Wednesday, May 30, 2012

मी तर माझा मजेत आहे!


कुणी रडावे, कुणी हसावे, मी तर माझा मजेत आहे
कुणी जगावे, कुणी मरावे, मी तर माझा मजेत आहे!

आयुष्याचा अथांग सागर, दु:खाची त्याच्यात वादळे
कुणी बुडावे, कुणी तरावे, मी तर माझा मजेत आहे !

पुण्याचा अन् पापाचाही हिशेब कोणी कधी ठेवला?
कुणी करावे, कुणी भरावे, मी तर माझा मजेत आहे !

जीवनभर जळतोच इथे, मग मेल्यानंतर काय करावे?
कुणी सडावे, कुणी जळावे, मी तर माझा मजेत आहे !

पहा लागली शर्यत येथे, उंदिर सारे धडपड करती
कुणी थकावे, कुणी पळावे, मी तर माझा मजेत आहे !

पाठ फिरवता बरेच म्हणती, 'हा तर पक्का हलकट आहे'
कुणी चिडावे, कुणी कुढावे मी तर माझा मजेत आहे !

....रसप....
२९ मे २०१२

Tuesday, May 29, 2012

तसेच काहीसे..


ह्या तीराचे त्या तीराशी नाते समजत नाही
दूर राहती तरी बंध का कधीच उसवत नाही ?
तसेच काहीसे माझे अन तुझे आगळे नाते
परस्परांचे नसतानाही स्वतंत्र करवत नाही

ह्या मेघाच्या अन धरतीच्या मनात काय असावे ?
ह्याने व्हावे रिते-रिते अन तिला चिंब भिजवावे !
तसेच काहीसे माझेही तुला आठवुन झुरणे
तुझी आसवे मी ढाळावी तुझी वेदना व्हावे

ओढ समुद्राची सरितेला कशास ही लागावी ?
कडे-कपारी ओलांडुन वेडावुन धावत यावी
तसेच काहीसे तू माझ्यासाठी चंचल होणे
रोज मला पाहून मनातुन नवी उभारी घ्यावी

संध्येच्या कातर सूर्याला क्षितिजाने सावरणे
एक क्षणाची संगत असते तरी किती मोहवणे !
तसेच काहीसे अपुले हे नजरबंद जपतो मी
पुन्हा पुन्हा अन त्याच क्षणाला फिरुन मनाशी जगणे..!

तुझ्या सोबतीने जगण्याचे स्वप्न पाहिले नव्हते
तुझ्याविना पण कुणीच इतके कधी भावले नव्हते
ह्या नात्याला कशास द्यावे नाव उगा काहीही ?
ह्या नात्याने बांध मनाचे कधी तोडले नव्हते..

....रसप....
२८ मे २०१२

Sunday, May 27, 2012

नभाच्या कडांना छटा केशराच्या..


नभाच्या कडांना छटा केशराच्या
सुगंधी हवा खेळते भोवती
झुलावे किती आठवांच्या झुल्याने
मला दु:खं माझीच गोंजारती

पुन्हा आज मी एकटा गीत गातो
जशी मावळे पश्चिमा लाघवी
कुठे दूर रानातला एक पक्षी
मला ऐकुनी शीळ का वाजवी ?

मनाच्या तरंगातुनी साद येते
मला मीच माझ्यात बोलावतो
किती दूर गेलो तरी दूर नाही
तुझी स्पंदने अंतरी मोजतो

तुझ्या पावलांच्या खुणा झाकण्याला
पहा सांडले मी फुलांचे सडे
तुझी वाट मी रोज पाहीन येथे
सुन्या काळजाला पडू दे तडे

मला ठाव आहे तुझी मूक प्रीती
तुझ्या बंधनांनीच सजतेस तू
तुझ्या पापण्या बोलती मौनभाषा
मला त्या अबोल्यात कळतेस तू

निशेच्या कुशीची मला ओढ वाटे
मला स्वप्नदेशात मी पाहतो
धुक्यातून कोरून हळवी हवीशी
घराची तुझ्या वाट मी चालतो..

....रसप....
२६ मे २०१२

Thursday, May 24, 2012

'कून फाया कून..' - स्वैर भावानुवाद/ प्रेरणा


'रॉकस्टार' मधील 'कून फाया कून..' चा अनुवाद/ भावानुवाद करायचे अनेक दिवस मनात घोळत होते. पण काही केल्या जमत नव्हता. कारणे अनेक.. 
१. मूळ गीत इतके भिनले होते की विचारचक्र चालू होतच नसे.. 
२. मूळ गीत नीट वाचल्यास लक्षात येते की त्याला कुठलाही विशिष्ट आकृतिबंध तर नाहीच, पण यमकसुद्धा पाळलेले नाहीत. अनुवाद करताना शक्यतो मूळ गीताच्या चालीवर करायची मला आवड आहे, पण ह्या गीताबाबत मी लय पकडण्यासाठी कुठलाच आधार पकडू शकलो नाही. 
३. गाण्यात काही फारसी/ उर्दू शब्दप्रयोग (सदाक़ अल्लाहुल....) व काही संदर्भ (या निझामुद्दीन....) असे आहेत, ज्यांचा अनुवाद केला जाऊ शकत नाही किंवा केल्यास त्यात काही मजा येणार नाही. 

शेवटी अनेक दिवस विचार करायचा प्रयत्न केल्यावर मी चालीवर न लिहिता मूळ गीताप्रमाणेच भरपूर मोकळीक घेऊन लिहिण्याचे ठरवले आणि तसेच केले. हा अनुवाद वाचताना म्हणूनच किंचित विस्कळीत वाटेल, पण त्यातही मी थोडासा Format जपायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून एखादी स्वतंत्र चाल तरी नक्कीच दिली जाऊ शकेल.
टीप - मूळ गीत ज्यांनी ऐकलं नसेल, त्यांनी ते माझ्या आग्रहाखातर अवश्य ऐकावे.

======================================================

अनुवाद -

पुढे जरासे पाउल घे
कमी होउ दे अंतर हे 
जीवनातले रितेपण हे दूर कर माझ्या 
तुझ्याविनाचे रितेपण हे दूर कर आता 
रितेपणाही जगात नव्हता तेव्हा होता तोच एकटा
तुला मला तो व्यापुन उरला, त्याची माया, तोच विधाता 

तन मन माझे रंगव तू
मोबदला घे जीवन तू 

सोनसकाळी किरणे येती नाव तुझे घेऊन 
माझ्यामधल्या अंधाराला तूच टाक दिपवून 
तुझ्या पायरीवरती माझे मन जाते उजळून 
भगवंता रे, दयाघना घे आज मला व्यापून.........

एव्हढेच तू माझ्यावरती कर उपकार 
माझ्यापासुन मलाच मुक्ती दे सरकार..
मलाच माझा दिसो चेहरा बेदरकार 
माझे मजला कळून येवो सर्व विकार 

भ्रम माझे घेऊन चालले मला कुठे ?
माझ्या कर्माचे झेपे ना मज ओझे 
समजे ना हे पाउल नेते मला कुठे ?

माझ्यामध्ये तू सामावून 
तुझ्याच मागुन माझे पाउल
तुझ्यामधे मीही सामावून
तुझ्याच मी छायेला ओढून 

तुझ्याच हातुन मी घडलो
जगास नाही आवडलो 
तुझ्याच प्रेमावरी मदार 
तूच सत्य अन तू आधार
रितेपणाही जगात नव्हता तेव्हा होता तोच एकटा
तुला मला तो व्यापुन उरला, त्याची माया, तोच विधाता 
त्याची माया, तोच विधाता 
त्याची माया, तोच विधाता 

स्वैर भावानुवाद - ....रसप....
मूळ गीत/ प्रेरणा - 'कून फाया कून..'
मूळ गीतकार - इर्शाद क़मिल
चित्रपट - रॉकस्टार 

मूळ गीत -

या निझामुद्दीन औलिया,
या निझामुद्दीन सल का

क़दम बढ़ा ले,
हदों को मिटा ले,
आजा खालीपन में, पी का घर तेरा
तेरे बिन खाली आजा खालीपन में.

रंगरेज़ा रंगरेज़ा 
रंगरेज़ा रंगरेज़ा 

कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!
कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!

जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था 
वोही था, वोही था, वोही था 

वोह जो मुझ में समाया,
वोह जो तुझ में समाया 
मौला वही वही माया.

कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!

सदाक़ अल्लाहुल अलिय्युल अज़ीम 

रंगरेज़ा रंग मेरा तन मेरा मन,
ले ले रंगाई चाहे तन चाहे मन.

सजरा सवेरा मेरे तन बरसे 
कजरा अँधेरा तेरी जाँ की लौ...
क़तरा मिला जो तेरे दरबर से 
ओ मौला... मौला...

कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!
जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था 
वोही था, वोही था, वोही था 
कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!

सदाक़ अल्लाहुल अलिय्युल अज़ीम 
सदक़ रसूल उल नबी उल करीम 
सल्लल्लाहु अलय्ही व सल्लम 

हो मुझ पे करम सरकार तेरा,
अरज़ तुझे कर दे मुझे मुझसेही रिहा,
अब मुझको भी हो दीदार मेरा,
कर दे मुझे मुझसेही रिहा,
मुझसेही रिहा

मन के मेरे यह भरम,
कच्चे मेरे यह करम,
लेके चलें हैं कहाँ 
मैं तो जानू ना 

तू हैं मुझ में समाया 
कहाँ लेके मुझे आया.
मैं हूँ तुझ में समाया 
तेरे पीछे चला आया,
तेराही मैं इक साया 

तूने मुझको बनाया 
मैं तो जग को न भाया,
तूने गले से लगाया,
हक़ तूही हैं खुदाया 
सच तूही हैं खुदाया 

कुन! फ या कुन!, 
कुन! फ या कुन!

जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था 
वोही था, वोही था, वोही था 
कुन! फ या कुन!, कुन! फ या कुन!

सदाक़ अल्लाहुल अलिय्युल अज़ीम 
सदक़ रसूल उल नबी उल करीम 
सल्लल्लाहु अलय्ही व सल्लम 
सल्लल्लाहु अलय्ही व सल्लम 

 - इर्शाद क़मिल

Tuesday, May 22, 2012

अशी जगावी गझल !



मनामधूनी निर्झर वाहे, अशी लिहावी गझल
हृदयी अंकुर उमलुन यावे, तशी फुलावी गझल

आर्त भावना झिरपत यावी, लयीत अल्लद सहज
चौकटीतले चित्र सजावे, तशी दिसावी गझल

भाळावरच्या सौभाग्यासम हरेक अक्षर सजव
पायी पैंजण छनछनवावे, तशी हसावी गझल!

मनात जपलेली आवडती जुनी सुगंधी जखम
डोळ्यातिल सुकलेले पाणी, तशी रुजावी गझल

एका एका शब्दाने तू अंबर सारे उजळ
क्षितिजकडांनी झळकुन जावे अशी जमावी गझल

वैशाखाच्या जाळामध्ये वसंत मनिचा फुलव
प्राजक्ताने मुग्ध करावे अशी जगावी गझल

....रसप....
२२ मे २०१२

Sunday, May 20, 2012

काउन्ट डाऊन



जडावलेले डोळे आणि ओढलेला चेहरा घेऊनच येते
ती सकाळ..
पावलं खेचत चालणारी वाट सुरू होते
अगदी बेडरूमपासून
आणि संपते थेट ऑफिसमध्ये!
मग मी बघतो माझ्यासारखेच काही
सुस्तावलेले चेहरे
आणि मनातल्या कंटाळवाण्या धुक्यात
मला एकटं वाटत नाही!
नव्या उमेदीने मी परत सुरु करतो
काउन्ट डाऊन पुढच्या वीकेंडचा !!
६ - ५ - ४ - ३ - २ - १

एकेक दिवस सरत जातो आणि
चेहरा अधिकाधिक खुलतो..!
शून्याच्या काउन्टवर येणारी ती शनिवारची रात्र
मी मोकाट सोडतो..

ती मला सुसाट बाईकवर घेऊन जाते..
वांद्र्यापासून नरीमन पॉइन्टपर्यंत
हातात असते -
टोलेजंग ओबेरॉयसमोर कट्ट्यावर बसून
'क्वीन्स नेकलेस' न्याहाळत घेतलेली
प्लास्टिकच्या कपातील कॉफी..

सहा दिवसांच्या घडामोडींचा हिशोब करता करता
बाईक बॅण्डस्टॅण्डला येते.. पुन्हा तोच दुधवाला..
अर्धा लिटर दुधाची पिशवी आणि मित्रांसोबत शर्यत..
एका घोटात पिशवी संपते.. जशी रात्र संपलेली असते..

मग रविवारचा दिवस जातो सुस्तीत
आणि रात्र मात्र अंगावर येते..
उबदार शालीला पडलेल्या छोट्याश्या भोकातून
येणाऱ्या गार हवेसारखी त्रास देते..
मी पापण्यांना ओढून उशीत तोंड खुपसतो...
चुळबुळ करतो..
काही सुचेनासं होतं.. एफएम लावतो..
"पुरानी जीन्स" मधली रेट्रो मेलोडी मनाला सुखावते..
आशा-किशोर-रफी-आरडी-एसडी
जणू काही केसांतून हलकासा फिरणारा एखादा हात...
मग बाहेरचा ट्राफिकचा आवाज रातकिड्यांसारखा गुंगवतो..
आणि एका अनाहूत क्षणी डोळ्याला डोळा लागतो..
अन काही वेळानेच उजाडतं..

जडावलेले डोळे आणि ओढलेला चेहरा घेऊनच येते
ती सकाळ..
पावलं खेचत चालणारी वाट सुरू होते
अगदी बेडरूमपासून
आणि संपते थेट ऑफिसमध्ये!
मनात परत काउन्ट डाऊन -
६ - ५ - ४ - ३ - २ - १

....रसप....
२० मे २०१२

वांद्रे - मुंबईतील एक उपनगर ("मुंबई उपनगर" जिल्ह्याचं हेडक्वार्टर) 
नरीमन पॉइन्ट - दक्षिण मुंबईचे एक टोक 
ओबेरॉय - सुप्रसिद्ध ओबेरॉय हॉटेल
क्वीन्स नेकलेस - ओबेरॉय समोरील समुद्राच्या भोवती असलेला रस्ता (मरीन ड्राइव्ह) रात्री ह्या अर्धगोलाकार रस्त्यावरील दिव्यांमुळे हा एखादा हिरेजडीत कंठहार भासतो.
बॅण्डस्टॅण्ड - बान्द्र्याचा समुद्रकिनारा

Thursday, May 17, 2012

पुन्हा भरारी भरण्यासाठी..


हातावरची रेघ सांगते खडतर जीवन मी जगलो
कितीक आले वादळवारे भिडून त्यांना मी उरलो
मला कधी ना जाणवले की क्षणाक्षणाला मी लढलो
मला लाभले जे जे येथे ते ते वेचुन मी रमलो

आस कधी ना प्रारब्धाच्या औदार्याची बाळगली
तमातुनी मी मुक्तीसाठी मनात ज्योती जागवली
यशस्वितेची वाटचाल ही मर्जीने मी थांबवली
खऱ्याखुऱ्या आनंदासाठी नवी दिशा मी चेतवली

दक्षिणेकडे प्रवास माझा मी संध्येचा वाटसरू
नकोस माझी संगत मागू अपुली-अपुली वाट धरू
अज्ञाताची ओढ मला मी कशास संचय वृथा करू
त्यागुन संचित भणंग झालो नको मला तू बद्ध करू

विषण्णतेच्या विशाल क्षितिजावरती माझी नजर थिजे
अंथरून झिजलेली चादर उदास माझी रात निजे
गडगडणारे अंबर मजला सदा वाटले जरा खुजे
पुन्हा भरारी भरण्यासाठी मनात आशाबीज रुजे..

....रसप....
१७ मे २०१२

Wednesday, May 16, 2012

"कसली सुंदर कविता"!


संध्याकाळच्या झाकोळल्या आकाशाचा तांबुसपणा
मनाला व्यापून उरतो
आणि काळाच्या अथांग डोहात
मी प्रकाशाचा एक किरण शोधत भरकटत जातो..

हरवलेलं अस्तित्त्व शोधण्याची केविलवाणी धडपड
सोसेनाशी होऊन येते एक ग्लानी
मी शरण जातो खवळायचं विसरून गेलेल्या
माझ्यातल्याच सुप्त ज्वालामुखीला

मग बोचऱ्या आठवणींच्या ओरखड्यांतून
वास्तवाच्या झळयांनी रापलेल्या हृदयातून
फुटकी स्वप्नं रुतलेल्या डोळ्यांतून
एक थेंब वेदना वाहते
आणि कागदभर पसरते
कधी कागदाबाहेरही ओघळते

कधी विस्तव.. कधी राख
कधी होरपळणारा सविता
आणि तुम्ही वाचून म्हणता -
"कसली सुंदर कविता"!

....रसप....
१६ मे २०१२

Tuesday, May 15, 2012

मृत्युला चकवून काही क्षण जगावे..


मृत्युला चकवून काही क्षण जगावे
बस तुझ्या हातून थोडे विष मिळावे

ना मला कळले कधी माझे इरादे
मग तुला हे प्रेमही कैसे कळावे ?

रोजचा वळवून रस्ता ये कधी तू
मीच का खाऊन खस्ता रोज यावे ?

गाळली गुलमोहराने सर्व पाने
त्यागुनी सारी सुखे मी मोहरावे

"पाहतो सारेच तो" म्हणतात सारे
"जाणतो सारे" असे केव्हा दिसावे ?

चुरडली कित्येक हृदये पावलांनी
चेहऱ्यावर भाव का भोळे असावे ?

व्याकरण भाषेहुनी ना भिन्न तरिही
भावना मांडायला बेशिस्त व्हावे !

सोड ना 'जीतू' जरा ही बेफिकीरी
मरण आल्यावर तरी डोळे मिटावे !

....रसप....
१५ मे २०१२

Monday, May 14, 2012

गझल कशाला हवी?


तिच्या रुपाची खुबी सांगण्या गझल कशाला हवी?
मनातले हे गुपित बोलण्या गझल कशाला हवी ?

तिचे मोकळे केस पाहुनी गंधुन जाते निशा
चंद्रकोर भाळावर दिसण्या गझल कशाला हवी?

गालांवरती रंग गुलाबी दोन पाकळ्या जणू
गुलाबगाली खळी दावण्या गझल कशाला हवी?

रक्तवर्ण ओठांना मुडपुन हळूच लाजुन हसे
खुळ्याप्रमाणे शुद्ध हरपण्या गझल कशाला हवी?

वृत्तबद्ध चालीत जणू ती कवितेच्या चालते
छुनछुन पैंजणनाद ऐकण्या गझल कशाला हवी ?

मधुर तिचे बोलणे ऐकुनी सप्तसूर थांबती
तिच्या मैफलीमधे रंगण्या गझल कशाला हवी ?

शब्दांची लेणी गवसावी तिच्याच श्वासांतुनी
मला स्वत:ला आणिक जगण्या गझल कशाला हवी ?

....रसप....
१४ मे २०१२

Saturday, May 12, 2012

"बी ग्रेसफुल"


'माझ्या पाठीच्या
कण्यातील कुंडलीत,
आपल्या चरणगतीचा मोक्ष
तपासून पाहणाऱ्या
शहमृगास;
आणि मेंदूतील चंद्रामृताच्या
तळ्यात,
आपल्या सुगंधतृष्णेची
जोखीम सांभाळणाऱ्या
कास्तुरीमृगास (ही)
ओल्या वेळूची बासरी
अर्पण '

अशा विलक्षण शब्दलालित्याने सजलेली आणि अपूर्व भावबंध गुंफणारी आपली ७ ललित साहित्याची आणि ५ कवितासंग्रहांची अभूतपूर्व संपदा रसिकांना अर्पण करत
‘लख्ख निरंजन माझी वाणी
अलख निरंजन माझी कविता’
असं आपल्या कवितेचं आणि वाणीचं वर्णन करणारा 'घनांनी वाकलेला' आणि 'फुलांनी झाकलेला' संध्यामग्न पुरुष आपल्या काव्याचा आणि साहित्याचा समृद्ध ठेवा आपल्या झोळीत घालून
'डोंगरी दिसे कल्लोळ
अलीकडले सर्व निवांत
निजतात कसे हे लोक
सरणाच्या खाली शांत?'
असं विचारून स्वत: त्याच मार्गाने चंद्रमाधवीचे प्रदेश काबीज करण्यासाठी अनंताच्या प्रवासाला निघून गेला. १० मे रोजी या सांध्यपर्वाच्या यात्रिकाचा, म्हणजेच दु:खाचे महाकवी म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या ग्रेस यांचा जन्मदिवस.
त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजळणारी आपली ही छोटीशी भावपूर्ण श्रद्धांजली.



"मराठी कविता समुह", ग्रेस यांच्या स्मृतीस वाहिलेला  "बी ग्रेसफुल" हा अंक  आपणासमोर सादर करत आहे. हा अंक मेलमध्ये मिळविण्यासाठी mkebooks@marathi-kavita.com या पत्त्यावर मेल करा.

आत्ताच्या आत्ता हा अंक डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी लावा:
http://www.marathi-kavita.com/sites/default/files/ebookpdfs/Kawita-Wishwa-Be-Gressful-10-5-2012.pdf

हा अंक कसा वाटला हे आम्हाला mkebooks@marathi-kavita.com या पत्त्यावर नक्की सांगा. किंवा तुम्ही mkmoderators@gmail.com  या पत्त्यावरही अभिप्राय पाठवू शकता. हा अंक आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. शेयर करा, लाईक करा."


संचालक मंडळ
मराठी कविता समूह

Friday, May 11, 2012

पुन्हा..


मना पसारा तुझ्यातला आवरू पुन्हा
तिच्या स्मृतींचे नवे सोहळे करू पुन्हा

कुणास आहे उगाच इच्छा जगायची
दिवा विझावा तसे मुक्याने सरू पुन्हा

उसंत नाही मला जराही टिपायला
नकोस डोळ्यामधून दु:खा झरू पुन्हा

तुझ्या मनाला विचार आधी तुझेच तू
जुन्या गुन्ह्यांची शिळीच चर्चा करू पुन्हा ?

निमूट साऱ्या जबाबदाऱ्या निभावल्या
मला कुणी ना म्हणे "तुला सावरू पुन्हा !"

मिळे न माया कुठेच जेव्हा खरीखुरी
फिरून येते घराकडे लेकरू पुन्हा

....रसप....
१० मे २०१२

Thursday, May 10, 2012

एक होता कवी गचाळ !


एक होता कवी गचाळ
कविता त्याची नुसतीच वाचाळ
ओळीओळीतून करत असे
हीन पातळीची शिवीगाळ

ह्याची कविता कधीच हसली नाही
ह्याची कविता कधीच नाचली नाही
कधी निसर्गचक्रात रमली नाही
कधी कुणाच्या प्रेमात पडली नाही

समांतरपणाच्या नावाखाली
त्याने आखली एकच रेष
आपल्याभोवती गोल गोल
आणि बनवलं एक स्वत:पुरतं परीघ
ना कुठला कोन..
ना सुरुवात..
ना अंत..
ना तोंड..
ना शेपूट..

त्याच परीघात राहिला जन्मभर
लिहित राहिला पान-पानभर

आज तो संपला..
लोक म्हणाले -
"एक तरी कविता सरणावर ठेवू त्याच्यासमवेत"
पण कविता मिळालीच नाही
सगळ्या कधीच विरल्या होत्या बदललेल्या हवेत..!!


....रसप....
९ मे २०१२

Wednesday, May 09, 2012

माझी 'प्रायोरिटी' - माझी जन्मठेप..!


तुझं म्हणणं बरोबर आहे..
तू माझी 'प्रायोरिटी' नाहीस
माझंच चुकतं,
मी बोलून दाखवत नाही
झोपलेल्या तुला तासन तास न्याहाळतो
पण जागेपणी बघत नाही
तुझ्यासाठी लिहितो ,
पण तुझं नाव लिहित नाही
तुझ्यासाठी गातो
पण बोलून दाखवत नाही

तुझं म्हणणं बरोबर आहे..
तू माझी 'प्रायोरिटी' नाहीस
मी तुला जवळ घेऊ शकतो
तुझ्या श्वासांत हरवू शकतो
पण तुला 'माझी' म्हणू शकत नाही
कारण पायात प्रपंचाच्या बेड्या आहेत
आणि डोक्यावर संस्कारांचं ओझं
मी दबलोय..
मी जखडलोय..
पण ह्या दबलेल्या.. जखडलेल्या
माझ्यातच कैद असलेल्या मला
तूच एक मुक्तीचं स्वप्न आहेस..
हो.. तू स्वप्नच आहेस..
माझ्या काळ्या रात्रायुष्याला पडलेलं
साखरझोपेतील पहाटस्वप्न
जे मी रोज बघतो...
ज्यात मी रोज रमतो
पण शेवटी जागा होतो
पायातल्या बेड्या आणि डोक्यावरचं ओझं सांभाळत
खुरडत खुरडत चालायला..

तुझं म्हणणं बरोबर आहे..
तू माझी 'प्रायोरिटी' नाहीस
माझी 'प्रायोरिटी' माझी ही कैदच आहे..
माझी जन्मठेप..
माझी जन्मठेप..!

....रसप....
९ मे २०१२

Tuesday, May 08, 2012

कविता... कविता... कविता...


कविता... कविता... कविता...
अहो असतं तरी काय?
कुणी म्हणालं, "दुधावरची साय!"
पण कोणत्या दुधावरची ?
फ्रीजमध्ये गोठलेल्या
की तापवून निवलेल्या?
कोणती साय?
हळुवार फुंकरीने सरकणारी?
की बोट घालून दुमडायला लागणारी?
फुग्यासारखी फुलणारी?
की थप्पीसारखी जमणारी?

अहो.. सायीसारखी साय!
विरजण लागलं पाहिजे
खोटं खोटंच लिहा की
यमक जुळलं पाहिजे !

मग मीही बसलो ठरवून
की काढायचंच काही तरी लिहून
यमक-बिमक जुळवून
इथून-तिथून उचलून...

कुसुमाग्रजांच्या कवितेतेतून घेतली 'अनंत आशा'
केशवसुतांची चोरली जराशी वजनदार भाषा
उगाच लिहिलं काही-बाही, जे कुणालाच कळलं नाही
वरून म्हटलं - "का बरं? ग्रेसांनी लिहिलं नाही?"
'र' ला 'र' आणि 'ट' ला 'ट' जोडला
आणि पाडगांवकरी सहजतेचा आव आणला
गोंडस "खळखळ-झुळझुळ" लिहिलं
आणि बालकवींचा साज मानला
वृत्तांच्या साच्यातून काढल्या दोन-दोन ओळी
आणि माधवरावांच्या पायी वाहिल्या
रदीफांच्या शेपट्या जोडून नाचवले काफिये
आणि भटांच्या गोडव्या गायल्या !

खंडीभर लिहिलं.. लिहीतच राहिलो
कवितांचा रतीब घालतच राहिलो
वाह-वाह करणारे भाट बरेच भेटले
पोकळ स्तुतीने हुरळतच राहिलो

आणि एक दिवस आलं काही तरी उफाळून..
कुठून तरी.. आतून...
पराकोटीची चलबिचल झाली
काही ठोके चुकले
मनातल्या मनात थोड्या वेळासाठी
डोळे मिटून घेतले
ती पहिली कविता आली
काळजावरचा ओरखडा बनून
यमक स्वत:च जुळले होते..
शब्द वृत्तात खेळले होते
तिचा साज होता वेगळाच..
अन रुबाब होता आगळाच..

एक तो दिवस आहे आणि एक आजचा..
दुधावरती साय आपसूकच जमते
माझ्या हातून कविता स्वत:लाच लिहिते..
माझ्या हातून कविता स्वत:लाच लिहिते....!

....रसप....
८ मे २०१२

Monday, May 07, 2012

सुखाच्या मल्मली वेषात... (उधारीचं हसू आणून....)


सुखाच्या मल्मली वेषात आली बोचरी दु:खे
उधारीचे हसू आणून झाली साजरी दु:खे

सराईताप्रमाणे मी सुखांना चोरले होते
सुखे सारीच ती खोटी निघाली ही खरी दु:खे

मनाचे मी किती कप्पे करावे अन् किती वेळा?
इथे जागा नसे पाहून झाली बावरी दु:खे

तुझ्या माझ्या शिळ्या ताज्या क्षणांचे सोहळे झाले
मनापासून सजवावी अशी ती लाजरी दु:खे

जरी अंधारल्या वाटा मनाला लाभल्या होत्या
विसाव्याच्या क्षणी बनली घराची ओसरी दु:खे

मला प्रेमाविना काही तुझ्याकडचे नको होते
तुझे समजून नजराणे जपावी मी तरी दु:खे

तुला पाहून 'जीतू' आरसाही बोलला नाही
लपवली काय त्यानेही स्वत:च्या अंतरी दु:खे


...रसप....
३ एप्रिल २०१२

उधारीचं हसू आणून.... (सर्व कविता)

Saturday, May 05, 2012

काकस्पर्श


नशीबाने वारंवार पेकाटात लाथ घातली
तरी लाळघोट्या कुत्र्यासारखं पुन्हा पुन्हा
शेपूट कधी पायात घालून
तर कधी हलवत हलवत
त्याच्याच मागे मागे फिरणं..
संपलं एकदाचं ते मरत मरत जगणं !

तसा मी प्रयत्न बऱ्याचदा केला होता
काळाचं लक्ष वेधून घेण्याचा
त्याला जवळ बोलावण्याचा
पण त्यालाही कधी वाटलं नाही
मान वर करून पाहावंसं
मला मुक्त करावंसं..
आणि मी फक्त लाथाच खाल्ल्या...
कधी शेपूट पायात घालून
कधी हलवून... हलवून...

आज मात्र त्याचं कसं कोण जाणे, लक्ष गेलं
(म्हणाला असावा - "अरे! हे कुत्रं अजून कसं नाही मेलं?)
आणि शेवटची लाथ त्यानेच घातली
मला तर आनंदच होता मरण्याचा
सोसच नव्हता मुळी असल्या जगण्याचा

मग उगाचच जमा झाली आप्तेष्टांची टाळकी
प्रथेप्रमाणे "चांगला होता हो!" म्हणायला
आणि कोरडेच डोळे मुद्दामहून पुसायला
कवटी फुटली, तसे सगळे घरी गेले
केव्हाचे उपाशी होते, भरपेट जेवले!

वेळ आली पिंड ठेवायची
कावळ्याला बोलवायची..
पण येईल कसा?
मी तिथे असताना?
बसा ओरडत... "कां...!! कां...!! कां...!! "
मीसुद्धा आयुष्यभर हेच विचारात होतो...
"का? का?.... का?"

हजारो इच्छा माझ्या अपुऱ्या राहिल्या आहेत..
किती जणांना बोलवाल?
माफी मागायला...
वचने द्यायला..
कबुल करायला...
खरं बोलायला.....

जाऊ द्या...
दर्भाचा कावळा करा
अन समाधान करून घ्या स्वत:चं...!
मी बघून घेईन माझ्या मुक्तीचं...........

....रसप....
५ मे २०१२

प्रगल्भ विषयाची प्रगल्भ मांडणी - 'काकस्पर्श' Kaksparsh Review

"मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा....."
ह्या मन:स्थितीत अडकलेल्या व्यक्तीचे आंतरिक द्वंद्व, "धर्म की कर्तव्य की भावना की माणुसकी ?" अश्या विचित्र संभ्रमात सापडलेल्या व्यक्तीची मानसिक घालमेल आणि ह्या सगळ्यात एका निरागस, निष्पाप जीवाची होणारी पराकोटीची कुचंबणा - ह्याचं उत्कृष्ट सादरीकरण म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट 'काकस्पर्श'.

स्वातंत्रपूर्व काळातील कोकण. एका गावातील एक सुखवस्तू कुटुंब - "रानडे". आई-वडील अवेळीच वारल्याने लहान भावाचं पालन पोषण करून, स्वत:चा संसार व प्रपंचही अगदी व्यवस्थित पार पाडत असलेले 'हरीदादा रानडे' हे गावातील एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. लहान भाऊ 'महादेव' वकिलीच्या शिक्षणाकरिता मुंबईस असतो. त्याचं लग्न जवळच्या गावातील 'दुर्गा'शी ठरविले जाते. लग्न दिमाखात पार पडते. 'फलशोधना*'ची पूजा होते. पण महादेव मुंबईहून येतो तोच तापाने फणफणून आणि त्याच रात्री त्याचं निधनही होते. पोरवयातच 'दुर्गा'ला (लग्नानंतरची 'उमा') वैधव्य येते. आणि इथून पुढे सुरू होते एक अनाकलनीय भावनिक द्वंद्व. स्वत:शी, दुसऱ्यांशी..
हरीदादा उमाला माहेरी पाठविण्यास नकार देतात, उमा स्वत:सुद्धा त्यासाठी तयार होते. ते तिचं दुसरं लग्नही करून देत नाहीत व तिला सर्व रूढी परंपरा तोडून 'सोवळी' न करता (मुंडण न करता) घरात इतर कुटुंबसदस्यांप्रमाणेच वागवतात. तिच्याविषयी त्यांच्या व त्यांच्याविषयी तिच्या भावना नक्की काय आहेत? हे कळूनसुद्धा स्वत: त्या दोघांसह कुणालाच काही करता येत नसतं. हा गुंता वाढतच जातो. सामजिक संघर्षालाही तोंड द्यावं लागतं. आपली माणसं तुटतात. पण हरीदादा आपल्या भूमिकेवरून ढळत नाहीत. प्रसंगी ती आडमुठेपणाचीही वाटते. 
चित्रपट उत्तरार्धात येतो तोपर्यंत उमा व हरीदादा ह्यांच्यात "प्लॅटनिक लव्ह" (शारीरिक आकर्षणविरहीत पवित्र प्रेम) आहे, ह्याची खात्री पटते. पण अजून 'काही तरी' आहे, असंही जाणवत राहातं. कारण घरचे सदस्य उघडपणे त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत असतानाही हरीदादा आपल्या विरक्त भूमिकेवर ठाम असतात. ह्याचा परिणाम अखेरीस उमावर व्हायचा तसाच होतो. पोरवयात वैधव्य आलेलं, ज्यावर मनापासून प्रेम आहे तो माणूस जाणून-बुजून वाळीत टाकतोय, शारीरिक सुखाची एक विचित्र ओढ आहे/ औत्सुत्क्य आहे अशी ही उमा "माझे वर्तमान काय आहे आणि भविष्य काय?" ह्या विचारांनी पोखरून जाते. वेडगळही होते. आणि सरतेशेवटी एका वेगळ्या वळणावर येऊन आयुष्याची काटेरी वाट संपते.

कहाणी खूप धीम्या गतीने पुढे सरकतेय असं अनेकदा वाटतं, जे बहुतांशी खरंही आहे; पण कदाचित विषयाच्या गांभीर्यास पाहता जरा धीमी गती आवश्यकही असावी. 

हरीदादांच्या भूमिकेतील सचिन खेडेकर इतका उच्च दर्ज्याचा अभिनय करतो की कौतुक करावं तेव्हढं कमीच! तरूण वयातील 'उमा' साकारताना प्रिया बापट अविस्मरणीय काम करते आणि 'उपाध्याय' च्या नकारात्मक भूमिकेतील वैभव मांगले असा काही अभिनय करतो की त्याचा खरोखरच राग यावा. तसं पाहता सर्वच कलाकारांनी अप्रतिम अदाकारी केली आहे. पोरवयातील दुर्गा/ उमा साकारणारी केतकी माटेगांवकर मात्र खूपच कमी पडते. अनेक ठिकाणी तिचे भाव नीट समजतच नाहीत. ती कुठे पाहातेय तेही समजत नाही. मुंडण करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती होत असताना हरीदादा तिला वाचवतात, तेव्हा ती हसते! ते तर अगदीच पटत नाही.
संगीत फारसं नाही, पण सुमधुर आहे. गीतं फारशी नाहीत, पण अर्थपूर्ण आहेत. 

एक अतिशय प्रगल्भ विषय अतिशय प्रगल्भपणे हाताळल्याबद्दल 'काकस्पर्श' टीमचे कौतुक करायलाच हवं. असा विषय हाताळताना बहुतेकदा अशी चित्रणं केली जातात की सिनेमास "वरिष्ठ" प्रमाणपत्र मिळते. पण प्रगल्भ विषयाची प्रगल्भ मांडणी करतानाही सभ्यतेच्या चौकटीत राहून सिनेमा आवश्यक परिणाम साधतो. काही दृश्यांमध्ये अंगावरही येतो. ह्याला म्हणतात 'मराठी चित्रपट' असंच म्हणावं लागतं, कारण हा विषय हिंदीत आला असता तर नक्कीच 'वरिष्ठ' झाला असता.

एकंदरीत, एकदा तरी पाहावाच असाच हा चित्रपट आहे.
मी (अर्धा गुण धीम्या गतीसाठी कापून) ५ पैकी ३.५ नक्कीच देईन.

=======================================

फलशोधन* = पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न लहान वयात होत असे. मुलगी वयात येईपर्यंत मुलास तिच्याजवळ जाण्यास पाबंदी असे. मुलीला जेव्हा पहिल्यांदा वयात आल्याची जाणीव होई (Menstruation Cycle ची सुरुवात होई) तेव्हा 'फलशोधना'ची यथासांग पूजा केली जात असे व त्यानंतर खऱ्या अर्थाने मुलगा व मुलगी एकत्र येत असत.


Thursday, May 03, 2012

रस्ता खराब आहे..


आता इथून पुढचा रस्ता खराब आहे
जावे जपून पुढचा रस्ता खराब आहे

आतापर्यंत माझा खडतर प्रवास नव्हता
वळणावरून पुढचा रस्ता खराब आहे

मुक्काम दूर आहे, हातात हात दे तू
मित्रा, अजून पुढचा रस्ता खराब आहे

यंदाहि पीक माझे पाण्याविना जळाले
जातो मरून पुढचा रस्ता खराब आहे

लग्नाकडून केली होती किती अपेक्षा
आले कळून पुढचा रस्ता खराब आहे

आयुष्य वेचले मी करण्या सुखी 'उद्या'ला
गेलो थकून पुढचा रस्ता खराब आहे

निवडून आणले ह्या 'कोल्ह्या'स मी खुशीने
म्हणतो हसून, "पुढचा रस्ता खराब आहे!"

....रसप....
३ मे २०१२

Wednesday, May 02, 2012

म्हणूनच ही जिंकण्याची जिद्द आहे..!


'मराठी कविता समूहा'च्या 'लिहा ओळीवरून कविता -भाग ९१' मध्ये माझा सहभाग -

डावीकडे.. उजवीकडे..
मागे.. पुढे.. सगळीकडे
बघावं तिकडे चेहरेच चेहरे..
कुणी गोरा..कुणी काळा..
कुणी ऐटबाज.. कुणी बावळा..
उंच.. बुटका.. बारीक.. जाडा..
पण प्रत्येकाच्या डोक्यात एकच कीडा...!
"कधी येईल?" "कशी येईल?"

आणि मग ती आली..
डोलत डोलत.. हसतमुख
आणि जो-तो उभा सरसावून
पवित्रा घेऊन..

मला प्रत्येक चेहरा हरलेला दिसत होता..
रोजच्या धावपळीत स्वत:ला शोधायच्या लढाईत..
सुख मिळवायच्या लढाईत..
सुरक्षित होण्याच्या लढाईत
स्वत:च स्वत:शी हरलेला..
मी विचारमग्न...
खरंच, हेही एक आश्चर्य आहे..
रोजच्या हरण्याला काही हद्द नाही..
पण लोकलमध्ये शिरण्यासाठी
जिंकण्याची जिद्द आहे!!

मी ती लोकल सोडली..
फलाटावर नवीन गर्दी भरली..
पुन्हा असंख्य चेहरे
बावरलेले.. सावरलेले
डबडबलेले.. थबथबलेले
पण सगळेच हरलेले!

कदाचित हीच एक लढाई असावी
जिथे मध्यमवर्गीय जिंकतो
म्हणूनच असंख्य पराभव पचवून
रोज मनापासून लढतो...!

मोठ्या मोठ्या पराभवांचं शल्य
ह्या फुटकळ विजयामुळे बोचत नसावं..
बोचत असलं तरी थोडा काळ का होईना..
जाणवत नसावं..
म्हणूनच ही लढाई आहे..
म्हणूनच ही जिंकण्याची जिद्द आहे..!
पण खरंच, हेही एक आश्चर्य आहे..!

....रसप....
३० एप्रिल २०१२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...