Saturday, April 30, 2016

नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.


'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

Tuesday, April 26, 2016

पाजीराव भन्साळी (Bajirao Mastani Movie - Not a Review !)

बहुचर्चित, बहुपुरस्कृत 'बाजीराव मस्तानी' परवा कुठल्याश्या वाहिनीवर लागला होता.
'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे दोनपैकी एकच पाहायला जमणार होतं. प्रदर्शनाच्या एक आठवडाआधीच मी त्यावेळी 'दै. मी मराठी लाईव्ह'साठी लिहित असलेलं काम स्थगित करायचा निर्णय घेतला होता आणि तसं संबंधितांना कळवलंही होतं. पण मग त्यांनी मला एक शेवटचा चित्रपट 'कव्हर' करायला सांगितलं. मी 'दिलवाले' निवडला. कारण त्या काळात जितका रणवीर डोक्यात जात होता तितका शाहरुख जात नव्हता ! Eventually, 'मी मराठी लाईव्ह'ने मला 'राहू द्या' सांगितल्याने, 'दिलवाले'सुद्धा उगाच पाहिला गेला.

तर सांगायचा उद्देश हा की 'बाजीराव मस्तानी' तेव्हा टाळला नव्हता, त्यामुळे आत्ता जर फुकट पाहायला मिळणार होता तर का न पाहावा ? वेळ होता, पाहिला.
'दिलवाले' हा एक गरीब चित्रपट असेल, तर 'बाजीराव मस्तानी' दळभद्री म्हणावा, ह्या मताला मी आलो आणि शेवटचा अर्धा तास उरलेला असताना माझा संयम संपला. मी टीव्ही बंद केला.


'बाजीराव मस्तानी'ची अनेक परीक्षणं येऊन गेली आहेत. आता इतक्या दिवसांनंतर मी परीक्षण लिहिणं तसं निरर्थकच. त्यामुळे काही टिपिकल लिहित नाही. थोडेसे, जसे आठवताहेत तसे मुद्दे मांडतो. हे लहान-मोठे किस्से समजा. जे मला जाणवलं ते सांगतो.

१. भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्यतेची साक्षात व्याख्या असते. हम दिल दे चुके सनम, देवदास आणि अगदी गुजारीशमध्येही त्याने दाखवलेली भव्यता लक्षात राहणारी होती. त्यातून 'बा.म.' ऐतिहासिक चित्रपट. मग तर मोठमोठे सेट्स, भव्यता, श्रीमंती वगैरे दाखवायला आयतंच निमित्त होतं. पण सावरिया आणि राम-लीला मधले पूर्णपणे खोटे समजून येणारे सुमार सेट्स आठवले. सेट्समधली कृत्रिमता, खोटेपणा ठळकपणे जाणवत होता. गड, किल्ले, महाल, खोल्या, झाडं, पाणी, नदी, पाऊस काही म्हणता काहीही थोडंसुद्धा खरं वाटत नाही, इतकं गंडलं आहे. अत्यंत वाईट प्रकारे केलेली प्रकाशयोजना ह्यासाठी जबाबदार आहे की अजून काही, मला माहित नाही. पण जो काही End result आहे, तो शुद्ध बकवास आहे.

२. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे वजनदार संवाद आले पाहिजेत. त्यांची तितकीच जबरदस्त फेकही आली पाहिजे. कसलं काय ! इथे तर सगळंच 'फेक' (Fake) ! 'बाजीराव ने मस्तानी से प्यार किया है, अय्याशी नही' हा सुमार डायलॉग संवादलेखनाची सर्वोच्च पातळी आहे. अत्यंत बाष्कळ, पोकळ, निरर्थक, सपक संवादांची तितकीच अभिनिवेशशून्य फेक 'अथ'पासून 'इति'पर्यंत ('इति' मी पाहिला नाही, पण बहुतांश पाहिला) आहे. 'पेशवीण पद म्हणजे आमराई' असे अनेक अत्यंत हास्यास्पद डायलॉग्स आपल्यावर आदळत राहतात. एका प्रसंगात काशीबाई उखाणा घेतात. त्यात 'कोहिनूर - हैं नूर' अशी यमकायमकी आहे. ह्यातला तांत्रिक दोष आज कुणालाही कळणार नाही आणि कळला तरी तो किरकोळच वाटेल. पण त्या काळात लोकांची काव्याची जाण इतकी भिकारडी नव्हती. असं सगळं ऐकता, पाहताना हसताही येत नाही. कीव येते लिहिणाऱ्याची.

३. त्याहून जास्त कीव येते गाणी लिहिणाऱ्याची. 'कडक तडक भडक झाली, चटक मटक वटक झाली, दुश्मन की देखो जो वाट लावली' (इथे 'झाली' आहे की 'साली'?) हे बाजीरावाचं शौर्यगान आहे. ह्यात वीररस असणं अपेक्षित होतं. ह्या निरर्थक आणि मवाली छाप शब्दांत कोणता रस आहे, माहित नाही. पण वीररसपूर्ण लिखाणाची ही जर सीमा असेल, तर त्या सीमेवरून गीतकाराने परत फिरूच नये. तसंच पुढे जात राहावं आणि आयुष्यात इतर सर्वांना क्षमा करावं.

४. बाजीराव, काशीबाई आणि मस्तानी. ह्या तिन्ही मुख्य व्यक्तिरेखा समस्त चित्रपट युनिटमधील कुणाला तरी समजल्या असाव्यात का, अशी शंका येते.

  • बाजीराव हा एक हाडाचा योद्धा होता. महावीर होता तो. भारताच्याच काय, जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक बाजीराव होता. त्याचं मस्तानीसोबतचं प्रकरण हा एक वेगळा भाग आहे. पण त्यापायी तो वेडगळ झालेला दाखवायचं ? एक कर्तव्यदक्ष राजा (प्रधान) असलेला तो शेवटी शेवटी अगदी बिथरलेला दाखवला आहे. त्याची ती मनस्थिती सादर करतानाचा रणवीर सिंगचा अभिनय तर हास्यास्पदच वाटला. तो सतत दारूच्या नशेत बरळल्यासारखा बोलताना दिसतो. (की तसंच दाखवलंय, कळलं नाही.) 
  • काशीबाई एक घरंदाज स्त्री होती की पोरगेलेशी, हाही मुद्दा बाजूला ठेवू. पण बाजीरावाच्या निजामाशी वाटाघाटी सफल ठरल्या, ही बातमी जेव्हा चिमाजी घेऊन येतो, तेव्हा ती ऐकून अत्यानंदाने ती टुण्णकन् उडी मारुन सासूबाईंच्या मांडीत जाऊन बसते, हे दृश्य पाहून तर माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. तसंच बाजीरावाचा शिरटोप वगैरे घालून 'हर हर महादेव' ओरडून त्याच्याभोवती नाचणं बागडणं म्हणजे थिल्लरपणा होता. 
  • दुसरीकडे मस्तानी. दीपिकाच्या चेहऱ्यावर मस्तानी सादर करताना कायमस्वरूपी बारा वाजलेले आहेत. ती गोरी वगैरे न दिसता चक्क 'पांढरी' दिसते. रोगट वाटते. मस्तानी जर अशी हाडाडलेली, कुपोषित, निस्तेज होती तर आम्ही इतकी वर्षं तिचं भलतंच काही तरी वर्णन वाचत आलो आहोत. 'बाजीराव म्हणून रणवीर' आणि 'काशीबाई म्हणून प्रियांका' ह्यापेक्षा 'मस्तानी म्हणून दीपिका' हे कास्टिंग सपशेल फसलेलं आहे. दीपिका सुंदर आहे. पण तिच्या सौंदर्यात दैवीपणाची झाक नाही. मस्तानीसाठी तीच अत्यावश्यक होती. 

५. भन्साळीचा अभ्यास (केला असल्यास) अगदीच अपुरा पडला आहे. ना त्याला पेशवे, मराठाकालीन, महाराष्ट्रीयन, मराठी संस्कृती समजली आहे ना व्यक्तिरेखा. महालांचे सेट्स मुघलांचेच वाटतात. कुठे तरी एक गणेश वंदना असणं अत्यंत गरजेचं होतं, इतकी साधी बाब लक्षात आलेली नाही. 'कट्यार' मध्ये 'सूर निरागस हो'नेच एक माहोल बनवला जातो. तो 'बा.म.' मध्ये बनतच नाही.
'बा.म.' ही कुठली शौर्यगाथा किंवा कुणा व्यक्तीवर आधारित चित्रपट (Not exactly Biopic) नाही. ही प्रेमकहाणी आहे आणि आपल्या कुवतीवर अचूक विश्वास ठेवत भन्साळीने ही कहाणी 'प्रेम कहाणी'च्या पुढे जाऊ दिलेली नाही. त्यामुळे अत्यंत फालतू युद्धदृश्यं माफ करून टाकावीत म्हणतो. मात्र प्रेमकहाणी तरी कुठे व्यवस्थित मांडली आहे ? कुठल्याही क्षणी बाजीराव आणि मस्तानी, राम आणि लीला बनून 'लहू मूंह लग गया..' करत तोंडात तोंडं घालतायत की काय अशी एक विचित्र अनामिक भीती सतत वाटत राहते, इतकं सगळं वरवरचं झालं आहे.

६. सरसकट सगळे लोक, अगदी मराठी नट-नट्याही 'राऊ' न म्हणता 'राव' म्हणतात ! निवेदक इरफान खान 'बाजीराव बल्लाड' असा अगदी सुस्पष्ट उच्चार करतो. तेव्हा मात्र 'च' आणि 'भ' चे पाढे मनातल्या मनात सुरु झाले. इतकं सगळं उथळ करायचं होतं, तर काही शतकं मागे जायची गरज काय होती ? आजच्याच काळातली एखादी कहाणी गुंफायची होती ना ! अभ्यास करायचाच नव्हता, मेहनत घ्यायचीच नव्हती तर एक प्लॉट ज्याचं इतर कुणी तरी कदाचित सोनं केलं असतं, तो वाया का घालवला ? असा एक वैफल्यग्रस्त प्रश्न मला पडला.

७. हिमेश रेशमियाची अभिनयाची हौस आणि भन्साळीची संगीत देण्याची हौस एकसारखीच वाटते आहे. सगळ्या गाण्यांच्या चाली एक तर एकसारख्याच किंवा इतर कुठल्या तरी गाण्यासारख्या किंवा थेट इस्माईल दरबारची नक्कल करणाऱ्या आहेत. 'अलबेला सजन आयो..' ची चाल मस्तच आहे. पण आयो' मधल्या 'आ' वरच्या जबरदस्त समेची अक्षरश: माती झाली आहे. वाद्यांचा इतका गोंगाट आहे की ती समेची जागा खरंच वाया जाते. इथे पुन्हा एकदा 'कट्यार'चा संदर्भ देतो. 'दिल की तपिश आज हैं आफताब..' मधल्या 'ता' (आफ'ता'ब) वर येणारी समेची जागाही अशीच दिलखेच आहे. पण सुरेख व अचूक प्रमाणातला वाद्यमेळ ही सम व्यवस्थित ठळक करतो. भन्साळी भसाभस वाद्यांचे आवाज ओततो आणि फक्त गोंगाट करतो.

एकंदरीत, अत्यंत रटाळ आणि सपशेल फसलेला चित्रपट म्हणूनच 'बाजीराव मस्तानी' ओळखला जाईल. मी 'दिलवाले' पाहिला ह्याचा तुलनात्मक का होईना मला आनंद होईल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. आता वाटतंय.

- रणजित पराडकर

Saturday, April 16, 2016

'स्टार'पेक्षा 'फॅन' सरस ! (Movie Review - Fan)

'जब तक हैं जान' पासून शाहरुखची घसरगुंडी सुरु झाली. अतिबंडल 'हॅप्पी न्यू इयर' आणि अतिभंपक 'दिलवाले' ह्या पाठोपाठच्या वर्षी आलेल्या शाहरुखपटांमुळे डोक्याचा बाजार उठला असतानाही अजून एक शाहरुखपट पाहायला मी गेलो. माझं एक मन मला 'नको.. नको' म्हणत होतं, पण दुसरं मन ऐकत नव्हतं. 'वोह नहीं सुनता उसको जल जाना होता हैं' टाईप मी वागलो आणि 'फॅन' पाहायला गेलोच. कारण शाहरुखच्या बाबतीत, you can like him or you can dislike him; but you cannot ignore him हे सत्य आहे. शाहरुख आणि सलमानकडे उपद्रवमूल्य असलं तरी 'मूल्य' आहे. आमीरचा 'पीके' मी आजतागायत पाहिलेला नाही आणि पाहावासा वाटतही नाही. कदाचित त्याचा 'दंगल'ही नाही पाहणार. (ह्या मागे गेल्या काही महिन्यांतले त्यांची वक्तव्यं व त्यानंतर झालेली बोंबाबोंब नाही. फक्त Preference चा सवाल आहे.) पण शाहरुखचा आगामी 'रईस' आणि 'गुंडे' वाल्या 'अली अब्बास जफर' चा असला तरी सलमानचा 'सुलतान' मी पाहणार आहे, हे आत्ताच सांगून टाकतो !
तर ते असो.

प्रामाणिक कबुली द्यायची झाल्यास, एक सुपरस्टार आणि त्याचा वेडेपणापर्यंत गेलेला एक चाहता ह्यांची कहाणी असल्यावर 'फॅन'मध्ये शाहरुखचं 'मला-पहा-फुले-वहा' असणार, असा माझा अंदाज होता. त्या तयारीनिशीच मी तिकिटासाठी 'आयनॉक्स'ला पाचशेची फोडणी दिली. ते पाचशे मी तत्क्षणी अक्कलखाती जमाही करून टाकले होते. त्यामुळे सगळे इ.एम.आय., बिलं, वगैरे भरून झाल्यावर दर महिन्याच्या १०-१२ तारखेला सॅलरी अकाऊन्टची जी स्थिती असते, त्याच रिकामेपणे मी सिनेमागृहात आलो.
पुढचे सव्वा दोन तास माझ्यासाठी आश्चर्यकारक होते.
माझ्या अंदाजाला शाहरुखने थेट उभा छेद दिला. त्याने माझ्या हातात फुलांची परडी दिली नाही. तो स्वत:च गळ्यात माळा घालून आल्यासारखा मला वाटला नाही. त्याने ह्या वेळी पडद्यावर मर्कटचेष्टा न करता चक्क समंजस अभिनय केला ! आवराआवर करत असताना एखाद्या जुन्या कपड्याच्या खिश्यात शंभराची नोट मिळावी, तसा एक अनपेक्षित आनंद मला झाला होता. पाचशेच्या फोडणीने चव चांगली आली होती. अक्कलखाते डेबिट केले आणि केलेला खर्च वसूल झाला ! (इथेच मी एक सिनेमाला स्टार देऊन टाकला !)

'फॅन' हा १९९६ साली आलेल्या 'रॉबर्ट डी निरो' अभिनित 'द फॅन' वर सही सही बेतलेला आहे. त्यात काही जुजबी बदल केले आहेत. मूळ 'द फॅन' मध्ये रॉबर्ट डी निरो' एका बेसबॉलपटूचा आणि बेसबॉल ह्या खेळाचाही 'डाय हार्ड फॅन' दाखवलेला आहे. तर त्याचं भारतीयीकरण करतेवेळी तो स्टार 'फिल्मस्टार'च दाखवला आहे. दुसरा मुख्य फरक म्हणजे मूळ 'द फॅन' मध्ये स्टार आणि फॅन एकसारखे दिसत नसतात. ती कामंही दोन भिन्न नटांनी केलेली आहेत. तर इथे त्याचं फिल्मीकरण करून स्टार आणि फॅन एकसारखेच दिसणारे दाखवले आहेत. बाकी विषयाच्या हाताळणीतल्या प्रखरतेमधली इंग्रजी-हिंदीतली जनरल तथाकथित तफावत इथेही जाणवेल, ह्याबद्दल वादच नाही. तरी, एकंदरीत विचार करता, जे आहे ते वाईट निश्चितच नाही.


आर्यन खन्ना (शाहरुख) एक हिंदी सिनेमातला सुपरस्टार. दिल्लीस्थित गौरव चांदना (शाहरुखच) आर्यनचा नुसता फॅनच नाही तर भक्त असतो. त्याची चेहरेपट्टी थेट आर्यनशी मिळती-जुळती दाखवली आहे. (इथे तो जन्मत:च तसा आहे, हे न दाखवता; त्याने स्वत:ला सर्जरीज वगैरे करून मुद्दाम तसं बनवलंय असं दाखवलं असतं, तर जास्त आवडलं असतं. पण असो !) आपल्या राहत्या भागात 'ज्युनियर आर्यन' म्हणून प्रसिद्ध असलेला गौरव मुंबईला येतो. आर्यनला त्याच्या वाढदिवसाला भेटण्यासाठी. त्याची भेट सहजासहजी होणार नसतेच आणि होत नाहीच. मग त्या भेटीसाठी गौरव एक कांड करतो आणि भेट मिळवतो. मात्र ही भेट त्याच्या आयुष्याला कायमस्वरूपी कलाटणी देणारी ठरते. ह्या भेटीनंतर मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेला गौरव आपल्या 'देवा'च्या आयुष्यात एक वादळ आणतो. ह्या वादळात काय काय उद्ध्वस्त होतं आणि काय काय तग धरून उरतं, त्याची कहाणी म्हणजे 'फॅन'.

शाहरुखसाठी 'फॅन' आव्हानात्मक होता. कारण इथे त्याने त्याच्या 'नार्सिसिज्म'वर विजय मिळवणं अपेक्षित होतं, जे अजिबातच सोपं नाही. पण २४ वर्षांचा अनुभव अगदीच वाया गेलेला नाही, हे शाहरुखने सप्रमाण दाखवून दिलं आणि जे अवघड तेच व्यवस्थित करून दाखवलं, ह्यासाठी मनापासून अभिनंदन ! एरव्ही प्रत्येक भूमिकेत त्या त्या व्यक्तिरेखेवर स्वत:च वरचढ होणारा हा अभिनेता एका अर्थाने 'स्वत:'चीच व्यक्तिरेखा सादर करताना मात्र तिच्यावर वरचढ झाला नाही, ही खरोखरच कमाल आहे.
दुसरा शाहरुख 'गौरव'. दोन भिन्न व्यक्तिरेखांच्या शैलींत असलेल्या थोडीशी भिन्नता शाहरुखने व्यवस्थित राखली आहे. मुळात गौरव हा आर्यनचीच स्टाईल मारणारा आहे. त्यामुळे दोघांत खूप थोडासाच फरक असणार होता, पण तो राखणं अत्यंत आवश्यक होतं. शाहरुखने 'गौरव'ला 'आर्यन'पेक्षा जास्त परिणामकारक केलंय, ह्यातच सर्व काही आलं. आर्यन चांगला झाला असूनही गौरव भाव खाऊन जातो !
मात्र त्याच्या 'नर्वस ब्रेकडाऊन' ला पुरेसं रंगवता आलंय, असं मला तरी वाटलं नाही. त्याचं माथेफिरूपण ठळक करायला हवं होतं. उलटपक्षी त्याचं संतुलन बिघडवणारा धक्का जेव्हा त्याला बसतो, त्यानंतर त्याचं रडणं सिनेमागृहात हशा पिकवतं ! त्यानंतरही जेव्हा जेव्हा तो भावनिक होतो, तेव्हा तेव्हा त्यात गांभीर्य न वाटता गंमतच वाटते. खरं तर तो भावनिक झाल्यावर भीती वाटणं आवश्यक होतं.

विविध दृश्यांची रंगत कमी करण्याचं काम सुमार कॅमेरावर्कने केलं आहे. पाठलागाची दृश्यं जितकी 'एक था टायगर' किंवा 'रेस' मध्ये रोमहर्षक झाली होती, त्याच्या तुलनेतही इथली फिकी झालीत. इंग्रजी सिनेमाशी तर तुलना नकोच. नको तिथे नको तितका क्लोजअप घेण्याचा आचरटपणा आपण कधी बंद करणार आहोत देव जाणे ! अजून एक गोष्ट म्हणजे, गौरवच्या दातांची ठेवण आर्यनहून वेगळी दाखवली आहे. पण ती ठेवण काही दृश्यांत सोयीस्करपणे बदलते ! ह्या सगळ्या ढिसाळपणामुळे कहाणीतलं आणि सादरीकरणातलं 'थ्रील' कमी होतं.

सहाय्यक भूमिकांत वालुस्चा डीसोजा (वालुस्चा - बरोबर लिहिलं ना ?) आणि श्रिया पिळगांवकर सफाईदार काम करतात. श्रियाचा वावर खूपच सहज व आश्वासक आहे. इतर कुणी फारसं दिसत नाही. शाहरुखचा सिनेमा आणि त्यात त्याचा डबल रोल म्हटल्यावर इतर सगळे औषधापुरते असणार, हेसुद्धा टाळावं इतका काही तो सुधारलेला नाही.

सिनेमात एकही गाणं नाही. ही बाब चांगली की वाईट, हे ज्याचं त्याने ठरवावं. गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपट संगीतहीन किंवा हीनसंगीत ह्याच दोन श्रेणींत जास्त करून दिसत आहे. मला तरी ही बाब खटकते. संगीत प्रत्येक वस्तूत आहे आणि ज्या प्रकारे चित्रकलेबाबत म्हटलं जातं की, A picture is worth a thousand words, त्याच प्रकारे एक सुंदर गीतही हजार डायलॉग्सच्या तोडीचं असतं. सिनेसंगीत हे भारतीय चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे, ओळख आहे. ती सोडून देऊन आपण आंतरराष्ट्रीय होऊ पाहतो आहोत. हे पाहून मला पोट फुगवणारी बेडकीण आठवते. उत्तम संगीतनिर्मिती होत नाही, म्हणून जर संगीत चित्रपटापासून विलग होत असेल तर ही खरं तर खूपच लाजिरवाणी बाब आहे.

'फॅन' हे काही आत्तापर्यंतचं शाहरुखचं सर्वोत्तम काम नाही. चक दे, स्वदेस मधला शाहरुख 'फॅन'वाल्या शाहरुखच्या बरीच पाउलं पुढे आहे. मात्र समाधानाची बाब हीच की गेल्या काही चित्रपटांद्वारे शाहरुखचं जे उलटी पाउलं टाकत एक एक पायरी उतरत जाणं सुरु होतं, ते ह्या वेळी झालं नाही. तो काही पायऱ्या चढून पुन्हा एकदा वर आला आहे. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये विंडीज फॉर्मात आल्याने क्रिकेटचाच दर्जा वाढेल, त्याच प्रकारे सिनेमासृष्टीत शाहरुखला आत्मभान आल्यास हिंदी सिनेमाचंच भलं होणार आहे. हिंदी चित्रपटाचा निस्सीम चाहता म्हणून मला इतकंच म्हणावंसं वाटतं की 'रईस'द्वारे शाहरुखने केवळ अजून काही पायऱ्या वर चढू नये तर चक दे, स्वदेस मधल्या स्वत:लाही मागे टाकावं !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
(ता.क. - मी अजूनही शाहरुखचा 'फॅन' नाही !)

Saturday, April 09, 2016

हार-जीत

मी रोजच थकतो, हरतो, उरतो हताश अन् बुजलेला
तो रोज जिंकतो, कुचकट हसतो, गलिच्छ अन् मळलेला
मी पुन्हा भांडतो, भिडतो, नडतो, नव्या-नव्या हुरुपाने
तो तसाच असतो, बदलत नाही, मावळल्या सूर्याने

ही रोजरोजची तीच कहाणी, तीच, तीच अन् तीच
मी जरी बरोबर, जरी न्याय्य पण तरी हार माझीच
हा षंढपणा मी जमवत जमवत मलाच उसवत जातो
तो येता-जाता मला न बघतादेखिल हरवत जातो

ही हार-जीत संपेल कधी, बदलेल कधी का काही ?
की श्वासांची शृंखला संपल्याशिवाय सुटका नाही ?
जे असेल ते राहू दे मी निर्लज्जपणे हरणारच
तो रोज जिंकला तरी नव्याने मी त्याला भिडणारच

....रसप....
०९ एप्रिल २०१६
Related Posts Plugin for WordPress, Blogger...