Monday, April 30, 2012

शब्द-सुरांचे नाते जुळले


शब्द-सुरांचे नाते जुळले मी तुमच्यातुन जाता जाता
अजुन शिदोरी नको कोणती मला जगातुन जाता जाता

माझे काही नव्हते येथे तुम्हाजवळचे दिले तुम्हाला
नको मला अश्रूंची सुमने ह्या बगिच्यातुन जाता जाता

विशाल अंबर अथांग सागर अनंत धरणी तुमच्यासाठी
नको मला कुठलीही चौकट मी माझ्यातुन जाता जाता

माझी वसने विरली तेव्हा नात्यांचीही वीण उसवली
नको मला बंधन स्मरणांचे अनुबंधातुन जाता जाता

ह्या जगण्याला आकाशाचे प्रेम दिले मी स्वरांजलीतुन
मरणालाही हसवुन जाइन मी जगण्यातुन जाता जाता


....रसप....
३० एप्रिल २०१२

Thursday, April 26, 2012

जीवना, वैरी न तू, नाही सखाही


ना कधी होता तुझा पुळका मलाही
जीवना, वैरी न तू, नाही सखाही

नेहमी माझे मुखवटे बदलतो मी
आठवे ना चेहरा मज कालचाही

कैक मी केले गुन्हे, ना सिद्ध झाले
वाटते, माझीच मी द्यावी गवाही

का, कसा बरबाद झालो, काय सांगू?
आजही प्रेमात माझ्या खोट नाही

मंदिरासम मानले मी घर प्रियेचे
आज कळले देव गाभाऱ्यात नाही..

सांगती इतिहास सोन्याच्या युगाचा
चाड नाही वर्तमानाची जराही !

पेटला वणवा तरी ना पेटलो मी
अन कटाक्षाने तिच्या का होय लाही ?


....रसप....
२६ एप्रिल २०१२

Wednesday, April 25, 2012

आर्ततेची 'ग्रेस'फुल सांज


क्षितीजास लागे कशी ओढ वेडी
तुझ्या गावची वाट चाले पुढे
फुलांच्या नशीबात कोमेजणे अन्
थवा पाखरांचा उदासी उडे

सुक्या पापणीला पुन्हा ओल येते
तुझ्या शब्दरंगांत तेजाळुनी
जुनी वेदनाही तुझे गीत गाते
तुझ्या दु:खगंगेमधे न्हाउनी

सरी पावसाच्या मुक्याने झराव्या
सुन्या माळरानावरी सोहळा
अश्या सांजवेळी रिता बैसलो मी
फुटे कोंब दु:खास हा कोवळा

तुझे शब्द वाचून मी पाहताना
मनावेगळे खेळ माझ्या मनी
ऋणाईत आजन्म आहे तुझा मी
खरा तूच रे अमृताचा धनी

जशी सांज तू पाहिली आर्ततेची
पुन्हा ती मनाला दिसावी कशी ?
तुझी पावले थांबली अंबराशी
पुन्हा सांग मागे फिरावी कशी ?


....रसप....
२५ एप्रिल २०१२
इट्स टाईम टू बी 'ग्रेस'फुल......... 

Tuesday, April 24, 2012

ती कविता तर माझी होती :-(


दुनिया वाचुन हसली होती
कुणी 'उचलली' हळूच होती
'मेल'मधुन जी धावत होती
ती कविता तर माझी होती :-(

प्रसववेदना मीच साहिल्या
शब्दकळ्या त्या मीच फुलविल्या
पर्वा त्याची कुणास नव्हती
पण कविता तर माझी होती :-(

बिननावाची तुम्ही छापली
अगतिक पुरुषांनीहि वाचली
'नावही लिहा', तुम्हा विनंती
कारण कविता माझी होती :-(

माझी प्रतिभा माझ्यापाशी
नसेल भिडली आकाशाशी
तरी पोटची पोरच होती
ती कविता तर माझी होती :-(

तुमच्यासाठी 'स्लॉट' एकला
पेपरवरचा 'प्लॉट' रंगला
'नेटवरून साभार'च होती
पण कविता तर माझी होती :-(

'भव्य-दिव्य' नावाचा पेपर
अडलं का हो तुमचं खेटर?
गरिब कवीच्या नावापोटी
खरेच कविता माझी हो ती! :-(

....रसप....
२४ एप्रिल २०१२
एका नावाजलेल्या वृत्तपत्रात माझी कविता 'इंटरनेटवरून साभार, कवीचे नाव माहित नाही' असे लिहून छापून आली. राग नाही, रोष नाही. छापून आली, ह्याचा आनंदच. पण नाव न आल्याने जरासं दु:ख झालं. म्हणून ही जराशी गंमत..!

Monday, April 16, 2012

दीप विझला पण अजुनही तेज आहे राहिले..

शाळेपासूनच माझी वाचनाची आवड मर्यादितच होती. लहानपणापासूनची ही सवय मी आजतागायत जपली आहे! शाळेत असताना दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पुढल्या वर्षाचे मराठीचे पुस्तक मात्र पूर्ण वाचून काढायचोच. मला भाषेची आवड आहे हे मला उशीरानेच कळले आणि अनावधानानेही!

जेव्हा मला माझी आवड कळली, तेव्हा मी लिहायलाही लागलो होतो. कवितेशी तर माझा पूर्वीही फारसा संबंध नव्हता. (मराठीचं पुस्तक वाचून काढायचो, तेसुद्धा कविता वगळूनच..!) तसं नाही म्हणायला कणा, कोलंबसाचे गर्वगीत (कुसुमाग्रज), भ्रांत तुम्हा का पडे (माधव ज्युलियन), माणूस माझे नाव (बाबा आमटे) अश्या काही कविता प्रचंड आवडल्या होत्या व बऱ्यापैकी पाठही होत्या (आहेत.).
पण कॉलेजनंतर पहिल्यांदा जेव्हा मला एका कवितेने भुरळ घातली, तो क्षण मला अगदी व्यवस्थित आठवतोय.

एका सकाळी मी बेळगांवहून मडगांवला बसने जात होतो. बसमध्ये बसण्यापूर्वी मी बेळगांव बस स्थानकात 'तरुण भारत' घेतला बसमध्ये वाचायला. पूर्ण पेपर वाचला, चाळला आणि मग पुरवणीही उघडली! त्यात एक विडंबन काव्य होतं. मूळ रचनासुद्धा तिथे दिली होती. ही -

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

ह्याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

- सुरेश भट

विडंबन मी वाचलंच नाही. मी ही कविताच (हो. गझल वगैरे मला तेव्हा काही समजायचं नाही.) असंख्य वेळा वाचली. पेपर पुन्हा पुन्हा उघडून वाचली.. मला त्यातील एकेक द्विपदी बेचैन करत होती. मी प्रत्येक वेळेस ती रचना वाचून मनातल्या मनात 'वाह वाह' करत होतो. अनेकदा काटा आला. संपूर्ण प्रवासात मी ती रचना इतक्या वेळा वाचली की मला पाठच झाली! मग पेपर हातात नसताना, ती रचना समोर नसतानाही माझ्या मनात त्या ओळीच मी वाचत होतो. ही पहिली खऱ्या अर्थाने मला झालेली भटांच्या लिखाणाची अनुभूती होती. मी ते कात्रण अजूनही माझ्या डायरीत ठेवले आहे.

पुढे अजून काही वर्षांनी मी ऑर्कुट-फेसबुकवरील मित्रांच्या सहवासाने कविता लिहू-वाचू लागलो आणि मग 'गझल'शी परिचय झाला. 'बाराखडी' वाचली.. कधी कधी मोडक्या तोडक्या गझलाही लिहिल्या. गझलेचे जे काही तंत्र-मंत्र समजले, आजमावले ते केवळ ती बाराखडी समोर ठेवून..

आज भट साहेबांना अभिवादन करताना मला काजव्याने सूर्याला ओवाळावे असं वाटतंय. माझ्यासारखे असंख्य गझलेचे चाहते, कवी ह्या सूर्याच्या तेजाने टीमटीम करत आहेत. माधव ज्युलियन ह्यांच्यानंतर, सुरेश भटांच्या काळातही ज्या ताकदीने आणि श्रद्धेने त्यांनी गझल फुलवली, तितकं करणारं दुसरं कुणीही नव्हतं. पण आज ह्या काव्यप्रकारावर मनापासून प्रेम करणारे आणि तो हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे अनेक जण आहेत. खरोखर त्यांच्या ह्या ओळी सर्वार्थाने खऱ्या आहेत -

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
सुरेश भट 
(१५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३)

Sunday, April 15, 2012

फेसबुकावर!!


जडलो घडलो फेसबुकावर
रडलो हसलो फेसबुकावर

तिने सोडले होते मजला
पुन्हा भेटलो फेसबुकावर

ठाव न पत्ता ज्या गावाचा
तिथला बनलो फेसबुकावर

फोटोमध्ये चिकणी दिसली
भाळुन फसलो फेसबुकावर

पूर्वी होतो किती 'श्यामळू'
'चटोर' बनलो फेसबुकावर

शेजाऱ्याला जाणत नव्हतो
'फ्रेंड' जाहलो फेसबुकावर

नको नको ते 'टॅग' लागले
'लंपट' ठरलो फेसबुकावर

किती भेटले आंबटशौकिन
म्हणुनच रमलो फेसबुकावर !

....रसप....
१५ एप्रिल २०१२

Saturday, April 14, 2012

भीमासाठी जगतंय कोण ?


भीमासाठी जगतंय कोण ?
गांधीसाठी झिजतंय कोण ?
उपोषणांचे स्तोम माजले
सत्यासाठी मरतंय कोण ?

पाटिलकी शाबूत राहिली
शिवबासाठी लढतंय कोण ?
जो-तो जाती-धर्म जाणतो
एकीसाठी झुरतंय कोण ?

पोकळ बाता समाजसेवी
जनतेसाठी वदतंय कोण ?
धमाल मस्ती मजा करूया
नेत्यासाठी जमतंय कोण ?

स्वार्थाचा बाजार मांडला
तुमच्यासाठी बसतंय कोण ?
आरक्षण द्या प्रत्येकाला
विद्येसाठी शिकतंय कोण ?

चिंता आहे इस्टेटीची
बापासाठी रडतंय कोण ?
अपुली पोळी भाजुन घ्यावी
दुसऱ्यासाठी जळतंय कोण ?

....रसप....
१४ एप्रिल २०१२

Thursday, April 12, 2012

तुझी आठवण येते....


भिजऱ्या पाउलवाटा आणिक टपटप गळती पाने
दरवळ मृद्गंधाचा पाणी खळखळ झुळझुळवाणे
हळवी रिमझिम अंगणवेडी ठाव मनाचा घेते
धुंद लाघवी संध्याकाळी तुझी आठवण येते

मोत्यांनी चमचम करणारी हरिततृणांची पाती
सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती
गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते
नवी पालवी बघुन कोवळी तुझी आठवण येते

ओली वाळू फसफस लाटा अनवाणी पाऊले
भुरभुर पाऊस नकळत भिजवे थेंब-थेंब ओघळे
डबडबल्या डोळ्यातुन कविता गालावरून झरते
लोभसवाण्या कातरवेळी तुझी आठवण येते

चिंब चिंब तू चिंब चिंब मी आसमंत भिजलेला
गोजिरवाणा शब्द मनाचा ओठांवर थिजलेला
दोघांमधले अंतर क्षुल्लक तरी न सरले होते
असताना तू माझ्या जवळी.. तुझी आठवण येते....

....रसप....
१२ एप्रिल २०१२

Tuesday, April 10, 2012

माणसे


आपल्या छबीसही न एकनिष्ठ माणसे
आरश्यासमोर वाटतात शिष्ट माणसे

आयता मिळेल तो न सोडती छदामही
ओरबाडणेच जाणतात भ्रष्ट माणसे

सांगती जनांस की "मला पहा, फुले वहा!"
देव जाहला कनिष्ठ अन वरिष्ठ माणसे !

वित्त साठवूनही नसे निवांत चित्त का ?
आपल्या घरात वाटती भ्रमिष्ट माणसे..

आजच्या सुखात दु:ख घोळतात कालचे
जीवनास आपल्या करून क्लिष्ट माणसे

जंगलात कायदा असे तसाच पाळती
राहिलीत फक्त श्वापदेच, नष्ट माणसे

जोडशील तू 'जितू' कितीक मित्र-सोयरे
सोडती चितेपर्यंत ती 'विशिष्ट' माणसे

....रसप....
१० एप्रिल २०१२

Monday, April 09, 2012

आज मला मुक्त करा


तुमच्यातुन आज मला मुक्त करा
माझ्यातुन आज मला मुक्त करा

मीच नसे लायक ते प्रेम नको
हृदयातुन आज मला मुक्त करा

शब्द थिटे सूर खुजे ताल चुके
गझलांतुन आज मला मुक्त करा

मी केल्या पापांना मोजू द्या
पुण्यातुन आज मला मुक्त करा

भवताली हिरवळ मी पसरवतो
काट्यातुन आज मला मुक्त करा

प्रामाणिक मी माझ्या छायेशी
नात्यातुन आज मला मुक्त करा

हातावर नशिबाला मी लिहितो
भोगातुन आज मला मुक्त करा

'जीतू' ना रमला ह्या मंचावर
नाट्यातुन आज मला मुक्त करा


....रसप....
३ एप्रिल २०१२

कविताविश्व अशी जगावी गझल विशेषांक''


मराठी कविता समुहाच्या ''अशी जगावी गझल'' वर आधारित ''कविताविश्व अशी जगावी गझल विशेषांक'' आपणासमोर सादर करत आहोत. हा अंक मेल मधे मिळवण्यासाठी mkebooks@marathi-kavita.com या पत्त्यावर मेल करा.

आताच्या आता हा अंक डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी लावा
http://www.marathi-kavita.com/sites/default/files/ebookpdfs/Kavita-Wishva-Ashi-Jagavi-Gazal-Part1-8-4-2012.pdf


हा अंक कसा वाटला आम्हाला mkebooks@marathi-kavita.com या पत्त्यावर नक्की सांगा, किंवा तुम्ही mkmoderators@gmail.com इथे पण तुमचे अभिप्राय पाठवू शकता. हा अंक आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. लाईक करा शेयर करा.

Sunday, April 08, 2012

ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'


ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
पण मला जराही समजत नाय!

मी दिसतो काळा जरा बावळा
शहरी पोरांहून वेगळा
चष्मे, गॉगल, उंची कपडे
स्मार्टफोन अन गळ्यात टाय
मी मऱ्हाटमोळा साधा ब्वाय
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
पण मला जराही समजत नाय!

शेतावर माझ्या मी रमतो
मित्रांशी गल्लाही जमतो
उगाच आलो शहराला ह्या
धावपळीने मी दमतो
तिला पाहुनी फक्त एकदा
दूर उडूनी थकवा जाय
पण....
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
अन मला जराही समजत नाय!

मी पोरींशी ना कधी बोललो
'हलो-हाय' मी नुकते शिकलो
नाव सांगतो कसेबसे
ती माझ्यावर जोरात हसे
प्रेमाची भाषा 'ग्लोबल' नाय
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
पण मला जराही समजत नाय!

कपास फुलते गालावरती
डोळ्यामधुनी कालवे झरती
चवळीची ती शेंग कोवळी
कधी वाटते तिख्खट मिरची
खळखळणारी मंजुळ वाणी
ऐकून मी तर गुंगून जाय
माझ्या मनचे बोलू काय?
मला जराही समजत नाय!
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'!

....रसप....
८ एप्रिल २०१२

Saturday, April 07, 2012

फुल्ल गोंधळ 'हाउसफुल्ल - २' - (Review -House full -2)

कितीही मोठे झालो तरी कधी कधी मोठ्ठ्या आकाशपाळण्यात बसल्यावर मजा येतेच ना? तस्संच, कितीही कळत असलं तरी कधी कधी काही सिनेमे लॉजिक-फिजीक.. डोकं-बिकं.. समज-बिमज.. बाजूला ठेवून पाहिले ना की सॉल्लिड मज्जा येते बुवा.. "हाउसफुल्ल -२" त्यातलाच एक..!
आजकाल विनोदी सिनेमा म्हटलं की प्रचंड गुंतागुंतीचं कथानक हे एक समीकरणच झालं आहे. इथेही तोच प्रकार आहे. 
चिंटू कपूर (ऋषी कपूर) आणि डब्बू कपूर (रणधीर कपूर) हे सावत्र भाऊ. चिंटू 'रिअल सन' आणि डब्बू 'नाजायाझ!' पण त्यांच्या वडिलांनी त्यांची ब्रिटनमधील कंपनी व इतर मिळकत दोघांच्याही नावावर समसमान केली असते. ह्यामुळे 'रिअल सन' चिंटू चा डब्बूवर  फार राग असतो. त्याची घृणा असते. आणि अर्थातच दोन्ही कुटुंबात हे वितुष्ट असते. भावजय-भावजय, बहिण-बहिण एकमेकांवर खार खाऊन असतात. असंच एका बाचाबाचीत चिंटू-डब्बू एकमेकांना आव्हान देतात की, "मी माझ्या मुलीचं लग्न ब्रिटनमधील 'सबसे अमीर खानदान में' करीन...!!" 
ईन कम्स 'पास्ता'! 
खाण्याचा नाही हो! 'आखरी पास्ता' (चंकी पांडे) हा 'लग्न जुळवायची कामं' करत असतो.. हो हो.. वधु-वर सूचन ! 'पास्ता' चिंटूकडे 'जय' (श्रेयस तळपदे)चं स्थळ घेऊन येतो. पण मस्तवाल चिंटू अद्वातद्वा बोलून जयच्या आईवडिलांचा असा काही अपमान करतो की आधीच 'कमजोर दिल के' जयचे वडील हृदयविकाराचा झटका येऊन थेट इस्पितळ गाठतात..
ईन कम्स 'जय'! 
वडिलांची ही अवस्था पाहून 'जय' पेटून उठतो. आणि ठरवतो की 'चिंटू'लाही असाच झटका देणार.. चिंटूला अतिश्रीमंत घरचं स्थळ हवं असतं ना? ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंतांपैकी एक 'जे.डी.' (मिथुन) चा मुलगा 'जॉली' (रितेश) त्याचा जिगरी दोस्त असतो. हे दोघे कॉलेजातल्या अस्सल बदमाश दोस्त ॅक्स (जॉन अब्राहम) सोबत मिळून चिंटूला धडा शिकविण्यासाठी एक प्लान आखतात. 'जे.डी.'चा मुलगा अशी ओळख सांगून लग्न ठरवायचं आणि अगदी ऐन वेळी स्वत:ची खरी ओळख सांगायची.. अस्सा झटका की डायरेक्ट हॉस्पिटलातच पोहोचवेल! ॅक्स खोटा 'जॉली - जे.डी.चा मुलगा' आणि जय त्याचा ड्रायव्हर बनतात. पण चुकून चिंटूऐवजी डब्बूकडे पोहोचतात! आता?
ईन कम्स 'सनी' (अक्षय कुमार)!
जय -जॉली चा कॉलेजातला अजून एक बदमाश दोस्त आणि ॅक्सचा जानी दुश्मन.. प्लान तोच.. टार्गेट - चिंटू. सनी खोटा जॉली बनून आणि जॉली त्याचा खोटा अंगरक्षक बनून चिंटूकडे दाखल होतात. 
ह्या कहाणीत हळूहळू करत गुंता वाढतच जातो.. खुमासदार संवाद, शाब्दिक कोट्या, यमकायमकी आणि प्रासंगिक विनोदातून हा गुंता तुम्हालाही गुरफटवून टाकतो आणि सरतेशेवटी सगळा गोंधळ कसाबसा उरकून गोड शेवट होतो! इतका पसारा मांडल्यावर अखेरीस घाई-घाईने उरक णं अपेक्षितच होतं.
काही ठिकाणी खो-खो हसवणारा हा सिनेमा काही ठिकाणी रेंगाळला आहेच आणि काही ठिकाणी गुंडाळलाही आहे. एकंदरीत हा विनोदाचा प्रयत्न आधीच्या 'हाउसफुल्ल' पेक्षा तरी बरा जमला आहे. पण मी अजूनही निखळ विनोदी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे, जो हृषीकेश मुखर्जी नंतर काही प्रमाणात प्रियदर्शनने केलाय आणि दिबाकर बानर्जीसारख्या अजून काहींनी एखाद सिनेमात (खोसला का घोसला) ती झलक दाखवली. पण साजीद खान कडून दर्जेदार विनोदाची अपेक्षा करणं हे जॉन अब्राहम कडून चांगल्या अभिनयाची अपेक्षा करण्यासारखंच! 
संगीताच्या (साजिद-वाजीद) नावाने खरोखरच अक्षरश: बोंबाबोंब आहे. इतकी की शब्दच कळू नयेत. कुठलीच चाल 'ओरिजिनल' वाटत नाही, इतकं हे संगीत घीसं पीटं आहे.  

ह्या सिनेमात 'नॉट टू मिस' म्हणावं असं काहीच नाही, पण बघितलाच तर डोकं आपटून घ्याल असाही काहीच नाही. (अपवाद - संगीत) पाचपैकी अडीच तारे देण्यास हरकत नसावी! 



Thursday, April 05, 2012

पुन्हा डाव तू मांड, मी हारतो..



जगाच्या पटी हा तुझा खेळ सारा
हरेकासमोरी तुझा मोहरा
तुझा ना भरोसा जरी वाटला रे
तरी वाटतो का तुझा आसरा ?

'लढावे' असे वाटले ना मनाला
जसे ठेवले तू तसा नांदलो
तुला खोड होती मला छेडण्याची
तरीही कधीही न मी भांडलो

मला ठाव होता तुझा धूर्त कावा
'धरूनी दबा एकटे गाठणे'
चहूबाजुनी घेरुनी एकट्याला
विजेत्यापरी आवही आणणे !

तुझी चाल दैवा कधी वाकडी वा
कधी चाल होती तुझी थेटही
मला जिंकणेही न मंजूर होते
दिली जिंकण्याची तुला भेट ही

अखेरीस केलीस कोंडी इथे तू
मनापासुनी हार मी मानतो
जरी खेळ आयुष्य झाले तरीही
पुन्हा डाव तू मांड, मी हारतो..

....रसप....
४ एप्रिल २०१२

Wednesday, April 04, 2012

इथे थांबुनी घे विसावा जरा


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८९" मध्ये माझा दुसरा सहभाग -

नसे मी तुझा तू तरी खास माझा
मना जाणवावे कधी हे तुला ?
तुझ्या प्रकृतीला, तुझ्या विकृतीला
असे चेहरा मीच माझा दिला

तुझे कालचक्रापुढे धावणे हे
मना, गुंतवाया तुला ना कुणी
मला तूच देशी नव्या स्वप्नगाठी
दिसे सप्तरंगी मला ओढणी

कधी पाहिले तू कुणा दूर गावी
सुखाचे खजीने कुणाच्या घरी
मला ते नको मी सुखासीन आहे
जरी ओढतो फाटक्या चादरी

तुला भावतो अंबराचा पसारा
मला पावलाएव्हढी वाटही
तुला पाहिजे प्राशणे सागराला
मला एक डोळ्यातली धारही

जुन्या वेदनांना नव्याने उजाळा
सहानूभुतीचे वृथा भार का ?
उगाळूनही दु:ख गेल्या दिसांचे
सुगंधास दे चंदनासारखा

पहा आज तूही जरा भोवताली
कसा गंध देती फुलांचे सडे
खरे ह्या क्षणाचेच तू मान वेड्या
भरूनी पुन्हा घे सुखांनी घडे

कुठे चाललो मी मला ठाव नाही
तुझ्यामागुनी मी निघालो खरा
तुझ्या ह्या प्रवासास ना अंत काही
इथे थांबुनी घे विसावा जरा


....रसप....
४ एप्रिल २०१२

Sunday, April 01, 2012

तू घे विसावा जरा........!


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८९ मध्ये माझा सहभाग.. (एक हलकं फुलकं 'सुनीत' लिहिण्याचा प्रयत्न आहे..)

होते रोज सुरू पहाटसमयी गर्दी इथे धावती 
सारे शांतपणे कसे समजुनी वेगास त्या पाळती ?
कंटाळा करती कधी न बसती काट्यासवे चालती 
पाहूनी तुज वाटले गजब ना ही मुंबईची गती ? 

जागेला धरण्यास लोकलमधे घेती उड्या धावुनी  
हॉटेलात कधी पहा बसुनिया खाती भुका मारुनी 
जो-तो येउन हो अधीर बनुनी होतो उभा मागुनी 
घाई ही कसली असे? कळ नसे, थांबावया जाणुनी

घेणे श्वास जरा नसेच जमणे ह्या धावणाऱ्या जगा
नाही मंजुरही कुणास दमणे, रेंगाळणेही उगा 
विश्रांती नच लाभते क्षणभरी आकाशवेड्या ढगा
त्याला ठाउक एक केवळ असे होणे जळाचा फुगा !   

तूही आजच जुंपलास झटण्या गाड्यास ऐसा खरा 
झाला थोर जरी 'मनी*' कमवुनी, तू घे विसावा जरा........!  

....रसप....
१ एप्रिल २०१२ 
शार्दूलविक्रीडीत - गागागा ललगा लगा लललगा गागा लगागालगा 
मनी* = Money, पैसा  
Related Posts Plugin for WordPress, Blogger...