Thursday, January 29, 2015

भरपाई

कुठल्याश्या पिढीने माझ्या
कुठल्या तरी पिढीवर कुणाच्या
अन्याय केला होता
त्याची मी करतो आहे भरपाई
ज्यासाठी माझी काहीच हरकत नाही

मात्र इतकी तरी शाश्वती हवी आहे की,
हा हिशोब सतत वाढताच नसावा.
सावकाराच्या चोपडीतल्या
निरक्षर अंगठ्यांभोवती फास बनून आवळत जाणाऱ्या
चक्रवाढ व्याजासारखा
सतत फुगताच नसावा.

उद्या माझी कुठलीशी पिढीसुद्धा
फोडायची अन्यायाचं एक अनोळखी खापर
कुणाच्या तरी कुठल्याश्या पिढीच्या
निरपराध अनभिज्ञ माथ्यावर..
अन्याय-भरपाईच्या हिशोबात
चोपड्यांतलं पान अन् पान भरायचं
आणि
डोळ्याच्या बदल्यात डोळा घेत
आधीच बहिरं असलेलं बापूंचं सर्वसमावेशक जग
आंधळंसुद्धा व्हायचं..

मग
ना आक्रोश ऐकला जाईल, ना हिशोब पाहिला जाईल
प्रत्येक मनात जखमेचा व्रण जपला जाईल

....रसप....
२४ जानेवारी २०१५

Wednesday, January 21, 2015

पहिली लोकल

सावळा निश्चल रस्ता पहाटेच्या रात्री पहुडलेला
संथ पाउलांचा ताल मंद ठोक्यांशी जुळलेला
आणि आपलाच आपल्याशी एक मूक हिशोब चाललेला
धुसफुसीचा,
घुसमटीचा,
शक्याशक्यतांचा,
स्वप्न-वास्तवाचा,
आणि जिथे काही समजलं नव्हतं,
तिथे हातचा राखत..
जुळवाजुळव करत....

हाच सगळा हिशोब एका पिवळसर कागदावर मांडला होता
आणि तिच्या निद्रिस्त उश्याशी ठेवला होता
बाहेर निघताना दाराला कडी घातली नव्हती
कारण एक मूर्ख आशा कोयंड्यात साठली होती

स्टेशनवर पहिली लोकल यायला अवकाश होता
आणि बसायला जागा भरपूर होती
वर्तमानाशी नातं सांगणारी निरर्थकता..
त्या निरर्थक शून्यत्वात,
अजून एक शून्य मिसळलं..
एका बाकड्यावर विसावलं

मिटलेल्या डोळ्यांच्या आड पत्राची उजळणी चालू होती
आणि अचानक..
कर्कश्य भोंग्याने सगळी अक्षरं विखुरली..

बहुतेक तिने पुन्हा एकदा पत्र फाडलं होतं..
न वाचताच

....रसप....
२१ जानेवारी २०१५

Tuesday, January 13, 2015

रंगमंचाला न ठाउक बदलले पडदे किती

रंगमंचाला न ठाउक बदलले पडदे किती
तेच ते नेपथ्य तरिही हासले, रडले किती

वेदना, दु:खे, व्यथांचे साठले खजिने किती
आसवांवर पौरुषाची ठोकली कुलुपे किती

वाटते पाहून ओंजळ पूर्ण भरुनी सांडता
ह्यातले माझे किती अन् त्यातले माझे किती ?

जग मनापासून तू विज्ञान आणिक धर्मही..
बघ कुणीही सांगते का 'राहिली मिनिटे किती' ?

पाहिला जेव्हा जनाज़ा हात तेव्हा जोडले
एक क्षण माणूस झालो, एरव्ही जमले किती ?

एक माझ्या आत्महत्येने तुम्ही हेलावता
गाडली आहेत वाफ्यातून मी प्रेते किती !

....रसप....
६ जानेवारी २०१५

Tuesday, January 06, 2015

चित्रपटात न मावलेले लोकमान्य - (Movie Review - Lokmanya Ek Yugpurush)

चहा हा 'चहा' समजूनच प्यायला पाहिजे. जर कुणी म्हटलं की, 'साखरेचा पाक समजुन पी' किंवा 'काढा समजुन पी' तर कसं चालेल ? 'सूप' म्हणून 'बाउल'मध्ये काही तरी आणून द्यायचं आणि म्हणायचं की, 'कोशिंबीर समजुन खा' तर कसं चालेल ? तसंच, एक शौकीन माणूस चित्रपट हा 'चित्रपट' म्हणूनच पाहतो. 'हा चरित्रपट आहे, ह्याला वेगळ्या नजरेने पहा.. ह्याचं बजेट कमी आहे, ह्याला सहानुभूतीने पहा..' वगैरे गोष्टी मनावर दगड ठेवायला लावतात, दुसरं काही नाही. कुठे तरी आत काही तरी अतृप्त राहतंच, अपूर्ण राहतंच. वेगळ्या नजरेने, सहानुभूतीने पाहूनही मग प्रतिक्रिया सावधच असते. 'कसा होता?' विचारलं की 'बरा होता... ठीकच होता... वाईट नाही.. अगदीच न पाहण्यासारखा नाही' वगैरे अधांतरी विधानं केली जातात.
'लोकमान्य' पाहिल्यावर माझी तरी प्रतिक्रिया अशीच अधांतरी होती.

लोकमान्य टिळक अर्थात बाळ गंगाधर टिळक अर्थात केशव गंगाधर टिळक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. दस्तुरखुद्द महात्मा गांधी ज्यांना गुरुस्थानी मानायचे असे एक तडफदार नेतृत्व. शंभर वर्षांपूर्वी आजच्या सुधारणा सुचवणारा अद्वितीय द्रष्टा माणूस. टिळकांचे आयुष्य किंबहुना कुणाही स्वातंत्र्यसेनानीचे आयुष्य हे एका २-३ तासाच्या कलाकृतीत बांधणं म्हणजे निव्वळ अशक्यच. काही धागे अपरिहार्यपणे सुटे राहणं स्वाभाविकच. पण, जे धागे विणले जातील त्यांची वीण घट्ट असावी, अशी माफक अपेक्षा 'लोकमान्य' पूर्ण करण्यात कमी पडतो.

आजच्या जगातील एक तरुण पत्रकार. असा एक पत्रकार जो आजच्या विकल्या गेलेल्या, धंदेवाईक पत्रकारितेला अंगीकारून 'अपना काम बनता, तो भाड मे जाये जनता' हे सूत्र अवलंबून चाकोरीबद्ध मध्यमवर्गीय जीवन जगतो आहे. ज्याला आसपास होणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांचं फारसं सोयर अथवा सुतक नाही. जो उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहुन, खुल्या कानांनी ऐकून रोज रात्री निर्ढावलेल्या शांतपणे झोपी जाऊ शकतो, असा कुणीही एक सामान्य माणूस निवडा, तो आहे ह्या चित्रपटातला तरुण पत्रकार 'मकरंद' (चिन्मय मांडलेकर).
लो. टिळकांच्या आवाजातील एका ध्वनिफितीचे जाहीर श्रवण असलेल्या एका कार्यक्रमाचे 'कव्हरेज' करण्यासाठी त्याला पाठवण्यात येतं आणि ती ध्वनिफीत त्याच्या निद्रिस्त मनाला जागं करते. उत्सुकता वाढीस लागून तो टिळकांविषयीची अजून माहिती मिळविण्यासाठी त्यांच्यावरील लेखन वाचतो आणि त्यांच्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव पडत जातो. 'त्या' काळातील विदारक परिस्थितीशी तो आजच्या परिस्थितीची सांगड घालायला लागतो. तो अधिकाधिक माहिती मिळवत असताना दुसरीकडे टिळकांचा जीवनपट उलगडत जातो.
ह्या अंगाने ही कहाणी उलगडत जाते. थोडासा 'लगे रहो मुन्नाभाई' आणि बराचसा 'रंग दे बसंती' अधूनमधून डोकावतो.



चरित्रपट हे नेहमीच दोन व्यक्तींसाठी पाहिली जातात. एक म्हणजे ती व्यक्ती जिच्यावर तो चित्रपट आधारलेला असतो आणि दुसरी व्यक्ती ती जी ती भूमिका साकारत असते. 'लोकमान्य' लोकमान्यांसाठी पाहाणाऱ्या लोकांना निराश करतो कारण दोन अडीच तासांच्या चित्रपटात टिळकांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त भाग दाखवण्याच्या कसरतीत अनेक ठिगळं एकत्र जोडल्यासारखं वाटतं. कुठलाच एकसंध परिणाम साधला जात नाही. अधूनमधून वाटत राहतं की आता पकड घेईल, आता पकड घेईल. पण दुर्दैवाने तसं होतच नाही. दुसरीकडे लोकमान्यांच्या भूमिकेतील सुबोध भावे मात्र छाप सोडून जातो. टिळकांच्या नजरेतील करारी भाव त्याने असा काही दाखवला आहे की त्याला तोडच नाही. एकूणच त्याने चित्रपटभर अंतर्बाह्य टिळक वागवले आहेत. टिळकांची बहुचर्चित वाक्यं त्याने दमदारपणे उद्गत केली आहेत. त्यांचा त्या ठिकाणी, जसा परिणाम साधायला जायला हवा, तसा तो साधला जातो.
खरं तर इतर सर्वच बाजूंत उणा पडलेला हा चित्रपट सर्व्ह कलाकारांच्या सशक्त अभिनयानेच तोलून धरला आहे, असं म्हणता येऊ शकतं. चिन्मय मांडलेकरनेही आपली भूमिका - ती जरी बऱ्याच अंशी अविश्वसनीय वाटली तरी - चोख वठवली आहे. द्विधा, नैराश्य, बंड असा त्याच्या व्यक्तिरेखेचा प्रवास पटकथेत खूप बांधीवपणे मांडला नसला, तरीही तो त्याने मात्र चांगला सादर केला आहे.
प्रिया बापटला विशेष काम नसलं, तरी तिचा वावर नेहमीच खूप आल्हाददायक असतोच आणि इथेही आहे.
गोपाल गणेश आगरकर रंगवाणारा समीर विद्वांससुद्धा लक्षात राहतो, तसेच दाजी खरेंच्या भूमिकेतील अंगद म्हसकरनेही संयत अभिनय केला आहे.
सर्व पात्रांची वेशभूषा अभिनयातील अर्धे काम करत असावी, इतकी अचूक जमून आली आहे, त्यासाठी विक्रम गायकवाड (मेक अप) आणि महेश शेरला (वेशभूषा) ह्यांना विशेष दाद द्यायलाच हवी. तरी सावरकर म्हणून जे पात्र निवडलं आहे (१ किंवा २ च ओळी आहेत त्याच्या तोंडी) ते 'पात्र'च वाटलं मला तर. पण ह्याचं छोटंसं डेबिट 'कास्टिंग'ला पडायला हवं.
संगीत लक्षात ठेवण्यायोग्य नाहीच. मुख्य गीत (बहुतेक 'जीवन आपले सार्थ करा') तर 'लगान'च्या 'बार बार हां..' ची सही सही नक्कलच वाटतं.

वैयक्तिक पातळीवर मला ह्या चित्रपटात प्रकर्षाने एक गोष्ट खटकली. युगपुरुष हे 'युगपुरुष' ह्यासाठी नसतात की त्यांच्याव्यतिरिक्त इतर बहुतेक लोक चांगले नसतात. आगरकर, रानडे व (एकाच दृश्यात आलेले) महात्मा गांधी हीसुद्धा महान व्यक्तिमत्वंच होती. लोकमान्यांचं मोठेपण दाखवताना ह्या लोकांना छोटे दाखवण्याची आवश्यकता नव्हती. आगरकर-टिळकांत तात्विक मतभेद होते, ह्याचा अर्थ हा नाही की आगरकरांचे हेतू संशयास्पद होते. चित्रपटात ज्याप्रकारे 'सुधारक' व्यक्तींना ब्रिटीशांचे हुजरे म्हणून रंगवले आहे, ते पटलं नाही.
एकाच दृश्यासाठी गांधींना आणून त्यांना झिडकारून जाणारे टिळक दाखवून टिळकांचं मोठेपण सिद्ध होत नाही. त्यापेक्षा त्यांना दाखावलंच नसतं, तरी चाललं असतं. असंही टिळकांचा कॉंग्रेसमधील सहभाग, मोहम्मद अली जीनांशी असलेले चांगले संबंध, एनी बेझंट, होम रूल चळवळ वगैरे अनेक गोष्टींचा तर साधा उल्लेखसुद्धा चित्रपटात नाही.

कदाचित फार जास्त अपेक्षा ठेवून गेलो असीन, पण कुठे तरी आत काही तरी अतृप्त राहिलं आहे, अपूर्ण राहिलं आहे. म्हणूनच परदेशात असलेल्या एका मित्राने जेव्हा मला विचारलं -
'कसा आहे रे लोकमान्य? मी मिस केला !'
तेव्हा मी म्हटलं, 'नेव्हर माइंड, तू विशेष असं काही 'मिस' केलेलं नाहीस.'

रेटिंग - * *

Related Posts Plugin for WordPress, Blogger...