Tuesday, August 16, 2016

थोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)

'रुस्तम'बद्दल आवर्जून सांगावं असं खरं तर काहीच नाही. कारण तो 'नानावटी केस' वर आधारलेला आहे, हे पहिल्यापासूनच सर्वांना माहित आहे आणि 'नानावटी केस'ही सर्वांना माहित आहे. ज्यांना ती माहित नाही, त्यांच्यासाठी त्या केसची पुरेशी माहिती आंतरजालावर अगदी सहज उपलब्ध आहे. पण तरीही हा एक प्रचंड जाहिरात केलेला आणि (कदाचित म्हणूनच) पाहण्याची उत्कंठा वाटलेला चित्रपट आहे/ होता म्हणून लिहितो आहे. ह्या लिहिण्यालाही जरासा उशीरच झाला आहे, तरी.. !

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढची जवळजवळ १३ वर्षं म्हणजे १९६० पर्यंत महाराष्ट्र व गुजरात मिळून एकच राज्य अस्तित्वात होतं, ज्याला 'बॉम्बे स्टेट' म्हटलं जायचं. 'रुस्तम'चं कथानक त्या काळातलं आहे. भारतीय नौदलात एका मोठ्या हुद्द्यावर असलेला रुस्तम पावरी (अक्षय कुमार) एका मोहिमेवरून परत घरी येतो. पत्नीवर जीवापाड प्रेम असलेला रुस्तम जेव्हा तिला भेटण्यासाठी उतावीळ होऊन घरी येतो, तेव्हा त्याला हादरवून टाकणारं सत्य त्याला उमगतं. त्याच्या पत्नीचं विक्रम मखीजा (अर्जन बाजवा) ह्या एका चांगल्या ओळखीच्या व्यक्तीशीच प्रेम प्रकरण चालू असतं. विक्रमशी ह्याबाबत बोलायला गेलेला रुस्तम त्याला गोळ्या घालून ठार मारतो आणि त्याच्यावर खूनाचा खटला भरला जातो.
बहुतांश सिनेमा हा ह्या खटल्यावर आधारित आहे. आपण ह्याला 'कोर्टरूम ड्रामा' किंबहुना 'कोर्टरूम मेलोड्रामा' म्हणू शकतो.



रुस्तम आवडला की नाही आवडला, ह्याचा निर्णय चटकन होत नाही. ह्याचा अर्थ ह्यात काही चांगल्या गोष्टी आहेत पण काही तितक्याश्या चांगल्या नसलेल्या नावडलेल्या गोष्टीही आहेत आणि दोन्हींना दुर्लक्षित करता येत नाही.

चांगले -

१. अक्षय कुमार

'अक्षय कुमार डोक्यात जातो' असं म्हणणारा मनुष्य मला तरी आजतागायत भेटलेला नाही. तो काही लोकांना विशेष दखलपात्र नसेल वाटत, पण 'तो पडद्यावर आल्यावर असह्य होतं', असं कुणी म्हणत असेल, हे वाटत तरी नाही. शाहरुखपासून रणवीरपर्यंत प्रत्येक जण असह्य होत असतो. पण अ.कु. नाही. अ.कु.चे फॅनसुद्धा भरपूर आहेत. (मी त्यांतला एक !) तर ज्यांना तो आवडतो आणि ज्यांना तो विशेष आवडत नाही, अश्या दोघांसाठीही 'रुस्तम' हा एक 'बघणीय' सिनेमा आहे. अ.कु.च्या हालचालींत नेहमीचा उत्साह जरासुद्धा कमी होत नाही आणि प्रचंड आत्मविश्वास असलेला एक नौदल कमांडर त्याने सहज साकारला आहे. वर्दीत असलेला मनुष्य असाही ऐटबाज दिसतोच, पण अ.कु.ची बातच काही और आहे.
मला असं वाटतं की 'अफलातून' नंतर त्याला त्याच्या आवाजाचा वापर करण्याचं एक विशिष्ट तंत्रही मिळालं आहे आणि प्रत्येक सिनेमागणिक ते मला तरी प्रकर्षाने जाणवत असतं. अगदी पूर्वीच्या (खिलाडी वगैरे) काळातला त्याचा आवाज आणि आजचा त्याचा आवाज ह्यांत फारसा फरक नसला, तरी त्याच्या वापरात मात्र बराच फरक पडला आहे. एक सामान्य चित्रपटही एखादा असा संस्कार अभिनेत्यावर करतो की त्याचं पुढच्या प्रवासाची दिशाच बदलावी, असं काहीसं हे एक उदाहरण आहे. त्याच्या 'रुस्तम'मध्ये फक्त स्टाईल आणि आत्मविश्वासच नसून अत्यंत समंजसपणे त्याने ती व्यक्तिरेखा साकारली आहे. मुळात 'रुस्तम' हा एक सैनिक आहे. तो इतर सामान्य माणसांप्रमाणे भावनिक असू शकत नाही, हे लक्षात ठेवून त्याने त्याचा आनंद, दु:ख, वैषम्य, संताप वगैरे दाखवला आहे. हे नुसतं अंडरप्ले करणं नसून तोलून मापून केलेलं सादरीकरण आहे, असं मला वाटलं.

२. नीरज पांडे

दिग्दर्शक 'टिनू सुरेश देसाई' असले तरी त्यांवर 'नीरज पांडे'चा प्रभाव जाणवतो. बहुतेक, काही चित्रपटांत त्यांनी पांडेंना सहाय्यक म्हणून काम केलंही असावं. नीरज पांडे निर्माते आहेत आणि पांडेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवाद, देशभक्ती वगैरेची किनार असलेलं कथानक आपल्यासमोर मांडलं आहे. 'स्पेशल छब्बीस'चा अपवाद वगळता त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वच सिनेमांत हे जाणवलं आहे. पांडेंचा हातखंडा थरार चित्रित करण्यात आहे. त्यांच्या सिनेमातली पात्र शांतपणे, पॉजेस वगैरे घेत संवाद फेकत नाहीत. लांबलचक मोनोलॉग्ससुद्धा त्यांच्या समीकरणांत बसत नाहीत. त्यांच्या सिनेमातली पात्रं ताडताड पाउलं टाकत चालतात, चटपटीत असतात. त्यांच्या हालचाली जलद असतात. कॅमेरा उगाच गरागरा फिरत नाही किंवा कुठल्या तरी विचित्र कोनांतून तो पाहत नाही किंवा अगदीच एखाद्या कोपऱ्यात टाकून दिल्यासारखा पडूनही राहत नाही. तो जेव्हढ्यास तेव्हढा फिरतो आणि बुचकळ्यात वगैरे पाडत नाही. ह्या सगळ्यामुळे कथानक कुठल्याही गतीने पुढे सरकत असलं तरी खिळवून नक्कीच ठेवतं. 'टिनू देसाई' ह्या सगळ्याला अपवाद नाहीत आणि 'रुस्तम'सुद्धा ! काय होणार आहे, हे आपल्याला आधीच माहित असलं तरीही त्याची उत्सुकता मात्र वाटत राहतेच.

३. जुनी मुंबई

जुन्या मुंबईचं फार काही दर्शन घडतं अश्यातला भाग नाही. पण जे काही घडतं, ते पाहताना एखादा मुंबईकर नक्कीच सुखावतो. खरं तर तो काळ असा होता की मुंबईत मुख्यत्वे दोनच प्रकारचे लोक होते. अतिश्रीमंत आणि अतिगरीब. ही तफावत भयंकर होती. मध्यमवर्ग हळूहळू करत आपलं अस्तित्व दाखवू लागला आणि आता तर ह्या मध्यमवर्गातही निम्न, उच्च असे गट पाडता येतील इतक्या पायऱ्या तयार झाल्या आहेत. पण तो काळ होता जेव्हा एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी बहुतेक दोनच पायऱ्या होत्या. गरीब आणि श्रीमंत. मात्र, ह्या भयंकर तफावतीचे दर्शन इथे होत नाही. इथे दिसणारी मुंबई म्हणजे उच्चभ्रू, सुखवस्तू लोकांचीच मुंबई. स्वच्छ रस्ते, देखण्या गाड्या आणि टापटीप ब्रिटीश पद्धतीची घरं व इमारती ह्यांचं ओझरतं दर्शन होत राहतं. I know, हे दर्शन अपूर्ण आहे आणि ब्लफमास्टर व टॅक्सी नं. ९२११ मध्ये दिसलेल्या मुंबईने मला जास्त मोहवलं होतं आणि 'रमन राघव' मध्ये दिसलेली मुंबई जास्त भिडली होती, पण तरी... !!

४. पवन मल्होत्रा

हा एक अत्यंत गुणी अभिनेता आहे. खूप आव्हानात्मक भूमिका गेल्या काही वर्षांत त्याच्या वाट्याला आलेल्या नाहीत. पवन मल्होत्रा म्हटल्यावर आपल्याला सहसा आठवतात 'सलीम लंगडे पे मत रो' आणि 'ब्लॅक फ्रायडे' मधला 'टायगर मेमन'. नक्कीच, ही दोन त्याची जबरदस्त कामं होती, मात्र 'जब वुई मेट' मधला सरदार 'चाचाजी' असो की 'डॉन' मधला 'नारंग किंवा 'भाग मिल्खा भाग' मधला प्रशिक्षक, त्याने प्रत्येक वेळी ती ती छोटीशी व्यक्तिरेखासुद्धा जिवंत केलेली आहे. कमांडर रुस्तमबद्दल अतिशय आदर असलेला आणि त्याच वेळी आपल्या कर्तव्याचीही पूर्ण जाणीव असलेला 'रुस्तम' मधला त्याचा पोलीस अधिकारी 'व्हिन्सेंट लोबो'ही असाच. अगदी छोटीशी भूमिका आहे असंही नाही, पण फार मोठीही नाही. मात्र तरीही लक्षणीय. अ.कु. आणि त्याचे दोन प्रसंग तर मस्तच जमून आले आहेत. दोन्हींत बुद्धिबळ आहे. एकात तो खेळतो, दुसऱ्यात खेळ टाळतो. एकात दोघांना समसमान स्कोप आहे तर दुसऱ्यात अ.कु.ला जास्त स्कोप आहे.

५. काही किरकोळ (Miscellaneous)

# जेलमध्ये रुस्तम आणि लोबो एक बुद्धिबळाचा डाव खेळतात. असा प्रसंग अनेक सिनेमांत चित्रित झालेला आहे. पण बहुतेक वेळेस ते चित्रण अर्धवट किंवा बाष्कळपणे दाखवलं आहे. इथे एक पूर्ण डाव अगदी व्यवस्थित दाखवला गेला आहे. हा प्रसंग, तेव्हाचे संवाद सगळं मस्त जुळून आलं आहे.
# काही जागांवर उत्तम व सजग संकलन (Editing) जाणवतं.

फार चांगले नाही -

१. इलियाना डी क्रुज

ही 'बर्फी'मध्ये मला आवडली होती. पण इथे खूपच कमी पडल्यासारखी वाटली. अक्षरश: एकाही प्रसंगात ती आश्वासक वाटत नाही. तिचं रडणं, हसणं सगळं नकलीच वाटत राहतं. ह्या कहाणीत 'रुस्तम' पत्नी 'सिंथिया' म्हणून तिचं पात्र महत्वाचं आहे. भले तिची भूमिका केंद्रस्थानी नसली तरीही महत्वाची आहे कारण तिच्यामुळेच तर सगळं घडलेलं आहे. पण तीच परिणामकारक नसल्यामुळे इतर सगळं अपुरंच वाटत राहतं. पुरेसं कूलिंग नसलेल्या वातानुकूलित केबिनमध्ये बसल्यासारखं वाटतं. अगदी जीव गुदमरतही नाही आणि अगदी निवांतही वाटत नाही.

२. संगीत

नसतंच तरी चाललं असतंच की. पण जर आहे, तर चांगलं तरी असायला हवं होतं. 'तेरे संग यारा' ऐकायला ठीक वाटतं, पण तिथल्या तिथे फिरत राहणारी चाल असल्याने लगेच पुरे वाटतं. ही चालही अगदी टिपिकल असल्याने नवीन काही ऐकतो आहे, असंही वाटत नाही. शीर्षक गीत 'रुस्तम वही' म्हणजे तर अमानवी अत्याचार आहे. संगीत म्हणून हे जे काही केलं आहे तो नुसता असह्य गोंगाट आहे. 'तय हैं' हे गाणंही तसं चांगलं आहे, but again काही नवीन ऐकल्यासारखं नाहीच वाटत.
खरं तर आजच्या सिनेमात 'संगीत वाईट असणं' ही बाब गृहीतच धरायला हवी. सिनेमा पाहायला जातेवेळीच ह्यासाठीची मानसिक तयारी असली पाहिजे. पण माझी तरी अजूनही तशी तयारी होतच नाही. जे सुश्राव्य व अर्थपूर्ण असतं तेच संगीत असतं, ह्याहून काही वेगळं जर कानांवर पडलं तर ते पचतही नाही आणि पटतही नाही ! कदाचित हा माझाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित केला तरी चालतोय !

३. कोर्टरूम मेलोड्रामा

'कोर्ट', 'अलिगढ' आणि काही प्रमाणात 'जॉली एल एल बी' अश्या काही सिनेमांतून दिसलेलं कोर्ट जास्त खरं वाटतं. 'रुस्तम'मध्ये दाखवलेला कारभार मात्र मेलोड्रामॅटिकच वाटतो. ज्यूरींना न्यायाधीशाने त्यांचं काम समजावून सांगणं, त्यावर ज्यूरींनी शाळेतल्या मुलाप्रमाणे माना हलवणं वगैरे तर अगदीच उथळ वाटलं. बाकी टिपिकल फिल्मी डायलॉगबाजीही इथे चालते. लोक टाळ्या वगैरे वाजवतात आणि जज 'ऑर्डर, ऑर्डर' करतो. आताशा ह्या सगळ्याने प्रेक्षकाला समाधान मिळत नाही. नको तिथे अवाजवी, अनावश्यक वास्तवदर्शनाचा अट्टाहास करणारे आजचे लेखक-दिग्दर्शक अश्या काही ठिकाणीही तितकेच आग्रही व्हायला हवे.

४. काही किरकोळ (Miscellaneous)

# 'रुस्तम' बहुतांश वेळ वर्दीत दाखवला आहे. त्याची ही वर्दी इतकी पांढरी शुभ्र आहे की दर दोन तासांनी 'टाईड'ने धुवून घेतो की काय असं वाटतं. इतना भी मत करो यार ! अगदी जेलमध्ये असतानाही तो पूर्ण वर्दीत दाखवला आहे. कोठडीही इतकी स्वच्छ असते की त्याच्या कपड्यांवर जराही धूळ वगैरे लागत नाही, हे जरा जास्त होतं. ही ड्राय क्लीन्ड शुभ्रता इतकीही आवश्यक नव्हती की डोळ्यांत खुपेल.
# एक वृत्तपत्र आधी २५ पैसे आणि नंतर त्याची लोकप्रियता वाढल्यावर एक रुपयाला विकलं जाताना दाखवलं आहे. ही कहाणी १९५७ ची असल्याचं सांगितलं आहे. त्या काळात २५ पैसे किती महाग होते, ह्याचा विचार केलेला दिसत नाही. एक आण्यालाही किंमत असणारा तो जमाना होता. एका वृत्तपत्रासाठी १ रुपया ही खूप म्हणजे खूपच जास्त किंमत आहे. १ रुपयाला तर आजही वृत्तपत्र मिळतं बहुतेक !
# मूळ कथानक माहित असलं, तरी जोड-कथानक (जे काल्पनिक आहे) मात्र कुणाला नक्कीच माहित नसावं. पण काय घडणार आहे, ह्याचा अंदाज आधीच बांधता येतो आणि ते तसंच घडतं. ही प्रेडिक्टेबलिटी मारक ठरली आहे. ह्यामुळे थरारातली हवाच निघून जाते.
# सिंथिया आणि विक्रमचा जवळ येण्याचा प्रसंग/ परिस्थिती अगदीच भंकस वाटते. तो सगळा भाग ऐंशीच्या सुमार कालखंडातील एखाद्या फडतूस सिनेमातून उचलून इथे टाकला आहे की काय, असा संशय येतो !

'रुस्तम' वाईट नसला तरी त्याच्याकडून अपेक्षा खूप होत्या. त्या पूर्ण होत नाहीत. नानावटी केसवर आधारलेला 'गुलजार'चा 'अचानक' चाळीस एक वर्षांपूर्वी आला होता. त्यात विनोद खन्ना, फरीदा जलाल आणि ओम शिवपुरी ह्यांचा अप्रतिम अभिनय होता. चाळीस वर्षांपूर्वी उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांनी बनलेला व बनवलेला तो सिनेमाही 'रुस्तम'पेक्षा कैक पटींनी जास्त थरारक तर होताच आणि दर्ज्याची तर तुलनाही होणार नाही, इतका उजवा होता. त्या काळात, जेव्हा एकेका सिनेमात ८-१० गाणी असायची, गुलजारने गाणी पूर्णपणे टाळली होती. नीरज पांडे, टिनू देसाई व कं.नी किमान तो तरी मोह आवरायला हवा होता.
असो.
एकदा पाहावा असा नक्कीच आहे आणि नाही पहिला तरी काही चुकलं/ हुकलं नसेल, ह्याचीही खात्री बाळगावी.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...