Sunday, April 05, 2015

'विस्मयकारक सत्यशोधाचा रहस्यमय प्रवास' (Movie Review - Detective Byomkesh Bakshy!))

सत्य.
जगातली सगळ्यात विस्मयकारक गोष्ट. कारण 'सत्य' कधीच पूर्ण होत नसतं, त्याला कुठलाच अंत नसतो. त्याची सुरुवात आणि शेवट कुणालाच ठाऊक होत नसतो. सत्यशोध हे एक असं व्यसन आहे, ज्यावर कुठलाही इलाज नाही. एकदा हे व्यसन जडलं की दिवस-रात्र, तहान-भूक, शक्य-अशक्य कशाचंही भान राहत नाही. सत्यशोधनाच्या मार्गावर विश्रांतीचे थांबे नसतात, विसाव्याच्या सावल्या नसतात. हा मार्ग एकदा अवलंबला की आपल्यापुरतं सत्य गवसेपर्यंत नि:श्वासही घेता येत नाही कारण त्या क्षणैक विलंबामुळेही दृष्टीपथात आलेलं साध्य दृष्टीआड होऊ शकत असतं. अश्याच अविरत सत्यशोधनाचं व्यसन जडलेला 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी'. 

१९४२ साली, दुसऱ्या महायुद्धाच्या झळा सोसत हिंसाचार आणि अस्थैर्य ह्या दोन रुळांवर संथ गतीच्या ट्रामसारखं चालणाऱ्या, अंधाऱ्या, कळकट, बकाल कलकत्त्यात घडणारं हे कथानक आहे. 'भुवन बॅनर्जी' ही व्यक्ती गेले दोन महिने गायब आहे. त्याचा मुलगा अजित (आनंद तिवारी) वडिलांचा शोध लावण्यासाठी व्योमकेश बक्षीला गळ घालतो. व्योमकेश आधी 'हे प्रकरण निरर्थक आहे' असा पवित्रा घेतो. नंतर त्यावर काम सुरु करतो आणि त्याला लगेच समजतं की खून झालेला आहे. पण का ? कुणी केला ? कधी ? कुठे ? ह्या प्रकरणाचं एकेक तो पान उलटत जातो. रक्ताच्या डागांनी रंगलेली ही पानं ड्रग्स, युद्ध, राजकारण, आंतरराष्ट्रीय माफिया इ.शी संबंधित बऱ्याच धक्कादायक गोष्टी उजेडात आणतात. 'भुवन बॅनर्जी'चा खून ही एक अत्यंत किरकोळ घटना असून, प्रत्यक्षात बरंच मोठं कारस्थान शिजत आहे, हे कळल्यावर व्योमकेश अजितच्या मदतीने सगळा छडा लावायचं ठरवतो. वळणावळणावर जीवाचा धोका असताना हा प्रवास व्योमकेश केवळ स्वत:च्या अक्कलहुशारीवर कसा पार करतो, नेमका शोध कशाचा आणि कुणाचा आहे, हेच समजत नसतानाही तो त्याचा सत्यशोध कसा पूर्ण करतो, ह्या प्रवासात त्याच्या सान्निध्यात येणारे अनेक लोक नेमके कोण आहेत, त्यांच्यापैकी किती जणांच्या चेहऱ्यावर मुखवटे ओढलेले आहेत, हे मुखवटे बाजूला करून खरे चेहरे जगासमोर आणण्यासाठी कशाची किंमत मोजायला लागते, अश्या सगळ्या उत्कंठांची शृंखला जेव्हा तिच्या अखेरच्या कडीपर्यंत पोहोचते, तेव्हा आपल्याला अगदी १००% पटतं की 'सत्य हीच जगातली सगळ्यात विस्मयकारक गोष्ट आहे.

सुशांत सिंग राजपूतने साकारलेला व्योमकेश बक्षी, दूरदर्शनवर रजत कपूरने साकार केलेल्या व्योमकेश बक्षीची आठवण करून देत नाही. दोन्ही व्योमकेश बक्षी आपापल्या जागी श्रेष्ठ ठरले आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. फार काही भावनिक चढ-उतार किंवा उद्रेक नसलेली एका जासूसाची भूमिका अभिनयकौशल्याला विशेष आव्हान देणारी नसणारच. ही हेरगिरीची कथा, किंबहुना एकंदरीतच व्योमकेश बक्षीच्या कथा, ह्या काही मसालेदार, प्रचंड गतिमान, धावपळ, पाठलागाच्या नाहीत. पण म्हणूनच एक अभिनेता म्हणून संयमाची परीक्षा पाहणारी ही व्यक्तिरेखा असावी. प्रथमच एखाद्या इतक्या मोठ्या - High profile - प्रकरणाचा माग काढणाऱ्या, उत्साहाने सळसळणाऱ्या तरुण व्योमकेश बक्षीला सुशांत सिंग राजपूतने ताकदीने जिवंत केलं आहे. अननुभवी पण तरी अत्यंत तल्लख असा व्योमकेश म्हणून तो अगदी शोभून दिसतो.

मूळ कथाशृंखलेत नंतर व्योमकेशचा भागीदार बनणाऱ्या 'अजित'ची भूमिका आनंद तिवारीनेही उत्तम वठवली आहे. दूरदर्शन मालिकेत ही व्यक्तिरेखा के के रैनाने साकार केली होती. इथेही दोन्ही अजित आपापल्या जागी परिपूर्ण वाटतात. ह्याआधी 'गो गोवा गॉन' सारख्या अति-सुमार चित्रपटांत वाया गेलेला हा एक गुणी अभिनेता आहे, ह्याची खात्री 'अजित' पटवून देतो.

मेयांग चँग, स्वस्तिका मुखर्जी, दिव्या मेनन सहाय्यक भूमिका चोख बजावतात. 
पण सगळ्यांना पुरून, उरून लक्षात राहतो 'डॉ. अनुकूल गुहा'च्या भूमिकेतील 'नीरज कबी'. अनुकूल गुहाचं गूढ, चाणाक्ष व्यक्तिमत्व 'कबी'ने जबरदस्त उभं केलं आहे. केवळ नजरेतून तो अनेक अव्यक्त संवाद साधत असतो. व्योमकेशला एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे मदत करणं किंवा गुरूप्रमाणे सावध करणं, हे सगळं अतिशय सूचकपणे करणारा डॉ. गुहा लक्षात राहणारा आहे. 

दूरदर्शनवर झळकलेल्या आजपर्यंतच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एका मालिकेतून शरदिंदु बंडोपाध्यायांच्या व्योमकेश बक्षीला बासूदा आणि रजत कपूरने घराघरात पोहोचवलं होतं. हिंदी चित्रपटात हा व्योमकेश प्रथमच दिसला आहे आणि तो तितक्याच उत्तम रीतीने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी पोहोचवतात. 'खोसला का घोसला' पासून आपला वेगळा ठसा उमटवणारा हा दिग्दर्शक त्यानंतरच्या प्रत्येक चित्रपटातून काही तरी वेगळं दाखवत आला आहे. 'रहस्यकथा' मांडताना बहुतेक वेळा हिंदी चित्रपट भरकटला, रेंगाळला, लंगडला आहे. पण व्योमकेश बक्षी मात्र सफाईदार आहे. अगदी लहान-सहान गोष्टींमधून काही न काही सांगितलं गेलं आहे, पण तरी अनावश्यक स्पष्टीकरणं दिलेली नाहीत. किरकोळ कृतींमधून समजलेलं सत्य नंतर केवळ एखाद्या वाक्यातून उलगडतं. 

पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीचं कलकत्ता चतुराईने दाखवलं आहे. बहुतेक दृश्यं रात्रीच्या वेळेची आहेत आणि जी दिवसा उजेडी आहेत, त्या दृश्यांत जुन्या काळातलं कलकत्ता दाखवण्याचं काम जुन्या गाड्या व पात्रांची वेशभूषा, केशभूषा करतात ! 
तरी 'कहानी'मध्ये दाखवलेलं 'कोलकाता' आपण आठवून त्याची 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी' मध्ये दाखवलेल्या 'कलकत्ता'शी अपरिहार्यपणे तुलना करतोच. दोन्हींत असलेला कालखंडाचा फरक लगेच लक्षात येतो.

संगीत अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. त्यात न काही लक्षात राहण्यासारखं आहे, न ठेवण्यासारखं. १-२ गाणी पार्श्वभूमीला वाजतात, पण त्यावेळीही आपलं संपूर्ण लक्ष कथानकाकडेच असतं. ते विचलित करण्याची ताकद त्या संगीतात नाही. 

'NH10' नंतर 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी' येणं, ही हिंदी रहस्यपटांच्या दृष्टीने खूप आश्वासक गोष्ट आहे. अर्थात, मांडलेल्या विषयामुळे 'NH10' प्रचंड अंगावर येतो. तसं 'व्योमकेश'चं नाहीच. मात्र हा रहस्यभेदाचा प्रवास नुसताच उत्कंठावर्धक नाही, तर नव्या उत्कंठेची आशा जागवणाराही आहे. कारण चित्रपटाच्या अखेरीस व्योमकेशच्या पुढील भेटीची केलेली तजवीज, चित्रपटगृहातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाकडून पुढील भागाचे चित्रीकरणपूर्व अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून घेते !

रेटिंग - * * * *  

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०५ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-


1 comment:

  1. छान परिक्षण. अजून पहिलेला नाही पण पहिल्या पोस्टर पासून लक्षवेधी ठरलेला चित्रपट आहे. बघेन लवकरच.

    गो गोवा गोन हा एक चांगला zombie कॉमेडी चित्रपट होता. त्या बद्दल तुमचे मत पटले नाही. असो,

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...