Showing posts with label कविता - गण वृत्त. Show all posts
Showing posts with label कविता - गण वृत्त. Show all posts

Tuesday, December 17, 2019

एका शेराची कविता

नवा रंग माझ्या घराला दिला 
नसे आवडीचा, तरी का दिला?
कुणाला विचारायचा जाब मी ?
घरातील सगळेच माझेच की !
नवा गंध छातीत मी ओढला 
अनावर उसळला जुना खोकला 
जरा थांबलो, शांत झालो जरा 
जपूनच पुन्हा श्वास मी घेतला 
सवय लागली हीच नकळत मला 
हळू अन् जपुन श्वास घेतो अता 
घराच्या पुढे एक चाफा असे 
सवे डोलणारा कडूनिंबही 
हसू रानफूलातले गोडसे 
मधूनच दिसे अन् मधूनच लपे 
धडाडून बुलडोझराला तिथे 
कुणी निर्दयाने फिरवले असे 
न चाफा तिथे ना कडूनिंबही 
फुलांची चिरडली मुकी आसवे 
इथे वास येतो विचित्रच अता 
नवा रंग अन् झाडप्रेतांतला  

इथे ह्या घरी मी जरी जन्मलो
उद्या ह्याच मातीत संपीनही
तरीही मला वेगळे वाटते 
कसे वाटते, काय सांगायचे ?


....रसप... 
१७ डिसेंबर २०१९

Friday, March 08, 2019

रुटीनात आहेस तू रोज माझ्या

इथे रोजचा ओढणे तोच गाडा
जरी कुरकुरे वंगणाच्या विना
दिवस आजचा कालची फक्त कॉपी
उजाडून येतो नव्याने जुना

परीघातली धाव कंटाळवाणी
तरी त्यातही एक आहे मजा
रुटीनात आहेस तू रोज माझ्या
तुला पाहणे, स्पर्श मलमल तुझा

तुला ओढ लावायचा छंद आहे
मला धावणे रोज आहे अटळ
तुझ्या क्यूट हातात मी बोट देता
स्वत:चे दिसे रुक्षपणही निखळ

तुझा कोवळा स्पर्श भासांत असतो
तुझा गंध श्वासांत रेंगाळतो
दिवसभर जरी दूर असलो तरीही
तुझ्या पास बाबा तुझा राहतो

व्यथांचा निखारा क्षणार्धात शमतो
लपेटून घेताक्षणी मी तुला
तुझ्या बोळक्या हासण्याने फुलवतो
सुखाच्या कळ्या मुग्ध, माझ्या मुला

....रसप....
७ मार्च २०१९

Friday, September 07, 2018

पहारा

तुझ्या प्रश्नांमधे असते भयानकशी अनिश्चितता
तुला उलथायची असते स्वत:च्या आतली सत्ता
नवी अन् वेगळी किंमत असे प्रत्येक बदलाला 
कधी मोजायची असते, कधी साभार नशिबाला

कुणाला काळजी नाही, कुणी ना चौकशी करते
तुला पाहून हळहळते, असे नाही कुणी येथे
जराशी भूल घेण्याला मनाची मान्यता नसते 
व्यथांवर प्रेम जडल्यावर व्यथांनाही व्यथा कळते

कधी थांबायचा झगडा, असे चालायचे कुठवर ?
कधी मिळणार प्रश्नाला बरोबर नेमके उत्तर ?
तसा खंबीर तू दिसतोस पण आहेस ना नक्की ?
पहा, होतील आता तर स्वत:ची माणसे परकी 

घड्याळातील काटाही तुला न्याहाळतो आहे
तुझ्या संवेदनांवरचा पहारा वाढतो आहे
नजर चोरुन, तरी मोजुन, गणित तू मांड श्वासांचे
स्वत:हुन सांगते पत्ते दिशा पाऊलवाटांचे

....रसप....
७ सप्टेंबर २०१८

Monday, April 17, 2017

तू....

सूर तू संगीत तू
स्वप्न तू सत्यात तू
छंद तू धुंदीत तू
दूर तू माझ्यात तू

स्वाद तू आस्वाद तू
स्नेह तू मोहात तू
गंध तू अस्तित्त्व तू
दृश्य तू खोलात तू

आज तू अंदाज तू
मित्र तू सर्वस्व तू
साज तू श्रुंगार तू
यत्र तू सर्वत्र तू

कल्प तू आभास तू
मर्म तू गर्भीत तू
मूर्त तू साक्षात तू
कर्म तू संचीत तू

साध्य तू आरंभ मी
आस तू वर्तूळ मी
ध्येय तू मार्गस्थ मी
तोय तू व्याकूळ मी


....रसप....
१९ जुलै २००८

--------------------

वेग तू आवेग मी
जोम तू उद्ध्वस्त मी
प्राण तू शारीर मी
स्थैर्य तू अस्वस्थ मी

प्रार्थ्य तू अन् स्वार्थ मी
पूर्ण तू चतकोर मी
क्षीर तू नवनीत मी
रम्य तू घनघोर मी

पद्म तू तर भ्रमर मी
सूज्ञ तू ओढाळ मी
मेघ तू अन् मोर मी
सौम्य तू नाठाळ मी

सौर्य तू बेसूर मी
मौज तू बेरंग मी
डौल तू बेताल मी
ऐट तू बेढंग मी


....रसप....
१९ जुलै २००८

(संपादित - १७ एप्रिल २०१७)

Monday, January 09, 2017

सदाचार नष्ट

स्तुतीपाठकांच्या
तश्या निंदकांच्या
भिडवल्यात सेना
इथे कौरवांच्या

म्हणे येथ जो तो
नसे मी जसा 'तो'
तरी वागताना
कसा तोल जातो?

कुणी अंधभक्त
कुणी अंधत्रस्त
भल्या माणसांचा
सदाचार नष्ट

कुणा ना पहावे
कुणा ना दिसावे
स्वत:च्या मनाचे
कुणा ना कथावे

....रसप....
७ जानेवारी २०१७

Saturday, January 07, 2017

लहान होतो म्हणून..

चुकार चिमणी करायची ती अबोध चिवचिव कळायचीही
पन्हाळरांगांमधून थेंबांसमेत गट्टी जमायचीही

खट्याळ वाटायचे मला जे घड्याळ आता खडूस वाटे
मला हव्या त्या क्षणास टिकटिक निवांत थांबून जायचीही

जरा चुकीचे नि बोबडे पण मनातले बोलणे खरोखर
मला व्याकरण न ठाव होते परंतु भाषा जमायचीही

चवीचवीने कधी लापशी, निवट दूध अन् भात गुरगुट्या
'मिळेल खाऊ उद्या' ऐकुनी कळी मनाची खुलायचीही

दिवसभराचा प्रचंड थकवा छळत असे त्या वयातही, पण
निवांत होण्यास फक्त आई हवी असे अन् मिळायचीही

जिथे जशी जेव्हढी मिळे ती तशी झोप आवडायचीही
लहान होतो म्हणून माझी सकाळ हसरी असायचीही

....रसप....
०७ जानेवारी २०१७

Wednesday, December 28, 2016

शब्द शोधत थबकली कविता जशी

चल मना, ये, बस इथे माझ्याजवळ
आज माझ्याशी जरा संवाद कर
सांगतो ख्यालीखुशाली मी तुला
हात मित्रासारखा हातात धर

एकटेपण दाटते, अंधारते
पसरतो काळोख माझ्या आतला
भोवताली फक्त मी माझ्याविना
जाणिवांचा खेळ फसवा चालला

एक रस्ता मूक होउन धावतो
एक गोंधळतो हरवल्यासारखा
गुरफटे पायांत रस्ता जो कुणी
तो स्वत:पासून दिसतो पारखा

अक्षरे विरलीत एकांतात अन्
शब्द गोंगाटात भरकटले कधी
भावनेचा वेध घेउन नेमका
खूप आहे लोटला कालावधी

ही व्यथा, ही वेदना, घुसमट अशी
सांग सांगावी कुणाला मी कशी
जायचे आहे कुठे नाही कळत
शब्द शोधत थबकली कविता जशी

....रसप....
१२ जून २०१५ ते २८ डिसेंबर २०१६

Sunday, December 04, 2016

हव्याश्या वेदनेवर काळ अडला

परीटाच्या घडीची कापडे झाली नकोशी
हवासा वाटतो बेबंद वारा
व्यथांच्या फेनलाटा तुंबल्या माझ्या उश्याशी
मला माझीच सीमा, मी किनारा

सुखाची वाढली आहे उधारी फार आता
हिशोबाची वही जाळून टाका
खुणावू देत काट्यांच्या मला पाऊलवाटा
फुलांचे चेहरे चुरडून टाका

कफल्लक होत जाणे पाहतो आहे स्वत:चे
कुणाला वाटते हे आत्मघाती
मुठीतुन सांडते वाळू तसे ऐश्वर्य माझे
इथे राहीन मी होऊन माती

तसे काहीच नाही पण तरी भरपूर वाटे
रित्या संपन्नतेवर जीव जडला
मनाच्या किलकिल्या दारातुनी हुरहूर दाटे
हव्याश्या वेदनेवर काळ अडला

....रसप....
०४ डिसेंबर २०१६
(संपादित - ३१ जानेवारी २०२४) 

Tuesday, November 26, 2013

अनुभूती

कितीदा मनाला उभारी दिली मी
कितीदा नवी जिद्द मी बाणली
तरी सांज प्रत्येक घेऊन येते
निशेची निराशामयी सावली

इथे एकदा काळजाने झरावे*
जशी पाझरे पश्चिमा सावळी
निळाई मुक्याने जरा सावळावी
भरावी जरा लोचनांची तळी

तळातून गहिऱ्या उफाळून यावे
जुने साचलेले तरी सोवळे
मनातून माझ्या कुणी व्यक्त व्हावे
जरा मुक्त व्हावीत ही वादळे

कुणी हारले सर्व काही तरीही
मला जिंकवाया पडावे कमी
दिसे फक्त आनंद ओसंडता पण
स्वतःशीच आहे पराभूत मी

....रसप....
१६ नोव्हेंबर २०१३
*ओळ 'श्री. प्रसाद जोशी' ह्यांची. 

Monday, August 05, 2013

खुळा

सुमन तिचे सुमनासम सुंदर स्वच्छ पवित्र सुगंध जसा
नितळ निळ्या नयनी नभरंग निरागस लोभस अल्लडसा
अधरकळी कमनीय जुळी मकरंदकुपी पुरती भरली
बघुन तिला मज ईश्वरदर्शनआस नसे दुसरी उरली

रुणझुण पैंजण नादत भासत मोहक चालत मोहविशी
अलगद शब्द अनाहुत येउन स्पर्श करे जणु मोरपिशी
कटिखटके लटके झटके बघता उडते मन होत खुळे
लय हलते हृदयात नि स्पंदन एक-दुज्यास कधी न जुळे

झुळुकहवा उडवून खट्याळ बटांस तिच्या लडिवाळपणे
बहरुन येउन बाग हसे भ्रमरासम हे मन बागडणे
जणु हरिवल्लभ व्यस्त झुले श्रवणाभरणे झुलतात तशी
नकळत मी झुललो उलटा, झुरलो पडलो नित तोंडघशी

लिहुन किती कविता जमल्या पण शब्द न एक कधी वदलो
कुणि सुकुमार तिचे मुख चुंबित पाहुन मीच खुळा ठरलो

....रसप....
४ ऑगस्ट २०१३
सत्यकथेवर आधारित
वृत्त श्रवणाभरण - ललललगा ललगा ललगा ललगा ललगा ललगा ललगा

Thursday, July 25, 2013

वेडा (सुनीत)

'मराठी कविता समूहा'च्या 'लिहा ओळीवरून कविता - भाग १०७' मध्ये माझा सहभाग -

डोळ्यांखाली नकळत बनली वर्तुळे शुष्क काळी
दृष्टीसुद्धा विझुन हरवली शून्य देशात गेली
जाळे आठ्यांमधुन पसरले कृष्णवर्णी कपाळी
झोळी त्याची मळकट विटकी भार खांद्यास झाली

प्रत्येकाने सजवुन लिहिली त्या खुळ्याची कहाणी
कोणासाठी मजनु अपयशी प्रेमखेळात झाला
कोणी बोले बहुत धनिक तो भोगतो शापवाणी
आला होता कुठुन समजले ना कधीही कुणाला

धुंदीमध्ये बडबड करि तो नेहमी आपल्याशी
ऐकू आले सहजच मज तो गातसे काव्यओळी
नाही त्याला फिकिरच कुठली सख्य नाही जगाशी
काही बाही खरडत असतो गच्च ती पूर्ण झोळी

काव्योत्पत्ती हरवत असतो बावळा हा, तसा मी
तोही आता समजुन हसतो आपला, हासता मी !

….रसप….
२५ जुलै २०१३
वृत्त - चन्द्रलेखा

Sunday, July 14, 2013

मला ओढ नाही तुला भेटण्याची..

'मराठी कविता समूहा'च्या 'प्रसंगावरून गीत - भाग क्र. २७' ह्या उपक्रमात माझा सहभाग -

मला ओढ नाही तुला भेटण्याची
तुला भेटतो रोज स्वप्नातुनी
मला फक्त सांगायचे हेच आहे
तुला चोरले मी तुझ्यापासुनी

पुन्हा एकदा रंग आला ऋतूला
तुझी फक्त चाहूलही लागता
तुझ्या आवडीची फुले हासती अन्
सुगंधी हवेचा सुरू राबता
दिसे आज प्रत्येक रस्ता नव्याने
जणू चालला घेत वळणे जुनी
मला ओढ नाही तुला भेटण्याची
तुला भेटतो रोज स्वप्नातुनी

कशाला कुणाला मनातील सांगू
तुझ्यावर इथे सर्व असती फिदा
तुझे नाव ऐकून गुंगीत सारे
तुझी धुंद मदमस्त ऐसी अदा
मला ना नशा ही, तुझी सावली मी
कुठे जायचे मी तुला टाळुनी
मला फक्त सांगायचे हेच आहे
तुला चोरले मी तुझ्यापासुनी

....रसप....
१४ जुलै २०१३  

Wednesday, May 22, 2013

अबोली


अबोलीच्या फुलांचे
तुझ्या-माझ्या मनांचे
घरांच्या अंगणांचे
कुणी ऐकायचे ?

छतांच्या झुंबरांशी
कड्यांच्या बंधनांशी
जवळच्या अंतरांशी
किती भांडायचे ?

स्मृतींच्या पाउलांना
पसरत्या सावल्यांना
तरल कातर छटांना
कसे वाचायचे ?

तुझे येणे न होते
तुझे जाणे न होते
तुझे असणे न होते
कधी सांगायचे?

इथे सारा पसारा
अनावर कोंडमारा
छुप्या पाऊसधारा
कसे टाळायचे ?

तरीही हाक द्यावी
उरी आशा रुजावी
नजर ओली थिजावी
कुणी समजायचे ?

....रसप....
२२ मे २०१३

Sunday, May 19, 2013

विचारा..


तुझी साथ वाटे मला शाश्वताची तुझ्यावर मला हक्कही वाटतो
तसे ह्या जगाशी जुळवले कितीही तरी रोज हटकून मी भांडतो

क्वचित एकदा तू असा मूर्त होऊन येतोस, होतोस अक्षरफुले
तुझा हाच दुर्दम्य विश्वास माझ्यात आशा उद्याची बनुन किलबिले

छुप्या पावलांनी कधी भ्याड हल्ले, कधी वार होतील पाठीवरी
लढू सोबतीने जगाशी, तुझ्या सत्यतेची असे ही लढाई खरी

विचारा, तुझ्यावर अजुन ठाम मी तू नको धीर सोडूस इतक्यात रे
प्रवासास आरंभ केला कधीचा नको थांबणे व्यर्थ अर्ध्यात रे

....रसप....
१९ मे २०१३

Sunday, July 08, 2012

बनूनी तुझा मी हरी सावळा


तुझ्या चाहुली जाणवाव्या कितीदा
मनाला फुटावी नवी पालवी
किती तारकांनी नभाशी सजावे
तुझा चंद्र स्वप्नामधे मालवी

कळे ना मला मी कुठे लुप्त होतो
निवारा तुझ्या सावलीचा मला
जणू सांजवेळी कुणी सप्तरंगी
मुखावर पदर रेशमी ओढला

विचारांस माझ्या नसे आज थारा
पतंगाप्रमाणे इथे वा तिथे
हवेच्या दिशेशी जुळे खास नाते
तुझा गंध मोहून नेतो जिथे

पुन्हा एकदा दाटुनी रात येते
पुन्हा मी नभाशी असा भांडतो
जरी दूर असला तरी चंद्र माझा
मला शुभ्र अन् आपला वाटतो

कशी रोज माझी सरे रात्र येथे
तुला आकळावे कसे? दूर तू
मनाच्या सतारीतुनी छेडलेला
सुन्या जोगियाचा सुना सूर तू

सरी पावसाच्या सवे आणती हा
तुझ्या पैंजणांचा जुळा सोहळा
भिजावे सये नाद वेचून सारा
बनूनी तुझा मी हरी सावळा
.................... बनूनी तुझा मी हरी सावळा
.................... बनूनी तुझा मी हरी सावळा

....रसप....
८ जुलै २०१२

Monday, July 02, 2012

कसे शक्य नाही नभाला झुकवणे ?

कसे शक्य नाही नभाला झुकवणे ?
जरासा तुझा हात उंचाव रे !
क्षितीजापुढेही तुझी वाट जाते
पुन्हा वेग घेऊन तू धाव रे !

तुझ्या मनगटी कृष्णगोविंद आहे
उचल तू कधी पूर्ण गोवर्धना
तुझ्या अंतरंगात आहे नृसिंह
कधी तू उफाळून कर गर्जना !

तुझ्या हस्तरेषा कुणी आखणे अन
कुणी प्राक्तनाला लिहावे तुझ्या ?
तुझा तूच आहेस कर्ता विधाता
कुणी धाडसाला पहावे तुझ्या ?    

नको आज पाहूस मागे फिरूनी
कुणी साथ सोडून रेंगाळता..
तुझ्या इप्सिताचे तुझ्या संचिताशी
नको बंध जोडूस तू जाणता

तुझ्या हिंमतीची तुला जाण व्हावी
पुरे एव्हढे विश्व जिंकावया !
नको साथ-संगत, न सौभाग्य लाभो
तुला जीत खेचून आणावया !

....रसप....
२ जुलै २०१२



Sunday, May 27, 2012

नभाच्या कडांना छटा केशराच्या..


नभाच्या कडांना छटा केशराच्या
सुगंधी हवा खेळते भोवती
झुलावे किती आठवांच्या झुल्याने
मला दु:खं माझीच गोंजारती

पुन्हा आज मी एकटा गीत गातो
जशी मावळे पश्चिमा लाघवी
कुठे दूर रानातला एक पक्षी
मला ऐकुनी शीळ का वाजवी ?

मनाच्या तरंगातुनी साद येते
मला मीच माझ्यात बोलावतो
किती दूर गेलो तरी दूर नाही
तुझी स्पंदने अंतरी मोजतो

तुझ्या पावलांच्या खुणा झाकण्याला
पहा सांडले मी फुलांचे सडे
तुझी वाट मी रोज पाहीन येथे
सुन्या काळजाला पडू दे तडे

मला ठाव आहे तुझी मूक प्रीती
तुझ्या बंधनांनीच सजतेस तू
तुझ्या पापण्या बोलती मौनभाषा
मला त्या अबोल्यात कळतेस तू

निशेच्या कुशीची मला ओढ वाटे
मला स्वप्नदेशात मी पाहतो
धुक्यातून कोरून हळवी हवीशी
घराची तुझ्या वाट मी चालतो..

....रसप....
२६ मे २०१२

Wednesday, April 25, 2012

आर्ततेची 'ग्रेस'फुल सांज


क्षितीजास लागे कशी ओढ वेडी
तुझ्या गावची वाट चाले पुढे
फुलांच्या नशीबात कोमेजणे अन्
थवा पाखरांचा उदासी उडे

सुक्या पापणीला पुन्हा ओल येते
तुझ्या शब्दरंगांत तेजाळुनी
जुनी वेदनाही तुझे गीत गाते
तुझ्या दु:खगंगेमधे न्हाउनी

सरी पावसाच्या मुक्याने झराव्या
सुन्या माळरानावरी सोहळा
अश्या सांजवेळी रिता बैसलो मी
फुटे कोंब दु:खास हा कोवळा

तुझे शब्द वाचून मी पाहताना
मनावेगळे खेळ माझ्या मनी
ऋणाईत आजन्म आहे तुझा मी
खरा तूच रे अमृताचा धनी

जशी सांज तू पाहिली आर्ततेची
पुन्हा ती मनाला दिसावी कशी ?
तुझी पावले थांबली अंबराशी
पुन्हा सांग मागे फिरावी कशी ?


....रसप....
२५ एप्रिल २०१२
इट्स टाईम टू बी 'ग्रेस'फुल......... 

Thursday, April 05, 2012

पुन्हा डाव तू मांड, मी हारतो..



जगाच्या पटी हा तुझा खेळ सारा
हरेकासमोरी तुझा मोहरा
तुझा ना भरोसा जरी वाटला रे
तरी वाटतो का तुझा आसरा ?

'लढावे' असे वाटले ना मनाला
जसे ठेवले तू तसा नांदलो
तुला खोड होती मला छेडण्याची
तरीही कधीही न मी भांडलो

मला ठाव होता तुझा धूर्त कावा
'धरूनी दबा एकटे गाठणे'
चहूबाजुनी घेरुनी एकट्याला
विजेत्यापरी आवही आणणे !

तुझी चाल दैवा कधी वाकडी वा
कधी चाल होती तुझी थेटही
मला जिंकणेही न मंजूर होते
दिली जिंकण्याची तुला भेट ही

अखेरीस केलीस कोंडी इथे तू
मनापासुनी हार मी मानतो
जरी खेळ आयुष्य झाले तरीही
पुन्हा डाव तू मांड, मी हारतो..

....रसप....
४ एप्रिल २०१२

Wednesday, April 04, 2012

इथे थांबुनी घे विसावा जरा


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८९" मध्ये माझा दुसरा सहभाग -

नसे मी तुझा तू तरी खास माझा
मना जाणवावे कधी हे तुला ?
तुझ्या प्रकृतीला, तुझ्या विकृतीला
असे चेहरा मीच माझा दिला

तुझे कालचक्रापुढे धावणे हे
मना, गुंतवाया तुला ना कुणी
मला तूच देशी नव्या स्वप्नगाठी
दिसे सप्तरंगी मला ओढणी

कधी पाहिले तू कुणा दूर गावी
सुखाचे खजीने कुणाच्या घरी
मला ते नको मी सुखासीन आहे
जरी ओढतो फाटक्या चादरी

तुला भावतो अंबराचा पसारा
मला पावलाएव्हढी वाटही
तुला पाहिजे प्राशणे सागराला
मला एक डोळ्यातली धारही

जुन्या वेदनांना नव्याने उजाळा
सहानूभुतीचे वृथा भार का ?
उगाळूनही दु:ख गेल्या दिसांचे
सुगंधास दे चंदनासारखा

पहा आज तूही जरा भोवताली
कसा गंध देती फुलांचे सडे
खरे ह्या क्षणाचेच तू मान वेड्या
भरूनी पुन्हा घे सुखांनी घडे

कुठे चाललो मी मला ठाव नाही
तुझ्यामागुनी मी निघालो खरा
तुझ्या ह्या प्रवासास ना अंत काही
इथे थांबुनी घे विसावा जरा


....रसप....
४ एप्रिल २०१२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...