Tuesday, March 31, 2015

शून्याचा पांगुळगाडा

शून्यास पाहतो आहे
शून्याला दिसतो आहे
पसरले दूरवर शून्य
ते शून्यच बनतो आहे

मी कण-कण जगतो आहे
ही श्वासोत्सुकता नाही
अंतोत्सुक आयुष्याची
मृत्यूला चिंता नाही

ओलांडू बघतो रस्ता
पाऊलच उचलत नाही
साखळी तुटावी इतकी
वेदनाच वाढत नाही

बेसावध होतो तेव्हा
ठरलो माझा अपराधी
माझ्याच शरीराला ही
जडली 'मी' नामक व्याधी

मन माझे भणाणलेले
जणु जुनाट पडका वाडा
हे शरीर म्हणजे माझ्या
शून्याचा पांगुळगाडा

....रसप....
३१ मार्च २०१५

Monday, March 30, 2015

~ ~ स्वप्नभंगाची हॅटट्रीक (Australia vs New Zealand - Cricket World Cup 2015 - Final) ~ ~

प्रत्येक विश्वचषक सुरु होण्याआधी काही संघ 'प्रबळ दावेदार' मानले जातात. 'फेवरेट्स'.
एखाद-दुसरा संघ 'लक्षवेधी' असतो. 'डार्क हॉर्स'.
जवळजवळ प्रत्येक विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ 'प्रबळ दावेदार' मानला गेला आहे. तर न्यू झीलंड नेहमीच 'लक्षवेधी'. १९९२ ला दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात सहभाग घेतला, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक विश्वचषकासाठी तेसुद्धा 'प्रबळ दावेदार' राहिले आहेत आणि सौरव गांगुलीने खडबडून जागं केलेल्या भारतीय संघाने जेव्हा २००३ साली अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारली होती, तेव्हापासून भारतसुद्धा. त्या त्या देशातील लोकांना तो तो देश जिंकावा, असं वाटणं स्वाभाविक आहे. (ब्रिटीश लोकांचाही इंग्लंड संघाला पाठींबा असणारच.) त्यामुळे बाद फेरीत जेव्हा आठ संघ दाखल झाले तेव्हा ते सगळेच संघ, त्या त्या देशांतील लोकांसाठी 'प्रबळ दावेदार' झालेले होते आणि त्यातून जेव्हा चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले, तेव्हा तर भावनांना ऊतच आला होता. दक्षिण आफ्रिका, न्यू झीलंड आणि भारत ह्यांना प्रचंड प्रमाणात 'दिल से' पाठींबा होता पण 'दिमाग से' बहुतेक जण ऑस्ट्रेलियासोबत होते. ह्या तिन्ही संघांचे पाठीराखे आपापल्या संघाच्या विजेतेपदाचं स्वप्न रंगवत होते आणि मग एकामागोमाग एक तिन्ही स्वप्न भंग झाली. स्वप्नभंगाची हॅटट्रीक झाली. उरलं ते एक असं वास्तव, जे बदलण्याचा अजून एक प्रयत्न अयशस्वी ठरला होता. 'ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदा'चं वास्तव.

हा भावनिक कडेलोट फक्त पाठीराख्यांतच होता, असं नाही. जेव्हा स्टेनसारखा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जीव तोडून गोलंदाजी करत असतानाही टप्पा चुकत होता, जेव्हा सेट झालेल्या शिखर धवनने उतावीळपणे आपली विकेट फेकली, जेव्हा ब्रेंडन मॅक्युलमने नेहमीप्रमाणे पहिल्या चेंडूपासूनच चेंडूला सीमा दाखवण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टंप गमावला, तेव्हा त्यांचा आपापल्या भावनांवरचा ताबा सुटलेला होता. तर दुसरीकडे पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात जेव्हा वहाब रियाझ तोफगोळे फेकावेत तसे चेंडू टाकत होता, तेव्हा त्याच्यासमोर स्टीव्हन स्मिथ शांतपणे उभा राहिला होता, त्याने कुठलाही आत्मघात केला नाही, भारताविरुद्ध उपांत्य सामन्यांत आपल्या बॅटमधून धावा निघत नाही आहेत, हे दिसत असतानाही आरोन फिंचने संयम सोडून उतावीळपणा केला नाही आणि पॉवरप्लेच्या षटकांत हल्ला होणार आहे, ह्याचा आधीच अंदाज घेऊन जेम्स फॉकनरने सुरुवातच धीम्या गतीच्या चेंडूने करून न्यू झीलंडच्या फलंदाजीला अंतिम सामन्यात घसरगुंडीवर लोटलं; हे व असं बरंच काही ऑस्ट्रेलियन खेळाडू करू शकले कारण इतरांप्रमाणे त्यांच्या मेंदूचा ताबा मनाने घेतलेला नव्हता. ह्या म्हणतात अस्सल व्यावसायिकपणा. आपल्याला काय करायचं आहे, आपली भूमिका काय आहे, लक्ष्य काय आहे ह्यावरच त्यांचं लक्ष पूर्णपणे केंद्रित असणं. दबावाखाली खेळताना हीच बाब सगळ्यात महत्वाची ठरते. Clarity of thoughts.

ह्यामुळेच अंतिम सामन्यात नाणेफेक गमवूनही ऑस्ट्रेलियाच्या खेळावर परिणाम झाला नाही आणि न्यू झीलंडने नाणेफेक जिंकली तरी त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. ३५ व्या षटकांत १५० वर ३ बाद ही एक समाधानकारक धावसंख्या होती. तिथपर्यंत पोहोचवणारे इलियट व टेलर जितका काळ एकत्र होते, तितका काळ वगळता दोन्ही डावांत पूर्णपणे ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. सर्व बाद १८३ ही धावसंख्या १९८३ साली भारताने अंतिम सामन्यात केली होती आणि सामना जिंकला होता. पण तेव्हाचं आणि आजचं एकदिवसीय क्रिकेट ह्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आता इतक्या धावा तर एकटा खेळाडूही बरेचदा करत असतो. ह्या विश्वचषकात तब्बल ३८ शतकं ठोकली गेलीत आणि त्यांपैकी दोन तर द्विशतकं. आजच्या घडीस प्रथम फलंदाजी करताना १८३ धावांत गळपटणं, म्हणजे जवळजवळ आत्महत्याच. त्यात मेलबर्नची खेळपट्टी जराशी मनधरणी केल्यावर ३०० धावा करू देईल इतकी दयाळू होती. तिथे १८४ धावा, त्याही ऑस्ट्रेलियासाठी आणि त्याही चौथा व पाचवा गोलंदाज कमकुवत असलेल्या न्यू झीलंडसमोर किरकोळ होत्या, किरकोळच ठरल्या. ३४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्टीव्हन स्मिथने विजयाचा चौकार मारला, पण त्या अखेरच्या क्षणासाठी खेळाडूंसकट, प्रेक्षकही खूप आधीपासूनच तयार होते. स्टेडियममध्ये जमलेल्या ९१००० लोकांना आपण विश्वचषकाचा अंतिम सामना पाहतो आहे, असं वाटलंच नसावं कारण व्यावसायिकतेपुढे भावनिकता पूर्णपणे हताश झालेली होती.

संपूर्ण स्पर्धेत, न्यू झीलंडने घराबाहेर खेळलेला हा पहिला सामना होता. ही गोष्ट त्यांच्यावर उलटली. साखळीतील ऑस्ट्रेलियासोबतचा सामनाही त्यांनी घरीच खेळला. ऑस्ट्रेलियाने तो सामना गमावला, पण त्यामुळे जर उपांत्यपूर्व वा उपांत्य मध्ये एखाद-दुसरा सामना त्यांना घराबाहेर खेळायला लागला असता तर ते त्यासाठी थोडे फार तरी तयार असते.

न्यू झीलंडसाठी सहा उपांत्य सामने हरल्यावर मिळालेली अंतिम सामना खेळण्याची पहिली संधी होती. ती त्यांनी गमावली. विश्वविजेतेपद मिळवण्याच्या वाटेवर नेहमीच ऑस्ट्रेलियाचं आव्हान असतं. ते ज्याला पेलवतं, तोच यशस्वी ठरतो. पण खरं सांगायचं तर ह्या आव्हानासाठी न्यू झीलंड तयार असल्यासारखे वाटलेच नाहीत. स्टार्क, जॉन्सनच्या भन्नाट वेगाला उत्तर देण्यासाठी किंवा स्मिथ, क्लार्कला भेदण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही विशिष्ट नीती दिसली नाही. 'बस्स, जाऊन आपापला नैसर्गिक खेळ खेळा' हे ऑस्ट्रेलियासारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यासमोर पुरेसं नसतंच. त्याची किंमत आधी पाकिस्तान, नंतर भारत व सगळ्यात शेवटी न्यू झीलंडने मोजली.

मला स्वत:ला अंतिम सामन्याच्या ह्या निकालाबद्दल आश्चर्य वाटत नसलं तरी आनंदही वाटत नाही.
क्रिकेट हा माझ्यासाठी खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन करणारा सर्वोत्कृष्ट सांघिक खेळ आहे. आणि ऑस्ट्रेलिया व खिलाडूवृत्ती हे दोन परस्परविरोधी शब्द आहेत. हा असा संघ आहे की ज्याच्याकडून खिलाडूवृत्तीची अपेक्षा करणंही चूक आहे आणि असा संघ पुन्हा एकदा विश्वविजेता ठरला आहे. त्यांनी उत्तम खेळ केला आहे, मात्र त्या उत्तम खेळाने मिळवलेल्या यशाने त्यांच्यात आलेला उन्मत्तपणा योग्य ठरत नाही.

असो. एक मात्र नक्की की पराभवाच्या दरीत कोसळल्यावर उद्दामपणाच्या उड्या मारणं सुचत नसतं. त्या वेळी आत्मपरीक्षण करून, नियोजनबद्ध आखणी करून आधी दरीतून बाहेर यावं लागतं. तूर्तास न्यू झीलंड, भारत व दक्षिण आफ्रिकेसाठी हेच करणं आवश्यक आहे. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने सेंड ऑफ द्यावेत आणि त्यांनी ते स्वीकारावेत. फक्त उद्या त्यांची परतफेड तशीच करू नये कारण मग त्यांच्यात आणि ऑस्ट्रेलियात फरक राहणार नाही आणि माझ्यासारख्या प्रामाणिक क्रिकेटप्रेमींना ते पाहवणार नाही. विश्वचषक चार वर्षांनी पुन्हा येईल. तो दर चार वर्षांनी येतच राहील. दर चार वर्षांनी विश्वविजेता बदलू शकेल. पण खेळ ह्या सगळ्याच्या वर आहे. तो बदलू नये. क्रिकेटचं फुटबॉल, रग्बी, रेसलिंग होणार असेल तर आम्ही क्रिकेट कुठे शोधायचं ?

ऑस्ट्रेलियाचे मन:पूर्वक अभिनंदन !
न्यू झीलंडला मन भरून शुभेच्छा !

- रणजित पराडकर


ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Sunday, March 29, 2015

बरखा सुमार आयी (Movie Review – Barkhaa)

वर्षानुवर्षं सकाळी उठून चहा किंवा कॉफी घेण्याची जवळजवळ प्रत्येकाला सवय असते. तीच चव, साधारण तीच वेळ आणि बहुतेकदा जागाही तीच. फक्त काही ठराविक काळानंतर 'कप' बदलतो. अगदी तसंच, वर्षानुवर्षं रोज सकाळी जाग आल्यावर प्रेमत्रिकोणाची किंवा 'पहिल्या नजरेत होणारं प्रेम आणि नंतर नावावर शेम' ह्या चहा किंवा कॉफीची हिंदी चित्रपटकर्त्यांचीही जुनी सवय आहे. फक्त ठराविक काळानंतर इथेही 'कप' बदलत गेला आहे. पहिली नजर जुळण्याच्या निवडक जागा कायम ठेवत नजरांची उगम स्थानं व मिलन स्थानं बदलत गेली आहे. ह्या 'प्रेम ते शेम ते परत प्रेम' प्रवासाची हाताळणी थोडी बदलत गेली आहे. ती अगदी जराशी वास्तववादी झाली आहे. अश्या कहाण्या दाखवताना पडद्यावर मात्र आजही ठोकळेच का असतात, हे मात्र मला समजत नाही.

'प्रेम-शेम-प्रेम'वाल्या 'बरखा' मधले ठोकळे आहेत 'ताहा शाह' आणि 'सारा लोरेन'. (पैकी हीरोचं नाव पहिलं आहे.)
एका नावाजलेल्या वकिलाचा मुलगा असलेला जतीन सबरवाल (ताहा) हिमाचल प्रदेशात मित्रासोबत गेला असताना बरखा (सारा)ला पाहतो आणि पहिल्या नजरेत वेड लागावं, असं तिच्यात काहीही नसतानाही तिच्यासाठी वेडा होतो. मग ती पांढरी पाल त्याला मुंबईत परतल्यावर पुन्हा भेटते. कालांतराने ती एक बार डान्सर असल्याचा एक भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक धक्का बसतो. भूकंपाप्रमाणे एका धक्क्यासोबत अजून एक धक्का बसतो, जो मी सांगणार नाही पण पण ह्या सगळ्यातून तो सावरणार आहे, हे आपल्याला माहित असतंच, सावर्तोच. अत्यंत बाष्कळपणे ही कहाणी, लिहिण्याआधीच सुचलेल्या शेवटापर्यंत पोहोचते. असा एकंदरीत कहाणीचा प्रवास.

ह्या दरम्यानच्या काळात असह्य प्रवासाचा आनंद काय असतो, ह्याचा पुरेपूर प्रत्यय येतो. पडद्यावर दिसणाऱ्यांपैकी १-२ सह-अभिनेत्यांचा अपवाद वगळता सर्व जण 'सुमार अभिनय स्पर्धे'त हिरीरीने सहभाग नोंदवल्यासारखे वावरतात.
'ताहा शाह' ही स्पर्धा अगदी सहजपणे जिंकतो. तो अनेक वर्षांतून एकदा येणाऱ्या विशिष्ट आकड्यांच्या तारखेप्रमाणे विशेष उल्लेखनीय आयटम आहे. त्याच्या चेहऱ्यावर हवा तो भाव दिसावा म्हणून मेक अपवाला, साउंड रेकॉर्डिस्ट, कॅमेरामन इ. सर्वांनी जीवाचं रान केलंय, मात्र तो क्षणभरही विचलित होत नाही. तो विनोद करताना हास्यास्पद आणि भावनिक होताना विनोदी वाटतो.
'सारा लोरेन'ला दुसरा क्रमांक मिळाल्याने ती जराशी खट्टू होईल. पण त्यात तिची खरोखर काहीच चूक नाही. तिची भूमिकाच अशी होती की तिने कितीही प्रयत्न केला, तरी अभिनयाचा थोडासा भास निर्माण होणं स्वाभाविकच होतं. मख्ख चेहऱ्याने लख्ख अंगप्रदर्शन करणाऱ्या जॅकलिन फर्नांडीस, लिसा रे, सेलिना जेटली, इ. पांढऱ्या बाहुल्यांच्या क्लबमध्ये 'सारा'ला आजीवन सदस्यत्व मिळू शकेल, नव्हे द्यायलाच हवं.
हिमांशू चटर्जी, पुनीत इस्सार व इतर सर्व कलाकारांना उत्तेजनार्थ बक्षीस विभागून देता येऊ शकेल. पण बारवाल्या 'अन्ना'च्या भूमिकेतील आशिष रॉयला 'सुमार अभिनय स्पर्धे'साठी अपात्र ठरवावं लागेल.
सगळ्यांकडून इतकं अप्रतिम प्रदर्शन करवून घेतल्याबद्दल दिग्दर्शकाच्या रिकाम्या खुर्चीला मात्र एक विशेष पारितोषिक दिलं गेलं पाहिजे. कारण चित्रपट हे दिग्दर्शकाचंच माध्यम असतं. पडद्यावर दिसणारे चेहरे निमित्तमात्र असतात.
ह्या सगळ्यात एक-दोन गाणी मात्र उगाच बरी जमून गेली आहेत. ती गाणी आपल्याला आवडल्याने थोडासा रसभंग होतो. खासकरून साबरी ब्रदर्सची कव्वाली 'मन कांटो मौला' चांगलीच लक्षात राहते आणि काही काळासाठी कलाकारांच्या नेत्रदीपक योगदानाला विसरायला भाग पाडते.
हिमाचलसारख्या निसर्गसुंदर भागात केलेलं चित्रणही इतकी इतकं सफाईदारपणे वाईट केलं आहे की कुठल्याही फ्रेममध्ये सौंदर्याचा लवलेश दिसू नये. मुंबई आणि हिमाचल हे दोन्ही भाग न पाहिलेल्यांना ह्या दोन्हींमध्ये फक्त बर्फाचा फरक आहे, असंही वाटू शकेल इतकं हे चित्रण सफाईदार आहे.

समजा दोन-अडीच तास कुठे तरी वेळ घालवायचाच असेल, तर उन्हाळ्याचे दिवस आहेत; उगाच इथे तिथे उंडारण्यापेक्षा एखाद्या स्वस्तातल्या, स्वच्छ व वातानुकुलीत चित्रपटगृहात जाऊन 'बरखा'चं तिकीट काढावे. अगदी कोपऱ्यातली जागा निवडावी आणि खुर्ची पुश बॅक करून ताणून द्यावी. उत्तम झोप होईल.

रेटिंग - १/२* (अर्धा तारा)

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२९ मार्च २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

Friday, March 27, 2015

स्वप्नापासून वास्तवापर्यंत ! (India vs Australia - Cricket World Cup 2015 - Semi Final)

गेले चार महिने ऑस्ट्रेलियन संघासमोर जे भारताला जमलं नव्हतं, ते शेवटपर्यंत जमलंच नाही. सगळं स्टेडीयम निळ्या रंगात न्हाऊन निघालं, पण तरी विजयाचा रंग बदलला नाही. स्टेडीयमचा, लोकांचा रंग मैदानावर ओघळला नाही तरी अखेरीस सिडनी सिडनीच राहिलं, अहमदाबाद झालं नाही. भारतासाठी एक स्वप्नवत स्पर्धा, एका बोचऱ्या वास्तवाची जाणीव करून देऊन संपली.
भारत उपांत्य सामना हरला ह्याचं दु:ख राहिल, ऑस्ट्रेलियाशी हरला ह्याचंही दु:ख राहिल, पण ह्याहून जास्त दु:ख ह्याचं राहिल की न झुंजता हरला.
दु:ख राहिल, वाईट वाटेल तरी लाज वाटणार नाही. लाजिरवाणं तर ते होतं जे ह्या विश्वचषकात श्रीलंकेचं दक्षिण आफ्रिकेसमोर झालं, इंग्लंडचं न्यू झीलंडसमोर झालं, पाकिस्तानचं वेस्ट इंडीजसमोर झालं किंवा भारताचं बांगलादेशसमोर २००७ च्या विश्वचषकात झालं, ऑस्ट्रेलियासमोर २००३ च्या विश्वचषकात साखळी फेरीत झालं. सध्याच्या भारतीय संघाने सलग सात सामने जिंकत, प्रत्येक सामन्यात १० बळी मिळवत, दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश करणं हेच खरं तर अविश्वसनीय यश आहे.
भारताच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता, ह्या सात सामन्यांत ज्या संघांशी सामना झाला, त्यांपैकी ४ कच्चे लिंबू (बांगलादेश, आयर्लंड, झिंबाब्वे, संयुक्त अरब अमिराती) होते. २ लंगडे घोडे (पाकिस्तान, वेस्ट इंडीज) होते आणि एकच दक्षिण आफ्रिकेचा संघ होता जो बलशाली होता. तोच एक खरा विजय. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण ह्या तिन्हीत ऑस्ट्रेलियासुद्धा भारतापेक्षा सरस आहे, हे मान्य करावंच लागेल. त्यामुळे जे घडलं ते अनपेक्षित होतं असं नाही तर माझ्यासकट अनेक क्रिकेटरसिक ज्याची आस लावून होते, तेच खरं तर अवास्तव होतं. तरी, 'आजही जर अमुक झालं असतं तर निकाल बदलला असता; तमुक घडलं असतं तर जिंकलो असतो' वगैरे म्हणणं मात्र 'मेल्या म्हशीला दूध फार' असा प्रकार होईल. तेव्हा हे स्पष्टपणे स्वीकारायला हवं की भारताने खरं तर ह्या विश्वचषकात आत्तापर्यंत स्वत:च्या कुवतीपेक्षा चांगला खेळ केला आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जास्त योग्य होता.

महत्वाच्या सामन्यांत नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजूने लागला नाही आणि मायकेल क्लार्कने फलंदाजी स्वीकारली. डेव्हिड वॉर्नरने हाणामारीसाठी बाहू सरसावलेच होते, पण उमेश यादवच्या गतीने त्याला चकित केलं आणि भारताला महत्वाचा बळी लौकर मिळाला. चांगली सुरुवात होती, मात्र त्याचा फायदा पुढे घेता आला नाही. किंबहुना, मी असं म्हणीन की स्टीव्हन स्मिथने घेऊ दिला नाही. चाचपडत खेळणाऱ्या आरोन फिंचला सोबत घेऊन त्याने जी शतकी भागीदारी केली, त्यात खरं तर दोघांच्या धावा त्याच्याच समजायला हव्या. त्याने इतक्या सहजतेने धावा वाढवत ठेवल्या की फिंचला धावा काढणं जमत नसतानाही उतावळेपणा करायची गरजच भासली नाही. एक फलंदाज शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे धडपडत होता आणि दुसरा केवळ स्वत:च्या कुवतीच्या जोरावर त्याच गोलंदाजीवर मात करत होता; असंच हे चित्र होतं. स्मिथचं शतक आणि नंतर मॅक्सवेल, फॉकनर आणि जॉन्सनने मिळून केलेल्या अवघ्या ३५ चेंडूंतील ७१ धावा ह्यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३२८ पर्यंत मजल मारली.
ऑस्ट्रेलियाच्या जलदगती माऱ्यापुढे ३२९ धावांचं लक्ष्य भारतासाठी महाकठीण ठरणार होतंच, ठरलंच. धवन-रोहितने प्रत्येकी एका जीवदानाच्या जोरावर ७१ धावांची चांगली सलामी दिली, मात्र धवन बाद झाल्यानंतर भारत हळूहळू सामन्यातून बाहेर फेकला गेला. ठराविक अंतराने गडी बाद होत राहिले आणि सावरता आलंच नाही.

सामने जिंकत असताना काही गोष्टींबाबत फार तर हलकीशी कुरबुर केली जाते. मात्र जेव्हा सामना हरला जातो, तेव्हा त्याच गोष्टींवर बोट ठेवून त्या ठळक केल्या जातात. अश्या अनेक गोष्टी आता ठळक होतील.
उमेश यादवने आज ४ बळी घेतले, पण त्यासाठी प्रति षटक तब्बल ८ धावा दिल्या. हाणामारीच्या षटकांत होणाऱ्या हल्ल्यामुळे हे आकडे बिघडले का ? नाही. त्याने नियमितपणे धावांचा पुरवठा केला. ह्याचं कारण काय ? त्याचा सगळ्यात जलद चेंडू १४९ च्या गतीने होता आणि सगळ्यात धीमा चेंडू १४० ने. हे गतीपरिवर्तन अगदीच क्षुल्लक आहे. आजच्या क्रिकेटमध्ये फलंदाज सतत धाव घेण्याच्याच विचारात असतो. 'पुढील येणारा चेंडू कोणत्या गतीने येईल' ह्यावर त्याला विचार करायला भाग पाडणं म्हणूनच अत्यावश्यक ठरतं. हे आकडे खरं तर १४९ व १२५ असे काहीसे हवे होते. यादवला जर अधिक काळ यशस्वी राहायचं असेल, तर त्याला गोलंदाजीत काही चतुर बदल करावेच लागतील. ९ षटकांत ७२ धावा देऊन ४ बळी घेणं, हे संघाला विजयपथावर नेऊ शकत नाही. ह्यापेक्षा ९ षटकांत ३६ धावा देऊन एकही बळी नाही मिळाला, तरी उत्तम.
रवींद्र जडेजाच्या बाबतीत नीट विचार करणे खूप आवश्यक आहे. जडेजा संघात जर एक अष्टपैलू म्हणून खेळत असेल, तर त्याचं अष्टपैलुत्व त्याने आयपीएलमध्ये सिद्ध करून उपयोगाचं नाही. सनथ जयसूर्यासुद्धा जडेजासारखाच एक सामान्य डावखुरा फिरकी गोलंदाज होता. श्रीलंकेने त्याच्यावर वेगळा विचार करून त्याला असा काही 'तयार' केला की त्याने संघाचं नशीब तर बदललंच, खेळाचं गणितही कायमस्वरूपी बदलून टाकलं. ही तुलना जयसूर्या आणि जडेजाची नसून भारत व श्रीलंकेच्या विचारप्रक्रियेची आहे. जडेजाच्या तंत्रात एक फलंदाज म्हणून अनेक उणीवा आहेत. पण आजच्या क्रिकेटमध्ये अनेक यशस्वी फलंदाज अत्यंत सदोष तंत्राने खेळताना दिसतील. त्यांतले किती तरी जण तर सलामीला असतील ! एक गोलंदाज म्हणून तो १००% विश्वासाने प्रत्येक सामन्यात १० षटकं टाकू शकत नाही. एक फलंदाज म्हणून तो १५ चेंडूत २५ धावांशिवाय जास्त योगदान देऊ शकत नाही. म्हणजेच पाचवा गोलंदाज आणि सातवा फलंदाज म्हणून दिलेली जबाबदारी तो नक्कीच अपेक्षेइतकी चांगल्या प्रकारे पार पाडू शकत नाही आहे. अश्या वेळी दोन उपाय उरतात, ती जबाबदारी दुसऱ्या कुणाला देणं किंवा त्याला दुसरीच जबाबदारी देणं.
विश्वचषकातील आठ सामन्यांपैकी सात सामन्यांत भारताने एकच संघ खेळवला. एकाच सामन्यात शमीऐवजी भुवनेश्वर कुमार खेळला कारण शमी दुखापतग्रस्त होता. जे सामने अक्षरश: केवळ औपचारिक होते, त्या सामन्यांतही भारताने संघात बदल केले नाहीत. भुवनेश्वर कुमारसारख्या विश्वसनीय स्विंग गोलंदाजाला आपण संघाबाहेर ठेवावं, इतकी श्रीमंती आपल्या गोलंदाजीत नक्कीच नाही. केवळ 'विनिंग कॉम्बीनेशन' बदलायचं नाही, म्हणून अपेक्षेनुरूप कामगिरी करूच न शकणाऱ्या खेळाडूंना खेळवत राहणं अंगलट येऊ शकतं, आलंही असावं.

असो !
स्पर्धा संपली. चषक गेला. आता २०१९ पर्यंत प्रतीक्षा करणं, हेच केवळ हाती आहे. तेव्हा कदाचित महेंद्रसिंग धोनी नसेल. संघाला त्याची उणीव भासेल, असं मी म्हणणार नाही. कारण संघाला आज सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली ह्यांचीही उणीव जाणवत नाही आहे. प्रत्येकाची जागा, कुणी ना कुणी घेत असतोच आणि घ्यायलाही हवीच. धोनीचं एक कर्णधार व एक फलंदाज म्हणून मोठेपण, गोलंदाजीतील बदलापासून संघनिवडीपर्यंत कुठलाही निर्णय ठामपणे घेणे आणि त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांना सामोरं जाण्याची हिंमत दाखवणे ह्यात आणि कालच्या सामन्यांत ५ गडी बाद होऊन आवश्यक धावगती १५ पर्यंत गेली असतानाही 'जोपर्यंत धोनी आहे, तोपर्यंत आपण जिंकले नाही' ही जाणीव प्रतिस्पर्ध्यांना असणं, ह्यात आहे.

धोनी हरला. भारत हरला. मात्र सपशेल अपयशी ठरलेल्या संपूर्ण ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्या अखेरीस विश्वचषकाच्या सर्वोच्च मंचावर मात्र ह्या संघाने हाराकिरी केली नाही. ह्या पराभवाची चुटपूट लागेल, पण लाज वाटणार नाही; इतकी तरी कमाई त्याने व ह्या संघाने केली आहे निश्चितच ! आशा करू या की वास्तवाला झाकणारा जो स्वप्नवत आभास गेल्या महिन्याभरात निर्माण झाला होता, ते स्वप्न पुढील चार वर्षांत वास्तवरूपात उतरेल. धोनी नावाचा सिंह असेल किंवा नसेल, पण गड पुन्हा मिळवला जाईल. त्यासाठी भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा !

- रणजित पराडकर




ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Tuesday, March 24, 2015

क्षण एक तो अखेरी (New Zealand vs South Africa - Cricket World Cup 2015 - Semi Final)

२४ मार्च २०१५ चा दिवस ऑकलंडमध्ये नेहमीसारखा उगवला. पण नेहमीसारखा मावळला नाही. सूर्य मावळला खरा, पण कुठून तरी किलकिल्या डोळ्यांनी तोसुद्धा चोरून इडन पार्कवर नजर टिकवून राहिला असावा. एकदिवसीय क्रिकेटच्या अंबरात नेहमीच दिमाखात तळपणारे पण दर चार वर्षांनी विश्वचषकाच्या पश्चिम क्षितिजावर मावळून जीवाला हुरहूर लावणारे, कातर करणारे दोन प्रति-सूर्य आज त्या मैदानावर एकमेकांसमोर आमने सामने उभे राहिले होते. हे ठरवायला की आज कोण मावळणार ? तुंबळ लढत झाली आणि अखेरीस एकाने मान टाकली. चोरून बघणारा सूर्य एका डोळ्यांत आनंदाचे आणि दुसऱ्या डोळ्यांत दु:खाचे अश्रू घेऊन निघून गेला. कारण त्याला पुन्हा यायचं होतं, जो हरला आहे त्याला नवीन उमेद देण्यासाठी.

छोटं मैदान. पावसाची शक्यता. उपांत्य सामना. फलंदाजांची खेळपट्टी. प्रतिस्पर्ध्याचं घर.
ह्या पार्श्वभूमीवर कुणीही कर्णधार नाणेफेक जिंकल्यावर जे करेल तेच दक्षिण आफ्रिकेच्या अब्राहम डी व्हिलियर्सने केलं. प्रथम फलंदाजी घेतली. नाणेफेक न्यू झीलंडने हरली पण टीम साउदी आणि ट्रेंट बोल्टने हशीम अमला आणि क्विंटन डी कॉकची पहिल्या चेंडूपासून परीक्षा घ्यायला सुरुवात केली. ते दोघेही गडबडले आणि वाटलं की नाणेफेक उलटली ! मात्र ड्यू प्लेसिस, डी व्हिलियर्स आणि रुसोने डाव सावरलाच नाही तर मिलरसाठी असा एक रन वे बनवला ज्यावरून त्याने आल्या आल्या टेक ऑफ घेतला. डावाची सात षटकं पावसात वाहून गेली आणि न्यू झीलंडसाठी ४३ षटकांत २९८ चं लक्ष्य ठेवलं गेलं.
एखाद्या मोठ्या सामन्यात ही धावसंख्या जबरदस्तच.

ह्या विश्वचषकात प्रत्येक सामन्यात ब्रेंडन मॅक्युलम 'सर पे कफन बाँधे हुए' उतरला आहे. तसाच तो परत उतरला. त्याने डेल स्टेनसारख्या तेजतर्रार गोलंदाजाला एखाद्या ऑफस्पिनरला हाणावं, तसं क्रीझच्या बाहेर निघून झोडपलं. मॅक्युलमला सामना पंचवीस षटकांत संपवायचा असावा बहुतेक. त्याच्या घणाघातांनी चेंडूची शकलं उडतील की काय असं वाटत असताना डी व्हिलियर्सने चेंडू लेगस्पिनर इम्रान ताहीरकडे दिला आणि षटकामागे चौदापेक्षा जास्त गतीने धावा कुटल्या जात असताना त्याने एक निर्धाव षटक टाकलं. केवळ पाच षटकांत न्यू झीलंडसाठी आवश्यक धावगती सहाच्या खाली आणणारी ही सलामी पुढील षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॅक्युलमला बाद करून मॉर्ने मॉर्कलने फोडली आणि मग रस्सीखेचेचा थरार सुरु झाला. पुढच्या छत्तीस षटकांत सामन्यावर पकड मिळवण्यासाठी प्रत्येक षटकात दोन फलंदाज आणि एक गोलंदाज जीवाचं रान करत होते. प्रचंड दबावाखाली कोरे एन्डरसन आणि ग्रँट इलियटने अत्यंत शांत चित्ताने व निर्धाराने एक सगळ्यात महत्वाची भागीदारी केली. जश्या न्यू झीलंडने क्षेत्ररक्षण करताना काही चुका केल्या तश्याच दक्षिण आफ्रिकेनेही केल्या. खरं तर दबावाखाली अश्या चुका होतच असतात. पण जेव्हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतो, तेव्हा त्या चुकाच महागात पडल्या असं म्हणता येत नाही. कारण त्या सामन्याचा निर्णय तो शेवटचा एक सेकंद करत असतो, जेव्हा अखेरचा चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटून फलंदाजापर्यंत पोहोचतो. तो चेंडू स्टेनच्या हातातून सुटला आणि सव्वीस षटकांपासून बाहू शिवशिवत असलेल्या ग्रँट इलियटने तो प्रेक्षकांत भिरकावला. सामन्यावर न्यू झीलंडची मोहोर उमटली आणि दक्षिण आफ्रिकेसाठी अजून एक विश्वचषक अश्रू, निराशा, हिरमोड, हताशा देऊन संपला. ज्या मैदानावर त्यांनी दुपारी आशेचं, विश्वासाचं पाऊल टाकलं होतं, त्याच मैदानावर काहींच्या पाठा टेकल्या होत्या, कुणाचे गुडघे तर कुणाचं नाकही. मैदानात एका बाजूला जल्लोष सुरु होता आणि दुसऱ्या बाजूला काही मनांत आक्रोश कोंडला जात होता, काही डोळ्यांतून तो मूकपणे वाहत होता.

हा सामना ह्या विश्वचषकाचा आत्तापर्यंतचा सर्वोच्च बिंदू होता. सर्वोच्च बिंदू हा इतका लहान असतो की तिथे दोन जण राहू शकत नाहीत. त्यामुळे तिथे शेवटी कुणा एकालाच टिकता येणार होतं. त्या अखेरच्या क्षणी ज्याचा तोल गेला, तो गडगडला आणि ज्याने तोल जाऊ दिला नाही तो टिकला. न्यू झीलंडला हा सामना जिंकून देणाऱ्या 'ग्रँट इलियट' ह्या मूळच्या दक्षिण आफ्रिकन खेळाडूला आजपर्यंत किती जण सन्मानाने पाहत होते ? सामन्यापूर्वी जर कुणाला हा प्रश्न विचारला असता की ग्रँट इलियट महान आहे की डेल स्टेन ? तर ती व्यक्ती उत्तरही न देता छद्मी हसून विचारणाऱ्याच्या क्रिकेट अज्ञानाची कीव करून निघून गेली असती. पण त्याच ग्रँट इलियटने सामन्याच्या शेवटून दुसऱ्या चेंडूनंतर त्याच डेल स्टेनला शब्दश: अस्मान दाखवलं. सामना हरल्यावर हताश स्टेन खेळपट्टीवर उताणा पडून शून्य नजरेने आकाशात पाहात होता. हा फरक कर्तृत्व व कसबाचा नसून त्या अखेरच्या क्षणी तोल सांभाळता येण्याचा किंवा सांभाळला जाण्याचा आहे.

दक्षिण आफ्रिकेने क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकांमुळेच - सुटलेले झेल, हुकलेले धावचीत - ते हरले, असे म्हणता येणार नाही हे आत्ता मी म्हणतो आहे कारण ते खूप सोपं आहे. पण त्या शेवटून दुसऱ्या चेंडूवरचा इलियटचा फटका चुकला असता, तर ह्या चुका पुढील सामन्यात सुधारता आल्या असत्या. मात्र आता पुढील चार वर्षं त्या आफ्रिकेला पछाडतील. ह्या चार वर्षांत ते पुन्हा न्यू झीलंडशी खेळतील, जिंकतीलही. कदाचित पुढील विश्वचषकात ह्या पराभवाचे उट्टेही काढतील, पण त्याने हा सामना काही इतिहासातून पुसला जाणार नाही. जे अश्रू मॉर्केलच्या डोळ्यांतून ओघळून इडन पार्कच्या हिरवळीत रुजले, ते पुन्हा वेचता येणार नाहीत.

खरा क्रिकेटरसिक, खरा क्रिकेटपटू आजच्या सामन्यानंतर हेच म्हणेल की खेळ जिंकला'. मात्र मनात कुठे तरी न्यू झीलंडसाठी जितका आनंद वाटत असेल तितकंच दु:ख दक्षिण आफ्रिकेसाठी वाटत असेलच आणि वाटत राहीलच, पुढील विश्वचषकापर्यंत.

- रणजित पराडकर



ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Monday, March 23, 2015

करा एल्गार ! (INDIA vs AUSTRALIA - Semi Final Cricket World Cup 2015 - Preview)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने फलंदाजांनी पत्करलेल्या शरणागतीमुळे पराभव पत्करला. सर्व बाद पाकिस्तान झाला आणि ऑस्ट्रेलियाचे फक्त चारच गाडी बाद झाले पण सामना गाजला पाकिस्तानच्या वहाब रियाझच्या गोलंदाजीमुळे. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खास करून शेन वॉटसनला ज्याप्रकारे नाचवलं ते पाहून त्यांचं 'कांगारू' नाव सार्थ वाटावं. वॉटसनला आणि त्याच्या बॅटला वहाबचे अनेक चेंडू अगदी जवळून वारा घालून गेले. काहींनी तर त्याचं हेल्मेटच्या आतलं डोकंही हलवलं. सुदैव आणि पाकच्या राहत अलीच्या मदतीच्या जोरावर वॉटसन टिकला आणि कांगारूंना विजय मिळवता आला.
सुनील गावस्करने म्हटलं आहे की, 'जेव्हा एखादा गोलंदाज भेदक जलद मारा करत असतो, तेव्हा त्याला खेळायची सगळ्यात उत्तम पद्धत म्हणजे नॉन-स्ट्रायकर एंडला पोहोचणे !'
पण वहाबच्या त्या स्पेलदरम्यान वॉटसनला तेसुद्धा सहजपणे करता येत नव्हतं. जेव्हा दोन ऑस्ट्रेलियन फलंदाज पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांकडून एक धाव चोरू शकत नाहीत, तेव्हा त्याचा अर्थ एकच होतो की त्यांच्या बॅटला क्वचितच चेंडू लागतो आहे ! वहाबला अजून एखाद्या गोलंदाजाची तोडीस तोड साथ मिळाली असती किंवा क्षेत्ररक्षकांनी आंतरराष्ट्रीय पातळीला साजेसं प्रदर्शन केलं असतं तर कदाचित भारतासमोर पुन्हा एकदा पाकिस्तानचं आव्हान असतं. पण तसं झालं नाही आणि कांगारूंनी सुटकेची उडी मारली.

ह्या विश्वचषकात आत्तापर्यंत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहात केवळ एकच फिरकी गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहीर. बाकी सगळे जलदगती गोलंदाजच. ह्या यादीत आत्ताच्या घडीला भारताचा मोहम्मद शमी तिसऱ्या स्थानावर आहे. पण गोलंदाजीचे जबरदस्त स्पेल्स आठवायचे झाले तर मला न्यू झीलंडचे टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, पाकचे मोहम्मद इरफान, वहाब रियाझ आठवतात. खरं तर जी किमया भारतीय गोलंदाजांनी केली आहे ती न्यू झीलंडव्यतिरिक्त इतर कुणालाच जमलेली नाही. आत्तापर्यंतच्या सातही सामन्यांत त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला सर्व बाद केलं आहे.
इथे एक गंमतीशीर आणि आश्चर्यकारक बाब लक्षात घ्यायला हवी. विश्वचषक सुरु होण्यापूर्वी इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे भारतीय गोलंदाजीचे दोन प्रमुख आधारस्तंभ होते. इशांत शर्मासारख्या अत्यंत बेभरवश्याच्या व प्रसंगी अति-सामान्य वाटणाऱ्या गोलंदाजावर एखाद्या संघाची भिस्त असणं ही खरं तर हास्यास्पद बाब, पण कटू सत्य. भुवनेश्वर कुमार विश्वासू वाटत असला, तरी अजून तसा नवखाच. तसेच गेल्या वर्षभरातील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त बळी मोहम्मद शमीच्या नावावर होते. ह्या तीन प्रमुख गोलंदाजांपैकी फक्त शमी ह्या विश्वचषकात खेळतो आहे. भुवनेश्वर आहे, पण चक्क बाहेर बसला आहे आणि इशांत तर स्पर्धेपूर्वीच दुखापतग्रस्त झाला आहे. अश्या स्थितीत, जे वेस्ट इंडीज बाबत रवी रामपॉल आणि सुनील नारायणच्या अनुपस्थितीमुळे आणि पाकिस्तानबाबत सईद अजमल, उमर गुल, जुनैद खानच्या अनुपस्थितीमुळे झालं, तसं भारताबाबत झालं नाही. गोलंदाजी थिटी पडली नाही, उलटपक्षी आश्चर्यकारकपणे सुधारली ! ह्याचा अर्थ हाच की इशांत शर्मावर भारतीय गोलंदाजी अवलंबून आहे, हा भारताचाच गैरसमज होता. डोलारा पेलण्यासाठी बांबूची ताकद लागते, वेलीची लवचिकता नाही. इशांत शर्मा दिसत बांबूसारखा असला, तरी त्यात ती ताकदच नसावी. अन्यथा शेकडो जाणकारांनी अनेक वेळा केलेल्या सामन्याआधी व नंतरच्या चर्चांत कुठे तरी कुणी तरी हा मुद्दा मांडला असता की, 'ही कमाल भारतीय गोलंदाज त्यांचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माच्या अनुपस्थितीत दाखवत आहेत!'
तर एकाही भारतीय गोलंदाजाने एकही झणझणीत तिखट स्पेल टाकलेला नसतानाही सात सामन्यांत सत्तर बळी आणि एक गोलंदाज सर्वाधिक बळींच्या यादीत तिसरा कसा ? ह्याचं उत्तर ह्या गोलंदाजीच्या पूर्वकर्तृत्वात मिळावं. गेले कित्येक महिने ही गोलंदाजी विविध खेळपट्ट्यांवर फक्त धडपडतच आहे. विश्वचषक सुरु होतेवेळी अगदी अफगाणिस्तान किंवा अमिरातीसारख्या देशांच्या फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजीला फारसं गांभीर्यानं घेतलं नसावं. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीतून तर ते अगदी स्पष्टपणे जाणवलं. त्यांनी ह्या गोलंदाजांना अगदी तुच्छ लेखलं आणि हाराकिरी केली. प्रतिस्पर्ध्याच्या बेसावधपणाचा पुरेपूर फायदा भारतीय गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी उठवला. मिळालेल्या बहुतांश संधींचं सोनं केलं.

असो.
पण आता परिस्थिती बदलली आहे. विश्वचषक दोनच पावलं दूर आहे. पण तो फक्त भारतासाठीच नव्हे तर इतरही तीन संघांसाठी दोनच पावलं दूर आहे. ही शेवटची दोन पावलं टाकत असताना नक्कीच कुणाला डुलकी लागणार नाही. आता फलंदाजांनी बेसावधपणी चूक करण्याची वाट बघत राहिल्यास पूर्वीसारखं घवघवीत यश मिळेल असं वाटत नाही. उपांत्य फेरीत भारतासमोर जेव्हा ऑस्ट्रेलिया असेल, तेव्हा सामना जर फलंदाज विरुद्ध फलंदाज झाला तर भारताचं पारडं नक्कीच जड असेल. मात्र जर गोलंदाज विरुद्ध गोलंदाज झाला तर शमी-यादव-मोहित-अश्विनला स्टार्क-हेजलवूड-जॉन्सन-फॉकनरच्या पातळीपर्यंत स्वत:ला उचलणं कठीण जाऊ शकतं.
इथे दोन गोष्टी आहेत. एक तर भारताचा जलदगती मारा एकसमान आहे. तिन्ही गोलंदाज उजव्या हाताचेच आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडे उजव्या व डाव्या हाताच्या गोलंदाजीचे सुयोग्य मिश्रण आहे. मात्र चांगल्या फिरकी गोलंदाजाची त्यांच्याकडे उणीव आहे. गेल्या सामन्यात त्यांनी झेवियर डोहर्टीला खेळवलं नव्हतं. झेवियर डोहर्टी हा रवींद्र जडेजापेक्षा बरा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, इतपतच त्याला सन्मान मिळू शकतो. त्यामुळे भारतासाठी अश्विन-रैना- जडेजाची षटकं, त्यातही विशेषकरून अश्विनची कामगिरी सगळ्यात जास्त महत्वाची ठरेल. तर ऑस्ट्रेलियासाठी त्यांच्या गोलंदाजांची पहिली दहा षटकं रोहित-धवन कशी खेळतात हे महत्वाचं ठरेल. ह्या दहा षटकांत जर धवनला तो धवन असल्याची आणि रोहितला तो रोहित असल्याची जाणीव झाली नाही, तर कोहलीला तो विराट असल्याची आणि रहाणेला तो अजिंक्य असल्याची जाणीव होईल. रैना-धोनी-जडेजा शेवटची दहा षटकं सांभाळू शकतील.



सामन्याच्या आधीपासूनच अपेक्षेप्रमाणे कांगारुंकडून वाग्युद्धाला सुरुवात झाली आहेच. ग्लेन मॅक्सवेलने गेल्या तीन महिन्यांत भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयाची चव चाखलेलीच नसल्याची आठवण करून दिली आहे. हे चांगलं झालं. 'आपण काय मिळवू शकलो नाही आहोत', ह्याची प्रखर जाणीव झाली म्हणजे 'आपल्याला काय मिळवायचं आहे', ह्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होते. तशी ती धोनी आणि त्याच्या ठरलेल्या इतर दहांना होवो. एल्गार होवो. हल्लाबोल होवो. बाहूंत हजार मॅक्सवेलांचे बळ संचारो आणि सिडनी क्रिकेट ग्राउंडमधून कांगारूंना उड्या मारत बाहेर पडायला लागो, हीच सचिन-द्रविडचरणी प्रार्थना !

- रणजित पराडकर



ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Sunday, March 22, 2015

विस्कळीत 'ब्लॅक होम' (Movie Review - BLACK HOME)

एक संशयास्पद रिमांड होम. 'राजावाडी रिमांड होम'. जिथल्या मुलींवर अनन्वित अत्याचार केले जात असतात. त्यांचा व्यवसायही केला जात असतो. ह्या सगळ्याची खबरबात समाजसेवक राघव आणि सरिता एका टेलिव्हिजन वृत्तवाहिनीचा अधिकारी डी.के. (आशुतोष राणा) पर्यंत पोहोचवतात. ह्या मागे बरंच मोठं रॅकेट असण्याची शक्यता बेरकी व चाणाक्ष डी. के. जाणतो आणि त्याच्यावर आधीच अनेकांची नजर असल्याने तो दुसऱ्या कुणाकरवी ह्या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचं ठरवतो. साहजिकच असं 'दुसरं कुणी' म्हणजे असं कुणी पाहिजे, जे फार विचार करणारं नसेल जेणेकरून त्या व्यक्तीकडून तो हवं तसं काम करवून घेऊ शकेल. त्याच्या कार्यालयातल्या अनेक बिनडोक लोकांपैकी सगळ्यात बिनडोक व्यक्ती 'अंजली' (सिमरन सेहमी) ला तो ह्या कामासाठी नेमतो आणि तिच्या व राघव-सरिताच्या मदतीने ह्या प्रकरणाला खणून काढतो. 'राजावाडी रिमांड होम' च्या प्रमुखाच्या भूमिकेतील अचिंत कौर आणि तिचा असिस्टन्ट दाखवलेला शरद पोंक्षे ही ह्या रॅकेटमधली लहान प्यादी. तर साहजिकच मुख्यमंत्री (मोहन जोशी) आणि गृहमंत्री (मुरली शर्मा) सारखी बडी धेंडंही ह्यात सामील असतातच. चॅनेलमधलं अंतर्गत राजकारण व ह्या प्रकरणामुळे येणारा राजकीय दबाव ह्या सगळ्याचा सामना करून डी के 'राजावाडी रिमांड होम'चं सत्य जगासमोर आणतो का ? कसं ? त्यासाठी कुणाला काय किंमत मोजावी लागते ? दोषींचं काय होतं ? वगैरे प्रश्नांची उत्तरं चित्रपट देतो. पण त्यासाठी बरंच काही झेलावं लागतं!

'सिमरन सेहमी' हा ठोकळा पहिल्यापासून शेवटपर्यंत अत्यंत नकली वावराने अक्षरश: वैताग आणतो. तिचे तिच्या होणाऱ्या पतीसोबतचे (संतोष जुवेकर) संवाद, त्याच्या कुटुंबीयांसोबतच्या गप्पा, आईसोबतचं वागणं सगळं केवळ नकली आणि थिल्लर आहे. बटबटीत चेहरा आणि उग्र मेक अप तिचं उपद्रव मूल्य आणखीच वाढवतात. प्रमुख पात्राची अभिनयाच्या नावाने बोंब असल्यावर लोक चित्रपट आवडीने का बघतील ?
आशुतोष राणाची सगळी दृश्यं त्याच्या केबिनमध्येच आहेत. बहुतेक त्याला दोन तासांसाठी बोलवून संपूर्ण शेड्युल उरकून घेतलेलं असावं. एकाच जागी, एकाच पवित्र्यात सगळी दृश्यं असल्यामुळे त्याच्यासारख्या ताकदीच्या अभिनेत्याचाही थोड्या वेळाने कंटाळाच येतो.

'रिमांड होम' मधल्या 'मिर्ची' नामक मुलीच्या भूमिकेतील 'चित्रांशी रावत' मूळची हॉकीपटू. उत्तराखंडकडून ती अजूनही राष्ट्रीय पातळीवर खेळते. 'चक दे इंडिया'मुळे तिचा चित्रपटात प्रवेश झाला आणि तिच्यातल्या अभिनयगुणांनी चांगलीच ख्याती मिळवली. 'ब्लॅक होम' मधली तिची भूमिकाही ताकदीची होती. पण तिच्याऐवजी सगळा फोकस थिल्लर अंजलीवर राहिल्याने सगळा बट्ट्याबोळ झाला.
मोहन जोशी, मुरली शर्मा ह्यांना विशेष काम नाही. पण शरद पोंक्षेंचा 'भोगी' मात्र अंगावर येतो.

वास्तवदर्शनाच्या प्रयत्नात रिमांड होम संदर्भातलं कथानक अतिरंजित, अतिभडक दाखवलं गेलं आहे आणि समांतरपणे अंजली व तिची कहाणी इतकी भंपकपणे चालते की वास्तव अतिरंजित आहे की अतिभंपक, हेच समजत नाही. चेहऱ्यावर एकच एक भाव ओढलेला डी.के., बाष्कळ अभिनयाचं मूर्तस्वरूप असलेली अंजली, तिची फडतूस कहाणी, अचानक कुठून तरी उगवून म-कार, भ-कार काढणारी मिर्ची, कथानकाच्या मांडणीत सपशेल गंडलेलं दिवसाचं वेळापत्रक ही सगळी ठिगळं विचित्र पद्धतीने जोडल्यामुळे एक दमदार 'प्लॉट' केवळ विस्कळीत हाताळणीने वाया गेला आहे.
त्यातल्या त्यात लक्षात राहतं ते अमर मोहिलेंचं पार्श्वसंगीत आणि बऱ्यापैकी जमून आलेली १-२ गाणी.

अखेरीस, एक गोष्ट आवर्जून सांगतो. एक प्रार्थना आशा भोसलेंनी गायली आहे. आशाताईंची इतकी सुंदर गाणी आम्हा रसिकांनी कानांत प्राण आणून ऐकली आणि मनात मौल्यवान रत्नांप्रमाणे साठवली आहेत. ज्या कानांनी आम्ही त्यांचा दैवी आवाज ऐकला, त्यावर मनापासून प्रेम केलं, त्याच कानांना त्यांचा इतका खराब झालेला आवाज ऐकवत नाही. ते गाणं त्यांनी नसतं गायलं तर काय फरक पडला असता ? मोठ्या लोकांनी त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या रसिकांसाठी तरी आपला अट्टाहास सोडावा म्हणतो !

चांगला रस्ता बरोबर असतोच असं नाही, बरोबर रस्ता चांगला असेलच असंही नाही. सुंदर गाण्याचे शब्द चांगले असतीलच असेलच असं नाही, सर्वच चांगल्या शब्दांचं चांगलं गाणं बनेलच असंही नाही. चांगल्या चित्रपटाची कहाणी चांगली असेलच असं नाही आणि प्रत्येक चांगल्या कहाणीचा चांगला चित्रपट बनेलच असंही नाही. 'ब्लॅक होम'ची ह्याआधीही सांगितली गेलेली कहाणी दमदार आहे. मात्र चित्रपटाचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर 'सुमार' म्हणता येईल. ह्युमन ट्रॅफिकिंग, सेक्स रॅकेट्स हे सगळं ह्यापूर्वी 'य' चित्रपटांतून आपण पाहिलेलं आहे. 'ब्लॅक होम' त्याच पठडीतला 'य + १' वा चित्रपट आहे.

रेटिंग - *


हे परीक्षण आज (१५ मार्च २०१५) मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये प्रकाशित झाले आहे :-

Friday, March 20, 2015

चलो सिडनी ! (IND vs BAN - World Cup 2015)

~ ~ चलो सिडनी ! ~ ~

विश्वचषक सुरु होण्यापूर्वी जर कुणाही संघाला हा पर्याय दिला असता की 'उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशसोबत खेळा', तर प्रत्येकानेच अगदी आनंदाने स्वीकार केला असता. ह्याचा अर्थ बांगलादेश कच्चा संघ आहे, असं नाही तर इतर संघ जास्त पक्के आहेत असा. भारताला उपांत्यपूर्व सामना बांगलादेशशी खेळायला मिळणे, हे भारताचे सौभाग्य आहे असं बरेच जण म्हणतील, खासकरून पाकिस्तानचे समर्थक. मात्र हे म्हणत असताना ते सगळे सोयीस्काररित्या हे विसरतील की हा सामना मिळवण्यासाठी भारताने त्याच्या ग्रुपमधल्या सर्व सहा संघांना चारी मुंड्या चीत केलं होतं आणि हे सहा बांगलादेशचे संघ नव्हते. ज्या दक्षिण आफ्रिकेसमोर पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेने बिनशर्त शरणागती पत्करली, त्या दक्षिण आफ्रिकेला, जो पाकिस्तानचा संघ आत्ताच्या क्षणी सगळ्यात धोकादायक म्हणवला जातो आहे, त्या पाकिस्तानलाही भारताने धूळ चारली होती. झिंबाब्वेला बुकलून काढल्यावर जबरदस्त आत्मविश्वास कमावलेल्या विंडीजलाही भारताने अस्मान दाखवलं होतं. भारताने उपांत्यपूर्व फेरीत स्वकर्तृत्वाच्या बळावर थाटात, आवेशात प्रवेश केला. केलेल्या मेहनतीचं फळ म्हणून किंवा एक काव्यात्मक न्याय म्हणून त्यांना उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेश मिळाला. हे त्यांचं नशीब नव्हे आणि असलं तरी ते त्यांनी स्वत:च्या हाताने लिहून घेतलं होतं.

बांगलादेशला नेहमीच लिंबू टिंबू म्हटलं जातं. पण ह्या लिंबाने आजवर अनेकांचे दुधाचे पेले नासवले आहेत. भारतासाठी २००७ च्या विश्वचषकाच्या आठवणी अजूनही ताज्या होत्या आणि डावाचा पहिला अर्धा भाग संपला तोपर्यंत त्या आठवणी अश्या काही त्रास द्यायला लागल्या होत्या जसा एखादाच डास कानाजवळ 'गुँss गुँss' करत असावा. पंचवीस षटकांत ९९ धावा म्हणजे रनरेट पूर्ण चारचाही नाही, धवन व कोहली तंबूत परतलेले आणि खेळपट्टीवर आंधळी कोशिंबीर खेळणारा अजिंक्य रहाणे. हे दृश्य पुन्हा पुन्हा पोर्ट ऑफ स्पेनला घेउन जात होतं. पण रोहित शर्मा योग्य वेळी कृष्ण बनला आणि वस्त्रहरण होत असलेल्या भारतीय फलंदाजीची अब्रू वाचली.

मेलबर्नच्या मैदानावर नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करणं आणि धावांची गगनचुंबी इमारत उभारून सामना स्वत:च्या नावावर लिहून घेणं, असंच गेल्या काही सामन्यांत होत आलेलं आहे. धोनीने नाणेफेक जिंकली आणि अजून एका इमारतीचा पाया धवन-रोहितने घातला. पण महत्वाच्या संसदीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्ष नेत्याने सुट्टीवर निघून जावं तसं ऐन मोक्याच्या क्षणी धवन आणि कोहली पटापट बाद झाले आणि धावांचा ओघ पाण्याची टाकी संपावी तसा मंदावला. नळाने आचके देत देत धार सोडावी, तश्या अधूनमधून एक-दोन धावा निघायला लागल्या. एरव्ही मोरपिसासारखा हळुवार खेळ दाखवणारा अजिंक्य रहाणे टूथब्रशसारखा खरवडायला लागला आणि अखेरीस लहान मुलाने खेळणं फेकावं तसा विकेट फेकून निघून गेला. त्याचं विकेट फेकणं 'ब्लेसिंग इन डिसगाईस' ठरलं. झिंबाब्वेविरुद्ध महत्वपूर्ण शतक ठोकणारा रैना रोहितच्या साथीला आला आणि बांगलादेशी खेळाडूंना काही काळासाठी दिसलेलं मधुरस्वप्न स्वप्नच राहिलं. सर्व गोलंदाजांना धावांची समसमान वाटणी करून कुणालाही तक्रारीची संधी न देता ह्या दोघांनी धावसंख्येला आकार दिला. आत्तापर्यंतच्या स्पर्धेत जवळजवळ सर्व सामन्यांत धूम केतूप्रमाणे येऊन निघून जाणाऱ्या रोहितने 'आज एकाग्रतेने खेळायचा दिवस आहे' असं ठरवलं होतं. Fortune favours the brave असं म्हणतात. त्याचे काही हवेतले, धोकादायक, ताबा नसलेले फटके मैदानावरील रिकाम्या जागा शोधून तिथे विसावले आणि एकदा तर साक्षात पंचदेवही त्याला प्रसन्न झाले. अखेरच्या षटकांत भारताला धोनीकडून जी अपेक्षा होती ती थोड्या प्रमाणात जडेजाने पूर्ण केली. पहिल्या २५ षटकांत ९९ आणि पुढच्या २५ मध्ये २०३ ही रिकव्हरी जबरदस्तच होती.

३०३ धावांच्या पाठलागाची सुरुवात बांगलादेशने खोकल्याची उबळ दाबतच केली. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या आणि आधीपासूनच बांगलादेशच्या हातात नसलेला विजय हळूहळू दृष्टिक्षेपाच्याही बाहेर गेला.
सुरुवातीला मोहम्मद शमी स्वत:च्या डुप्लिकेटसारखा वाटत होता. पहिल्या दोन षटकांत त्याने मार खालल्यावर चाणाक्ष धोनीने त्याला लगेच विश्रांती देऊन मोहितला आणलं. पण उमेश यादव मात्र स्वाभिमान डिवचल्यासारखा टिच्चून गोलंदाजी करत होता. धोक्याचा इशारा देणाऱ्या तमिम इक़्बालला त्याने तंबूत जाण्याचा इशारा दिला आणि त्याने आत जाऊन पॅड्स सोडण्याच्याही आधी त्याचा जोडीदार इम्रूल कयीससुद्धा आलाच ! बांगलादेशची गाडी ह्यानंतर पुन्हा रुळावर आलीच नाही आणि भारताची थेट सिडनीच्या दिशेने रवाना झाली.

गेल्या सहा सामन्यांत ज्या रोहित, 'यदाव' आणि जडेजाच्या खेळावर प्रश्नचिन्ह होते, त्या तिघांनीही ह्या सामन्यांत आपली कमी-अधिक प्रमाणात चुणूक दाखवली, हे विशेष. शमी आणि अश्विन ही ह्या भारतीय गोलंदाजीची संपत्ती आहे. पहिल्या दोन षटकांत स्वैर वाटलेल्या शमीने नंतरच्या स्पेल्समध्ये स्वत:ला आणि स्वत:च्या गोलंदाजी पृथ:करणाला सावरलं आणि मागील सामन्यात भरपूर चोप खाललेल्या अश्विनने बांगला फलंदाजांच्या मुसक्या आवळत पुन्हा एकदा आपली 'उंची' सिद्ध केली.




हा लेख लिहून होईपर्यंत तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्याचा निकाल जवळजवळ निश्चित झालेला आहे. बहुतेक तरी भारतासमोर उपांत्य फेरीत खडूस ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान असणार आहे. ते मोडून काढण्यासाठी भारतालाही खडूसपणा वाढवावा लागेल. कारण 'लोहा लोहे को काटता हैं'. विराट कोहलीला स्वस्तात बाद करणाऱ्या रुबेल हुसेनने त्याला जाता जाता तोंड भरून शुभेच्छा दिल्या होत्या. विराटने त्या शांतपणे ऐकून घेतल्या त्याचं कारण स्पर्धेच्या सुरुवातीलाच पत्रकाराशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल त्याला मिळालेल्या कानपिचक्या असाव्यात. पण प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन रुबेल हुसेनच काय सगळ्यांच्याच किती तरी मैल पुढे आहेत. ते नक्कीच बाचाबाचीची एकही संधी सोडणार नाहीत. तेव्हाही भारतीयांना संयम पाळून प्रत्येक टोमण्याचं उत्तर आपल्या बॅटने किंवा चेंडूनेच खडूसपणा दाखवून द्यावं लागेल.

भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्याला सिडनी क्रिकेट ग्राउंड तुडुंब भरेल, हे निश्चित. त्या जनसागरात निळ्या लाटा जास्त असतील की पिवळ्या लाटा जास्त असतील ? कुठल्याही रंगाच्या लाटा असोत, विजयाचा झेंडा तिरंगीच असायला हवा !

- रणजित पराडकर


ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Tuesday, March 17, 2015

खडतर प्रवास सुरु (IND vs ZIM - World Cup 2015)

साखळी फेरीतील शेवटचा झिंबाब्वेविरुद्धचा सामना म्हणजे मॉकटेलच्या ग्लासाच्या कडेवर लावलेल्या लिंबू/ संत्र/ मोसंबीच्या चकतीसारखा निरर्थक होता. कुठल्याही निकालाने कुणालाही कसलाही फरक पडणार नव्हता. पण खादाड आणि महाकंजूष धोनीला ती चकतीसुद्धा चोखून खायची होती. त्यामुळे त्याने संघात कुठलाही बदल केला नाही. आत्तापर्यंत बेंचवर बसून राहिलेल्या भुवनेश्वर, बिन्नी आणि अक्षर पटेलच्या जागा 'थ्री इडीयट्स'च्या पोस्टरवरच्या आमिर, माधवन आणि शर्मनच्या जागांसारख्या झाल्या असल्यास नवल वाटू नये.


पण ह्या सामन्याला एक वेगळं महत्व होतं. एक वेगळी ओळख होती. हा सामना झिंबाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा शेवटचा सामना होता. ब्रेंडन टेलर. झिंबाब्वे क्रिकेटच्या मोडकळीस आलेल्या घराच्या ओसरीत, अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री निर्धाराने एकटाच तेवणारा एक कंदील. ह्या कंदीलाचा भोग असा की त्याला स्वत:ची वात बदलणे, तेल घालणे, काजळी पुसणे इ. कामंही स्वत:च करावी लागत होती. अखेरीस त्याने प्रकाशदानाचं पुण्यकर्म सोडून इंग्लंड नामक रईसजाद्याच्या दिवाणखान्यात शोभेची वस्तू म्हणून लटकण्याचं स्वीकारलं. ही एक शोकांतिका आहे. एका खेळाडूला वयाच्या केवळ २९ व्या वर्षी स्वत:च्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी स्वत:च्या देशाला सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होऊन तिथून खेळण्याच्या अप्रिय निर्णय घ्यायला लागणे, ही त्या खेळाच्या भविष्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं करणारी परिस्थिती आहे. झिंबाब्वे क्रिकेटची वाटचाल हलाखीकडून डबघाईकडे चालली आहे.

टेलरच्या ह्या भावनिक निर्णयाचा प्रभाव ह्या सामन्यावर होता आणि त्या एकाच कारणामुळे ह्या अन्यथा बिनमहत्वाच्या सामन्याला एक वेगळा आयाम मिळाला. नेहमीचा कर्णधार एल्टन चिगुम्बुरा दुखापतग्रस्त असल्याने गेले काही सामने टेलरच झिंबाब्वेचा प्रभारी कर्णधार होता. नाणेफेक भारताने जिंकली आणि धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन ह्या सामन्यात धावांच्या पाठलागाचा सराव करण्याचा आपला हेतू स्पष्ट केला. प्रथम फलंदाजी करण्याच्या संधीचं टेलरने सोनं केलं. नेहमीच आपल्या देशासाठी व संघासाठी जीव तोडून खेळलेल्या टेलरने आपल्या ह्या अखेरच्या सामन्यात एक तडाखेबंद शतक झळकावलं. अकराव्या षटकात ३ गडी बाद ३३ अश्या कठीण परिस्थितीतून त्याने विल्यम्स आणि अर्विनच्या साथीने संघाला अश्या स्थितीत नेलं की ३१०-३२० पर्यंतही मजल मारता आली असती. ब्रेंडन टेलर मैदानात उतरला तेव्हा त्याला समोर 'खेळपट्टी' नावाचं क्रिकेट इतिहासाचं एक पान दिसलं. त्याने तेव्हाच ठरवलं की आज माझ्या ह्या अखेरच्या सामन्यात मी ह्या पानावर माझ्या बॅटने इतिहास लिहिणार आणि त्याने लिहिला. त्याने निश्चयपूर्वक शतक झळकावलं. पण शतकासाठी खेळला नाही, तर गोगलगायीच्या गतीने हलणाऱ्या धावफलकाला हरणाची गतीही दिली. उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या अश्विन आणि शमीवर त्याने हल्ला चढवला. जडेजा तर सध्या अशी गोलंदाजी करतो आहे की स्वत: जडेजाही त्याला ठोकून काढू शकतो. तोही टेलरच्या तडाख्यातून वाचणार नव्हताच. अश्विनसाठी ही त्याच्या आजवरच्या कारकीर्दीतील सगळ्यात महागडी दहा षटकं होती. मात्र ह्या स्पर्धेत ऐन मोक्याच्या क्षणी झिंबाब्वेच्या खेळाडूंनी चुका केल्या आहेत. ह्या वेळीही टेलर बाद झाल्यावर सगळा डोलारा कोसळला आणि डाव २८७ वर आटोपला.



२३ व्या षटकापर्यंत भारताची अवस्थाही बिकटच होती. पण ४ गडी बाद ९२ वर धोनी रैनाच्या साथीला आला आणि त्या नंतर भारतीय पॅव्हेलियनचे दरवाजे थेट सामना संपल्यावर विजयश्रीसाठीच उघडले. धोनीच्या थंड डोक्याचा कुणी तरी विशेष अभ्यास करायला हवा. ज्या शांतपणे तो 'एका निरर्थक सामन्यासाठीही मी संघात बदल करणार नाही' ही ताठर भूमिका निभावतो, त्याच धीरोदात्तपणे आव्हानाच्या महासागराला 'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला' असं कोलंबसाच्या आत्मविश्वासाने सुनावू शकतो. रैनाने शतक केले आणि सामनावीरही ठरला पण माझ्या मते हा सामना दोन कर्णधारांनी गाजवला होता. टेलर आणि धोनी. दोघांनी कर्णधाराच्या खेळी केल्या.

विजय मिळाला. साखळीत निर्भेळ यशही संपादन केलं. सहाच्या सहा सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांना सर्वबाद केलं. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळं काही आलबेल आहे. चिंतेचं एक कारण आहे रवींद्र जडेजा. सहापैकी सहा सामन्यांत जडेजाने नियमितपणे सामान्य गोलंदाजी केली आहे आणि फलंदाजीतही विशेष चमक दाखवलेली नाही. क्षेत्ररक्षणातसुद्धा त्याने मैदानावर काही शिंपण केलंच आहे. तो कुठे कमी पडतोय, हे सांगायला संघासोबत बरेच जाणकार आहेत. ते नक्कीच त्याला उपदेश देत असतील. प्रश्न हा आहे की त्याची अंमलबजावणी होतेय, काही तरी बदल होतोय असं का दिसत नाही ? किमान यादवप्रमाणे त्याने नावात एक 'A' तरी वाढवून पाहावा. त्याने 'यदाव' केलंय, ह्याने 'जाडेज' करून पाहावं ! कदाचित त्यालाही आंदण म्हणून काही विकेट्स मिळतील ! कारण यादवच्या नावाच्या स्पेलिंगमधल्या बदलाशिवाय त्याच्यात इतर काही बदल झालेला मला तरी जाणवत नाही.

दुसरी चिंतेची बाब भारताकडून पहिला चेंडू खेळते आहे. रोहित शर्मा. त्याने बहुतेक स्वत:च्या मनाशी ठरवलेलं असावं की, 'मी जेव्हा इतिहासजमा होईन, तेव्हा 'स्वत:च्या गुणवत्तेशी न्याय न केलेला खेळाडू' म्हणूनच होईन.' त्याच्या नावावर असलेली वनडेतली दोन द्विशतकं सध्या तरी त्याच्या डोक्यावर दोन शिंगांप्रमाणे भासत आहेत. १३३ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यावरही त्याच्यातला बेदरकारपणा, निष्काळजीपणा कमी होत नाहीये. त्याला क्रिकेटमधला 'बप्पी लाहिरी' बनायचंय. कित्येक वर्षं काम करून शेकड्याने चित्रपट करूनही त्याला दर्जेदार संगीतासाठी कुणी ओळखत नाही. त्याची ओळख 'डिस्को किंग' म्हणूनच आहे. रोहित शर्माकडे खूप जास्त गुणवत्ता आहे. पण त्याच्या समोर नेहमी एक 'पण' असतो. पुढील सामन्यातही संघात नक्कीच काही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे 'यदाव', जडेजा आणि रोहितला स्वत:चा खेळ उंचवावा लागेल.

उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर बांगलादेशचे आव्हान आहे. हो. आव्हानच. 'बांगलादेश' ही भारतासाठी नेहमीच नको तेव्हा सुरु होणारी डोकेदुखी आहे. हा संघ कसोटी खेळणाऱ्या इतर सर्व संघांसमोर लिंबू-टिंबू मानला जातो. त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखं कधीच काही नसतं. 'नंगे से खुदा भी डरता है' ह्या विचाराने ते बिनधास्त खेळतील. भारतासाठी मात्र प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. सगळा दबाव भारतावरच असेल. अश्या वेळी एखाद-दुसरी चूकही खूप महागात पडू शकेल.

पण ह्या संघावर मला तरी खूप विश्वास वाटतो आहे. खरं तर मला ह्या कर्णधारावर जास्त विश्वास वाटतो आहे. झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यात काही वेळा मला त्याची देहबोली जराशी complacent वाटली, ('मिरे'चा झेल घेतल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया 'ह्यात काय विशेष, यह तो होना ही था' टाईप होती.) पण फलंदाजी करताना तो पुन्हा जमिनीवर आला असावा.

उत्तम खेळाकडून सर्वोत्कृष्ट खेळाकडे भारताचा एक छोटासा पण खडतर प्रवास सुरु झाला आहे. ह्या प्रवासाला भरपूर शुभेच्छा !

- रणजित पराडकर


ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Sunday, March 15, 2015

एक भयावह प्रवास (Movie Review - NH10)

एखाद्या काल्पनिक कथेवर विश्वास न ठेवणे जर शक्य असेल तर बहुतेक वेळेस तो आपल्या अज्ञानातला आनंद असतो. कारण आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या भोवतालच्या जगाबाबतच आपल्याला पूर्ण ज्ञान नसतं तर जी सृष्टी दृष्टीआडची आहे, तिची काय कथा ? कुठल्याही रंगाचा चष्मा न लावता, डोळ्यांना झापडं न बांधता खुल्या नजेरेने जर आपण पाहिलं तर दिसून येईल की आपल्याच परिघात संस्कृतीच्या पताका म्हणून कित्येक वेळा लोकशाहीची लक्तरं टांगलेली असतात. देशाच्या राजधानीच्या शहरातल्या एका उपनगरातल्या एका सोसायटीतल्या एका फ्लॅटच्या बंद दरवाज्याआड असलेलं सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या एका पती-पत्नीला हरयाणातल्या एका अर्धविकसित गावातल्या अर्धशिक्षित लोकांच्या आयुष्यातल्या घडामोडींची माहिती असणं अनेकदा शक्य नसतंच कारण ह्याच्या उलटसुद्धा अशक्यच असतं. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्या प्रमाणे प्रत्येक संस्कृतीच्याही दोन बाजू असाव्यातच. ही दुसरी बाजू कधी अनपेक्षित आनंद देते तर कधी अकल्पित आघात.

लग्न करून बंगलोर (बंगळुरू!)हून दिल्लीला स्थायिक झालेली मीरा (अनुष्का शर्मा) आणि तिचा नवरा अर्जुन (नील भूपालन) एक समाधानी आयुष्य जगणारे पती-पत्नी. एके रात्री मीराला ऑफिसमधून तातडीने बोलावणं येतं म्हणून ती एकटीच गाडी घेऊन निघते. तिला एकटी पाहून रस्त्यात तिच्यावर अज्ञात लोक हल्ला करता, पण ती शिताफीने बचावते. ह्या मानसिक धक्क्यात असलेली मीरा आणि 'मी तिला एकटं का जाऊ दिलं' ह्या अपराधी भावनेने अस्थिर झालेला अर्जुन मीराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाण्याचं ठरवतात. दिल्लीहून हरयाणामार्गे पंजाबमधील भारतीय सीमारेषेपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १० (NH10) ने जाताना एका धाब्यावर त्यांच्यासमोर एक मुलगी व तिच्या पतीचं अपहरण होतं आणि अर्जुन त्यात हस्तक्षेप करतो. इथून पुढे, त्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मीरा-अर्जुनच्या आयुष्यात जे काही घडतं, त्यामुळे त्यांना नाण्याची दुसरी बाजू दिसते जिचा एक खोलवर आघात होतो.


हा आघात आपल्या मनावरसुद्धा होतो. वास्तवाचं इतकं भयावह नग्न चित्रण बघताना असह्यही होतं. दाखवलेली हिंसा अश्या वेळी कहाणीसाठी न्याय्य वाटते. हिंसाच नव्हे तर काही साधे-साधे संवादही हादरवतात. उदा.
- यह शहर बढ़ता बच्चा हैं, उछलेगाही !
- गुडगाँव का आखिरी मॉल जहाँ ख़तम होता हैं, वहीं पर आपकी डेमोक्रसी भी ख़तम हो जाती हैं !
- टोल माँगा तो गोली मार दी !

आपल्या 'कम्फर्ट झेन' मधून बाहेर जेव्हा एखादी कलाकृती आपल्याला नेते तेव्हा तिने आपल्यावर पूर्णपणे पकड घेतलेली असते. त्या वेळी आपण आपल्याच नकळत खूष होतो, हसतो, रडतो, दाद देतो किंवा घाबरतोही. खुर्चीत रेलून पॉपकॉर्न चघळत, पेप्सीचे फुरके मारत शांतपणे कुणी 'NH10' पाहू शकत असेल तर ते ढोंग तरी समजावं किंवा संवेदनाशून्यता.
उण्या-पुऱ्या दोन तासांचं हे नाट्य आहे. एका रात्रीत घडणारं कथानक आहे. त्यामुळे त्याला प्रचंड वेग आहे. हा वेग ह्या सगळ्या थराराला वेगळीच धार देतो.
प्रत्येक लहान-मोठ्या भूमिकेने आपापली छाप सोडली आहे. अगदी टोलनाक्यावर निर्विकारपणे 'रात्री इथे गोळीबार झाला' सांगणारा माणूस किंवा दोन लाखांच्या घड्याळाला पाहून 'इसमे लाईट नही लगती क्या ?' विचारणारा लहान मुलगासुद्धा लक्षात राहतो.

वारंवार संताप, नैराश्याचा उद्रेक होणारी 'मीरा' व्यक्तिरेखा साकारताना अनुष्का शर्माकडून अति-अभिनय होणे स्वाभाविक होते. मात्र आपल्या 'इमेज'च्या बाहेर जाऊन तिने 'मीरा' साकारली आहे. योग्य वेळी, योग्य तितका उद्रेक करण्यात ती यशस्वी ठरली आहे आणि तो तिच्याकडून करवून घेतल्याबद्दल दिग्दर्शक नवदीप सिंग अभिनंदनास पात्र आहेत. नवदीप सिंग ह्यांचा 'मनोरमा' हा पहिला चित्रपट तिकीटबारीवर विशेष चालला नव्हता, मात्र तोसुद्धा एक चांगला थरारपट होता. नील भूपालन आणि दीप्ती नवल दोघांना खूप जास्त काम नाही. मात्र एक गुणी अभिनेता आहे तर एक कसलेली अभिनेत्री. 'ज़िन्दगी ना मिलेगी दोबारा' मध्ये केवळ एका दृश्यात दीप्ती नवलने व्यक्तिरेखा साकारली होती, तर इथे शेवटच्या काही मिनिटांत कमाल दाखवली आहे. नकारात्मक भूमिकेत अनेकदा अभिनयास बराच वाव असतो, असं मला नेहमी वाटतं. कारण त्या भूमिकेस आनंद, दु:ख, विकृती, रुद्र, भीती, मृत्यू वगैरे अनेक छटा सादर करायच्या असतात. त्याच बरोबर प्रत्येक खलव्यक्तिरेखेस बहुतेकदा स्वत:ची वेगळी अशी एखादी लकबही असतेच. पण इथला खलनायक सतबीर मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच मूडमध्ये आहे. भावनांचे असे वेगवेगळे रंग उधळायला ह्या व्यक्तिरेखेत खरं तर वावच नाही, तरी 'दर्शन कुमार' ('मेरी कोम' मधला नवरा) ने सतबीर असा उभा केला आहे की जणू तो आपल्या समोरच उभा ठाकला असावा. चित्रपट संपल्यावर मीरा आणि सतबीर प्रत्येकाच्या लक्षात राहतात, हे निश्चित.

हिंदीत उत्तम थरारपट म्हणजे योग्य वेळी होणाऱ्या पावसासारखा दुर्लभ योग झाला आहे. त्यामुळे 'NH10' हा 'पाहायलाच हवा' असा चित्रपट नक्कीच आहे !

रेटिंग - * * * *

हे परीक्षण आज (१५ मार्च २०१५) मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये प्रकाशित झाले आहे :-


Wednesday, March 11, 2015

क्लिनिकल ! (India vs Ireland - World Cup 2015)

सदतिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोहलीने केव्हिन ओ'ब्रायनचा चेंडू सीमापार टोलवला आणि आयर्लंडविरुद्धचा सामना भारताने जिंकला. हा जो विजयी फटका होता, तो फटका संपूर्ण सामन्याचं सार सांगत होता. त्या षटकातील सगळे चेंडू ओ'ब्रायन ऑफ स्टंपबाहेर टाकले. फक्त सहा धावा विजयासाठी हव्या होत्या, पण ह्या सहा धावा सहजासहजी द्यायच्या नव्हत्या म्हणून. पण कोहलीने काय केलं ? त्याने गोलंदाजाचा प्लान ओळखला आणि आधीच पुढे येण्याच्या पवित्रा घेऊन योग्य वेळी ऑफ स्टंपच्या बाहेर आला आणि त्या बाहेरील चेंडूपर्यंत पोहोचून त्याच्या कानाखाली एक असा आवाज काढला की लहान मुलाने भोकाड पसरावं तसा तो चेंडू थयथयाट करत सीमापार पळून गेला ! ओ'ब्रायनच नव्हे तर एकूणच आयरिश गोलंदाजी मर्यादित क्षमतेचीच आहे. त्यांनी २६० धावांच्या किरकोळ लक्ष्याला त्यांच्या मानाने कठीण करायचा प्रयत्न केला, पण भारतीय फलंदाज हर तऱ्हेने त्यांना वरचढच होते.

खरं तर जेव्हा २५९ धावांवर आयर्लंडचा डाव संपुष्टात आला, तेव्हाच सामना भारताच्या खिश्यात जमा झाला होता. कारण हॅमिल्टनच्या मैदानाच्या सीमारेषा इतक्या लहान आहेत की अटलबिहारी वाजपेयींच्या दोन शब्दांमधील विरामाच्या वेळेत ख्रिस गेलसुद्धा मैदानाची एक फेरी धावून येऊ शकेल. ह्या मैदानात चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये टायमिंगने मारला की मग फक्त सीमारेषेपर्यंत जाऊन तो परत घेऊन येण्याचं औपचारिक कामच क्षेत्ररक्षकाकडे राहातं.

ह्या नाकपुडीएव्हढ्या सीमारेषांचा फायदा घेत पोर्टरफिल्ड आणि स्टर्लिंगने आयर्लंडला दमदार सुरुवात करून दिली. पण इथेच धोनीतला धूर्त कर्णधार दिसला. त्याने पाहिलं की मध्यमगती, जलदगतीला ही खेळपट्टी साथ देत नसून उलट चेंडूच्या गतीचा फायदा फलंदाजालाच होणार आहे. त्या खेळपट्टीत खरं तर कुठल्याच गोलंदाजासाठी काहीच नव्हतं. लहान मैदानात, साथ न देणाऱ्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजाला चांगलाच मार बसू शकतो. मात्र डॉक्टरकडे काम करणारा कंपाउंडर किंवा नर्ससुद्धा कसे 'तयार' होतात, तसे इंग्लंडच्या शेजारी राहून तेज गोलंदाजी खेळण्यासाठी तयार झालेले आयरिश फलंदाज चांगल्या फिरकी गोलंदाजीशी तितकेच परिचित होते जितके धवन-जडेजा चांगल्या जलदगती गोलंदाजीशी असतील.
गेल्या काही सामान्यांपासून अश्विनला एक अत्यंत महत्वाची उपरती झालेली जाणवते आहे. चेंडूची गती कमी ठेवण्याची. कमी गतीमुळे चेंडूला उंचीही (फ्लाईट) दिली जात आहे आणि म्हणून त्याला खेळताना फलंदाजांना त्रास होतो आहे. ह्या फिरकीच्या जाळ्यात स्टर्लिंग काजूचं पिकलेलं फळ जसं आपोआप जमिनीवर पडतं तसा पडला आणि अडकला.
ह्या नंतर रैना, अश्विनने आयर्लंडच्या गाडीच्या चाकांमधली हवाच काढून घेतली आणि मग ही गाडी पळाली नाहीच, तर आयरिशांना तिला धक्का देऊन २५९ मैलांच्या दगडाजवळ ४९ व्या षटकाच्या वळणावर उभी करावी लागली.
तरीही मला नाईल ओ'ब्रायनबद्दल फार आदर वाटला. अश्विन-रैनाने त्याला सुरुवातीला असा काही बांधून ठेवला होता की एखाद्याने बेचैन होऊन उतावीळ फटका मारला असता. पण पठ्ठा पहिल्या वीसेक चेंडूंत १-२ धावांवर अडकलेला असतानाही पिचला नाही. तो बाद झाला तेव्हा त्याच्या खात्यावर जमा होत्या चेंडूला धाव ह्या गतीने ७५ धावा. ह्याला म्हणतात 'पेसिंग द इनिंग्स' ! एका नवख्या संघाच्या खेळाडूकडून अशी परिपक्वता दिसते आणि दुसरीकडे इंग्लंडसारखे पुरातन कालापासून खेळणारे लोक वारंवार कच खातात हे पाहून आश्चर्य वाटलं.
फिरकीकडून काही काळ विकेट मिळत नसताना धोनीने मोहित शर्माकडे चेंडू सोपवला. ही त्याची खेळी तर माझ्या मते 'मास्टरस्ट्रोक' होता. मोहितकडे अतिशय सुंदर असा स्लोअर वन आहे. जो इतर कुणाकडेच नाही. तो खूप चतुरपणे चेंडूची गती कमी-जास्त करत असतो. फिरकीसमोर गुदमरलेल्या आयरिश फलंदाजांना समोर मध्यमगती गोलंदाज दिसल्यावर ते स्वाभाविकपणे प्रफुल्लीत होऊन हल्ला चढवणार आणि म्हणूनच इथे मोहितचं गती-परिवर्तन कामाला येईल, हे धोनीने जाणलं. सेट झालेला पोर्टरफिल्ड फसला आणि डाव सावरता सावरता गडगडला.

२६० धावांचं लक्ष्य, सामान्य गोलंदाजी, छोटं मैदान, विमानाच्या रनवेसारखी खेळपट्टी. धवन-रोहितला डोळ्यांसमोर शतकं दिसत असावीत. धवनने ते गाठलं, तर रोहितने शेखचिल्लीपणा करून स्वत:ची फांदी स्वत:च तोडली. श्रीखंडाचं पातेलं चाटून पुसून स्वच्छ करावं, तसं कोहली-रहाणेने उर्वरित सोपस्कार मोठ्या आनंदाने पूर्ण केले आणि सरतेशेवटी कोहलीने तो फटका मारला ज्यात संपूर्ण सामन्याचं सार होतं.


एखाद्या अत्यंत अनुभवी शल्यविशारदाने ज्या कुशलतेने छोटीशी शस्त्रक्रिया करावी त्या सहजपणे भारताने हा सामना जिंकला. आयर्लंड हा एक धोकादायक संघ आहे. वेस्ट इंडीज आणि इंग्लंडला ह्याची पुरेपूर प्रचीती आलेली आहे. परंतु, भारताने कुठल्याही क्षणी संतुलन ढळू दिलं नाही आणि नियोजनबद्ध खेळ केला.
खटकली ती एकच गोष्ट. भुवनेश्वर कुमारला बाहेर बसवून उमेश यादवला खेळवावं, असं का वाटावं ? चार सामन्यांपैकी अमिरातीविरुद्धचा सामना वगळल्यास यादवने इतर सामन्यांत असामान्य अशी काही गोलंदाजी केली आहे, असं मला वाटत नाही. ४९ षटकांपैकी फक्त ४ च षटकं जर तो टाकणार असेल, तर त्याचा गोलंदाज म्हणून उपयोग काय आणि जर त्याला ४ पेक्षा जास्त षटकं देण्याइतका विश्वास कर्णधाराला वाटत नसेल, तर तो संघात का आहे ? पुढील सामन्यातच नव्हे तर त्यापुढेही मला त्याच्या जागी भुवनेश्वरला पाहायला आवडेल. निश्चितच तो त्याची दहा षटकं तरी पूर्ण टाकेलच.

- रणजित पराडकर

ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Saturday, March 07, 2015

फिंगर्स क्रॉस्ड ! (India vs West Indies - World Cup 2015)

'वाका'वरील कालच्या सामन्याची नाणेफेक धोनी हरला आणि विंडीजचा कोवळा कर्णधार जेसन होल्डर मनातल्या मनात सुखावला कारण त्याला पहिली फलंदाजी करता येणार होती. ('विंडीजचा कोवळा कर्णधार' हे कदाचित उकळती बियर किंवा 'समाधानी नारायण राणे' सारखं असंबद्ध वाटू शकेल. पण मला खरोखर तो कोवळाच वाटतो. फक्त २३ वर्षे वय. केवळ ३० सामन्यांचा अनुभव. त्याच्या चेहऱ्यात एक प्रकारचा निरागस भाव दिसतो. त्यामुळे त्याच्यावर गेल, सॅम्युअल्स, स्मिथसारख्या धटिंगणांची जबाबदारी असणं म्हणजे अजूनही तीन आणि सहा लिहिताना गोंधळणाऱ्या लहानग्या बालकाला सत्तावीसचा पाढा विचारल्यासारखं वाटतं. असो.) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळणं म्हणजे ख्रिस गेल नामक घोड्याच्या डोळ्यांवरची झापडं काढून त्याला मोकळं सोडता येण्याची संधी मिळणं.

ख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ ही दोन अतिज्वलनशील व विस्फोटक रसायनं खेळपट्टीवर आली. मात्र पर्थच्या ह्या खेळपट्टीने तिचा रंग पहिल्या षटकापासूनच दाखवायला सुरुवात केला. त्या रंगात कुठलंही रसायन स्वत:चा रंग दाखवू शकणार नव्हतंच ! खरं तर शमीच्या तिसऱ्याच चेंडूवर स्मिथने जेव्हा प्रहार केला होता, तेव्हा काही वेगळंच वाटलं होतं. पण डुलकी लागून मान एका बाजूला पडल्यावर खाडकन जाग येते तशी खेळपट्टी पुढच्याच चेंडूंवर जागी झाली आणि त्यानंतर चेंडू टप्प्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने असा झेपावत होता जसा सूर्याला पाहून बालहनुमान झेपावला असावा. शमी-यादवने पहिली काही षटकं फलंदाजांची सत्वपरीक्षाच पाहिली. त्यात स्मिथ उत्तीर्ण झाला नाहीच. शमीच्या त्या चेंडूवर त्याची बॅट खाली येईपर्यंत चेंडू स्वत:च त्याच्या बॅटला स्पर्श करून धोनीच्या हाती विसावला. इथून सुरु झालेली पडझड थांबूच शकली नाही. एकानंतर एक फलंदाज बाद होत जाताना मला मात्र 'आज पुन्हा एक एकतर्फी सामना पाहावा लागणार' अशी हुरहूर लागली होती. विंडीजच्या फलंदाजीची बेजबाबदार फटके, सुमार रनिंग बिटवीन द विकेट्स, तंत्राचा सपशेल अभाव अशी सगळी अशोभनीय अंगं काल व्यवस्थितपणे दाखवली गेली. अखेरच्या टप्प्यात 'कोवळा कर्णधार' मदतीस धावून आला म्हणून जरा तरी सन्मानजनक धावसंख्या नोंदवता आली.

ज्या खेळपट्टीवर शमी-यादव-मोहितने फलंदाजांना नाचवलं, तिथे विंडीजची गोलंदाजी काही सोपी जाणार नव्हतीच. जेरोम टेलर, आंद्रे रसेल, केमार रोच ह्यांचे खांदे आणि शमी, यादव, मोहितचे खांदे ह्यांच्यात वडाच्या झाडाचा बुंधा आणि अशोकाच्या झाडाचा बुंधा ह्यांच्याइतका फरक आहे. तर, ऑफ स्टंप बाहेरील जलदगती, उसळती गोलंदाजी आणि धवन-रोहितच्या बॅट्स ह्यांच्यात चुंबकीय आकर्षण आहे. कोहली जसा परवा पत्रकाराला ओळखताना चुकला तसाच हूकसाठी चेंडू निवडताना फसला. रहाणेच्या विकेटने हॉकआय प्रणालीच्या मर्यादा विंडीजच्या फलंदाजीप्रमाणे उघड्या पडल्या. रैना समोर आला की निर्जीव चेंडूसुद्धा स्वत:च आखूड टप्पा घेत असावा, त्याची ही उणीव इतकी सुस्पष्ट झाली आहे. जडेजाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की त्याच्या कुवतीपेक्षा मोठे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. १३४ वर ६ गडी बाद झाल्यावर फॉर्मात नसलेल्या धोनीवर सर्व मदार होती आणि त्याने संघाची डूबती नैया पार केली.


१८३ धावांचं लक्ष्य माफक होतं, पण डावाच्या पहिल्या अर्ध्या भागात विंडीज गोलंदाजांनी त्या धावसंख्येत अजून १०० धावा जोडलेल्या असाव्यात असं भासवलं. पण नंतर मात्र स्वैरपणा वाढत गेला.
भारताने अकरा षटकं राखून लक्ष्य साध्य केलं, तेव्हा निश्चितच विंडीजच्या खेळाडूंना वाटलं असेल की आपण ४५ षटकांत गाशा न गुंडाळता पूर्ण पन्नास षटकं खेळून काढली असती, तर....?? तर कदाचित पाकिस्तानसाठी पुढील फेरीचा रस्ता अधिक जास्त कठीण असता आणि स्वत: विंडीजसाठी थोडासा सोपा.

ह्या विजयामुळे भारताचा मात्र पुढील फेरीतील प्रवेश निश्चित झाला. पण त्याचबरोबरच चांगल्या गोलंदाजीसमोर मोठे लक्ष्य गाठण्यासाठी खेळताना ही फलंदाजी ढेपाळू शकते, हेही समजून आलं. इथून पुढच्या सामन्यांसाठी एकच शुभेच्छा - 'पहिली फलंदाजी मिळो आणि तसे न झाल्यास २०० च्या आतले लक्ष्य असो !'
कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड !

- रणजित पराडकर


ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Friday, March 06, 2015

आपला तोच बाब्या !

२४ फेब्रुवारी २०१०.
ग्वाल्हेरला सचिन तेंडूलकरने अजून एक इतिहासाचं पान स्वत:च्या नावाने लिहून घेतलं. वनडेमधलं पहिलं द्विशतक झळकावून. त्यानंतर बरोब्बर त्याच दिवशी पाच वर्षांनंतर ख्रिस गेलने इतिहासाचं एक पान स्वत:च्या नावाने लिहून घेतलं. वनडेत द्विशतक झळकावणारा पहिला अ-भारतीय खेळाडू बनून आणि वर्ल्डकपमधील सगळ्यात मोठी वैयक्तिक धावसंख्या नोंदवून. गेली दोन वर्षं निद्रिस्त असलेला ज्वालामुखी कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर उफाळला आणि झिम्बाब्वेचा प्रत्येक गोलंदाज त्या लाव्ह्यात होरपळला. गेलच्या साथीने मार्लन सॅम्युअल्सने शतक झळकावलं. पण त्या १३३ धावांसाठी त्याने १५६ चेंडू घेतले. ह्या जास्तीच्या २३ चेंडूंपैकी जर अर्ध्या चेंडूंवरही त्याने एक धाव घेऊन गेलला स्ट्राईक दिला असता तर त्याने कदाचित पावणे तीनशे धावाही कुटल्या असत्या. एका फलंदाजाने द्विशतक करूनही संघाची धावसंख्या चारशेपर्यंत पोहोचत नाही, ही खरं तर फलंदाजीची कमजोरी मानायला हवी. पण तरी गेलला सूर गवसणे ही विश्वचषकातील इतर सर्व संघांसाठी ही एक धोक्याची घंटाच आहे. ख्रिस गेल हा असा एक खेळाडू आहे की जो संघाची धावसंख्या एकहाती उंचच उंच नेऊन ठेवू शकतो. झिम्बाब्वेनंतरच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र गेल पुन्हा फेल झाला. ह्यावर विचार करायला हवा. मला असं वाटतं की गेल हा असा खेळाडू आहे जो सुमार गोलंदाजीची बेसुमार धुलाई करतो. मात्र भेदक जलदगती किंवा शिस्तबद्ध स्विंग किंवा अचूक फिरकी गोलंदाजी मात्र गेलला बांधून ठेवते. उत्कृष्ट चेंडूवर धावा जमवण्याची हातोटी त्याच्यात कमी असल्याचं नेहमीच जाणवतं. तसंच, दबावाखाली गेलने फार क्वचित चांगला खेळ दाखवला आहे. तो नेहमीच प्रथम फलंदाजी करताना जास्त आश्वासक वाटतो. भारतीय संघाने गेल्या दोन सामन्यात ज्या शिस्तीने गोलंदाजी व क्षेत्ररक्षण केले, तेच त्यांनी आजच्या विंडीजसोबतच्या सामन्यात दाखवलं तर गेलसाठी हा सामना सोपा नसेल.

दुसरी गोष्ट. हा सामना पर्थला खेळवला जातो आहे. पर्थ म्हणजे बाउन्स आणि गती. वनडेला शोभेल म्हणून त्या खेळपट्टीला कितीही सजवलं तरी ती आपला मूळ गुणधर्म सोडणार नाहीच. त्यामुळे तेज गोलंदाज शमी-यादव आणि विंडीजचे सगळेच, ह्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी असे काही उत्सुक असतील जसा सलमान खान उघडा होण्यासाठी असतो. उसळत्या चेंडूंसमोर अमिरातीसोबतच्या सामन्यात भारतीयांची परीक्षा पाहिली गेलीच नाही. तो सामना म्हणजे पेपर फुटल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पासापुरते मार्क्स दिल्यासारखा होता. पण धवन-रोहित-विराट-अजिंक्य-रैनाची आजच्या सामन्यात नक्कीच परीक्षा पाहिली जाईल. रोहित आणि विराटने अमिरातीसमोर 'रस्ते का माल सस्ते में' पाहून धावांची काही घाऊक खरेदी केली, पण आज मात्र त्यांना बाजारभाव समजू शकेल.

विराट कोहली पुन्हा एकदा खेळाव्यतिरिक्तच्या थेरांसाठी चर्चेत आलेला आहे. अजून एका विजयाने त्याचं चित्त थाऱ्यावर येवो. त्याचं वाचन वगैरे फार काही असेल असं त्याला पाहून वाटत नाही आणि मराठीचा तर त्याला निश्चितच गंधही नसावा. त्याच्यासाठी पुलंच्या अंतू बर्व्याने एक सुंदर वाक्य रत्नांग्रीच्या त्या सुप्रसिद्ध लोकोत्तर पुरुषांच्या आळीत पेरून ठेवलं आहे. 'गोठ्यात निजणारांना बैलाच्या मुताची घाण येऊन कसं चालेल ?' जर खेळाशिवाय इतरही काही क्षेत्रांत आपलं कर्तृत्व असेल, तर बातमी तर होणारच ना ? थयथयाट करणे, तमाशा करणे हा कोहलीचा स्वभावच आहे. पण लग्न झाल्यावर जबाबदारीने वागायचं असतं, तसंच कसोटी कर्णधार झाल्यावर गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या उतावळ्या नवऱ्यासारखं वागणं शोभत नसतं.

वेस्ट इंडीजच्या संघावर भारतीय क्रिकेटप्रेमींनी नेहमीच मनसोक्त प्रेम केलं आहे. त्यांनी श्रीलंकेत ट्वेंटी२० विश्वचषक जिंकला, तेव्हा मुंबई-दिल्लीत सुद्धा जल्लोष झाला होता आणि विंडीज खेळाडूंसोबत अनेकांनी घरातल्या घरात गंगनम नृत्य केलं होतं. विश्वचषकाच्या सुरुवातीला आयर्लंडने विंडीजवर मात केली तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं. आजचा सामना कदाचित त्यांच्यासाठी 'करा किंवा मरा' असणार आहे. आजच्या सामन्यातल्या जयपराजयावर त्यांचा पुढील फेरीतील प्रवेश बराच अवलंबून असणार आहे. पण म्हणून मी त्यांना जिंकण्याच्या शुभेच्छा देऊ शकत नाही ! कारण शेजारचा मुलगा कितीही लाडका असला, तरी आपला तोच बाब्या असतो ना ! एक चांगली लढत बघायला मिळो. उत्तम दर्ज्याचं क्रिकेट खेळलं जावो. कुणाच्या हरण्याचं कुणाला दु:ख नसावं, खेळ जिंकला असल्याचा आनंद असावा, असे काही आयडीयलिस्टीक विचार मनात येत आहेत. पण ह्या सगळ्याच्या मूळाशी एकच भावना आहे ती म्हणजे अजून एका भारतीय विजयाची इच्छा !

- रणजित पराडकर 

Tuesday, March 03, 2015

कोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)

पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी बदडून काढलेली आणि दुसऱ्या सराव सामन्यात अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाचेही पूर्ण १० बळी घेता आले नाहीत, भारतीय गोलंदाजीची गेल्या काही महिन्यांतली कामगिरी पाहता, सराव सामन्यांमधली ही किमया आश्चर्यकारक नक्कीच नव्हती. हे दोन्ही सराव सामने भारतासमोर विश्वचषक स्पर्धेत पुढे काय वाढून ठेवलं आहे, ह्याची कल्पना देणारे होते. सराव सामन्यांतून कसलाही जास्तीचा आत्मविश्वास न मिळवता आणि त्याऐवजी एक जोरदार 'फॅक्ट चेक' घेऊनच साखळी फेरीतील पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आला. कुठल्याही सामान्य भारतीय क्रिकेटरसिकाप्रमाणे 'एव्हढा सामना जिंका, नंतर सगळे हरलात तरी चालेल' हीच भावना माझ्या मनात सामन्यापूर्वी होती.
पण सामना संपल्यानंतर त्या सामन्यावर लिहिण्यासाठी योजून ठेवलेले शब्द जल्लोषाच्या गदारोळात माझेच मला मिळेनासे झाले. भारतभर दिवाळी साजरी होत होती आणि फटाक्याच्या आवाजाने भेदरलेली निष्पाप गरीब पाखरं जशी 'धडाम्' झाल्याबरोबर फांद्यां-फांद्यांतून फुर्रकन् उडून जातात, तसंच काहीसं माझ्या शब्दांचं झालं होतं.

ह्या सामन्यापूर्वी विश्वचषकातील पाकविरुद्धच्या '५ - ०' ह्या विजयी सांख्यिकीला मिरवून भारतीय क्रिकेटरसिकांनी खूप गमजा मारल्या होत्या. त्यावेळी माझ्या मनात मात्र सतत राजकुमारचा 'वक़्त'मधला गाजलेला 'जिनके अपने घर शीशे के होते हैं, वोह दूसरों के घरों पे पत्थर फेंका नहीं करतें..' हा डायलॉग घुमत होता.
नाणेफेक जिंकून धोनीने साहजिकच प्रथम फलंदाजी स्वीकारली. सातफुटी मोहम्मद इरफान आणि सोहेल खानच्या पहिल्या २-२ षटकांना रोहित-धवन जोडीने सुयोग्य सन्मान दिला. ह्या सावध सुरूवातीनंतर दोघांनीही काही आश्वासक फटके मारले आणि गुदगुल्यांची जाणीव होत असतानाच रोहित शर्मामधला 'रोहित शर्मा' जागा झाला आणि तो क्षणभर विसरला की ही खेळपट्टी भारतातली नसून ऑस्ट्रेलियातली आहे. पुरेसा अंदाज न घेता, योग्य दिशेने पाय न हलवता त्याने मारलेला मरतुकडा पुल मिड-ऑनला मिसबाहच्या हातात जाऊन विसावला. खाटकासमोर बकऱ्याने स्वत:च मान ठेवावी आणि खाटकाला तेव्हाच झोप अनावर व्हावी, तसं काहीसं चित्र ह्यानंतर पाहायला मिळालं.
ढिल्या पडलेल्या पाक गोलंदाजीसमोर कोहली, रैना आणि धवनने भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेलं. कोहलीची ही शतकी खेळी त्याच्या व भारतीय क्रिकेटरसिकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहील. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ह्यापेक्षा अनेक नेत्रदीपक शतकं झळकावली आहेत. त्या मानाने ही खेळी तशी सामान्यच. पण विश्वचषकात पाकिस्तानसमोर भारताकडून पहिलं शतक त्याने केलं आणि जो संघ सामना सुरु होण्यापूर्वीपासूनच निकालाच्या अनिश्चित सावटाखाली वाटत होता, त्याला सुस्थितीत नेण्यात एक महत्वाची भूमिका बजावणं, त्याने करून दाखवलं. रैनाने साकारलेली खेळी तितकीच महत्वाची होती. त्याच्या समायोचित फटकेबाजीने धावसंख्येला एक आकार दिला. कदाचित तो आकार बराच विशाल होऊ शकला असता पण अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी धडाधडा कोसळली आणि किमान ३०-३५ धावा कमी झाल्या. बरोब्बर ३०० वर धावसंख्या पोहोचली.
इथून पुढचा सामना कमकुवत फलंदाजी विरुद्ध कमकुवत गोलंदाजीचा होता. ही दोन गरीबींमधली भाग्यवान तुलना होती. त्यात गोलंदाजी कमी गरीब ठरली. सलामीला युनुस खान येणं पाहुन मला ९० च्या दशकात ऋषी कपूरने हीरोच्या भूमिकेत काम केल्याची आठवण झाली. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या गरीबीची ही परिसीमा असावी. ही फलंदाजीची फळी युनुस आणि मिसबाह ह्यांच्या अनुभवावरच अवलंबून आहे. त्यातील एक नको तितक्या लौकर आल्याने वाया गेला आणि दुसरा नेहमीच नको तितक्या उशीरा येऊन वाया जात असतो. शहजाद व हॅरिस सोहेलच्या भागीदारीने काही काळ आशा दाखवली होती, पण दोघांनाही अननुभव नडला आणि पुन्हा एकदा मिसबाहच्या डोक्यावर असा भार आला की जो पेलणे अशक्यच होते. आफ्रिदीची धडपड आणि विझणाऱ्या वातीची फडफड सारखीच. तो येईपर्यंत पाकिस्तानचा पराभव जवळजवळ अटळ झालाच होता.
उमेश यादवने पहिल्या स्पेलमध्ये जितकी वाईट गोलंदाजी केली, तितकीच वाईट गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्येही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण त्याला नशीबाने साथ दिली नाही आणि दोन विकेट्स त्याच्या गळ्यात पडल्याच !
दबावाखाली पाकने असंख्य चुका केल्या आणि त्या चुकांमुळे भारताच्या बऱ्याच चुका झाकल्या गेल्या. चुकांच्या तुलनांचं पारडं पाककडे झुकलं आणि त्यांना त्याची किंमत पराभवाने मोजायला लागली. पाकसोबतचा हा विजय गुदगुल्या करणारा होता, पण त्याच वेळी लगेच पुढचा सामना समोर दिसायला लागला.
पाकनंतर गाठ होती दक्षिण आफ्रिकेशी. तिथे गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हींत काही दैत्य फुरफुरणारे बाहू घेउन बसले होते. स्टेन-मॉर्कल-फिलेंडरचा तेज तर्रार मारा, डीव्हिलियर्स-आमला-मिलर-डी कॉक ची भक्कम फलंदाजी आणि ११ चित्त्यांचं चौफेर क्षेत्ररक्षण ह्यासमोर ताठ उभं राहण्यासाठी सैरभैर पाकिस्तानवर मिळवलेला विजय कितपत आत्मविश्वास देणार, हे पाहायचं होतं.

पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजी घेतली.
अपेक्षेप्रमाणे स्टेनच्या पहिल्या षटकात चेंडू बंदुकीच्या गोळीसारखा वाटला. रोहित-धवन बऱ्यापैकी शांतपणे खेळत आहेत असं वाटत असतानाच डीव्हिलियर्सच्या अंगात अर्जुन शिरला आणि त्याने मिड ऑनवरून थेट फेक करून रोहितला माघारी पाठवलं. एका झटक्यात भारतीयांना जाणीव झाली की आपण पाकसोबत खेळत नसून आफ्रिकेशी दोन हात करतो आहोत. पण धवन बहुतेक सचिनकडून आशीर्वाद घेउनच उतरला होता. कारण कधी नाही इतका आश्वासक वाटत होता. खेळायला येतानाच तो शतकाचा पोस्ट डेटेड चेक खिश्यात घेउन आला होता, जो त्याने पस्तिसाव्या षटकात एनकॅश केला. तोपर्यंत कोहली त्याचा शतकी चेक जसाच्या तसा परत घेउन गेला होता. रहाणेच्या नेत्रदीपक फटकेबाजीने मात्र खर्या अर्थाने पर्वणी दिली. तोडफोड, चिरफाड करणाऱ्या फटकेबाज फलंदाजांचं एक बेसुमार पीक सगळीकडे आलं आहे. त्यात एखादाच रहाणेसारखा असतो की ज्याचे चौकार, षटकार पोटात गोळा आणणारे नसतात तर मोरपीस फिरवल्यासारखे असतात. रहाणे खेळतो तेव्हा सभोवताली वसंत असतो. हा वसंत २२ तारखेला पूर्ण बहरला होता आणि आफ्रिकेचे गोलंदाज मोरपिसाच्या हळुवार स्पर्शात हरवून राहिले असताना त्याने धावफलकावर हिरवळ फुलवली.
परंपरा अबाधित राखत अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी ढेपाळली आणि ३०८ धावांचं लक्ष्य त्यांनी आफ्रिकेला दिलं. आमला, डी कॉक, ड्यू प्लेसीस, डी व्हिलियर्स, ड्युमिनी, मिलर ह्या फलंदाजीसाठी खरं तर कुठलंच लक्ष्य अवघड नाही. पण कधी नव्हे इतक्या अचूक भारतीय गोलंदाजीने व चपळ क्षेत्ररक्षणाने धावा क्रूड तेलापेक्षा महाग केल्या. ह्या सामन्याने सट्टेबाजांचे अंदाज पूर्णपणे चुकवले असावेत. तब्बल १३० धावांनी भारत आफ्रिकेला धूळ चारेल, हे भाकीत जर सामन्यापूर्वी कुणी वर्तवलं असतं तर स्वत: भारतीय खेळाडूंनीही त्याला वेड्यात काढलं असतं. पण असंच झालं आणि केवळ १७७ धावांत आफ्रिकेचा संपूर्ण संघ तंबूत खाली माना घालून परतला.

दोन तगड्या संघांना अगदी एकतर्फी हरवल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीशी 'गाठ होती' असं म्हणणं खरं तर अतिशयोक्ती वाटावी. हा सामना डावखुऱ्यांनी उजव्या हाताने आणि उजव्या हाताच्यांनी डावखुरं खेळूनही जिंकू, असा फाजील आत्मविश्वास घेउन भारत ह्या सामन्यात येतो की काय, अशी भीती वाटत होती. सुदैवाने भारताला धोनीच्या रुपात असा कर्णधार लाभला आहे की ज्याच्या पायात सिमेंटचे बूट असावेत आणि डोक्यात चलाख मेंदूसोबत थोडासा बर्फही. (पायात सिमेंटचे बूट नक्कीच असावेत, हे त्याची फलंदाजीही सांगतेच !)
नाणेफेक अमिरातीचा कर्णधार मोहम्मद तौकीरने जिंकली आणि संपूर्ण दिवसात तेव्हढी एकच घटना अमिरातीसाठी सकारात्मक ठरली. दुसऱ्याच षटकात डावाला जे खिंडार पडलं, ते शेवटपर्यंत बुजलंच नाही आणि प्रत्येक येणारा नवीन फलंदाज आधीच बुजलेला वाटत होता. उमेश यादवकडे भन्नाट वेग आहे, ह्याची जाणीव प्रथमच कुणा फलंदाजांना झाली होती आणि आपण चेंडूला उंचीही देऊ शकतो ह्याची जाणीव अनेक दिवसानंतर अश्विनला झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन सन्मानजनक धावसंख्या उभारून भारतीय फलंदाजांवर दबाव टाकून आपण लिंबू-टिंबू नाही आहोत असं छातीठोकपणे सांगायचं अरबी स्वप्न यादव-अश्विनने धुळीस मिळवलं. स्पर्धेत प्रथमच एक नवखा संघ, एका नवख्या संघासारखा खेळला आणि १०२ धावांत गाशा गुंडाळून शहाण्यासारखा लगेच गोलंदाजीसाठी उतरला. हे लक्ष्य जर भारताला कठीण गेलं असतं, तर ती फलंदाजी कसली !

एकूणात पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघाने केवळ क्रिकेटरसिक, पंडित व समीक्षकांनाच नव्हे तर स्वत:लाही चकित केलं असावं. स्पर्धेपूर्वी धडपडत वाटचाल करणारा हा संघ स्पर्धेत दाखल होताच अचानक राजहंसाच्या डौलात चालायला लागला आहे. वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्याप्रमाणे स्वैर, सैरभैर वाटणारी गोलंदाजी अचानक स्वत:च हवा बनून फलंदाजीच्या फळ्या पाचोळ्यासारख्या विखरू लागली आहे. लेझीम किंवा आंधळी कोशिंबीर खेळणारे फलंदाज अचानक 'दीवार' मधल्या अमिताभसारखे ताडताड् पावलं टाकायला लागले आहेत. सगळंच कसं स्वप्नवत वाटतंय ! १९८३ चा असो की २०११ चा चषक जिंकणारा भारतीय संघ असो, दोन्ही संघ साखळी फेरीत जरासे धडपडतच होते. 'लांबी रेस का घोडा शुरू में पीछे पीछे दौडता है..' हे इफ़्तिक़ारच्या 'डावर'ने म्हटलेलं जर इथे लागू केलं, तर मनात शंकेची पाल चुकचुकते आहे की have they really picked up at the right time की जरा लौकरच आहे ?
येणारे सामने काय ते ठरवतीलच. एक मात्र निश्चित हाच आत्मविश्वास व हीच कामगिरी कायम ठेवली तर ह्या वर्षी भारतात दोनदा दिवाळी साजरी होईल एक मार्चच्या शेवटी आणि दुसरी नोव्हेंबरमध्ये ! तोपर्यंत 'कोई ताज़ा हवा चली हैं अभी' असं म्हणून ह्या आनंददायी हवापालटाचा मज़ा घेऊ !

- रणजित पराडकर



ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Monday, March 02, 2015

अब तक..... पहिलाच ! (Movie Review - Ab Tak Chhappan 2)

एखादा पदार्थ खूप आवडला की आपण हौशीने तो पुन्हा ताटात वाढून घेतो किंवा कुणी तरी आग्रह करुन वाढतं. काही वेळेस ही हौस किंवा आग्रह सहज फिटतो किंवा पचतो, तर काही वेळेस तो पचण्यापेक्षा 'पचवला' जातो आणि काही वेळेस तर तेही झेपतच नाही.
हिंदी चित्रपटात रिमेक व सीक्वेलचे प्रयत्न मला असेच हौसाग्रहास्तव वाटतात. ते कधी झेपतात कधी नाही.
'अब तक छप्पन्न - २' वरीलपैकी दुस-या प्रकारातला. जरा जबरदस्तीनेच गळी उरवलेला आणि पचवलेला वाटला.

सिस्टमने केलेल्या अन्यायाला कंटाळून मुंबई सोडून आपल्या गावात जाऊन राहणाऱ्या निलंबित एन्काऊन्टर स्पेश्यालिस्ट साधू आगाशेला (नाना) पुन्हा एकदा सरकारकडून बोलावणं येतं. मुंबईत बोकाळलेल्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा एन्काऊण्टर स्क्वाड सुरु करायचा असतो आणि त्याचा प्रमुख म्हणून साधूशिवाय योग्य कुणी असूच शकत नाही, असं सरकारचे सल्लागार प्रधान (मोहन आगाशे) मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना ठासून सांगतात. साधू मुलासह मुंबईत येतो आणि पुन्हा एकदा सुरु होतो एन्काउण्टर्सचा सिलसिला. पण साधूचं नेमकं काम, त्याचा रोल काही तरी वेगळाच असतो. तो पूर्ण झाल्यावर तो एका विचित्र वळणावर पोहोचतो आणि पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही एक अनिश्चित भविष्य गाठीला बांधतो.


हा चित्रपट प्रत्येक अर्थाने पहिल्या 'अब तक छप्पन्न'चाच पुढचा भाग आहे. खरं तर पहिल्या चित्रपटाच्या अखेरीस साधू देशाबाहेर निघून गेलेला असतो आणि प्रधानांशी त्याच्या बोलण्यातून त्याचा पुढील प्रवास बराच सकारात्मक होणार असतो. पण त्यानंतर तो अचानक परत भारतात येऊन नैराश्याने ग्रासलेलं आयुष्य का जगत असतो, हा प्रश्न आपल्याला सुरुवातीसच पडतो आणि शेवटपर्यंत सुटत नाही.
चाणाक्ष किंवा माझ्यासारख्या दर आठवड्याला एक पिक्चर टाकणाऱ्या प्रेक्षकाला पहिल्या काही मिनिटांतच चित्रपट कुठे आणि कसा जाणार आहे, हे समजतं. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जोरदार धक्का बसायची अपेक्षा असावी, त्या त्या ठिकाणी 'मला वाटलंच होतं' इतकंच वाटतं.
चित्रपट पहिल्या भागाची वळणा-वळणावर नक्कल करण्याचा प्रयत्न करत राहतो. पण कसं आहे, सचिन तेंडूलकरची नक्कल करून एखादा सचिन'सारखा' होऊ शकतो, पण 'सचिन' होऊ शकत नाही. त्यामुळे एक स्वतंत्र चित्रपट म्हणून तो जितकी अनुभूती देतो, त्यापेक्षा जास्त पहिल्या भागाची आठवण करून देतो.
निश्चितच थिल्लर विनोद, हास्यास्पद हाणामाऱ्या, फुसके थरार, पांचट भावनिक नाट्यं वगैरेंच्या जोडीला घणाघाती किंवा कंटाळवाणी गाणी अश्या टिपिकल स्वस्तातल्या फॉर्म्युलावाल्या बऱ्याच चित्रपटांच्या तुलनेत 'अ.त.छ.-२' खूप उजवा आहे. (किंबहुना ही तुलनाच होऊ शकत नाही.) पण तरी पूर्ण चित्रपट वेगवेगळी ठिगळं जोडल्यासारखा वाटत राहतो. साधू मुंबईत परतल्यावर, कामावर रुजू झाल्यावर फार विशेष असं काही करतो, असंही वाटत नाही आणि त्याच वेळी तो जे काही करतो ते एन्काऊण्टर स्पेश्यालिस्टपेक्षा सुपारी गुंडाचं काम जास्त वाटतं. तसंच उघडपणे, जाहीर, लोकांसमोर 'एन्काऊण्टर स्क्वाड' असा उल्लेख ह्या स्क्वाडचा होत नसतो. मानवाधिकार आयोग व मानवाधिकार संघटना ह्यांच्या अस्तित्वावरच असे उल्लेख प्रश्न उभे करतात. अश्या काही, वरवर किरकोळ वाटू शकणाऱ्या खबरदाऱ्या घ्यायला हव्या होत्या.

'नाना पाटेकरचं काम केवळ अप्रतिम आहे', असं म्हणणं म्हणजे 'पाणी ओलं आहे' किंवा 'आग गरम आहे' किंवा 'बर्फ थंड आहे' ह्यासारखं विधान आहे. नानाने वाईट काम केलेला चित्रपट माझ्या तरी स्मरणात नाहीच आणि ही भूमिका तर नाना ह्याआधीही जगून झाला आहे. चित्रपट साधू आगाशेचा आहे आणि तो नानाचाच राहतो.
इतर भूमिकांत आशुतोष राणा, पहिल्या भागात साधूवर खार खाणाऱ्या 'इम्तियाज'ची जागा घेतो. भेदक नजर, वजनदार संवादफेक आणि आक्रमक देहबोली ह्यांतून आशुतोष राणाने आजवर प्रत्येक भूमिकेत जान ओतली आहे, इथेही ओततोच. गुल पनाग ही गुणी अभिनेत्री तिला मिळालेल्या मर्यादित वेळेचं सोनं करते आणि गोविंद नामदेव सारख्या ताकदीच्या अभिनेत्याला फारसं काही कामच नाहीये ! गृहमंत्री जहागिरदारच्या भूमिकेत विक्रम गोखले आणि मुख्यमंत्री अण्णासाहेबांच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर हे एक उत्तम कास्टिंग आहे. प्रभावळकरांच्या भूमिकेची लांबी कमी आहे. पण विक्रम गोखलेंचा जहागिरदार मात्र जबरदस्त !

चित्रपटाच्या नामावलीवरून तरी ह्याचा रामगोपाल वर्माशी संबंध नाही, असं दिसलं म्हणून मी पाहायची हिंमत केली. कारण रा.गो.व.च्या गेल्या काही चित्रपटांमुळे मी त्याच्या नावाचा धसकाच घेतला आहे. पण तरी, हे पीक त्याच जमिनीत घेण्यात आलं असावं असं सतत जाणवत राहतं.
चित्रपटात बऱ्याच गोष्टी बऱ्याच अंशी समाधानकारक आहेत. पण तरीही मला जर 'साधू आगाशे' पाहावासा वाटला तर मी 'अ. त. छ. - १' च पाहीन, 'अ. त. छ. - २' नाहीच, हे मात्र नक्की.
कारण शेवटी ओरिजिनल, तो ओरिजिनलच !

रेटिंग - * * १/२

------------------------------------

दर रविवारी ह्या वृत्तपत्रात मी 'मी मराठी लाईव्ह' ह्या मुंबई व ठाणे येथे प्रकाशित होणाऱ्या दैनिकात चित्रपट परीक्षण लिहिणार आहे .ह्या लेखाचा संपादित भाग कालच्या अंकात छापून आला आहे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...