Sunday, July 26, 2015

अनिश्चिततेचा सोहळा (Movie Review - Masaan)


नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

शस्त्र छेद देऊ शकत नाही, आग जाळू शकत नाही, पाणी आणि हवासुद्धा नष्ट करु शकत नाही, असं आत्म्याचं वर्णन भगवद्गीतेत आहे. ह्या दोनच ओळींचा स्वतंत्र विचार केला तर त्यांचे अर्थ, अन्वयार्थ अनेक लावले जाऊ शकतात. एक असाही लावता येईल की, व्यक्ती शारीरिक रूपाने आपल्यातून निघुन जाते. पण तिच्या आठवणी मागे राहतात. काही जण त्या विसरवू शकतात आणि काहींचा मात्र त्या आठवणी पिच्छा शेवटपर्यंत पुरवतात. कालपरत्वे त्या पिच्छा पुरवण्यात गोडवा येतो. त्या उफाळून आल्या की चेहऱ्यावर स्मितरेषा उमटतात किंवा त्या हळवेपणा, नैराश्य, उदासीनताही आणतात.

मृत्यू ही एक सुरुवात असते. मागे राहिलेल्यांसाठी एकाच जन्मातली दुसरी आणि निघुन गेलेल्यासाठी नव्या जन्माची. सुरेश भट साहेबांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास -

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

- असं निघून गेलेली व्यक्ती म्हणु शकते, पण मागे राहिलेली मात्र हा छळवाद सहन करत राहते.

'पियुष अग्रवाल' ह्या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे असाच एक छळवाद 'देवी पाठक' (रिचा चढ्ढा) ह्या त्याच्या शिक्षिकेचा सुरु होतो. तिच्यासोबत फरफट होते तिचे वडील 'विद्याधर पाठक' (संजय मिश्रा) ह्यांचीही. गंगेच्या घाटावर, बनारसमध्ये राहणाऱ्या ह्या बाप-लेकीच्या आयुष्यात पियुषच्या मृत्यूमुळे बदनामी, असहाय्यता, अनिश्चितता आणि लाचारीचं एक भयाण सावट येतं. पाळंमुळं बनारसमध्ये रोवलेल्या वृद्ध विद्याधरसाठी तर शक्य नसतं, पण देवी मात्र ह्या सगळ्यापासून दूर जाण्याचा, बाहेरगावी जाऊन नवीन आयुष्य सुरु करण्याचा प्रयत्न करत असते.

दुसरीकडे त्याच बनारसमध्ये 'दीपक चौधरी' (विकी कौशल) हा त्याच्या पारंपारिक, कौटुंबिक व्यवसायातून दूर जाण्याचा, एक सन्मानाचं आयुष्य सुरु करण्याचा प्रयत्न करत असतो. चौधरी कुटुंब पिढ्यानपिढ्या गंगेच्या घाटावर अन्त्यक्रीयेची कामं करत असते. आपण 'डोम' असुन समाजाच्या दृष्टीने हलक्या जातीचे आहेत, ह्याची जाणीव असूनही 'दीपक' उच्च जातीतील शालू (श्वेता त्रिपाठी) च्या प्रेमात पडतो. शालूलाही तो आवडत असतोच. ही प्रेमकहाणीसुद्धा एक विचित्र वळणावर संपते आणि दीपकही एक अनिश्चितता व असहाय्यतेचं सावट डोक्यावर व मनात वागवत असतो.

प्राप्त परिस्थितीवर मात करून, तिच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जायलाच हवं, ह्याचं भान देवी आणि दीपकला असतंच आणि ते  तसंच करतात. त्यांच्या एरव्ही पूर्णपणे भिन्न असलेल्या कहाण्या गंगा-यमुनेच्या संगमाप्रमाणे एकत्र येतात. ज्या प्रकारे गंगा-यमुनेच्या संगमात सरस्वतीसुद्धा अदृश्यरूपाने आहे, त्याच प्रकारे ह्या दोन आयुष्यांच्या संगमात एका आश्वासक उद्याची आशा अस्पष्टपणे जाणवते.

'नीरज घायवान' दिग्दर्शक म्हणुन पहिला चित्रपट करताना 'मसान' मधून ही एक आव्हानात्मक कहाणी खूपच विश्वासाने मांडतात. आव्हानात्मक अश्यासाठी की कहाणीत पुढे काय घडणार आहे, हे अगदी नेमकं माहित नसलं तरी पुसटसं कळतच असतं आणि ते तसं घडतंही. नवोदित अभिनेत्यांसोबत अशी एक कहाणी मांडणं जी 'प्रेडिक्टेबल'ही आहे आणि समांतर चित्रपटाला साजेशी आहे, हे पहिल्याच प्रयत्नासाठी साधंसोपं नक्कीच नाही. पण दोन आयुष्यांचा संगम आणि त्रिवेणी संगमाचा त्यांनी जोडलेला संबंध आणि प्रत्येकाकडून ज्याप्रकारे त्यांनी केवळ अफलातून काम करून घेतलं आहे त्यावरून आपण हे निश्चितच म्हणू शकतो की अनुराग कश्यपसोबत 'गॅंग्स ऑफ वासेपूर' आणि 'अग्ली' सारख्या चित्रपटांत मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन काम केलेल्या नीरज ह्यांना त्या अनुभवातून पुरेशी शिदोरीही मिळालेली दिसते आणि त्यांच्यात उपजत धमकही नक्कीच असावी.

मुख्य भूमिकेत रिचा चढ्ढा आणि विकी कौशल अप्रतिम काम करतात. रिचा चढ्ढाचा अभिनय एकसुरी वाटतो. पण ती व्यक्तिरेखासुद्धा आपल्या कोशात शिरलेल्या एका व्यक्तीची आहे, जी भावनिक उद्रेक वगैरे फारसा दाखवत नाही, त्यामुळे कदाचित तो एकसुरेपणा भूमिकेची गरजच मानता येऊ शकतो.

विकी कौशलच्या 'दीपक'च्या व्यक्तिरेखेला मात्र विविध छटा आहेत आणि त्या सगळ्याच त्याने ताकदीने रंगवल्या आहेत. आघात, नैराश्य, अनपेक्षित आनंद, जिद्द वगैरे सर्व चढ-उतार तो उत्तमरीत्या पार करतो. त्याची 'शालू'सोबतची जोडीही अगदी साजेशी वाटते. छोट्याश्या भूमिकेत 'श्वेता त्रिपाठी' देखील 'शालू' म्हणून गोड दिसते आणि चांगलं कामही करते.

'संजय मिश्रा' पुन्हा एकदा आपण काय ताकदीचे कलाकार आहोत, हे दाखवून देतात. विद्याधरची लाचारी त्यांनी ज्या परिणामकारकपणे साकार केली आहे, त्याला तोडच नाही. एखादा महान गायक सहजतेने अशी एखादी तान, हरकत, मुरकी घेतो की ती घेताना इतर कुणाचीही बोबडी वळावी, त्या सहजतेने त्यांनी अनेक जागी कमाल केली आहे. हा अभिनेता, ह्या पिढीतल्या महान अभिनेत्यांपैकी एक आहे, ह्यात तिळमात्र शंका नसावीच !

संगीताची बाजू भक्कम आहे, हे विशेष. 'इंडियन ओशन' ने दिलेली मोजकीच गाणी श्रवणीय आहेत. दुष्यंत कुमार साहेबांच्या ओळींवर बेतलेलं गीत 'तू किसी रेल की तरह..' तर चित्रपट संपल्यानंतरही मनात रुंजी घालत राहतं.

संवाद चुरचुरीत आहेत. मोजक्या शब्दांत अधिकाधिक व्यक्त होण्याचा प्रयत्न जागोजाग दिसतो. हलक्या-फुलक्या विनोदाची पेरणी जिथे जिथे केली आहे, तिथे तिथे प्रत्येक वेळी हास्याची लकेर प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर उमटतेच !

'मसान' हा मनोरंजनपर चित्रपट नाही. त्यासाठी बाहुबली आणि बजरंगी अजूनही इतर पडद्यांवर कब्जा करून बसलेच आहेत. 'मसान' हा एक उद्गार आहे एका नवोदित दिग्दर्शकाचा. जो खणखणीत आणि सुस्पष्ट आहे. 'मसान'सारखे चित्रपट आजच्या चित्रपटांचं आश्वासक रूप आहेत, ह्यात वादच नाही. 'आयुष्य' आपल्याला जिथे नेतं, तिथे आपल्याला जावंच लागतं. त्या त्या ठिकाणी जाणं आणि तिथलंच होणं, हे जमवण्याची ज्याच्यात हिंमत असते, तो हा अनिश्चित प्रवाससुद्धा एक सोहळा बनवू शकतो. अन्यथा बहुतेक जण दुष्यंत कुमारांच्याच ओळींपासून प्रेरणा घेऊन सांगायचं झाल्यास -

जिंदगी रेल सी गुजरती हैं
मै किसी पुल सा थरथराता हूं

- इतकंच करु शकतात.

'मसान' अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी आहे.

रेटिंग - * * * *


- रणजित पराडकर

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज २६ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

Sunday, July 19, 2015

सुसह्य मेलोड्रामा (Movie Review - Bajrangi Bhaijaan)

अनपेक्षित धनलाभाचा आनंद खरं तर अतुलनीय असतो, पण तरी जर तुलना करायचीच झाली तर, 'तद्दन गल्लाभरू, व्यावसायिक आणि अक्कलदिवाळखोर असेल', अश्या धारणेने एखादा 'सलमानपट' बघावा आणि तो व्यावसायिक असला तरी अगदीच अक्कलदिवाळखोर न निघाल्याची भावना ही अनपेक्षित घबाड मिळाल्याच्या आनंदाच्या जवळपास जात असावी, असं मला 'बजरंगी भाईजान'मुळे जाणवलं.
चित्रपटातली एक कव्वाली अदनान सामीने गायली आहे. पडद्यावरही अदनान स्वत:च आहे. कोणे एके काळी तंबूइतका घेर असलेला अदनान सामी इतका बारीक झाला आहे की स्वत:च्या जुन्या कपड्यांत आता तो एका वेळी किमान चार वेळा मावू शकेल. अदनान सामीने बारीक होऊन जो सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे, तसाच, किंबहुना त्याहूनही मोठा धक्का सलमान खानने दिला आहे ! प्रथेप्रमाणे शर्ट न काढून नव्हे, शर्ट तर उतरतोच. पण त्याने चक्क बऱ्यापैकी अभिनय केला आहे ! मला जाणीव आहे की हे विश्वास ठेवायला थोडं जड आहे. पण असं झालंय खरं !
अर्थात ह्यामध्ये दिग्दर्शक कबीर खानचं अभिनंदन करायला हवं. कारण माझ्या मते, चांगले दिग्दर्शक सामान्य अभिनेत्यांकडूनही चांगलं काम करून घेऊ शकतात. (गुलजार साहेबांनी काही चित्रपटांत तर जम्पिंग जॅक जितेंद्रकडून अभिनय करून घेतला होता !) कबीर खानने सलमानच्या नाकावर 'एक था टायगर'मध्येही माशी बसू दिली नव्हती आणि 'काबुल एक्स्प्रेस' आणि 'न्यू यॉर्क'मध्ये त्याने जॉन अब्राहमच्या चेहऱ्यावर आठ्यांबरोबर अभिनयरेषाही उमटवल्या होत्या. 'न्यू यॉर्क'मध्ये तर मख्ख नील नितीन मुकेशसुद्धा त्याने यशस्वीपणे हाताळला होता !

कहाणीवर घट्ट पकड असणे, सर्वांकडून चांगला अभिनय करवून घेणे, कथानक एका विशिष्ट गतीने पुढे नेणे, अनावश्यक गाणी, प्रसंग टाळणे वगैरे कबीर खानची, किंबहुना कुठल्याही चांगल्या दिग्दर्शकाची वैशिष्ट्यं. 'बजरंगी भाईजान' मध्ये मात्र मध्यंतरापूर्वीच्या बहुतांश भागात कबीर भाईजान आपल्या एखाद्या सहाय्यकाला जबाबदारी सोपवून डुलकी घेत होते की काय, असं वाटलं. त्या वेळात मंद आचेवर शिजणाऱ्या 'मटन पाया'सारखं कथानक शिजत राहतं. शेवटी कुठे तरी कबीरसाहेबांना जाग येते आणि ते ताबा घेतात. मग मध्यंतरानंतर घटना पटापट घडत जातात आणि खऱ्या अर्थाने उत्तम दिग्दर्शकाचा चित्रपट सुरु होतो.

चित्रपटाचे ट्रेलर इतके बुद्धिचातुर्याने बनवले आहेत की कथानक कुणापासूनही लपलेलं नाही !
म्हणजे -
एक पाच-सहा वर्षांची पाकिस्तानी मुकी मुलगी एकटीच भारतात पोहोचते, हरवते. ती पवन कुमार चतुर्वेदी (सलमान) ऑल्सो नोन अ‍ॅज 'बजरंगी'ला भेटते. अल्पावधीतच त्या गोंडस मुलीवर प्रचंड माया करायला लागलेल्या बजरंगीला, ती पाकिस्तानातून चुकून भारतात आलेली आहे, हे समजल्यावर तो तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याची शप्पथ घेतो आणि तिला घेउन पाकिस्तानात पोहोचतो.
- हे कथानक तर चित्रपटगृहात शिरण्याच्याही आधीपासून प्रत्येकाला माहित असतं. मला तरी एकदाच ट्रेलर पाहून समजलं होतं. त्यामुळे साहजिकच जे काही घडतं, ते कसं घडतं हे पाहणं हाच एक उद्देश उरतो. बजरंगी त्या लहान मुलीला घेऊन पाकिस्तानात कसा जातो ? तिला पोहोचवू शकतो का ? परत येतो का ? नवाझुद्दिन सिद्दिकीची काय भूमिका आहे ? सीमारेषेवर असलेला जीवाचा धोका तो कसा पार पाडतो ? वगैरे वगैरे लहान-मोठे प्रश्न पडत असल्यास 'बजरंगी भाईजान' अवश्य पाहावा.



पहिला अर्धा भाग खुरडत, लंगडत चालला असला तरी त्या भागाला अगदीच कंटाळवाणा न होऊ देण्याचीही खबरदारी घेतलेली आहे. ह्या भागात टिपिकल सलमानछाप पांचट कॉमेडी न दाखवता खुसखुशीत प्रसंगांच्या पेरणीतून विनोदनिर्मिती केली आहे.
अधूनमधून करीना बोअर करते. पण सध्या तिने असंही खर्चापुरतंच किरकोळ काम करायचं ठरवलेलं असल्याने तिच्या भूमिकेची लांबी तिच्या 'झीरो फिगर' प्रमाणे 'कंट्रोल्ड' आहे. तिच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगला एक-दोन ठिकाणीच केंद्रित करून ठेवून एरव्ही तिला सलमान किंवा शरत सक्सेनाच्या जोडीला सहाय्यक म्हणूनच काम करायला दिलेलं आहे. जिच्याकडे काही काळापूर्वी एक आश्वासक अभिनेत्री म्हणून पाहिलं जात होतं, तिला अशी दुय्यम कामं मिळणं, ह्यामागे इतरांचा दोष वगैरे काही नसून तिचं तिनेच ठरवलेलं 'खर्चापुरतंच किरकोळ काम' आहे. त्यामुळे नो सहानुभूती !
लहान मुलगी 'मुन्नी/ शाहिदा' म्हणून झळकलेली चिमुरडी 'हर्षाली मल्होत्रा' अमर्याद गोंडस व निरागस दिसते. बजरंगीच्या आधी आपलाच तिच्यावर जीव जडतो. तिचा टवटवीत फुलासारखा चेहरा आणि डोळ्यांतला निष्पाप भाव ह्यांमुळे ती मुकी वगैरे वाटतच नाही. कारण ती गप्प बसूनही खूप बोलते.
एका पाकिस्तानी पत्रकाराच्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकीची एन्ट्री उत्तरार्धात होते. गच्च भरलेल्या लोकलच्या डब्यात 'आता अजून कुणीही शिरू शकत नाही' वाटत असतानाही शिरलेला एखादा किमयागार जसा आपल्यापुरती जागा करूनच घेतो, तसा पहिल्या प्रसंगापासूनच नवाझुद्दिन कथानकात स्वत:साठी एक कोपरा पकडतोच. त्याचा 'चांद नवाब' खरं तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बजरंगीच्याच बरोबरीचं मुख्य पात्र बनला आहे. अर्थात, नवाझुद्दिन हा एक हीरा आहे आणि सलमान 'हीरो', अभिनेता नाही. हीरा आकाराने कितीही छोटा असला तरी महाकाय दगड त्याच्यासमोर कधीही फिकाच. त्यामुळे ही तुलना खरं तर दुर्दैवी आहे.  
करीनाच्या वडिलांच्या भूमिकेत शरत सक्सेनाची भूमिकाही मर्यादित आहे, ती ते जबाबदारीने पार पाडतात.
छोट्या छोट्या भूमिकांत सीमारेषेवरील अधिकारी, पोलीस अधिकारी, बस कंडक्टर वगैरे अनोळखी चेहरे धमाल करतात.

बहुचर्चित 'सेल्फी ले ले' गाणं चित्रपटगृहात शिट्ट्यांचा पाऊस पाडतं. मात्र इतर गाणी जास्त चांगली आहेत. 'चिकन सॉंग' तर मस्तच जमून आलं आहे आणि त्याची पेरणीही अगदी अचूक झाली आहे. 'ह्या जागी एक गाणं हवंच होतं' असं क्वचित वाटतं, ते ह्या गाण्याबाबत वाटलं. एकूणच सर्व गाण्यांत मेलडी आहे. पण संगीत प्रीतम चक्रवर्तीचं असल्याने नेमकं कौतुक कुणाचं करावं की करूच नये, हे समजत नसल्याने मी हात आखडता घेतो !

उत्तरार्धात 'गदर'ची कॉपी मारायचा फुटकळ प्रयत्न तर केलेला नाही ना, अशीही एक भीती मला होती. पण सुदैवाने तसं काही झालेलं नाही. अर्थात, काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे, काही ठिकाणी मेलोड्रामाही आहे. पण हे सगळं सहनीय आहे. डोळ्यांत येणारं पाणी जर मेलोड्रामामुळे असेल, तर तो नक्कीच जमून आलेला आहे असं म्हणावं लागेल. ह्याचं श्रेय लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि संवादलेखक कबीर खानला द्यायला हवं. संवाद अगदी लक्षात राहतील असे नसले, तरी मार्मिक आहेत, खुमासदार आहेत. तडातड उडणारी माणसं (एक किरकोळ अपवाद!), गाड्या आणि फुटणाऱ्या भिंती वगैरे टाईप हाणामाऱ्या इथे नाहीत.

उत्तुंग पर्वतराजी डोळ्यांचं पारणं फेडतात आणि नजरेच्या पट्ट्यात न मावणारी रखरखीत वाळवंटं थक्क करतात. छायाचित्रण अप्रतिमच झालेलं आहे.

'बाहुबली' आणि 'बजरंगी भाईजान' ह्यांच्या शक्तिप्रदर्शनात चित्रपटगृह चालकांची चांदी आहे, हे ओसंडून वाहणारे पार्किंग लॉट्स सांगत आहेत. सर्वत्र परवापर्यंत चर्चा होती की 'बाहुबलीमुळे बजरंगी मार खाणार की बजरंगीमुळे बाहुबली', प्रत्यक्षात दोघांमुळे इतरांना मार बसणार आहे.

थोडक्यात, सलमानभक्तांना 'बजरंगी' आवडेल ह्यात तिळमात्र शंका नाही आणि सलमानत्रस्तांनाही तो असह्य होणार नाही, अशी खात्री वाटते.
काबुल एक्स्प्रेस, न्यू यॉर्क आणि एक था टायगर ह्या हॅटट्रिकनंतरच कबीर खान माझ्यासाठी 'Must watch Director' च्या यादीत विसावला होता. 'बजरंगी'ने त्याचं स्थान अजून भक्कम केलं आहे !

रेटिंग - * * *१/२


हे परीक्षण दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१९ जुलै २०१५) रोजी प्रकाशित झाले आहे -


Sunday, July 12, 2015

भव्य गोष्टीवेल्हाळपणा (Movie Review - Bahubali - The Beginning)

वर्षभरापूर्वी एका मित्राने म्हटलं की, 'ह्यावर्षी मी मुंबई मॅरेथॉन धावणार!'
मी म्हटलं, ' बाबा रे, तू काही अ‍ॅथलीट नाहीस आणि सेलेब्रिटी तर त्याहूनही नाहीस, कशाला उगाच जीवाला त्रास करून घेतोयस?'
पण तो ठाम होता. 'हे स्पिरीट आहे रे, 'स्पिरीट'. तुमच्या शहरासाठीचं तुमचं 'स्पिरीट''
तो पूर्ण नाही, हाफ मॅरेथॉन धावला. पण हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठीसुद्धा सॉलिड जिद्द लागते. त्या जिद्दीला सलाम म्हणून काही दिवसांनी त्याला एक प्रशस्तीपत्रक तर मिळालंच, त्याहीपेक्षा मित्रांकडून क्वचितच मिळणारी कौतुकाची थाप आणि कायमस्वरूपी 'इज्जत' मिळाली !

एस एस राजामाउलीचा 'बाहुबली' अशीच एक हाफ मॅरेथॉन पूर्ण करतो. भव्य, अतिभव्य, अतिशयोक्तभव्य अश्या एकावर एक कडी करत जाणाऱ्या परदेशी इतिहासपटांच्या जोडीला भारताने जोधा-अकबर वगैरे काही मोजकेच चित्रपट उभे केले आहेत. जे उभे केले, त्यांतही लिखित इतिहासाकडून कथानकं उधार घेण्याकडे जास्त कल होता. पूर्णपणे काल्पनिक कथानकावरील एक भव्य इतिहासपट बनवणं, हा एक मोठा धोका राजामाउलीनी स्वीकारला. ह्या चित्रपटाचं नेमकं बजेट काय ह्यावर १७५ कोटींपासून ते २५० कोटींपर्यंत माहिती उपलब्ध आहे. १७५ कोटीसुद्धा काही चिल्लर नाही ! मुघल-ए-आझम बनवताना दिग्दर्शक के आसिफ ह्यांनी निर्माता शापूरजी पालनजींना पाण्यासारखा पैसा वाहवायला लावला होता, तेव्हा शापूरजींचे धाबे कसे दणाणले होते, ह्याच्या सुरस कथा बऱ्याच वाचायला मिळतात. पण वाहिलेल्या पैश्याचं जे चीज मुघल-ए-आझमच्या आरसेमहाल व इतर भव्य सेट्समध्ये झालं, तसंच चीज 'बाहुबली'नेही केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

'बाहुबली'ची भव्यता शीर्षकांपासूनच सुरु होते. अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकाला करून दिलेली ही भव्यतेची अनुभूती, अगदी अखेरपर्यंत ठेवलेली आहे. काही दृश्यांमध्ये स्पेशल इफेक्ट्स कळून येतात, पण ते गुळगुळीत रस्त्यासाठी टोल भरण्याचा त्रास नसल्यासारखं निरुपद्रवी आहे.
कल्पनेच्या पलीकडे असणारा अतिप्रचंड धबधबा आपल्याला पहिल्याच दृश्यात दिसतो. एका मध्यमवयीन स्त्रीच्या (राम्या कृष्णन) मागावर काही सैनिक लागलेले असतात. तिच्या कुशीत एक लहानगं बाळही असतं. ती त्या सैनिकांपासून वाचते, मात्र जखमी अवस्थेत पाण्याच्या त्या अथांग प्रवाहाला शरण जाते. पण त्या लहान बाळाला सुरक्षित ठेवते. हे बाळ ह्या महाकाय जलपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भूमिपुत्रांना मिळते आणि त्यांच्या टोळीच्या मालकिणीला दैवदत्त पुत्रप्राप्ती होते. लहानपणापासून जलपर्वताच्या वरच्या बाजूस काय असेल, ह्याची जबरदस्त ओढ असलेला हा पुत्र - शिवा - पर्वतकडा चढून जायचे असंख्य अयशस्वी प्रयत्न करत राहतो. अनेक वर्षांनंतर 'शिवा'च्या (प्रभास) प्रयत्नांना यश मिळतं आणि तो त्या अज्ञात दुनियेत पोहोचतो. इथे असलेले लोक त्यालाच काय, कुणालाच माहित नसतात. काय असतं तिथे ? कोण असतात ते लोक ? शिवा कोण असतो ? नेमका संघर्ष काय आणि कुणाचा आहे ? ही सगळी कहाणी बरीच मोठी आहे. इतकी मोठी की ती एका चित्रपटात मावलेलीच नाही ! उत्कंठा शमते आहे असं वाटत असताना ती परत ताणली जाते आणि चित्रपट त्याच अपूर्ण अवस्थेत संपतो ! 'बाहुबली - द कन्क्ल्युजन - इन २०१६' असं झळकतं.



बहुतेक लोकांना हे खरंच झेपत नाही. कारण भारतीय चित्रपटाच्या प्रेक्षकाला अश्या अतिभव्यतेची आणि अपूर्णतेची सवय नाही. त्यातही 'पुढील वर्षापर्यंत थांबा' असं सांगितलं जाणं, म्हणजे त्यांना एक थट्टाच वाटते ! काही अंशी बरोबरही आहे म्हणा. पुढील भाग वर्षाखेरीस किंवा दोन-तीन महिन्यांत प्रदर्शित करायला काहीच हरकत नव्हती. पण, निर्मात्यांचं गणित काय असेल ते अडीचशे कोटींची फोडणी जेव्हा बसते, तेव्हाच कळत असावं !

मूळ चित्रपट तेलुगुमध्ये बनलेला आहे. हिंदीत त्याची डब केलेली आवृत्ती आहे. ह्या विसंगातीशी जुळवून घेण्यात आपला थोडासा वेळ जातो. त्यात भर म्हणून काही ठिकाणी गंभीर रसभंग आहेत. उदा. - शेकडो लोक मिळून ओढत असलेल्या दोरखंडाला झोळ असणे, काहीही गरज नसताना मध्येच एक आयटम सॉंग येणे, सर्वदूर फरशीचं बांधकाम आणि दृष्टीपथातसुद्धा एखादंही झाड नसताना म्हातारीने मोठ्ठा खड्डा भरून काटक्या गोळा करणे आणि त्या काटक्या तिला तिच्या आसपास २४ तास मिळतच राहणे वगैरे. डब केलेले संवाद असल्याने त्यांत विशेष दम नाहीच, उलटपक्षी 'वो देखो तुम्हाला बेटा क्या कर रहा है.. वो देखो तुम्हारी मां क्या कर रही है..' सारख्या पुनरुक्तीही खटकतात.

मुख्य भूमिकेत 'प्रभास' खूप सहज वावरतो. त्यात वारंवार सुपरस्टार 'नागार्जुना'चा आभास होत राहतो. त्याची एनर्जी केवळ अप्रतिम आहे. काही अमानवी दृश्यं तो त्याच्या पिळदार देहयष्टी व आश्वासक शारीर अभिनयाने विश्वसनीय करवतो आणि त्याच वेळी 'अवंतिका' (तमन्ना) चा प्रेमिक म्हणून हळुवार अभिनयसुद्धा चांगलाच करतो.
त्याच्या विरुद्ध भूमिकेतल्या 'राणा दग्गुबती'ला आपण 'दम मारो दम' मध्ये बऱ्यापैकी मोठ्या आणि 'बेबी' व 'यह जवानी है दिवानी' मध्ये छोट्या भूमिकांत पाहिलं आहे. त्याची धिप्पाड देहयष्टी त्याचं इथलं काम आपोआपच करून जाते. माजलेल्या रानटी सांडाशी झुंजण्याचा प्रसंग असो की एका साम्राज्याचा अधिपती म्हणून मिरवणं असो, त्याला शोभून दिसतं.
तमन्नाच्या अंगावर एका दृश्यात असंख्य फुलपाखरं बसलेली दाखवले आहे, ते जराही अतिशयोक्त वाटू नये इतकी ती फुलासारखी सुंदर दिसली आहे. सुंदरीच्या वेशभूषेत नाजूक आणि एका लढवय्यीच्या भूमिकेत राकट दिसणं तिने चांगलं निभावून नेलं आहे.
राम्या कृष्णनने दिलेलं काम चोख केलं आहे आणि अनुष्का शेट्टीला ह्या भागात तरी विशेष काम नाहीच, कदाचित ती पुढच्या भागात जास्त दिसेल.
इतर सहाय्यक भूमिकांत सत्यराज (ज्याला आपण 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये दीपिकाच्या वडिलांच्या भूमिकेत पाहिलं होतं) आणि नासर लक्षात राहतातच. खासकरून सत्यराजचा 'कट्टप्पा' जबरदस्त !

रहमान आणि एम एम करीम, हे इलय्या राजांनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने हिंदीला दिलेले हल्लीचे अनमोल संगीतकार आहेत. करीमच्या क्रिमिनल, जिस्म, जख्म, सूर अश्या अनेक चित्रपटांच्या संगीताची मोहिनी रसिक श्रोत्यांच्या मनावरून सहजासहजी उतरणारी नाही. इथेही करीम उत्कृष्ट मेलोडी देतात. खासकरून 'पंछी बोले..' हे गाणं तर संपूच नये असं वाटावं, इतकं गोड आहे !

सेंथिल कुमार ह्यांचं छायाचित्रण आणि मनू जगध ह्यांचं कलादिग्दर्शन निश्चितच दाद देण्यायोग्य आहे. माहिष्मतीचा राजमहाल, अद्भुतरम्य निसर्ग, प्रत्येक दृश्यात जपलेली भव्यता केवळ अप्रतिम !

राजामाउलींचं अभिनंदन आधीच करून झालं आहे. तरी एक कहाणी सांगायला सात तासांची आवश्यकता भासणं, हे बरोबर आहे की नाही हे दुसरा भाग पाहिल्यावरच नेमकं कळेल. पण ह्या पहिल्या भागाची कहाणीसुद्धा आटोपशीर करायला हवीच होती. केवळ भव्यतेच्या ध्यासापोटी इतर काही ठिकाणी थोडी डोळेझाक केली असावी की काय असं वाटतं. अनावश्यक प्रसंग, लांबण, गोष्टीवेल्हाळपणा थोडा टाळायला हवा होता.
मात्र ह्या सगळ्याला सहन करून 'बाहुबली' एकदा तरी पाहावा असाच आहे. कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड अ‍ॅथलीटाचा जोडीने आपला नवखा भारतीय मित्र जिद्दीने धावायला उतरला आहे. कौतुक वाटायलाच हवं !
वन स्टार फॉर द एफर्ट.

रेटिंग - * * *


हे परीक्षण दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१२ जुलै २०१५) रोजी प्रकाशित झाले आहे -



Wednesday, July 01, 2015

एक जुनी कविता आठवली

ध्वस्त इमारत जुनी-पुराणी
तुटकी दारे फुटक्या खिडक्या
गळके छप्पर ओंगळ भिंती
कुरकुरणाऱ्या टेबल-खुर्च्या

इमारतीच्या पुढ्यात खंबिर
स्थितप्रज्ञ निश्चल गुलमोहर
वाताहतीस सांगत होता
कशी लागली होती घरघर

"कधी काळची हसरी फुलती
शाळा किलबिल, गोंगाटाची
अज्ञाताशी लढते आहे
एक लढाई अस्तित्वाची"

नकोनकोसे दाटुन आले
कृतज्ञतेला फुटला पाझर
चाचपले मी रित्या खिश्याला
माझी गरिबी झाली कातर

गुलमोहर बाबाला केवळ
डबडबलेली नजर वाहिली
ताठ कण्याने म्हटले त्याने
"एक जुनी कविता आठवली"

....रसप....
१ जुलै २०१५
Related Posts Plugin for WordPress, Blogger...