Thursday, June 11, 2020

परिणीता - एका कवितेची १५ वर्षं - (15 Years of Parineeta)

शरदचंद्र चट्टोपाध्याय ह्यांच्या दोन व्यक्तिरेखांनी भारतीय चित्रपटाला वारंवार भुरळ घातली आहे. एक म्हणजे 'देवदास' आणि दुसरी 'परिणीता'. 

२००५ ला विधू विनोद चोप्रा आणि प्रदीप सरकार ह्यांनी हिंदीत 'परिणीता' बनवला, त्याआधी हिंदीत ही कहाणी दोनदा बनवून झाली होती. 'देवदास' आणि 'परिणीता' ह्या दोन्ही प्रेमकहाण्या, किंबहुना प्रेमत्रिकोण. आणि बहुतेक तरी वारंवार आकर्षित होण्याचं कारणही हेच असावं. 'प्रेम त्रिकोण' हे बॉक्स ऑफिसवर हमखास चांगल्या भावात विकलं जाऊ शकणारं कथानक आहेच. 
मला जुन्या (आणि इतर भाषांमध्ये बनलेल्या काही) 'परिणितां'बद्दल फारशी माहिती नाही, पण २००५ चा 'परिणीता' बॉक्स ऑफिसवर खूप मोठा हिट नव्हता. २००५ च्या सर्वाधिक गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या दहांतसुद्धा तो आला नाही आणि ट्रेड ऍनालिस्ट्सनी बहुतेक तरी त्याच्यावर 'सरासरी'चाच शिक्का मारला असावा.
दुसरी गोष्ट ही की, एक चित्रपट म्हणूनही 'परिणीता' फार उत्तम वगैरे नक्कीच नव्हता. खरं तर त्यात बरेचसे दोषही होते आणि चुकासुद्धा होत्याच. उदाहरणार्थ - एका गाण्याचं रेकॉर्डिंग करतानाच्या दृश्यात शब्द तयार नसताना गाण्याचं रेकॉर्डिंग सुरु होणं आणि गायकांनी चक्क 'ट्रॅक'वर, तेसुद्धा री-टेक्स घेत गाणं दाखवलं आहे. जे १९६२ च्या काळी अगदीच प्रचलित नव्हतं. ही एक सिनेमॅटिक लिबर्टी समजून घेता येईल. मात्र असे इतरही काही तर्काच्या चौकटीत न बसणारे प्रसंग ह्यात आहेत. शेवटचा प्रसंग तर भावनिक ताणतणावाचा कमी आणि अंमळ विनोदीच वाटावा इतका फसलेला आहे. 
अनेक दोष असले, कहाणी नावीन्यशून्य असली तरीही 'परिणीता' मनात घर करून का बसला आहे ? काही कारणं आहेत. 


'परिणीता' म्हणून 'विद्या बालन'ला पाहणं हे अगदी नेत्रसुखद होतं. सोबत सैफ अली खान आणि संजय दत्तसारखे प्रस्थापित असतानाही  तिचा पडद्यावरचा वावर इतका सहज होता की हा तिचा पहिला चित्रपट असावा, असा संशयही येऊ नये ! 'ललिता' च्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक परिपक्वता विद्या बालनच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वात आहेच आणि ती तिथे उतरली असावी. तिच्या सौंदर्यातला गोडवा आणि साधेपणा असा काही होता की पाहणारा प्रत्येक जण शेखर किंवा गिरीश बनावा ! ह्या मधाळ चेहऱ्याच्या आश्वासक वावर व समंजस, संयत अभिनयाने 'परिणीता' जिवंत केली. विद्याची परिणीता कुठल्याच प्रसंगात तिचा संयतपणा सोडत नाही. शेखरसोबतचे हळवे क्षण असोत किंवा कुटुंबीयांसोबतचे मजा-मस्करीचे, प्रेमभंगाचा आघात असो किंवा अपमानाचे घाव असोत, सुख-दु:खाचे सगळे प्रसंग स्वतःचा तोल यत्किंचितही न ढळू देता स्वीकारणारी सर्वगुणसंपन्न नायिका अनेक वर्षांनी पडद्यावर आली होती आणि म्हणूनच तिच्यावर प्रेम जडलं. 
शेखर आणि ललिताचं नातं खूप नाजूक आहे. ललिताला शेखरच काय, इतरही सगळे अगदी गृहीतच धरत असतात. स्वतः: त्या दोघांनाही आपल्या मनात एकमेकांविषयी नक्की काय भावना आहे, हा प्रश्नही पडत नसतो, इतके ते एकमेकांसाठी गृहीत असतात. शेखरची आई ललितामध्ये एक आदर्श सून पाहत असते, त्या दोघांची घनिष्ट मैत्री तिला माहीतच असते, तरीही 'शेखरला लग्नासाठी मुलगी पाहायला जाण्यासाठी राजी कर' असं ललिताला बिनदिक्कत सांगते. आणि ललिताच्या चेहऱ्यावर क्षणार्धासाठीच गोंधळाची भावना तरळते. 'तू नाही म्हणालास म्हणून मी नाईटक्लबला गेले नव्हते', असं सांगताना मुसुमुसु रडणारी ललिता तर आपलीच एखादी हवीहवीशी गोंडस मैत्रीण वाटते. शेखरशी गैरसमजातून वाद झाल्यावर तो तिला अद्वातद्वा बोलतो, डोळ्यांत पाणी आणून ते सगळं ऐकून घेणारी ललिता तेव्हाही आपला तोल ढळू देत नाही. हे सगळी घुसमट आणि हे सगळे चढ-उतार विद्या बालनने अतिशय सहजतेने सादर केले आहेत. 



अर्थात, त्यात प्रदीप सरकारचेही क्रेडिट आहेच. अनेक प्रसंगात 'डिरेक्टर्स टच' स्पष्टपणे जाणवतो.
संतापलेला शेखर ललिताच्या थोबाडीत लगावून तणतणत दासबाबूंच्या हवेलीतून शेजारी स्वत:च्या घरी येतो. तो रस्ता क्रॉस करतो आणि तिथे बसलेला एक हमाल/ गाडीवाला बिडी शिलगावतो. माचिसचा उजेड पडदाभर वगैरे पसरत नाही. तिथे कंदील लावलेला असतोच. पण ती माचीस हे दाखवते की 'ठिणगी पडलेली आहे'. 'बॅकग्राऊंड'ला 'रतियां कारी कारी रतियां...' हे गाणं सुरु होतं. हा सगळा प्रसंग काव्यात्मक आहे. किंबहुना, 'परिणीता'चा ही आणि अशी काव्यात्मकता अनेकदा जाणवते. 
शेखर आणि ललिता एकमेकांना प्रेमाची कबुली देतात, त्यानंतर दार्जिलिंगला कामासाठी जाणारा शेखर ट्रेनमध्ये 'यह हवायें गुनगुनायें..' हे अवीट गोडीचं उडतं गाणं गातो. गाणं ट्रेनमध्ये आहे, तिच्याच तालावर आहे कारण प्रेमाची गाडी रुळावर आल्याची भावना मनात आहे. शेवटी ते गाणं 'झुकझुक झुकझुक' धीमी व कमी होत संपतं कारण शेखरच्या अपरोक्ष त्याच्या प्रेमाच्या गाडीला ब्रेक लागला आहे. हे सगळं खूप प्रतीकात्मक आहे. ह्या गाण्याच्या आधी नवीनबाबूच्या केबिनमधून चारित्र्यहनन करणारे अपमानास्पद बोल ऐकून ललिता रडत बाहेर पडते आणि त्यानंतर लगेच गाडीत बसून गिटार वाजवत गाणारा शेखर दिसतो. That's how he is. तो उथळ नसला, तरी अनभिज्ञ आहे. इतका की त्याला त्याच्या वडिलांचे दुष्ट हेतू ओळखता येतच नाहीत. म्हणून जेव्हा प्रत्यक्षात ललिताच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, तेव्हा तो मात्र 'धरती सजी अंबर सजा, जैसे कोई सपना...' गाऊ शकतो आहे. ही गाण्यांची पेरणी आणि त्यांचं सुंदर चित्रण 'परिणीता'चं वेगळेपण आहे. 
एका प्रसंगात शेखर ललिताला म्हणतो, 'हिसाब.. और मैं ?', जोडून पुढच्याच प्रसंगात शेखरच्या बाप - नवीन बाबू - त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ललितालाच म्हणतो, 'सारा खेल ही हिसाब-किताब का हैं !' लगेच पुढे असंही म्हणतो 'जहाँ मुनाफा ना हो वहाँ बिलकुल भी वक़्त बरबाद नहीं करना चाहिये'! 
अजून एका प्रसंगात गायत्री स्वतःच्या वाढदिवसाचा भला मोठा महागडा केक कापतेय आणि त्याच वेळी दुसरीकडे ललिता घरातच केकपात्रात केक करायला ठेवून ओव्हनचं बटन ऑन करते अन् फ्युज उडतो ! असे अनेक प्रसंग आहेत ज्यातले अंडरकरंट्स पाहणाऱ्याला समजून येतात. 

'परिणीता' काही पल्लेदार संवाद, पंचलाईन्सचा चित्रपट नाही. तो अश्याच अंडरकरंट्स आणि काव्यात्मकतेचा चित्रपट आहे. 
ह्या काव्यात्मकतेला महत्वाचा हातभार शंतनू मोईत्राचा आहे. एका मुलाखतीत शंतनू मोईत्राने असं कबूल केलं आहे की, परिणीताचं संगीत बनवताना त्याने आरडी बर्मनच्या विचारप्रक्रियेचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चित्रपट रिलीज झाल्यावर त्याला 'फिल्मफेअर'चा 'आरडी बर्मन अवॉर्ड फॉर न्यू म्यूझीक टॅलेंट' मिळाला, हा योगायोगही काव्यात्मकच ! ह्या सिनेमातून अनेक वर्षांनी अशी गाणी ऐकायला मिळाली की ती ऐकताना असं वाटलं की बनवणाऱ्याने आपल्या मनाचा एक तुकडा ह्यात घोळवून घोळवून विरघळवला आहे. सगळी गाणी मधुर (मेलोडिअस) आहेत. ती १९६२ च्या काळाला साजेशी आहेत. त्यात कुठलाही टेक्नो कलकलाट नाही किंवा शब्दांची ओढाताण नाही. 
'परिणीता' हा एक 'कम्प्लिट अल्बम' होता. त्यात 'पियू बोले....' आणि 'यह हवायें...' सारखी प्रेम गीतं आहेत, तर 'सूना सूना मन का आंगन..' आणि 'रात हमारी तो..' सारखी विरहगीतंही आहेत. 'कैसी पहेली जिंदगानी...' हा डान्स नंबर आणि 'धिनक धिनक धा..' हे लोकगीत सदृश विनोदी अंगाचंही गाणं आहे. प्रत्येक गाण्यासाठी स्वानंद किरकिरेचे अर्थपूर्ण शब्द होतेच, पण प्रत्येक गाण्यात शंतनू मोईत्राची मेहनतही आहे. कुठलंच गाणं पाटी टाकलेलं नाही. श्रवणीय गाण्यांची अचूक पेरणी आणि त्यांचं उत्तम चित्रीकरण ही विधू विनोद चोप्राची खासियत 'परिणीता'चं अजून एक वेगळेपण आहे. 

संजय दत्त आणि सलमान खान ह्या दोन अतिशय ओंगळवाण्या इसमांना काही चांगल्या कलाकृतींचा हिस्सा होण्याची संधी मिळाली. 'परिणीता' ही संजय दत्तसाठीची ती एक संधी होती. तो वाईट दिसलाय, त्याने नेहमीप्रमाणेच सुमार काम केलंय, पण तरी तो खटकला नाहीय कारण त्याच्याशिवाय इतर सगळं बऱ्यापैकी जमून आलं आहे. 


सैफ अली खान, हा एक अंडररेटेड अभिनेता आहे. त्याने साकारलेला शेखर, हा त्याच्या करियरमधल्या अनेक उत्तम कामांपैकी एक आहे. गाण्यांच्या चित्रीकरणांत सैफची सांगीतिक समज कळून येते. आशिक आवारा, ओले ओले... वगैरे थिल्लरपणापासून सुरुवात केलेला सैफ अली खान 'दिल चाहता है' नंतर जणू काही आमूलाग्र बदलला. मानेवरचे केस बावळटासारखे उडवत पोरकट नाचणारा भिक्कार नाईंटीजमधला सैफ ते 'पियू बोले...' मध्ये तालावर गिटारचे स्ट्रोक्स देणारा, पियानोसमोर सराईतासारखा बसणारा सैफ हा प्रवास खूप मोठा आहे. एके ठिकाणी वाचण्यात आलं होतं की, शेखरच्या भूमिकेसाठी सैफ 'फर्स्ट चॉईस' नव्हता. सुदैवाने का होईना, सैफच शेखर बनला आणि त्यात तो अगदी चपखल वाटला आहे. 'पडद्यावरची केमिस्ट्री' हा योग्य कास्टिंग आणि अभिनेत्यांमधली योग्य समज ह्याचा मिलाफ असतो, असं मला वाटतं. सैफ आणि विद्यामधली इथली केमिस्ट्री मस्त जमून आलेली आहे. मुख्य व्यक्तिरेखांचं असं एकमेकांशी घट्ट मिसळून येणं, ही 'परिणीता'ची अजून एक खासियत आहे.     


'परिणीता' हा केवळ एक चित्रपट नसून ती एक श्रवणीय सुरेल कविता आहे. विद्या बालन, शंतनू मोईत्रा आणि प्रदीप सरकार ह्यांची. त्यातलं काव्य अगदी सुदृढ सशक्त नसेल, पण अगदीच कमजोर अशक्तही नाही. महत्वाचं हे की त्यात 'काव्य आहे' आणि काव्य हे नेहमी सुंदरच असतं. म्हणून अनेक दोष, उणिवा असूनही 'परिणीता' ला मनात विशेष स्थान आहे. प्रत्येक सुंदर आविष्काराला असतं, तसंच. हक्काचं. 

- रणजित पराडकर 

Tuesday, June 02, 2020

निद्रिस्त

श्वासाला कुठली निश्चित लयही नाही
टिकटिकतो आहे घड्याळातला काटा
निद्रिस्तपणाला जाग निरर्थक आहे
निर्जन भवताली निर्जिव पडल्या वाटा

वाऱ्याचा हलका स्पर्श नसे झाडांना
आंधळी शांतता दूर दूर भरकटते 
पापणीस नाही ओलावा स्वप्नाचा
ह्या रात्रीचे पाऊल इथे अडखळते

पिंजरा मनाचा सताड उघडा केला
पण पक्षी काही केल्या उडतच नाही
अंधार कोणता कुणास भीती देतो
शिवशिवत्या पंखांनाही कळतच नाही

भिंतींची उंची कमी वाटते आता
खिडकीची चौकट अजून गहिरी होते
उद्गार पुसटसा कानी ऐकू येता
जाणीव कोरडी ठारच बहिरी होते

दुर्लक्षित झालो आहे की अज्ञात?
एकटेपणा आहे की हा एकांत?
छळवाद मनाचा मनात चालू आहे
माझ्यात कोणते तिसरेपण विश्रांत?

....रसप....
२० एप्रिल ते २ जून २०२०

Related Posts Plugin for WordPress, Blogger...