Thursday, July 25, 2013

वेडा (सुनीत)

'मराठी कविता समूहा'च्या 'लिहा ओळीवरून कविता - भाग १०७' मध्ये माझा सहभाग -

डोळ्यांखाली नकळत बनली वर्तुळे शुष्क काळी
दृष्टीसुद्धा विझुन हरवली शून्य देशात गेली
जाळे आठ्यांमधुन पसरले कृष्णवर्णी कपाळी
झोळी त्याची मळकट विटकी भार खांद्यास झाली

प्रत्येकाने सजवुन लिहिली त्या खुळ्याची कहाणी
कोणासाठी मजनु अपयशी प्रेमखेळात झाला
कोणी बोले बहुत धनिक तो भोगतो शापवाणी
आला होता कुठुन समजले ना कधीही कुणाला

धुंदीमध्ये बडबड करि तो नेहमी आपल्याशी
ऐकू आले सहजच मज तो गातसे काव्यओळी
नाही त्याला फिकिरच कुठली सख्य नाही जगाशी
काही बाही खरडत असतो गच्च ती पूर्ण झोळी

काव्योत्पत्ती हरवत असतो बावळा हा, तसा मी
तोही आता समजुन हसतो आपला, हासता मी !

….रसप….
२५ जुलै २०१३
वृत्त - चन्द्रलेखा

Monday, July 22, 2013

ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा..

ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा
मन माझे माझ्या घरात लागत नाही मित्रा

शेजार कधी पक्ष्यांचा होता किलबिल किलबिल
रात्रीस सोबती तारे होते झिलमिल झिलमिल
खिडकीत डहाळी आता वाकत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

प्राजक्त अंगणी गंध प्रितीचे सांडत होता
तो चाफा राजस रंग उषेचे माळत होता
आता दगडांतुन अंकुर हासत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

मी दूर दूरच्या नवीन देशी जावे म्हणतो
आवडते गाणे विसरुन दुसरे गावे म्हणतो
ह्या सुरांत आता रंगत वाटत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

येशील कधी तू भेटण्यास हे वाटत होते
पण एक अनामिक मळभ मनाशी दाटत होते
तू गेल्यावर मी माझ्यासोबत नाही मित्रा
................ मन माझे माझ्या घरात लागत नाही मित्रा 

....रसप....
२१ जुलै २०१३
(संपादित - ५ जानेवारी २०१९)

Sunday, July 21, 2013

लवलेटर

"अनेकदा हे सुचले होते
पण ना कधीच जमले होते
तुला सांगणे मनातले मी
ठरले होते, फसले होते

आज मात्र मी लिहिले आहे सगळे काही
आवडले ना तुला तरीही पर्वा नाही

तू वाचावे म्हणून आहे लिहिले सारे आज सविस्तर
मनात भीती वाटत आहे तरी वाच तू हे लवलेटर -

तुला पाहिले
जेव्हापासुन
मनास नाही
मुळीच थारा
असतोही मी
मी नसतोही
चालत असतो
पोचत नाही

कुणास ठाउक
काय हरवले
शोधत आहे
काय इथे मी
उगाच वाटे
मलाच माझे
तुझ्याचपाशी
आहे बहुधा
जे मी शोधत
आहे येथे

सांग मला तू
पहिल्या वेळी
पाहिलेस ना
तेव्हा काही
त्या नजरेने
ह्या नजरेचे
दिले-घेतले
होते असले
जाणवले का ?

असेल किंवा
नसेलही पण
इतके नक्की
खरेच, की ती
मनात जपली
छबी लाडकी
तुझीच आहे

नकार जर का
असेल तर तू
शांतपणाने
परत मला कर
हे लवलेटर….
समजा जर का
असेल 'हो' तर
नकोस बोलू
त्या धक्क्याने
वेडा होइन
म्हणून एकच
दे तू उत्तर
दे लवलेटर….

असेल 'ना' तर
'हे' लवलेटर
असेल 'हो' तर
'ते' लवलेटर !!"
.
.
.
.
.
इतके लिहिले आणि वाटले जरा थांबतो
तिच्या मनाचे अंदाजाने समजुन घेतो
आधी थोडी
मैत्री करतो
जवळिक करतो
नंतर देतो
हे लवलेटर

जरा थांबलो आणि कळाले
की लवलेटर तिला मिळाले
माझे नाही…
अन्य कुणाचे..!!
ती फुललेली
तो खुललेला
पुन्हा एकदा
मनात माझ्या
एक निखारा
धगधगलेला

उशीर केला म्हणून उरले हातामध्ये हे लवलेटर
तिला न कळले, मला न जमले पुन्हा राहिला प्रश्न निरुत्तर

….रसप….
२१ जुलै २०१३

Saturday, July 20, 2013

फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)

कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.

तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.



चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.

शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.

श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.

गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.

एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.

रेटिंग - * *  

Tuesday, July 16, 2013

कळले ताई ?

शाळेसाठी
जातानाचा
डोंगरातला
रस्ता होता
आठवतो का
आता ताई ?

घोट्याइतके
खळखळ पाणी
असलेला तो
ओढा लागे,
त्याच्यानंतर
माळावरच्या
चिखलामधली
पायवाटही
थबथब थबथब..!!
आठवते का ?

रोज तिथूनच
दूर-दूरच्या
शाळेसाठी
चालत जाणे
तरी कधीही
कंटाळाही
आला नाही
आठवते का ?

बरेच चालुन
गेल्यावरती
शाळा येई
तू आनंदी
अन् मी दु:खी
रोज व्हायचो
आठवते का ?

कितीकितीदा
माझ्या बाई
माझ्याबाबत
तक्रारींचा
तुझ्याचपाशी
पाढा वाचत
पण तू कधिही
आईला ना
सांगितले ते
आठवते का ?

मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत
तू नसल्याच्या
तक्रारींना
कुणाकडेही
कधीच मीही
मांडत नाही
कळले ताई ?

....रसप....
१६ जुलै २०१३

Sunday, July 14, 2013

मला ओढ नाही तुला भेटण्याची..

'मराठी कविता समूहा'च्या 'प्रसंगावरून गीत - भाग क्र. २७' ह्या उपक्रमात माझा सहभाग -

मला ओढ नाही तुला भेटण्याची
तुला भेटतो रोज स्वप्नातुनी
मला फक्त सांगायचे हेच आहे
तुला चोरले मी तुझ्यापासुनी

पुन्हा एकदा रंग आला ऋतूला
तुझी फक्त चाहूलही लागता
तुझ्या आवडीची फुले हासती अन्
सुगंधी हवेचा सुरू राबता
दिसे आज प्रत्येक रस्ता नव्याने
जणू चालला घेत वळणे जुनी
मला ओढ नाही तुला भेटण्याची
तुला भेटतो रोज स्वप्नातुनी

कशाला कुणाला मनातील सांगू
तुझ्यावर इथे सर्व असती फिदा
तुझे नाव ऐकून गुंगीत सारे
तुझी धुंद मदमस्त ऐसी अदा
मला ना नशा ही, तुझी सावली मी
कुठे जायचे मी तुला टाळुनी
मला फक्त सांगायचे हेच आहे
तुला चोरले मी तुझ्यापासुनी

....रसप....
१४ जुलै २०१३  

Saturday, July 13, 2013

न धावणारा मिल्खा सिंग (Bhaag Milkha Bhaag - Movie Review)

राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर आणि मिल्खा सिंग ह्या तिघांसाठी हा चित्रपट पाहायला गेलो. तिथे गेल्यावर दिसलं, मीच नाही शेकडो लोक आले होते, ह्याच तिघांसाठी. प्रवेशद्वाराबाहेर तोबा गर्दी होती. अशी गर्दी मी फक्त 'वाँटेड', 'एक था टायगर' ह्या सलमानपटांसाठी पाहिली होती. दरवाजा उघडण्यासाठी सगळेच आतुर होते. शर्यत सुरु होण्यापूर्वी 'गेट सेट गो' च्या वेळी सगळे स्पर्धक जसे असतात तसेच होते का? कदाचित ! कारण मी तर होतोच. दरवाजा उघडला. गर्दी इतकी होती की आम्ही - आई, बाबा, बायको, मी आणि मित्र विनायक - जागेवर पोहोचेपर्यंत नामावली सुरूही झाली.

वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग - द फ्लाईंग सिख - बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. ही एक मोठी बातमी असते. 'मिल्खा हरला.' अशी चित्रपटाची रोमांचक सुरुवात होते. किंचितशी 'चक दे' ची आठवण होते. पण किंचितशीच आणि थोडा वेळच. कारण ह्या रोमांचक व वेगवान सुरुवातीनंतर चित्रपट पुन्हा हा वेग पकडत नाही. आपण 'भाग मिल्खा भाग' बघत असतो, पण मिल्खा रमतगमत चालतो. मध्येच थोडासा धावतो, पण लगेच पुन्हा थांबतो. संपूर्ण पुढचा प्रवास असाच 'थांबा - पहा - पुढे जा' आहे.

'मिल्खा सिंग' भारतीय क्रीडाजगतातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आज क्रिकेटव्यक्तिरिक्त कुठल्याही क्षेत्रात भारताला अजिबात भाव मिळत नाही. पण एके काळचा हॉकीतला दादा भारत, त्याच काळात अभिमानाने एक खेलरत्न मिरवत होता. 'धावपटू मिल्खा सिंग'.

सध्याच्या पाकिस्तानातील मुलतान भागात मिल्खा सिंगचा जन्म होतो. फाळणीची भयंकर झळ लागलेल्या हजारो निरापराध कुटुंबांपैकी एक मिल्खाचं कुटुंब होतं. बालवयातच बेघर, अनाथ झालेला मिल्खा दिल्लीत आला. दिल्लीच्या गल्ल्यांत उलटसुलट धंदे करणारा मिल्खा सिंग एकेक पायरी चढत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू बनला. एक असामान्य प्रवास ! हाच प्रवास, त्यातील अनेक अडथळे, वळणे 'भाग मिल्खा भाग' मांडतो. अर्थातच ह्यात बऱ्यापैकी सूट घेऊन काही काल्पनिक भागही आहेच. ह्यातील काही काल्पनिक व सत्यकथन थरारक आहे, तर काही मनोरंजक. पण काही भाग दिग्दर्शकाला अपेक्षित थरार व मनोरंजन करण्यात कमी पडतो. काही भाग तर अगदीच अनावश्यक वाटतो. उदा. सोनम कपूरची व्यक्तिरेखा. कुठलाही आगा-पिछा न दाखवलेली ही व्यक्तिरेखा चित्रपटात येते आणि जाते. कहाणीत विशेष फरक पडत नाही. असे लहान-मोठे तुकडे मिल्खाला धावूच देत नाहीत. चित्रपटभर प्रेक्षक मिल्खाच्या वेगाची अपेक्षा करत राहातो. सव्वा तीन तास उलटून जातात, पण वेग सापडत नाही. सुरुवातीच्या दृश्यात मिल्खा हरतो आणि शेवटच्या दृश्यात चित्रपट. अगदीच शेवटचा वगैरे येत नाही, पण पदकही मिळत नाही व नैराश्य पदरी पडतं.



मिल्खा सिंगना ऑलिम्पिक पदक मिळालं नव्हतं. तरी त्यांची कामगिरी अद्वितीयच होती. ज्या परिस्थितीवर मात करून व जी मेहनत करून त्यांनी ऑलिम्पिकेतर स्पर्धांत भारताचं नाव केलं, ते निश्चितच 'क़ाबिल-ए-तारिफ़' होतंच. तद्वतच, चित्रपट चांगला असला तरी अपेक्षेइतका चांगला नसला तरी, 'मिल्खा' मन जिंकतो. फरहान अख्तरची मेहनत फक्त त्याच्या 'पॅक्स'वरूनच दिसत नाही. तर त्याची देहबोलीसुद्धा एखाद्या सैनिकाची व खेळाडूचीच वाटते. शर्यतींत धावणारा फरहान अख्तर खरोखर एखाद्या व्यावसायिक धावपटूसारखा, ते तंत्र समजून घेऊन, धावत असतो. त्याचं चालणं, बोलणं आणि आपल्या लक्ष्याला वाहून घेणं कधीच हे जाणवू देत नाही की हा 'फरहान अख्तर' आहे. आपण पूर्ण वेळ फक्त आणि फक्त 'मिल्खा'च पाहात असतो. तरुणपणी स्वतःच्या मूळ गावी आल्यावर हमसून हमसून रडणारा मिल्खा मात्र जरा कमी पडल्याचं प्रकर्षाने जाणवतं.

सोनम कपूर एका छोट्या व अनावश्यक भूमिकेत आहे. ती अभिनयाचा मनापासून प्रयत्न करते. पण ती 'मनापासून प्रयत्न करत आहे' हेच जाणवत राहतं.

दिव्या दत्ता ह्या गुणी अभिनेत्रीला अखेरीस बऱ्यापैकी वाव मिळाला आहे, ह्याचा मला खूप आनंद झाला. मिल्खावर आईसारखी माया करणारी मोठी बहिण तिने अप्रतिम साकारली आहे. तिचं प्रत्येक दृश्य ती जिंकते. दिग्दर्शक दिव्या दत्ता पडद्यावर असताना इतर कुणाला मुद्दामच जास्त वाव देत नाही. कारण इथे कदाचित फरहानचा मिल्खा कमी पडलाच असता. त्यामुळे जिथे जिथे दिव्या दत्ता आहे, तिथे तिथे ते ते दृश्य तिच्यावरच जणू एकवटलं आहे.

पवन मल्होत्रा हाही एक अत्यंत गुणी कलाकार. त्यालाही इथे बराच वाव मिळाला आहे. त्याच्यातला सैनिक त्याने खूप भावनिक बनवला आहे मात्र. दिव्या दत्ता आणि पवन मल्होत्रा निम्म्याहून अधिक दृश्यात गहिवरतात व गहिवरवतात.

इतर भूमिकांतून दिलीप ताहिलने साकारलेले पं. नेहरू लक्षात राहतात. फार काही काम नाहीये. पण एकदम डिट्टो वाटतात !

शंकर-एहसान-लॉयला बऱ्याच दिवसांनी ऐकलं का ? बहुतेक हो. हवन करेंगे, घुलमिल घुलमिल आणि रंगरेज ही गाणी छान आहेत. खासकरून 'घुलमिल घुलमिल' ऐकत असताना मनातल्या मनात आपण जरासं नाचूनही घेतो ! गाण्यांचे शब्द समजत नाहीत. पण आजकाल बहुतांश गाण्यांचं तसंच असतं !

राकेश मेहरा, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी अशी काही नावं आहेत ज्यांचे चित्रपट तीन - साडेतीन तास चालतातच. जातानाच त्याची मानसिक तयारी करून जायला हवे. ती कदाचित मी केली नव्हती म्हणून असेल पण मला असं वाटलं की इतपत कहाणी अडिच तासात सांगता येऊ शकली असती. फ्लॅशबॅक्समधून कहाणी उलगडत जाण्याचं तंत्र, कॅमेऱ्याचे विशिष्ट कोण मेहरा सुंदर वापरतात. त्यांची मेहनत व त्यांचं 'व्हिजन' दिसून येतं. पण ह्या सगळ्यावर चित्रपटाची लांबी व वेग मात करतात. चित्रपट अगदीच कंटाळवाणा नसला तरी कमी रंजक करतात.

संवाद लेखनाची बाजू ह्या चित्रपटात सगळ्यात कमकुवत असावी. हवा तर अशी होती की काही वादग्रस्त संवाद आहेत. पण एकही ओळ लक्षात राहात नाही. सपक संवादांमुळेही अपेक्षित नाट्यनिर्मिती काही ठिकाणी मार खाते.

एखादा अंतिम सामना, आपल्या आवडीच्या संघ जिंकतो. निकाल आपल्या पसंतीचा लागतो, पण सामन्यात रंजकता कमी असते. अगदीच एकतर्फी झाला असतो. अश्या सामन्याने जितका आनंद मिळतो; तितका आनंद 'भामिभा' देतो.

रेटिंग - * * *

Wednesday, July 10, 2013

मृत्युही गझलीय यावा.. (भावानुवाद - अपने होंठों पर सजाना चाहता हूँ..)

'मराठी कविता समूहा'च्या 'कविता एक अनुवाद अनेक - भाग २८' ह्या उपक्रमात माझा सहभाग -

वाटते ओठांवरी तू हास्य व्हावे
जन्मभर केवळ तुला मी गुणगुणावे

एकदा तर एक अश्रू तू टिपावा
पापणीने मोतियाचे दान द्यावे

खूप जपली मी तुझी स्मरणे उराशी
'मी तुला स्मरतो' असे तूही स्मरावे

स्वप्न काळोखात माझे हरवलेले
वास्तवाचे दीप आता पेटवावे

श्वास शेवटचा तुझ्या डोळ्यांत घ्यावा
मृत्युही गझलीय* यावा, मी जगावे

मुळ गझल : अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
मूळ गझलकार : क़तील शिफ़ाई
भावानुवाद : ....रसप....
९ जुलै २०१३

मूळ गझल :-

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ

कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ

थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ

छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ

आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ

- क़तील शिफ़ाई

* * * *

मीच गप्पा मारतो आता तुझ्याशी
एकट्याने तू मना का हिरमुसावे ?

Tuesday, July 09, 2013

पाऊस नसे हा पहिला..

पाऊस नसे हा पहिला पण भिजणे बाकी आहे
मी तिच्या लोचनांमधुनी पाझरणे बाकी आहे

विश्वास कसा ठेवावा तू आसपास असल्याचा
माणूस माणसामधला सापडणे बाकी आहे

मी लिहिल्या अनेक कविता संतोष वाटला नाही
नुकतेच मला कळले की, 'तू' सुचणे बाकी आहे

सत्यास शोधले होते, सत्यास मांडलेसुद्धा
पण सत्य नग्न असते हे आवडणे बाकी आहे

माझ्यात राम आहे अन् माझ्यामधेच रावणही
चेहरा तुम्हाला दुसरा दाखवणे बाकी आहे

आईस फसवुनी 'जीतू' मी अनेक पाउस भिजलो
ती ओल मनातुन अजुनी वाळवणे बाकी आहे

....रसप....
८ जुलै २०१३  

Thursday, July 04, 2013

बंडखोर मी !

मनातले मी
कवितेमधुनी
मांडत असतो
असे सांगतो
जरी तुम्हाला
मलाच माहित
हे तर आहे
केवळ वरवर

आवड आहे
एकच मजला
प्रस्थापितता
मोडुन काढुन
बंड करावे
म्हणून लिहितो

जे जे दिसते
लोकमान्य अन्
पारंपारिक
ते ते सगळे
चूकच आहे
असे म्हणावे
म्हणजे येते
नजरेमध्ये
तेव्हढेच तर
मला पाहिजे

मला म्हणा हो
नव्या पिढीचा
कारण आहे
बंडखोर मी !
लिहितो केवळ
ठरण्यासाठी
बंडखोर मी..

....रसप....
४ जुलै २०१३  

Wednesday, July 03, 2013

एक क्षण निसटलेला..

एक दिवस अचानक दिसला मला
खोलीच्या कोपऱ्यात एक क्षण रेंगाळलेला
माझ्या नकळत माझ्याच मुठीतून
कधीकाळी निसटलेला
बरेच दिवस लागत नव्हता हिशेब
सरलेल्या आणि उरलेल्या वेळेचा
आता लागेल बहुधा !

फक्त इतकंच व्हावं,
की हा क्षण मुठीत घेताना
अजून एक दोन निसटू नयेत !
कारण घरात राहतील तर कोपऱ्यात दिसतील
बाहेर पडले, तर गोल दुनियेत गोल-गोल फिरतील..
कुठे शोधीन ? कुठे मिळतील ?

बस्स!
ह्याच विचारात मी गढलो
आणि निसटल्यावरही दिसलेला क्षण
पुन्हा एकदा हरवून बसलो
आता घर इतकं मोठं झालंय की,
कोपरेही संपत नाहीत....

....रसप....
२ जुलै २०१३
Related Posts Plugin for WordPress, Blogger...