Showing posts with label विनोदी कविता. Show all posts
Showing posts with label विनोदी कविता. Show all posts

Wednesday, August 14, 2013

त्याला शाहरुख आवडत नाही, तिला शाहरुख आवडतो..

त्याला शाहरुख आवडत नाही, तिला शाहरुख आवडतो
पिच्चर रिलीज झाल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो

मी तुला आवडते पण शाहरुख आवडत नाही
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही !!

शाहरुख म्हणजे उथळ काला, शाहरुख म्हणजे बडबड
शाहरुख म्हणजे मालमसाला, शाहरुख म्हणजे धडधड
शाहरुख डोकं खराब करतो, शाहरुख वैतागवाडी
शाहरुख म्हणजे हसूची लाट, शाहरुख म्हणजे गोडी
शाहरुख वेडेवाकडे चाळे, शाहरुख म्हणजे अ‍ॅक्टिंग चुलीत
शाहरुखकडे गुपचूप पाहता, मन जाऊन बसतं त्याच्या खळीत

दरवर्षी पिच्चर येतो, दरवर्षी असं होतं
शाहरुखवरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

शाहरुख आवडत नसला तरी ती त्याला आवडते
शाहरुखसकट आवडावी ती म्हणून तीही झगडते

रुसून मग ती निघून जाते, बसून राहते थेटरात
त्याचं-तिचं भांडण असं सणासुदीच्या दिवसात !

....रसप....
१३ ऑगस्ट २०१३

---------------------------------------------------------------

मूळ कविता - 

त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो 

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही  
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही 

पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ 
पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ
पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी 
पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजे झाडी 
पाऊस रेंगाळलेली कामं, पाऊस म्हणजे सुटी उगाच 
पावसामध्ये गुपचूप निसटून, मन जाऊन बसतं ढगात 

दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं 
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं 

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते 
पावसासकट आवडावी ती म्हणून तीही झगडते 

रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात
त्याचं-तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात 

- सौमित्र 

Thursday, May 16, 2013

केस पांढरा (तरूण कविता !)


पुन्हा पुन्हा मी भांग पाडतो
केस पांढरा तरी न लपतो
मनात अजुनी विशीतला मी
हा नालायक वय दाखवतो !

प्रवासात शेजारी माझ्या
असते जेव्हा सुंदर तरुणी
डोळ्यांवर गॉगल लावुन मी
चोरुन बघतो नजर फिरवुनी
संवादाच्या सुरुवातीला
तीही हसते, मीही हसतो
मग ती म्हणते 'अंकल' जेव्हा
सारा उत्साहच गळपटतो
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो

फेसबूकवर चिकना मुखडा
मित्र विनंती मला पाठवे
जुन्या काळची अवखळ वृत्ती
क्षणात फिरुनी मनी जागवे
त्या ललनेशी चॅट कराया
असा उचंबळ दाटुन येतो
आणि तिचा संदेश वाचता
सुरुवातीला 'दादा' असतो !
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो

किती जरी दिलफेक वागलो
जाणिव एकच मनात असते
गेले आता ते दिन गेले
फिरून त्यांचे येणे नसते
पिकल्या केसाला ना औषध
तरुण मनाला मी सावरतो
जरी उधळले मनात वारू
लगाम घालुन मी आवरतो
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो..

....रसप....
१६ मे २०१३

Sunday, January 20, 2013

पप्पूला राजकारणी व्हायचंय !!


पप्पूला राजकारणी व्हायचंय
मागच्या-पुढच्या सात पिढ्यांचं
एकाच जन्मात खायचंय..
आमच्या पप्पूला राजकारणी व्हायचंय !

कसाबसा पप्पू १२ वी शिकला
पास-नापासच्या छापा-काट्यात तितपतच टिकला
पुढच्या पुस्तकांचा गठ्ठा मात्र रद्दीमध्ये विकला
१२ वीत पास होण्यासाठी एक क्लास लावला होता
तसंच आता एखादं 'पक्ष कार्यालय' लावायचंय
कारण पप्पूला राजकारणी व्हायचंय !

त्याने ठरवलंय, नोकरी करायची नाही
कारण माहितेय, मेहनत झेपायची नाही !
पण शौक पुरे करण्यासाठी बाप कमाईही पुरायची नाही !
ढुंगण न हलवताही पैसा यायला पाहिजे
म्हणूनच त्याला एकदाच 'मीटर डाऊन' करायचंय
एव्हढ्यासाठीच पप्पूला राजकारणी व्हायचंय !

'सामाजिक जाणीव' त्याला बालपणापासून होती
शाळेतल्या दिवसात त्याला पोरं बिचकून होती
ह्याच्या बालहट्टांपुढे आईसुद्धा मान तुकवून होती
आता बाळ मोठा होऊन माजोरडा सांड झालाय
माजलेल्या सांडाला आता सारं गाव उजवायचंय
मस्तवाल पप्पूला राजकारणी व्हायचंय

उद्या पप्पू उभा राहील तिकीट विकत घेऊन
मतं मागेल, मतं मिळवेल दारोदार फिरून
मीच आणीन निवडून त्याला सगळं माहित असून
कारण 'हा' पप्पू आला नाही, तरी फरक काय पडतो ?
दुसऱ्या कुठल्या पप्पूला डोक्यावर घ्यायचंय !
ह्या देशात प्रत्येक पप्पूला राजकारणी व्हायचंय

प्रत्येक लोकशाहीचं 'अराजक'च बनत असतं
पाहावं तिथे आजकाल अघटित घडत असतं
लोकहिताच्या राज्यघटनेचं बाड कुजत असतं
सुशिक्षित समाजावर राज्य करायला -
अर्धशिक्षित नालायकांनीच सरसावायचंय
वर्षानुवर्षं 'पप्पूं'ना राजकारणी व्हायचंय !
मागच्या-पुढच्या सात पिढ्यांचं एकाच जन्मात खायचंय..
इथे प्रत्येक पप्पूला राजकारणी व्हायचंय !!

....रसप....
२० जानेवारी २०१३

Sunday, July 01, 2012

एक उनाड दिवस तू कधी तरी जगशील..


एक उनाड दिवस तू कधी तरी जगशील
पुन्हा पुन्हा मिटल्या डोळ्यांनी
फक्त मलाच बघशील
स्वत:शीच हसशील
गुपचूप लाजशील
पुन्हा पुन्हा मोबाईल काढून
जुना मेसेज वाचशील
रुळणाऱ्या चुकार बटेचा
गालाला होणारा हळूवार स्पर्श
खट्याळ वारा सारखा देत राहील
आणि तुला वाटेल -
माझी नजर थांबली आहे तुझ्या चेहऱ्यावर

- असं मला नेहमी वाटायचं
असं मला नेहमी दिसायचं
पण आत्ताच कळलं की,
नाही. तू कधीच बांधली गेली आहेस
तुझ्या आवडीच्या बंधनात
त्याची पोच म्हणून ही 'गोड' बातमी!
हरकत नाही!
मी तरी कुठे तुझ्याशिवाय झुरतोय?
मी तर जुन्या आठवणींवर मनापासून हसतोय !

पण एकच काळजी वाटते
तुझ्या लहानगीने मला 'मामा' म्हणू नये !
जखमेवरच्या खपलीला हसता हसता उघडू नये !!

....रसप....
१ जुलै २०१२

Tuesday, April 24, 2012

ती कविता तर माझी होती :-(


दुनिया वाचुन हसली होती
कुणी 'उचलली' हळूच होती
'मेल'मधुन जी धावत होती
ती कविता तर माझी होती :-(

प्रसववेदना मीच साहिल्या
शब्दकळ्या त्या मीच फुलविल्या
पर्वा त्याची कुणास नव्हती
पण कविता तर माझी होती :-(

बिननावाची तुम्ही छापली
अगतिक पुरुषांनीहि वाचली
'नावही लिहा', तुम्हा विनंती
कारण कविता माझी होती :-(

माझी प्रतिभा माझ्यापाशी
नसेल भिडली आकाशाशी
तरी पोटची पोरच होती
ती कविता तर माझी होती :-(

तुमच्यासाठी 'स्लॉट' एकला
पेपरवरचा 'प्लॉट' रंगला
'नेटवरून साभार'च होती
पण कविता तर माझी होती :-(

'भव्य-दिव्य' नावाचा पेपर
अडलं का हो तुमचं खेटर?
गरिब कवीच्या नावापोटी
खरेच कविता माझी हो ती! :-(

....रसप....
२४ एप्रिल २०१२
एका नावाजलेल्या वृत्तपत्रात माझी कविता 'इंटरनेटवरून साभार, कवीचे नाव माहित नाही' असे लिहून छापून आली. राग नाही, रोष नाही. छापून आली, ह्याचा आनंदच. पण नाव न आल्याने जरासं दु:ख झालं. म्हणून ही जराशी गंमत..!

Sunday, April 15, 2012

फेसबुकावर!!


जडलो घडलो फेसबुकावर
रडलो हसलो फेसबुकावर

तिने सोडले होते मजला
पुन्हा भेटलो फेसबुकावर

ठाव न पत्ता ज्या गावाचा
तिथला बनलो फेसबुकावर

फोटोमध्ये चिकणी दिसली
भाळुन फसलो फेसबुकावर

पूर्वी होतो किती 'श्यामळू'
'चटोर' बनलो फेसबुकावर

शेजाऱ्याला जाणत नव्हतो
'फ्रेंड' जाहलो फेसबुकावर

नको नको ते 'टॅग' लागले
'लंपट' ठरलो फेसबुकावर

किती भेटले आंबटशौकिन
म्हणुनच रमलो फेसबुकावर !

....रसप....
१५ एप्रिल २०१२

Sunday, April 08, 2012

ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'


ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
पण मला जराही समजत नाय!

मी दिसतो काळा जरा बावळा
शहरी पोरांहून वेगळा
चष्मे, गॉगल, उंची कपडे
स्मार्टफोन अन गळ्यात टाय
मी मऱ्हाटमोळा साधा ब्वाय
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
पण मला जराही समजत नाय!

शेतावर माझ्या मी रमतो
मित्रांशी गल्लाही जमतो
उगाच आलो शहराला ह्या
धावपळीने मी दमतो
तिला पाहुनी फक्त एकदा
दूर उडूनी थकवा जाय
पण....
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
अन मला जराही समजत नाय!

मी पोरींशी ना कधी बोललो
'हलो-हाय' मी नुकते शिकलो
नाव सांगतो कसेबसे
ती माझ्यावर जोरात हसे
प्रेमाची भाषा 'ग्लोबल' नाय
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
पण मला जराही समजत नाय!

कपास फुलते गालावरती
डोळ्यामधुनी कालवे झरती
चवळीची ती शेंग कोवळी
कधी वाटते तिख्खट मिरची
खळखळणारी मंजुळ वाणी
ऐकून मी तर गुंगून जाय
माझ्या मनचे बोलू काय?
मला जराही समजत नाय!
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'!

....रसप....
८ एप्रिल २०१२

Sunday, April 01, 2012

तू घे विसावा जरा........!


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८९ मध्ये माझा सहभाग.. (एक हलकं फुलकं 'सुनीत' लिहिण्याचा प्रयत्न आहे..)

होते रोज सुरू पहाटसमयी गर्दी इथे धावती 
सारे शांतपणे कसे समजुनी वेगास त्या पाळती ?
कंटाळा करती कधी न बसती काट्यासवे चालती 
पाहूनी तुज वाटले गजब ना ही मुंबईची गती ? 

जागेला धरण्यास लोकलमधे घेती उड्या धावुनी  
हॉटेलात कधी पहा बसुनिया खाती भुका मारुनी 
जो-तो येउन हो अधीर बनुनी होतो उभा मागुनी 
घाई ही कसली असे? कळ नसे, थांबावया जाणुनी

घेणे श्वास जरा नसेच जमणे ह्या धावणाऱ्या जगा
नाही मंजुरही कुणास दमणे, रेंगाळणेही उगा 
विश्रांती नच लाभते क्षणभरी आकाशवेड्या ढगा
त्याला ठाउक एक केवळ असे होणे जळाचा फुगा !   

तूही आजच जुंपलास झटण्या गाड्यास ऐसा खरा 
झाला थोर जरी 'मनी*' कमवुनी, तू घे विसावा जरा........!  

....रसप....
१ एप्रिल २०१२ 
शार्दूलविक्रीडीत - गागागा ललगा लगा लललगा गागा लगागालगा 
मनी* = Money, पैसा  

Monday, February 27, 2012

तू माझी गर्लफ्रेंड होशील का?


"जीना मरना साथ साथ" वाले
फिल्मी डायलॉग बोलणार नाही
पण तुझ्याशिवाय मला तर
बिलकुलच जमणार नाही
माझा प्रपोज जरा तरी सिरिअसली घेशील का?
सांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का?

बाईकवरती पोरगा-पोरगी बघून
माझं डोकंच फिरतं
सिंगल सीट बाईक चालवणं
मला जाम बोअर वाटतं
कधी तरी माझ्या मागे बाईकवर बसशील का ?
सांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का?

शाहरुख माझ्या डोक्यात जातो,
तरी त्याचे पिक्चर बघतोय
मी रोमँटिक बनायचा
मनापासून प्रयत्न करतोय
पण हात पुढे केल्यावर, हातात हात देशील का?
सांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का?

आयुष्याचा फंडा -
"पगार तीनसौ साठ" झाला
तुला ब्लँक कॉल देऊन देऊन
मला नंबर पाठ झाला
कधी तरी तूसुद्धा एखादा मिस्ड कॉल देशील का?
सांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का?

तुला "व्हॅलेन्टाइन डे"चं मस्त गिफ्ट द्यायचंय
"रोज डे"ला सगळ्यांसमोर रेड रोज द्यायचंय
तुझ्या चिकण्या फोटोला व्हॉलेटमध्ये ठेवायचंय
आणि तुझ्याकडे बघणाऱ्या प्रत्येकाला 'तोडायचंय'
पण एकदा तरी माझ्याकडे बघून जरा हसशील का?
सांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का?
 

.....रसप....
२७ फेब्रुवारी २०१२

Monday, February 20, 2012

रस्त्या-रस्त्यावर येथे..


"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल - भाग १४" मध्ये सहभागाचा माझा प्रयत्न-

रस्त्या-रस्त्यावर येथे लुटण्याला टोल असावे
रस्त्यांचे खड्डे म्हणजे 'बाबूं'चे झोल असावे

ह्या निवडणुकांच्या खेळी हरणारा जिंकत असतो
व्ह्यूअरशिप मिळण्यासाठी एक्झिटचे 'पोल' असावे

"बी एम् डब्ल्यू"चा मालक कसला फटिचरसा होता
बहुधा त्याचे अन माझे चुकलेले 'रोल' असावे

नकट्या नाकाची होती, मी तरी निवडली होती
का माझ्या नाकावरचे हे दिसले 'मोल' असावे ?

मित्रांना माझ्या बघते अन गोड लाजुनी हसते
का मलाच देण्यासाठी चपलेचे 'सोल' असावे?

मी पैसा साठवतो ती बिनधास्त उडवुनी येते
ती म्हणजे खिश्यास माझ्या पडलेले 'होल' असावे
 

....रसप....
१९ फेब्रुवारी २०१२

Sunday, January 22, 2012

तू नसताना..


तू नसताना मी ऑफिसलाही उगाच दांडी देतो
अंमळ उठतो उशीराच अन् पिक्चर, क्रिकेट बघतो !

तू नसताना मज भूक लागते, दाबुन-चापुन खातो
फिरवून हात मी पोटावरती ढेकर-तृप्ती देतो !

तू नसताना मी ताणून देतो, गाढ शांत झोपतो
अन् स्वप्नपऱ्यांना मिठीत घेउन कुशीत मलमल भरतो !

तू नसताना मी खुशीत असतो मित्रांना बोलवतो
ते जुने सुखाचे दिवस आठवुन नॉस्टॅल्जियात रमतो

तू नसताना मी शिवारातला बैल मोकळा बनतो
ये उधाण आनंदाला अन् मी मस्तवाल बागडतो !

....रसप....
२२ जानेवारी २०१२

Tuesday, November 08, 2011

पैशासाठी अमेरिकेला इतके गेले - (विडंबन)


समाज अमुचा इतका पुढारलेला आहे
रॉक गायकाच्या डोईला शेला आहे

मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
हरकत नाही, "मंदिर" नामक ठेला आहे

पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
कर्जामध्ये गोराही बुडलेला आहे !

जेव्हा मिळते दर्शन नेत्यांचे जाणावे
निवडणुकीचा काळ नजिक आलेला आहे

गाडी माझी रोज थांबते बारसमोरी
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे

वाट पाहतो आहे, त्याने फोन करावा
यमास माझा मिस्ड कॉल गेलेला आहे

दुनिया इतकी कष्टी का हे विचारले मी
पुन्हा 'जितू'चा जन्म म्हणे झालेला आहे

मूळ रचना - 'बेफिकीर !'
विडंबन - ....रसप....
५ नोव्हेंबर २०११

मूळ रचना - "पैशासाठी अमेरिकेला इतके गेले.."

Monday, October 24, 2011

मोडला “कणा”

सर्वप्रथम कवीवर्य कुसुमाग्रजांना अभिवादन.
क्षमस्व.


"सोडताय का सर मला"
-जोडून हात दोन्ही
इस्त्री उतरल्या कपड्यांमधली
मूर्ती केविलवाणी

पळभर श्वास रोखून बॉस
बोलला वरती पाहून,
"Reports अजून दिले नाहीस
चाललास कुठे पळुन ?

सकाळपासून PC तुझा
मांडीत घेउन बसलास
काम अर्धे आहे तरी
येऊन उभा ठाकलास?

जबाबदारीची जाण नाही
घड्याळ बघत बसतोस
F.T.R. "झीरो" तुझा
नुसतेच दिवस भरतोस ..!!

बैलासारखी कामं करता
डोकं जरा वापरा
५:३० ला घोड्यावर बसता
आधी खाली उतरा..!!"

'बैल' म्हणताच शेळीच्या त्या
डोक्यात तिडीक गेली
कुणास ठाऊक त्याच्यात इतकी
हिंमत कुठून आली....!

झटक्यासरशी जीभ उचलून
त्याने टाळुस लावली
"रेकॉर्ड्स काढून पाहा माझे
सुट्टी कधी घेतली ?

सहा महीन्यात घरी,
मी वेळेत गेलो नाही
बायको-मुलं रुसून बसलीत
घरात संवाद नाही

मंद झाली बुद्धी आता
राब राब राबुन
लक्ष्मी माय देई आम्हा
तरी दर्शन दुरून..!!

दिवस दिवस झिज-झिज झिजून
मोडला जरी कणा
पाठीवरती हात ठेवून
नुसते "मर" म्हणा..!!"


....रसप....

Monday, August 01, 2011

"S. N. S." (सोशल नेटवर्कींगचे श्लोक)

ट्विटा, ऑर्कुटा, फेसबूकी दिसावे
असे "सोशली" सर्व काही करावे
नसे छंद ना जाण काही तरीही
दिसे त्याच ग्रूपात सामील व्हावे


कुणाचा कुणाशी मिळे सूर भावे
कुणाशी उगा वाद घालीत जावे
जरी ना कुणाला कुणी जाणतो रे
तरी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकार व्हावे


म्हणे "आज आंघोळ केलीच नाही"
म्हणे "आज कॉफीत माशी मिळाली"
"असा पादलो मी, तसा वास आला"
अशी फालतू रोज उक्ती करावी..!


नसे दूरचाही जरी गोत काही
तरीही कुणाला कुणी टॅग लावी
कुणी दात काढी जरी बोध नाही
अशी शृंखला ती पुढे जात राही


इथे वेगळी "शॉर्ट लँग्वेज" चाले
"एलोएल"* जोरात हसता म्हणाले
म्हणी 'के'च 'ओके'स हटकून सारे
"बि आर् बी"* म्हणूनी कुणी लुप्त झाले..!


इथे सुंदरींचे पहावेत फोटो
भिडवण्यात 'टाक्या'स गुंतून जो तो
पहा आज हुंगून तूही मजेने
जुळे बंध झटक्यात अनुबंध होतो


जरी वाटले की असे फोल चाळा
इथे सज्जनांचा भरे खास मेळा
कधी कोण विद्वान संवाद साधी
कधी आवडी मित्र होतात गोळा


तुम्हा लाभला हा किती छान मेवा
करा "नेटवर्कींग" 'फ्री'चीच सेवा
कधी व्यावसायीक संबंध जोडा
जुने मित्र शोधा खरा तोच ठेवा



....रसप....
२७ जुलै २०११



एलोएल* = LOL (Laughing Out Loud)
बि आर् बी* = BRB (Be Right Back)

Tuesday, July 05, 2011

गुगलून गुगलून..!! (तिचे उत्तर)


"तुझी भेट झाली गुगलता गुगलता" असे म्हणणाऱ्या "त्या" गुगलर ला तिने टाकलेला गुगली..


मला न होती तुझी प्रतीक्षा बंध जोडला गुगलून गुगलून
नेटकरी तू हाडाचा रे शोधले मला गुगलून गुगलून

माझ्या मागे मागे होता कॉलेजात अन शाळेमधेही
तेही न का रे पुरले तुला माग काढला गुगलून गुगलून ?

मला 'पोक'तो मला 'टॅग'तो तू माझ्या वॉली 'हाय*' पोस्टतो
उगा धाडला स्क्रॅप तुला मी खुळा जाहला गुगलून गुगलून

तुला न काही काम की धंदा भार भुईला बनून राहिला
अरे टपोरी शोध नोकरी जरा पोर्टला** गुगलून गुगलून

तुझ्यासारखे मी किती पाहिले वास काढती जिकडे तिकडे
असे वाटते मानवरूपी श्वान भेटला गुगलून गुगलून

गप्प बैस तू ब्लॉक करीन मी सदैव खातोस डोके माझे
वाटले मज असशील आता जरा सुधरला गुगलून गुगलून



....रसप....
२ जुलै २०११
३४ मात्रांची गझल लिहायचा प्रयत्न केला आहे.



*हाय = Hi !!
**पोर्टला = (जॉब) पोर्टल्सना



Monday, July 04, 2011

गुगलता गुगलता..!!

तुझी भेट झाली गुगलता गुगलता
मला तू मिळाली गुगलता गुगलता

तुला शोधले मी इथेही तिथेही
किती रात झाली गुगलता गुगलता

कधी ऑर्कुटी मी कधी फेसबूकी
नसे एक वाली गुगलता गुगलता

अता स्कॅन डोके करावेच वाटे
कमी स्पीड झाली गुगलता गुगलता

कदाचीत माऊसही 'बोर' झाला
पडे आज खाली गुगलता गुगलता

तुझे ओठ दोन्ही गुलाबी कळ्या त्या
दिसे तीच लाली गुगलता गुगलता

तुझा स्क्रॅप येता खुळा जाहलो मी
उडे शीर भाली गुगलता गुगलता

तुला 'पोक'ले मी, तुला 'टॅग'ले मी
मजा खास आली गुगलता गुगलता!!

किती शेर सांडून गेलेत 'जीतू'
गझल एक झाली गुगलता गुगलता..!


....रसप....
२ जुलै २०११


Friday, June 24, 2011

इन्क्रिमेंट Increment



कुटुंबाच्या व आपल्या सुखासाठी, भवितव्यासाठी आपण नोकरी करत असतो. पण ह्या कामामध्ये आपण इतके बुडतो की कुटुंबासाठी, घरासाठी व स्वत:साठी जगायचं राहूनच जातं! मग प्रश्न पडतो की.. "जगण्यासाठी नोकरी की नोकरीसाठी जगणं?"  बरं, इतकं मरमर करून नोकरीतही बहुतेक वेळा तोंडाला पानंच पुसली जातात..! तेव्हा असं वाटत नाही का की, आपलं गणितच चुकलं..? घरासाठी ऑफीसला येतो आणि ऑफिसला आल्यावर घराची आठवण येते का? जेव्हा जेव्हा अवहेलना होते, दुर्लक्ष केलं जातं... तेव्हा "उगाच मी माझ्या घरापासून दुरावलोय" असं वाटतं का..??

येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी-
बघा, घरची आठवण येत का..!!
 



कवी सौमित्र ह्यांच्या "मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा... बघ माझी आठवण येते का.." ह्या कवितेपासून प्रेरित -


मुसळधार पाऊस ऑफिसमधून पाहा
बघ घरची आठवण येते का..
हात लांबव.. ओठाला लाव तो कॉफीचा कप
इवलासा घोट पिऊन बघ
बघ घरची आठवण येते का..!

वा-याने वाजणारी खिडकीतली शीळ कानावर घे...
डोळे मिटून घे.. तल्लीन हो..
नाहीच जाणवलं काही, तर बाहेर पड
कॉरीडॉरमध्ये ये.
तो ओसाडलेला असेलच
पाय मुडपून उभा राहा
कळ येईल पोटरीमधून!!
बघ घरची आठवण येते का..

मग चालू लाग
शांततेच्या अगणित सुया टोचून घेत
चालत राहा कॉरीडॉर संपेपर्यंत
तो गोलाकार आहे, संपणार नाहीच
शेवटी परत ये..
आळोखे देऊ नकोस... सुस्कारे सोडू नकोस
पुन्हा त्याच खुर्चीत बस..
आता....... बॉसची वाट बघ..
बघ घरची आठवण येते का..

दाराबाहेर मोबाईल वाजेल..
नजर टाक.. बॉस असेल
त्याला स्माईल दे... शिव्या तो स्वत:च घालेल
तो विचारेल तुला तुझ्या थांबण्याचं कारण
तू म्हण "माझा REVIEW बाकी आहे"
तो वळून ए.सी. बघेल.. तू तो लगेच चालू कर
थोडासा त्याच्याकडे वळव
बघ घरची आठवण येते का..!!

मग (अजून) रात्र होईल!
तो तुझं अप्रेजल काढेल..
म्हणेल - "तू होपलेस आहेस!"
पण तू ही तसंच म्हण !!(मनात)
ग्रेड्स कमी होतील..
KRA अजून वाढतील..
तो खाली सही करेल....
त्याच्या शे-यांकडे बघ..
बघ घरची आठवण येते का..

ह्यानंतर, हताश मनाने
SHUT DOWN करायला विसरू नकोस;
ह्यानंतर, मागचं इन्क्रिमेंट
नुसतं आठवायचा प्रयत्न कर;
ह्यानंतर, सगळा अपमान गिळून.. हसून दाखवायचा प्रयत्न कर

येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी -
बघ घरची आठवण येते का..?

....रसप....
२३ जून २०११

Tuesday, April 12, 2011

अति झालं क्रिकेट..! ;-)

किती तुमचा स्टॅमिना हो? विचारावं थेट..
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

टेस्ट नंतर वनडे नंतर ट्वेंटी२० खेळतात
वर्ल्डकप नंतर चारच दिवसात आयपीएल रंगतात
जिंकल्यानंतर विजेत्यांच्या चैम्पियन्स ट्रोफी भरतात
कुणीतरी खातो का हो, जेवल्यानंतर भरपेट?
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

कोण कुठला बिस्ला म्हणे कॅलीससोबत खेळतोय
डिब्ली-डुब्ली बोलरसुद्धा पहिली ओव्हर टाकतोय
वाकूच शकत नाही तरी, आशिष नेहरा धावतोय!
मनोरंजनाची अशी कुणी देतं का हो भेट?
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

धडकी भरे उरात जेव्हा हॉल धावत यायचा
भारतीयांच्या फिरकीपुढे फलंदाज नाचायचा
दिवसभरात २०० धावा, चांगला खेळ वाटायचा
आता क्रिकेट बघताना - "फॅसन युवर बेल्ट"
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

किती आमच्या जीवाला घोर लावणार तुम्ही
स्कोरकडे लक्ष ठेवून कामं करतो आम्ही
सामने बघता बघता पितो बादल्या-बादल्या पाणी!
हार्टपेशंटच्या ठोक्यांचा वाढतो आहे रेट
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

रोज घरी जातो तेव्हा मैच सुरू असते
स्पोर्ट्स चैनल लावलं म्हणून आमची 'ही' चिडते
झोपता झोपता डोक्याशी भुणभुण करू लागते
माझ्या मात्र डोक्यात असतं - "गेली कशी विकेट?"
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

बीसीसीआय बघता बघता दादा मंडळ झालं
क्रिकेटचं 'मार्केट' आता उपखंडात आलं
मधल्यामध्ये खेळाडूंचं उखळ पांढरं झालं!
नाक्या-नाक्यावरती आता "क्रिकेट-क्रिकेट-क्रिकेट"
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

देव झाला सचिन आणि हीरो झाला धोनी
एक होतात क्रिकेटसाठी राम-रहीम-जॉनी
विजयासाठी धावा-दुवा हात उचलून दोन्ही
विसरून जातात भ्रष्टाचार अन फिक्सिंगचे रैकेट
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

....रसप....
१२ एप्रिल २०११

Monday, March 28, 2011

दे घुमाके!! (World Cup 2011 Special)

बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध....

.
पहिलाच सामना 'बांगला'शी
तोही त्यांच्या गल्लीत
न्यूझीलंडला खडे चारले
होते त्यांनी हल्लीच

विसरलो नव्हतो अजून
मागल्या वेळचा धक्का
भारताने 'बांगला'चा
घेतला होता धसका

पण सेहवागसमोर बांगलाचा
निभाव नाही लागला
गेल्या वेळच्या पराभवाचा
असा वचपा काढला

पुढचा सामना 'साहेबा'शी
'चिन्नास्वामी'त खेळला
सचिनने षटकारांचा
मस्त पाउस पाडला

डावाच्या शेवटी मात्र
आपण नांगी टाकली
कशीबशी ३३८
धावसंख्या गाठली

गोरा 'स्ट्रोस ' नेमका तेव्हाच
फॉर्मामध्ये आला
इंग्लंडचा पाठलाग
जोर घेउ लागला

"आता हरलो" वाटताच
झहीर धावून आला
तीन बळी घेउन त्याने
नूर पालटून टाकला

'साहेबा'नेही मनाशी
जिद्द होती केली
स्वान आणि शेह्झादने
चांगलीच झुंज दिली

शेवटच्या चेंडूला
श्वास रोखले होते
१ चेंडू दोन धावा
असे गणित होते

शंभर षटकी थराराचा
सार्थ शेवट झाला
रोमहर्षक सामना तो
बरोबरीत सुटला..



....रसप....
२८ मार्च २०११

आयर्लंड विरुद्ध....

आयरिश आर्मी 'साहेबा'चं
नाक कापून आली
मोठ्या जोशात भारतासमोर
येउन उभी झाली

नाणेफेक जिंकून त्यांनी
फलंदाजी घेतली
२ बाद ९ नंतर
शतकी भागी रचली

युवराजच्या फिरकीने
मग जादूच केली
पाच गडी बाद करून
"आयरीश" कंबर मोडली!!

सुस्थितीतला डाव त्यांचा
कोसळून गेला पार
तरीसुद्धा दोनशेचा
आकडा केला पार

कागदी शेर भारताचे
पुन्हा ढेर झाले
ठराविक अंतराने
बाद होऊ लागले

सचिन-विराट-युवराज-धोनी
थोडे थोडे खेळले
पठाणने फिरवला दांडपट्टा
गंगेत घोडे न्हाले

धापा टाकत भारताने
सामना जिंकला होता
"मजा नहीं आया यार"
प्रेक्षक बोलला होता..


....रसप....
२८ मार्च २०११


नेदरलंड विरुद्ध..

.
पहिल्या तिन्ही सामन्यांत
पियुष 'चा*वला' होता
तरीसुद्धा चौथ्यामध्ये
त्याला ठेवला होता

"डचां"चं आव्हान तसं
विशेष काही नव्हतं
पण आपलंही घोडं
कुठे भरवश्याचं होतं?

पहिली बैटिंग त्यांची होती
सुरुवात बरी केली
पुढच्या खेळाडूंनी मात्र
अगदी निराशा केली

१८९ मध्येच
डाव पुरा झाला
सहेचाळीस षटकांमध्ये
संघ बाद झाला

भारताची सुरुवात
धडाकेबाज होती
सचिन-सेहवागच्या लौकिकास
साजेशीच होती

पण दिमाखदार विजय काही
साधता आला नाही
पाच विकेट गेल्या
अती केली घाई

पुन्हा एकदा युवराज
उपयुक्त खेळला
धोनीच्या साथीने
बेडा पार केला


....रसप....
२८ मार्च २०११
* च चंद्राचा नव्हे

द. आफ्रिकेविरुद्ध....

चार सामन्यात सात गुण
असे होते कमावले
आफ्रिकेशी दोन हात
करण्यासाठी सरसावले

कर्णधार धोनीने
नाणेफेक जिंकली
खुषी-खुषी ताबडतोब
पहिली बैटिंग घेतली

सेहवाग-सचिनची जोडी
पुन्हा एकदा 'पेटली'
आफ्रिकेची गोलंदाजी
धू-धू धुतली

तिस-या पॉवरप्लेने
आपला घात केला
पत्त्यांच्या बंगल्यासारखा
सारा डाव पडला

३५०-४०० चं
स्वप्न गेलं धुळीत
२९६ मध्येच झाले
अकरा वीर चीत!

आफ्रिकेची सुरुवातही
आश्वासक झाली
आघाडीच्या सगळ्यांनी
डाव-बांधणी केली

भज्जीच्या तीन बळींनी
पारडं हलकं कललं
मुनाफलाही दोन बळींचं
फुक्कट घबाड लाभलं

आयत्या वेळी भज्जीने
शेपूट पायात घातली
शेवटचं षटक टाकण्याला
चक्क माघार घेतली!

६ चेंडू १३ धावा
समोर गडी नववा
फार कठीण नव्हतं
की 'हरभजन'च हवा

विचार करून शेवटी
चेंडू नेहराकडे दिला
माझा तरी हात तेव्हा
कपाळाकडे गेला

तुडतुड्या नेहराने
डोकं गहाण ठेवलं
"चार चेंडूत सोळा" चं
धर्मादाय केलं..!


....रसप....
२९ मार्च २०११

Thursday, March 24, 2011

सासू किती गोड!

बायको म्हणते मला, "एकदा तरी बोल..
माझी सासू किती किती गोड..!

सासरी जातोस तेव्हा कसली चंगळ असते
कशी तुझ्या राहण्याची बडदास्त ठेवते
तुला विचारूनच सगळा स्वयंपाक करते
तुझ्यासाठी खास कमी तिखट घालते
तोंडावर नाही तर माझ्याकडे बोल..
माझी सासू किती किती गोड..!

मी तुझ्यावर चिडलेय हे ती तुला सांगते
मला कसं पटवायचं हेसुद्धा शिकवते
चूक तुझी असली तरी मला झापून काढते
तुला समजून घेण्यासाठी मला समजावत असते
लाजेकाजेस्तव का होईना खरं खरं बोल..
माझी सासू किती किती गोड..!

तुलाही माहित आहे कुठे कुठे दुखतं
मुलीपासून दूर राहता मन कसं तुटतं
पुन्हा पुन्हा आतमधून काय भरून येतं
किती किती हुंदक्यांना पचवावंच लागतं
प्यायलेल्या आसवांचं जाणतोस ना मोल?
तुलासुद्धा वाटतं ना.. सासू किती गोड!
तुलासुद्धा वाटतं ना.. सासू किती गोड!"

....रसप....
२४ मार्च २०११
Related Posts Plugin for WordPress, Blogger...