क्रूर गुंड खलनायक, भ्रष्ट राजकारणी, नीच पोलीस, ह्या सगळ्यांचे त्यांच्यासारखेच क्रूर/ भ्रष्ट/ नीच साथीदार किंवा काउंटरपार्ट्स आणि ह्यांच्या समोर पिळदार शरीरयष्टीचा एक देखणा नायक. एक कोवळी चिकणी पोरगी, नायकाची तिच्या सोबतची छोटीशी लव्हस्टोरी, २-३ गाणी, सुंदर लोकेशन्स. ह्या सगळ्याच्या जोडीला देशप्रेम, भारत- पाकिस्तान, टाळीखेच शिट्टीबाज डायलॉग्ज, हाणामाऱ्या, पाठलाग, गोळीबार. असे सगळे जिन्नस एकत्र केले की एक हमखास पदार्थ बनतो. त्याला म्हणतात 'व्यावसायिक सिनेमा'. जो तिकीटबारीवर डल्ला मारतो आणि पब्लिकमध्ये कल्ला करतो.
'धुरंधर'ची रेसिपी हीच आहे. फक्त त्याला थोडी वास्तवाची जोड दिली आहे. पण ही 'जोड' आहे, पूर्ण वास्तव नाही.
अस्सल व्यावसायिकच असला तरी बहुतांश व्यावसायिक पटांसारखा 'सुमार ते ठीकठाक' ह्या पट्टीत तो येत नाही. व्यावसायिक सिनेमा बनवायच्याही दोन पद्धती असतात. एक सफाईदार आणि दुसरा साचेबाज. धुरंधर सफाईदार आहे, बहुतांश बाबतींत तरी. पण पक्का फिल्मी. इतका फिल्मी की पार्शवसंगीतातही जुन्या हिंदी सिनेमांची गाणी आहेत, गाण्यांमधल्या म्युझिक पीसेसचे तुकडे आहेत. ह्या सगळ्या मसाल्याला चाखून हे कसलं पौष्टिक आहे असं म्हणणारे आणि हे किती अनहायजिनिक आहे म्हणून नाकं मुरडणारे, अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांकडे असलेली सिनेमाची कमालीची समज माझ्याकडे नसावी म्हणून मला ह्या सिनेमाकडे वेगळ्या कुठल्या दृष्टीने पाहता आलंच नाही. मी एक सिनेमा म्हणूनच पाहिला आणि सिनेमा म्हणूनच मला त्याचा आनंदही मिळाला.
आधीच म्हटल्याप्रमाणे धुरंधरला वास्तवाची जोड आहे. कंदाहार विमान अपहरणाच्या प्रकरणातून जी भारताची नाचक्की झाली तिथून ह्या सगळ्याची सुरुवात होते. नंतर संसदेवरील हल्ला, २६/११ चा मुंबई हल्ला असं सगळं ह्यात जोडलं जातं. ह्या सगळ्याला एकत्र बांधण्यासाठी कराचीतल्या कुप्रसिद्ध ल्यारी गँगवॉरची मध्यवर्ती कहाणी घेऊन त्यात एक भारतीय गुप्तहेर गुंफला आहे.
सिनेमाची कहाणी सरळसोट पद्धतीने - linear - मांडली आहे. आदित्य धरचा ह्याआधीच सिनेमा 'उरी'सुद्धा बहुतांश असाच होता. बरं.. ही कहाणीसुद्धा अशी आहे की त्यात कसलाही सस्पेन्स नाही, जे आहे ते समोरच आणि सगळंच. हा एक मुख्य प्रॉब्लेम मला वाटला.
दुसरी खटकलेली बाब म्हणजे अनावश्यक गाणी. जास्त नाहीत, २-३ च आहेत पण उगाच आहेत आणि मुख्य म्हणजे वाईट आहेत. आधीच आपला पसारा साडेतीन तासांच्या वर जात आहे. अश्या वेळी ही टुकार गाणी ठेवायची गरजच काय होती ? तेव्हढीच १०-१२ मिनिटं कमी झाली असती, हा विचार का केला नसावा माहित नाही.
कास्टिंग ही धुरंधरची खासियत आहे. एक-एक तगडा स्क्रीन प्रेझेन्स आणि जबरदस्त क्षमता असलेले लोक एकत्र आल्यामुळे सिनेमाची उंची खूपच वाढते.
रणवीर सिंगने जबरदस्त काम केलं आहे, नेहमीच करतो. पडद्याबाहेर तो जे काही माकडचाळे करतो ते सगळे त्याला त्याच्या पडद्यावरच्या कामामुळेच माफ होतात. तो प्रत्येक रोलसाठी भरपूर मेहनत घेणारा आणि जीव ओतून काम करणारा अत्यंत गुणी अभिनेता आहे. एकच जरा गंडलेलं वाटलं. त्याने साकार केलेला हमजा हा अफगाणिस्तानातून आलेला दाखवला आहे. भले ती त्याची स्टोरी खोटी असली तरी परिस्थितीने नाडलेला एक मनुष्य, ज्याच्याकडे पैसे नाहीत, राहायला जागा, खायला अन्न नाही. तो अंगापिंडाने इतका आडमाप कसा असू शकतो ? तो पठाण दाखवला आहे आणि त्यांचे जीन्सच तसे असतात असं जरी म्हटलं तरी सुरुवातीच्या भागात त्याला गुंड मंडळी 'चिकना' म्हणतात, त्याच्यावर लाईन मारतात आणि त्याच्यावर अत्याचार करायचाही प्रयत्न केला जातो. आता असं सगळं कुणी एका भरभक्कम पिळदार माणसाला करेल, हे पडद्यावर पाहताना अजिबात विश्वसनीय वाटत नाही. दुसरं तो तिथे एक रूप घेऊन गेला आहे. त्याची अशी देहयष्टी त्याला उघड पाडू शकते. दुकानात काम करणारा पोऱ्या म्हणून जरा तरी शोभला पाहिजे ना !
अक्षय खन्नाचा रहमान डकैतदेखील उत्तम जमला आहे. तरी त्याच्या 'छावा'मधल्या कामाला तोडच नाही. उलट रणवीरसारखी आडमाप देहयष्टी रहमान डकैतच्या रोलला शोभली असती. हा रोल रणवीरने केला असता तर तो पद्मावतच्या खिलजीपेक्षा खतरनाक झाला असता, असा एक विचार आला.
अर्जुन रामपालचा मेजर इक्बाल खतरनाक झाला आहे. ह्या भागात तरी तसं कमी काम आहे पण जेव्हा तो पडद्यावर येतो तेव्हा तो सगळ्यांना पुरून उरतो. पुढच्या भागातल्या त्याच्या रोलची उत्सुकता वाटावी, असं एक ट्रेलर ह्या भागात त्याने दाखवलं आहे. माधवनसुद्धा कमी वेळाच्या कामातही स्वतःची छाप सोडतो. पण त्याला पुढच्याही भागात फार काही काम असेल असं मला वाटत नाही.
'एसपी चौधरी अस्लम'च्या भूमिकेत संजय दत्त, संजय दत्तच साकार करतो. जिथे बाकी सगळे लोक आपली अमर्याद कुवत दाखवून किंवा कुवतीच्या मर्यादा पार करून काम करत आहेत, तिथे संजू बाबा नेहमीच्याच स्वॅगमध्ये वावरतो. कुठल्याही क्षणी तो 'मुन्नाभाई एमबीबीएस' वर नाचायला लागेल, असं वाटत राहतं. कास्टिंगमध्ये ही एक कमजोर कडी आहे.
दुसरी कमजोर कडी म्हणजे सारा अर्जुन. अख्ख्या सिनेमात ती प्रत्येक वेळी जरा कमीच पडली आहे. का, ते सांगता येणार नाही. कदाचित इतक्या सगळ्या धटिंगण पुरुषांत हे एकमेव स्त्री पात्र आहे आणि तेही अगदीच छोट्या चणीचं, त्यामुळे तसं वाटलं असेल. पण अभिनयातसुद्धा अशी काही तिला विशेष चमक दाखवता आलेली नाही.
दुसरीकडे, क्वचितच जरा चांगली लांबी असलेली भूमिका मिळालेला राकेश बेदी कमाल करतो. जे बाकी कुणीही केलेलं नाही, ते बेदी करतो. पाकिस्तानी accent पकडतो.
संगीत अगदी सामान्य आहे. लक्षात राहत नाही. पण पार्श्वसंगीत मात्र लक्षात राहतं. त्यात केलेला जुन्या गाण्यांचा वापर मात्र सिनेमाला जरा उथळपणा आणतो, असं मला वाटलं. मात्र जिथे ओरिजिनल पार्श्वसंगीत तिथं ते खूप प्रभावी झालं आहे. आजकालच्या ट्रेंडनुसार ऍक्शनपट म्हटल्यावर कानठळ्या बसवणारा गोंगाट म्हणजेच पार्श्वसंगीत झालं आहे. सुदैवाने इथे तसं नाहीय.
आवर्जून उल्लेख करायला हवा, तो साऊंड डिझाईनचा. आदित्य धरच्या 'उरी'चंही साऊंड डिझाईन जबरदस्त होतं. इथंही आहे. सिगरेट पेटण्याचा असो, हातातल्या ब्रेसलेटचं किणकिणणं असो किंवा गोळीबार, स्फोट असोत, छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा आवाज सुयोग्य स्पष्टपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. ह्याची कमाल अशी होते की प्रत्येक प्रसंग जिवंत होतो, होणारे आवाज आपल्याच आजूबाजूला होत आहेत असं वाटून एक सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ तयार होतो. एक प्रकारची जादूच जणू !
धुरंधरबाबत दोन गोष्टी मी खूप ऐकल्या.
एक म्हणजे लांबी खूप आहे. साडेतीन तासांचा सिनेमा आणि त्याचाही अजून एक भाग १९ मार्च रोजी येऊ घातलेला आहे. म्हणजे साधारण साडे सहा/ सात तासांचा मालमसाला आहे. मग सरळ एखादी मिनी सिरीज किंवा पूर्ण लांबीची ८-९ एपिसोड्सची सीरीजच करायची की !
नक्कीच. मी तर म्हणतो जी कहाणी तुम्हाला फार तर अडीच तासांत सांगता येत नसेल, ती सिनेमाची नाहीच. तिला सीरिजमधूनच मांडायला हवं. जबरदस्तीने सिनेमाच बनवला तर तो एक तर अति लांबतो किंवा मग सॅम बहादूरसारखं मॅचच्या हायलाईट्स पाहिल्यासारखं वाटतं. धुरंधरमधल्या प्रत्येक व्यक्तिरेखेची एक कहाणी आहे. त्या सगळ्या बॅकस्टोरीज केवळ उल्लेखाने गुंडाळल्या आहेत. जर लांबीची कसलीच मर्यादा नसती तर एका अजून मोठ्या कॅनव्हासवर चित्र साकारता आलं असतं.
दुसरी गोष्ट म्हणजे त्यातला प्रोपगंडा.
धुरंधर काँग्रेसप्रणित सरकारांवर टीका करतो आणि आजच्या सरकारची भलामणसुद्धा. हे नाकारता येऊ शकत नाही, इतकं सुस्पष्ट आहे सिनेमात. पण ते तितकंच सुस्पष्ट वास्तवातही आहेच. २६/११ च्या हल्ल्यानंतर आपले सरकार हातावर हात ठेवून बसून राहिलं. अमेरिकेच्या दबावामुळे आपण कसलीही प्रतिक्रियात्मक कारवाई केली नाही, हे कबूल करून झालेलं आहे. इतकंच काय तो हल्ला पाकिस्तानकडून झालेला इस्लामी दहशतवादी हल्ला नव्हता तर तो रा.स्व.सं. ने करवलेला भगवा दहशतवादी हल्ला होता, अशीही एक थिअरी खपवायचा निर्लज्जपणा केला गेला होता. त्या वेळच्या सरकारने कुचकामीपणाही केला आहे आणि कचखाऊपणाही. जर ते कुणी सिनेमात दाखवत आणि तसं म्हणत असेल तर त्यात चूक काय आहे ? खाल्ल्यामुळे खवखवत आहे का ? कंदहार विमान अपहरण प्रकरणाच्या वेळी भाजप सरकार होतं आणि त्या सरकारने कच खाल्ली, असंही सिनेमात दाखवलेलं आहे. त्यातही काही चूक नाहीय. पण ही गोष्ट का दुर्लक्षिली जातेय ?
चुकीचा इतिहास सांगणारे, सरकारची तळी उचलणारे सिनेमे आपण वर्षानुवर्षं करत आलो आहोत. विनाकारण ह्या गोष्टीचा बाऊ करण्यापेक्षा सिनेमाला सिनेमा म्हणून पाहायला हवं. केवळ एक विशिष्ट थिअरी मांडायची म्हणून बनवला जरी असेल तरी जर उत्तम प्रकारे बनवला असेल तर त्या दृष्टीने पाहता यायला हवं.
असो.
एकंदर धुरंधर चांगला आहे. एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे. अजून चांगला बनला असता का ? नक्कीच !
- रणजित पराडकर

No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!