Sunday, May 03, 2015

कॉपी करून पास (Movie Review - Gabbar Is Back)

आदल्या दिवशीच्या उरलेल्या पोळ्यांचे बारिक तुकडे करायचे. मिरची, कढीपत्त्याची फोडणी करून त्यात भरपूर कांदा परतायचा. त्यावर हे पोळ्यांचे तुकडे घालून हळद, तिखट, मीठ टाकून तयार होणारं पक्वान्न म्हणजे ‘फोडणीची पोळी.’ कुणी त्याला कुसकरा म्हणतं, मध्य प्रदेशात तर ह्याला एक गोंडस नाव आहे, ‘मनोहरा’! तर ही फोडणीची पोळी माझ्या मध्यमवर्गीय पोट व जिभेचा अत्यंत आवडता नाश्ता. रानोमाळ भटकणाऱ्या गब्बरसिंगलासुद्धा नाश्त्यासाठी ह्यावरच समाधान मानावं लागत असावं, असा माझा एक कयास आहे. गब्बरच्या नावाने चित्रपट करताना फोडणीच्या पोळीचीच रेसिपी वापरणं, हा निव्वळ योगायोग आहे की गब्बरच्या आवडत्या नाश्त्याला दिलेली एक मानवंदना ते माहित नाही, मात्र जे काही जुळून आलं आहे, ते जर त्याने पाहिलं असतं तर नक्कीच ‘सरदार खुस हुआ’ होता आणि ‘सबासी’ भी दिया होता !
‘गब्बर इज बॅक’मधल्या आदल्या दिवशीच्या उरलेल्या पोळ्या म्हणजे २००२ साली तमिळमध्ये बनलेला ‘रामण्णा’ हा चित्रपट आणि पुढील १३ वर्षांत त्याचे तेलुगु, कन्नड, बंगालीमध्ये झालेले रिमेक्स. ह्या सगळ्यांना एकत्र कुसकरून त्याला थोडासा ‘बॉलीवूडी’ तडका देऊन गब्बर हॅज कम बॅक! संजय लीला भन्साळीला जेव्हा गल्ला भरायचा असतो, तेव्हा तो एक दक्षिणायन करतो. मागे एकदा त्याने असंच दक्षिणायन केलं आणि ‘विक्रमार्कुडू’ घेउन आला अन् ‘राउडी राठोड’ निर्मित केला. आता भन्साळी इज बॅक विथ ‘रामण्णा’ उर्फ ‘गब्बर’.

एकाच दिवशी १० तहसीलदारांचं अपहरण आणि त्यांपैकी एकाचा खून झाल्यावर सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या होतात. मृत तहसिलदाराच्या शरीरासोबत गब्बरच्या आवाजातली ऑडीओ सीडी आणि त्या तहसिलदाराच्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण लेखाजोखा असतो. इथून सुरु होतो एक शोधमोहिमेचा, अपहरण-हत्यांचा, सूडाचा आणि जनजागृतीचा प्रवास.
एका कॉलेजात प्रोफेसर असलेल्या ‘आदित्य’ची (अक्षय कुमार) दोन रूपं असतात. एक जे जगाला दिसतंय ते एका प्रोफेसरचं आणि दुसरं जे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय ते, ‘गब्बर’चं. मुलांशी मुलांच्याच भाषेत संवाद साधणारा, त्याचा वर्ग खुल्या मैदानात भरवणारा, प्रात्यक्षिकं दाखवून मजा-मस्करी करत शिकवणारा आदित्य विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असतो. विद्यार्थ्यांचीच ताकद वापरून तो ‘गब्बर’ टोळी चालवत असतो. महाराष्ट्राच्या विविध भागांतून एखाद्या विशिष्ट विभागाच्या १० भ्रष्ट अधिकाऱ्यांना अपहृत करायचं आणि त्यांच्यातल्या सगळ्यात भ्रष्ट अधिकाऱ्याला सजा-ए-मौत देऊन पाचावर धारण बसलेल्या बाकीच्या ९ जणांना मुक्त करायचं, हा त्याचा शिरस्ता.
ह्या कहाणीच्या जोडीला - पोलीस विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांना जे जमत नाही ते करून दाखवणारा, पण पात्रता असूनही केवळ लाच न दिल्यामुळे निरीक्षकाच्या ऐवजी हवालदार बनून राहिलेला एक इमानदार व तडफदार तरुण 'साधुराम' (सुनील ग्रोव्हर) आणि ‘आदित्य’ला ‘आदित्य’पासून ‘गब्बर’ बनवण्यात मोलाचा वाटा उचलणारा एक उद्योजक 'पाटील' (सुमन)– सुद्धा आहेत. मध्येच अकारण लुडबुड करवायची, गाणी घुसडायची सोय म्हणून एक बावळट मुलगी 'श्रुती'सुद्धा (श्रुती हासन) आहे. हा सगळा माल-मसाला मिळून बनणारा पदार्थ मात्र दोन घटिका जीभेवर एक बरी चव रेंगाळवतो.

दाक्षिणात्य मारधाडपटाचा रिमेक आणि त्यात अक्षय कुमार, सलमान खान किंवा अजय देवगण असले की चित्रपटगृहात शिरतेवेळीच विचारप्रक्रियेचा ‘लॉजिक’ मोड बंद करायचा असतो, हे मला 'चिंगम', 'खिक' व 'रद्दड राठोड' ह्यांच्या अविस्मरणीय अनुभवांतून शिकायला मिळालं आहे. त्यामुळे पडद्यावर ‘व्हूफ्.. व्हूफ्..’ करून शीर्षक आदळत असतानाच मी जाणीवपूर्वक माझा ‘लॉजिक’ मोड बंद केला होता. त्यामुळे ‘हे सगळं करण्यासाठी पैसे कुठून आले?’ किंवा ‘यूपीएससीमध्ये इतका आभाळ फाडणारा स्कोअर करून किंबहुना युपिएससी झाल्यावर कुणी हवालदार कसा राहील ?’ किंवा ‘गाडीच्या छोट्याश्या सीटवर त्यातही अर्ध्या भागात दुसरी व्यक्ती बसलेली असताना एक स्त्री प्रसवू कशी शकते?’ किंवा ‘ह्याच्या एकाच ठोश्यात हेल्यासारखा दिसणारा गुंड गपगार कसा पडतो ?’ किंवा ‘ह्याने उचलून आपटल्यावर माणूस चेंडूसारखा टप्पा कसा काय घेऊ शकतो? हा भौतिकशास्त्राचा प्रोफेसर आहे की न्यूटनचा बाप ?’ असले डोकॅलिटीवाले प्रश्न मला पडले नाहीत. ते तुम्हाला पडणार असतील, ‘लॉजिक’ मोड ऑन-ऑफचं बटन कुठे असतं, हे जर माहित नसेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी निश्चितच नाही.

अ‍ॅक्शन हीरो म्हणून अक्षय कुमार सध्या तरी सर्वोत्तम असावा, असं मला वाटतं. त्याचा फिटनेस आणि मार्शल आर्ट्समधील निर्विवाद प्राविण्य केवळ जबरदस्त आहे. सनी देओलला आवरायला जेव्हा १५ लोक कमी पडायचे आणि तो उजव्या हाताने ७-८ आणि डाव्या हाता ७-८ जणांना झुलवायचा, तेव्हा त्याचा आवेश पाहून तो हे खरंच करू शकतो असं वाटायचं. अक्षय कुमारने सप्पकन् फिरवलेल्या किकने किंवा दिलेल्या जोरदार ठोश्याने भलेभले भेंडाळताना पाहून हे अगदीच अशक्य नाही, असं वाटतं. अर्थात, ह्यामागे मी बंद केलेल्या 'लॉजिक' मोडचा हातही असू शकतो, पण तरी !
अभिनय नावाच्या चिमणीला इथे चिवचिवायला वाव नाही, हे चोखंदळांनी लक्षात घ्यावे. जो काही अभिनय करायचा आहे, तो हवालदाराच्या भूमिकेतला सुनील ग्रोव्हर करतो आणि लक्षात राहतो.
उद्योजक पाटीलच्या भूमिकेतल्या 'सुमन'ला फक्त गुरगुरण्याचं काम आहे, ते तो बऱ्यापैकी करतो.
'श्रुती हासन' रस्त्यात नको तिथे बांधलेल्या स्पीड ब्रेकरसारखी उगाच आणि त्रासदायक आहे.
संगीत नावाची काही गोष्ट हिंदी चित्रपटांत कधी काळी असायची. आजकाल डबे, पराती, ताटल्या, तांबे बडवले जातात आणि त्या तालावर कोंबडे, बैल, घोडे इ. सुरेल प्राणी आरवत किंवा हंबरत किंवा रेकत असतात. डोक्याला पोचे पडेपर्यंतची सांगीतिक सोय इथे व्यवस्थित लावलेली आहे.

कॉलेजमध्ये कट्ट्यावर बसून पूर्णवेळ टवाळक्या करणारा पण तसा अगदीच डफ्फळशंख नसल्याने परीक्षेच्या आधी रट्टा मारून आणि पेपरमध्ये कॉपी करून पास झालेला एखादा मित्र प्रत्येकाचा असतो. बहुतेकदा कॉलेजनंतरच्या आयुष्यात तो आपल्यापेक्षा चांगला कमवतही असतो. 'गब्बर इज बॅक' म्हणजे असाच एक मारलेला रट्टा आणि केलेली कॉपी आहे. ही कॉपी करून दिग्दर्शक 'क्रिश' नक्कीच पास होईल. पण तुम्ही मात्र चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर आपला 'लॉजिक' मोड पुन्हा सुरु करायचं मात्र विसरू नका, नाही तर नापास व्हाल !

रेटिंग - * * १/२


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०३ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

1 comment:

  1. जमलंय. माझं परिक्षण असंच नसलं तरी शेवटचे गुण जुळलेले आहेत.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...