Sunday, August 07, 2011

शब्दांच्या बागा सजल्या..



शब्दांच्या बागा सजल्या गंधून दिशा मोहरल्या
ती येता कळीकळीच्या अव्यक्त तृषा तोषवल्या


गहिवर येता दु:खाला काळीज हुंदका देते
कित्येक व्यथांच्या सरिता होऊन खुद्द ओसरल्या


आनंद कधी मावेना गगनामधुनी वाटावे
एकाच चिठोऱ्यावरती साऱ्याच छटा ओघळल्या


उलट्या सुलट्या प्रश्नांचे काहूर मनी दाटावे
अतृप्त सरी मग काही मनसोक्त धुंद कोसळल्या


हुरहूर गूढशी किंवा अज्ञात बोच काहीशी
अडकून गुंतल्या गाठी हलकेच कुणी सोडवल्या


डोळ्यांत सत्य खुपताना अन् क्रुद्ध मुठी वळताना
बेड्या पडलेल्या कविता अपुलाच कंठ सोलटल्या


भक्ती भरल्या हृदयाला तो ध्यास लागला 'त्या'चा
संसारी चिंता साऱ्या 'त्या'च्यावरती सोपवल्या


पाहूनी अपुल्या प्रेमा जो 'जीतू' झाला वेडा
एका नजरेच्या डोही त्याने गझला घोळवल्या



....रसप....
६ ऑगस्ट २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...