Tuesday, February 24, 2015

भिस्त आणि शिस्त ह्यांचा समतोल हवा

हा लेख आधीच लिहिला होता. पण प्रकाशित केला नाही कारण सामन्याच्या निकालावर माझा पुढील उत्साह अवलंबून असणार होता. पाकिस्तानसोबतच्या सामन्यानंतर मला वेळ मिळाला नाही, आज मिळाला आहे, म्हणून प्रकाशित करतो आहे. ह्यानंतर संयुक्त अरब अमिरातीसोबतच्या सामन्यापूर्वी भारत-पाक व भारत- द. आफ्रिका ह्या सामन्यांवर लिहून बॅकलॉग भरून काढण्याचा विचार आहे.

# क्रिकेट हा माझा धर्म आहे आणि कसोटी, वनडे व ट्वेंटी२० हे देव. विश्वचषक हा एक सोहळा. हा साजरा करायलाच हवा ! पण माझं धर्मपालन एका मर्यादेपर्यंत आहे. जोपर्यंत खेळात भारत आहे, तोपर्यंत मी जीव ओवाळतो, त्यानंतर मात्र माझा जीव घुसमटतो. ही एक शृंखला सुरु करतो आहे, जी ह्या विश्वचषकातील भारताच्या प्रवासावर पूर्णपणे अवलंबून आहे. तो जितका चालेल, तितकीच माझी शृंखला. #




~ ~ भिस्त आणि शिस्त ह्यांचा समतोल हवा ~ ~

फार पूर्वीपासून भारताची भिस्त कायम फलंदाजीवरच राहिलेली आहे. पण ह्या विश्वचषक संघातले बहुतेक भारतीय फलंदाज चांगल्या गोलंदाजीसमोर तितकीच चांगली फलंदाजी करण्यापेक्षा तिच्यासमोर त्रेधा उडण्यासाठीच जाणले गेलेले आहेत. विराट कोहलीवर भारत सगळ्यात जास्त अवलंबून दिसतो. पण ह्याच कोहलीला इंग्लंडमध्ये ऑफ स्टंपबाहेरील स्विंग गोलंदाजीने नाचवलं होतं. कोहली फलंदाजीला आल्यावर इंगलंडचे स्लीपमधील क्षेत्ररक्षक लाल सिग्नल पडल्यावर त्याच्या उतरत्या काउंटरवर नजर लावून उभ्या राहिलेल्या मोटारसायकलस्वारांप्रमाणे असत. पहिली संधी मिळताच त्याचं सोनं करून त्याला प्रत्येक वेळी पॅव्हेलियनमध्ये त्वरित माघारी पाठवत. आखूड टप्प्याचे चेंडू खेळण्याची शिखर धवनची कुवत आणि मुद्राभिनय करण्याची सलमान, कतरिना वगैरेंची कुवत सारखीच आहे, हे आता सर्वश्रुत झालंय. रोहित शर्मा म्हणजे मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनसारखा आहे. दोघांना नियमितपणे मेगा ब्लॉक असतात आणि दोघेही नियमितपणे अनियमित असतात. रैना व धोनी हाणामारीच्या षटकांत उपयुक्त आहेत. जाडेजा हा फलंदाज आहे की गोलंदाज की दोन्हीत कामचलाऊ, हे त्याचं त्यालाही समजत नसावं. त्याच्या नावावर तीन त्रिशतकं असणं मला हास्यास्पदच वाटतं. राहता राहिला रहाणे. अजिंक्य रहाणे ह्या विश्वचषकात कसा खेळतो, ह्यावर भारताचा ह्या स्पर्धेतीलच नव्हे तर त्यानंतरचाही प्रवास अवलंबून आहे. द्रविडनंतर एक अत्यंत भरवश्याचं तंत्र असलेला रहाणेशिवाय दुसरा खेळाडू अजून तरी दृष्टीपथात आलेला नाही. कसोटीत चेतेश्वर पुजाराला बरेच जण 'नेक्स्ट द्रविड' म्हणतात. मात्र त्याच्या बॅट आणि पॅडमधली विस्तीर्ण मोकळी जागा चेंडूने वारंवार हेरली आहे आणि तो वनडेसाठी अजून तरी तितकासा उपयुक्त वाटलेला नाही कारण वनडेसाठी आवश्यक मोठे फटके व धावा पळण्यातली चपळाई त्याच्यात नाही. असंही ह्या संघातही तो नाहीच. त्यामुळे मला तरी रहाणेमध्येच पुढचा द्रविड दिसतो आहे. तो खरोखर आहे की मला भास होतो आहे, हे ही स्पर्धा ठरवेल.

ह्या विश्वचषकात सहभागी संघांत सगळ्यात बेभरवश्याची गोलंदाजी कुणाची असेल तर ती भारताची. खरं तर 'बेभरवश्याची' नाहीच. उलटपक्षी 'भरवश्याचीच'. भरवसा हाच की, हे कुठलीच अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. भारत कधीच स्वत:च्या गोलंदाजीसाठी जाणला गेला नाही. संघात काही चांगले गोलंदाज असत, मात्र अशी गोलंदाजांची फळी जी हमखास सामना जिंकून देईल, कधीच भारताकडे नव्हती. गेल्या काही महिन्यांत भारतीय जलदगती गोलंदाजांनी स्वत:च्या खेळामुळे जे चित्र निर्माण केलं आहे ते उरात धडकी भरवणारं आहे, भारताच्याच ! भुवनेश्वर कुमार वगळता सगळेच जण बहुतेकदा सामना सुरु होऊन संपेपर्यंत अचूक टप्प्याच्या शोधातच दिसतात. भुवनेश्वरलासुद्धा त्याच्या वेगाच्या मर्यादा आहेत आणि त्यात तो सध्या १००% तंदुरुस्तही नाही. इशांत शर्माचं दुखापतग्रस्त होऊन विश्वचषकातून बाहेर पडणं, हे भारतासाठी चांगलं आहे की वाईट ह्याचा विचार करावा लागणे आणि गेले काही महिने तो भारतीय गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणवला गेला असणे हे नैराश्यजनक आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा अश्विन सांभाळत असला, तरी ते 'सांभाळणे' आहे की नुसतंच 'खांदा देणं' आहे, कुणास ठाऊक ! उपखंडाबाहेरील अश्विनची गोलंदाजी इतकी बोथट असते की त्या टोकावर एखादा चेंडू टप्पा घेऊ शकेल. जाडेजा, रैना, रोहित शर्मा, बिन्नी हे सगळे मिळून माझ्या मते एक पाचवा गोलंदाज आहे.

भारताच्या गोलंदाजीची अशी अवस्था असताना गोलंदाजीत दादा संघ राहिलेल्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेशी पहिले दोन सामने खेळायचे आहेत. ही सुरुवात अत्यंत कठीण जाणार आहे निश्चितच. गेल्या तीन महिन्यात ऑस्ट्रेलियात ह्या संघाने जवळजवळ प्रत्येक सामना हरलेला आहे. त्यातही विश्वचषकापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसोबतच्या तिरंगी स्पर्धेत तर ह्या संघाच्या मर्यादा अधिकच उघड्या पडल्या आहेत.
पाकिस्तानला भारतासोबत आजतागायत एकही विश्वचषक सामना जिंकता आलेला नाही, ही सांख्यिकी जर त्यांना बदलायची असेल, तर त्यांना ह्या वेळी खूपच चांगली संधी आहे; असं म्हणावं लागेल. कारण कदाचित भारताचा हा संघ आत्तापर्यंतचा सगळ्यात दुबळा डिफेंडिंग चॅम्पियन असावा.

एकंदरीतच अभ्यास पूर्ण न करता परीक्षेला बसणाऱ्या पोरासारखा भारतीय संघ ह्या विश्वचषकासाठी दाखल होतो आहे असं मला वाटतंय. अर्थात, ह्या संघातील काही खेळाडूंत चमत्कार करवून आणण्याची क्षमता आहे आणि त्यांच्या त्या क्षमतेच्या जोरावर ते संपूर्ण संघाचं मनोबल दुप्पट, चौपटही करू शकतात आणि संघप्रदर्शन उंचावू शकतात. एक निस्सीम भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून माझी इच्छाही असंच काही व्हावं, अशी आहे आणि विश्वचषकापूर्वी भारतीय संघालाही हीच शुभेच्छा आहे. महत्वाच्या खेळाडूंवर प्रत्येकच संघ अवलंबून असतो. पण त्या खेळाडूंना इतर खेळाडू कितपत शिस्तीने साथ देतात ह्यावर संघाचं दीर्घकालीन यशापयश अवलंबून असतं. त्यामुळेच आता जी काही उपलब्ध साधनं आहेत, त्यांचा शिस्तबद्ध वापर करणं हेच महत्वाचं आहे. कुणावर किती भिस्त असावी आणि कुणी कितपत शिस्त पाळावी, ह्याचा सारासारविचार व पालन करायला हवे आहे.

- रणजित पराडकर 

Saturday, February 07, 2015

बालकी सांगतात म्हणून...... (शमिताभ - Movie Review - Shamitabh)

हमको आजकल हैं इंतज़ार
कोई आयें लेके प्यार....
'सैलाब' ह्या चित्रपटातलं हे गाणं म्हणजे माधुरीच्या करोडो चाहत्यांच्या गळ्यातला ताईत. चवळीच्या शेंगेसारखी माधुरी आणि तिच्या दिलखेच अदांनी आणि ठसकेबाज ठुमक्यांनी 'सिझलर' सारखं वाफाळत समोर येणारं हे गाणं. आता कल्पना करा की ह्या गाण्याचा रिमेक आला. व्हिडीओ तोच, तसाच. तीच माधुरी. पण चेहरा 'Morph' का काय करतात, तसं करून 'सोनाक्षी सिन्हा'. ही कल्पना केल्याबद्दल, इथे लिहिल्याबद्दल आणि त्यावर विचार करायला लावल्याबद्दल काही लोकांनी मनातल्या मनात किंवा कदाचित खुल्या आवाजातही मला दोन-चार कचकचीत शिव्या हासडल्या असतील. ह्याची पूर्वकल्पना असूनही मी हे लिहिलं कारण अक्षरश: असंच 'शमिताभ' बघत असताना अख्खा चित्रपटभर, धनुषच्या तोंडून अमिताभचा आवाज ऐकताना वाटत होतं. स्वत:साठी अमिताभचा आवाज घेण्याची किंवा अमिताभच्या आवाजाला स्वत:चा चेहरा देण्याची ऑफर स्वीकारण्याची हिंमत जर धनुष करू शकतो, तर मी नुसती एक किरकोळ कल्पना करण्याची हिंमत का करू नये ?

चित्रपटाची कहाणी तशी वेगळी आहे. महाराष्ट्राच्या एका छोट्याश्या गावातून एक तरुण मुलगा हीरो बनायचं स्वप्न घेऊन मुंबईत येतो. लहान वयापासून चित्रपटाचं प्रचंड आकर्षण असणारा हा मुलगा - दानिश (धनुष) - मुका असतो. अतिसामान्य देहयष्टी, सामान्य चेहरा आणि आवाज नाही, हे कॉम्बीनेशन निश्चितच त्याला 'हीरो' बनवू शकणारं नसतंच. पण नशीब योग्य वेळी मेहरबान होतं आणि त्याची भेट 'अक्षरा' (अक्षरा हासन) शी होते. जी एक सहाय्यक दिग्दर्शक असते. ती 'ही गवताच्या काडी नसून गौती चहा आहे' असं जाणते (प्रत्यक्षात तसं पडद्यावर आपल्याला तरी जाणवत नाही.) आणि 'आउट ऑफ द वे'च्याही बाहेर जाऊन दानिशला मदत करते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्याला दुसऱ्या कुणा व्यक्तीचा आवाज बेमालूमपणे देता येईल, अशी व्यवस्था होते. दानिशचा आवाज म्हणून एक दारुडा सापडतो. जोरदार पंख्याखाली असलेला एक कागदाचा तुकडा त्यावर पेपर वेट ठेवल्याने सर्व बाजूंनी फडफडला तरी उडत नाही, तसा ह्या दारुड्या अमिताभ सिन्हा (अमिताभ बच्चन) चा आवाज दानिशवर पडतो आणि तो तग धरतो. पुढे अमुक अमुक होतं, तमुक तमुक होतं आणि शेवटी ढमुक होऊन चित्रपट संपतो. ह्यातलं हे 'ढमुक' तर इतकं अनावश्यक, अनाठायी आहे की त्या पांचट चवीने तोंड आंबावं.


खरं तर हाच, अगदी फ्रेम टू फ्रेम सेम चित्रपट जर 'बालकी'ऐवजी इतर कुणाच्या नावे आला असता, तर कदाचित 'सर्व युनिटची अक्कल एका छोट्याश्या काडेपेटीच्या डब्यात भरून अरबी समुद्रात फेकून दिली होती की काय?' असा काहीसा सवाल केला गेला असता. पण फक्त हे 'बालकी' सांगतात म्हणून आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो.

आपल्याकडे 'टू हंड्रेड फॉर एफर्ट' नको तिथे देण्याची सवय असते. 'आपल्या फडफडत्या देहयष्टीला अमिताभचा आवाज शोभणार नाही, हे धनुषला माहित नसेल का? नक्कीच असेल, पण तरी त्याने ही रिस्क घेतली. आजच्या घडीचा इतर कुणीही अभिनेता अशी रिस्क घेऊ शकणार नाही', वगैरे युक्तिवाद करून धनुषचे आणि बालकीचेही कौतुकसोहळे चालतील. चालोत. त्याने हे सत्य बदलणार नाही की हा सगळा प्रकार अजिबात पचनी पडलेला नाही. खरं तर धनुष+अमिताभ हे 'शमिताभ'चं 'युनिक सेलिंग प्रपोझीशन' होतं, कदाचित असेलही. पण प्रत्यक्षात हेच त्याचं 'युनिक स्टुपिड प्रपोझीशन'ही झालं आहे. धनुषच्या एन्ट्रीला तो 'तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतज़ार कर रहा हूँ' हा 'दीवार'मधला अमिताभचा डायलॉग अमिताभच्याच आवाजात मारतो. मला तर तिथे हसावं की रडावं, हेच कळेना.

एम एफ हुसेन जसे माधुरीमुळे फॅसिनेट झाले होते, तसे बालकी अमिताभमुळे इम्प्रेस झाले असावेत. त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन चित्रपटाच्या 'कंटेंट'पेक्षा त्यातल्या अमिताभला विकण्याच्या दृष्टीने केलं जातं. हे तर सगळेच करतात म्हणा. पण 'शमिताभ'ऐवजी दुसरं एखादं नाव असतं, ज्यात 'अमिताभ' नसतं, तर मी इतका आवर्जून चित्रपट पाहायला गेलो असतो का ? माझी उत्कंठा ह्या नावातच जास्त होती. इथे चित्रपट आणि त्यातली व्यक्तिरेखा ह्यांच्याही वर 'अमिताभ' हा अभिनेता, हा स्टार जाऊन बसतो आहे. ही गोष्ट चांगली की वाईट, हा ज्याच्या त्याचा दृष्टीकोन. (एके काळी स्वत:च्या सुपरस्टार इमेजच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या राजेश खन्नाला ही कल्पना त्याच्या काळात सुचली नाही, हे चित्रपटाचं सौभाग्य आहे.)


अमिताभ चित्रपट एकहाती उचलून धरतो, हे मात्र निश्चित. 'शमिताभ' हा 'अमिताभ'चाच चित्रपट आहे, लोकांनी कितीही गोडवे गायले तरी अमिताभसमोर धनुषच्या सर्व मर्यादा स्पष्टपणे उघड्या होतात. एका दृश्यात जेव्हा धनुष अमिताभला ठोसे मारतो, तेव्हा फक्त मारणारा धनुष दाखवला आहे, मार खाणारा अमिताभ दाखवला नाही. कारण ते दृष्टीस पटलंच नसतं. निव्वळ अभिनयाच्या जोरावरही धनुष विशेष असा वाटत नाही. 'रांझणा'मधला बेचैन प्रियकर त्याने जितक्या सफाईने उभा केला होता, त्या तुलनेत मुका दानिश किंवा सुपरस्टार 'शमिताभ' खूपच कमजोर वाटला.


चित्रपटात 'अमिताभ'नंतर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे 'अक्षरा हासन'. ही एक साखरेची बाहुली आहे. पण ती बाहुली वाटत असली, तरी शेवटी वडिलांचा अंश तिच्यात उतरला आहेच. तिचा वावर खूप आल्हाददायक व आश्वासक आहे. ती पडद्यावर येते तेव्हा एक थंडगार झुळूक आल्याचा भास होत राहतो.

शमिताभ, एक 'बालकी आणि अमिताभ प्रोडक्ट' म्हणून खूप सामान्य वाटला. त्यात अमिताभ होता आणि अधूनमधून 'अक्षरा' नावाचं एक मोरपीस होतं म्हणून अडीच तास सहन करता आला. दुसरे कुणी असते, तर कदाचित मध्यंतरात बाहेर पडलो असतो.

रेटिंग - * *

Wednesday, February 04, 2015

व्यसन लागले

तू गेल्यावर मला स्वत:चे व्यसन लागले
माझ्यामध्ये तू मिळण्याचे व्यसन लागले

तुझा अबोला इतका झाला सवयीचा की
माझ्या मनासही मौनाचे व्यसन लागले

वेगवेगळे खेळ खेळलो नशिबासोबत
इतका हरलो की हरण्याचे व्यसन लागले

कोणे एके काळी सुंदर लिहित असे तो
नंतर टाळ्या कमावण्याचे व्यसन लागले

निजायला ती जाते एका विशिष्ट वेळी
म्हणुन जगाला अंधाराचे व्यसन लागले

अनेकदा मी कुणीच नसतो असतानाही
पूर्णत्वाला शून्यत्वाचे व्यसन लागले

नात्यामधला हरेक जण सोडुन जातो, जर
जिवास म्हाताऱ्या जगण्याचे व्यसन लागले

....रसप....
०३ फेब्रुवारी २०१५

ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद
Related Posts Plugin for WordPress, Blogger...