Sunday, June 05, 2011

पावसाळी नॉस्टॅलजिया

१.
मनाच्या कुठल्याश्या कोप-यात
आसवांची ओल येते..
आणि दूर.. क्षितिजाजवळ
ढगांची जमवाजमव सुरू होते

माझा मोकळा हात
दुस-या हातात धरून
मी थोडासा दाबतो
आणि स्वत:च स्वत:ला
तुझी आठवण करून देतो..

ओल पसरत जाते अन्
सर्वांग दमट होते
दाटून आलेल्या डोळ्यांसमोर....
आभाळ भरून येते..!!
=========================================================

२.
टिपटिप टिपटिप
रिमझिम रिमझिम
दिवसभर चालतं
रात्री मात्र पावसाला
उधाणच येतं

धो-धो मुसळधार
ढगांचा गडगडाट
मिट्ट काळोखात
विजांचा कडकडाट

लखलखती एक रेघ
काळजाच्या पार जाते
वाळलेल्या जखमांच्या
खपल्या उघडून ठेवते

ओलेत्या अंगाने पहाट
खिडकीपाशी येते
पाऊस थांबतो, तरीसुद्धा
आभाळ भरून येते..
=========================================================

३.
मी बेचैन होतो
चुळबुळ करतो
कुठे तरी मनाला
गुंतवायला बघतो

स्वत:शीच बोलतो
काही-बाही लिहितो
बेसूर गुणगुणतो
पण अखेरीस हरतो

ओली पावसाळी झुळूक
श्वासामध्ये खेळते
येते... तुझी आठवण
अगदी आभाळ भरून येते....

=========================================================


४.

भुरूभुरू पावसात
झाकोळलेल्या रस्त्यात
हळूहळू भिजताना
हातात हात घेताना

अंगावरती शहारा
खांद्यावरचा निवारा
छातीमध्ये धडधड
पापण्यांची फडफड

काही तरी बोलणार..
इतक्यात जाग येते!
स्वप्न पडतात जेव्हा
आभाळ भरून येते.....

=========================================================

५.

मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर
पाय सोडून बसावं..
अर्धं लाटांनी.. अर्धं सरींनी..
चिंब चिंब भिजावं

कट्ट्यावरून चालताना
वा-यावर उडावं..!
शहारून आल्यावर
तू मला बिलगावं

वाफाळलेल्या कॉफीला चार घोटांत प्यावं
चालत चालत नरीमन पॉईंटला जावं

सूर्यास्त होण्याआधीच अंधारून यावं
मग परत चालत चालत यावं...
आता "नॅचरल्स" आईसक्रीम खावं..
आणि पुन्हा पुन्हा हुडहुडावं ..!

पण....
पण असं काहीच होत नाही!
तो बरसत नाही..
हा खवळत नाही..
कॉफी निवळत नाही..
आपण चालत नाही..

तू आलीस की सगळं
फटफटीत होतं
अन् "सीसीडी" मध्ये
आपलं बस्तान होतं

नेहमीसारखा मनातून
मी चरफडतो
इतक्यात गडगडून
'तो' मला हसतो

मी घड्याळ पाहातो..
तुझी वेळ झालेली असते
तू जातेस आणि लगेच
आभाळ भरून येते....

=========================================================

६.

माथेरानची हिरवाई
ओली चिंब नवलाई
दर पावसात आठवते
अन् नजरेला गोठवते

मनातल्या मनात मी
'पॅनोरमा'ला पोहोचतो
तुझ्या हातातली सिगरेट घेऊन
दोन झुरके मारतो..
पण..
दोनच झुरक्यांचा एव्हढा धूर होतो
की गोठलेली नजर गुंतून पडते..
मी धुरातून बाहेर येतो..
समोर खिडकीची चौकट असते
.
.
.
.
झटक्यात सगळं संपवून
तू निघून गेलास
अशी का कधी दोस्ती असते?
माझे डोळे पाझरत नाहीत
पण आभाळ भरून येते...



=========================================================
७.

खिडकीतून बाहेर बघताना
डोळ्यांसमोर पायवाट ओली झाली
अन् अचानक ती ओली सायंकाळ
काळोखी रात्र झाली

पायवाट थबथबली होती
झाडे निथळत होती
अंधाराच्या कुशीत
रात्र सरत होती

छपरावर वाजणारे थेंब
रिकाम्या घरात घुमत होते
त्याच्या एकटेपणाला
पुन्हा पुन्हा चिथवत होते

खिडक्या दारं गच्च लावून पहुडल्यावर
अशीच झोप उडून जाते
आणि सताड उघड्या डोळ्यांमध्ये
आभाळ भरून येते....
=========================================================
८.

भेगाळल्या जमिनीला
आसवांची ओल
वाळलेल्या विहिरीचा
तळ किती खोल

उजाडलेल्या आकाशी
तळपती आग
कळवळल्या जीवाला
मृत्यूही महाग

तहान नाही फारशी
काही थेंब फक्त
आसुसल्या डोळ्यांतून
वाळलेलं रक्त

खपाटीला पोट गेलं
पाठीलाही बाक
आभाळाला धरणीची
ऐकू न ये हाक

बैलाच्या बरगड्यांना
पाहतोय कोण?
गावागावात रोगांचं
पसरलं लोण

लटपटती पावलं
हातांना कापरं
पाण्यासाठी दगडाला
घालती साकडं

पुन्हा पुन्हा नजरा त्या
पाहती वरती
आभाळ भरून येते
डोळ्यांना भरती

=========================================================

९.

बाहेर खेळ -
ऊन आणि पाऊस
मनात असते
भिजायची हौस

पाऊस आला
की गच्चीत जायचं
गच्चीत गेलं
की ऊन पडायचं !!

दोन-तीनदा झालं
की नाद सोडायचा
घरातच भिजायचा
'प्लान' करायचा!

शॉवरखाली कुडकुडायचं..
मिठीमध्ये शिरायचं..
'कृत्रिम' पावसामध्ये
चिंब चिंब भिजायचं!

अखेरीस...

ओलेत्या अंगानेच बाहेर आल्यावर
दोघांना दिसतं
पुन्हा एकदा त्यांना फसवून -
"आभाळ भरून येतं!!"

=========================================================

१०.

मुंबईचा पाऊस सारं काही भिजवतो..
'लोकल्स'ना अडवतो, 'बसेस'ना थांबवतो..
दर पावसाळ्यात एकदा तरी,
मला घरातच कोंडतो..
पण मीही कमी नाही; कैदेतही रमतो!
किशोर-रफी ऐकतो,
चार-दोन ओळी लिहितो..!

मुसळधार कोसळूनही
त्याचं मन भरत नाही
बदाबद सांडूनही,
पाउस थांबत नाही

ओली संध्याकाळ गारठते..
अन् तास दोन तासासाठी तो शांत होतो
रडून थकलेल्या मुलासारखा कोपऱ्यात जाऊन बसतो..
पण झाडांची, इमारतींची टीप-टीप चालूच असते
कधी न मिळणारी शांतता त्या दोन तासांत असते..

किशोर-रफीची मैफल रंगते..
ग्लासातली व्होडका डोळ्यांत उतरते
अन् पुन्हा एकदा.. आधीसारखंच..
बदाबद कोसळायला -
आभाळ भरून येते..

=========================================================

.

ऑफिसला जाण्यासाठी
आपली बस ठरलेली
तुझी जागा ठरलेली;
माझी जागा ठरलेली

तुझ्या गालावरची बट
तू कानामागे खोवायची
बटसुद्धा अशी लोचट
पुन्हा पुन्हा रूळायची....
....पुन्हा पुन्हा झुलायची

दीड तासाचा प्रवास
तुझ्या सुगंधाने बहरायचा
रोज एक नवा गुलाब
मनामध्ये फुलायचा

परत घरी येताना
वेगळे वेगळे यायचो
कारण मी ऑफिसमध्ये
उशीरापर्यंत बसायचो

त्या दिवशी मात्र
गडबड झाली होती
पावसामुळे ऑफिसं
लौकर सोडली होती

पाऊस मी म्हणत होता
छत्र्या फाडून बरसत होता
टॅक्सी-रिक्शा-बस साठी
नुसता गोंधळ चालला होता

मी घाई केली नाही
ऑफिसातच थांबलो
दुसऱ्या दिवशी सकाळी
घरी परत आलो

पण त्या दिवशीनंतर तू
परत दिसलीच नाहीस
पाऊस गेला, पाणी सरलं
तरी तू आलीच नाहीस

आजकाल तुझ्या घरालाही
म्हणे कुलूपच असतं
बाल्कनीतून गुलाबफुल
एकटंच हसत असतं

आता जेव्हा कधीही
आभाळ भरून येतं
गुलाबाचा गंध माझ्या
मनात सोडून जातं...


....रसप....
















=========================================================
१२.
सांग ना गं आई कसं
आभाळ भरून येतं?
काळ्या काळ्या ढगांमध्ये
कुठून पाणी भरतं?

मोठे मोठे ढग सारे
रोज कुठे लपतात?
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये
कुठल्या गावी जातात?

पाऊस जेव्हा पडतो
तेव्हाच बेडूक येतो
मला समजत नाही
नेहमी कुठे असतो?

जोरात वीज पडते
आवाज होतो केव्हढा
ढगांच्याही पोटामध्ये
येतच असेल गोळा!

जिथे तिथे पाणी पाणी
शाळेत का गं नव्हतं?
सांग ना गं आई कसं
आभाळ भरून येतं ?


=========================================================
१३.
पोपडे निघालेल्या भिंती
पिवळट पांढऱ्या बुरशीची नक्षी सजवायच्या
दर पावसाळ्यात गळक्या छताला
प्लास्टिकच्या झोळ्या लटकवायच्या

पावसाळ्यात पाणी मुबलक असायचं
नळाला दोनच तास यायचं
छतातून चोवीस तास गळायचं

दाराबाहेर नेहमीच घोटाभर पाणी साचायचं
छोट्या-मोठ्या दगडांवरून उड्या मारत जायचं!

सदैव एक कुबट वास..
भिजलेल्या कपड्यासारखा..
नाकात, छातीत भरायचा
आणि तुझ्या दम्याला
खरवडून काढायचा..

बाबांचा डबा.. आमच्या शाळा
आजीच्या शिव्या अन्.. छतातून धारा!
तुझी परवड कधीच जाणवली नाही
अन् तुझी सहनशीलता कधीच खुंटली नाही

आता दिवस बदललेत -
आज ते भाड्याचं घर नाही
छतातून धार नाही
भिंतीला बुरशी नाही
कामाचा भार नाही
पण खोलवर मनात एक बोच आहे तुझ्या खस्तांची
अंधाऱ्या आयुष्याला उजळायला घेतलेल्या कष्टांची

खरं सांगतो आई,
जेव्हा आभाळ भरून येतं
माझ्या डोळ्यांसमोर ते
आपलं जुनाट घर येतं....

=========================================================
१४.

एक पाऊस..
पहिल्या सरीचा उत्साह ल्यायलेला..
दरवळता मृद्गंध मनसोक्त प्यायलेला

एक पाऊस..
आवाजही न करता शांतपणे झिरपणारा
गालावरच्या अश्रूप्रमाणे पानांवरून ओघळणारा

एक पाऊस..
कसल्या तरी संतापाने प्रचंड थयथयाट करणारा
चाबकाच्या फटक्यांनी जमिनीला सोलटणारा..

एक पाऊस..
शाळेतल्या शहाण्या मुलासारखा रोज हजेरी लावणारा
खाली मान घालून येणारा, खाली मान घालून जाणारा

एक पाऊस..
धावत धावत अचानक येऊन फट्फजिती करणारा
आणि लगेच थांबून "कशी गंमत केली?" म्हणणारा

एक पाऊस..
अनाहूतपणे तिच्या डोळ्यांमधून डोकावणारा
वाहण्याची वेळ येताच माझ्या डोळ्यांतून झरणारा..

दर वर्षीचा पाऊस, असे अनेक पाऊस घेऊन येतो
आठवणींच्या थेंबांचा वर्षाव करून जातो
कधी होतो तो रिता, कधी मन हलकं होतं
पुन्हा फिरून तरीसुद्धा आभाळ भरून येतं....


....रसप....
=========================================================

१५.

जीवशास्त्राच्या तासाला
खिडकीबाहेर पत्र्यावरून वाहणाऱ्या पाण्यात
गुंतलेलं माझं मन
आणि समोर चाललेलं
जास्वंदीच्या फुलाचं विघटन...

फळ्यावर बीजगणिताची रांगोळी काढणाऱ्या
सरांचं कृत्रिम बोलणं
आणि मी
वर्गाच्या दाराबाहेरच्या ओहोळात
मनातल्या मनात कागदी होड्या सोडणं..

पहिल्या पावसाचे थेंब पडताच
पसरलेला गारवा,
छातीत भरलेला मातीचा सुगंध
आणि सुस्तावलेल्या पायांना बाकाखाली ताणून...
थोडंसं मागे रेलून..
तिच्याकडे बघण्याचा आवडता छंद..

दहावीपर्यंत प्रत्येक पावसाळा असाच होता
प्रत्येक थेंब अगदी मनापासून माझाच होता..


चिंब चिंब होण्यासाठी माझं मन
शाळेत जाऊन येतं
प्रत्येक पावसात जेव्हा जेव्हा
आभाळ भरून येतं......


....रसप....
७ जून २०१२

4 comments:

  1. ur poems are so real and touch right to the heart.They have so much meaning and true feelings that i feel every emotion connected with it.
    thanx for these wonderful poems..
    mast ahet saglyach kavita!!!!!!

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...