Wednesday, August 31, 2011

"F5" (मला Refresh व्हायचंय..)



ऑफिस-घर-जेवण-झोप
ऑफिस-घर-जेवण-झोप
हे काय लाईफ आहे?
छ्या: भलतंच बोरिंग आहे!

काही तरी Happening असायला हवं
लाईफ मध्ये Excitement असायला हवं

धम्माल हवी.. मस्ती हवी
यारी हवी.. दोस्ती हवी !
कधी थोडासा माज हवा
बेशिस्तीचा साज हवा
मोकाट सुटावं... बेफाम बनावं..
आयुष्याचीच नशा करून
बेताल नाचावं!

कुणी म्हणेल वेडा
कुणी म्हणेल बेवडा
कुणी म्हणेल मस्तवाल
कुणी म्हणेल माजोरडा !

पण मी मात्र आनंदात न्हाऊन चिंब असीन
अथांगश्या आकाशाला पायाखाली बघीन

लाईफची OS सुद्धा बहुतेक Windows च असते
अधून मधून F5 ची आवश्यकता असते..!
एका दिवसासाठी का होईना मला unstressed व्हायचंय
कधी भेटताय दोस्तांनो? मला Refresh व्हायचंय..



....रसप....
२८ ऑगस्ट २०११

Tuesday, August 30, 2011

You create beauty - अनुवाद


काल ब्लॉग सर्फिंग करताना "सरू सिंघल" ह्यांच्या ब्लॉगवर एक कविता वाचनात आली.. खूप आवडली आणि सहज म्हणून अनुवाद केला..
माझी खात्री आहे, तुम्हालाही ही मूळ कविता खूप आवडेल.


After a long tiring day,
When my heart seeks consoling,
In the night,
When my views are strolling,
To make me live,
You create beauty in life.


Sometimes, when you're away,
My skin feels bare.
Cuddling myself with your photo,
I look for you everywhere.
To tell me life is better than it seems,
You create beauty in dreams.


When the world makes me dumb-struck,
And I sit like a neglect art, ground struck.
To tell me not to care afterwards,
You create beauty in words.


- Saru Singhal


अनुवाद -

एक सरता न सरणारा दिवस
कसाबसा ढकलून झाल्यावर
जेव्हा मनास कुणी तरी गोंजारावंसं वाटतं
जेव्हा सगळं जगच भरकटल्यासारखं भासतं
तेव्हा जगण्याची उमेद देण्यासाठी
तू जीवनातलं सौंदर्य दाखवतोस

कधी तरी तू जवळ नसताना
बोचरं एकटेपण साहताना
तुझ्या फोटोला कवटाळताना
भिरभिरती नजर तुला शोधत असते
ती अगतिकतेची क्षणिकता संपवण्यासाठी
तू स्वप्नातलं सौंदर्य दाखवतोस

ही दुनिया जेव्हा मला हतबुद्ध करते
आणि मी एखाद्या नाकारलेल्या निर्मितीसारखी हताश बनते
सगळी कटुता भुलवण्यासाठी
तू शब्दांतलं सौंदर्य दाखवतोस...

....रसप....
२९ ऑगस्ट २०११

Monday, August 29, 2011

सलाम अण्णा! Salute Anna hajare!



अखेरीस सरकार झुकलं..
अहिंसेच्या ताकदीपुढे झुकलं!

"अजून हा अर्धाच विजय आहे", हे अण्णांचं म्हणणं जरी बरोबर असलं, तरी हा अर्धा विजयसुद्धा अहिंसात्मक  विचाराने दिलेल्या लढ्याचाच आहे. हिंसा फार काळ टिकत नाही आणि तिला बळाचा वापर करून दडपता येतं. पण अहिंसेवर बळाचा उपयोग करता येत नाही, त्यामुळे असा लढा मोडून काढणं फार कठीण असतं. गांधींचे विचार आज पहिल्यांदा मला पटत आहेत. अण्णांनी ते मलाच नव्हे, करोडो भारतीयांना पटवून दिले आहेत.

१२ दिवस उपोषण!
मी १२ तास उपाशी राहू शकत नाही! पण मोठ्या लढाया जिंकण्यासाठी मोठा संयम लागतो.
असं म्हणतात की, एका गाढवांच्या सेनेचा सेनापती सिंह असेल आणि एका सिंहांच्या सेनेचा सेनापती गाढव असेल तर गाढवांची सेना सिंहांच्या सेनेलाही सहज हरवू शकते..!! इथे तर अण्णांच्या सेनेत सेनापतीसह सैनिकही सिंहच होते आणि सरकारच्या सेनेत गाढव सैनिकांचा सेनापती नावाचाच 'सिंह' निघाला..  ना आवाज ना धमक!

काल संसदेच्या विशेष सत्रात लालूप्रसाद आणि शरद यादव ह्या भारतीय राजकारणाच्या सगळ्यात ओंगळवाण्या चेहऱ्यांनी आपली वैचारिक पातळी आणि हीन मनोवृत्ती दाखवताना अण्णा व त्यांच्या टीमवर टीका केली.
शरद यादव ह्यांचं म्हणणं आहे की ते गोरगरीबांची सेवा करून इथपर्यंत पोचले आहेत (!) आणि त्यांचा असा जाहीर अपमान होणे अयोग्य आहे. (म्हणजे खासदारांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करणे, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणे, सर्व नेते भ्रष्ट आहेत असं जाहीरपणे बोलणे, ई.) आणि लालूंनी तर ह्याला जातीय रंग देण्याचा गलिच्छ प्रयत्न केला! म्हणे, "फुले-आंबेडकरांच्या भूमीतून आलेल्या अण्णांनी दलित समाजाच्या समस्यांना का उचलून धरले नाही!"
"सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही" असं म्हणतात ते खरंच आहे. गेल्या १२ दिवसात जनतेने सरकार व राजनेत्यांवरील आपला अविश्वास एकमुखाने, उस्फूर्तपणे दाखवला, तरी त्यातून काही बोध घेणे तर राहिलं दूरच, उलटपक्षी "मियाँ पड़ें तो टंगड़ी ऊँची"!! अजूनही ह्यांचा माज उतरत नाही!

माझ्या "लोकशाहीतून यादवीकडे" ह्या पूर्वीच्या एका लेखात मी म्हटल्याप्रमाणे, ह्या आणि असल्या निर्लज्जांना खुर्चीवर बसवणारे आपणही ह्यात दोषी आहोत.

असो. अजून अर्धी लढाई बाकी आहे. विधेयक अंमलात आल्याशिवाय हा विजय पूर्ण मानता येणार नाही.
पण एक विचार मनात पुन्हा पुन्हा येतोय.. कायदा बनण्याआधीच त्याला तोडायसाठी पळवाटा शोधल्या जातात.. लोकपालाच्या संरचनेतही त्याला बनवणारे स्वत:साठी पळवाटा ठेवतीलच ना?


Sunday, August 28, 2011

एक पाऊस.. (पावसाळी नॉस्टॅलजिया - १५)


एक पाऊस..
पहिल्या सरीचा उत्साह ल्यायलेला..
दरवळता मृद्गंध मनसोक्त प्यायलेला

एक पाऊस..
आवाजही न करता शांतपणे झिरपणारा
गालावरच्या अश्रूप्रमाणे पानांवरून ओघळणारा

एक पाऊस..
कसल्या तरी संतापाने प्रचंड थयथयाट करणारा
चाबकाच्या फटक्यांनी जमिनीला सोलटणारा..

एक पाऊस..
शाळेतल्या शहाण्या मुलासारखा रोज हजेरी लावणारा
खाली मान घालून येणारा, खाली मान घालून जाणारा

एक पाऊस..
धावत धावत अचानक येऊन फट्फजिती करणारा
आणि लगेच थांबून "कशी गंमत केली?" म्हणणारा

एक पाऊस..
अनाहूतपणे तिच्या डोळ्यांमधून डोकावणारा
वाहण्याची वेळ येताच माझ्या डोळ्यांतून झरणारा..

दर वर्षीचा पाऊस, असे अनेक पाऊस घेऊन येतो
आठवणींच्या थेंबांचा वर्षाव करून जातो
कधी होतो तो रिता, कधी मन हलकं होतं
पुन्हा फिरून तरीसुद्धा आभाळ भरून येतं....


....रसप....
२७ ऑगस्ट २०११


Saturday, August 27, 2011

"खुदा" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - २


पसरून विश्व अवघे तू खेळ मांडला जो
नियमांस मी तुझ्या त्या पाळून खेळला तो

सूर्यास झाकले तू काळ्या घरात एका
अन् वाटले तुला मी भांबावलोच आता
पण दीप प्रज्वलूनी अंधार जिंकला मी
माझ्या पुढ्यात तेथे आल्या अनेक वाटा

हातात सागराला घेऊन लोटले तू
मी ठेवले हसूनी त्याच्यावरीच तारू

ती चाल खास होती कोंडी करावयाची
भेदून चक्रव्यूहा शिकलो लढावयासी

केल्या चमत्कृती अन ललकारलेस मजला
मी एक चाल केली गिळले तुझ्याच वझिरा

मृत्यू पुढे करूनी तू खेळले शहाला
मी संपलोच आता हे वाटले तुला ना?
जाणून मी तुझ्या ह्या चालीस फोल केले
आत्म्यास वाचवूनी मी त्यागले तनाला

पसरून विश्व अवघे तू खेळ मांडला जो
खेळीन मीच आता नियमांस बदलुनी तो



मूळ कविता - "खुदा"
मूळ कवी - गुलजार
भावानुवाद - ....रसप....
२५ ऑगस्ट २०११


मूळ कविता -

"खुदा"


पूरे का पूरा आकाश घुमा कर बाज़ी देखी मैने

काले घर में सूरज चलके,
तुमने शायद सोचा था
मेरे सब मोहरे पिट जायेंगे.
मैने एक चराग जलाकर रोशनी कर ली,
अपना रस्ता खोल लिया..

तुमने एक समन्दर हाथ में लेकर मुझपे ढेल दिया,
मैने नोह की कश्ति उस के ऊपर रख दी

काल चला तुमने और मेरी जानिब देखा,
मैने काल को तोड़कर,
लम्हा लम्हा जीना सीख लिया

मेरी खुदी को मारना चाहा
तुमने चन्द चमत्कारों से
और मेरे एक प्यादे ने चलते चलते
तेरा चांद का मोहरा मार लिया

मौत की शह देकर तुमने समझा था अब
तो मात हुई
मैने जिस्म का खोल उतारकर सौंप
दिया,
और रूह बचा ली

पूरे का पूरा आकाश घुमा कर अब
तुम देखो बाज़ी...


- गुलज़ार


"खुदा" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - १ 


Thursday, August 25, 2011

मागणे न काही..



फक्त बोलु दे मला, मागणे न काही
दु:ख खुद्द बोलते बोलणे न काही


तेच ते मनातले खेळ ह्या मनाचे
रोज खेळतो तरी, जिंकणे न काही


मी तुझेच भास हे आपले म्हणावे
धावणे इथे-तिथे, गावणे न काही


भग्नतेतही मला ना दिसे निराशा
राख चाळतो पुन्हा, राखणे न काही


एकटेपणा जरा शोधतो इथे मी
आरसा तुझाच मी, लाभणे न काही


'बोलघेवडा' कधी ते मला म्हणाले
मीच प्रश्न जाहलो, सांगणे न काही


ह्या इथेच मी कधी, हासलो जरासा
वाट थांबली 'जितू', वेचणे न काही


....रसप....
२५ ऑगस्ट २०११

Wednesday, August 24, 2011

"खुदा" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - १


विश्वाच्या पटावर तू माझा खेळ मांडलास

काळ्या घरात सूर्य झाकलास
तुला वाटलं मी भरकटीन
मी एका ज्योतीने आसमंत उजळवला
आणि रस्ता शोधला

हाताच्या रेट्याने एक महासागर लोटलास माझ्या अंगावर
नखाएव्हढी माझी एक नांव त्यावर आरूढ झाली

कोंडी केलीस माझी बिकट परिस्थितीत गाठून
मी हसत हसत त्यातूनही मार्ग काढून दाखवला

चमत्कारांच्या जोरावर
तू माझ्या बुद्धिमत्तेला आव्हान दिलंस
माझ्या छोट्याश्या पावलाने
तुझा चंद्र काबीज केला

मृत्यूच्या रूपाने काटशह देताना तुला वाटलं की
आता मात झालीच
मी नश्वर शरीराची खोळ उतरवून ठेवली
आणि आत्मा पवित्र ठेवला

आता विश्वाच्या पटावर तू माझा खेळ बघ...


मूळ कविता - "खुदा"
मूळ कवी - गुलजार
शब्दश: अनुवाद - ....रसप....
२३ ऑगस्ट २०११



मूळ कविता -

"खुदा"


पूरे का पूरा आकाश घुमा कर बाज़ी देखी मैने

काले घर में सूरज चलके,
तुमने शायद सोचा था
मेरे सब मोहरे पिट जायेंगे.
मैने एक चराग जलाकर रोशनी कर ली,
अपना रस्ता खोल लिया..

तुमने एक समन्दर हाथ में लेकर मुझपे ढेल दिया,
मैने नोह की कश्ति उस के ऊपर रख दी

काल चला तुमने और मेरी जानिब देखा,
मैने काल को तोड़कर,
लम्हा लम्हा जीना सीख लिया

मेरी खुदी को मारना चाहा
तुमने चन्द चमत्कारों से
और मेरे एक प्यादे ने चलते चलते
तेरा चांद का मोहरा मार लिया

मौत की शह देकर तुमने समझा था अब
तो मात हुई
मैने जिस्म का खोल उतारकर सौंप
दिया,
और रूह बचा ली

पूरे का पूरा आकाश घुमा कर अब
तुम देखो बाज़ी...


- गुलज़ार

Monday, August 22, 2011

राजहंस मी


राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही
डौलदारशी चाल मंदशी पळण्याचाही सराव नाही


कधी ओढली चर्या नाही उदासवाणे गीत गाउनी
कधीच फडफड पंखांची ना कधी न केला दंगाही मी
शांत विहरतो, कधीच केला क्रुद्ध होउनी उठाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही


ध्यान लावुनी डाव साधणे येथ चालली कुटील नीती
मला न मंजुर डाव रडीचा तुम्हीच पाळा तुमच्या रीती
स्थितप्रज्ञतेचा हा खोटा दर्शनरूपी बनाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही


किल्मिष नाही मनात काही कळकट माझी वसने नसती
मला न भासे ददात कसली कृपा ईश्वरी माझ्यावरती
तुम्हासारखा खुद्द आपला इथे मांडला लिलाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही


कुणास वाटे गर्व कुणाला दिसते माझी मुजोर वृत्ती
प्रसन्नतेचे गुपीत माझ्या मनात आहे निस्सिम भक्ती
सुखी जीवनावरती माझ्या भोग विलासी प्रभाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही



....रसप....
२१ ऑगस्ट २०११

Sunday, August 21, 2011

एक दिन जब सवेरे सवेरे.... - भावानुवाद


मऊ अंधाऱ्या शालीत गुरफटलेला
पर्वताची उशी करून निजलेला सूर्य
एका भल्या पहाटे जेव्हा जागा झाला,
तेव्हा दिसलं.. 
मनातल्या अंगणात प्रेमाचा बहर फुलला आहे
प्रत्येक आठवणीच्या डहाळीवर
रंगीबेरंगी क्षणांच्या कळ्या दरवळत आहेत

अव्यक्तशी इच्छा..
अर्धवट जागी होऊन, किलकिल्या डोळ्यांनी पाहू लागली
प्रत्येक लाटेबरोबर..
प्रत्येक झुळूकीसरशी
वाहाणारं जीवन
जणू प्रत्येक क्षणाला नवं
अन् तरीही तसंच.. जुनं
कुशीत प्रेमाची उब आहे
डोळ्यांत स्वप्नांची ओल आहे
मीलनाचे क्षण आहेत
विरहाचे व्रण आहेत
आणि एक जाणीव आहे
खळाळत्या ओढ्यासारखा कालौघ सांगतो आहे -  
मनातल्या अंगणात प्रेमाचा बहर फुलला आहे
प्रत्येक आठवणीच्या डहाळीवर
रंगीबेरंगी क्षणांच्या कळ्या दरवळत आहेत.....


मूळ कविता - एक दिन जब सवेरे सवेरे....
मूळ कवी - जावेद अख्तर
स्वैर अनुवाद - ....रसप....
२० ऑगस्ट २०११


मूळ कविता -


एक दिन जब सवेरे सवेरे,
सुरमई से अँधेरे की चादर हटाके,

एक परबत के तकिये से सूरज ने सर जो उठाया,तो देखा..
दिल की वादी में चाहत का मौसम हैं..
और यादों की डालियों पर

अनगिनत बीतें लम्हों की क़लिया महकने लगी हैं..

अनकही अनसुनी आरजू,

अर्धवट आँखे मलते हुए देखती हैं..
लहर दर लहर,मौज दर मौज बहती हुई जिंदगी
जैसे हर पल नयी पर फिर भी वही.. हाँ, वही जिंदगी..
जिसके दमन में एक मोहब्बत भी हैं, कोई हसरत भी हैं..
पास आना भी हैं, दूर जाना भी हैं
और ये एहसास हैं..
वक़्त झरने सा बहता हुआ,
जा रहा हैं, ये कहता हुआ..
दिल की वादी में चाहत का मौसम हैं..
और यादों की डालियों पर
अनगिनत बीतें लम्हों की क़लिया महकने लगी हैं..

--- जावेद अख्तर

Saturday, August 20, 2011

तुझ्या पावलांचे..

तुझ्या पावलांचे ठसे कालचे
जसे आजचे हे तसे कालचे!

पहा प्रश्न करतील सारे तुला
तुझे रूप आता नसे कालचे

कधी वाटले ना तुला वा मला
नको ते घडावे असे कालचे

अजूनी तुझा गंध रेंगाळतो
तरी विस्मरावे कसे कालचे?

मघाशीच मी पाहिला आरसा
तुझे हास्य तेथे वसे कालचे!

नको नाव घेऊस माझे कधी
कधी सत्य ना होतसे कालचे


....रसप....
१६ ऑगस्ट २०११

Friday, August 12, 2011

पाऊस कालचा

होता जरा अधाशी पाऊस कालचा
संपूनही उपाशी पाऊस कालचा

वाहून सांज गेली, मागे उदास गाणे
मी घेतला उशाशी पाऊस कालचा

आहे उरात ओली ही आग का कळेना
तो बोचतो मनाशी पाऊस कालचा

भिंती चहूकडूनी, होतात कोंडमारा
ओथंबला छताशी पाऊस कालचा

दारास, अंगणाला चाहूल ना कुणाची
रेंगाळला घराशी पाऊस कालचा


....रसप....
११ ऑगस्ट २०११

Thursday, August 11, 2011

तुझे "मिसरे"..


तुझ्याच पायी लोळण घेती दरवळणारे हजार मिसरे
कधी मला तू ओंजळ भरुनी थोडेसे दे उधार मिसरे


स्पर्श तुझ्या कलमाचा होउन लखलखणारा शब्द एक दे
झळकुन होतिल कनक अन्यथा असेच माझे सुमार मिसरे


सुगंध यावा कागदासही अशी सुगंधी गझल वाचली
फिरून फुलली बाग पुन्हा ते उधळुन गेले बहार मिसरे


थकलो, हरलो, पिचून गेलो रहाटगाडा ओढुन आम्ही
निश्चल झाल्या मनास देती जोम, दिलासा, उभार मिसरे


जसा षड्ज ऐकुनी चुकावा रसिकाच्या हृदयाचा ठोका
तसेच गझला तुझ्या वाचुनी शायर विसरे टुकार मिसरे


शरण तुला हा 'जीत' येतसे शब्दकोकिळे अद्वितीय तू
मला कधी ना सूर गावला, तुझे सुरेले तुषार मिसरे !



....रसप....
९ ऑगस्ट २०११

क्रांती ताई साडेकर ह्यांच्यासाठी


"मिसरा" (उर्दू) - कवितेतील/ खासकरून गझलेतील एक ओळ/ चरण/ पंक्ती. 

Wednesday, August 10, 2011

कुंतलकाळी रात सारुनी..


कुंतलकाळी रात सारुनी पहाटवारा खेळत होता
तुझ्या कुशीतुन हळूच निसटुन पहाटवारा हासत होता


सुगंध श्वासांमधून माझ्या तनामनाला व्यापुन गेला
दरवळ माझ्या 'रातकली'चा पहाटवारा उधळत होता


क्षितिजावरचा रक्तलालिमा नव्हता ओठांपरी रंगला
तुझ्या मल्मली मिठीस वेडा पहाटवारा उसवत होता


अजून बाकी तृषा मनाची स्वप्न मनोहर अजून बाकी
फुले शहारा पुन्हा पुन्हा अन् पहाटवारा डिवचत होता


रिमझिम श्रावण सरी झेलतो गवाक्षातुनी चोरुन बघतो
पळवे ना त्या चंद्राला तो पहाटवारा गुंजत होता


कधी न ऐसा गंध माळला कैफ न ऐसा कधी जाणला
गुपीत कानामधे येउनी पहाटवारा सांगत होता


....रसप....
९ ऑगस्ट २०११

Tuesday, August 09, 2011

कालचा बस स्टॉप

डोळ्यांसमोर आहे बस स्टॉप कालचा
सलतो मनात माझ्या बस स्टॉप कालचा

माझे मला कळेना आली कशी उदासी
सुनसान वाटला तो बस स्टॉप कालचा

येथेच हासलो मी, येथेच प्रेम केले
वाटे तरी दुजा का बस स्टॉप कालचा

गर्दीच चेहऱ्यांची कोणी न ओळखीचे
होता अनोळखीसा बस स्टॉप कालचा

पाहून पिंपळाला काळोख ल्यायलेला
झोपून गाढ गेला बस स्टॉप कालचा

....रसप....
८ ऑगस्ट २०११
बस स्टॉप वरच्या कविता

Monday, August 08, 2011

लोकशाहीतून यादवीकडे..

नऊ हजाराचा साबण.. पन्नास लाखाचा दिवा.. १५ कोटींच्या कुंड्या..!!
शीला दीक्षित च्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा वाचत होतो. मनात विचार आला, किती भूक आहे ह्या हरामखोरांची? मला जर एकरकमी १० कोटी मिळाले तर मी माझं अख्खं आयुष्य ऐश करू शकतो! ह्यांच्या अश्या काय गरजा आहेत की कितीही कमावलं (कमावलं कसलं.. लाटलं) तरी पुरेसं वाटतच नाही?
ह्या काळ्या पैश्याची एक समांतर अर्थव्यवस्था चालू आहे, जिची उलाढाल देशाच्या अर्थसंकल्पाच्या कैक पटींनी मोठी असावी..! खरंच अशी परिस्थिती आहे की देशभरातील झाडून सगळ्या लहानमोठ्या राजकारण्यांना एकत्र करून डोळे मिटून त्या गर्दीत एक खडा टाकला तर तो ज्याला/ जिला लागेल त्याने/ तिने काही कोटी रुपये कालच खाल्लेले असतील!
पण कुणाला दोष द्यावा? माझ्या मते स्वत:लाच. कारण असं म्हणतात -

"People deserve the government they get." 

अर्थात, जनतेला तिच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळतं.
बरोबरच आहे. राजकारणी, सरकारी अधिकारी, पोलीस वगैरेंना भ्रष्ट म्हणणारे आपण स्वत: तरी कितपत स्वच्छ आहोत? लहान मुलाचे फालतू लाड करून आपणच त्याला बिघडवतो आणि मग "तू अमुक केलंस तर मी तुला तमुक देईन" अशी लाच खायची सवय बालपणातच लावतो. मोठा होऊन तोच मुलगा/ तीच मुलगी जर कुणी भ्रष्ट अधिकारी बनला/ बनली तर त्यात आश्चर्य काय? सिग्नल तोडल्यावर पोलिसाला चिरीमिरी आपण देतो, म्हणूनच त्याला ते घेण्याची सवय लागली ना? एक काळ असा होता की पोलिसाला ट्रकवाल्याकडून पैसे खाता येतात हे माहीतही नव्हतं! जर कधी कुणी पोलिसाने चुकून-माकून काही "घेतलंच" तर तेही तो स्वत: हातात घेत नसे.. दूर कुठल्याश्या पानाच्या टपरीवर/ दुकानात दे म्हणत असे! 
हे नेते, हे अधिकारी आपल्यातूनच वर गेले ना? आपणच त्यांना घडवले ना? तुमचं पोर नतद्रष्ट निघालं तर त्याचा अर्थ तुमचे संस्कार पोकळ होते असाच होईल ना? 
जसजसा काळ पुढे चाललाय.. तसतसं घोटाळ्यांच्या रकमेपुढची शून्यं वाढतच चालली आहेत! आणि एकजात सगळेच भ्रष्ट! असं का व्हावं? आणि कुठवर चालणार असं? आज ना उद्या ह्याचं पर्यावसान नक्कीच यादवीत होणार आहे. 
मला वाटतं दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी आपण स्वत: अंतर्मुख व्हायला हवं. कळत नकळत आपण स्वत:ही किती भ्रष्ट झालो आहोत, आपण स्वत:ही भ्रष्टाचार कसा पोसतो आहोत, घडवतो आहोत ह्याचा विचार करायला हवा.  

Sunday, August 07, 2011

शब्दांच्या बागा सजल्या..



शब्दांच्या बागा सजल्या गंधून दिशा मोहरल्या
ती येता कळीकळीच्या अव्यक्त तृषा तोषवल्या


गहिवर येता दु:खाला काळीज हुंदका देते
कित्येक व्यथांच्या सरिता होऊन खुद्द ओसरल्या


आनंद कधी मावेना गगनामधुनी वाटावे
एकाच चिठोऱ्यावरती साऱ्याच छटा ओघळल्या


उलट्या सुलट्या प्रश्नांचे काहूर मनी दाटावे
अतृप्त सरी मग काही मनसोक्त धुंद कोसळल्या


हुरहूर गूढशी किंवा अज्ञात बोच काहीशी
अडकून गुंतल्या गाठी हलकेच कुणी सोडवल्या


डोळ्यांत सत्य खुपताना अन् क्रुद्ध मुठी वळताना
बेड्या पडलेल्या कविता अपुलाच कंठ सोलटल्या


भक्ती भरल्या हृदयाला तो ध्यास लागला 'त्या'चा
संसारी चिंता साऱ्या 'त्या'च्यावरती सोपवल्या


पाहूनी अपुल्या प्रेमा जो 'जीतू' झाला वेडा
एका नजरेच्या डोही त्याने गझला घोळवल्या



....रसप....
६ ऑगस्ट २०११

Saturday, August 06, 2011

हे जीवन म्हणजे खेळ वेगळा....

हे जीवन म्हणजे खेळ वेगळा 
बाजी खेळत जाणे 
"हार-जीत" चा नसे फैसला
नवे डाव मांडणे
गीत मनाचे गात रहावे
सूर जरी ना जुळले
शब्दपाकळ्या उधळित जावे
रंग जरी ना दिसले
सुख दु:खाला कुणी बांधले 
मिळे त्यास भोगणे
............. हे जीवन म्हणजे खेळ वेगळा.... बाजी खेळत जाणे 
स्वप्न भंगता ठिकऱ्या ठिकऱ्या
मोजुन वेचुन घे तू
तुकडे सारे पुन्हा जोडुनी
भरून नयनी घे तू
कधी कुणाला सर्व लाभले
तडजोडी पोसणे  

............. हे जीवन म्हणजे खेळ वेगळा.... बाजी खेळत जाणे 
पोळुन लाही लाही होते
असे ऊनही सरते
फुटून अंबर धो-धो बरसे
ते पाणी ओझरते
ऋतू-ऋतूचा घाव निराळा
सोसुन झेलुन घेणे

............. हे जीवन म्हणजे खेळ वेगळा.... बाजी खेळत जाणे 
....रसप....
४ ऑगस्ट २०११

Friday, August 05, 2011

"शायर उधारी" (बस स्टॉप वरच्या कविता)

"यह बाईस-ऐ-नौमीदी-ऐ-अरबाब-ऐ-हवस हैं
ग़ालिब को बुरा कहतें हो अच्छा नहीं करतें"

अर्थ विचारण्याची हिंमत
आमच्यात नसते
बस स्टॉप वरती "वाह वाह"
त्याला नेहमीच मिळते

काळी जीन्स आणि
चौकटीचा शर्टं
पायात फ्लोटर्स
डोक्यावर घरटं

आजपर्यंत "उधारी"ला
असाच बघत आलोय
"बाउन्सर" शायरीला
गुमान ऐकत आलोय

फटीचर बुडाचा
नेहमीच 'कडकी"त असतो
आमचीच सिगरेट घेऊन
आम्हालाच चावत असतो

त्यालाही कळतं -
आम्ही त्याची खेचतो
"वाह.. तेरी माँ की!"
म्हटल्यावर तोसुद्धा हसतो!

"शायर उधारी"
जन्मजात भिकारी
बाप गिरणी कामगार
पोसलेली बेकारी!

एका खोलीच्या घरात
नऊ जण राहतात
काळ्याकुट्ट वर्तमानात
स्वप्नांना शोधतात

ऐंशीच्या पुढचे आजी-आजोबा
कंबरेतून वाकतात
कमनशिबी लोकच कसे
दीर्घायुषी असतात?

परिस्थितीबद्दल आम्हाला
सहानुभूती आहे
पण त्याच्या शायरीवर
स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे!!


....रसप....
४ ऑगस्ट २०११

 
 

Thursday, August 04, 2011

"सुखी पाप" झालो


जरा धुंद झालो, तसे फार नाही
जराशीच प्यालो, तसे फार नाही


जरा वाटले की बघावेत तारे
ढगांना मिळालो, तसे फार नाही


जरा घोट घ्यावा मधू अमृताचा
मनाशी म्हणालो, तसे फार नाही


जरा वेदनेला मिळो झोप थोडी
असा सुन्न झालो, तसे फार नाही


जरा सूर शब्दांत गायील माझ्या
सुरेलाच ल्यालो तसे फार नाही!


जरा भावनांनी मला व्यक्त व्हावे
अनासक्त झालो, तसे फार नाही


जरा पाहिली मी जुनी स्वप्नं माझी
पुन्हा चिंब न्हालो, तसे फार नाही


जरा चाखली मी "ति"ची गोड लाली
जळूनी म्हणालो, तसे फार नाही


जरा बैस माझ्या समोरीच 'जीतू'
"सुखी पाप" झालो, तसे फार नाही



....रसप....
३ ऑगस्ट २०११

Tuesday, August 02, 2011

इकतारा - १ (रूह का बंजारा..) - भावानुवाद

मूळ चालीत लिहायचा प्रयत्न केला आहे -  

पाखरू मनाचं मुक्त झालं
सोडुनी घराला दूर गेलं
सोडुनी घराला दूर गेलं, तोडुनी
रे घराला तोडुनी गेलं सोडुनी
मिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही
वाहतात थेंब काही
मिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही
वेदना उठे ऐकुनी मनी गीतमल्हार रे

नादहीन तुझी एकतारी एकतारी
नादहीन तुझी एकतारी
नादहीन तुझी एकतारी एकतारी
नादहीन तुझी एकतारी


निशा कालची पारोशी बैसली उशाला
परतली उषा पाहूनी बंद दरवाज्याला
जीव कावला कोंडूनी श्वास थंडावले
साद गुंफते दु:खाची एकटेपणाला
साद गुंफते
साद गुंफते
एकटेपणा
एकटेपणा

मिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही
वाहतात थेंब काही
मिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही
वेदना उठे ऐकुनी मनी गीतमल्हार रे

नादहीन तुझी एकतारी एकतारी
नादहीन तुझी एकतारी
नादहीन तुझी एकतारी एकतारी
नादहीन तुझी एकतारी



मूळ गीत - इकतारा (रूह का बंजारा..)
मूळ गीतकार/ कवी - अमिताभ भट्टाचार्य
संगीत - अमित त्रिवेदी
चित्रपट - वेक अप सिड

भावानुवाद - ....रसप....
२ ऑगस्ट २०११
मूळ गीत -
रूह का बंजारा रे परिंदा
छड गया दिल का रे घरौंदा
छड गया दिल का रे घरौंदा तोड़ के
वे घरौंदा तोड़ के, गया छोड़ के
जे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद
बह जाए बूँद बूँद
जे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद
तड़पाए रे, क्यूँ सुनाए गीत मल्हार दे

बेमलंग तेरा इकतारा इकतारा
बेमलंग तेरा इकतारा

बेमलंग तेरा इकतारा इकतारा
बेमलंग तेरा इकतारा

बीती रात बासी बासी पड़ी है सिर्हाने
बंद दरवाजा देखे लौटी है सुबह
ठण्डी है अँगिठी, सीली सीली हैं दिवारें
गूँजे टकराके इनमें दिल की सदा
गूँजे हाए रे
गूँजे हाए रे
दिल की सदा
दिल की सदा

जे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद
बह जाए बूँद बूँद
जे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद
तड़पाए रे, क्यूँ सुनाए गीत मल्हार दे

बेमलंग तेरा इकतारा इकतारा
बेमलंग तेरा इकतारा
बेमलंग तेरा इकतारा इकतारा
बेमलंग तेरा इकतारा

- अमिताभ भट्टाचार्य

Monday, August 01, 2011

"S. N. S." (सोशल नेटवर्कींगचे श्लोक)

ट्विटा, ऑर्कुटा, फेसबूकी दिसावे
असे "सोशली" सर्व काही करावे
नसे छंद ना जाण काही तरीही
दिसे त्याच ग्रूपात सामील व्हावे


कुणाचा कुणाशी मिळे सूर भावे
कुणाशी उगा वाद घालीत जावे
जरी ना कुणाला कुणी जाणतो रे
तरी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकार व्हावे


म्हणे "आज आंघोळ केलीच नाही"
म्हणे "आज कॉफीत माशी मिळाली"
"असा पादलो मी, तसा वास आला"
अशी फालतू रोज उक्ती करावी..!


नसे दूरचाही जरी गोत काही
तरीही कुणाला कुणी टॅग लावी
कुणी दात काढी जरी बोध नाही
अशी शृंखला ती पुढे जात राही


इथे वेगळी "शॉर्ट लँग्वेज" चाले
"एलोएल"* जोरात हसता म्हणाले
म्हणी 'के'च 'ओके'स हटकून सारे
"बि आर् बी"* म्हणूनी कुणी लुप्त झाले..!


इथे सुंदरींचे पहावेत फोटो
भिडवण्यात 'टाक्या'स गुंतून जो तो
पहा आज हुंगून तूही मजेने
जुळे बंध झटक्यात अनुबंध होतो


जरी वाटले की असे फोल चाळा
इथे सज्जनांचा भरे खास मेळा
कधी कोण विद्वान संवाद साधी
कधी आवडी मित्र होतात गोळा


तुम्हा लाभला हा किती छान मेवा
करा "नेटवर्कींग" 'फ्री'चीच सेवा
कधी व्यावसायीक संबंध जोडा
जुने मित्र शोधा खरा तोच ठेवा



....रसप....
२७ जुलै २०११



एलोएल* = LOL (Laughing Out Loud)
बि आर् बी* = BRB (Be Right Back)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...