Thursday, September 29, 2011

माता न तू वैरिणी !! (सुनीत)


माते जन्म दिलास तू परि तुला होती कधी काळजी
माया ना ममता कधी न दिधली सोडून गेलीस जी
लोकांनी मज बोल येथ कसले होते बहू लावले
का नाही वदलीस तू परतुनी की मी न होते तुझी


त्यावेळी मज वाटले नशिब हे आहे अता भोगणे
आशाही नव्हती मला पुसटशी संपून गेले जिणे
अंधारात मला तिरीप दिसली होते कुणी लाभले  
बोटाला पकडूनिया शिकविले त्यांनी मला चालणे  


आता मी परिपूर्ण खास बनले जिंकून साऱ्या व्यथा
देती लोक पहा उदाहरण हे सांगून माझी कथा
सारे श्रेय परी नसेच मम ही त्या सज्जनांची कृपा
ते होते झिजले मला घडविण्या, होतेच मीही वृथा


दावा का करतेस तू फुकटचा 'माझीच कन्या गुणी'
नाही प्रेम मनी तुझ्या फसविशी, माता न तू वैरिणी !!


....रसप....
२९ सप्टेंबर २०११

"मराठी कविता समूहा"च्या "काव्य छंद - भाग ३ (सुनीत)" साठी सुनीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
वृत्त - शार्दूलविक्रीडित

Wednesday, September 28, 2011

बिजली (आयटम साँग)

पार्श्वभूमी -

डि'मेलो गँग चा वाढता उपद्व्याप सुरक्षा यंत्रणेसाठी एक मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. मुंबईचे पोलीस कमिशनर अरविंद मोहिते गृहखात्याला आश्वासन देतात की लौकरात लौकर ह्या गँगच्या मुसक्या बांधण्यात येतील. एसीपी जयराज शिर्के, मोहितेंच्या टीममधील एक तडफदार ऑफिसर. त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाते. एका स्पेशल टास्क फोर्स ची स्थापना होते. ह्या एसटीएफ ला काही विशेष अधिकार, खास शस्त्रास्त्रं दिली जातात. मोहीम कशी राबवायची हे सर्वस्वी जयराज ठरवणार.
जयराज डि'मेलो गँगबाबत खडान् खडा माहिती गोळा करतो.
डि'मेलो, अंमली पदार्थ आणि हत्यारांच्या स्मगलिंग मध्ये मुरलेला एक 'मुरब्बी' डॉन. ह्याचे तीन एक्के आहेत. पुष्कर, अश्विन आणि जेम्स. तसं पाहता डि'मेलो गँगचे सगळे धंदे हेच तिघं सांभाळतात. सर्व निर्णयसुद्धा हेच घेतात. आतली खबर ही असते की हे तिघेही डि'मेलो चा काटा काढायचं ठरवून असतात. "सगळा कारभार आपण सांभाळायचा आणि डि'मेलोने थायलंड मध्ये बसून ऐश करायची? चालायचं नाही." प्लान ठरवला जातो. पुष्कर एका महत्त्वाच्या डीलिंगबाबतच्या चर्चेसाठी थायलंडला जाणार असतो. तिथेच एक खोटं गँगवॉर घडवून डि'मेलोचा काटा काढायचा. दाखवायचं असं की, प्रतिस्पर्धी अक्रम गँगने हे सगळं घडवून आणलं. पुष्कर रवाना होतो.
पण ह्या प्लान मध्ये एक छुपा प्लानही असतो.. डि'मेलो सोबत पुष्करलाही उडवायचा!
आपल्या जबरदस्त 'खबरी नेटवर्क' साठी प्रसिद्ध असलेला जयराज, ही सगळी माहिती मिळवतो आणि एक तिसराच प्लान शिजवतो! ह्या गँगमध्ये अंतर्गत बंडाळी माजवायची.. आपसांत लढवायचं, एकमेकांना मारू द्यायचं आणि उरलेल्यांना आपण टिपायचं! अश्विन आणि जेम्स च्या 'छुप्या प्लान'बाबत पुष्करपर्यंत माहिती पोचवली जाते. डि'मेलो मारला जातो आणि शातीर दिमाग पुष्कर मरायचं ढोंग करतो. जयराज, अश्विन आणि जेम्स सकट साऱ्या जगासाठी पुष्कर मरतो. डि'मेलो गँगची सर्व सूत्रे आता अश्विन आणि जेम्स कडे येतात.
जयराज आणि त्याची टीम एक एक करून डि'मेलो गँगच्या महत्त्वाच्या लोकांना टिपायला सुरू करतात. त्यांच्या काही महत्त्वाच्या सौद्यांनाही मोडून काढतात.
आणि एक दिवस जयराजला समजतं की 'तारांगण' बारमध्ये एक खूप मोठा सौदा होणार आहे, त्यासाठी स्वत: अश्विन व जेम्स येणार आहेत.
बस्स.. धिस इस द डि-डे!


प्रसंग -

साध्या वेषातील पोलीस 'तारांगण' मध्ये फिल्डिंग लावतात. पण ही बातमी खुद्द अशीन-जेम्सनेच पाठवली असते. जेणेकरून अजून एक खोटी चकमक घडवून ह्या 'जयराज शिर्के'चाही काटा काढावा.
अश्विन-जेम्स च्या ह्या प्लान बाबत पुष्करला समजतं आणि तो ठरवतो की एसटीएफ वि. अश्विन-जेम्स गँगच्या ह्या चकमकीत बाजी आपण मारायची!

अश्याप्रकारे, 'तारांगण' मध्ये सगळे जण एकमेकाला 'टिपायला' जमतात.. आणि सुरू होते एका थराराच्या अंताची सुरुवात!!


ह्या ठिकाणी सिनेमात एक आयटम साँग हवं आहे.




आली आली आली आली बिजली आली!!
मी झटका देते, मी फटका देते
हात नको लावु मला, धक्का देते
छन छनना छनक छनक
चाल तुझी ठुमक ठुमक
आज कशी रात अशी 'आयटम' झाली
ए..... बिजली आली, ए..... बिजली आली
आली आली आली आली बिजली आली !!


असा केला शृंगार, डोळ्यामधे अंगार
चमचमते मीच खास, बाकी इथे अंधार
दूर दूर राहूनी एक नजर फेकूनी
उभ्या उभ्या किती किती टाकलेत जाळूनी!
छन छनना छनक छनक
चाल तुझी ठुमक ठुमक
आज कशी रात अशी 'आयटम' झाली
ए..... बिजली आली, ए..... बिजली आली
आली आली आली आली बिजली आली !!


दबा धरुन बसणार, तोच आज फसणार
खेळतो कुणी आणि कोण इथे हरणार
आज रोखठोक सारे होऊ दे
फैसला इथेच आज होऊ दे
अरे नजर फिरवूनी पहा इथे तिथे
तुझा राहिला नसे कुणीच रे इथे
छन छनना छनक छनक
चाल तुझी ठुमक ठुमक
आज कशी रात अशी 'आयटम' झाली
ए..... बिजली आली, ए..... बिजली आली
आली आली आली आली बिजली आली !!



....रसप....
२८ सप्टेंबर २०११

Tuesday, September 27, 2011

तीळ तीळ मरण अन् दैव हताश.....



शरीर जखडलेलं
हात-पाय-मान..
बोटही हलवणे अशक्य
आणि--
मधोमध छातीच्या
काहीतरी रुततंय..
ना टोक ना धार
..बोथटच
पण हळूहळू घुसतंय
क्षणाला कणाच्या जोराने....

ओरडून ओरडून कंठ फाटला
आवाजही निघेना
वेदना अशी… की
मरेना.... मारेना

तुटून फुटून कोसळतंय
बदाबद आकाश
तीळ तीळ मरण
अन्
दैव हताश.....


....रसप....

Monday, September 26, 2011

अशी लाडकी लेक माझी असावी....


कळी मोहरावी तशी ती हसावी      
तिची पापणी अमृताने भिजावी
गुलाबी खळी लाल गाली पडावी
अशी लाडकी लेक माझी असावी



तिचे हट्ट सारे पुरे मी करावे
मला आवडीने तिनेही छळावे
तिचे त्रास देणे, मजा खास यावी
अशी लाडकी लेक माझी असावी


 
तिचा राग नाकावरी रंग घ्यावा
मला पाहुनी तो जरा ओघळावा
व्यथा गोड माझी तिला आकळावी
अशी लाडकी लेक माझी असावी


तिचे बोलणे आरश्याला कळावे!
तिचे लाजणे पाकळीने पहावे
नटावे तिने चांदणी अन् झुकावी
अशी लाडकी लेक माझी असावी


पुढे काळ जाता असा काळ यावा
नको वाटुनीही बनावा दुरावा
शिवाच्या घरी पार्वती ती निघावी
अशी लाडकी लेक माझी असावी


कधी ह्या मनाशी निराशा उरावी
जरा आस थोडी मला ना दिसावी
तिला पाहता अन् उभारी मिळावी
अशी लाडकी लेक माझी असावी









....रसप....
२६ सप्टेंबर २०११
("राष्ट्रीय कन्या दिन - २५ सप्टेंबर" विशेष "मराठी कविता समूहा"चा उपक्रम "लेक लाडकी" साठी) 
सर्व छायाचित्रे - सौ. रश्मी सुळे 

Thursday, September 22, 2011

जो बीत गई सो बात गई.. - भावानुवाद


आशा आणिक स्वप्नांचा हा
जीवनातला प्रियतम तारा
मावळला तर मावळला
प्रसन्नवदनी आकाशाला पहा जरा
कितीक तारे निखळुन गेले
आवडतेही निघून गेले
सांग निखळल्या ताऱ्यासाठी
शोक कधी आकाश करे का?
झाले-गेले विसरुन जावे!


मधूर संतोषाचा प्याला
तना-मनाला रिझवुन गेला
जरी तडकला, तडकू द्यावा
मधुशालेच्या अंगणास तू पहा जरा
कितीक प्याले डगमग करती
धडपडती अन् धुळीस मिळती
पडल्यावरती कधी न उठती
तुटल्या-फुटल्या प्याल्यांसाठी
मधुशाला ना कुंथत बसते
झाले गेले विसरुन जावे


नाजुक मातीचे हे बनती
मधुघट सारे हटकुन फुटती
अल्पायुष्यच घेऊन येती
सारे प्याले तुटती फुटती
असे असूनीही मधुशालेमधे पहा
मधुघट असती, मधुप्यालेही
मादकतेने रंगलेलेही
मधुरस लुटुनी दंगलेलेही


जीव जडवितो घट प्याल्यांवर
रसप असा तो कच्चा असतो
खऱ्या रसाने जो जळतो तो
कधी न रडता, प्रसन्न दिसतो
झाले गेले विसरुन जावे!





मूळ कविता - जीवन में इक सितारा था...
मूळ कवी - हरिवंशराय बच्चन
भावानुवाद - ....रसप....
२२ सप्टेंबर २०११



मूळ कविता -


जीवन में एक सितारा था
माना वह बेहद प्यारा था
वह डूब गया तो डूब गया
अम्बर के आनन को देखो
कितने इसके तारे टूटे
कितने इसके प्यारे छूटे
जो छूट गए फिर कहाँ मिले
पर बोलो टूटे तारों पर
कब अम्बर शोक मनाता है
जो बीत गई सो बात गई

जीवन में मधु का प्याला था
तुमने तन मन दे डाला था
वह टूट गया तो टूट गया
मदिरालय का आँगन देखो
कितने प्याले हिल जाते हैं
गिर मिट्टी में मिल जाते हैं
जो गिरते हैं कब उठतें हैं
पर बोलो टूटे प्यालों पर
कब मदिरालय पछताता है
जो बीत गई सो बात गई

मृदु मिटटी के हैं बने हुए
मधु घट फूटा ही करते हैं
लघु जीवन लेकर आए हैं
प्याले टूटा ही करते हैं
फिर भी मदिरालय के अन्दर
मधु के घट हैं मधु प्याले हैं
जो मादकता के मारे हैं
वे मधु लूटा ही करते हैं

जिसकी ममता घट प्यालों पर
वह कच्चा पीने वाला है
जो सच्चे मधु से जला हुआ
कब रोता है चिल्लाता है
जो बीत गई सो बात गई।।

- हरिवंशराय बच्चन

Monday, September 19, 2011

तू एक गझल !



पाकळ्यांसमान ओठ मुडपणे गझल
पापण्यांत सागरास हसवणे गझल


शेर गुंफले हजारही कुणी इथे
शब्द तो तुझा निवांत बहरणे गझल


भिन्न वृत्तं चालती लयीत डोलुनी
तू सुगंध सहजताच उधळणे गझल


ल्यायली सुरूप साज धुंद पश्चिमा
तू क्षितीज लोचनांत सजवणे गझल


काफिये, रदीफ अन् अलामती जुन्या
आज तू नवी जमीन बनवणे गझल


लक्ष तारकांस माळुनी निशा खुले
चंद्रकोर तू कुशीत फुलवणे गझल



....रसप....
१९ सप्टेंबर २०११

Friday, September 16, 2011

पुन्हा पुन्हा वाटतं.. (पहिलं प्रेम - चौथीमधलं - ३)


पुन्हा पुन्हा वाटतं,
घड्याळाचे काटे उलटे फिरावे.. 
रात्रीआधीचे दिवस पुन्हा उजाडावे..
कॅलेंडरच्या पानांनी मागे उडावे..
आणि चौथीतल्या प्रेमाला परत जगावे..!

ह्या वेळी मी पेपर जरा तरी चांगले लिहीन
तुझ्या बाजूचा, पुढचा बाक मिळवीन
ह्या वेळी मी थोडा तरी धीट बनीन
तुझ्यासमोर येऊन माझं नाव तरी सांगीन

माझ्या वाढदिवसाचं चॉकलेट तुला नक्की देईन
आणि तू फेकलेला रॅपर खिश्यात जपून ठेवीन
तुझा खाली पडलेला रुमाल, तुला परत मिळणार नाही
माझ्याशिवाय कुणाचीच त्यावर नजर पडणार नाही

एका तरी पावसाळी दिवशी तू तुझी छत्री विसरशील
मलासुद्धा तुझ्यासोबत उगाच भिजताना बघशील

वर्षभरात माझ्याकडे बघून एकदा तरी हसशीलच
कधी पेन, कधी रबर, कधी पेन्सिल तरी मागशीलच!
तेव्हढ्यातच मला अगदी धन्यता वाटेल
पुन्हा पुन्हा मनामध्ये काही तरी दाटेल..
कुणास ठाऊक मला नक्की काय बोलायचं असेल?
"तुलासुद्धा मी आवडतो ना?" असंच काहीसं असेल..

पण असं काही होणार नाही, माहित आहे
काळ उलटा फिरणार नाही, माहित आहे

म्हणूनच,
पुन्हा पुन्हा वाटतं की तुझी भेट व्हावी,
बघताक्षणी तुझ्यासाठी एक कविता सुचावी..
भिरभिरत्या नजरेतून तूच तिला टिपावी..
आणि माझ्या पहिल्या प्रेमाची कहाणी,
तुझी तुलाच कळावी.. तुझी तुलाच कळावी...



....रसप....
१५ सप्टेंबर २०११

पहिलं प्रेम - चौथीमधलं - १
 

Thursday, September 15, 2011

उरलो, रिताच उरलो..

उरलो, रिताच उरलो
उगाच झिजलो
झिजून उरलो.. उरलो

इथे कुणाचे नसे कुणाला
कवडीचेही मोल
हसरा चेहरा समोर दिसतो
डाव शिजवती खोल
फसलो, पुराच फसलो
रस्ता चुकलो
चुकून उरलो.. उरलो
रिताच उरलो
उगाच झिजलो
झिजून उरलो.. उरलो

डोक्यावरती फुटके अंबर
पायी डळमळ धरती
दिशाहीनतेला वा~याच्या
सोसाट्याची भरती
विरलो, हवेत विरलो
स्वत:स भुललो
भुलून उरलो.. उरलो
रिताच उरलो
उगाच झिजलो
झिजून उरलो.. उरलो

पाठीवरचे घाव मोजता
त्वेष उरी संचारे
कुणाकुणाला सोडून द्यावे
माफ करावे सारे?
लढलो, मनात लढलो
क्षणात हरलो
हरून उरलो.. उरलो
रिताच उरलो
उगाच झिजलो
झिजून उरलो.. उरलो

....रसप....

१४ ऑक्टोबर २००९

Wednesday, September 14, 2011

'मजला महाग पडले'

अविनाश काकांच्या 'मजला महाग पडले' वरून स्फुरले....
रदीफ सुचविल्याबद्दल धन्यवाद, अविनाश काका..!!



नयनी तुझ्या हरवणे, मजला महाग पडले
नखरे बघून झुरणे, मजला महाग पडले


हृदयास पार करती तिरक्या मदीर नजरा
जखमा उरात जपणे, मजला महाग पडले


कळले कधीच नव्हते, हसणे तुझे सुरमयी
जळलो तरी न शमणे, मजला महाग पडले


हळवी कळी उमलते, भ्रमरास मुग्ध करण्या
समजूनही बहकणे, मजला महाग पडले


पचवून दु:ख हसलो, बदनाम मीच ठरलो
हकनाक जीव जडणे, मजला महाग पडले


....रसप....
१३ सप्टेंबर २०११

Monday, September 12, 2011

राहिल्या खुणा आता..


राहिल्या खुणा आता, गाजले समर होते
या इथे कधीकाळी देखणे शहर होते


मी कसे कुणा सांगू खास का जखम आहे?
घाव खोल देणारे सोवळे अधर होते!


देव मानले होते ती प्रिया बदलली का?
अंतरी तिच्यासाठी साजिरे मखर होते


बाग का फुलावा हा ती न ये फिरकण्याही..
येउनी किती गेले कोरडे बहर होते


वाटते जगी नाही 'देव' नामक कुणीही
की तुझ्याच मर्जीने जाहले कहर होते?


पाहिले 'जितू' येथे वासनांध नजरांना
लाज झाकण्यासाठी तोकडे पदर होते



....रसप....
१२ सप्टेंबर २०११

Saturday, September 10, 2011

ज्याचं त्यानं ठरवायचं....

रोज लौकर भल्या पहाटे
गजर लावून उठायचं
आपलं आपण आवरून
आपल्या मार्गाला लागायचं

दिवसभर घाम-रक्त
एकत्रच आटवायचं
कीडा-मुंगी सारखं बनून
फरफटत रांगायचं

दिवस संपला म्हणून
शेवटी नाईलाजाने परतायचं
आठ बाय दहाच्या त्या
खुराड्यात शिरायचं

चार आकडी पगारात
अर्धपोट जेवायचं
बाकी अर्ध्या पोटाऐवजी
मुलांकडे पाहायचं

"काही शिल्लक राहणार का?"
कुढत नाही बसायचं
शरीराच्या वळकटीला
कोप-याकडे लोटायचं

जगून जगून मरायचं की
मरून मरून जगायचं..
ज्याचं त्यानं सोसायचं..
ज्याचं त्यानं ठरवायचं....


....रसप....

Friday, September 09, 2011

तुझी भेट व्हावी..

तुझी भेट व्हावी म्हणूनी जरासा
पुन्हा त्या किनाऱ्याकडे चाललो
जिथे पावलांची दिसे रोज नक्षी
पुन्हा त्याच वाटेत रेंगाळलो


तुझी भेट व्हावी क्षणाएव्हढीही
पुरे ती मला, जन्म सोसेन मी
तुझे रूप डोळ्यामध्ये साठवूनी
तुझा शब्द हृदयात कोरेन मी


तुझी भेट व्हावी कधी चांदराती
दिसावे मला चंद्र दोन्ही जुळे
मला एक वेडी नशा होत जावी
तुझ्या चांदण्याच्या सुवासामुळे


तुझी भेट व्हावी अशी चिंब ओली
मिळावी जरा ऊब श्वासांतुनी
मुकी आसवे वाहुनी तृप्त व्हावे
कळे ना कुणा धार डोळ्यांतुनी


तुझी भेट व्हावी सुटे बंध होता
मिटावी न माझी दुखी पापणी
तुला आकळावी नसे बोललो जी
मनाची कहाणी सुन्या जीवनी


....रसप....
८ सप्टेंबर २०११

Thursday, September 08, 2011

आता नको


खाक होऊनी नव्याने भडकणे आता नको
जीव घे प्रेमा मनाला खुणवणे आता नको


मी नको झालो जगाला, बोलले नाही कुणी
सांत्वनाच्या सोहळ्यांचे भरवणे आता नको


जोडले होते कुणाला? तोडण्याचे दु:ख का?
ओढलेल्या चेहऱ्याला चढवणे आता नको


ती फिरूनी ना इथे आली कधी गेल्यावरी
रातराणी मोगऱ्याचे बहरणे आता नको


द्या सुखांनो सोडुनी थोडे मलाही एकटे
हुंदके दाबून खोटे हसवणे आता नको


सांडलेली अक्षरे वेचून घ्यावे वाटते
व्यर्थ ताज्या पाकळ्यांचे उधळणे आता नको


जीवनाशी सख्य होते ना तुझे जीतू कधी
'ऐकुनी घ्यावे मनाचे' समजणे आता नको



....रसप....
८ सप्टेंबर २०११

Monday, September 05, 2011

ती हसते तेव्हा..

"ती रुसते तेव्हा.." आणि "ती रुसली तेव्हा.." ला माझ्या आंतरजालीय मित्रांनी खूप छान प्रतिसाद दिला. म्हणूनच अजून थोडं लिहावंसं वाटलं -


ती हसते तेव्हा मोत्यांची सर हळूच तुटली वाटे
चांदण्यात भिजला चिंब चिंब तो चकोर नयनी दाटे


ती हसते तेव्हा हृदयाच्या ठोक्यांची गडबड होते
क्षण एक थांबुनी तिला बघाया गुलबकावली खुलते


ती हसते तेव्हा मनात "येथे स्वर्ग असावा" येते
ही हवा सुगंधी मल्मल होते मला मिठीशी घेते


ती हसते तेव्हा डोळ्यांमधला सागर खळखळ करतो
मी पुन्हा एकदा खुळ्यासारखा तळास शोधत बसतो


ती हसते तेव्हा गंधर्वांचे गान थांबते थोडे
तो सूर आठवा इथे राहतो सुटते त्यांना कोडे


ती हसते तेव्हा मरगळ सरते दूर उदासी उडते
ना दु:ख राहते, चैतन्याने अंतरंग मोहरते



...रसप....
५ सप्टेंबर २०११

Sunday, September 04, 2011

शेवटी संपायला आलीच ही एकांकिका

राहुनी गेली जगायाचीच माझी भूमिका
शेवटी संपायला आलीच ही एकांकिका


मोजक्या श्वासांत मोजावे किती कोणी कसे?
राहिली कोरीच पाटी अन् गुणांची तालिका 


बोलक्या डोळ्यांत होती मूक वेडी आसवे
चंद्र तो ओथंबलेला साचलेल्या चंद्रिका


व्यक्त झालो मी तरी अव्यक्त काही वाटते
घ्या लिहा पुढचे तुम्ही अन् भावना माझ्या विका !


हार मी मानीन ऐसा काळही बनलाच ना
क्रुद्ध होऊनी फुलविता व्यर्थ का हो नासिका?


ठेच तुजला लागता जे हासले होते 'जितू'
पाहुनी शिकले तुला ते बोलती मजला "शिका"!



....रसप....
४ सप्टेंबर २०११ 

Saturday, September 03, 2011

जीवनाचा आब राखावा कसा?



जीवनाचा आब राखावा कसा?
मोडलेला साज छेडावा कसा?


भोग सारे साहिले हासून मी
पापण्यांना आज ओलावा कसा?


मी सुखाची मागणी केली कधी?
वेदनांचा भार सोसावा कसा?


लाभले जे वाटले सारे इथे
एकट्याने हुंदका द्यावा कसा?


"हे न माझे, ते न माझे" मानले
अश्रुही माझा न मानावा कसा?


बोचलेले सर्व काटे वेचले
पार गेला तीर शोधावा कसा?


बोलुनीही ना कळे त्याला तरी?
सांग आता देव जाणावा कसा?


कर्ज श्वासांचे इथे झाले 'जितू'
एकही तू श्वास फेडावा कसा?


....रसप....
३ सप्टेंबर २०११
प्रेरणा - "या जिण्याचा आब राखाया हवा.." (स्वामीजी)" 

Friday, September 02, 2011

ती रुसली तेव्हा..!


ती रुसली तेव्हा प्राजक्ताला गंध येइना झाला
आकाश ओढुनी गाढ झोपला चंद्र दिसेना झाला


ती रुसली तेव्हा आकाशी तो व्याकुळ घन गलबलला
अलगद येऊनी कानाशी तो "थांबव रे" कुजबुजला


ती रुसली तेव्हा गाण्यामधला सूरच हरवुन गेला
अन जाता जाता क्षितिजलोचनी काजळ देउन गेला


ती रुसली तेव्हा घरच्या पाउलवाटा त्या अडखळल्या
मी पुन्हा पुन्हा त्या चालत गेलो, पुन्हा पुन्हा त्या फिरल्या


ती रुसली तेव्हा ती न राहिली, होती केवळ छाया
तो दिवस उदासी मनी ठेवुनी असाच गेला वाया 



....रसप....
३१ ऑगस्ट २०११

"ती नसते तेव्हा..
"ती रुसते तेव्हा.." 
"ती हसते तेव्हा"

Thursday, September 01, 2011

ती रुसते तेव्हा..



ती रुसते तेव्हा अजून थोडे गाल गुलाबी होती
अन् अधरपाकळ्या किंचित मुडपुन लाल मोगरा होती!


ती रुसते तेव्हा सुगंध वारा शांत शांतसा होतो
तो रेंगाळुन मग इथे तिथे का बावरलेला होतो ?


ती रुसते तेव्हा मधुघट डोळ्यामधले झरझर भरती
मी "नको नको" म्हणतानाही ते थेंब थेंब पाझरती


ती रुसते तेव्हा नाकावरती चढते रक्तिम लाली
मग एक मोकळी मुजोर बट ती भिरभिर करते भाली


ती रुसते तेव्हा फक्त बोलतो सागर खळखळणारा
त्या लाटांवरती शब्द मनाचा झुरतो कळवळणारा


ती रुसते तेव्हा उठे वेदना कुठे तेच ना कळते
मी उदासडोही विरघळतो अन् बोच अनामिक छळते



....रसप....
३० ऑगस्ट २०११

"ती नसते तेव्हा..
"ती रुसली तेव्हा.." 
"ती हसते तेव्हा"
Related Posts Plugin for WordPress, Blogger...