Saturday, March 23, 2019

'नॉस्टॅल्जिया' - बधीर करणारं एक ड्रग !

प्रत्येक सिनेमामध्ये किमान एक तरी गाणं रिमिक्स करून टाकण्याचा ट्रेंड सध्या दिसून येतो आहे. 
ह्या मागचं व्यावसायिक गणित समजण्यासारखं आहे. पैसा रोटेशनमध्ये राहिला तर त्यातून जास्त फायदा. म्हणजे कमी मिळाले तरी चालेल, पण ताबडतोब रिटर्न्स मिळाले पाहिजेत. ह्यासाठी पैसा गुंतवण्याची आणि त्यानंतर वाट पाहण्याची जी प्रोसेस असेल, ती अधिकाधिक लौकर उरकली पाहिजे. जेणेकरून लौकरात लौकर 'मीटर डाऊन' होऊन रोटेशन सुरु होईल. 
मग साहजिकच - 'संगीत' ज्याबाबतची लोकांची एकंदरीतच जाण आजकाल कमी कमी होत चालली आहे, त्याच्या निर्मितीसाठी जास्त वेळ का दिला जावा ? - असा प्रश्न येतोच. कालच्या उरलेल्या भात किंवा पोळ्यांना फोडणी देऊन झटपट फोडणीचा भात किंवा पोळी करून नाश्ता उरकल्यासारखं पूर्वीच्या एखाद्या गाण्याला फोडणी देणं चटकन उरकणारं आहे. कुठे माथापच्ची करून नवीन धून बनवा, त्यावर शब्द लिहा. मग कच्च्या गाण्यात अजून बदल करा. मग त्याचं संयोजन, मिक्सिंग वगैरे वगैरे करा ! त्यापेक्षा उचला कुठून तरी, कोंबा काही तरी आणि मिक्स केल्यासारखं करून व्हा मोकळे ! काही तासांत एक गाणं तयार. मीटर डाऊन, रोटेशन सुरु ! दिलेल्या फोडणीत जर चिमुटभर 'नॉस्टॅल्जिया'सुद्धा असला, तर मग सुटणारा घमघमाट दूरवर पोहोचू शकतो !

करोडो रुपये टाकणाऱ्या लोकांनी त्याच्यावर मिळणाऱ्या फायद्याचा असा विचार केला तर त्यात नैतिकदृष्ट्या काहीच गैर नाही. मात्र, विकत घेणाऱ्यांनीच जर आपली आवड विकणाऱ्या लोकांच्या फायद्याशी जुळवून घेतली असेल, तर त्यात चूक कुणाची असणार ? खरं तर उलट व्हायला पाहिजे. लोकांना काय आवडतं ते विकायला ठेवलं गेलं पाहिजे. मगर आजकल गंगा उलटी बह रही हैं ! 
दुसरं काही विकत घ्यायला नाहीच त्यामुळे त्यातल्या त्यात 'कमी भुक्कड' जे असेल, ते विकत घेतलं जातं. हे फक्त देशाच्या राजकीय क्षेत्रातच घडत आहे, हा एक मोठा गैरसमज किंवा अज्ञान असावं. कारण जेव्हा अभिजातपणा, दर्जा अश्या मूलभूत संकल्पनांनाच आव्हान देण्याइतका उथळपणा 'बंडखोरी'च्या नावाखाली बळावतो, तेव्हा सगळ्याच क्षेत्रांमध्ये दुय्यम-तिय्यम दर्ज्याचे लोक उच्च पदावर पोहोचतात. दर्जात्मक अधोगती कुठल्या एका विशिष्ट क्षेत्राशीच मर्यादित नसावीच. एकाच वेळी अनेक, किंबहुना प्रत्येक पातळीवर समांतरपणे कमी-अधिक प्रमाणात (गतीने) ती सुरु असते. मग ते कलेचं क्षेत्र असो वा विज्ञानाचं, व्यावसायिक क्षेत्र असो वा राजकीय. एकदा आपला स्वत:कडूनच काही विशिष्ट दर्ज्याच्या निर्मिती व आस्वादाचा आग्रह संपुष्टात आला की आपण काहीही विकू शकतो आणि काहीही खरेदीही करू शकतो.

कलेचे बहुतांश पैलू हे शास्त्राने सिद्ध होत असतात. त्यामुळे 'दर्जा सापेक्ष असतो', हा युक्तिवाद जर कुणी करणार असेल, तर तो अगदीच तकलादू आहे. कारण अनुभूतीला मोजमाप नसलं, तरी अनुभवाला असतं. कलाकृतीचा आस्वाद घेणं आणि कलाकृतीने प्रभावित होणं, ह्यात फरक आहे. हा फरक अनुभवातून कळतो आणि अनुभव माहिती, ज्ञान, अभ्यास व काही प्रमाणात साधनेतून येतो. 
उदाहरणार्थ - लहान मुलाला थोडं सुरात कमी-जास्त असलेलं एखादं बालगीत अद्वितीय आनंद देत असतं. ती त्या लहान मुलाची अनुभूती. मात्र तेच मूल मोठं झाल्यावर त्या बालगीताचा आस्वाद घेताना भूतकाळात, आठवणींत रमतं, तो त्याचा अनुभव असतो; कलाकृतीचा दर्जा नाही. दर्जा हा शास्त्रसिद्धच असतो आणि कलाकृतीची महानता अश्या सिद्धतेनेच ठरते. अनुभूतीच्या पातळीवर ती ठरत नाही कारण अनुभूती वैश्विक असत नाही, व्यक्तीपरत्वे बदलत जाते.

म्हणूनच चित्रपट आणि चित्रपटसंगीताच्या बाबतीत भुक्कड, सुमार 'नव्वदी'च्या दशकाचं उदात्तीकरण आता पुरे करायला पाहिजे. 
मला जाणीव आहे की, सोशल मिडियावर सक्रीय असणाऱ्यांत मोठ्या संख्येने एक अशी पिढी आहे, जिच्या लहानपणाची किंवा तारुण्याची जोडी नव्वदीतल्या चित्रपट व चित्रपटसंगीताशी जोडलेली आहे. (माझीही आहे !) त्यामुळे त्या सगळ्याशी असलेली भावनिक जवळीक समजून येण्यासारखी आहे. मात्र केवळ नॉस्टॅल्जियाच्या नशेपायी लोक फार वाहवत चालले आहेत. आंख मारे लडकी आंख मारे.., ये खबर छपवा दो अखबार मे.., इ. टुकार ओरिजिनल्सची महाटुकार रिमिक्स, ती भिकार आहेत हे समजत असतानाही केलीही जात आहेत आणि स्वीकारलीही जात आहेत. ह्या सगळ्यात कुठे तरी आपला सारासारविवेक आपण स्वखुशीने गहाण ठेवतो आहोत.

नव्वदीच्या दशकाच्या उजळणीने मिळणाऱ्या नॉस्टॅल्जिक किकसाठी सामान्यत्वाचा असामान्य गौरव करण्याची एक प्रकारची अहमहमिका चालू असलेली दिसून येते. हे असंच जितकं सुरु राहिल, तितकं आपल्या माथी अजूनाजून सामान्यत्व मारलं जाणंही सुरुच राहिल. 'नॉस्टॅल्जिया' नावाचं 'ड्रग' आपल्याला बधीर करतंय आणि हे एखाद्याच्या बाबतीत नाही, तर एका मोठ्या समूहाच्या बाबतीत होत आहे. जिथे तिथे सामान्यत्वाचा 'उदो उदो' आपण करतो आहोत कारण काही असामान्य करण्याची कुवत आपल्यात नाहीय आणि ह्याचाच अभिमान मिरवण्यात आपण धन्यता मानतो आहोत. 
'चांगलं काय आहे, हे माहित नसणं आणि त्यामुळे एखादं सुमारपण, सुमार असल्याचं न समजून येणं', हा अज्ञानातला एक आनंद आणि त्या आनंदात हुरळून जाऊन एखाद्या टुकारकीतही असामान्यत्व दिसणे, हा न्यूनगंडाचा एक भाग असतो. 
हा न्यूनगंड झटकायला हवा, प्रयत्नपूर्वक. 
नाही तर अजून काहीच वर्षांनी लोक रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' सिरिजची किंवा even worse, इंद्रकुमारच्या 'मस्ती' सिरीजची आठवण काढून व्याकुळ होतील आणि त्या काळात रिमिक्स होऊन येणारी गाणी कोणती असतील, ह्याचा तर विचारही करवत नाही.

- रणजित पराडकर

Friday, March 08, 2019

रुटीनात आहेस तू रोज माझ्या

इथे रोजचा ओढणे तोच गाडा
जरी कुरकुरे वंगणाच्या विना
दिवस आजचा कालची फक्त कॉपी
उजाडून येतो नव्याने जुना

परीघातली धाव कंटाळवाणी
तरी त्यातही एक आहे मजा
रुटीनात आहेस तू रोज माझ्या
तुला पाहणे, स्पर्श मलमल तुझा

तुला ओढ लावायचा छंद आहे
मला धावणे रोज आहे अटळ
तुझ्या क्यूट हातात मी बोट देता
स्वत:चे दिसे रुक्षपणही निखळ

तुझा कोवळा स्पर्श भासांत असतो
तुझा गंध श्वासांत रेंगाळतो
दिवसभर जरी दूर असलो तरीही
तुझ्या पास बाबा तुझा राहतो

व्यथांचा निखारा क्षणार्धात शमतो
लपेटून घेताक्षणी मी तुला
तुझ्या बोळक्या हासण्याने फुलवतो
सुखाच्या कळ्या मुग्ध, माझ्या मुला

....रसप....
७ मार्च २०१९
Related Posts Plugin for WordPress, Blogger...