Monday, August 01, 2011

"S. N. S." (सोशल नेटवर्कींगचे श्लोक)

ट्विटा, ऑर्कुटा, फेसबूकी दिसावे
असे "सोशली" सर्व काही करावे
नसे छंद ना जाण काही तरीही
दिसे त्याच ग्रूपात सामील व्हावे


कुणाचा कुणाशी मिळे सूर भावे
कुणाशी उगा वाद घालीत जावे
जरी ना कुणाला कुणी जाणतो रे
तरी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकार व्हावे


म्हणे "आज आंघोळ केलीच नाही"
म्हणे "आज कॉफीत माशी मिळाली"
"असा पादलो मी, तसा वास आला"
अशी फालतू रोज उक्ती करावी..!


नसे दूरचाही जरी गोत काही
तरीही कुणाला कुणी टॅग लावी
कुणी दात काढी जरी बोध नाही
अशी शृंखला ती पुढे जात राही


इथे वेगळी "शॉर्ट लँग्वेज" चाले
"एलोएल"* जोरात हसता म्हणाले
म्हणी 'के'च 'ओके'स हटकून सारे
"बि आर् बी"* म्हणूनी कुणी लुप्त झाले..!


इथे सुंदरींचे पहावेत फोटो
भिडवण्यात 'टाक्या'स गुंतून जो तो
पहा आज हुंगून तूही मजेने
जुळे बंध झटक्यात अनुबंध होतो


जरी वाटले की असे फोल चाळा
इथे सज्जनांचा भरे खास मेळा
कधी कोण विद्वान संवाद साधी
कधी आवडी मित्र होतात गोळा


तुम्हा लाभला हा किती छान मेवा
करा "नेटवर्कींग" 'फ्री'चीच सेवा
कधी व्यावसायीक संबंध जोडा
जुने मित्र शोधा खरा तोच ठेवा



....रसप....
२७ जुलै २०११



एलोएल* = LOL (Laughing Out Loud)
बि आर् बी* = BRB (Be Right Back)

5 comments:

  1. Ranjit... You are too good ... !!!!!!!!!!!

    ReplyDelete
  2. खुपच छान ब्लोग आहे. आताच पाहिला. एकच कविता वाचली ती खूप आवडली.
    महेश नाईक.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...