Sunday, August 28, 2016

एक निखळ मनोरंजन - 'हॅपी भाग जायेगी' (Movie Review - Happy Bhag Jayegi)

आशयसंपन्नता किंवा आशयचमत्कृतीच्या अट्टाहासापायी शायरी स्वत:ची लय हरवत चालली आहे. अर्थपूर्ण शब्द अनेकदा लिहिले जातातही, मात्र त्यांना आवर्तनाच्या गणितात स्वरबद्ध करत असताना त्यांची कुतरओढ होते. खरं तर 'आधी शब्द आणि नंतर चाल' ही पद्धती कधीच मोडीत निघाली आहे. कदाचित त्यामुळेही चालीनुसार शब्द गुंफत जाताना खूप काही सॅक्रीफाईस करावं लागत असावं. चालीसुद्धा आजकाल 'इसीजी' सारख्या वर-खाली होत असतात. त्यांचा हा धसमुसळा स्वभावही बऱ्याचदा शब्दांच्या नाजूक प्रकृतीला झेपणारा नसतो.
कारण काहीही असो पण -

होश बातों का अक्सर नहीं था
दिल हमारा तो शायर नहीं था
तूने लिख दी यह तक़दीर वरना
इश्क़वाला मुक़द्दर नहीं था

- असे घट्ट बांधलेले शब्द आजकाल सिनेसंगीतात सहसा ऐकायला मिळत नाहीत. 'हॅपी भाग जायेगी' खूप हसवतो. पण सोबतच -

ज़रासी दोस्ती कर ले
ज़रासा हमनशीं बन जा
ज़रासा साथ दे बस फिर
चाहे अजनबी बन जा

- असे मनात रेंगाळणारे काही शब्दही सप्रेम भेट देऊन जातो.

चित्रपटाची कहाणी पंजाब आणि पाकिस्तान ह्या भागांतली असल्यामुळे संगीतावर पंजाबी व सूफी संगीताची छाप आहे. ऐकणेबल (अजूनही मी 'सुश्राव्य' असा शुद्ध, शास्त्रीय शब्द वापरणार नाहीच !) संगीताची माझ्या तरी कानांना सवय राहिलेली नाही. ही सगळी गाणी तुकड्या-तुकड्यांत आहेत. फार क्वचित असं वाटतं की गाणी पूर्ण हवी होती !

ह्यासाठी अगदी सुरुवातीलाच गीतकार 'मुदस्सर अज़ीज़' (बहुतेक) आणि संगीतकार सोहेल सेन ह्यांना मनापासून दाद !

'मुदस्सर अज़ीज़'नी फक्त गीतलेखनच नव्हे तर कथा व पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अश्या तीन आघाड्या सांभाळल्या आहेत. लेखन, दिग्दर्शन एकाच व्यक्तीचं असल्यामुळे एक प्रकारचा 'एकजिन्नस'पणा 'हॅपी भाग जायेगी' मध्ये जाणवतो.

'हॅपी भाग जायेगी' एक वेगळा सिनेमा आहे. कारण 'कॉमेडी म्हणजे वाह्यातपणा' असं एक समीकरण सध्या बनलं आहे. किंबहुना तसं जर नसलं, तर लोकांना पुरेसं हसूही येत नाही. त्यामुळे 'यथा डिमांड, तथा सप्लाय' होत राहतो. 'हॅपी..' मात्र हे समीकरण बाजूला ठेवतो. आहेत, काही कमजोर जागाही आहेत. पण हे वेगळेपण त्यापेक्षा महत्वाचं ठरतं.

सिनेमातल्या एका व्यक्तिरेखेच्या नावावरुन सिनेमाचं शीर्षक असलं की संपूर्ण सिनेमा हा त्या व्यक्तिरेखेभोवतीच फिरत राहणं आणि तीच व्यक्तिरेखा प्रमुख ठरणं हे स्वाभाविक आहे. 'हॅपी'च्या भूमिकेत असलेली 'डायना पेंटी' मला 'कॉकटेल' मध्येही 'सो-सो'च वाटली होती. ती भूमिका खरं तर खूप वाव असलेलीही होती, पण - कदाचित पहिलाच सिनेमा असल्यामुळे असेल - तिने काही कमाल वगैरे केलेली नव्हती. लक्षात राहावा, असं ते काम नव्हतंच. ती मुख्य भूमिकेत असणं, हे जरा पचायला जड जाणारं होतं. अभय देओल आणि जिमी शेरगिलसाठी पाहावासाही वाटत होता आणि इतकी सगळी 'डायना पेंटी' शान होईल असंही वाटत नव्हतं.
२-३ लोकांनी शिफारस केल्यावरच मी 'हॅपी..' पाहायला गेलो आहे.

And it paid off !
सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे 'हॅपी' म्हणजेच 'डायना पेंटी' ही मुख्य भूमिकेत नाही. सिनेमा तिच्याहून जास्त अभय देओलचा आहे. डायनानेही काम चांगलं केलं आहे, पण ह्या रोलसाठी ती शोभतच नाही, असं वाटलं. 'हॅपी' ही एक रांगडी पंजाबी व्यक्तिरेखा आहे. बिनधास्त, निडर आणि कुणावरही वचक ठेवू शकेल अशी. हाडाडलेली, खप्पड डायना पेंटी इथे फिट्ट वाटतच नाही ! एक बिनधास्त पंजाबी मुलगी इतकी मरतुकडी असू शकते, हे मला तरी पटलंच नाही.

अभय देओल मात्र पाकिस्तानच्या राजकारणातील उगवता सूर्य असणारा 'बिलाल अहमद' सादर करताना पुन्हा एकदा समजून, उमजून अगदी तोलून मापून व्यक्त होत राहतो. त्याला क्रिकेटमध्ये करियर करायचं असतानाही त्याच्या वडिलांनी त्याला राजकारणात ओढलेलं असतं. नसानसांत क्रिकेट भिनलेला माणूस, फलंदाजीसाठी उभा राहताना इतका वाईट 'स्टान्स' कसा घेईल, हा नसानसांत क्रिकेट भिनलेल्या माझ्यासारख्या छिद्रान्वेश्याला पडलेला निरागस प्रश्न, मी स्वत:च अभय देओलसाठी डिस्काऊन्ट केला !

जिमी शेरगिलचा 'दमनसिंग बग्गा' 'तनू वेड्स मनू' मधल्या 'राजा अवस्थी' चंच दुसरं नाव असल्यासारखा झाला आहे. त्याचा सिनेमातला 'लव्ह इंटरेस्ट' कायम त्याला बोहल्यापर्यंत नेऊन पळून जाणारा असतो. त्याला बहुतेक अश्या भूमिकांत स्पेशलायजेशन करायचं असावं ! सहाय्यक भूमिकांत त्याचं स्पेशलायजेशन तर आताशा मान्य करायलाच हवं.

लाहोरचा पोलीस अधिकारी 'उस्मान आफ्रिदी' म्हणून 'पियुष मिश्रा'नी मात्र नुसती धमाल केली आहे ! पियुष मिश्रा हे एक अजब रसायन आहे. लेखाच्या सुरुवातीला उल्लेखल्याप्रमाणे घट्ट बांधलेली शायरी करणारा त्यांच्यासारखा दुसरा गीतकार नाही. गच्च बांधलेल्या पटकथा, संवादलेखनही ते करतात आणि वेगवेगळ्या छटांच्या भूमिकाही ताकदीने करतात !

अली फझलला फारसं काम नाहीय. पण तो खूप सहज वावरतो आणि त्याचे बोलके डोळे खूप फ्रेशही वाटतात.



सिनेमाचं कथानक अगदी थोडक्यात सांगण्यासारखं आहे.
'हॅपी' (डायना पेंटी) ला 'गुड्डू' (अली फझल) शी लग्न करायचं असतं. पण बेकार, बिनकामाच्या गुड्डूशी लग्नाला 'हॅपी'च्या वडिलांचा (कंवलजीत सिंग) विरोध असतो. स्थानिक नगरसेवक दमनसिंग बग्गा (जिमी शेरगिल) शी तिचं लग्न ठरवलं जातं. मात्र ती लग्नाच्या मंडपातून पळून जाते. गडबडी अशी होते की ती गुड्डूकडे न पोहोचता थेट पाकिस्तानात लाहोरला बिलाल अहमद (अभय देओल) च्या घरी पोहोचते ! बिलालचं राजकीय भविष्य, हॅपी-गुड्डूच्या प्रेमाचं भविष्य, बग्गाच्या सामाजिक छबीचं भविष्य आता काय होणार ? ह्या प्रश्नाचं उत्तर सिनेमा देतो.

कथानक विचित्र योगायोगावर कमजोरपणे आधारलेलं असलं, तरी वेगवान पटकथा त्यात रंगत आणते. काही ठिकाणी अजून मजा आली असती, असं मात्र वाटलं. गुड्डूला पाकिस्तानला नेऊ देण्यासाठी बग्गाला पटवणं, अजिबातच कन्व्हिन्सिंग वाटत नाही. इथे 'हॅपी'प्रमाणे 'गुड्डू'ही जर एक जटीलबुद्धी दाखवला असता, तो नकोसा झालेला दाखवला असता, तर ते जास्त कन्व्हिन्सिंग वाटलं असतं किंवा इतर काही तरी मजेशीर 'प्लॅनिंग' तरी दाखवता येऊ शकलं असतं. गुड्डूची व्यक्तिरेखा पूर्णपणे दुर्लक्षितच ठेवली असल्याने किंवा 'बिलाल'वर जास्त फोकस ठेवायचं (अभय देओलला युएसपी मानून) ठरवलं गेलं असल्यामुळे (कदाचित) हा सगळा भाग कमजोर वाटला आहे. एकूणच 'गुड्डू' हा माणूस गुड फॉर नथिंगच वाटतो आणि त्यामुळे हे प्रेमप्रकरणही फुसकं वाटत राहतं.

पियुष मिश्रांचं 'काश अमुक-अमुक पाकिस्तान में होता'वालं पालुपद आणि उर्दूचा वापर जबरदस्त मजा आणतो ! खासकरून बग्गाशी होणारी त्यांची पहिली भेट, तर भारीच रंगली आहे ! एकदा स्वतंत्रपणे पियुष मिश्रांसाठीच हा सिनेमा पाहिला जाऊ शकतो, इतका 'उस्मान आफ्रिदी' जबरदस्त झाला आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री 'मोमल शेख' खूप आश्वासक वाटली. तिचा चेहरा 'दिव्या दत्ता + परिणीती चोप्रा' असं डेडली कॉम्बीनेशन आहे. तिच्या चेहऱ्यावर सूक्ष्मतम भावही खूप सुंदरपणे उमटतात. डायनापेक्षा ती खूपच जास्त देखणी दिसली आहे.

निखळ, कौटुंबिक विनोदाचा जमाना राहिलेला नसताना आणि त्याचा दर्जाही खालावलेला असताना पिकूतनू वेड्स मनूमिस तणकपूर हाजीर हो, हॅपी भाग जायेगी सारखे सिनेमेसुद्धा येत असतात. हे प्रमाण खूप कमी आहे, पण तेव्हढाच दिलासा मिळत राहतो.
'हॅपी..' चं बॉक्स ऑफिस ओपनिंग कमी होतं पण हळूहळू वाढत जाईल, अशी लक्षणं दिसत आहेत. माउथ पब्लिसिटीने जे सिनेमे गल्ला जमवतात, ते नक्कीच खास असतात आणि 'हॅपी..' खास आहेच ! पण भारतात चक्क 'टायगर श्रॉफ'च्या 'फ्लायिंग जट्ट' नामक पॉसिबली टाकाऊपटाला जास्त स्क्रीन्स मिळत आहेत आणि पाकिस्तानात 'हॅपी..' वर सेन्सॉरने बंदी घातली आहे ! टाकाऊपणाला हात जोडावे की मूर्खपणाला, समजत नाहीय.

चालायचंच... यथा डिमांड, तथा सप्लाय !

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

Sunday, August 21, 2016

लिहित असतो, कळत नाही हल्ली

लिहित असतो, कळत नाही हल्ली
मी मलाही सुचत नाही हल्ली

जे कधी जमलेच नाही तेही
रोज करणे चुकत नाही हल्ली

झोप नुकती लागलेली असते
मी पहाटे उठत नाही हल्ली

आपले नाते असावी अफवा
नोंद कुठली मिळत नाही हल्ली

चंद्र होई चिंब येथे पूर्वी
एक घागर बुडत नाही हल्ली

आतड्यांना पीळ पडला आहे
आतड्यांना दुखत नाही हल्ली

पंढरीच्या कानड्या राजाला
राज्य करणे जमत नाही हल्ली

....रसप....
१६ ऑगस्ट २०१६

Wednesday, August 17, 2016

मोहेंजोदडो - हिंमतीला दाद ! (Movie Review - Mohenjo Daro)

पूर्वी हृतिक रोशन मला विशेष आवडायचा नाही. 'कहो ना प्यार हैं' हा एक 'जस्ट अनदर मूव्ही' होता आणि त्यातला हृतिकसुद्धा 'जस्ट अनदर स्टार किड'. पण नंतरच्या ३-४ सिनेमांत त्याने जरा वेगळेपणा दाखवला. मात्र लगेच पाठोपाठ ६-७ सुमार सिनेमेही केले. त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष कुतूहल कधी वाटायचं नाही.
पण फरहान अख्तरच्या 'लक्ष्य' नंतर तो बदलला बहुतेक. त्यापुढचे त्याचे धूम, क्रिश, काईट्स, जोधा अकबर, जिंदगी ना मिलेगी दोबारा, गुजारीश मी आवर्जून पाहिले आणि मला तो आवडायला लागला. हो, 'बँग बँग' सुद्धा पाहिला मी ! आणि लगेच तो त्याला माफही करून टाकला ! हृतिकच्या अभिनयाला मर्यादा आहेत. तरीही तो स्वत:ला आव्हानं देण्यात कमी पडत नाही. नुसती आव्हानंच देत नाही, तर स्वत:च स्वत:ला दिलेल्या ह्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरं जाण्यासाठी तो मेहनतही घेतो. भले त्यात त्याला यश मिळो अथवा न मिळो. पण त्याचा प्रयत्न मात्र कधी कमी पडलेला वाटत नाही.

ह्या आठवड्यात 'रुस्तम' आणि 'मोहेंजोदडो' एकत्रच रिलीज झाले. अक्षय कुमार आणि हृतिक दोघेही आवडते. दोन्ही सिनेमे पाहायचे होते. पण रिलीज होण्याआधीपासूनच 'रुस्तम'ची स्तुती आणि 'मोहेंजोदडो'वर टीका सुरु झाली. हे म्हणजे 'पोटात पोर अन् बाहेर बारसं' अश्यातला प्रकार होता. 'मोहेंजोदडो'चं अक्षरश: बिनडोक ट्रेलर पाहून खरं तर माझंही डोकं फिरलंच होतं.
'फर्क हैं महम, तुझे मोहेंजोदड़ो पर राज्य करना हैं और मुझे सेवा'
'इस नगर से कोई नाता हैं मेरा'
'यह मेरा नगर हैं. मोहेंजोदड़ो !'
असे सगळं कथानक उघड करणारे संवाद ट्रेलरमध्ये घेण्याचा मूर्खपणा कुणी कसं काय करू शकतं ? पण केला तर होताच. त्यामुळे लोकांची सिनेमाबद्दलची अर्धी उत्सुकता संपून गेली होती. त्यानंतर सिनेमातल्या पात्रांचे कपडेपट, इतर वेशभूषा, बोली, संगीत, नृत्यं वगैरे बाबींवर टीका करून ह्या 'पिरीयड ड्रामा' ची अगदी टिंगल केली गेली. इतकं, की हे सगळं जाणीवपूर्वक, ठरवून केलं जात आहे की काय, असा संशय यावा !

पण माझं नक्की ठरलेलं होतं. मी रुस्तम आणि मोहेंजोदडो, दोन्ही बघणार होतो. नेमकं शुक्रवार ते रविवार बाहेरगावी जावं लागल्याने ते वेळेत जमलं नाही. तरी परत आल्यावर दोन्ही सिनेमे आवर्जून पाहिले. माझे अंदाज खरे ठरले. 'रुस्तम'ला उगीच डोक्यावर घेतलं गेलं आहे आणि 'मोहेंजोदडो'ला उगीच लाथाडलं गेलं आहे. प्रत्यक्षात दोघेही सारखेच चांगले आहेत किंवा सारखेच वाईट आहेत. किंबहुना, दोघेही सारखेच 'सामान्य' आहेत.



'मोहेंजोदडो'चं कथानक सांगायची काही आवश्यकता नाहीच आहे. बिनडोक ट्रेलर्समधून ते आधीच सर्वांना समजलेलं आहे. तरी एक औपचारिकता !
'मोहेंजोदडो' ह्या नगरावर महम (कबीर बेदी) ची हुकुमत चालते आहे. ही सत्ता त्याने ती दगाफटका करून बळकावलेली असते. जवळपासच्या लहान लहान गावांतून व्यापारी, शेतकरी मोहेंजोदडो नगरात आपल्या व्यवसायासाठी येत असतात. तसाच 'आम्री' गावातून 'सर्मन' (हृतिक रोशन) येतो. ही कहाणी त्याचीच आहे. इथे आल्यावर त्याला दिसतं की ह्या अत्याचारी राजवटीमुळे इथला सामान्य माणूस खंगत चालला आहे. त्याला जाणवतं की ह्या जागेशी त्याचं काही तरी जुनं आणि घट्ट नातं आहे.

हे नातं नक्की काय आहे, हे आपल्याला आधीपासूनच माहित असतंच. पण ज्या प्रकारे ते उघड केलं जातं, ते इतकं बाळबोधपणे आहे की काय सांगावं ! भले तुमचा सस्पेन्स कितीही फुसका असला, तरी तो कहाणीचा गाभा आहे ना ? त्याला काही महत्व नको द्यायला ? ती गोष्ट खुद्द सर्मनला समजते तो प्रसंग तर बाळबोध आहेच, पण जेव्हा सर्मनचं सत्य सगळ्या नगरवासियांना सांगितलं जातं, तो प्रसंग तर अजूनच फुसका बार झाला आहे. एक तर असंच सगळं कथानक आपण आधी अनेकदा पाहून झालेलं आहे. नुकतंच 'बाहुबली'नेही हीच कहाणी मोठ्या रंजकतेने (अर्धीच) सांगितली आहे. त्यात तुमची प्रसिद्धी सपशेल गंडली आहे. त्यात तुमच्यावर उतावळी टीका होते आहे आणि असं सगळं असताना तुम्ही स्वत:च तुमच्या सादरीकरणात गटांगळ्या खात आहात. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास !

खरं तर सिनेमाची सुरुवात खूप रोमांचक होते आणि एकंदरीतच सगळेच अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस मस्त जमून आले आहेत. शेवटी शेवटी व्हीएफएक्स जरासं कमी पडले आहेत, पण तेही अगदीच पिचकवणी झालेले नाहीत. शेवट तर चांगलाच नाट्यमयही झाला आहे. 'पाण्यातून झेप मारुन बाहेर येणारी मगर' हाही एक विनोदाचा विषय झाला होता, पण तो प्रसंगही जबरदस्त झाला आहे.
जे प्रचंड फसलं आहे ते म्हणजे कथाकथन आणि संगीत.
कथानक त्याच त्या ठराविक वळणांनी जात राहतं. तेच ते पहिल्या नजरेत प्रेमात पडणं, तेच ते खलनायकाने प्रेयसी-प्रियकराच्या मार्गातला अडसर बनणं, तोच तो विश्वासघात, तोच तो जन-उठाव आणि तीच ती अच्छाई वि. बुराई अशी लढाई. पण एक चांगला दिग्दर्शक, एक नेहमीचंच कथानकही वेगळ्या प्रकारे सांगून रोचक, रंजक बनवू शकतो. गोवारीकरांचं गणित नेमकं काय होतं, कुणास ठाऊक !

संगीत तर रहमानसाठी लाजीरवाणं आहे, असंच क्षणभर वाटलं. पण पुढच्याच क्षणी मला 'जब तक है जान' आठवला. त्याहून जरा(संच) बरं, इतकीच समाधानाची बाब ! शब्द जावेद अख्तर साहेबांचे आहेत, ही अजून एक आश्चर्यमिश्रीत निराशा. खरं तर दोनच गाणी आहेत सिनेमात आणि एरव्ही ती दुर्लक्षितही केली असती. पण रहमान आणि अख्तर असताना ते जमत नाही. You expect something far better. गाणं सुरु झालं की कधी एकदा संपतंय, असं वाटणं ह्यासाठी रहमान आणि अख्तर जन्मले नाहीत. त्यासाठी इतर बरीच भुक्कड पिलावळ आहे की !

नवा चेहरा (हिंदीसाठी) पूजा हेगडे, 'चेहरा' म्हणूनच चांगला आहे. बाकी सगळा आनंदी आनंदच आहे. तर घसा खरवडून खरवडून बोलणारा कबीर बेदीही खूप थकलेला जाणवतो. अरुणोदय सिंग व इतर सहाय्यक कलाकार आपापलं काम व्यवस्थित करतात. विशेष लक्षात राहणारं असं कुणी नाही.
हृतिक रोशन मात्र पुन्हा एकदा त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांनी मन जिंकतो. हे काही त्याचं सर्वोत्तम काम म्हणता येणार नाही पण कुठे काही कमी तरी पडणार नाही, ह्याची त्याने काळजी नक्कीच घेतलेली आहे.

All in all, 'मोहेंजोदडो चांगला आहे की वाईट ?' Let's say, Average. तरी दोन गोष्टींवर बोलणं महत्वाचं वाटतंय -

१. मोहेंजोदडोवर झालेली प्रदर्शनपूर्व टीका

ही सगळी टीका पात्रांचे कपडेपट, इतर वेशभूषा, बोली, संगीत, नृत्यं वगैरे बाबींवर होती. त्या काळात कपड्यांना शिवण नसे, नुसतं एखादं कापडच गुंडाळत, नक्षीकाम, प्रिंटींग तर अगदीच नसे; ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे. तरी सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून हे सगळं समजून घ्यायला हरकत नसावी. तर संगीत, नृत्यं ह्या तर खूपच किरकोळ गोष्टी आहेत. खरं सिनेमावर टीका करण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. बुळबुळीत कथानक, त्याचं बोथट कथन, काही लोकांचं सामान्य दर्ज्याचं काम ह्यांवर बोला की. मात्र त्यांवर बोलण्यासाठी आधी तो पाहायला तर हवा !

२. रुस्तम वि. मोहेंजोदडो

दोन्ही सिनेमे पूर्णपणे वेगळ्या धाटणीचे असले, तरी त्यांची तुलना स्वाभाविक आहे कारण बॉक्स ऑफिसवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उणीवा रुस्तममध्येही आहेत आणि मोहेंजोदडोमध्येही. 'रुस्तम' हा त्या मानाने कमी आव्हानात्मक विषय होता असं मी म्हणीन. त्याला एका सत्यघटनेची पार्श्वभूमी होती, त्यामुळे कथानक बहुतांश तयारच होतं. 'मोहेंजोदडो' जास्त आव्हानात्मक होता कारण सगळंच अगदी शून्यातून तयार करायचं होतं. 'पिरीयड ड्रामा' दोन्ही आहेत. संगीत आणि कथाकथनही दोन्हींचं फसलं आहे. पण दोन्हींचा विचार केला तर 'सृजनशील प्रायोगिकता' ही 'मोहेंजोदडो'मध्ये जास्त आहे. सत्यघटनांवर, पात्रांवर आधारित सिनेमांचं तर सध्या पीकच आलं आहे. रुस्तमने कोणता मोठा तीर मारला आहे ? धाडस एखाद्या अस्पर्श्य कथानकाला हात घालण्यात जास्त आहे. ते गोवारीकरांनी केलं आहे. एखादा ऐतिहासिक सिनेमा बनवणं वेगळं आणि एखाद्या अगदी प्राचीन काळाला पूर्णपणे improvise करणं वेगळं. हे भारतात तरी सहसा कुणी करायला धजावत नाही. कारण भरमसाट संदर्भ उपलब्ध असलेला ऐतिहासिक विषयच आपल्याला झेपत नाही. भन्साळीचा बाजीराव 'वाट लावली' करत मवाली नृत्य करतो आपल्याकडे !
असो.

एक मात्र खरं आहे, अजून खूप चांगलं करता आलं असतं आणि करायला हवंही होतं.
पण ह्या हिंमतीसाठी तरी दाद द्यायला हवी ना ?
मी तरी देतो आणि रुस्तमपेक्षा मोहेंजोदडोची शिफारस करतो.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

Tuesday, August 16, 2016

थोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)

'रुस्तम'बद्दल आवर्जून सांगावं असं खरं तर काहीच नाही. कारण तो 'नानावटी केस' वर आधारलेला आहे, हे पहिल्यापासूनच सर्वांना माहित आहे आणि 'नानावटी केस'ही सर्वांना माहित आहे. ज्यांना ती माहित नाही, त्यांच्यासाठी त्या केसची पुरेशी माहिती आंतरजालावर अगदी सहज उपलब्ध आहे. पण तरीही हा एक प्रचंड जाहिरात केलेला आणि (कदाचित म्हणूनच) पाहण्याची उत्कंठा वाटलेला चित्रपट आहे/ होता म्हणून लिहितो आहे. ह्या लिहिण्यालाही जरासा उशीरच झाला आहे, तरी.. !

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढची जवळजवळ १३ वर्षं म्हणजे १९६० पर्यंत महाराष्ट्र व गुजरात मिळून एकच राज्य अस्तित्वात होतं, ज्याला 'बॉम्बे स्टेट' म्हटलं जायचं. 'रुस्तम'चं कथानक त्या काळातलं आहे. भारतीय नौदलात एका मोठ्या हुद्द्यावर असलेला रुस्तम पावरी (अक्षय कुमार) एका मोहिमेवरून परत घरी येतो. पत्नीवर जीवापाड प्रेम असलेला रुस्तम जेव्हा तिला भेटण्यासाठी उतावीळ होऊन घरी येतो, तेव्हा त्याला हादरवून टाकणारं सत्य त्याला उमगतं. त्याच्या पत्नीचं विक्रम मखीजा (अर्जन बाजवा) ह्या एका चांगल्या ओळखीच्या व्यक्तीशीच प्रेम प्रकरण चालू असतं. विक्रमशी ह्याबाबत बोलायला गेलेला रुस्तम त्याला गोळ्या घालून ठार मारतो आणि त्याच्यावर खूनाचा खटला भरला जातो.
बहुतांश सिनेमा हा ह्या खटल्यावर आधारित आहे. आपण ह्याला 'कोर्टरूम ड्रामा' किंबहुना 'कोर्टरूम मेलोड्रामा' म्हणू शकतो.



रुस्तम आवडला की नाही आवडला, ह्याचा निर्णय चटकन होत नाही. ह्याचा अर्थ ह्यात काही चांगल्या गोष्टी आहेत पण काही तितक्याश्या चांगल्या नसलेल्या नावडलेल्या गोष्टीही आहेत आणि दोन्हींना दुर्लक्षित करता येत नाही.

चांगले -

१. अक्षय कुमार

'अक्षय कुमार डोक्यात जातो' असं म्हणणारा मनुष्य मला तरी आजतागायत भेटलेला नाही. तो काही लोकांना विशेष दखलपात्र नसेल वाटत, पण 'तो पडद्यावर आल्यावर असह्य होतं', असं कुणी म्हणत असेल, हे वाटत तरी नाही. शाहरुखपासून रणवीरपर्यंत प्रत्येक जण असह्य होत असतो. पण अ.कु. नाही. अ.कु.चे फॅनसुद्धा भरपूर आहेत. (मी त्यांतला एक !) तर ज्यांना तो आवडतो आणि ज्यांना तो विशेष आवडत नाही, अश्या दोघांसाठीही 'रुस्तम' हा एक 'बघणीय' सिनेमा आहे. अ.कु.च्या हालचालींत नेहमीचा उत्साह जरासुद्धा कमी होत नाही आणि प्रचंड आत्मविश्वास असलेला एक नौदल कमांडर त्याने सहज साकारला आहे. वर्दीत असलेला मनुष्य असाही ऐटबाज दिसतोच, पण अ.कु.ची बातच काही और आहे.
मला असं वाटतं की 'अफलातून' नंतर त्याला त्याच्या आवाजाचा वापर करण्याचं एक विशिष्ट तंत्रही मिळालं आहे आणि प्रत्येक सिनेमागणिक ते मला तरी प्रकर्षाने जाणवत असतं. अगदी पूर्वीच्या (खिलाडी वगैरे) काळातला त्याचा आवाज आणि आजचा त्याचा आवाज ह्यांत फारसा फरक नसला, तरी त्याच्या वापरात मात्र बराच फरक पडला आहे. एक सामान्य चित्रपटही एखादा असा संस्कार अभिनेत्यावर करतो की त्याचं पुढच्या प्रवासाची दिशाच बदलावी, असं काहीसं हे एक उदाहरण आहे. त्याच्या 'रुस्तम'मध्ये फक्त स्टाईल आणि आत्मविश्वासच नसून अत्यंत समंजसपणे त्याने ती व्यक्तिरेखा साकारली आहे. मुळात 'रुस्तम' हा एक सैनिक आहे. तो इतर सामान्य माणसांप्रमाणे भावनिक असू शकत नाही, हे लक्षात ठेवून त्याने त्याचा आनंद, दु:ख, वैषम्य, संताप वगैरे दाखवला आहे. हे नुसतं अंडरप्ले करणं नसून तोलून मापून केलेलं सादरीकरण आहे, असं मला वाटलं.

२. नीरज पांडे

दिग्दर्शक 'टिनू सुरेश देसाई' असले तरी त्यांवर 'नीरज पांडे'चा प्रभाव जाणवतो. बहुतेक, काही चित्रपटांत त्यांनी पांडेंना सहाय्यक म्हणून काम केलंही असावं. नीरज पांडे निर्माते आहेत आणि पांडेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवाद, देशभक्ती वगैरेची किनार असलेलं कथानक आपल्यासमोर मांडलं आहे. 'स्पेशल छब्बीस'चा अपवाद वगळता त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वच सिनेमांत हे जाणवलं आहे. पांडेंचा हातखंडा थरार चित्रित करण्यात आहे. त्यांच्या सिनेमातली पात्र शांतपणे, पॉजेस वगैरे घेत संवाद फेकत नाहीत. लांबलचक मोनोलॉग्ससुद्धा त्यांच्या समीकरणांत बसत नाहीत. त्यांच्या सिनेमातली पात्रं ताडताड पाउलं टाकत चालतात, चटपटीत असतात. त्यांच्या हालचाली जलद असतात. कॅमेरा उगाच गरागरा फिरत नाही किंवा कुठल्या तरी विचित्र कोनांतून तो पाहत नाही किंवा अगदीच एखाद्या कोपऱ्यात टाकून दिल्यासारखा पडूनही राहत नाही. तो जेव्हढ्यास तेव्हढा फिरतो आणि बुचकळ्यात वगैरे पाडत नाही. ह्या सगळ्यामुळे कथानक कुठल्याही गतीने पुढे सरकत असलं तरी खिळवून नक्कीच ठेवतं. 'टिनू देसाई' ह्या सगळ्याला अपवाद नाहीत आणि 'रुस्तम'सुद्धा ! काय होणार आहे, हे आपल्याला आधीच माहित असलं तरीही त्याची उत्सुकता मात्र वाटत राहतेच.

३. जुनी मुंबई

जुन्या मुंबईचं फार काही दर्शन घडतं अश्यातला भाग नाही. पण जे काही घडतं, ते पाहताना एखादा मुंबईकर नक्कीच सुखावतो. खरं तर तो काळ असा होता की मुंबईत मुख्यत्वे दोनच प्रकारचे लोक होते. अतिश्रीमंत आणि अतिगरीब. ही तफावत भयंकर होती. मध्यमवर्ग हळूहळू करत आपलं अस्तित्व दाखवू लागला आणि आता तर ह्या मध्यमवर्गातही निम्न, उच्च असे गट पाडता येतील इतक्या पायऱ्या तयार झाल्या आहेत. पण तो काळ होता जेव्हा एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी बहुतेक दोनच पायऱ्या होत्या. गरीब आणि श्रीमंत. मात्र, ह्या भयंकर तफावतीचे दर्शन इथे होत नाही. इथे दिसणारी मुंबई म्हणजे उच्चभ्रू, सुखवस्तू लोकांचीच मुंबई. स्वच्छ रस्ते, देखण्या गाड्या आणि टापटीप ब्रिटीश पद्धतीची घरं व इमारती ह्यांचं ओझरतं दर्शन होत राहतं. I know, हे दर्शन अपूर्ण आहे आणि ब्लफमास्टर व टॅक्सी नं. ९२११ मध्ये दिसलेल्या मुंबईने मला जास्त मोहवलं होतं आणि 'रमन राघव' मध्ये दिसलेली मुंबई जास्त भिडली होती, पण तरी... !!

४. पवन मल्होत्रा

हा एक अत्यंत गुणी अभिनेता आहे. खूप आव्हानात्मक भूमिका गेल्या काही वर्षांत त्याच्या वाट्याला आलेल्या नाहीत. पवन मल्होत्रा म्हटल्यावर आपल्याला सहसा आठवतात 'सलीम लंगडे पे मत रो' आणि 'ब्लॅक फ्रायडे' मधला 'टायगर मेमन'. नक्कीच, ही दोन त्याची जबरदस्त कामं होती, मात्र 'जब वुई मेट' मधला सरदार 'चाचाजी' असो की 'डॉन' मधला 'नारंग किंवा 'भाग मिल्खा भाग' मधला प्रशिक्षक, त्याने प्रत्येक वेळी ती ती छोटीशी व्यक्तिरेखासुद्धा जिवंत केलेली आहे. कमांडर रुस्तमबद्दल अतिशय आदर असलेला आणि त्याच वेळी आपल्या कर्तव्याचीही पूर्ण जाणीव असलेला 'रुस्तम' मधला त्याचा पोलीस अधिकारी 'व्हिन्सेंट लोबो'ही असाच. अगदी छोटीशी भूमिका आहे असंही नाही, पण फार मोठीही नाही. मात्र तरीही लक्षणीय. अ.कु. आणि त्याचे दोन प्रसंग तर मस्तच जमून आले आहेत. दोन्हींत बुद्धिबळ आहे. एकात तो खेळतो, दुसऱ्यात खेळ टाळतो. एकात दोघांना समसमान स्कोप आहे तर दुसऱ्यात अ.कु.ला जास्त स्कोप आहे.

५. काही किरकोळ (Miscellaneous)

# जेलमध्ये रुस्तम आणि लोबो एक बुद्धिबळाचा डाव खेळतात. असा प्रसंग अनेक सिनेमांत चित्रित झालेला आहे. पण बहुतेक वेळेस ते चित्रण अर्धवट किंवा बाष्कळपणे दाखवलं आहे. इथे एक पूर्ण डाव अगदी व्यवस्थित दाखवला गेला आहे. हा प्रसंग, तेव्हाचे संवाद सगळं मस्त जुळून आलं आहे.
# काही जागांवर उत्तम व सजग संकलन (Editing) जाणवतं.

फार चांगले नाही -

१. इलियाना डी क्रुज

ही 'बर्फी'मध्ये मला आवडली होती. पण इथे खूपच कमी पडल्यासारखी वाटली. अक्षरश: एकाही प्रसंगात ती आश्वासक वाटत नाही. तिचं रडणं, हसणं सगळं नकलीच वाटत राहतं. ह्या कहाणीत 'रुस्तम' पत्नी 'सिंथिया' म्हणून तिचं पात्र महत्वाचं आहे. भले तिची भूमिका केंद्रस्थानी नसली तरीही महत्वाची आहे कारण तिच्यामुळेच तर सगळं घडलेलं आहे. पण तीच परिणामकारक नसल्यामुळे इतर सगळं अपुरंच वाटत राहतं. पुरेसं कूलिंग नसलेल्या वातानुकूलित केबिनमध्ये बसल्यासारखं वाटतं. अगदी जीव गुदमरतही नाही आणि अगदी निवांतही वाटत नाही.

२. संगीत

नसतंच तरी चाललं असतंच की. पण जर आहे, तर चांगलं तरी असायला हवं होतं. 'तेरे संग यारा' ऐकायला ठीक वाटतं, पण तिथल्या तिथे फिरत राहणारी चाल असल्याने लगेच पुरे वाटतं. ही चालही अगदी टिपिकल असल्याने नवीन काही ऐकतो आहे, असंही वाटत नाही. शीर्षक गीत 'रुस्तम वही' म्हणजे तर अमानवी अत्याचार आहे. संगीत म्हणून हे जे काही केलं आहे तो नुसता असह्य गोंगाट आहे. 'तय हैं' हे गाणंही तसं चांगलं आहे, but again काही नवीन ऐकल्यासारखं नाहीच वाटत.
खरं तर आजच्या सिनेमात 'संगीत वाईट असणं' ही बाब गृहीतच धरायला हवी. सिनेमा पाहायला जातेवेळीच ह्यासाठीची मानसिक तयारी असली पाहिजे. पण माझी तरी अजूनही तशी तयारी होतच नाही. जे सुश्राव्य व अर्थपूर्ण असतं तेच संगीत असतं, ह्याहून काही वेगळं जर कानांवर पडलं तर ते पचतही नाही आणि पटतही नाही ! कदाचित हा माझाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित केला तरी चालतोय !

३. कोर्टरूम मेलोड्रामा

'कोर्ट', 'अलिगढ' आणि काही प्रमाणात 'जॉली एल एल बी' अश्या काही सिनेमांतून दिसलेलं कोर्ट जास्त खरं वाटतं. 'रुस्तम'मध्ये दाखवलेला कारभार मात्र मेलोड्रामॅटिकच वाटतो. ज्यूरींना न्यायाधीशाने त्यांचं काम समजावून सांगणं, त्यावर ज्यूरींनी शाळेतल्या मुलाप्रमाणे माना हलवणं वगैरे तर अगदीच उथळ वाटलं. बाकी टिपिकल फिल्मी डायलॉगबाजीही इथे चालते. लोक टाळ्या वगैरे वाजवतात आणि जज 'ऑर्डर, ऑर्डर' करतो. आताशा ह्या सगळ्याने प्रेक्षकाला समाधान मिळत नाही. नको तिथे अवाजवी, अनावश्यक वास्तवदर्शनाचा अट्टाहास करणारे आजचे लेखक-दिग्दर्शक अश्या काही ठिकाणीही तितकेच आग्रही व्हायला हवे.

४. काही किरकोळ (Miscellaneous)

# 'रुस्तम' बहुतांश वेळ वर्दीत दाखवला आहे. त्याची ही वर्दी इतकी पांढरी शुभ्र आहे की दर दोन तासांनी 'टाईड'ने धुवून घेतो की काय असं वाटतं. इतना भी मत करो यार ! अगदी जेलमध्ये असतानाही तो पूर्ण वर्दीत दाखवला आहे. कोठडीही इतकी स्वच्छ असते की त्याच्या कपड्यांवर जराही धूळ वगैरे लागत नाही, हे जरा जास्त होतं. ही ड्राय क्लीन्ड शुभ्रता इतकीही आवश्यक नव्हती की डोळ्यांत खुपेल.
# एक वृत्तपत्र आधी २५ पैसे आणि नंतर त्याची लोकप्रियता वाढल्यावर एक रुपयाला विकलं जाताना दाखवलं आहे. ही कहाणी १९५७ ची असल्याचं सांगितलं आहे. त्या काळात २५ पैसे किती महाग होते, ह्याचा विचार केलेला दिसत नाही. एक आण्यालाही किंमत असणारा तो जमाना होता. एका वृत्तपत्रासाठी १ रुपया ही खूप म्हणजे खूपच जास्त किंमत आहे. १ रुपयाला तर आजही वृत्तपत्र मिळतं बहुतेक !
# मूळ कथानक माहित असलं, तरी जोड-कथानक (जे काल्पनिक आहे) मात्र कुणाला नक्कीच माहित नसावं. पण काय घडणार आहे, ह्याचा अंदाज आधीच बांधता येतो आणि ते तसंच घडतं. ही प्रेडिक्टेबलिटी मारक ठरली आहे. ह्यामुळे थरारातली हवाच निघून जाते.
# सिंथिया आणि विक्रमचा जवळ येण्याचा प्रसंग/ परिस्थिती अगदीच भंकस वाटते. तो सगळा भाग ऐंशीच्या सुमार कालखंडातील एखाद्या फडतूस सिनेमातून उचलून इथे टाकला आहे की काय, असा संशय येतो !

'रुस्तम' वाईट नसला तरी त्याच्याकडून अपेक्षा खूप होत्या. त्या पूर्ण होत नाहीत. नानावटी केसवर आधारलेला 'गुलजार'चा 'अचानक' चाळीस एक वर्षांपूर्वी आला होता. त्यात विनोद खन्ना, फरीदा जलाल आणि ओम शिवपुरी ह्यांचा अप्रतिम अभिनय होता. चाळीस वर्षांपूर्वी उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांनी बनलेला व बनवलेला तो सिनेमाही 'रुस्तम'पेक्षा कैक पटींनी जास्त थरारक तर होताच आणि दर्ज्याची तर तुलनाही होणार नाही, इतका उजवा होता. त्या काळात, जेव्हा एकेका सिनेमात ८-१० गाणी असायची, गुलजारने गाणी पूर्णपणे टाळली होती. नीरज पांडे, टिनू देसाई व कं.नी किमान तो तरी मोह आवरायला हवा होता.
असो.
एकदा पाहावा असा नक्कीच आहे आणि नाही पहिला तरी काही चुकलं/ हुकलं नसेल, ह्याचीही खात्री बाळगावी.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...