Sunday, April 26, 2015

नकली फुलं, असली फूल्स (Movie Review - Kaagaz Ke Fools)

मला खूप आवडणाऱ्या ह्या 'निदा फाजलीं'च्या ओळी आहेत -

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं

कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. ह्याच्या बरोबरच अजून एक 'जोड-सत्य' असंही असतं की, प्रयत्नपूर्वक किंवा ओघानेच किंवा दोन्हीच्या एकत्रित परिणामाने जे काही आपल्याला मिळतं, त्याने आपले आयुष्य कितीही सुखकर केलं, तरी 'समाधानी' होईलच असे नाही. कारण सामान्यत: मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याला नेहमीच दुसऱ्याच्या अंगणातली हिरवळ जास्त मोहक वाटत असते. (Grass is always greener on the neighbor's side!). हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणं, हा मनुष्यस्वभावाला मिळालेला एक शापच !
असेच पळत्याच्या मागे धावणारे पती-पत्नी म्हणजे 'पुरुषोत्तम' आणि 'निक्की'.
'पुरुषोत्तम त्रिपाठी' (विनय पाठक) हा आयुष्याच्या ह्या प्रवाहासोबत वाहणाऱ्या प्रवासाला आपलं मानून मार्गक्रमण करणारा एक उदयोन्मुख लेखक असतो आणि मिळालेल्या सुखात समाधानी नसलेली त्याची पत्नी असते 'निक्की' (मुग्धा गोडसे). एका जाहिरात एजन्सीत कॉपीरायटरची नोकरी करणाऱ्या पुरुषोत्तमची गेल्या वर्षभरापासून स्वत:ची एक कादंबरी लिहून तयार असते, मात्र प्रकाशक मिळत नसतो आणि दुसरीकडे त्याचाच एक मित्र, स्वत:चा कापडाचा व्यवसाय सांभाळत थिल्लर पुस्तकांचा रतीब टाकून भरपूर प्रसिद्धी व पैसाही कमवत असतो. खरं तर हा एकच मित्र नव्हे तर त्याचे सगळेच मित्र स्वत:च्या आयुष्यात मस्तपैकी चैन करत असतात. हे सगळं निक्कीला साहजिकच सहन होत नसतंच आणि वरचेवर दोघांमध्ये ह्या विषयावरून वाद-विवाद होत असतात. 'पैसा कमवावा, नाव कमवावं, अधिक आनंदाचं, सुखाचं आयुष्य जगावं अशी काही महत्वाकांक्षाच पुरुषोत्तमकडे नाही. तो नुसता आपल्या नाकासमोर चालत राहणारा आहे. त्याचं आयुष्यात काहीही होऊ शकत नाही, जोपर्यंत तो स्वत:ला बदलत नाही', अशी निक्कीची पुरुषोत्तमविषयी समजूत असते. एक दिवस हा वाद इतका विकोपाला जातो की रागाच्या भरात पुरुषोत्तम घर सोडून निघून जातो. तो कुठे गेला आहे, हे न त्याच्या मित्रांना माहित असतं, न इतर कुणाला.
नेहमीच्या आयुष्याशी जवळजवळ पूर्णपणे संपर्क तोडून पुरुषोत्तम एक वेगळी दुनिया पाहतो, नव्हे त्याला ती दुनिया 'दिसते'. वाहता प्रवाह त्याला त्या दुनियेपर्यंत थोडासा वाहवत नेतो. काही नवीन जाणीवा होतात आणि काही जुन्या जाणीवांवरील धूळ झटकली जाते. एक उदयोन्मुख लेखक व एक सामान्य माणूस अश्या दोन पातळीवर झगडणारा पुरुषोत्तम ह्या काही दिवसांत कोणकोणत्या परिस्थितींतून जातो व अखेरीस काय साध्य करतो, ह्याचा प्रवास म्हणजे 'कागज़ के फूल्स'. ह्यातल्या 'कागज़' चे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे पैसा (नोटा) आणि दुसरा म्हणजे शब्द सजवणारा साधारण कागद. पुरुषोत्तम ह्या दुसऱ्या 'साधारण कागज़'च्या मागे आहे तर 'निक्की'ला पहिल्या 'कागज़' मध्ये जास्त रस आहे.

असं एकायला, वाचायला ही कहाणी खूप दमदार वाटेल. विनय पाठक, सौरभ शुक्ला, मुग्धा गोडसे, रायमा सेन ही नावंही दमदार आहेत. मात्र तरीही चित्रपटाचा 'कागज़' कोराच राहतो. चित्रपट म्हणावं अशी पकड घेतच नाही. प्रकाशकाने पुस्तक छापण्यासाठी पैसे मागितल्यावर त्याला पन्नास रुपये देऊन 'यह चाय का पैसा' म्हणून पुरुषोत्तम निघून जातो, अशी काही १-२ दृश्यं वगळता बाकी भाग काहीच छाप सोडत नाही. दारू पिऊन तर्र झालेल्या पुरुषोत्तमचा चेहरा मात्र अगदी टवटवीत दिसत असतो, एक केससुद्धा विस्कटलेला नसतो, अश्या छोट्या-छोट्या उणीवांमुळे पडद्यावर जे काही चालू आहे, त्यात 'जान' येत नाही. त्याचा खोटेपणा लपतच नाही.
'विनय पाठक' हा आजच्या चित्रपटाने 'अमोल पालेकरां'साठी दिलेला पर्याय आहे, असं मला त्याच्या 'भेजा फ्राय', 'चलो दिल्ली' वगैरे चित्रपटांमुळे वाटतं. नुकत्याच आलेल्या 'बदलापूर'मध्ये त्याची भूमिका एरव्हीपेक्षा वेगळी होती पण तरी त्याच्याकडे ह्या कहाणीला हवा असलेला सामान्य माणसाचा चेहरा, देहयष्टी व देहबोली निश्चितच आहे. मात्र ह्या सगळ्याचा सुयोग्य वापर दिग्दर्शक 'अनिल कुमार चौधरी' करू शकलेले नाहीत. 'निक्की'च्या अत्युत्साही मोठ्या भावाच्या भूमिकेत 'सौरभ शुक्ला' आहे. हा एक अश्या ताकदीचा अभिनेता आहे की त्याला बहुतेक दिग्दर्शकाची गरजच नाही, त्यामुळे त्याच्याविषयी काही बोलायला जागाच नाही. मुग्धा गोडसे दिसते छान, पण ती पडद्यावर असताना 'मुग्धा गोडसे' आणि 'निक्की' वेगवेगळ्या दिसत राहतात. 'रायमा सेन'ला एका वेश्येची भूमिका आहे. तिच्या भूमिकेलाच एक वलय आहे, त्यामुळे ती बऱ्यापैकी लक्षात राहते.
३-४ गाणी मध्ये मध्ये वाजतात, पण आजकाल बहुतेक चित्रपटांत होतं तसं, छळवाद करत नाहीत. तरी, लक्षातही राहत नाहीत.

एक चांगला'प्लॉट', ज्यावर बऱ्याच दिवसांनी एक हलका फुलका खुसखुशीत चित्रपट बनू शकला असता. मात्र बनला नाही, ह्याची हळहळ वाटल्याशिवाय राहवत नाही. कुठे तरी चित्रपटकर्ता स्वत:सुद्धा 'रुख हवाओं का जिधर का है..' उधरच्या दिशेने भरकटला आहे आणि परिणाम स्वरूप एका कोरड्या, गंधहीन नकली कागदी फुलासारखा चित्रपट बनला आणि 'विनय पाठक, सौरभ शुक्ला' अशी नावं पाहुन चित्रपट पाहायला गेलेले अनेक जण असली 'फूल्स' बनले !

रेटिंग - * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२६ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...