Tuesday, April 28, 2015

ह्या लेखाला शीर्षक नाही

बराच विचार करून व जबाबदारीने काही लिहितो आहे. ह्यात कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. काही चुकल्यास सांगावे. कमी-जास्त झाल्यास समजुन घ्यावे आणि हे काही न करता जर डोक्यात राख घालूनच घ्यायची असेल तर तसंही करावे. कारण मी माझं मत मांडणारच !

गेल्या काही महिन्यांत असं दिसून आलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात 'गझल' हा काव्यप्रकार हाताळला जातो आहे. ही तसं पाहिलं तर चांगली गोष्ट आहे. कारण ultimately एका अत्यंत सुंदर काव्यप्रकाराचा प्रसार होतो आहे. तो सर्वदूर पोहोचतो आहे. त्याची वाढ होते आहे.
पण ही खरोखर 'वाढ' आहे की 'सूज' आहे, ह्याचा विचार करायला हवा, असं मला वाटतं.

माझ्या लक्षात आलेल्या किंवा असं म्हणू की मला संशय येतो आहे, अश्या काही गोष्टी मी इथे लिहितो :-

१. सोय - शेर लिहिणे, गझल लिहिणे हे अभिव्यक्तीची गरज म्हणून नाही तर शुद्ध 'सोय' म्हणून लिहिले जाणे. दोन ओळींत एखादा विचार मांडून झटक्यात मोकळं होता येतं. तीच जमीन पाळून पुढील दोन ओळींत दुसराच कुठला विचारही मांडला जाऊ शकतो. त्यामुळे माथापच्ची करत बसावी लागत नाही. एक कवी म्हणून स्वत:च्या मनाची झीज करावी लागत नाही किंवा कमी झिजावं लागतं. ह्यामध्ये प्रामाणिक नाईलाजही असतो काहींचा. धावपळीचं जग आहे. लोकांना घड्याळ्याच्या काट्यावर पळावं लागतं. ह्या ओढाताणीत, वाहतं पाणी ज्याप्रमाणे आपला उतार आपणच शोधून घेतं, तसंच त्यांची अभिव्यक्ती दोन ओळींची ही सोय हुडकून काढत असावी. इथवर ठीक आहे. पण असं सगळ्यांच्याच बाबतीत निश्चितच नाही. स्पष्टपणे सांगायचं झाल्यास, एरव्ही हा आळसाचा भाग झाला असावा. म्हणूनच मुसलसल गझला फारच कमी लिहिल्या जात आहेत.

२. लोकप्रियता - गझल हा अनेकविध कार्यक्रमांतून व जनमानसात त्याविषयी असलेल्या एक प्रकारच्या उदात्त व उच्च प्रतिमेमुळे लोकप्रिय काव्यप्रकार आहे. परखडपणे सांगायचं झाल्यास 'टाळ्या कमावणारी अभिव्यक्ती' आहे. शेराला मिळणारी दाद व कवितेला मिळणारी दाद ह्यांतला फरक सांगायची आवश्यकता नाही. ही दाद कवींना भुरळ पाडते आहे. त्यामुळे 'गझल' समजुनही न घेता गझल लिहिणारे लोक झालेले आहेत. अर्थात बहुतेकांची सुरुवात साधारण लिखाणापासूनच होते. आज जे कुणी श्रेष्ठ व अनुकरणीय गझलकार आहेत, त्यांनीही सुरुवातीला लिहिलेल्या गझला सामान्य असू शकतील किंवा आजही त्यांच्याकडून होणारं सगळंच लिखाण अत्युच्च प्रतीचंच असेल असंही नाही. पण झालं असं आहे की सामान्य लिहूनही, केवळ त्या संरचनेच्या आकर्षकतेमुळे त्या सामान्यत्वावर पांघरूण ओढलं जात आहे. काही लोक तर असल्या तोडक्या मोडक्या गझला घेउन मंचावर विराजमान होत आहेत आणि त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवलेलंही दिसतंय. उदा. - काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीचा कुठल्याश्या राज्यस्तरीय मुशायऱ्यात सहभागी होऊन सन्मानचिन्ह घेतानाचा फोटो पाहिला. ही व्यक्ती अगदी काल-परवापर्यंत अत्यंत सदोष भाषेत सुमार कविता व चारोळ्या लिहित असे. मला आश्चर्यमिश्रित आनंद झाला म्हणून मी त्या व्यक्तीच्या गझला वाचण्यासाठी शोध घेतला. जे काही मला मिळालं, ते पाहून मला केवळ कीव आली.

३. गुरु-शिष्य - स्वयंघोषित गुरू (उस्ताद) ही कमी नाहीत ! काही वर्षांपूर्वी एका काव्यमेळाव्यात एका 'नामवंत' गझलकार व्यक्तीने, एका गुरुतुल्य व्यक्तीला 'माझा इस्लाह घ्या' अशी अप्रत्यक्ष सुचवणी माझ्यासमोर केली होती. त्यावेळी ती गुरुतुल्य व्यक्ती, मी व इतर काही स्नेही ह्या संभ्रमात पडलो की हसावं की चिडावं ! परंतु, आज असं दिसतंय की अनेक गुरुकुलं चाललेली आहेत. जरा कुणी 'गझल म्हणजे काय' असा विचार करणाराही दिसला की त्याला पंखाखाली घेण्यासाठी लोक तयार आहेत. हे उतावीळ उस्ताद त्या धडपडणाऱ्या कवी/ कवयित्रीला घाई-घाईने गझलेच्या डोहात उतरवत आहेत, ढकलत आहेत. आणि तो निरागस भाबडा जीवही जीवावर उदार होऊन गटांगळ्या खातो आहे. लोकांना इस्लाह देण्याची व घेण्याचीही खूप घाई झालेली आहे.

४. श्रेष्ठत्व - कुठे तरी अशी एक भावना आहे की 'गझल लिहिणे हे कविता लिहिण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.' गझल लिहिणारा आणि ती वाचणारा दोघेही ही भावना मनात घेउन असतात. अनेक (जवळजवळ सगळ्याच) कवी/ कवयित्रींचा प्रवास 'कविता ते गझल' असाच सुरु आहे किंवा झालेला दिसतो. बहुसंख्य लोक एकदा गझल लिहायला लागले की कविता लिहित नाहीत. ह्या श्रेष्ठत्वाच्या आभासामुळेही अनेक जण गझलेकडे ओढले जात आहेत. तंत्रात बसवलेल्या १० ओळी लिहिल्या की त्यांना आपण खूप भारी काही केलं आहे, असं वाटायला लागतं. बढती मिळाल्याचा आनंद होतो. Ideally कविता व गझल हे दोन्ही समांतरपणे विकसित होणं, हे एका कवीमनासाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही.

५. अनभिज्ञता - 'वृत्तात लिहिणं म्हणजे गझल लिहिणं', असा एक समज पसरला आहे किंवा असा एक संस्कार नकळतच अनेकांच्या मनावर झालेला आहे किंवा इथे पुन्हा आधी लिहिलेला 'सोय' हा मुद्दा आहेच. 'दोन ओळी वृत्तात लिहिणे आणि त्यांवर आशय-विषयाचे बंधन नसणे', ही चौकट खूपच सोयीची आहे. ह्या अनभिज्ञतेमुळे किंवा सोयीमुळे लोक कविता लिखाणाला सुरुवात केल्यावर काही काळानंतर गझलकडे वळतात. कविताही वृत्तात लिहिलेली असू शकते किंवा वृत्तात कविताही लिहिली जाते, हे त्यांना कदाचित लक्षातच येत नसते किंवा ते कालबाह्य आहे, असा समज असतो किंवा असं काही समोर सहसा येतच नसल्यामुळे 'हेही करता येईल का' असा विचार मनात येत नसावा किंवा सोय पाहिली जात आहे.
(काही गझलकार जेव्हा क्वचित कधी तरी कविता लिहितात तेव्हा ते मुक्त लिहितात ही कदाचित अभिव्यक्तीला पडलेली खीळ असावी कारण 'तिसरी ओळ' सुचतच नाही.)

६. कुरूप कविता - हे एक कडवट सत्य आहे की कविता कुरूप, अनाकर्षक झाली आहे. विषय व आशयाची विशिष्ट बंधनं कवितेवर लादली गेली आहेत. कविता सामाजिकतेच्या भल्यामोठ्या आभाळाचा एक छोटासा तुकडा तोडून, त्याला अंथरून तेच आपलं विश्व समजते आहे. ह्याच्या बाहेर विचार करणारे लोक साहजिकच स्वत:ला परग्रहवासी समजत आहेत आणि दुसरीकडे वळत आहेत. 'कविता' त्यांना रमवू शकत नाही आहे. प्रयोगशीलतेचा दुराग्रह नसावाच, पण प्रयोग करूच नये असाही दुराग्रह कसा बरोबर ? जाणून बुजून चौकटी झुगारल्या जात आहेत. ओठांवर रुळणारी, हृदयात घर करणारी कविता फार क्वचित लिहिली जाते. त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमी झाला आहे.

------------
हे व असे अजूनही काही विचार आहेत. आत्ता इतकेच सुचले. ह्याव्यतिरिक्त काही विचार तुमच्याकडेही असतील. पण ह्या सगळ्यातून काही काळजीचे मुद्दे मला वाटतात :-

१. अति तेथे माती - ह्या घडीला माझ्या फेसबुक न्यूज फीडची स्थिती अशी आहे की जर माझ्यासमोर (चारोळ्या लिहिणाऱ्या बहुतेकांना मी अनफॉलो केलेलं असतं) १० वेगवेगळ्या कवी/ कवयित्री मित्रमंडळींच्या १० पोस्ट्स असतील तर त्यातील ४-५ तरी शेर किंवा गझला असतात. हे प्रमाण खूप जास्त आहे. स्पष्टपणे हेच दिसून येतंय की कवितेचे इतरही काही प्रकार असतात ते कुणाला माहितही नाहीत किंवा ते हाताळायचेच नसावेत. ज्या प्रमाणे अति संख्येने लोक कविता लिहायला लागल्याने सुमार कवितांचं पीक आलं आहे, त्याच प्रमाणे खूप जास्त प्रमाणात गझलही लिहिली जाऊ लागल्याने दर्जा साहजिकच खालावला आहे.

२. नीर-क्षीर विवेक - कवी/ कवयित्री त्यांच्या परीने त्यांचे विचार गझलेतून, शेरातून मांडतात. त्यात गझलेचा उद्गार कधी असतो, कधी नसतो. कधी तर त्यात तांत्रिक चुकाही असतात. पण मायेने पंखाखाली घेणारे उस्ताद लोक जबाबदारीने चुका दाखवत नाहीत की काय ? जिथे गुरुच्या अधिकाराने खडसावायची आवश्यकता असते, तिथे ते कुणी करत नसावेत की काय ? काही जाणकार व अधिकारी लोकांना वाईटपणा घ्यायचा नसतो. त्यामुळे चुकीचे, वाईट असे काही असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याकडे कल असतो. परिणामत: चुकीचं किंवा वाईट लिहिणारी व्यक्ती पुन्हा पुन्हा तेच लिहित राहते. कालांतराने तिच्यात सुधारणा होतही असेल, पण ती वेळीच होत नाही आणि ती होईपर्यंत अश्या लिखाणाची लागण इतरही काहींना होते.

३. चौफेर वाढ खुंटली - बहुतांश लोक 'कविता ते गझल' असाच प्रवास करत आहेत. ह्यांतले ९९% लोक तरी असे असावेत ज्यांनी फक्त मुक्त छंद कविता व गझल हेच दोन काव्यप्रकार हाताळलेले असतील. ("हाताळणे" म्हणजे ८-१० वेळा प्रयत्न केले, असं नसतं हे मी मानतो.) कवितेतील अनेकविध प्रकार त्यांना आकर्षित करत नाहीत. गझल लिहिणारे बहुतेक जण कविता लिहित नाहीत. स्पष्ट चित्र असं आहे की, 'कविता लिहिणे म्हणजे मुक्त लिहिणे किंवा फार तर अक्षरछंदात लिहिणे आणि वृत्तात लिहिणे म्हणजे गझल लिहिणे.' कवी एक तर कवितेत अडकला आहे किंवा गझलेत गुरफटला आहे. सर्व काव्यप्रकार हाताळणारे, आवड असणारे एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक असतील. ह्यामध्ये असं दिसतंय की प्रचंड प्रतिभा असूनही काही जण एकाच कुठल्या तरी चौकटीत स्वत:च स्वत:ला बांधून/ कोंडून घेत आहेत.

४. दर्जा घसरणे - ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून असेल, पण कविता व गझल ह्या दोन्हीचा दर्जा इतका खालावला आहे की काही वाचावंसंही वाटत नाही आणि वाचावंसं वाटत नसतानाही वाचलं जातच असल्याने लिहावंसंही वाटत नाही ! वृत्तपूर्तीसाठी काहीही कवाफी जुळवले जाताना दिसतात, कुठल्याही रदीफांच्या शेपट्या लावलेल्या आढळतात आणि कसलीही जमीन कसली जाताना पाहण्यात येते.

-----------

माझ्या ह्या वाक्यावर सर्वांनी नीट विचार करावा अशी माझी विनंती आहे.
"गझल चारोळीच्या वाटेने चालली आहे."

चारोळीमुळे कवितेची अपरिमित हानी कशी झाली आहे, हे सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे. गझलेमुळेही असंच काहीसं होणार आहे किंवा कदाचित होतही आहे. कारण 'गझल'च्या नावाखाली अकाव्यात्मक लिहिले जाण्याचे असंख्य नमुने सर्रास दिसत असतात. वाचल्यावर किळस वाटावी असं लिखाण 'गझल' ह्या गोंडस नावाने लिहिलेलं मी सहन केलं आहे. एक काव्यरसिक म्हणून मला हे चित्र खूप विदारक वाटत आहे. कविता विद्रूप झालीच आहे. गझलही विवस्त्र होते आहे. 'सत्य नग्न असतं' हे मला मान्य आहे. पण म्हणून नग्नतेचा आग्रह धरणं मात्र पटत नाही.

कविता म्हणजे 'पसरट लिखाण' आणि 'साचेबद्ध मिसरे' अश्या दोन बाजू असलेलं एक खोटं नाणं बनत चाललं आहे किंवा कदाचित बनलंच आहे. माझ्यासाठी कविता एक दोन बाजू असलेलं एखादं खरं/ खोटं नाणं नसून एक हीरा आहे. त्याला अगणित पैलू पडायला व पाडायला हवे.

------------

माझ्या ह्या विचारांशी सगळेच सहमत नसतील. काहींना ह्यात आक्षेपार्ह वाटेल. काहींना अपमानास्पद वाटेल. कुणी दुखावले गेल्यास मी क्षमा मागतो. मात्र जे लिहिलं आहे ते मनातलं लिहिलं आहे. हे माझं अवलोकन आहे. माझ्या जागेवरून जे दृश्य दिसत आहे त्याचंच हे वर्णन आहे.

असंही होईल की काही लोकांना माझं बोलणं पटेलही. त्यांनी ह्याला असंतोषाची ठिणगी समजुन रान पेटवू नये. बोंब मारत सुटू नये. विचार करावा. हातभार लावावा. परिस्थिती कशी सुधरेल हे पाहावं. प्रत्येकाने आपापलं योगदान दिलं, आत्मभान बाळगलं तरी ते खूप मोठं असेल.
कवितेच्या पालखीला सर्वांनी वाहायचं आहे, हे नक्कीच.

धन्यवाद !
- ....रसप....
- रणजित पराडकर

2 comments:

  1. रणजीतजी, परिपूर्ण लेख. मी माझ्या कवितेला कधीही कोणत्याही सूत्रात बंधू इच्छित नाही. कदाचित ती माझी कुवतही नसेल. भले समीक्षकांना तिच्यात रुची वाटली नाही तरी चालेल. पण कविता सर्वसामान्य माणसांच्या काळजाला भिडली पाहिजे या मताचा मी आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मला वाटतं तुम्हाला लेख कळला नाही.

      Delete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...