Monday, June 20, 2011

डोळ्यांना भरती.. (पावसाळी नॉस्टॅलजिया - असाही)

.
भेगाळल्या जमिनीला
आसवांची ओल
वाळलेल्या विहिरीचा
तळ किती खोल

उजाडलेल्या आकाशी
तळपती आग
कळवळल्या जीवाला
मृत्यूही महाग

तहान नाही फारशी
काही थेंब फक्त
आसुसल्या डोळ्यांतून
वाळलेलं रक्त

खपाटीला पोट गेलं
पाठीलाही बाक
आभाळाला धरणीची
ऐकू न ये हाक

बैलाच्या बरगड्यांना
पाहतोय कोण?
गावागावात रोगांचं
पसरलं लोण

लटपटती पावलं
हातांना कापरं
पाण्यासाठी दगडाला
घालती साकडं

पुन्हा पुन्हा नजरा त्या
पाहती वरती
आभाळ भरून येते
डोळ्यांना भरती


....रसप....
२० जून २०११
टिचकी मारा -  पावसाळी नॉस्टॅलजिया 

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...