुशायऱ्यात सादर करतात आणि त्यांना स्वत:ला जितकी अपेक्षा आहे, त्यापेक्षा खूप जास्त लोकांपर्यंत लीलया पोहोचतात. पुस्तक छपाईच्या बाजारात उतरण्याची त्यांच्या गझलेला गरज नाही आणि म्हणून ते उतरतही नाहीत. मागच्या पिढीतल्या आउटडेटेड अभ्यासूंनी स्वत:ला उशिरा का होईना, अपग्रेड करायची गरज आहे. मुख्य धारेत जी काही साहित्य निर्मिती होते आहे, त्याच्या कैक पटींनी चांगल्या दर्ज्याचं लिखाण आंतरजालावर (इंटरनेटवर) होत आहे, हे कडवट सत्य स्वीकारण्याची गरज आहे. आजच्या काळाचा उद्गार 'इंटरनेट' आहे. तुम्ही जर त्याला ऐकत नसाल, तर ती तुमची चूक आहे आणि त्यामुळे तुमची माहिती (ज्याला काही लोक 'ज्ञान' म्हणतात) अपूर्णही आहे. ह्या लोकांनी आंतरजाल सरसकट टाकाऊ मानला असल्याने तिथे पूर्णपणे दुर्लक्ष करून एका प्रचंड मोठ्या संकलानाकडे सपशेल कानाडोळा केला आहे आणि आपल्या अर्धवट माहितीआधारे आपली काहीच्या काही मतं बनवलेली आहेत.

अक्षयकुमार काळे साहेबांचं वक्तव्य हे आंतरजालिय साहित्याबद्दल असलेल्या उदासिनतेचं एक उदाहरण तर आहेच पण कवितेच्या विद्रुपीकरणाकडे सोयीस्कर (कातडी बचाव) दुर्लक्ष करण्याचा प्रयत्नही आहे.

- रणजित पराडकर

Monday, October 24, 2016

शब्द काही थांबती ओठातही

शब्द काही थांबती ओठातही
श्वास काही हातचे उरतातही

मुश्किलीने जोडली जातात पण
फार लौकर माणसे तुटतातही

उमगलो आहे स्वत:ला जेव्हढा
तेव्हढा मी गूढ अन् अज्ञातही

गवसले आयुष्य ना आयुष्यभर
शोध घे आता जरा माझ्यातही

साचले नाते इथे डबके बनुन
कोरडेपण वाटते पाण्यातही

हे लिहू की ते लिहू की ते लिहू
चालले वादंग दु:खांच्यातही

तूच तू अन् तूच तू सगळीकडे
वेढते गर्दीच एकांतातही

मी, नशा, कविता, व्यथा, दु:खे, जखम
राहतो सगळेच आनंदातही

नीज माझ्याही कुशीमध्ये कधी
एक आई राहते बाबातही

....रसप....
२३ ऑक्टोबर २०१६

Sunday, August 21, 2016

लिहित असतो, कळत नाही हल्ली

लिहित असतो, कळत नाही हल्ली
मी मलाही सुचत नाही हल्ली

जे कधी जमलेच नाही तेही
रोज करणे चुकत नाही हल्ली

झोप नुकती लागलेली असते
मी पहाटे उठत नाही हल्ली

आपले नाते असावी अफवा
नोंद कुठली मिळत नाही हल्ली

चंद्र होई चिंब येथे पूर्वी
एक घागर बुडत नाही हल्ली

आतड्यांना पीळ पडला आहे
आतड्यांना दुखत नाही हल्ली

पंढरीच्या कानड्या राजाला
राज्य करणे जमत नाही हल्ली

....रसप....
१६ ऑगस्ट २०१६

Thursday, March 17, 2016

सुधारुन आज थोडासा पुन्हा चुकणार आहे मी

सुधारुन आज थोडासा पुन्हा चुकणार आहे मी
कधी चुकलोच नाही तर कसा शिकणार आहे मी ?

मला नाकार तू, झिडकार तू, सोडूनही तू जा
तुझ्या अस्वस्थ रात्री रोज लुकलुकणार आहे मी

तुला भेटायचे असलेच तर येऊन जा लौकर
जगाच्या स्वस्त ठेल्यावर मला विकणार आहे मी

कितीही धाव आयुष्या, तुझा मी माग काढीनच
नको वाटून तू घेऊस की थकणार आहे मी

जरी हा फास पहिला अन् जरी हा श्वास शेवटचा
तरी मातीत गेल्यावर, खरा पिकणार आहे मी

लढाई आत्मभानाची करे अस्तित्व माझ्याशी
न पुढचे ठाव काही आज पण टिकणार आहे मी

रसास्वादामधे ओथंबले तारुण्य हे माझे
जरा* आलीच तर हमखास तुकतुकणार आहे मी

....रसप....
१७ मार्च २०१६

जरा* = वार्धक्य, वृद्धत्व

Thursday, October 29, 2015

आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती

आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती
कुणास माझी इतकी किंमत मुळीच नव्हती

आयुष्या, मी तुझ्या मनाचे केले असते
प्रामाणिक, आग्रही भूमिका तुझीच नव्हती

दर वर्षी सांगतो कहाणी दुष्काळाची
तरी तुला वाटते कधी ऐकलीच नव्हती

पुढच्या जन्मी दगड बनव गंगेघाटीचा
ह्या जन्मी राखेसाठीही नदीच नव्हती

पायाखाली जितके गाडू तितकी उंची
अस्मानी कळसाची शोभा अशीच नव्हती

रस्त्यावरती, लोकलमध्ये, बाजारांतुन
त्याला जी शांतता मिळे, ती घरीच नव्हती

दिवा नि वातीसमान नाते तिचे नि माझे
भोवतालची हवा तापली उगीच नव्हती

अर्ज लिहा अन् प्रती पाठवा मागितल्यावर
पुरस्कार मिळणेही का चाकरीच नव्हती ?

....रसप....
२८ ऑक्टोबर २०१५

ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद

Tuesday, October 20, 2015

जायचे नव्हते मला पण चाललो मी

जायचे नव्हते मला पण चाललो मी
ओढ ना वाटायची जर थांबलो मी

पाहणे आहे तुझ्या हातात केवळ
सांगुनी माझी व्यथा ओशाळलो मी

समजले ना ती कधी येऊन गेली
पाहण्यातच वाट इतका दंगलो मी

जेव्हढ्या वेळा तिच्या नजरेत वसलो
सांडलो, वाहून गेलो, बरसलो मी

ज्या क्षणी सुरुवात केली मी नव्याने
त्या क्षणी प्रत्येक वेळी संपलो मी

शोधती सारे मला मी संपल्यावर
संपल्यानंतर स्वत:ला लाभलो मी

उंबऱ्याबाहेरचे अस्तित्व माझे
ओसरीच्या कंदिलासम तेवलो मी

ने मला किंवा स्वत:ला सोड येथे
जन्मभर माझ्यासवे कंटाळलो मी

सर्व जखमांना दिली आहेत नावे
रोज एकीवर नव्याने भाळलो मी

ना मिळे परिणामकारक वीषसुद्धा
राग, मत्सर, दु:ख पुष्कळ प्यायलो मी

....रसप....
०२ सप्टेंबर २०१५ ते २० ऑक्टोबर २०१५

Monday, October 12, 2015

एव्हढी बदनाम माझी माहिरी

एव्हढी बदनाम माझी माहिरी
वेदनाही वाटते कारागिरी

पाहिल्यावर पाहणे मी टाळतो
तेव्हढी जमतेच करचुकवेगिरी

जीवनाला जीवही देईन मी
फक्त संपावी जरा हाराकिरी

आठवांचा दिवसभर शिमगा असे
रोज दु:खांची असे कोजागिरी

पायरीवर थांबलेला पोळला
चालला अभिषेक होता मंदिरी

मी तुझ्यावाचून आहे शून्यवत
स्पर्श तू आहेस अन् मी शिरशिरी

....रसप....
३ नोव्हेंबर २०१४ ते १२ ऑक्टोबर २०१५

Tuesday, May 19, 2015

एक मी वगैरेंतला

वाद जन्मभर चालला
वाटतो नको मी मला

शांततेत कल्लोळतो
मंद नाद माझ्यातला

बोलतात डोळे तुझे
'एक मी वगैरेंतला'

वाहतूक ना थांबते
श्वास हायवे जाहला

मी तिचा असा की जशी
पंढरी तुझी विठ्ठला

सावली असे सावळी
सावळाच तू विठ्ठला

फूल थेंबुडे वाळले
पण तरी पसा गंधला

....रसप....
४ एप्रिल २०१५

Tuesday, April 28, 2015

ह्या लेखाला शीर्षक नाही

बराच विचार करून व जबाबदारीने काही लिहितो आहे. ह्यात कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. काही चुकल्यास सांगावे. कमी-जास्त झाल्यास समजुन घ्यावे आणि हे काही न करता जर डोक्यात राख घालूनच घ्यायची असेल तर तसंही करावे. कारण मी माझं मत मांडणारच !

गेल्या काही महिन्यांत असं दिसून आलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात 'गझल' हा काव्यप्रकार हाताळला जातो आहे. ही तसं पाहिलं तर चांगली गोष्ट आहे. कारण ultimately एका अत्यंत सुंदर काव्यप्रकाराचा प्रसार होतो आहे. तो सर्वदूर पोहोचतो आहे. त्याची वाढ होते आहे.
पण ही खरोखर 'वाढ' आहे की 'सूज' आहे, ह्याचा विचार करायला हवा, असं मला वाटतं.

माझ्या लक्षात आलेल्या किंवा असं म्हणू की मला संशय येतो आहे, अश्या काही गोष्टी मी इथे लिहितो :-

१. सोय - शेर लिहिणे, गझल लिहिणे हे अभिव्यक्तीची गरज म्हणून नाही तर शुद्ध 'सोय' म्हणून लिहिले जाणे. दोन ओळींत एखादा विचार मांडून झटक्यात मोकळं होता येतं. तीच जमीन पाळून पुढील दोन ओळींत दुसराच कुठला विचारही मांडला जाऊ शकतो. त्यामुळे माथापच्ची करत बसावी लागत नाही. एक कवी म्हणून स्वत:च्या मनाची झीज करावी लागत नाही किंवा कमी झिजावं लागतं. ह्यामध्ये प्रामाणिक नाईलाजही असतो काहींचा. धावपळीचं जग आहे. लोकांना घड्याळ्याच्या काट्यावर पळावं लागतं. ह्या ओढाताणीत, वाहतं पाणी ज्याप्रमाणे आपला उतार आपणच शोधून घेतं, तसंच त्यांची अभिव्यक्ती दोन ओळींची ही सोय हुडकून काढत असावी. इथवर ठीक आहे. पण असं सगळ्यांच्याच बाबतीत निश्चितच नाही. स्पष्टपणे सांगायचं झाल्यास, एरव्ही हा आळसाचा भाग झाला असावा. म्हणूनच मुसलसल गझला फारच कमी लिहिल्या जात आहेत.

२. लोकप्रियता - गझल हा अनेकविध कार्यक्रमांतून व जनमानसात त्याविषयी असलेल्या एक प्रकारच्या उदात्त व उच्च प्रतिमेमुळे लोकप्रिय काव्यप्रकार आहे. परखडपणे सांगायचं झाल्यास 'टाळ्या कमावणारी अभिव्यक्ती' आहे. शेराला मिळणारी दाद व कवितेला मिळणारी दाद ह्यांतला फरक सांगायची आवश्यकता नाही. ही दाद कवींना भुरळ पाडते आहे. त्यामुळे 'गझल' समजुनही न घेता गझल लिहिणारे लोक झालेले आहेत. अर्थात बहुतेकांची सुरुवात साधारण लिखाणापासूनच होते. आज जे कुणी श्रेष्ठ व अनुकरणीय गझलकार आहेत, त्यांनीही सुरुवातीला लिहिलेल्या गझला सामान्य असू शकतील किंवा आजही त्यांच्याकडून होणारं सगळंच लिखाण अत्युच्च प्रतीचंच असेल असंही नाही. पण झालं असं आहे की सामान्य लिहूनही, केवळ त्या संरचनेच्या आकर्षकतेमुळे त्या सामान्यत्वावर पांघरूण ओढलं जात आहे. काही लोक तर असल्या तोडक्या मोडक्या गझला घेउन मंचावर विराजमान होत आहेत आणि त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवलेलंही दिसतंय. उदा. - काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीचा कुठल्याश्या राज्यस्तरीय मुशायऱ्यात सहभागी होऊन सन्मानचिन्ह घेतानाचा फोटो पाहिला. ही व्यक्ती अगदी काल-परवापर्यंत अत्यंत सदोष भाषेत सुमार कविता व चारोळ्या लिहित असे. मला आश्चर्यमिश्रित आनंद झाला म्हणून मी त्या व्यक्तीच्या गझला वाचण्यासाठी शोध घेतला. जे काही मला मिळालं, ते पाहून मला केवळ कीव आली.

३. गुरु-शिष्य - स्वयंघोषित गुरू (उस्ताद) ही कमी नाहीत ! काही वर्षांपूर्वी एका काव्यमेळाव्यात एका 'नामवंत' गझलकार व्यक्तीने, एका गुरुतुल्य व्यक्तीला 'माझा इस्लाह घ्या' अशी अप्रत्यक्ष सुचवणी माझ्यासमोर केली होती. त्यावेळी ती गुरुतुल्य व्यक्ती, मी व इतर काही स्नेही ह्या संभ्रमात पडलो की हसावं की चिडावं ! परंतु, आज असं दिसतंय की अनेक गुरुकुलं चाललेली आहेत. जरा कुणी 'गझल म्हणजे काय' असा विचार करणाराही दिसला की त्याला पंखाखाली घेण्यासाठी लोक तयार आहेत. हे उतावीळ उस्ताद त्या धडपडणाऱ्या कवी/ कवयित्रीला घाई-घाईने गझलेच्या डोहात उतरवत आहेत, ढकलत आहेत. आणि तो निरागस भाबडा जीवही जीवावर उदार होऊन गटांगळ्या खातो आहे. लोकांना इस्लाह देण्याची व घेण्याचीही खूप घाई झालेली आहे.

४. श्रेष्ठत्व - कुठे तरी अशी एक भावना आहे की 'गझल लिहिणे हे कविता लिहिण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.' गझल लिहिणारा आणि ती वाचणारा दोघेही ही भावना मनात घेउन असतात. अनेक (जवळजवळ सगळ्याच) कवी/ कवयित्रींचा प्रवास 'कविता ते गझल' असाच सुरु आहे किंवा झालेला दिसतो. बहुसंख्य लोक एकदा गझल लिहायला लागले की कविता लिहित नाहीत. ह्या श्रेष्ठत्वाच्या आभासामुळेही अनेक जण गझलेकडे ओढले जात आहेत. तंत्रात बसवलेल्या १० ओळी लिहिल्या की त्यांना आपण खूप भारी काही केलं आहे, असं वाटायला लागतं. बढती मिळाल्याचा आनंद होतो. Ideally कविता व गझल हे दोन्ही समांतरपणे विकसित होणं, हे एका कवीमनासाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही.

५. अनभिज्ञता - 'वृत्तात लिहिणं म्हणजे गझल लिहिणं', असा एक समज पसरला आहे किंवा असा एक संस्कार नकळतच अनेकांच्या मनावर झालेला आहे किंवा इथे पुन्हा आधी लिहिलेला 'सोय' हा मुद्दा आहेच. 'दोन ओळी वृत्तात लिहिणे आणि त्यांवर आशय-विषयाचे बंधन नसणे', ही चौकट खूपच सोयीची आहे. ह्या अनभिज्ञतेमुळे किंवा सोयीमुळे लोक कविता लिखाणाला सुरुवात केल्यावर काही काळानंतर गझलकडे वळतात. कविताही वृत्तात लिहिलेली असू शकते किंवा वृत्तात कविताही लिहिली जाते, हे त्यांना कदाचित लक्षातच येत नसते किंवा ते कालबाह्य आहे, असा समज असतो किंवा असं काही समोर सहसा येतच नसल्यामुळे 'हेही करता येईल का' असा विचार मनात येत नसावा किंवा सोय पाहिली जात आहे.
(काही गझलकार जेव्हा क्वचित कधी तरी कविता लिहितात तेव्हा ते मुक्त लिहितात ही कदाचित अभिव्यक्तीला पडलेली खीळ असावी कारण 'तिसरी ओळ' सुचतच नाही.)

६. कुरूप कविता - हे एक कडवट सत्य आहे की कविता कुरूप, अनाकर्षक झाली आहे. विषय व आशयाची विशिष्ट बंधनं कवितेवर लादली गेली आहेत. कविता सामाजिकतेच्या भल्यामोठ्या आभाळाचा एक छोटासा तुकडा तोडून, त्याला अंथरून तेच आपलं विश्व समजते आहे. ह्याच्या बाहेर विचार करणारे लोक साहजिकच स्वत:ला परग्रहवासी समजत आहेत आणि दुसरीकडे वळत आहेत. 'कविता' त्यांना रमवू शकत नाही आहे. प्रयोगशीलतेचा दुराग्रह नसावाच, पण प्रयोग करूच नये असाही दुराग्रह कसा बरोबर ? जाणून बुजून चौकटी झुगारल्या जात आहेत. ओठांवर रुळणारी, हृदयात घर करणारी कविता फार क्वचित लिहिली जाते. त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमी झाला आहे.

------------
हे व असे अजूनही काही विचार आहेत. आत्ता इतकेच सुचले. ह्याव्यतिरिक्त काही विचार तुमच्याकडेही असतील. पण ह्या सगळ्यातून काही काळजीचे मुद्दे मला वाटतात :-

१. अति तेथे माती - ह्या घडीला माझ्या फेसबुक न्यूज फीडची स्थिती अशी आहे की जर माझ्यासमोर (चारोळ्या लिहिणाऱ्या बहुतेकांना मी अनफॉलो केलेलं असतं) १० वेगवेगळ्या कवी/ कवयित्री मित्रमंडळींच्या १० पोस्ट्स असतील तर त्यातील ४-५ तरी शेर किंवा गझला असतात. हे प्रमाण खूप जास्त आहे. स्पष्टपणे हेच दिसून येतंय की कवितेचे इतरही काही प्रकार असतात ते कुणाला माहितही नाहीत किंवा ते हाताळायचेच नसावेत. ज्या प्रमाणे अति संख्येने लोक कविता लिहायला लागल्याने सुमार कवितांचं पीक आलं आहे, त्याच प्रमाणे खूप जास्त प्रमाणात गझलही लिहिली जाऊ लागल्याने दर्जा साहजिकच खालावला आहे.

२. नीर-क्षीर विवेक - कवी/ कवयित्री त्यांच्या परीने त्यांचे विचार गझलेतून, शेरातून मांडतात. त्यात गझलेचा उद्गार कधी असतो, कधी नसतो. कधी तर त्यात तांत्रिक चुकाही असतात. पण मायेने पंखाखाली घेणारे उस्ताद लोक जबाबदारीने चुका दाखवत नाहीत की काय ? जिथे गुरुच्या अधिकाराने खडसावायची आवश्यकता असते, तिथे ते कुणी करत नसावेत की काय ? काही जाणकार व अधिकारी लोकांना वाईटपणा घ्यायचा नसतो. त्यामुळे चुकीचे, वाईट असे काही असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याकडे कल असतो. परिणामत: चुकीचं किंवा वाईट लिहिणारी व्यक्ती पुन्हा पुन्हा तेच लिहित राहते. कालांतराने तिच्यात सुधारणा होतही असेल, पण ती वेळीच होत नाही आणि ती होईपर्यंत अश्या लिखाणाची लागण इतरही काहींना होते.

३. चौफेर वाढ खुंटली - बहुतांश लोक 'कविता ते गझल' असाच प्रवास करत आहेत. ह्यांतले ९९% लोक तरी असे असावेत ज्यांनी फक्त मुक्त छंद कविता व गझल हेच दोन काव्यप्रकार हाताळलेले असतील. ("हाताळणे" म्हणजे ८-१० वेळा प्रयत्न केले, असं नसतं हे मी मानतो.) कवितेतील अनेकविध प्रकार त्यांना आकर्षित करत नाहीत. गझल लिहिणारे बहुतेक जण कविता लिहित नाहीत. स्पष्ट चित्र असं आहे की, 'कविता लिहिणे म्हणजे मुक्त लिहिणे किंवा फार तर अक्षरछंदात लिहिणे आणि वृत्तात लिहिणे म्हणजे गझल लिहिणे.' कवी एक तर कवितेत अडकला आहे किंवा गझलेत गुरफटला आहे. सर्व काव्यप्रकार हाताळणारे, आवड असणारे एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक असतील. ह्यामध्ये असं दिसतंय की प्रचंड प्रतिभा असूनही काही जण एकाच कुठल्या तरी चौकटीत स्वत:च स्वत:ला बांधून/ कोंडून घेत आहेत.

४. दर्जा घसरणे - ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून असेल, पण कविता व गझल ह्या दोन्हीचा दर्जा इतका खालावला आहे की काही वाचावंसंही वाटत नाही आणि वाचावंसं वाटत नसतानाही वाचलं जातच असल्याने लिहावंसंही वाटत नाही ! वृत्तपूर्तीसाठी काहीही कवाफी जुळवले जाताना दिसतात, कुठल्याही रदीफांच्या शेपट्या लावलेल्या आढळतात आणि कसलीही जमीन कसली जाताना पाहण्यात येते.

-----------

माझ्या ह्या वाक्यावर सर्वांनी नीट विचार करावा अशी माझी विनंती आहे.
"गझल चारोळीच्या वाटेने चालली आहे."

चारोळीमुळे कवितेची अपरिमित हानी कशी झाली आहे, हे सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे. गझलेमुळेही असंच काहीसं होणार आहे किंवा कदाचित होतही आहे. कारण 'गझल'च्या नावाखाली अकाव्यात्मक लिहिले जाण्याचे असंख्य नमुने सर्रास दिसत असतात. वाचल्यावर किळस वाटावी असं लिखाण 'गझल' ह्या गोंडस नावाने लिहिलेलं मी सहन केलं आहे. एक काव्यरसिक म्हणून मला हे चित्र खूप विदारक वाटत आहे. कविता विद्रूप झालीच आहे. गझलही विवस्त्र होते आहे. 'सत्य नग्न असतं' हे मला मान्य आहे. पण म्हणून नग्नतेचा आग्रह धरणं मात्र पटत नाही.

कविता म्हणजे 'पसरट लिखाण' आणि 'साचेबद्ध मिसरे' अश्या दोन बाजू असलेलं एक खोटं नाणं बनत चाललं आहे किंवा कदाचित बनलंच आहे. माझ्यासाठी कविता एक दोन बाजू असलेलं एखादं खरं/ खोटं नाणं नसून एक हीरा आहे. त्याला अगणित पैलू पडायला व पाडायला हवे.

------------

माझ्या ह्या विचारांशी सगळेच सहमत नसतील. काहींना ह्यात आक्षेपार्ह वाटेल. काहींना अपमानास्पद वाटेल. कुणी दुखावले गेल्यास मी क्षमा मागतो. मात्र जे लिहिलं आहे ते मनातलं लिहिलं आहे. हे माझं अवलोकन आहे. माझ्या जागेवरून जे दृश्य दिसत आहे त्याचंच हे वर्णन आहे.

असंही होईल की काही लोकांना माझं बोलणं पटेलही. त्यांनी ह्याला असंतोषाची ठिणगी समजुन रान पेटवू नये. बोंब मारत सुटू नये. विचार करावा. हातभार लावावा. परिस्थिती कशी सुधरेल हे पाहावं. प्रत्येकाने आपापलं योगदान दिलं, आत्मभान बाळगलं तरी ते खूप मोठं असेल.
कवितेच्या पालखीला सर्वांनी वाहायचं आहे, हे नक्कीच.

धन्यवाद !
- ....रसप....
- रणजित पराडकर

Wednesday, April 22, 2015

मावळलेला दिवस रात्रभर जागवतो

आयुष्याला नवी कहाणी सांग 'जितू'
रोज तेच ते जगून कंटाळा येतो

-------------------------------------

मावळलेला दिवस रात्रभर जागवतो
आणि नव्याने अंधारच मग उजाडतो

माझ्यासोबत कधीच नसतो आनंदी
तुझ्या संगतीने मी इतके विस्मरतो

येणारा क्षण म्हणतो 'क्षणभर जगून घे'
मी गेलेल्याच्या वाटेवर घुटमळतो

अर्धा पेला नेहमीच बाकी माझा
पापणीत अव्यक्तपणे मी साठवतो

देवासाठी जिथे तिथे मंदिर बांधा
आई-बापासाठी वृद्धाश्रम असतो

तुला यायचे असेल तेव्हा ये कविते
तोपर्यंत मी गझलेवरती भागवतो

....रसप....
०९ एप्रिल २०१५ 

Wednesday, February 04, 2015

व्यसन लागले

तू गेल्यावर मला स्वत:चे व्यसन लागले
माझ्यामध्ये तू मिळण्याचे व्यसन लागले

तुझा अबोला इतका झाला सवयीचा की
माझ्या मनासही मौनाचे व्यसन लागले

वेगवेगळे खेळ खेळलो नशिबासोबत
इतका हरलो की हरण्याचे व्यसन लागले

कोणे एके काळी सुंदर लिहित असे तो
नंतर टाळ्या कमावण्याचे व्यसन लागले

निजायला ती जाते एका विशिष्ट वेळी
म्हणुन जगाला अंधाराचे व्यसन लागले

अनेकदा मी कुणीच नसतो असतानाही
पूर्णत्वाला शून्यत्वाचे व्यसन लागले

नात्यामधला हरेक जण सोडुन जातो, जर
जिवास म्हाताऱ्या जगण्याचे व्यसन लागले

....रसप....
०३ फेब्रुवारी २०१५

ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद

Tuesday, January 13, 2015

रंगमंचाला न ठाउक बदलले पडदे किती

रंगमंचाला न ठाउक बदलले पडदे किती
तेच ते नेपथ्य तरिही हासले, रडले किती

वेदना, दु:खे, व्यथांचे साठले खजिने किती
आसवांवर पौरुषाची ठोकली कुलुपे किती

वाटते पाहून ओंजळ पूर्ण भरुनी सांडता
ह्यातले माझे किती अन् त्यातले माझे किती ?

जग मनापासून तू विज्ञान आणिक धर्मही..
बघ कुणीही सांगते का 'राहिली मिनिटे किती' ?

पाहिला जेव्हा जनाज़ा हात तेव्हा जोडले
एक क्षण माणूस झालो, एरव्ही जमले किती ?

एक माझ्या आत्महत्येने तुम्ही हेलावता
गाडली आहेत वाफ्यातून मी प्रेते किती !

....रसप....
६ जानेवारी २०१५

Sunday, October 12, 2014

ती माझ्याशी बोलत नाही

ती माझ्याशी बोलत नाही
मी माझ्याशी बोलत नाही

तिची छबी दाखवा मलाही
जी माझ्याशी बोलत नाही

देव मुका अन् बहिरा आहे
की माझ्याशी बोलत नाही ?

छत्रपती मावळ्यांस म्हणतो
श्री माझ्याशी बोलत नाही

स्वप्न एव्हढे रोज पाहतो
'ही' माझ्याशी बोलत नाही ! :P

....रसप....
११ ऑक्टोबर २०१४
Related Posts Plugin for WordPress, Blogger...