Wednesday, July 30, 2008

माझी philosophy..

 

वाटून वाटून संपत नाही
कुणाशी न वाटता उमगत ही नाही
छोट्या छोट्या गोष्टींतही ही अगदी ओतप्रोत असतं,
'सुख' तर प्रत्येकाच्या उपभोगात असतं....

घरामध्ये, बँकेमध्ये
पाकीटामध्ये मावत नाही,
खोऱ्याने ओढला
तरी पुरेसा होत नाही
माणूस फक्त साठवण्यात समाधानी दीसतो,
पण 'पैसा' तर प्रत्येकाच्या खर्चामध्ये असतो..

आयुष्य सरतं पण क्वचितच मिळतं
मृगजळासारखं मागे मागे पळवतं
शब्दांमध्ये असतं
स्पर्शामध्ये असतं
खरंखुरं 'प्रेम' तर
एका कटाक्षात ही असतं..

कोमेजलेल्या फुलात असतं
उजाड वाळवंटात असतं
आटलेल्या पात्रात असतं
मोडक्या झोपड्यातही असतं
उघड्या डोळ्यांना दिसत नाही कारण..
'सौंदर्य' बघणाऱ्याच्या नजरेत असतं....

....रसप....

मैत्रीण माझी न्यारी

वेगळ्यांमध्ये मध्ये आगळी
मैत्रीण माझी न्यारी
सर नाही कुणा तिची
सुरूप सुंदर स्वारी

पावलोपावली माझं
अनेकदा धडपडणं
प्रत्येक वेळी तिचं
समर्थ सावरणं

तोंड काळं केलं तर
थोतरीत एक "ठेवणं"
शुद्धीत मी आल्यावर
डाग स्वच्छ करणं

भरकटलेलं तारू माझं
किना-याला लावणं
उधळलेलं वारू माझं
आटोक्यात आणणं

लटपटताना पाय माझे
स्थिर मला करणं
सरभरलेल्या मनाला ते
धीर तिचं देणं

ती म्हणेल तीच दिशा
माझ्यासाठी पूर्व
विश्वास अती दृढ़ माझा
मला तिचा गर्व

शब्दाशब्दाला तिच्या
मोत्याहून मूल्य
तेजापूढे फीके तिच्या
चंद्र आणि सूर्य


....रसप....
१९ जुलै २००८

हृदय : घरचा भेदी

प्रेम प्रेम म्हणतात ते
हेच असतं बहुतेक
दीवस तास मीनीट क्षण
मोजत राहा एकेक

खोलवर कुठून तरी
एक कळ येते
दुखरी जागा कळेपर्यंत
दूसरी सुद्धा येते

काहीच करू शकत नाही
करण्याशीवाय गणती
दीवसांची मीनीटान्ची
कळांची क्षणांची

तळमळ तडफड
जळजळ फडफड
क्षण क्षण भीरभीर
धाकधुक धडधड

प्रत्येकाचं हृदय फीतुर
असतं भेदी घरचा
वार्यावरती देतं सोडून
पडतोच ह्याचा फडशा


....रसप....
१७ जुलै २००८

माणसं

खोक्यांसारखी माणसं
एकावर एक रचलेली
गंज चढलेले मेंदू
आणि अक्कल पुसलेली

मेंढरांसारखी माणसं
मागे-मागे चालणारी
कंटाळवाणी मंदगती
पडणाऱ्यावर पडणारी..

बगळयांसारखी माणसं
ध्यान लावून बसलेली
दिसतात स्थितप्रज्ञ
मोडता घालण्या टपलेली

गेंड़यांसारखी माणसं
निगरगट्ट बनलेली
सोयर ना सूतक काही
मस्तवाल फुललेली

माणसासारखी माणसं
नावापुरती उरलेली
चिमणीच्या जातीसारखी
दुर्मीळ होत चाललेली.....


....रसप...
१३ जुलै २००८

दे मला संजीवनी

दे मला संजीवनी
तुकड्यात मी
श्वास कोंडले मनी
तुकड्यात मी ||धऋ.||

आसवांचे कुंभ प्यालो
भोगीले दू:शाप मी
काय माझे पाप होते
....... तुटलो मनी,
तुकड्यात मी ||१||

रात येई रात जाई
चंद्र जाळतो मला
तांबडी पहाट होते
....... वीझलो मनी,
तुकड्यात मी ||२||

शब्द खूंटतात जेथे
गाठले वळण मी
इथूनची मागे फीरावे..
...... दुवीधेत मी,
तुकड्यात मी ||३||




....रसप....
२६ जुलै २००८

व्यथा

खर सांगू , आज काल मी काहीच लिहित नाही
भावनांचा शब्दांशी मेळच जुळत नाही

काहूर आहे मनात अनेक प्रश्नांचे
एकाही प्रश्नाला माझ्या
उत्तरच मिळत नाही

परिस्थिती बदललीय ,
मलाही कळतंय
पण कळलेले सगळेच
अंगी वळत नाही .

आठवांच्या सरींनी
अंग चिंब भिजते
तरीही वास्तव भोवताली जळते
कधी वेळे आधी कधी वेळे नंतर
सगळेच पळून जातात
काही केल्या माझी
हूरहूर पळत नाही

उमलत्या कळ्या, फुललेली फुले
कुणाला आवडत नाहीत ?
खुडून टाकलेल्या फुलांना मात्र
कुणीच माळत नाही

म्हणूनच आज काल मी काहीच लिहित नाही
म्हणूनच आज काल मी काहीच बोलत नाही

....रसप....
६ फेब्रु. २००८

अथांग आहे....

मन - कलह
तन - विरह
धन - संग्रह
अजाणताही

कर्म - फलन
धर्म - पालन
जन्म - मरण
मनुष्यासी

बंध - मुक्ती
भोग - वीरक्ती
भक्ती - शक्ती
ये उदयासी

हात जयाचे
हाकीती गाडा
भक्तीभाववेडा
सर्वांतरी

जाण तयासी
मान तयासी
दयासागरासी
अथांग आहे....

....रसप....
Related Posts Plugin for WordPress, Blogger...