Thursday, January 02, 2020

पंचम - बस नाम ही काफी हैं !

३१ डिसेंबर १९९३. सरत्या वर्षातली अखेरची संध्याकाळ. एका चित्रपटाचा मोठा सेट. सेटवरच निर्मात्याने आयोजित केलेली नवीन वर्षानिमित्ताची मोठी पार्टी. एक उत्साहाचं, आनंदाचं वातावरण. इतक्यात 'त्या'चं आगमन झालं. पार्टीतल्या त्या त्याच्या एन्ट्रीच्या वेळी त्याच चित्रपटातलं त्यानेच बनवलेलं एक अवीट गोडीचं गाणं पार्श्वसंगीतासारखं वाजवलं गेलं - 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा..' ! त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधानाचं हसू हेच सांगत होतं की आता येणाऱ्या काळात तो पुन्हा एकदा चित्रपट संगीताच्या दुनियेवर अधिराज्य गाजवणार आहे. बरोबर ! सेट होता '1942 अ लव्ह स्टोरी' चित्रपटाचा, पार्टी होती विधू विनोद चोप्राची आणि 'तो' होता अर्थातच 'पंचम', म्हणजे 'राहुलदेव बर्मन'. 



ऐंशीच्या दशकाच्या शेवटाकडे लागोपाठ अनेक चित्रपट फ्लॉप होत जाऊन पंचम चित्रपटाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला होता. कोणे एके काळी लोकांना वेड लावणाऱ्या एका अफलातून संगीतकाराकडे कामही येईनासं झालं होतं. म्युझिक कंपन्यांनी त्याला नाकारलं होतं. चित्रपट निर्मात्यांनी त्याला अव्हेरलं होतं. रसिकांनी त्याला दुर्लक्षित केलं होतं. अमाप यश व प्रसिद्धीचे दिवस उपभोगलेल्या पंचमसाठी हा काळ खडतर होता. तो अपयशाने खचला नव्हता, पण जगाच्या पाठ फिरवण्यामुळे नक्कीच निराश झाला होता. त्याच्यात अजून खूप काम करायची उर्मी बाकी होती, अजून खूप नवनवीन कल्पना स्फुरत होत्या. पण त्या कल्पनांना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आवश्यक संधी मिळत नव्हत्या आणि कुणासमोर जाऊन काम मागायचा स्वभावही नव्हता ! कारण कितीही झालं तरी, त्रिपुरातल्या एका राजघराण्याचा तो एक वंशज ! भले, त्याच्या वडिलांनी घरदार सोडून वेगळ्या क्षेत्रात टाकलेल्या पावलावर पाउल टाकूनच तोसुद्धा कधी राजाचं आयुष्य न जगता २४ तास, ३६५ दिवस एक संगीतकार म्हणूनच जगला होता, तरी ते जन्माने राजा होता आणि मनाने तर होताच होता ! पंचमयुग संपल्यात जमा होतं. सिनेसंगीत संपल्यात जमा होतं ! रॉक अ‍ॅण्ड रोल, डिस्को वगैरेच्या नावाखाली थिल्लरपणा बोकाळत चालला होता. ऱ्हिदमच्या नावाने टीनचे डब्बे बडवल्यासारखे बीट्स ऐकवले जात होते. पिचक्या आवाजात कणसुरे लोक स्वस्तात आणि चटकन विकली जाणारी गाणी चकल्यांप्रमाणे पाडत होते.आणि अश्या वेळी विधू विनोद चोप्राने 'परिंदा'नंतर '1942 अ लव्ह स्टोरी' साठी पुन्हा एकदा पंचमला साईन केलं होतं. 

'1942 अ लव्ह स्टोरी' साठी पंचम स्वत:च्या बेसिक्सकडे गेला. सिम्पल मेलोडीज्, साधं अरेंजिंग आणि उत्तम साउंड ह्यांचा त्रिवेणी संगम साधत पंचमने असं काही संगीत दिलं की जणू एका प्रकारे 'मी अजून संपलो नाहीय' असं सगळ्या जगाला सांगायचं असावं. ह्या चित्रपटासाठी पंचमने दिलेलं संगीत सगळ्यात साध्यासोप्या गाण्यांचं होतं. त्या नवीन वर्षाच्या पार्टीत त्याच्या एन्ट्रीला वाजवलं गेलेलं 'एक लडकी को..' आणि ते ऐकून तल्लीन झालेले लोक, म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं, तर जे त्याला सांगायचं होतं ते जगाला ऐकू जातंय अशी एक पोचपावती होती. ती त्याला मिळाली आणि समाधानाचं हसू मनात ठेवून अवघ्या ४ दिवसांनी त्याने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर ४ महिन्यांनी '1942 अ लव्ह स्टोरी' रिलीज झाला. चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही, पण संगीत सुपरहिट ठरलं. उभ्या हयातीत फक्त दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या पंचमला '1942..' साठी तिसरा फिल्मफेअर तर मिळाला. पंचम गेला. पण जाता जाता आपल्या पाउलखुणा कायमस्वरूपी उमटवून गेला. भले तो जिवंत असताना त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं गेलं, पण नंतर फिल्मफेअर पंचमच्या नावाने इतर संगीतकारांना पुरस्कार द्यायला लागलं. आज कुणीही चांगलं संगीत देणारा दिसला की लोक त्याला 'नेक्स्ट आर डी बर्मन' म्हणतात. रिमिक्सच्या जमान्यात सर्वाधिक गाणी पंचमचीच रिमिक्स केली जातायत. ही सगळी लक्षणं आहेत, पंचम जाऊनही न संपल्याची ! त्याने जाता जाता हेच सांगितलं होतं की, 'मी अजून संपलो नाहीय', तो संपणारही नाही.



केवळ ५४ वर्षांच्या आयुर्मानात, ३३ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत पंचमने विविध भाषांत मिळून तब्बल ३३१ चित्रपटांना संगीत दिलं. १९६१ साली आलेल्या मेहमूदच्या 'छोटे नवाब'मधून त्याने पदार्पण केलं. मात्र पंचमने त्याच्या खूप आधीपासून वडिलांसोबत काम करायला सुरु केलं होतं. सचिनदांच्या १९५८ च्या 'सोलवा साल' मधल्या 'है अपना दिल तो आवारा..' मधला प्रसिद्ध माउथ ऑर्गन त्यानेच वाजवला होता. इतकंच नव्हे तर १९५६ च्या 'फंटूष' चं शीर्षक गीत 'ऐ मेरी टोपी पलट के आ..' ची चाल पंचमला वयाच्या नवव्या वर्षी सुचली होती. पन्नासच्या दशकात अधूनमधून (शिक्षण सांभाळून) आणि साठच्या दशकात पूर्ण वेळ (शिक्षण सोडून देऊन!) पंचम सचिनदांचा सहाय्यक होता. तेरे घर के सामने, गाईड. ज्युल थीफ, प्रेम पुजारी, आराधना, गॅम्बलर, अभिमान, शर्मिली सारख्या अनेक सिनेमांमधल्या गाण्यांवर पंचमची छाप जाणवतेही ! वडिलांनी जाणीवपूर्वक कोवळ्या पंचमकडून मेहनत करवून घेऊन त्याला घडवलं. 'नवकेतन' सारख्या बॅनर्स आणि 'शक्ती सामंता', 'नसीर हुसेन'सारख्या यशस्वी चित्रपटकर्त्यांकडे पंचमची वर्णी लागणं सोपं होतं, पण तिथे टिकून राहण्यासाठी सतत दर्जेदार काम करायला हवं. त्याची तयारी सचिनदा करून घेत होते.

पंचमचं पदार्पण १९६१ साली जरी झालं, तरी त्याचं नाव खऱ्या अर्थाने चर्चेत आलं ते १९६६ साली. चित्रपट होता 'तीसरी मंजील'. एरव्ही शंकर जयकिशन, ओ पी नय्यर सारख्या दिग्गजांसोबत जोडी जमवलेल्या नसीर हुसेन, शम्मी कपूर ह्या मोठमोठ्या नावांसह पंचमला काम करायची संधी सहज मिळाली नाही. शम्मी कपूरने सुरुवातीला पंचमच्या नावाला चक्क नकार दिला होता ! पण दस्तुरखुद्द जयकिशननेच पंचमच्या नावाची जोरदार शिफारस केल्यावर शम्मीने पंचमची गाणी ऐकून घेण्याची तयारी दाखवली. पंचमने 'दीवाना मुझसा नहीं...' ची पहिली ओळ ऐकवल्यावर शम्मीने ताबडतोब मूळ नेपाळी लोकगीतातली पुढची ओळ (ए कान्छा मलाइ सुनको..') स्वत:च गाऊन मुखडा पूर्ण केला आणि म्हटलं, 'हे गाणं मी जयकिशनला देईन. पुढचं ऐकव !' पण पंचमने नेटाने बाकीची गाणी ऐकवली आणि काही वेळातच, जो शम्मी पंचमच्या नावाला पूर्ण विरोध करत होता तो ती गाणी ऐकून प्रचंड खूष झाला होता ! 



'तीसरी मंजील' हा खूप मोठा ब्रेक होता, पण तरीही पंचमकडे कामाचा ओघ सुरु झाला नाही. कारण त्याची स्पर्धा तगड्या लोकांशी होती. स्वत: वडील सचिनदेव बर्मन, शंकर-जयकिशन, मदनमोहन, नौशाद, रवी, लक्ष्मी-प्यारे अशी मोठमोठी नावं तेव्हा आजूबाजूला होती. तो 'तीसरी मंजील'च्या यशानंतरही वडिलांकडे सहाय्यक म्हणून काम करण्यातच अधिक व्यस्त राहिला. पुढील चार वर्षांत त्याने फक्त सहा चित्रपट केले. त्यांतही पडोसन, प्यार का मौसम सारखे बॉक्स ऑफिसवर चांगले चाललेले चित्रपट होते आणि  बहारों के सपने, अभिलाषासारख्या चित्रपटांतून त्याने लक्षवेधक काम केलं होतं. 
त्यानंतर मात्र, १९७० पासून चित्रपट संगीतात 'आर डी बर्मन' नावाचं एक वादळच आलं. पुढील १० वर्षांत पंचमने तब्बल ११० चित्रपट केले ! 

बॉक्स ऑफिसवर राजेश खन्नाला सुपरस्टार करण्यात पंचमच्या संगीताचा मुख्य हातभार होता. राजेश खन्नाची सद्दी संपून अमिताभची गादी आली. ते अमिताभयुगही पंचमच्या संगीतानेच गाजवलं. ऋषी कपूरचा जम बसवण्यातही पंचमच्याच संगीताचा हात होता. पंचमच्या संगीताची जादू अशी होती की त्याने मुख्यत्वे कॉलेजवयीन प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित केलं. रणधीर कपूर (जवानी दीवानी, रामपूर का लक्षमण - १९७२), संजय दत्त (रॉकी - १९८१), कुमार गौरव (लव्ह स्टोरी - १९८१), सनी देओल (बेताब - १९८३) इ. स्टारपुत्रांचं पडद्यावरील पदार्पण म्हणूनच पंचमचं संगीत असलेल्या चित्रपटांतूनच झालं. 'पंचमचं संगीत' हा त्यांच्यासाठी 'सेफ गेम' ठरेल इतकी पंचमची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती. नवीन अभिनेतेच नव्हे, तर नवीन निर्माते-दिग्दर्शकही स्वत:ची जागा सहज बनावी म्हणून पंचमला साईन करत होते. 

पण खऱ्या अर्थाने पंचमची गट्टी जमली ती गुलजारसोबत. ही गट्टी, ही दोस्ती फक्त कामापुरतीच नव्हती. वैयक्तिक आयुष्यातही दोघे जवळचे मित्र बनले. गुलजारच्या शब्दांना पंचांच्या सुरांनी सर्वतोपरी न्याय दिला आणि गुलजारच्या शब्दांनी एक वेगळाच पंचम बाहेर आणला. अर्थात, पंचमने प्रत्येकासाठी आपली वेगवेगळी शैली जपली होतीच. सिप्पींच्या चित्रपटांच्या संगीताचा लहेजा वेगळा होता, नसीर हुसेनसाठीच्या संगीताचा बाज वेगळा होता, तसाच गुलजारसाठीच्या गाण्यांची बांधणी वेगळीच असायची. सिनेसंगीतातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि महान गीतकार-संगीतकार जोड्यांमध्ये आरडी-गुलजार ही जोडी अग्रणी राहील, इतकं त्यांचं काम अतुलनीय आहे. 

पंचमने कुणासोबत कधीपासून किती आणि कसं काम केलं, हे इंटरनेटवर सहज मिळेल. ते इथे लिहिणं म्हणजे केवळ भाषांतर होईल. पण पंचमचं वेगळेपण काय होतं, हे तिथे मिळणार नाही. ती अनुभवायची, आस्वादायची गोष्ट आहे. 
त्याबाबत पुढच्या भागात..

(क्रमश:)

- रणजित पराडकर



Related Posts Plugin for WordPress, Blogger...