कुटुंबाच्या व आपल्या सुखासाठी, भवितव्यासाठी आपण नोकरी करत असतो. पण ह्या कामामध्ये आपण इतके बुडतो की कुटुंबासाठी, घरासाठी व स्वत:साठी जगायचं राहूनच जातं! मग प्रश्न पडतो की.. "जगण्यासाठी नोकरी की नोकरीसाठी जगणं?" बरं, इतकं मरमर करून नोकरीतही बहुतेक वेळा तोंडाला पानंच पुसली जातात..! तेव्हा असं वाटत नाही का की, आपलं गणितच चुकलं..? घरासाठी ऑफीसला येतो आणि ऑफिसला आल्यावर घराची आठवण येते का? जेव्हा जेव्हा अवहेलना होते, दुर्लक्ष केलं जातं... तेव्हा "उगाच मी माझ्या घरापासून दुरावलोय" असं वाटतं का..??
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी-
बघा, घरची आठवण येत का..!!
कवी सौमित्र ह्यांच्या "मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा... बघ माझी आठवण येते का.." ह्या कवितेपासून प्रेरित -
मुसळधार पाऊस ऑफिसमधून पाहा
बघ घरची आठवण येते का..
हात लांबव.. ओठाला लाव तो कॉफीचा कप
इवलासा घोट पिऊन बघ
बघ घरची आठवण येते का..!
वा-याने वाजणारी खिडकीतली शीळ कानावर घे...
डोळे मिटून घे.. तल्लीन हो..
नाहीच जाणवलं काही, तर बाहेर पड
कॉरीडॉरमध्ये ये.
तो ओसाडलेला असेलच
पाय मुडपून उभा राहा
कळ येईल पोटरीमधून!!
बघ घरची आठवण येते का..
मग चालू लाग
शांततेच्या अगणित सुया टोचून घेत
चालत राहा कॉरीडॉर संपेपर्यंत
तो गोलाकार आहे, संपणार नाहीच
शेवटी परत ये..
आळोखे देऊ नकोस... सुस्कारे सोडू नकोस
पुन्हा त्याच खुर्चीत बस..
आता....... बॉसची वाट बघ..
बघ घरची आठवण येते का..
दाराबाहेर मोबाईल वाजेल..
नजर टाक.. बॉस असेल
त्याला स्माईल दे... शिव्या तो स्वत:च घालेल
तो विचारेल तुला तुझ्या थांबण्याचं कारण
तू म्हण "माझा REVIEW बाकी आहे"
तो वळून ए.सी. बघेल.. तू तो लगेच चालू कर
थोडासा त्याच्याकडे वळव
बघ घरची आठवण येते का..!!
मग (अजून) रात्र होईल!
तो तुझं अप्रेजल काढेल..
म्हणेल - "तू होपलेस आहेस!"
पण तू ही तसंच म्हण !!(मनात)
ग्रेड्स कमी होतील..
KRA अजून वाढतील..
तो खाली सही करेल....
त्याच्या शे-यांकडे बघ..
बघ घरची आठवण येते का..
ह्यानंतर, हताश मनाने
SHUT DOWN करायला विसरू नकोस;
ह्यानंतर, मागचं इन्क्रिमेंट
नुसतं आठवायचा प्रयत्न कर;
ह्यानंतर, सगळा अपमान गिळून.. हसून दाखवायचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी -
बघ घरची आठवण येते का..?
....रसप....
२३ जून २०११
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!