Sunday, March 31, 2013

जेव्हा म्हणतो राजा, "आजचा दिवस माझा" (Aajcha Divas Majha - Movie Review)


आर्थिक वर्षाखेरीचे दिवस आहेत. नक्कीच ऑफिसमध्ये अनेकांच्या फुल्ल नाईट्स, लेट नाईट्स चालू असतील. हे दिवसच असे असतात की 'लोड' घेतल्याशिवाय काम होणारच नसतं. करोडोंचे पुस्तकी आणि प्रत्यक्ष हिशेब जुळवताना गद्धेमजुरी आणि मगजमारी कुठलाही मागचा-पुढचा, 'हे माझे काम आहे की नाही' वगैरेसारखा विचार न करता, करावीच लागते. ती करत असताना डोकं फिरतं, वैताग येतो, संताप येतो, चीडचीड होते पण अचूक ठोकताळा लागल्यावर, मेहनतीचं चीज झाल्यावर मिळणारा आनंदही अपूर्व असतो. तो पराकोटीचा मानसिक आणि शारीरिक थकवा एक वेगळंच समाधान देतो. कारण कुठे तरी, आत, आपण स्वत:च्याही नकळत एकदा तरी ठरवलेलं असतं की, 'आजचा दिवस (रात्र?) माझा' आहे !
पण काही वेळी, वर्षअखेर नसताना किंवा कुठलीही तातडी नसतानाही, उगाचच एखादं काम एखादी अवास्तव 'डेड लाईन' घेऊन केलं जातं. त्यात बहुतकरून केवळ साहेबी हट्ट असतो, दुसरं काही नाही. पण समजा एखादं 'नेक' कारण असेल तर ? ('नेक' कारणासाठी कॉर्पोरेटमध्ये झिजायला क्वचितच मिळत असावं, पण शासकीय नोकरीत, मनात असेल तर, अक्षरश: रोज अशी नेकी करता येईल, नाही?)

असाच एक दिवस उगवतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते (सचिन खेडेकर), पक्षांतर्गत बंडाळीवर मात करून, राज्यपालांच्या राजकारणावर कुरघोडी करून, आपली खुर्ची कायम ठेवण्यात यशस्वी होऊन दिल्लीहून परततात. अख्खा दिवस अभिनंदन, सत्कार, सदिच्छा भेटी ह्यात सरून जातो आणि संध्याकाळी एका महत्वाच्या व्यक्तीकडे, पत्नीसह (अश्विनी भावे), लग्नाच्या स्वागत समारंभास ते जातात. उपस्थित इतर प्रतिष्ठित व्यक्तींशी सोहळ्याचे यजमान मुख्यमंत्र्यांची ओळख करून देतात. त्यावेळी त्यांच्याकडून एका ज्येष्ठ अंध कलावंताचा अवमान घडतो. कर्तव्यदक्ष राज्यकर्ता असलेल्या विश्वासरावांच्या मनात अपराधी भावना येते. मन खाऊ लागते. आपल्या ह्या उन्मत्त वर्तणुकीचे प्रायश्चित्त करायलाच हवे, असं ते ठरवतात. पण काय करता येईल?
पं. गुंजकरांनी आठ वर्षांपूर्वी कलावंत म्हणून मुंबईत सदनिका मिळावी ह्यासाठी अर्ज केलेला असतो, असे समजते. बास्स.. सदनिकेची किल्ली पहाटेच्या सूर्याच्या किरणांसोबत गुंजकरांना मिळालीच पाहिजे, अश्या राजहट्टास मुख्यमत्री पेटतात आणि रात्री अकरापासून पहाटेपर्यंत मंत्रालय जागं राहातं. फायली उपसल्या जातात, कागदपत्रं बनवली जातात, आदेश काढले जातात.

गोष्ट छोटीशी, पण उत्कृष्ट सादरीकरण म्हणजे काय तर "आजचा दिवस माझा" !



आ ए एस ऑफिसर रहिमतपूरकर च्या भूमिकेत महेश मांजरेकर, मुख्यमत्र्यांच्या पत्नीच्या (छोट्याश्या) भूमिकेत अश्विनी भावे आणि खाजगी सचिव 'पी. डी. शिंदे'च्या भूमिकेत हृषीकेश जोशी अप्रतिम काम करतात. रहिमतपूरकर आणि विश्वासरावांमधली खडाजंगी रंगतदार झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांत सचिन खेडेकर हे नाव समाविष्ट होण्यास हरकत नसावी. अप्रतिम देहबोली, अचूक संवादफेक, संयत अभिनय आणि कॅमेरासमोर अगदी सहज वावर ह्या सगळ्यामुळे खेडेकरांचा मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते संस्मरणीय झाला आहे.

'रिमेक'साठी सिनेमा निवडतानाही, एखादा मुळातच भिक्कार दळभद्री सिनेमा निवडण्याची वैचारिक दिवाळखोरी, खिश्यात करोडो रुपये असतानाही दाखवणारा एक ओंगळवाणा सिनेमा दुसऱ्या पडद्यावर चालू असताना, मी एक सुंदर मराठी सिनेमा पाहात आहे, ही भावना सिनेमाभर मला मनातल्या मनात गुदगुल्या करत होती. ह्या उच्च वैचारिक गुदगुल्या अनुभवायच्या असतील, तर 'आजचा दिवस माझा' म्हणा आणि लावा लाईन तिकीटबारीवर !

रेटिंग - * * * *    

Monday, March 25, 2013

दुकान


एक कप.... कान नसलेला
एक ग्लास.... टवका उडलेला
झाकण हरवलेली एक बाटली
सोंड तुटलेली एक किटली
एक जाडजूड पुस्तक.... फाटलेलं
सुट्ट्या कागदांचं एक बाड,
पुन्हा पुन्हा भिजून, पुन्हा पुन्हा सुकलेलं
हात निखळलेली एक आरामखुर्ची,
डुगडुगणारी
नवार सैलावलेली एक खाट,
कुरकुरणारी
एक भलं मोठ्ठं घड्याळ..
फक्त तास काटा चालू असलेलं
शाई वाळलेलं एक फौंटन पेन,
निब मोडलेलं
काही फोटो काचा तडकलेले
दोन-तीन आरसे डाग पडलेले
एक हार्मोनियम, फ्रेट्स वाकलेली
एका तबल्याची वादी सुटलेली

दारावरची पाटी,
एका स्क्रूला लटकणारी
एकुलती एक कडी,
कोयंडा शोधणारी

गंजकं, तुटकं
मळकं, फुटकं
इतस्तत: विखुरलेलं बरंच सामान होतं
ते केविलवाणं घर, घर नव्हतं भंगारचं दुकान होतं

पांघरुणात हलणारा छातीचा भाता.........
वाट पाहात होता की
एखादं वादळ येईल, मरतुकड्या दाराला तोडेल
आणि एखाद्या पांथस्थाला इथपर्यंत पोहोचवेल

दार ना तुटलं
ना उघडावं लागलं...
पण वादळ आलं, पांथस्थही आला
छातीचा भाता बंद झाला

आता सामान आणि दुकान
दोन्ही विकायला काढलंय
हार्मोनियम आपणच वाजते,
म्हणून जाळायचं ठरलंय.......

....रसप....
२४ मार्च २०१३

Saturday, March 23, 2013

मी किनारा, लाट ती, भिडते कधी

ओढ ना मजला तिची असते कधी
मी किनारा, लाट ती, भिडते कधी

चोरल्यावरही नजर भिडते कधी
गप्प मी, पण ती तरी हसते कधी

अंगणी प्राजक्त नाही मोगरा
तीच श्वासातून दरवळते कधी

तू तिच्या तुलनेत छोटा, ईश्वरा
ती मला प्रत्यक्षही दिसते कधी

प्रेम डोळ्यातून नकळत वाहिले
आजही ना पापणी सुकते कधी

आग विझल्यावर निखारे राहती
ती निघुन जाते तरी उरते कधी

दर्शनाची रांग चालावी हळू
ऊब ममतेची पुन्हा मिळते कधी ?

तो हरेकाच्या विटेवरती उभा
झावळ्यांची झोपडी टिकते कधी ?

खूप रडलो दु:ख ना घटले 'जितू'
हासल्यावर वेदना भुलते कधी


....रसप....
१९ मार्च २०१३

Monday, March 18, 2013

Jolly - Lovely, Laudable, Bright (Movie Review - Jolly LLB)


आयुष्य म्हणजे एका सोप्प्या वाटेवरील अवघड प्रवास असावा. इथे प्रत्येक गोष्ट 'मिळवावी' लागते आणि जी सहजगत्या हाताला लागते, ती फसवी तरी असते किंवा क्षणभंगुर. आता, अंबानीच्या पोरांकडे भरमसाट पैसा (व सत्ताही) आपसूक आहे, त्यांना ती मिळविण्यासाठी काही कष्ट करावे लागणार नाहीत; पण तरीही ह्या नाही तर त्या प्रकारे, कुठे तरी 'झिजावं' लागेलच. नथिंग कम्स फॉर फ्री इन लाईफ. प्रेम, पैसा, सत्ता, मान, नाव सगळं काही इथे मिळवावं लागतं. अगदी न्यायसुद्धा ! मी कुणी मोठा व्यक्ती नाही. पण शाळेत असताना लोकमान्य टिळकांची, ते शाळेत असतानाची, एक गोष्ट वाचली होती. ती मनात घर करून राहिली. काही दिवसांनी मला सरांनी माझी काहीही चूक नसताना शिक्षा केली. सर जेव्हा पट्टी घेऊन माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'हात पुढे कर', तेव्हा मी टिळकांना आठवलं आणि म्हटलं, 'मी बोलत नव्हतो, माझी काहीही चूक नाहीये, मी पट्टी खाणार नाही!' सर हबकले. पण खूषही झाले आणि त्यांनी मला मी न केलेल्या चुकीसाठी क्षमा केलं. असंच आहे. इथे न्याय मागावा लागतो. त्यासाठी लढावं लागतं. इथे नाव कमवावं लागतं, त्यासाठी झिजावं लागतं.
पण असं असलं तरी, आयुष्य म्हणजे कुठली घनघोर लढाई किंवा अनंत रडगाणंही नाहीच ना ? अवघड असला तरी हा प्रवासही हसत हसत करता येऊ शकतो. किंबहुना, तो तसाच करायला हवा. तेव्हाच लोक तुम्हाला पाहून म्हणतात - 'He's a JOLLY good fellow!!'

'जॉली एल.एल.बी.' ही कहाणी एका धडपड्या वकिलाची आहे. देशात ज्युनियर वकिलांची काय अवस्था आहे, हे पाहायचं असेल तर कुठल्याही न्यायालयाच्या समोरून जा. तुमच्या मागे लागणाऱ्या वकिलांच्या विझलेल्या चेहऱ्यावरून, मळकट कपड्यांवरून तुम्हाला त्यांची अवस्था सहज समजून येईल. असाच एक 'केविलवाणा' वकील 'जगदीश त्यागी' उर्फ 'जॉली' (अर्शद वारसी) मेरठमध्ये झिजत असतो. रोजच्या झिजण्याने  त्याची डाळ शिजत नसते आणि तो मात्र पकत असतो. अखेरीस, तो दिल्लीस जाऊन नशीब आजमावण्याचे ठरवतो आणि खटारा स्कूटर व किडुकमिडुक सामानासह दिल्ली गाठतो. पण इथेही तीच कहाणी, फक्त नव्याने सुरू होते.
अश्यातच, स्टार वकील 'राजपाल' (बोमन इराणी) ह्यांची एक केस पाहाण्याची संधी त्याला मिळते. केस असते 'हिट अ‍ॅण्ड रन' ची. एका रईसजाद्या तरूणाने - 'राहुल दिवाण'ने - दारूच्या नशेत बेदरकारपणे 'लॅण्ड क्रूझर' गाडी फुटपाथवर चढवून तिथे झोपलेल्या ६ मजुरांना चिरडलं असतं. टिपिकल पुराव्यांचा अभाव वगैरे सिद्ध करून राजपाल त्या मुलाला निर्दोष सिद्ध करतो आणि केस जिंकतो. हे सगळं पाहून प्रचंड प्रभावित झालेला जॉली, नाव कमावण्यासाठी एक प्लान करतो. तो संबंधित केसविषयी जुजबी माहिती गोळा करून न्यायालयात ह्या प्रकरणी 'जनहितार्थ याचिका' (Public Interest Litigation) दाखल करतो.
सुरुवातीस केवळ सवंग प्रसिद्धीकरिता हा उपद्व्याप करणारा जॉली, त्याची प्रेयसी 'संध्या' (अमृता राव) आणि त्याच्यावर माया करणारा कोर्टातील कॅन्टिन चालक 'कौल' (रमेश देव) मुळे संवेदनशील होतो आणि अपघातात दगावलेल्या गरिबांच्या न्यायासाठी लढू लागतो.



चित्रपट सुरू होतो, तेव्हापासूनच आपल्याला शेवट समजलेला असतो आणि कहाणीचा प्रवासही साधारणपणे आपल्या अंदाजानुसारच घडत जातो. कोर्टातील चढाओढी ह्यापूर्वी असंख्य सिनेमांत दाखविल्या गेल्या आहेत. पण 'जॉली' मध्ये दाखवलेलं कोर्ट 'पटणारं' आहे. ही हाताळणी वेगळी आहे.

मी चित्रपट पाहायला गेलो, त्याची दोन कारणं होती. एक - अर्शद वारसी. आणि दुसरं - बोमन इराणी.
अर्शद वारसीला संधी मिळाल्या नाहीत, असे नाही. कदाचित उशीराने मिळण्यास सुरुवात झाली आहे. पण त्याच्या भूमिका वैविध्यपूर्ण असतात नक्कीच. मला तरी तो आजच्या घडीस, हिंदी चित्रपट सृष्टीत असलेल्या उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक वाटतो. 'सहर' पाहिल्यापासून तर माझे हे मत अधिकच पक्कं झालं. 'जॉली'च्या भूमिकेतही तो जान ओततो. तो 'जॉली' जगतो.
बोमन इराणी, खरं सांगायचं तर विशेष असं काही करत नाही. तो फक्त सहज वावरतो. त्याच्यापेक्षा अर्शद वारसीच लक्षात राहातो.

पण…… ही कोर्ट केस जिंकतो 'न्यायाधीश त्रिपाठी' बनलेला 'सौरभ शुक्ला' ! अफलातून काम ! हाही एक अत्यंत ताकदीचा अभिनेता आहे, जो 'सत्या'पासून 'बर्फी'पर्यंत अनेकविध भूमिकांना न्याय देत आहे. 'जॉली'मधला त्याचा जजसुद्धा एक लक्षवेधी पात्र आहे. खूप मोठा रोल नसला, तरी काही मोक्याच्या क्षणी शुक्लाजी कमाल करतात !

'अमृता राव' इतकी मरतुकडी दिसते की तिचं नाव 'मृता राव' आहे की काय असा संशय यावा. बाकी तिला पडद्यावर फक्त 'दिसण्या'साठीच ठेवलेले आहे.
इतर लहान मोठ्या भूमिकांतून, सगळेच लहान मोठे अभिनेते चोख काम करतात.
अजनबी, दारू पीके नचणा आणि हंस की चाल ही तिन्ही गाणी बऱ्यापैकी जमली आहेत.

चित्रपटाचा शेवटही खूप प्रॅक्टीकल घेतला आहे. त्यामुळे ही केस लेखक-दिग्दर्शक सुभाष कपूर जिंकलेत, असं म्हणायला आणि पदरमोड करून थेटरात जाण्यासही हरकत नाही !

रेटिंग - * * *

Saturday, March 09, 2013

रोल युवर आर्म, मेट...... कानाजवळून !!


बदलापूरला असेपर्यंत, 'क्रिकेट खेळणं म्हणजे अंडर आर्म बोलिंग' हेच माहित होतं. धावत येऊन, उडी घेऊन २२ यार्ड दूर असलेल्या स्टम्पात कधी बोलिंग केलीच नव्हती. मुंबईला - गव्हर्न्मेण्ट कॉलनी, वांद्र्याला - आलो. इथे माझ्या अर्ध्या वयाची मुलंही मस्तपैकी सुस्साट ओव्हर आर्म बोलिंग करत असत. सुरुवातीला मला खूप कमीपणा वाटे. मग त्या इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्समधून एक सुपिरिओरिटी कॉम्प्लेक्स झाला, जो जनरली होतोच, की, 'ह्यॅ:!! ह्यात काय विशेष ? हे तर मी पण करू शकतो!!'
बास ! एक दिवस गेलो खेळायला आणि घेतला हातात बॉल ! १५-२० पावलं मागे चालत गेलो. सुसाट धावत आलो, उंच उडी मारली आणि होता नव्हता तेवढा सगळा जोर एकवटून बॉल 'फेकला'. 'फेकलाच!' तो ओव्हर आर्म बॉल नव्हताच. तो होता 'फेकी'!! थ्रो ! असं थोडा वेळ चाललं. मला असं वाटत होतं की 'जमतंय की ! च्यायला उगाच घाबरत होतो !'
४-५ बॉल टाकून झाल्यावर इतर मुलं म्हणायला लागली, 'अबे, नीट टाक ना !'
मला कळेना, 'नीट' म्हणजे कसं ?
एका मुलाने येऊन मला सांगितलं, 'हात असा-असा फिरव…… तो दुमडला नाही पाहिजे.'
मी तसं करून पाहिलं. मी टाकलेला बॉल स्टम्प आणि पीच सोडून कुठेही पडू लागला ! 'छ्या: !! हे जमणारं नव्हतंच !' मला एकदम धाड्कन जमिनीवर आपटल्यासारखं झालं होतं.
एक-दोन दिवसांत सगळ्या मुलांशी बऱ्यापैकी दोस्ती झाली आणि मला एकमताने 'फेकी' ठरवण्यात आले. मला बोलिंग शिकवण्याचा प्रत्येक लहान-मोठ्याने प्रयत्न केला. पण मी धावत येऊन थ्रो मारायचा काही बदललो नाही. अखेरीस माझा नाद सोडण्यात आला.
महिन्यातून एकदा तरी आम्ही बाजूच्या 'चौका'शी मॅच खेळत असू. (गव्हर्न्मेण्ट कॉलनीत १०-१०, १२-१२ इमारतींचा एक असे अनेक गट आहेत. प्रत्येक गटातील इमारतींची चौकोनाकार मांडणी करून मध्यभागी खेळण्यासाठी/ पार्किंगसाठीची जागा, अशी साधारण संरचना. ह्या प्रत्येक गटाला आम्ही तिथे 'चौक म्हणत असू. चौका-चौकांत असलेली खुन्नस तशीच जशी गल्ल्या-गल्ल्यांत असते!!) त्या मॅचमध्ये मला बोलिंग दिली जात नसे. पण मला कधी वाईट वाटत नसे, कारण त्या चार-सहा महिन्यांत मलाही माहित झालं होतं की आपल्याला बोलिंग येत नाही !

पहिलं वर्षं सरलं. त्या काळात दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बडोद्यास, आजोळी, जात असू. त्या वर्षीही गेलो. बडोद्याचं आमचं घर म्हणजे, एका साधारण ८०-९० वर्षं जुन्या छोट्याश्या वाड्यातील १०-१२ घरांतील एक. भाड्याचं. छोटा वाडा होता. इथे खेळायला मोठी जागा नव्हती. आम्ही आमच्या घरासमोरच्या १५ यार्डांच्या जागेत प्लास्टिक बॉलने खेळायचो. मुंबईला जाऊन 'लै शाणा' झालो असल्याने मी माझ्या तिथल्या मित्रांना भरीस पाडून, रबरी चेंडू आणायला लावला आणि फरशीवाल्या, अर्ध्या - ११ यार्डांच्याच - पीचवर ओव्हर आर्म क्रिकेट सुरू केलं.
रन अप घेऊन, मी जेव्हा पहिला चेंडू टाकला, तेव्हा मीच आश्चर्यचकित झालो होतो ! छोट्याश्या पीचवर बोलिंग करताना माझा हात सरळ फिरला होता! मी बॉल 'थ्रो' केला नव्हता आणि तो पडलाही स्टम्पात होता !! मला इंग्रजीच्या पेपरात कसाबसा पास झाल्यावर होत असे, तसा आनंद भर सुट्टीत (निकालाच्या आधीच) झाला होता !

१५-२० दिवस कसून सराव करून मी परत मुंबईला परतलो. पीच पुन्हा एकदा मोठं होतं, पण आता 'खांदा' तयार झाला होता. १५ पावलांचा रान अप घेऊन मी पहिला बॉल टाकला. तो बॉल मी 'थ्रो' केला नव्हता आणि स्टम्पात गेला होता !

त्या दिवशी आमच्या चौकाला एक असा बोलर मिळाला जो एकही वाईड न टाकता हव्या तितक्या ओव्हर्स टाकू शकेल. आता मला कुणी 'फेकी' म्हणत नव्हतं. आता मी पहिली ओव्हर टाकत होतो !
 
....रसप....
९ मार्च २०१३


Friday, March 08, 2013

एकदा थेंबा मनातच..


एकदा थेंबा मनातच तू स्वत:ला पाझरव
साचल्या निद्रिस्त डोही तू तरंगांना उठव

हासते जे नेहमी ते फूल असते कागदी
दु:ख होता हासणारे फूल हो, अश्रू फुलव

मी किनारा सागराचा, तू नदीचा काठ हो
दगड वाळू जमवली मी, तू जरा हिरवळ सजव

जे नसे माझ्याकडे ते पाहिजे असते तुला
समज थोडीशी प्रपंचा तू स्वत:लाही शिकव

ये तुझे मंदीर बांधू आजवर नव्हते असे
तूच मूर्ती, तूच भिंती, तू पुजारी, तू गुरव

'काल' गेला ज्या दिशेने 'आज'ही जातो तिथे
पण उद्याची पाउले 'जीतू' हवी तिकडे वळव

....रसप....
७ मार्च २०१३

Monday, March 04, 2013

तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे..


किती धावलो तरी सावली येते मागे-मागे
तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे

मेहनतीच्या पैश्यासाठी कुणी न झिजतो आता
चोर झोपतो निवांत रात्री धनी बिचारे जागे

विठ्ठलदर्शन घेण्यासाठी अनवाणी मी गेलो
तिथे पाहिले रखुमाईशी तोही फटकुन वागे !

'गजानना*ने कधी फुंकली चिलीम होती' कळता
श्रद्धा-भक्ती चुलीत जाते, व्यसन तेव्हढे लागे

खोऱ्याने ओढावा पैसा तरी पुरे ना पडतो
आणि कुणाचे भिक्षा मागूनही व्यवस्थित भागे !

….रसप....
४ मार्च २०१३

*गजानन महाराज - शेगांव 

Sunday, March 03, 2013

फुलपाखरू (उधारीचं हसू आणून....भाग - २)


दु:ख फुलपाखरासारखं..!
मी अनेकदा अलगद चिमटीत पकडलंय
अगदी निरागस शांतपणे
ते दोन बोटांना शरण आलंय
त्याचा तो मलमली स्पर्श..
मोहवणारे रंग..
पण तो निष्पाप चेहरा..
मन भरून न्याहाळल्यावर
मी जेव्हा पुन्हा त्याला सोडून देतो..
इथे तिथे बागडायला..
तेव्हा बोटांवर राहतो
एक करडा रंग
त्याच्या पंखांचाच रंग मागे राहिलेला असतो
पण पंखांवर बोटांचा ठसा मात्र नसतो

असंख्य फुलपाखरं अवतीभवती असतात
मी पुन्हा पुन्हा
चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो
एकावर तरी माझा ठसा उमटेल म्हणून
अन् दरवेळी फक्त बोटांवरचा करडा
रंग पाहात राहातो -
उधारीचं हसू आणून....

....रसप....
०३ मार्च २०१३
Related Posts Plugin for WordPress, Blogger...