Sunday, November 29, 2015

'भागते रहो' ते 'जागते रहो' ! (Movie Review - Tamasha)

इतर कुणी असतं, तर, ‘हे म्हणजे ‘तारे जमीं पर’, ‘रॉकस्टार’, यह जवानी है दीवानी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ व अजून काही सिनेमांचं मिश्रण केलंय’, असं म्हणता आलं असतं. पण ‘इम्तियाझ अली’ आणि ‘इतर कुणी’ ह्यांच्यात हाच फरक आहे. उत्तम दिग्दर्शक आणि इतर दिग्दर्शक ह्यांच्यात फरक असतोच. कारण ‘कथाकथन’ (Story Telling) हीसुद्धा एक कला आहे. ती अंगभूत असायला लागते. (आठवा, ‘कट्यार काळजात घुसली’ मधले कविराजाचे ‘कला’ आणि ‘विद्या’ ह्यांच्यातला फरक सांगणारे शब्द !) उत्तम कथानक वाया घालवलेली अनेक उदाहरणं देता येतील. पण ज्याप्रमाणे आपल्या मित्रवर्गातील एखादी व्यक्ती एखादा साधासा विनोदही अश्या काही परिणामकारकतेने रंगवून सांगते की हास्याचा खळखळाट होतो, त्याचप्रमाणे इम्तियाझ अली पुन्हा एकदा एक प्रेमकहाणी सांगतो. प्रेमकहाणीचं नातं आयुष्याशी जोडतो आणि चित्रपटाकडे केवळ एक ‘मनोरंजन’ म्हणून न पाहता एक ‘कला’ म्हणूनही पाहणारे रसिक दिलखुलास दाद देतात.
का ?
कारण ह्या कहाणीतला वेद मलिक (रणबीर कपूर) प्रत्येकाने जगलेला, पाहिलेला आहे. हा ‘वेद’ दुसरा तिसरा कुणी नसून डोळ्यांना झापडं लावून धावत सुटणाऱ्या घोड्यासारखा ‘कहाँ से चलें, कहाँ के लिए’ हे खबर नसणारा नोकरदार आहे. तोच तो मर्ढेकरांच्या ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ वाला सामान्य माणूस. जो कधीच, कुठेच जिंकत नसतो कारण त्याला जिंकायचं नसतंच बहुतेक. बस्स, धावायचं असतं. कारण त्याला भीती असते की जर तो थांबला, तर त्याच्या मागून बेभानपणे धावत येणारे इतर लोक त्याला पाहणारही नाहीत आणि त्याला तुडवत तुडवत पुढे निघून जातील. त्याने माधव ज्युलियनांच्या -
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला
थांबला तो संपला
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे
ह्या ओळींचा सोयीस्कर अर्थ लावलेला आहे. त्याला बहुतेक असं वाटत असतं की तो ‘यदायदाहि धर्मस्य..’ वाला ह्याच्याही मदतीला येणार आहे म्हणून तो जबरदस्तीनेच ‘ग्लानिर्भवती’ पाळत असतो. येतो. त्याच्याही मदतीला येतो. पण त्याचं रुप ओळखता आलं पाहिजे. तेच बहुतांशांना जमत नाही. मात्र वेदला जमतं. त्याचं ‘प्रेम’ त्याला रस्ता दाखवतं. हा नेहमीचाच मसाला आहे की, ‘प्रेमाने आयुष्य बदलून टाकणं’ वगैरे. पण वेदला ते कसं आणि कितपत जमतं, त्याला होणारा साक्षात्कार नेमका काय असतो, त्यासाठी काय किंमत मोजायला लागते आणि तो कुठून, कसा व काय बनतो, हे सांगण्यासाठी एखादा ‘इम्तियाझ अली’च असावा लागतो ! नाही तर, ‘ही तर ४-५ सिनेमांची मिसळ आहे’, हा शेरा नक्की असतो !

ज्या संवेदनशीलतेने इम्तियाझ अली, एका लहानपणापासून सतत मर्जीविरुद्ध झिजत राहिलेल्या व्यक्तीची मानसिकता मांडतात, ते एखादा मनोवैज्ञानिकच जाणो ! मग ते सतत आरश्याशी बोलत राहणारं एकटेपण असो की झटक्यासरशी ‘मूड स्विंग्स’ करणारं मानसिक अस्थैर्य असो की टेबलावर डोकं ठेवून एका बाजूला तोंड करून शून्यात पाहणारी असुरक्षितता असो, वेदच्या व्यक्तिरेखेला इम्तियाझ अली एकेक पैलू विचार व काळजीपूर्वक पाडतात.


रणबीरमधला सक्षम अभिनेताही हा एकेक पैलू आपलासा करतो. तो त्याच्या वेडेपणाने जितका हसवतो, तितकाच त्या वेडेपणामागच्या कारुण्याच्या छटेने व्यथितही करतो. एरव्ही माथेफिरू वाटू शकणारी एक व्यक्तिरेखा तो प्रेक्षकाच्या मनात उतरवतो आणि त्याला ती बेमालूमपणे विकतोही !
जोडीला ‘दीपिका पदुकोण’सुद्धा तितकाच सशक्त अभिनय करते. जिथे रणबीरसोबत त्याच्याइतकीच उर्जा दाखवायची आवश्यकता असते तिथे ती कमी पडत नाही आणि जिथे त्याच्या उसळून येणाऱ्या भावनांना झेलायचं असतं, तिथेही ती तितकीच कधी प्रवाही, तर कधी निश्चल राहते. ‘कॉकटेल’ आणि ‘यह जवानी है दिवानी’ मधल्या तिच्या दोन व्यक्तिरेखांचं हे एक मिश्रण होतं. जे साहजिकच आव्हानात्मक होतं. ती ते आव्हान पेलते.

संगीत ए. आर. रहमानचं आहे म्हणून ‘मस्त आहे’ असं म्हणायला हवं. काही कलाकृती आपल्या कुवतीच्या बाहेर असतातच. ‘तमाशा’मधला रहमान माझ्या कुवतीबाहेरचा असावा. मात्र हेच संगीत इतर कुणाचं असतं तर त्याला काय म्हटलं असतं, हा विचार केल्यावर वाटतं की, जर काही कमी पडलं असेल, तर संगीताची बाजूच. गाण्यांचं अप्रतिम चित्रीकरण हेसुद्धा एक इम्तियाझ अलींचं बलस्थान आहे. त्यांच्या सिनेमात गाणी कधीच घुसडलेली वाटत नाहीत आणि काही गाणी तर कथेला खूप जलदपणे पुढे नेण्यात महत्वाची भूमिका निभावतात. (उदा. ‘जब वी मेट’ मधलं ‘आओगे जब तुम ओ साजना..’ आठवा.) इथेही प्रत्येक गाणं अप्रतिम चित्रित केलं असल्याने त्या संगीताचा मला त्रास झाला नाही, इतकंच.
मात्र ‘इर्शाद कमिल’ चे शब्द मात्र सर्व गाण्यांना अर्थपूर्णही करतात, हेही खरं !

फ्रान्स, टोकियो, दिल्ली अत्यंत सुंदरपणे टिपल्याबद्दल छायाचित्रक 'एस रवी वर्मन' ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. प्रत्येक फ्रेम कहाणीशी सुसंगतपणे कधी फ्रेश, तर कधी झाकोळलेली दिसली आहे.

सिनेमा एका वैचारिक उंचीवर आहे. त्याची मांडणी वेगळ्या धाटणीची आहे. ती कदाचित सर्वांच्या गळी उतरणार नाही. पण ज्यांना ती पटेल, त्यांना ती खूप आवडेल हे निश्चित. पण जी उंची व संवेदनशीलता एकूण हाताळणीत जाणवते ती नेमकी सिनेमाच्या शीर्षकात जाणवत नाही. ‘तमाशा’ ही शीर्षक अतिरंजित, भडक वगैरे काहीसं वाटतं. ते ह्या कहाणीशी न्याय करत नाही. सिनेमा जितका हळवा आहे, तितकंच हे शीर्षक मात्र भडक आहे.
असो.
‘तमाशा’ ही माझी कहाणी आहे. कदाचित तुमची आहे आणि तुमच्या ओळखीच्या अनेकांचीही असू शकते. मला ‘तमाशा'ने 'अंतर्मुख' केलंय की 'प्रभावित' केलंय, हे येणारा काळ सांगेल. तुम्हालाही किमान प्रभावित व्हायचं असेल, तर अवश्य पाहा. नाही पाहिलात, तरी चालतंय. शर्यत सुरू राहीलच.
'रॅट रेस' !
भागते रहो !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज २९ नोव्हेंबर २०१५ प्रकाशित झालं आहे - 


Monday, November 16, 2015

दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं !


तलत आणि किशोर मला प्रचंड जवळचे वाटतात. रफी, मन्नाही खूप आवडतात, पण अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर जेव्हा मी स्वत:ला पडद्यावर इमॅजिन करतो तेव्हा मला तलत किंवा किशोर हेच माझे आवाज वाटतात. हे बोलणं आगाऊ आहे, पण खरं तेच. 
किशोरशी माझी ओळख खूपच पूर्वीपासूनची. 'ओडलाई युडलाई' करत तो मला भेटला. नंतर त्याच्या गायकीतला ठहराव मला अनेकदा स्तिमित करत राहिला आणि आजही तो अधूनमधून नव्याने भेटत राहतो 'चेएची जा रे आमी..' सारख्या गाण्यांतून. तर तलतशी ओळख मात्र गेल्या काही वर्षांतलीच. तलतचं पहिलं ऐकलेलं गाणं होतं 'जिंदगी देनेवाले सुन..' आणि मग इतरही काही. पण ज्या गाण्याने अगदी आतपासून हलवलं ते 'फिर वोही शाम..' कॉलेजच्या दिवसांत पुरेसे पैसे साठले की एचएमव्हीच्या रिवायवल सिरिजमधल्या कॅसेट्स मी जेव्हा चर्चगेटच्या 'ग्रूव्ह'मध्ये जाऊन रँडम सिलेक्शन करुन घेऊन यायचो, तेव्हा एका कॅसेटमध्ये हे गाणं होतं. तो हळवा कापरा आवाज व्याकुळ करुन गेला. पहिल्यांदा ऐकताना हे तालाशी खेळणारं गाणं मला गायला जमणं तर सोडाच, गुणगुणायलाही जमेल असं अजिबात वाटलं नव्हतं. पोर्शेच्या शोरुममधली चकाचक लाल रंगाची जबरांडुस कार आपण रस्त्यावरुनच डोळे भरुन पाहून घ्यावी, तसं मी हे गाणं निरपेक्ष हव्यासाने ऐकत असे. (निरपेक्ष हव्यास - ही कन्सेप्ट मी एक्स्प्लेन करु शकणार नाही.) मला हे गाणं ऐकताना एका पलंगावर पाय खाली सोडून शांत बसलेला मीच दिसत असे आणि मी ते संपूर्ण गाणं त्याच पोझिशनमध्ये, मानही न हलवता गातोय असं वाटे. (शेकडो वेळा ऐकल्यावर आता कुठे गुणगुणण्याचा कॉन्फिडन्स आलाय.)
तलत ह्या गाण्यातून मला कडकडून भेटला, भेटायला लागला. मग त्याची सगळीच गाणी अशीच अतिशय संयतपणे आपली आर्तता मांडणारी वाटायला लागली. नव्हे. ती आहेतच तशी. कुठलाही आक्रोश, आक्रस्ताळेपणा, चडफडाट करणं त्या आवाजाच्या स्वभावातच नव्हतं. त्यात होती ती फक्त एक प्रकारची स्थितप्रज्ञता. त्या व्याकूळतेतही एक आत्मभान होतं. त्या उत्कटतेतही एक संयम होता. 

एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे साहिर आणि राजेन्द्र क्रिशन अनेक गाण्यांद्वारे मला झपाटत होते. हे गाणं राजेन्द्र क्रिशनचं.

जाने अब तुझसे मुलाक़ात कभी हो के न हो
जो अधूरी रही वो बात कभी हो के न हो
मेरी मंज़िल तेरी मंज़िल से बिछड़ आयी हैं

हे असं कुणी लिहावं आजच्या जगात? कुणातच ही सफाई आणि साधेपणा राहिलेला नाही. जो उठतो तो गुलज़ार बनायला पाहतोय आणि बस्स मोकाट सुटतोय. पण असे शब्द उतरायला प्रतिभेवरही एक संस्कार असायला हवा तो क्वचितच जाणवतो. साधेपणा आणि शिस्तीचा संस्कार. स्वत:च स्वत:वर केलेला. ह्या शिस्तबद्ध साधेपणामुळेच लिहिलं जातं की -

फिर वोही शाम, वोही ग़म, वोही तनहाई हैं 
दिल को समझाने तेरी याद चली आयी हैं

इथल्या 'फिर' ला किती महत्व आहे, हे त्या शब्दावर रेंगाळल्यावर समजेल. 
ही कहाणी आजची नाही. रोजची आहे, कित्येक दिवसांपासूनची आहे. रोज असंच सगळं अंगावर येतं आणि रोज तुझी आठवण दिलासा द्यायला येते ! इथे तलतच्या 'फिर वोही' म्हणण्यामध्ये एक हळवी तक्रार आहे. तो हे 'फिर वोही' एक प्रकारच्या उद्गारवाचक सुरात म्हणतो. दोन शब्दांत हे तक्रारयुक्त आर्जव तलत करतोय. हे दोन शब्द जर जसेच्या तसे जमले नाहीत, तर बाकीचं गाणं गाऊच नये. कारण सगळी 'जान' इथे आहे.

फिर तसव्वुर तेरे पहलू में बिठा जाएगा
फिर गया वक़्त घड़ीभर को पलट आएगा
दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं 

आता परत एकदा माझं भावविश्व तुझ्या जवळ येऊन बसेल अन् जुन्या दिवसांना उजाळा मिळेल आणि ह्या सगळ्या स्वप्नरंजनातच भोळसट मन खूष होईल ! 
- हे सगळं फक्त कथन आहे. पण त्यातलं जे चित्रण आहे ते पुन्हा एकदा एक तटस्थ, आर्जवी तक्रार करतंय. ही व्यथा जितक्या साधेपणाने एक कवी मांडतोय, तितक्याच साधेपणाने एक गायक गातोय आणि दोघांमधला पूल आहे अजून एक अफलातून माणूस. 'मदन मोहन'. हा तर सगळ्यांचा बाप होता, बाप. 

मदन मोहनला 'गझल किंग' म्हटलं जातं. हे गाणं 'गझल' नाही. मात्र त्याचा बाज तसाच आहे. स्वत: मदन मोहन किती आर्त आवाजाचा धनी होता, हे जाणण्यासाठी यूट्यूबवर त्याच्या आवाजातलं 'नैना बरसे रिमझिम रिमझिम..' ऐका किंवा 'दस्तक' चित्रपटातलं 'माई री, मैं कासे कहूँ..' ऐका. 
मदन मोहनची गाणी ऐकताना मी त्या त्या गाण्याच्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. हार्मोनियम घेऊन बसलेला मदन मोहन, अधूनमधून सिगरेटचे झुरके मारत लता बाई, तलत, रफी ह्यांना गाण्याची चाल सांगतोय. मग त्यावर बहुतेक काम ते लोक स्वत:चं स्वत: करत असतील. ते लोक गात असताना मध्येच एखादी जागा 'अंहं.. यह सुनो..' म्हणून तो स्वत: गाऊन दाखवत असेल. मग एक 'वाहवा' ची देवाणघेवाण ! सोबत राजेंद्र क्रिशनसुद्धा असेल. तो सांगत असेल, 'अमुक शब्दाचा, अक्षराचा उच्चार असा असा हवा'. हे गाणंही मदन मोहनने आधी स्वत: गायलं असेल.. 'फिर वोही शाम..' हात वरुन खाली गोलाकार आणत. सगळंच अफाट. इथे माझा 'तसव्वुर' त्यांच्या 'पहलू'त जाऊन बसतो आणि 'दिल बहल जाता हैं आखिर को तो सौदाई हैं' !

यथावकाश जसजसं हे गाणं खूप भिनलं तसतसा मी ते गुणगुणायला लागलो आणि एक दिवस एका लाईव्ह कार्यक्रमात एका गायकाने हे गाणं सादर करताना सांगितलं की, 'हे तलतचं शेवटचं गाणं होतं. 'जहाँ आरा' नंतर, 'फिर वोही शाम..' नंतर तलत कुठल्याच सिनेमासाठी गायलाच नाही !' 
शिखरावर पोहोचून निवृत्ती घेणं, आजपर्यंत सचिनपासून लता बाईंपर्यंत कुणाला जमलेलं नाही. प्रत्येकाने घसरगुंडी झाल्यावरच विश्राम घेतलाय. एक तलतच जो जितक्या शांतपणे काळीज चिरणारी व्यथा गायचा, तितक्याच शांतपणे 'आपलं काम संपलं आहे' हे मान्य करणारा ! खरा स्थितप्रज्ञ !

जाता जाता, ह्या गाण्याचं तिसरं कडवं. जे सहसा ऐकायला मिळत नाही -

फिर तेरे ज़ुल्फ़ की, रुखसार की बातें होंगी
हिज्र की रात हैं मगर प्यार की बातें होंगी
फिर मुहब्बत में तड़पने की क़सम खायी हैं !

__/\__


- रणजित 

Sunday, November 15, 2015

अपरिपूर्ण तरी अद्वितीय ! (Movie Review - Katyar Kaljat Ghusli)

असं म्हणतात की ताजमहाल बनल्यानंतर शाहजहानने ती कलाकृती साकारणाऱ्या कारागिरांचे हात छाटून टाकले होते, जेणेकरून अशी दुसरी कलाकृती बनवली जाऊच नये. ह्या सृष्टीचा कर्ता-करविताही काही निर्मिती केल्यानंतर ते साचेच नष्ट करत असावा. काही व्यक्ती, वास्तू, जागा म्हणूनच एकमेवाद्वितिय ठरत असाव्यात आणि म्हणूनच महान कलाकृतीही एकदाच बनत असतात.
पण, अस्सल सोनं असलं, तरी त्यावर धुळीची पुटं जमली की त्याची लकाकी झाकली जातेच. त्यामुळे ही पुटं झटकणे हेही एक महत्वाचं कार्य आहे. एका पिढीने जर अस्सल सोनं जतन केलं असेल, तर त्यावर काळाच्या धुळीची पुटं जमू न देणे हे पुढच्या पिढ्यांनी आपलं कर्तव्यच मानायला हवं.
महान कलाकृतीला पुनर्निमित केलं जाऊ शकत नाही. पण तिच्या प्रतिकृती बनू शकतात. ह्या प्रतिकृतीच्या निमित्ताने विस्मृतीची पुटं झटकून सोनेरी स्मृतींना झळाळी दिली जाऊ शकते. गाण्यांची रिमिक्स आणि चित्रपटांचे रिमेक्स करताना हाच एक प्रामाणिक उद्देश असेल, तर होणारी पुनर्निमिती त्या पूर्वसूरींच्या आशीर्वादाने उत्तमच होईल. 'कट्यार काळजात घुसली' ला मोठ्या पडद्यावर आणताना संपूर्ण टीम आपल्या ह्या उद्देशाशी पूर्ण प्रामाणिक राहिली आहे, हे सतत जाणवतं आणि म्हणूनच भव्य पडद्यावर जेव्हा ह्या महान कलाकृतीची प्रतिकृती साकारली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते, टाळ्या मिळवते आणि मुक्त कंठाने दादही मिळवते.



'कट्यार' हे एका पिढीने मनाच्या एका कोपऱ्यात श्रद्धेने जपलेलं सांगीतिक शिल्प. आजच्या पिढीतल्याही अनेकांनी त्या शिल्पाला मानाचं स्थान दिलं आहे. त्याचं सुबोध भावे, राहुल देशपांडे आदींनी नुकतंच नव्याने सादरीकरणही केलं होतं. पण तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा वर्ग असा आहे, ज्याला हे नाट्य केवळ ऐकूनच माहित आहे. हा चित्रपट त्याही वर्गापर्यंत पोहोचणार आहे. नव्हे, पोहोचलाच आहे आणि पोहोचतोच आहे ! ह्या पिढीसाठी अमुक गाणं मूळ नाटकात होतं का की नवीन आहे ? हा प्रश्न वारंवार पडू शकेल. असा प्रश्न पडणे, ह्याचा अर्थ काय होतो ? ह्याचा हाच अर्थ होतो की मूळ संगीत व चित्रपटासाठी केलेलं नवनिर्मित संगीत हे परस्परांत बेमालूमपणे मिसळलं गेलं आहे. 'कट्यार' चा अश्या प्रकारे चित्रपट बनवत असताना 'संगीत' हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. ह्या आव्हानाला पेलायला चित्रपटकर्त्यांनी उत्तमांतल्या उत्तमांना निवडलं आणि त्यांनी आपली निवड सार्थही केली. 'शंकर-एहसान-लॉय' ह्यांनी आठ नवीन गाणी दिली आहेत आणि एकेक गाणं त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं प्रतिक आहे. कुणास ठाऊक किती वर्षांनंतर एक सांगीतिक चित्रपट - भले 'रिमेक' का असेना - आला आहे ! ह्या नव्या कट्यारीचे नवे सूरही तितकेच धारदार आहेत आणि ते काळजात न घुसल्यास काळीज दगडी आहे, हे निश्चित ! सूर निरागस हो, दिल की तपिश, यार इलाही, मनमंदिरा ही गाणी तर केवळ अप्रतिम जमून आलेली आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर ह्यांचे आशयसंपन्न शब्द, अवीट गोडी असलेलं संगीत आणि अरिजित सिंग, शंकर महादेवन, राहुल देशपांडे ह्यांचे जवारीदार आवाज असं हे एक जीवघेणं मिश्रण आहे. कविराजांसाठी (बहुतेक समीर सामंतनेच) लिहिलेला छंदही सुंदर आहे.
अभिषेकी बुवांचे जुन्या कट्यारीचे संगीतसुद्धा नवनिर्मित करताना त्यावर चढवलेले साज त्याच्या सौंदर्यात भरच घालतात. मात्र मूळ नाटकात असलेली काही स्त्री गायिकांची पदं इथे वगळली आहेत. काही गाणी स्त्री आवाजात असणे आवश्यक होते, त्यामुळे एक प्रकारचा - कितीही नाही म्हटलं तरी - जो 'तोच-तो' पणा आला आहे, तो टाळता आला असता. कहाणीत अश्या नव्या पेरणीसाठीही जागा होत्या, त्या दिसल्याच नाहीत की जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेल्या, हे माहित नाही. मात्र त्यांवर जाणीवपूर्वक काम करता आले असते, जे केलेले नाही, हेही खरंच. तसेच एका प्रसंगी 'खां साहेबां'च्या संवादांतून आता इथे 'ह्या भवनातील गीत पुराणे..' सुरु होईल असं ठामपणे वाटतं, प्रत्यक्षात ते तिथेच काय, कुठेच येत नाही !

ही सगळी गाणी व कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यावर दिसणारे झाडून सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटाचे सन्माननीय धनी आहेत. सुबोध भावे तर एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहेच. तसं त्याने लोकमान्य व छोट्या पडद्यावरील काही कामांतूनही वारंवार सिद्ध केलं आहे. इथे त्याने साकारलेला 'सदाशिव'सुद्धा अविस्मरणीयच !
बालगंधर्व,
विशेष कौतुक करायला हवं ते शंकर महादेवन ह्यांचं. पंडितजींच्या भूमिकेतला शंकर महादेवन, मला वाटतं

प्रथमच अभिनय करताना दिसला आहे. स्वत: एक महान गायक असलेल्या शंकर महादेवनना पंडितजींना गाताना साकार करणं तसं सोपं गेलं असू शकेल, मात्र जिथे फक्त आणि फक्त अभिनय हवा होता, तिथेही हा माणूस कमालच करतो ! उच्चार, संवादफेक कुठेही नवखेपण किंवा अमराठीपण औषधापुरतंही जाणवू देत नाही !
चित्रपटाचा 'मालक' मात्र ठरतो तो सचिन पिळगांवकर. छोट्या पडद्यावर व इतर काही जाहीर प्रगटनांतून गेल्या काही वर्षांत 'महागुरू' म्हणून काहीश्या हेटाळणीयुक्त विनोदाचा विषय ठरलेल्या सचिनने साकारलेल्या 'खां साहेब' ला लवून मुजरा करायला हवा. त्याने टाकलेले शेकडो कटाक्ष पडद्याला छिद्रं पाडतात, इतके धारदार आहेत. सचिनची 'महागुरू' म्हणून ओळख विसरून जाऊन त्याला इथून पुढे 'खां साहेब' म्हणूनच ओळखायला हवं. 'खां साहेब' ची आपल्या कलेवरची निस्सीम श्रद्धा, परिस्थितीमुळे आलेली हताशा, पराभवाच्या मालिकेमुळे आलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेतून जन्मलेली खलप्रवृत्ती आणि विजयाचा उन्माद व नंतर शब्दा-शब्दातून जाणवणारा प्रचंड अहंकार हे सगळं एकाच ताकदीने व सफाईने सचिन साकार करतो.

सुबोध भावे, शंकर महादेवन आणि सचिन, ह्या तिघांसाठी आपापल्या व्यक्तिरेखा साकार करताना गाणं समजून घेणे अत्यावश्यक होतं. तिघांपैकी कुणीही त्यात तसूभरही कमी पडलेलं नाही. कुठलीही तान, हरकत आणि साधीशी मुरकीसुद्धा त्यांनी सपाट जाऊ दिलेली नाही. त्यांच्या नजरा व हातांना कुंचल्याचं रुप दिलं असतं, तर प्रत्येक गाण्याचं एक त्या गाण्याइतकंच सुंदर चित्र त्यांनी रेखाटलं असतं. देहबोलीत कुठलीही कृत्रिमता किंवा सांगितल्या बरहुकूम केल्याचं जाणवतही नाही. जे काही केलं आहे, ते त्यांनी स्वत:, उत्स्फूर्तपणे केलं आहे, हे निश्चित.

'उमा'च्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे खूप गोड दिसते ! निश्चयी, खंबीर व गुणी उमा म्हणून ती शोभतेच. तर 'झरीना'च्या भूमिकेत अमृता खानविलकर समंजस अभिनयाने चकितच करते ! आधी म्हटल्याप्रमाणे उमा, झरीना, मृण्मयी आणि अमृता ह्या चौघींनाही एकेक गाणं द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकारच होता बहुतेक !
लहानातल्या लहान भूमिकेतल्या अभिनेत्यां/ अभिनेत्रींनी त्या त्या व्यक्तिरेखेला जगलं आहे. खरं तर मराठी चित्रपट हा अभिनयाच्या बाबतीत इतर बहुतेकांपेक्षा बऱ्याच इयत्ता पुढे आहेच, त्यामुळे तसं पाहता 'मराठी चित्रपट' आणि 'अप्रतिम अभिनय' हे सूत्र कायमस्वरूपी गृहीतच धरायला हवे आणि म्हणूनच कथानकाला सादर करण्याची दिग्दर्शकाची जबाबदारी जरा वेगळ्या पातळीवरचीही मानायला हवी. सुबोध भावेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तरी काही सुटे किंवा ढिले धागे खटकतातच. सदाशिव आणि उमाची प्रेमकहाणी अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर टिपिकल मसाला चित्रपटातला जिन्नस वाटते. मनमोहन देसाई किंवा बडजात्या टाईप. बालपणीचं प्रेम आणि मग अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर ते लहानपणीचं गाणं गाऊन आपली ओळख पटवून देणे हा सगळा मसाला आता शिळा झाला आहे. तो वापरायला नकोच होता. असंही त्यामुळे कथानकाला कुठलाही महत्वपूर्ण हातभार लागत नव्हताच आणि ज्या पातळीला (कलावंताचा अहंकारेत्यादी) बाकी कथानक चाललं आहे, त्यासमोर हे सगळं प्रकरण बालिश वाटतं. चौदा वर्षांनंतर आलेल्या सदाशिवचा आगा-पिच्छाही कथानकात मांडला जात नाही. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेलं आहे किंवा मूळ कथानक माहित आहे, त्यांनाच ते समजू शकतं. इतरांना 'हा कोण आहे ? ह्याच्याशी मिरजेत नेमकी ओळख कशी झालेली असेल ?' इथपासून 'चौदा वर्षं होता कुठे?' इथपर्यंत प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. एका इंग्रज अधिकाऱ्याचं पात्रही असंच अधांतरी आहे. त्याचीही चित्रपटात अजिबातच गरज नव्हती. 'झरीना'ला नाचताना दाखवणे, हा त्या काळाच्या मुस्लीम संस्कृतीचा विचार करता न पटणारा भाग होता, तोसुद्धा टाळता आला असता. तसेच मूळ संहितेत महत्वाचं पात्र असलेल्या काविराजाच्या भूमिकेला इथे बरीच कात्री लावली गेली आहे. इतर अनावश्यक भरणा न करता, ही भूमिका जतन केली गेली असती, तर ? असाही एक प्रश्न पडला.

असे सगळे असले तरी, 'कट्यार' हा असा चित्रपट आहे की जो पाहणे प्रत्येक चित्रपटरसिकाचं कर्तव्यच आहे. (ह्यात सर्व भाषिक आले.) कारण 'म्युझिकल'साठी संगीत देण्याची पात्रता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांची असल्याने 'म्युझिकल्स' चा जमाना आता गेला आहे, हे कटू सत्य आहे. त्यामुळे, असा दुसरा चित्रपट होणे अवघडच आहे.
ह्या सुमधुर संगीतमय कट्यारीच्या घावाची सुगंधी जखम येणाऱ्या पिढ्यांना अभिमानाने दाखवण्याची एक सुवर्णसंधी सर्व रसिकांना दिल्याबद्दल संपूर्ण 'कट्यार' टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मानाचा मुजरा !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये १५ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.

Saturday, November 07, 2015

ओघळछंद

ओंजळभर भरून येते
पापणभर वाहुन जाते
नजरेस किनारा मिळतो
अन् नजर प्रवाही होते

अस्पष्ट बोलकी नक्षी
क्षणभंगुर अस्तित्वाची
स्मरणांतुन वाहत जाते
शृंखलाच ओलाव्याची

हे झरझर सरते चित्र
अर्थाचे तुषार देते
थेंबांना जुळता जुळता
गहिवरून भरते येते

थेंबाचा व्हावा शब्द
शब्दाला ओघळछंद
थेंबांची कुजबुज व्हावी
शब्दांनी अक्षरबद्ध

शांततेत नि:शब्दावे
नि:शब्दी कल्लोळावे
थेंबांनी थेंबांसाठी
केवळ इतकेच करावे


....रसप....
(१६ जुलै २०१५ ते ०८ सप्टेंबर २०१५)

Thursday, November 05, 2015

प्रेम - तुमचं, आमचं आणि त्यांचं



सदर लेख 'श्री. व सौ.' च्या दिवाळी अंक २०१५ साठी लिहिला आहे.
हा लेख लिहिण्यासाठी माझा मित्र अमोल उदगीरकरशी झालेली चर्चा लाख मोलाची होती. 
संपादक श्री. संदीप खाडिलकर ह्यांचे आभार ! त्यांनी तर लिहूनच घेतलं आहे माझ्याकडून !

काही दिवसांपूर्वी 'कट्टी-बट्टी' पाहिला. त्यातली ती बेदरकार कंगना राणावत आणि तिला तशीच स्वीकारणारा इम्रान खान पाहून बाहेर पडलो. चित्रपट तसा टुकारच होता. बहुतेक जण विचार करत होते की, 'चित्रपट जास्त बंडल होता की इम्रान खान?', पण माझ्या मनात मात्र  वेगळाच झगडा चालू होता. ह्या दोन व्यक्तिरेखांना
मान्य करतानाच माझी ओढाताण होत होती. म्हणजे एखाद्या मुलाने 'प्रपोज' केल्यावर स्वत:च 'अभी सिरियस का मूड नहीं हैं. टाईमपास चलेगा, तो बोल !' असं उत्तर देणारी कंगना आणि अश्या पूर्णपणे बेभरवश्याच्या मुलीसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहून त्या नात्याबाबत गंभीरही असणारा इम्रान काही केल्या माझ्या जराश्या प्रतिगामी बुद्धीला पचतच नव्हते. विक्रमादित्याच्या पाठुंगळीवरचा वेताळ बडबड करून, प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडत असे. माझं आणि माझ्या मनाचंही असंच काहीसं सुरु झालं होतं. काही वेळाने मनातल्या मनात एका चित्रपटापुरताच चाललेला हा संवाद द्वितीयपुरुषी झाला. माझं मन माझ्याच समोर आलं आणि म्हणालं -

"मित्रा,

तू आणि मी बऱ्याच पूर्वी 'मागल्या पिढीचे' झालो आहोत, हे मला तरी आत्ता आत्ता समजायला लागलंय. आता 'मागल्या पिढीचे' म्हणून लगेच स्वत:ला म्हातारा समजू नकोस ! तरुणाईतसुद्धा 'नवतरुण' आणि 'फक्त तरुण' असे दोन प्रकार असावेत. तू आणि मी 'फक्त तरुण' आहोत. नवतरुणाईशी बऱ्याच बाबतींत आपली आवड-निवड जुळत नाही किंवा जुळवून घेताना त्रासच होतो. राजकारण, क्रीडा, विज्ञान, धर्म, कला आणि एकंदरीतच आयुष्याकडे पाहण्याचा 'आजचा' दृष्टीकोन आणि 'आपला' दृष्टीकोन एकच आहे का रे ? पहा जरासा विचार करून.
मला तर असंही वाटतं की पिढ्यांतसुद्धा उप-पिढ्या पडायला लागल्या आहेत, आपल्या बहुपदरी जातिव्यवस्थेप्रमाणे ! तुझी आणि माझी अशीच एक उपपिढी. आजचीच, तरी वेगळी.  म्हणजे आपण स्वत:ला आजच्या पिढीचे समजावं, तर तिथे नाळ जुळत नाही आणि मागच्या पिढीचे समजावं, तर तेव्हढं वय झालेलं नाही ! काळ बदलतोय, मित्रा, Time is changing. आणि महत्वाचं म्हणजे, ही जी बदलाची गती आहे, तीसुद्धा सतत बदलते आहे, वाढते आहे. आज सर्वमान्य, सर्वप्रिय असलेली कोणती संकल्पना उद्या मोडीत निघेल सांगता येत नाही ! ही गती इतकी प्रचंड आहे की आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर -

आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे से मंज़र बदल जाता हैं !

ह्या ओळींवरून आठवलं. हे गाणं तू कॅन्टीनच्या टेबलावर ठेका धरून गायचास कॉलेजात असताना. आज कुणी गात असेल का रे ? कुमार सानू, उदित नारायण वगैरेंच्या काळातही तू तरी किशोर, रफीमध्येच रमला होतास. 'ओ हंसिनी, मेरी हंसिनी, कहाँ उड़ चली..' हे गाणं तू २ वर्षं कॅन्टीनमध्ये 'तिच्या'साठी गात होतास. शेवटपर्यंत मनातली गोष्ट सांगू शकला नाहीसच आणि 'ती' हंसिनी खरंच 'कहाँ उड़ चली' गयी ते तुझं तुलाच कळलं नाही. अशी प्रेमं तरी होत असतील का रे आजकाल ? कुणास ठाऊक !
माझा एक ठाम विश्वास आहे. चित्रपट आणि आजचा समाज ह्यांचं एक घनिष्ट नातं असतं. आता चित्रपटामुळे समाजात बदल होतात, समाजानुसार चित्रपट बदलतो की दोन्ही थोड्याफार प्रमाणात होतच असतं, हा विषय वेगळ्या मंथनाचा आहे. पण ते परस्परपूरक तर नक्कीच आहेत. मी काही फार पूर्वीचं बोलत नाही. २०-२२ वर्षांपूर्वीचे, १०-१२ वर्षांपूर्वीचे आणि आजचे चित्रपट पाहा. प्रेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलत गेला, बदलला आणि बदलतोही आहे.

'क़यामत से क़यामत तक़', 'मैने प्यार किया' वगैरेचा जमाना आठव. अरे प्रत्येक चित्रपटात 'प्रेम, प्रेम आणि प्रेम'च असायचं ! म्हणजे नाही म्हटलं तरी ९९% चित्रपट हे 'प्रेम' ह्या विषयावरच आधारित असत आणि उर्वरित १% चित्रपटांत 'प्रेम' हे उप-कथानक असे. आमटीत कढीपत्ता टाकतात. तो खालला जात नाही. पण त्याचा स्वाद असतोच. तसंच, प्रत्येक चित्रपटाच्या कहाणीतली कढीपत्त्याची पानं म्हणजे 'प्रेम' असे. पुढे हे प्रमाण जरा बदललं. १% चं ६-७% वगैरे झालं असावं आणि आज तर अस्सल प्रेमकहाणी १% चित्रपटांत असेल. ९९% चित्रपटांत 'प्रेम' हे उपकथानक झालंय ! बरं, फक्त 'वेटेज' बदललंय असंही नाही. सादरीकरणही बदललंय.

प्रेमकहाणीतला खलनायक ही संज्ञा कालबाह्य होत चालली आहे बहुतेक. पूर्वी प्रेमातले अडथळे असायचे धर्म,
गरिबी-श्रीमंती, खानदानी दुष्मनी वगैरे. त्यामुळे ओघानेच खलव्यक्ती यायच्याच. आताच्या प्रेमातले अडथळे वेगळ्या प्रकारचे आहेत. हे अडथळे नायक-नायिकेच्या मनातच असतात. त्यांना 'खल' ठरवता येत नाही. आजचे प्रेमी करियरकडेही लक्ष देतात. आर्थिक बदलांनंतर उघडलेल्या अनेक दरवाज्यांमुळे विविध स्वप्नं आजकाल खुणावतात. आयुष्य बदललं, तसं 'प्रेम'ही आणि त्यावर आधारित चित्रपटही.
'कभी हां कभी ना' मधला कुचकामी शाहरुख खान, त्याचं प्रेम असलेल्या 'सुचित्रा कृष्णमुर्ती'चं लग्न 'दीपक तिजोरी'शी होत असतानाही आनंदाने त्यात सहभागी असतो. त्याच्या पराभवात आपल्याला त्याचा विजय वाटला होता. पण त्या काळातल्या चित्रपटांच्या प्रकृतीचा विचार करता, तो शेवट 'अहेड ऑफ द टाईम' म्हणता येऊ शकेल. असा शेवट आजचे चित्रपट करतात, कारण असा विचारही आजची पिढी करते.
घरचं सारं काही सोडून देऊन स्वत:च्या प्रेमाखातर कुठल्याश्या दूरच्या गावी येऊन एखाद्या खाणीत अंगमेहनतीचं काम करणारा 'मैने प्यार किया' मधला सलमान आता दिसणार नाही. आता दिसेल, 'मला माझं स्वप्न साकार करायचं आहे', असं ठामपणे सांगून स्वत:चं प्रेमही मागे सोडून जाणारा 'यह जवानी है दीवानी' मधला रणबीर कपूर आणि त्याच्या त्या निर्णयाला 'त्याचा निर्णय' म्हणून स्वीकारणारी व स्वत:च्या आयुष्याकडे समंजसपणे पाहून पुढे जाणारी दीपिका पदुकोण. 'खानदान की दुष्मनी' मुळे घरून पळून जाणारे 'क़यामत से क़यामत तक' वाले आमीर खान आणि जुही चावला आता दिसणार नाहीत. आता मुलाने लग्नाला आयत्या वेळी नकार दिल्याने हट्टाने एकटीच हनिमूनला जाणारी 'क्वीन' कंगना राणावत दिसते आणि तिच्यात इतकी धमकही असते की नंतर परत आलेल्या त्या मुलाला ती झिडकारूनही लावेल !
फार पूर्वी, म्हणजे कृष्ण-धवल काळात, नायकाने नायिकेचा हात हातात घेणं म्हणजे 'अंगावर शहारा' असायचा. नंतर गळ्यात गळे पडू लागले आणि आता लग्नपूर्व संबंध किंवा किमान चुंबनदृश्यंही अगदी किरकोळीत चालतात ! 'कॉकटेल' सारख्या चित्रपटात बिनधास्त आयुष्य जगणारे सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण
दिसतात. दीपिकाची 'व्हेरॉनीका' तर 'ओपन सेक्स' चा खुलेआम पुरस्कार करते. तिथेच तिच्यासमोर असते 'डायना पेंटी'ने सादर केलेली एक व्यक्तिरेखा जी तिच्या पळून आलेल्या नवऱ्याला शोधण्यासाठी सैफ-दीपिकाच्या दुनियेत आलेली असते. संपूर्ण चित्रपटभर डायना पेंटीची 'मीरा' आपल्याला पटत नाही आणि उच्छ्रुंखल 'व्हेरॉनीका' मात्र चालून जाते. त्यांच्या कात्रीत अडकलेल्या सैफच्या 'गौतम'शी आपण नातं सांगतो. मात्र खऱ्या आयुष्यात हे संबंध आपण स्वीकारू शकणार नाहीच. कारण तू आणि मी वेगळ्या उप-पिढीचे आहोत ना रे !

गरीब-श्रीमंत ही तफावत दाखवण्यात तर आजकाल कुणी वेळ घालवतच नाही ! 'जब वी मेट' आणि 'वेक अप सिड' मधल्या नायक-नायिकांमधली आर्थिक परिस्थितीची तफावत सुस्पष्ट असली, तरी चित्रपट त्यावर भाष्य करत बसत नाही. कारण व्यक्तिरेखांना इतर अधिक महत्वाच्या समस्या आहेत. त्यांचा स्वत:शीच झगडा सुरु
आहे. आजच्या चित्रपटातील तरुण नायक-नायिका आपल्याच मनातला गोंधळ स्वीकारतायत आणि आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतायत. भटिंड्याहून मुंबईला शिकण्यासाठी आलेली खमकी करीना कपूर, अपयशी प्रेम व निराशाजनक आयुष्याला कंटाळून जीव देण्याच्या विचारापर्यंत पोहोचलेल्या अतिश्रीमंत शाहीद कपूरला फक्त एक मित्र म्हणून स्वीकारते, तेव्हा त्या नात्याबाबत तिच्या मनात कुठलेच संभ्रम नसतात. त्यामुळेच पुढे जेव्हा ती स्वत: प्रेमातल्या धक्कादायक अपयशाला सामोरी जाते, तेव्हा ती एकटीच उभी राहण्याची धडपड करत राहते. 'वेक अप सिड' मधला अमीरजादा बेजबाबदार रणबीर कपूर परिपक्व विचारांच्या, वयाने थोडी मोठी असलेल्या आणि दिसायलाही साधीच असणाऱ्या कोंकणा सेन शर्मावर प्रेम करायला लागतो. तो आयुष्यात इतका भरकटलेला व गोंधळलेला असतो की त्याचं प्रेमही त्याला स्वत:ला समजत नाही. ह्या व अश्या चित्रपटांत नायक व नायिकेत गरिबी व श्रीमंतीची एक मोठी दरी असतानाही, प्रेमकहाणीचा सगळा 'फोकस' व्यक्तिरेखांच्या वैयक्तिक समस्यांवरच ठेवलेला आहे.

'ठरलेलं लग्न करावं की नाही ?' ह्या द्विधेत असलेल्या अभय देओलला, लग्नाच्या पत्रिकाही वाटून झालेल्या असतानाही, त्याचा मित्र हृतिक रोशन 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये म्हणतो, 'Dude, its YOUR life !' तिथेच फरहान अख्तरचा एका स्पॅनिश मुलीसोबतचा 'वन नाईट स्टॅण्ड' दाखवताना त्या नात्याला 'व्यभिचार' म्हणून दाखवलं जात नाही.
इतर कुणाहीपेक्षा माझ्या आयुष्यावर माझा हक्क सगळ्यात जास्त आहे, हा विचार आताशा मनांत रुजायला लागला आहे. स्वबळावर नितांत विश्वास असणाऱ्या ह्या मनाला आता देव, धर्म, आई-वडिलांचा आधार वगैरे अनन्यसाधारण वाटत नाहीत. ह्याच मनाला 'प्रेम' ही गोष्टही दुय्यम किंवा तिय्यम झाली आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधला प्रियकर, आपल्या त्या प्रेमाखातर ज्याच्या परस्परमान्यतेची खातरजमाही
निश्चित झालेली नसते, लंडनहून थेट भारतात येतो, पंजाबमधील आपल्या प्रेयसीच्या गावीही पोहोचतो आणि अखेरीस तो दिलवाला शाहरुख आपल्या दुल्हनिया काजोलला प्राप्तही करतो. आजचा 'कभी अलविदा ना कहना' मधला शाहरुख प्राप्त केलेल्या प्रेमाशी लग्नोत्तर मतभेद झाल्यावर नव्याने प्रेमात पडतो आणि त्या प्रेमामुळे संसार संपवतो.
'कभी अलविदा ना कहना' वरून आठवलं. नातीही ठिसूळ झाली आहेत रे मित्रा आजकाल. माझ्या परिचयातल्या कित्येक जणांनी परस्पर सामंजस्याने कायदेशीर घटस्फोट घेतले आहेत आणि कित्येक जण त्याचा विचारही करत आहेत. तडजोड करणे, हेसुद्धा आताशा कालबाह्य होत चाललं आहे. कारण ? 'माझ्या आयुष्यावर माझा हक्क सगळ्यात जास्त आहे'. म्हणूनच व्यावसायिक चित्रपटकर्तेही 'कभी अलविदा ना कहना', 'चलते चलते', 'साथिया' सारखे चित्रपट बनवतात. ते तिकीट खिडकीवरसुद्धा चांगले आकडे दाखवतात.
एकूणच चित्रपटकर्त्यांची 'प्रेम' ह्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली आहे. नव्हे चित्रपटाकडेच पाहण्याची दृष्टी व्यापक झाली आहे. 'प्रेम' हा विषय टाळून, गाळून कहाणी सादर होते. चित्रपटातील पात्रं प्रेमाच्या पुढचा विचार करणारी दाखवली जात आहेत. 'मैं हूँ ना', 'रंग दे बसंती', 'अब तक छप्पन्न', 'चक दे इंडिया', 'थ्री इडियट्स', 'तारे जमीं पर', 'पा', 'बजरंगी भाईजान' सारखे अनेक चित्रपट जे लोकांनी खूप डोक्यावर घेतले, ते काही प्रेमकहाणी सांगणारे नव्हतेच. करायचंच असतं तर ह्या व अश्या इतर सगळ्या चित्रपटांत प्रेमकहाणीला घुसडता आलंच असतं. पण ते केलं गेलं नाही. चरित्रपटांची जी एक लाट सध्या आली आहे तीसुद्धा म्हणूनच. चित्रपटात प्रेमकहाणी नसली, तरीही तो व्यावसायिक यश मिळवू शकतो, हा विश्वास आल्यामुळेच उत्तमोत्तम तसेच नवोदित दिग्दर्शकही चरित्रपट बनवत आहेत आणि ते यशस्वीही ठरत आहेत. नाही म्हणता, मध्येच एखादा 'रांझणा' येतो, जो एक अस्सल प्रेमकहाणीच असतो. पण तो अपवादच. किंवा एखादा 'लंच बॉक्स' येतो. पण तोही वेगळेपणामुळेच लक्षात राहतो.
हे सगळं कशाचं द्योतक आहे ?
ह्याचंच की, 'प्रेम' ही गोष्ट आताशा Just another thing झालेली आहे. आजच्या पिढीसाठीही. किंवा असं म्हणू की आजच्या त्या उप-पिढीसाठी, जिचा तू आणि मी कदाचित भाग नाही आहोत ! दिसतील. आजही कुणाच्या प्रेमासाठी वेड्यासारखे वागणारे प्रेमवीर दिसतील. ही जमात नामशेष होणार नाहीच. पण तिची संख्या कमी झाली आहे.

मला असं वाटतं, साधारणत: 'दिल चाहता है' ह्या २००१ सालच्या चित्रपटानंतर चित्रपटांत बराच बदल घडला आहे. ती कहाणी तीन मित्रांची होती. आमीर खान एक फ्लर्ट, जो दर वीकेंडला गर्लफ्रेंड बदलत असावा. सैफ अली खान एक गोंधळलेला नवतरुण, जो दर काही महिन्यांनी कुणा न कुणाच्या प्रेमात मनापासून पडत असावा. आणि अक्षय खन्ना, कलाकार असलेला, हळव्या मनाचा, सभोवतालच्या प्रत्येक चीजवस्तूकडे, व्यक्तीकडे संवेदनशीलपणे पाहणारा. अक्षय खन्नाचं त्याच्या जवळजवळ दुप्पट वयाच्या डिम्पल कपाडियाच्या प्रेमात पडणं, जे ह्या चित्रपटात दाखवलं आहे, तो हिंदी चित्रपटासाठी एक 'कल्चरल शॉक'च होता. पण ज्या विश्वासाने आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक फरहान अख्तरने ही कहाणी सादर केली, त्यामुळे ती लोकांपर्यंत तर पोहोचलीच; पण इतर चित्रपटकर्त्यांनाही एक दृष्टी मिळाली की असा वेगळा विचार करूनही व्यावसायिक चित्रपट बनू शकतो. त्यानंतर पुढे 'प्रेम' ह्या संकल्पनेला सर्वांनीच एक तर उंच आकाशात बिनधास्त विहार करणाऱ्या पतंगाप्रमाणे मोकळं सोडलं किंवा चित्रपटाच्या दुचाकीच्या 'बॅक सीट'वर बसवलं. रायडींग सीटवर इतर राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक, वैयक्तिक समस्या आल्या, त्यांच्या कहाण्या आल्या. 'रायडर'चं लक्ष रस्त्यावर राहिलं आणि 'बॅक सीट'वर बसलेलं प्रेम एक तर पूर्णपणे शांत राहिलं किंवा परत खुल्या हवेचा आनंद बिनधास्तपणे घेऊ लागलं. पूर्वी शहरातल्या मुलीही स्वत:च्या अफेअर्सची खुलेआम चर्चा करत नसत. सामान्य मुलींचं सोड रे. सिनेतारकाच पहा की ! ऐश्वर्या आणि सलमानचं नातं जगजाहीर असतानाही कधी ऐश्वर्याने त्याची बिनधास्त कबुली दिली ? ते नातं दोघांकडून होतं की नाही, हे माहित नाही. पण नक्कीच काही तरी शिजतच होतं, ह्याची खात्री झाली जेव्हा सलमानने दारुच्या नशेत धिंगाणा केला. इंटरनेटवर जरासा शोध घेतला तर जुन्या जुन्या तारे-तारकांच्या प्रेमसंबंधांच्या अनेक कहाण्या वाचायला मिळतील. पण हे सगळं नेहमीच गुलदस्त्यात ठेवण्यात येत असे. मात्र आजची दीपिका पदुकोण 'My choice' चा नारा लावून स्वत:चे आयुष्य स्वत:च्या मर्जीने जगते. ती रणबीरशी अफेअर असताना शरीरावर त्याचं नाव गोंदवून घेते. ते नातं संपवल्यानंतर रणवीर सिंगसोबत जोडलेल्या नव्या नात्यालाही लपवून ठेवत नाही. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर तर एकत्र राहतात. अनुष्का शर्माही विराट कोहलीसोबतचे आपले संबंध सर्वांसमोर येऊ देते.
'हे काय वय आहे का लग्नाचा निर्णय घेण्याचं ?' असं आजची मुलं स्वत:च म्हणतात. पूर्वी हा डायलॉग आई-बाप मारायचे. ही मुलं प्रेम करतात पण पुढचा निर्णय मात्र विचारपूर्वक घेतात. हाच बदल चित्रपटांत परिवर्तीत होतो आहे. पुन्हा एकदा सांगतो, कुणामध्ये कुणामुळे बदल झाला हे विचारमंथन स्वतंत्र करू. पण दोघांतही बदल झाला आहे, हे नक्कीच !

लगेच इतका चिंताक्रांत होऊ नकोस, मित्रा. पण बदलत्या काळासोबत बदलायला हवं. कारण कालबदल हा उतारावरून गडगडत येणारा एक मोठा धोंडा आहे. तू आणि मी फक्त त्याच्या रस्त्यातून बाजूला होऊ शकतो.
'प्रेम' ही काही नामशेष होणारी बाब नाही. ते शाश्वत आहे. इतर बाबी येतील आणि जातील, पण जोपर्यंत माणसाच्या भावना शाबूत आहेत, जोपर्यंत त्याचा 'रोबो' होत नाही तोपर्यंत तो प्रेम करतच राहील. त्याचं महत्व कमी होईल इतकंच. स्त्री आणि पुरुष दोघांना एकमेकांची मानसिक व शारीरिक गरज असणे, हा निसर्गनियम आहे. तो पिढ्यांच्या उप-पिढ्या पडल्याने बदलणार नाही. तो नियम पाळायचा की नाही, हा व्यक्तिगत निर्णय असला, तरी समुदायाचा कल हा नियम पाळण्याकडेच असणार आहे. त्याच्या तऱ्हा, वेळा बदलतील. प्रेम प्रत्यक्ष आयुष्यातही केलं जाईल आणि चित्रपटांतही दाखवलं जाईल. फक्त ते तू केलंस, त्यापेक्षा जरा वेगळं असेल. आजची 'नवतरुणाई' करतेय, त्यापेक्षा उद्याची वेगळ्या प्रकारे करेल. कारण आज सर्वमान्य, सर्वप्रिय असलेली कोणती संकल्पना उद्या मोडीत निघेल सांगता येत नाही ! ही गती इतकी प्रचंड आहे की आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर -

आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे से मंज़र बदल जाता हैं !"

घरी पोहोचलो. मन-मित्राचा घसा अखंड बडबडीने कोरडा पडला असावा. आता ताबा डोक्याने घेतला. 'हम दिल दे चुके सनम' पासून ते अगदी काल-परवा आलेल्या 'तनू वेड्स मनू - रिटर्न्स' पर्यंतचे चित्रपट आठवले, त्यातली पात्रं आठवली. खोलवर समुद्रात उठलेल्या उंच लाटेने किनाऱ्यावर येईपर्यंत रेतीत मिसळून जावं, तसं काहीसं वाटलं. डोळ्यांसमोरून झरझर करत अनेक चित्रपट सरकले. 'सोचा ना था', 'लाईफ इन अ मेट्रो', 'रॉक स्टार', 'दम लगा के हैश्या' अश्या काही वेगळ्या धाटणीच्या प्रेमकहाण्या आठवल्या. ह्या सगळ्या पात्रांचे प्रॉब्लेम्स वेगळे होते. पण होत्या प्रेमकहाण्याच. हाताळणी वेगळी होती. पण होतं सगळं 'सच्चं'च.
माझ्या जन्माच्याही आधी एक चित्रपट आला होता. 'एक दुजे के लिये'. त्यातले कमल हसन आणि रती अग्निहोत्री अखेरीस आत्महत्या करतात. मला इतकंच माहित आहे की त्या नंतर लोकांमध्ये अश्याप्रकारे एकत्र आत्महत्या करण्याचंही वेड पसरलं होतं. ते त्या वेळीही वेडच मानलं गेलं असेल आणि आजही तसंच मानलं जाईल. पण आज कुणी असला फिल्मी बाष्कळपणा करेल असं वाटत नाही. एरव्ही आयपीएल क्रिकेटपासून यो यो हनी सिंगपर्यंत सामान्य व अतिसामान्य दर्ज्याच्या कलागुणांत रमणारी आजची पिढी ही मागल्या कैक पिढ्यांपेक्षा स्वत:च्या आयुष्याबाबत, भविष्याबाबत खूप जागरूक आहे. ती 'तेरे नाम' मधल्या सलमानमुळे प्रभावित होईल, त्याची नक्कल म्हणून 'पोमेरीयन'सारखी हेअर स्टाईल करतील, पण अपयशी प्रेमाच्या दु:खात जीव देणार नाहीत.

तसं पाहिलं, तर आजही जेव्हा एखादा स्टारपुत्र किंवा एखादी स्टारकन्या पदार्पण करते किंवा त्याचं वा तिचं पदार्पण करवलं जातं तेव्हा 'लव्ह स्टोरी' च निवडली जाते. कारण आजही 'लव्ह स्टोरी' हा बॉक्स ऑफिसवर 'सेफ गेम'च आहे. पण ती करताना वाहवत गेलेला दिग्दर्शक 'लाफिंग स्टॉक' होण्याचीच शक्यता जास्त. कुतूहलापोटी त्या नव्या चेहऱ्यांना लोक पहिल्यांदा पाहतीलही, पण जर त्यांनी अजून एखादा चित्रपटही हाच बाष्कळपणा केला, तर हृतिकच्या 'कहो ना प्यार है' नंतर त्याच 'हृतिक-अमिषा'च्या 'आप मुझे अच्छे लगने लगे' चं जे झालं, तेच होईल. कारण जमाना 'गर्ल नेक्स्ट डोअर'चा असला तरी, 'चॉकलेट बॉय' इमेजचा राहिलेला नाही.
'रोमिओ-ज्युलियेट' सारखं प्रेम दाखवणारा संजय लीला भन्साळीचा 'राम-लीला' मी जेव्हा पाहिला होता, तेव्हा हादरलोच होतो. हा कसला थिल्लरपणा आहे, हे माझं तेव्हाचं मत आजही कायम आहे. ते प्रेम मला प्रेम न वाटता वासनाच वाटली होती. पहिल्याच भेटीत, ओळख-पाळख तर सोडाच, नावही माहित नसताना शारीरिक जवळीक, नंतरचे सगळे संवादही अश्लीलतेकडे झुकणारे, हे सगळं मला भन्साळीकडून, ज्याने 'हम दिल दे चुके सनम' सारखी 'शालीन' प्रेमकहाणी दाखवली होती, अपेक्षित नव्हतं. पण कदाचित भन्साळीची दृष्टी बरोबरच असेल. कारण आजचा लोकप्रिय प्रियकर आहे 'इम्रान हाशमी'. त्याचं प्रेम जितकं 'उत्कट' आहे, तितकंच सापेक्षही. त्यात शारीर संबंधांना आडकाठी नाही. 'प्रेमात वासनेलाही जागा असते' असा विचार करणारा, प्रत्येकाने मनात स्वत:च्याच नकळत जपलेला प्रियकर आजकाल पडद्यावर येऊ लागला आहे कारण तो मनातून बाहेर प्रत्यक्ष आयुष्यातही येऊ लागला आहे. 'प्रेमानंतरची पुढची अपरिहार्य पायरी 'लग्न' असते', ही समजूत आता उरलेलीच नाही. 'रील' आणि 'रियल' दोन्ही 'लाईव्स'मध्ये !

आता मला चित्रपट आणि समाजात एक वेगळंच नातं जाणवायला लागलं. 'गुन्हेगार' आणि 'कायदा' हे ते नातं. गुन्हा करायच्या पद्धती जसजश्या प्रगत होत गेल्या, तसतसा कायदाही शहाणा होत गेला आहे. विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खास कायदे जन्माला येतात किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल केले जातात. कधी हे बदल, गुन्ह्याच्या एक पाउल पुढचे असतात तर कधी त्याच्या मागोमाग, त्याच्या जोडीने असतात. 'चित्रपट' हा तो 'कायदा' आहे, जो 'समाज' कुठे चालला आहे, हे पाहून आपलं पाउल टाकतो. कधी समाजाच्या एका पाउलासोबत चित्रपट दोन पाउलं टाकतो, कधी त्याच्या जोडीने एकच. कायद्यातील पळवाटा शोधून नवनवे गुन्हे करण्याच्या क्लृप्त्या काढल्या जातात, तद्वतच चित्रपटातून 'योग्य' तो बोध घेऊन समाज आपली दिशाही ठरवत असतो.
'समाज' आणि 'चित्रपट' = 'गुन्हेगार' आणि 'कायदा'
ह्या जोड्या परस्परांकडून खूप काही शिकतात. चित्रपटाने समाजाला आणि समाजाने चित्रपटाला 'प्रेम' शिकवलं आहे. एकमेकांनी, एकमेकांची घेतलेली ही शिकवणी नेहमीच चालू राहणार आहे.
मित्र बरोबर बोलत होता. 'बदल' झाला आहे, 'अस्त' किंवा 'अंत' नाही. कारण आजचा तरुण जेव्हा जावेद अख्तर साहेबांच्या शब्दात बोलतो तेव्हा तो बोलतो -

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
नजर में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम


आजही इथे 'दिलो में' आहे, 'दिमागों में' नाही. म्हणजे आजही 'दिल'ला महत्व आहेच. पूर्वीपेक्षा कमी असलं तरी काय झालं ?

- रणजित पराडकर

Tuesday, November 03, 2015

मराठवाडा

काळी माती
ठाक कोरडी
सफेद झाली
धूळ उडवतो
तापट वारा
धुळीत आहे
आज माखला
उद्या हरवला
धुळीत आहे
लडबडलेला
मराठवाडा

अवर्षणाची
टोपी घालुन
दुष्काळाचा
पंचा नेसुन
तांबुस डोळे,
रंध्रे जाळुन
डांबरवितळ्या
रस्त्यावरती
चप्पल भाजत
गळपटलेला
मराठवाडा

'हक्क कोणता?'
ठाउक नाही
'मदत मिळाली?'
माहित नाही
वोट बँकच्या
धरणांमध्ये
पाणी नसता
पश्चिमाभिमुख
विकास पाहत
हपापलेला
मराठवाडा

बहुधा हा तर
उगाच आहे
इतिहासाच्या
पानांपुरता
आणि नकाशा
भरण्यापुरता
राग न वाटे
प्रेम न वाटे
रुक्ष कोरडा
विस्कटलेला
मराठवाडा

संतजनांनी
गौरवलेला
नेतृत्वांनी
गाजवलेला
तरी सदोदित
स्वत:च अपुल्या
औलादींना
आसुसलेला
विस्कटलेला
हपापलेला
गळपटलेला
मराठवाडा

....रसप....
०३ नोव्हेंबर २०१५
(संपादित - १६ मे २०१७)

Monday, November 02, 2015

अंधारात हरवलेला चार्ल्स (Movie Review - Main Aur Charles)

चार्ल्स शोभराज.
जगभरातल्या सगळ्यात सुप्रसिद्ध गुन्हेगारांपैकी एक आणि भारतातला तर बहुतेक सर्वाधिक सुप्रसिद्ध गुन्हेगार. सहसा गुन्हेगार कुप्रसिद्ध असतात, पण चार्ल्स सुप्रसिद्धच होता. ऐंशीच्या दशकात जेव्हा त्याच्या बातम्या वृत्तपत्रांचे मथळे बनत होत्या, तेव्हा त्या प्रत्येक बातमीगणिक तो लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनत होता. त्या काळातल्या अपरिपक्व लहान व तरुण मुलांना तर 'चार्ल्स शोभराज' ह्या नावाभोवतीचं वलय वेगळंच वाटत होतं. मला आठवतंय, जेव्हा मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं होतं, तेव्हा किती तरी दिवस मला ही व्यक्ती कुणी तरी गुप्तहेर किंवा राजकुमार वगैरे आहे असं वाटत होतं ! सामान्य लोकांत बनलेल्या त्याच्या ह्या प्रतिमेसाठी पूर्णपणे 'श्रेय' माध्यमांना देण्यापेक्षा मी असं म्हणीन की चार्ल्सने माध्यमांचा उत्तमप्रकारे, चाणाक्षपणे वापर करून घेतला होता. 'मैं और चार्ल्स' मध्ये जेव्हा एक वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी चार्ल्सविषयी बोलताना म्हणतो, 'चार्ल्स वोह कहानियाँ लिखता हैं जिन्हें वोह बेच सके' तेव्हा त्यातून हेच समजून येतं की हा गुन्हेगार इतर गुन्हेगारांपेक्षा खूप वेगळा होता. तो अभ्यासू, अतिशय चतुर, निडर, प्रचंड आत्मविश्वास असलेला आणि खूप संयमही असलेला - त्या 'वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी' च्याच शब्दांत - एक असा लेखक होता, जो लिहिण्यासाठी पेन व कागद वापरत नव्हता, तर स्वत:चं आयुष्यच वापरत होता !

चार्ल्स शोभराजच्या करामतींवरून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपापला कार्यभाग उरकला. अनेक चित्रपटांतही त्याच्या क्लृप्त्या बेमालूमपणे वापरल्या गेल्या आणि काही व्यक्तिरेखाही ढोबळपणे त्याच्यावर आधारून उभ्या केल्या गेल्या. मात्र थेट चार्ल्सवरच चित्रपट बनवणे आजपर्यंत शक्य झालं नव्हतं कारण चाणाक्ष चार्ल्सने आपल्या जीवनकहाणीचे हक्क विकत घेण्यासाठी लावलेली बोलीच तोंडचं पाणी पळवणारी होती. मात्र 'मैं और चार्ल्स' बनवताना हे हक्क घेण्यात आले तत्कालीन दिल्ली पोलीस कमिशनर 'आमोद कांत' ह्यांच्याकडून. पण चित्रपट काही श्री. कांत ह्यांच्या दृष्टीकोनातून कहाणी सांगत नाही. तो पूर्णपणे चार्ल्सचाच चित्रपट आहे. तो 'मैं और चार्ल्स' नसून ' मैं और कांत' आहे.

'प्रवाल रामन' हे रामगोपाल वर्माच्या 'फॅक्टरी'चं एक उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. 'डरना मना है', 'डरना जरुरी है' आणि '404' हे त्यांचे चित्रपट पाहण्यासारखे आहेत. पण 'चार्ल्स'ची कहाणी सांगताना त्यांनी वेगळीच धाटणी निवडली आहे. हे जे कथन आहे ते काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या दिबाकर बॅनर्जींच्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' च्या सादरीकरणाशी थोड्याफार प्रमाणात साधर्म्य सांगतं. हा चित्रपट पहिल्यांदा बघतानाच दुसऱ्यांदा पाहिला पाहिजे. नाही तर दुसऱ्यांदा बघूनही पहिल्यांदा पाहिल्यासारखा वाटेल. म्हणजे, तो बघण्यापूर्वी चार्ल्सविषयीची माहिती असणं आवश्यक आहे आणि तिला एक उजळणी देणंही. ही एक परीक्षा आहे. ह्या पेपरला बसण्यापूर्वी अभ्यास करणे गरजेचं आहे. (आणि ते केलं नसेल, तर कॉपी करण्यासाठी सोबत कुणी तरी असणं तरी आवश्यक !)
किंचित कर्कश्य पार्श्वसंगीत, हळू आवाजातले संवाद, संवादात इंग्रजीचा भरपूर वापर आणि संपूर्ण चित्रपटात सतत असलेला अंधार ह्यामुळे आधीच अंमळ क्लिष्ट सादरीकरण आणखी क्लिष्ट वाटायला लागतं. चित्रपट उरकतो, आपल्याला काही तरी वेगळं, नवीन पाहिल्यासारखं वाटतं, पण त्याने समाधान झालेलं नसतं. म्हणूनच 'मैं और चार्ल्स' सर्वांच्या पसंतीला उतरेल, ह्याची शक्यता कमी आहे.

चार्ल्सचा गुन्हेगारी जगतातला प्रवास हा भारतासह जवळजवळ १०-१२ देशांतला आहे. मात्र चित्रपट भारत व थायलंडव्यतिरिक्त इतर देशांना स्पर्श करत नाही. तो त्याच्या आयुष्यातल्या त्याच टप्प्याबद्दल सांगतो ज्या टप्प्यात श्री. आमोद कांत त्याच्याशी संबंधित होते. मात्र ह्यामुळे चार्ल्स पूर्णपणे उभा राहत नाही आणि मुख्य व्यक्तिरेखेचाच आगा-पिच्छा समजून घ्यावा लागत असल्याने चित्रपटच अपूर्ण ठरतो.

ही मुख्य व्यक्तिरेखा कितीही अपूर्ण असली, तरी रणदीप हुडा कमाल करतो. त्याचा चेहरा चार्ल्स शोभराजशी किती मिळता जुळता आहे, हे चित्रपट पाहताना जाणवतं. अर्थात, त्याचा मेक अप व गेट अप त्याला हुबेहूब 'चार्ल्स' बनवतो, पण मूळ चेहराही बऱ्यापैकी साम्य सांगणारा आहे. त्यामुळे ह्या भूमिकेसाठी इतर कुणीही अभिनेता  इतका फिट्ट ठरला असता का, ह्याचा संशय वाटतो. बोलण्याची अ-भारतीय ढब (बहुतेक फ्रेंच) त्याने अप्रतिम निभावली आहे. शोभराजच्या ज्या 'चार्म' बद्दल सगळे बोलतात, तो 'चार्म'सुद्धा त्याने दाखवला आहे. त्याचं व्यक्तिमत्व कुणालाही भुरळ पाडेल असं खरोखर वाटतं, त्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे भाळलेल्या 'मीरा शर्मा'ची आपल्याला दयाच येते.



'मीरा'ला साकारणारी रिचा चढ्ढासुद्धा लक्षात राहते. तिचं 'मसान'मधलं काम मला तरी पूर्ण मनासारखं वाटलं नव्हतं, पण इथे मात्र ती 'मीरा' म्हणून कम्फर्टेबल वाटते.

आमोद कांत ह्यांच्या भूमिकेत अजून एक गुणी अभिनेता 'आदिल हुसेन' दिसून येतो. कर्तव्यदक्ष आणि चार्ल्सला अचूक ओळखणारा त्याच्याच इतका चलाख व अभ्यासू पोलीस ऑफिसर आदिल हुसेननी उत्तम वठवला आहे. चित्रपटाच्या कहाणीचं वलय चार्ल्सभोवती आणि पर्यायाने रणदीप हुडाभोवती असल्याने आमोद कांत व पर्यायाने आदिल हुसेन सहाय्यक किंवा दुय्यम ठरतात, हे दुर्दैवच.

टिस्का चोप्रा कांतच्या पत्नीची तिय्यम भूमिकेत मर्यादित दिसते आणि त्यामुळे विस्मृतीत जागा मिळवते.

इन्स्पेक्टर सुधाकर झेंडे, ज्यांनी प्रत्यक्षात चार्ल्सला गोव्यात जाऊन पकडून मुंबईला आणलं होतं, 'नंदू माधव' ह्यांनी साकारला आहे. अजून एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर, ज्याला कुठे तरी बहुतेक ह्याची जाणीव असते की त्याने चार्ल्सला पकडलेलं नसून, चार्ल्सने स्वत:च स्वत:ला पकडवलं आहे, त्यांनी सफाईने साकारला आहे. 'चार्ल्स'सोबतच्या त्यांच्या अनेक नजरानजर त्यांनी आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करण्याच्या संधी समजून अक्षरश: जिंकल्या आहेत.

आजकालच्या बहुतांश चित्रपटांप्रमाणे, संगीत कुठलेही मूल्यवर्धन करत नाही. उलटपक्षी पार्श्वसंगीत अधूनमधून त्रासच देतं.

कथा-पटकथालेखन (प्रवाल रामन) बहुतेक जिकिरीचं होतं. कारण २ तासांत चार्ल्सची पूर्ण कहाणी सांगणं अशक्यच असावं. त्याचं आयुष्य खरोखर इतक्या नाट्यमयतेने भरलेलं आहे, म्हणूनच तर त्याने त्याचे हक्क विकण्यासाठी भरमसाठ बोली लावली आहे ! कदाचित हा विषय दोन-तीन भागांत सांगण्याचा असावा. तरी थोडा सुटसुटीतपणा असता, तर आणखी मजा आली असती, हे मात्र नक्कीच.
काही संवाद चुरचुरीत आहेत आणि एकंदरीतच जितके ऐकू येतात तितके सगळेच लक्षवेधक आहेतच ! ह्यासाठी रामन ह्यांचं अभिनंदन !



एकंदरीत, 'मैं और चार्ल्स' हा काही एन्टरटेनर नाही. हा चित्रपट प्रायोगिकतेच्या सीमारेषेवर 'मुख्य धारा' व 'डॉक्युमेंटरी' ह्यांच्यात 'सी-सॉ' खेळतो. ही खेळ जे एन्जॉय करू शकतात, त्यांना चित्रपट पाहवतो. बाकी लोक मात्र, दुर्दैवाने 'The End' ची वाट पाहत बसतात. कारण ह्या चित्रपटाच्या अंधारात कहाणीचा गुंता सोडवणं कठीणच आहे !

रेटिंग - * *

हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये ०१ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...