Monday, August 08, 2011

लोकशाहीतून यादवीकडे..

नऊ हजाराचा साबण.. पन्नास लाखाचा दिवा.. १५ कोटींच्या कुंड्या..!!
शीला दीक्षित च्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा वाचत होतो. मनात विचार आला, किती भूक आहे ह्या हरामखोरांची? मला जर एकरकमी १० कोटी मिळाले तर मी माझं अख्खं आयुष्य ऐश करू शकतो! ह्यांच्या अश्या काय गरजा आहेत की कितीही कमावलं (कमावलं कसलं.. लाटलं) तरी पुरेसं वाटतच नाही?
ह्या काळ्या पैश्याची एक समांतर अर्थव्यवस्था चालू आहे, जिची उलाढाल देशाच्या अर्थसंकल्पाच्या कैक पटींनी मोठी असावी..! खरंच अशी परिस्थिती आहे की देशभरातील झाडून सगळ्या लहानमोठ्या राजकारण्यांना एकत्र करून डोळे मिटून त्या गर्दीत एक खडा टाकला तर तो ज्याला/ जिला लागेल त्याने/ तिने काही कोटी रुपये कालच खाल्लेले असतील!
पण कुणाला दोष द्यावा? माझ्या मते स्वत:लाच. कारण असं म्हणतात -

"People deserve the government they get." 

अर्थात, जनतेला तिच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळतं.
बरोबरच आहे. राजकारणी, सरकारी अधिकारी, पोलीस वगैरेंना भ्रष्ट म्हणणारे आपण स्वत: तरी कितपत स्वच्छ आहोत? लहान मुलाचे फालतू लाड करून आपणच त्याला बिघडवतो आणि मग "तू अमुक केलंस तर मी तुला तमुक देईन" अशी लाच खायची सवय बालपणातच लावतो. मोठा होऊन तोच मुलगा/ तीच मुलगी जर कुणी भ्रष्ट अधिकारी बनला/ बनली तर त्यात आश्चर्य काय? सिग्नल तोडल्यावर पोलिसाला चिरीमिरी आपण देतो, म्हणूनच त्याला ते घेण्याची सवय लागली ना? एक काळ असा होता की पोलिसाला ट्रकवाल्याकडून पैसे खाता येतात हे माहीतही नव्हतं! जर कधी कुणी पोलिसाने चुकून-माकून काही "घेतलंच" तर तेही तो स्वत: हातात घेत नसे.. दूर कुठल्याश्या पानाच्या टपरीवर/ दुकानात दे म्हणत असे! 
हे नेते, हे अधिकारी आपल्यातूनच वर गेले ना? आपणच त्यांना घडवले ना? तुमचं पोर नतद्रष्ट निघालं तर त्याचा अर्थ तुमचे संस्कार पोकळ होते असाच होईल ना? 
जसजसा काळ पुढे चाललाय.. तसतसं घोटाळ्यांच्या रकमेपुढची शून्यं वाढतच चालली आहेत! आणि एकजात सगळेच भ्रष्ट! असं का व्हावं? आणि कुठवर चालणार असं? आज ना उद्या ह्याचं पर्यावसान नक्कीच यादवीत होणार आहे. 
मला वाटतं दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी आपण स्वत: अंतर्मुख व्हायला हवं. कळत नकळत आपण स्वत:ही किती भ्रष्ट झालो आहोत, आपण स्वत:ही भ्रष्टाचार कसा पोसतो आहोत, घडवतो आहोत ह्याचा विचार करायला हवा.  

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...