राजन तुम हो साँच खरे, खूब लढे तुम जंग
देखत तव चंड प्रताप जही, तखत त्यजत औरंग !
कवी कलशाने संभाजी महाराजांना उद्देशून लिहिलेल्या ह्या ओळी. शंभूराजेंनी बुरहानपूर लुटल्यावर संतापलेल्या औरंगजेबाने ही प्रतिज्ञा केली होती की, 'जोपर्यंत संभाजीचा अंत करणार नाही, डोक्यावर ताज ठेवणार नाही.' संगमेश्वरला शंभूराजे, कवी कलश आणि इतर काही लोकांना कैदेत घेतलं गेलं आणि त्यांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं त्या वेळी खुदाचे आभार मानत आलमगीर आपल्या सिंहासनावरून उठून खाली आला. ते पाहून वरील ओळी कवी कलशाने उत्स्फूर्तपणे उच्चारल्या, असं म्हटलं जातं. काही ठिकाणी ह्या ओळी वेगळ्याही आहेत. पण मुद्दा हा की जेव्हा औरंगजेब आसन सोडून खाली आला आणि कैद केलेल्या संभाजी व कवी कलशाच्या समोर आला, तेव्हा कलशाने जखमी व जखडलेल्या अवस्थेत, मृत्यू समोर दिसत असतानाही आपलं शीघ्रकवित्व तर गमावलं नाहीच पण त्यासोबतच त्याच्यातला खमकेपणा, शंभूराजेंवरची आदर व प्रेमयुक्त निष्ठा आणि खोचक चिमटे काढणारी विनोदबुद्धीही गमावली नाही. औरंगजेबाच्या तोंडावर त्याला खिजवणाऱ्या आणि आपल्या राजाचे गुणगान करणाऱ्या ओळी फेकून मारायची ही जी गुस्ताखी कलशाने केली त्यामुळे चवताळून औरंगजेबाने कलशाची जीभ छाटायचे फर्मान सोडले. त्यावर तत्क्षणी अंमलही झाला.
'छावा'मध्ये हे दाखवलेलं नाहीय. खरं तर बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. आता इतिहास हा विषयच असा आहे की त्याची एकाहून अनेक versions आहेत. त्यात खरं-खोटं करण्याइतका अभ्यास माझा तरी नाही. मात्र आजवर जितकं ऐकलं त्यावरून तरी माझा समज हाच होता की सर्वात आधी कलशाची जीभ छाटली गेली, मग शंभूराजेंचीही जीभ छाटली. मग दोघांचे डोळे फोडले. अंगावरची कातडी ओरबाडून सोलली. त्यावर मीठ चोळले. हे सगळं करत असताना त्यांची धिंडही काढली गेली. सरतेशेवटी दोघांचा शिरच्छेद करून ठार मारले. औरंगजेबाच्या क्रूरपणाचा हा सगळा नंगानाच जवळजवळ दीड-दोन महिने सुरु होता. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ३-४ दिवसांत उरकला नव्हता. शंभूराजेंचा औरंगजेबाशी संघर्ष अनन्यसाधारण महत्वाचा आहे. पण त्याव्यतिरिक्तही त्यांच्या ९-१० वर्षांच्या छोट्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे टप्पे आहेत. गोव्याच्या पोर्तुगीजांवर केलेलं आक्रमण हा तर साफ आणि अक्षम्य दुर्लक्ष केलेला भाग आहे. पोर्तुगीजांनी गोव्यात केलेले अत्याचार हा इतिहास कधीच कुठे ऐकायला, वाचायला मिळत नाही. ह्या अत्याचारांवर वचक बसण्यासाठी शंभूराजेंनी गोव्यावर चाल केली होती. ते आक्रमण इतकं तिखट होतं की पोर्तुगीजांची पाचावर धारण बसली होती आणि त्यांनी त्यांच्या देवाला नवस बोलून मदत मागायला सुरु केलं होतं. इतक्या महत्वाच्या भागाचा साधा उल्लेखसुद्धा 'छावा'मध्ये येत नाही.
शंभूराजेंची जडणघडण लहानपणापासून झाली होती. आग्र्याहून पलायन, त्यानंतर काही वर्षं एक प्रकारचा अज्ञातवास. तोही असा की सगळ्या मुलुखात त्यांच्या मृत्यूची बातमी फिरवली गेली होती. मग काही वर्षांनी सुखरूप घरी पोहोचलेला युवराज संभाजी. आग्र्याला जाताना छोटं पोरगं होतं, परत आला तेव्हा अक्षरश: बारा गावाचं पाणी पिऊन, दुनियादारी पाहून, शिकून आणि तावून-सुलाखून कणखर बनलेला एक तरुण युवराज. हा प्रवास किरकोळ नाही, ही जडणघडण अदखलपात्र नाही. त्यानंतरच्या त्यांच्या आयुष्यात त्यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यापर्यंतच्या घडलेल्या घटना संदिग्ध आहेत. त्यावर वादविवाद होऊ शकतात म्हणून त्या टाळल्या, समजू शकतो. पण बाकीचं ?
अर्थात, एखाद्या ऐतिहासिक महापुरुषाची कहाणी सिनेमात दाखवायची तर बरेच शॉर्ट कट्स मारावेच लागतील. अन्यथा इतका मोठा पसारा दोन-अडीच तासात बसणारच कसा ? पण मग, जर बाहुबलीसारखी संपुर्णपणे कपोलकल्पित आणि अचाट व अतर्क्य कहाणी ह्याच देशात दाखवताना बिनधास्त दोन भागांत दाखवण्याची हिंमत करून ते यशस्वीही करून दाखवलं जातं; तर ह्या खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक महापराक्रमांची गाथा सांगताना सगळं एकाच सिनेमात कोंबायची गरज काय आहे ?
शिवाजी महाराज असोत वा शंभूराजे, दोघांपैकी कुणाचीही कहाणी औरंगजेबाच्या कहाणीशिवाय पूर्ण होत नाही. कारण औरंगजेब हा नीच, हलकट होता हे समजण्यासाठी त्याची ती कहाणी जाणणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्याच्याविरोधात महाराज आणि शंभूराजे का ठाकले होते, हे कळणार नाही. शिवरायांचं तरी एक वेळ जरा वेगळं आहे. त्यांच्या साधारण अर्ध्या कारकीर्दीनंतर औरंगजेबाशी त्यांचा सामना झाला असावा. पण शंभूराजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत औरंगजेबाशी लढले आहेत. हा औरंगजेबही 'छावा'मध्ये पूर्ण मांडला जात नाही. मूळ पुस्तकातही नाहीय. पण मूळ पुस्तकाशी तर अशीही बरीच फारकत घेतलेली आहेच. इथे एक सिनेमाची कहाणी म्हणून, ती व्यक्तिरेखा मांडणं आवश्यक होतं. तसं होत नाही. अक्षय खन्ना अप्रतिम काम करतो. पण व्यक्तिरेखाच अपुरी लिहिली गेल्याने त्यात खूप उणीव जाणवतेच. म्हणूनच मग असं वाटतं की अगदी सहजपणे औरंगजेबाचं दख्खनला येण्यापर्यंत एका भागात आणि त्यापुढे दुसऱ्या भागात असं हे कथानक मांडता आलं असतं का ?
असाच 'करता आलं असतं का' वाला अजून प्रश्न अनेकांनी आधीच मांडला आहे, मीही मांडतो. तो म्हणजे 'सिनेमाचे संगीत'. इथे ए. आर. रहमान इतका कमी पडला आहे की त्याच्याऐवजी दुसरा कुणी घेता आला असता का, हा प्रश्न पडतोच. वैयक्तिक सांगायचं तर रहमानचं संगीत मला पहिल्यांदा नावडलं आहे, असं अजिबात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा कंटाळा आलेला आहेच. पण छावा मात्र सगळ्यांच्या वर कडी आहे. पार्श्वसंगीत कानावर आदळत असताना अधूनमधून तर मला चक्क असं जाणवलं की हे ह्यांनी 'सिंघम अगेन' मधून कॉपी+पेस्ट केलं आहे की काय ! खास करून ते एक 'नरसिंघा..' का कायसं भयाण आरडाओरडा असलेलं गाणं(?) (किंवा पार्श्वसंगीत(?) जे काही आहे ते) तर 'सिंघम अगेन'मधल्या 'सिंघा..'चीच नक्कल वाटतं. रहमान आणि मेलडी ह्यांचं फार जवळचं नातं कधीच नव्हतं. पण ह्या नात्यात इतका प्रचंड दुरावाही कधी जाणवला नव्हता. एकंदर संगीत म्हणजे सुमार म्हणायच्याही लायकीचं नाहीय. काही वेळी तर ह्या ढणढणाटात संवादही नीट समजून येत नाहीत. शिवराय, शंभूराजे हे जिव्हाळ्याचा विषय आहेत आणि आपल्याकडच्या सिनेमात संगीताचा भाग अतिशय महत्वाचा असतो. इथे म्हणूनच एखादा असा संगीतकार हवा होता ज्याच्या गाण्यांत, संगीतात, चालबांधणीत यांत्रिकपणा कमी आणि एक 'ह्युमन टच' जास्त असेल. जो रहमानच्या संगीतात क्वचित असतो. त्यात त्याला संगीताचा मराठी बाजही अजिबात पकडता आलेला नाही. त्याच्यावर असलेली दाक्षिणात्य आणि सूफी संगीताची छाप काही केल्या पुसली जातच नाही. ह्यासाठी दिग्दर्शकही तितकाच जबादार मानायला हवा. त्याचा व्हिजन तो संगीतकारापर्यंत पोहोचवू शकला नाही, हे नक्कीच.
अजून दोन गोष्टी खटकल्या त्या म्हणजे:
१. मराठे चिलखत, शिरस्त्राण वगैरे आपादमस्तक लोखंडी युद्धपोशाख घालून लढत असत, ह्यावर मला संशय आहे. माझ्या माहितीनुसार मराठे चपळ, काटक होते. त्यांचा वेग जबरदस्त होता. कारण युद्धपोशाखाविना ते light weight असत. म्हणूनच ते नेहमी खिंडी, डोंगराळ भागांत शत्रूला गाठत असत. दुसरं अजून एक वैशिष्ट्य होतं. दोन्ही हातांत हत्यारं घेऊन लढणे. दोन्ही हातांत तरवारी किंवा दांडपट्टा घेऊन लढणारा एकही मावळा मला अख्ख्या सिनेमात दिसला नाही.
२. कवी कलशाला 'छंदोगामात्य' अशी उपाधी शंभूराजेंनी दिली होती. विकी कौशल ह्याचा उच्चार कायम 'चंदोगामात्य' किंवा 'चंडोगामात्य' असा करतो. Hopefully हा माझ्या ऐकण्याचा दोष असावा किंवा दणदणाटी पार्श्वसंगीतात नीट समजलं नसावं.
हे सगळं झालं जे खटकलं, नावडलं ते सगळं. मुद्दामच आधी मांडलं. आता मी मुख्य भागाकडे वळायला मोकळा !
छावा !
शंभूराजेंचं आयुष्य कायम संघर्षाचं होतं. शिवरायांचंही तसंच. राजपुतान्यातल्या राजांसारखे हे दिवाणखान्यात पसरून कधीच हुक्के पीत बसले नव्हते. चोहोबाजूंनी शत्रूंच्या घेऱ्यात असलेल्या मराठी स्वराज्यासाठी 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' अशीच परिस्थिती नेहमी होती. त्यात शंभूराजे बालवयात घरापासून दूर, एकटे राहिले. त्यांचं आयुष्य पराकोटीच्या शक्याशक्यतांनी आणि अतिशयोक्तीने भरलेलं आहे. ह्या महापुरुषांची कहाणी सांगताना सतत थरार, वेग हवा. ठाय नव्हे, द्रुत लय हवी आणि सिनेमाचा सूर खर्जाचा, ठहराववाला नाही, टिपेचा हवा. 'छावा'ने हा सूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पकडला आहे. अगदी सिंहासोबतची जी झुंज दाखवली आहे त्यातही आणि बसल्या खुर्चीत अक्षरश: अस्वस्थ करणाऱ्या संगमेश्वरच्या युद्धचित्रणातही.
सिनेमाची सुरुवात बुरहानपूरच्या लुटीपासून होते आणि शेवट कुठे होणार आहे, हे आपल्याला माहित असतंच. पण हा जो इथून तिथपर्यंत जायचा प्रवास आहे, ह्यात काही हातचं तर राखलं जात नाही ना ? ही भीती छावा फोल ठरवतो. Chhava breaks all the stereotypes ! मुघलांच्या थोरवी गाणाऱ्या निर्लज्ज बॉलिवूड सिनेमांच्या भाऊगर्दीत छावा वेगळा ठरतो. ह्याआधी तान्हाजीनेही हे वेगळेपण दाखवलं पण त्यातला भडकपणा आणि उथळपणा इथे नाहीय. विकी कौशलने ही व्यक्तिरेखा साकारताना संभाजी समजून घेतला आहे. नुसतंच बॉडी बनवून, दाढी वाढवून आणि गेटअप करून ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याचा भंपकपणा इथे नाही.
ऐतिहासिक सिनेमा म्हणजे भव्य सेट्स, चकचकीत पोशाख, दागदागिन्यांची रेलचेल; ह्याही stereotype ला छावा तोडतो. मुघल असो वा मावळे, इथे अनावश्यक दिखावे आणि देखावे नाहीत. जिथे जे जितकं आवश्यक आहे तितकंच. बादशहाचा दरबार दाखवायचा आहे, तर बादशहाचा दरबारच दाखवला आहे. तो कुठल्या महालात आहे, त्यात किती झुंबरं लटकतायत ह्याचा इथे काहीही संबंध नाहीय, दाखवलं नाही. शंभूराजे स्वप्नात शिवरायांचा आवाज ऐकतायत, लहान वयाचा शंभू अंधाऱ्या गुहेत अडकला आहे. हे स्वप्न पाहताना ते दचकून जागे होतात. तेव्हा शंभूराजे दिसले पाहिजेत, त्यांच्या शयनगृहाला खिडक्या किती, त्याची उंची किती हे सगळं अजिबात गरजेचं नाहीय, दाखवलेलं नाहीय.
एक मोठा कालखंड हा सिनेमा अडीच तासांत दाखवतो. त्यासाठी काही सिनेमॅटिक लिबर्टी घेतो, काही भाग गाळतो पण जो दाखवला आहे त्याच्याशी होता होईल तितकं प्रामाणिक राहण्याचा प्रामाणिक प्रयत्नसुद्धा करतो. सोयराबाईंसोबत मिळून अण्णाजी दत्तो व इतरांनी केलेले कारस्थान दाखवलं जातं आणि शिर्क्यांनी केलेला विश्वासघातही. हंबीरराव मोहितेंचा शंभूराजेंवर असलेला प्रभाव दाखवला जातो आणि कवी कलशासोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंधही. स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या मुघलांना भिडणारा रासवट संभाजी इथे जसा दिसतो तसाच येसूबाईंच्या सहवासात हळवा होणारा त्यांचा पती आणि 'श्रीसखा'ही.
सिनेमात अनेक लहानमोठ्या लढाया आहेत. मात्र अखेरची जी संगमेश्वरची लढाई आहे तिचा विशेष उल्लेख करायलाच हवा. लढाईचं असं, इतकं अंगावर येणारं उत्कट चित्रण मी आजतागायत आपल्याकडे कुठल्याच सिनेमात पाहिलेलं नाही. थोडं विचित्र वाटेल पण 'गेम ऑफ थ्रोन्स' पाहिलेल्यांना त्यातलं Battle of the bastards आठवल्याशिवाय राहणार नाही, असं हे चित्रण झालेलं आहे. हजारो लोक एका बंदिस्त जागेत घुसून एकमेकांशी लढतायत. त्यांच्यात चेंगराचेंगरी होतेय. त्यांच्या तलवारी कुठे, ढाली कुठे, एक हात कुठे, दुसरा कुठे.. मेलेले खाली पडतायत त्यांच्यात पाय अडकून जिवंतही पडतायत आणि हे सुरु असताना अजून लोक आत शिरतच आहेत. हा सगळा भयंकर कल्लोळ खुर्चीच्या टोकावर आणतो. तिथल्या सैनिकांना पाहून आपला बसल्या जागी श्वास कोंडतो, पाहूनच गुदमरल्यासारखं होतं.
एकंदरीत हा जो शेवटचा साधारण पाऊण तासाचा सिनेमा आहे तो (चांगल्या अर्थी) असह्यपणा गाठतो. हा पाऊण तास कुणाही नर्मदिल माणसासाठी नाहीय. (थिएटरमध्ये माझ्या बाजूला बसलेला भगवा टिळा लावलेला मुलगा तोंडावर हात ठेवून मुसमुसत होता.) हा एक प्रकारचा crescendo आहे. तो गाठण्यात अनेकांचा सहभाग आहे.
शंभूराजे औरंगजेबाच्या कैदेत गेले हे समजल्यानंतरची येसूबाई आणि एक-एक घाव सहन करणारे शंभूराजे एकत्र 'जगदंब जगदंब' म्हणतात; ह्याचा फार वेगळाच प्रभाव पडतो. रश्मीका मंदानाला येसूबाईंच्या भूमिकेत मर्यादित वाव आहे, पण त्यात ती छाप सोडते. तिने येसूबाईंचं दु:ख आणि बेचैनी दाखवताना अगदी अखेरच्या प्रसंगांतसुद्धा महाराणीपणाचा आब व्यवस्थित राखला आहे. संपूर्ण सिनेमात तिच्या वागण्या बोलण्यात जितका लाघवीपणा आहे, तितकाच घरंदाजपणासुद्धा. तिने केलेलं काम हा सुखद आश्चर्याचा धक्काच आहे
कवी कलश हे एक खरं तर गुंतागुंतीचं पात्र आहे. हा माणूस ब्राह्मण आहे आणि कवीही आहे; पण असं असूनही एक पराक्रमी शूर योद्धाही आहे ! ह्याचं ह्या स्वराज्यभूमीशी जन्माचं नातं नाही. हा आहे उत्तरेकडचा. तो इथे आला आग्र्याहून महाराजांनी जे शिताफीने पलायन केलं तेव्हा. पण तरी तो ह्या भूमीसाठी, स्वराज्यासाठी आणि शंभूराजेंसाठी प्राणांची आहुती द्यायला तयार आहे. एकाच वेळी भावुक आणि रुद्र, उग्र असलेलं हे पात्र विनीत कुमार सिंगने ताकदीने साकार केलं आहे. इथेही कुठला टाळीबाज आवेश नाही पण जितके त्याचे शब्द बोलतात तितकेच त्याचे डोळेही बोलतात. शंभूराजेंसोबत अखेरच्या क्षणांत केलेला काव्यमुकाबला त्या प्रसंगाची उत्कटता किती तरी पट उंच नेतो.
अक्षय खन्नाने जेव्हा जेव्हा नकारात्मक भूमिका केली आहे, तेव्हा तेव्हा त्याने केवळ कमाल केलेली आहे. त्याचा औरंगजेबाचा गेट अप मस्त जमून आला आहे आणि त्या गेट अपला तो ज्या सहजतेने वागवतो त्याला तोड नाही. चेहराभर केस आहेत आणि केवळ डोळ्यांतून भाव व्यक्त करायचे आहेत. त्यातही ते डोळे व्यक्तिरेखेशी साजेसे म्हणून मिचमिचे आहेत आणि पाठीला जरासा बाक असल्याने मानही थोडी खाली झुकलेली आहे. पण त्या तेव्हढ्या तिरक्या नजरेतही तो कधी जरब दाखवतो, कधी क्रौर्य तर कधी हताशाही. शिवरायांच्या मृत्यूची बातमी कळल्यावर 'या खुदा, जन्नत के दरवाजे खुले रखना. शेर आ रहा हैं' असो किंवा कवी कलशाच्या पंक्ती ऐकल्यावर अगदी निर्ममतेने 'मजा नहीं आया' असो, त्याचे संवाद अगदी समेवर थाप पडल्यासारखे आहेत. त्याचा हा परफॉर्मन्स बराच काळ लक्षात राहील.
हंबीररराव मोहितेंच्या भूमिकेत आशुतोष राणा, औरंगजेबाचा मुलगा मिर्झा अकबर म्हणून नील भूपालम, सोयराबाई म्हणून दिव्या दत्ता, रायाजी शिंदे म्हणून संतोष जुवेकर, औरंगजेबाची मुलगी झीनत म्हणून डायना पेंटी हे सगळेच आपापलं काम व्यवस्थित निभावतात. आशुतोष राणाला बाकी सहाय्यकांपेक्षा थोडा जास्त वाव मिळाला असेल म्हणून का असेना पण तो लक्षात राहतो.
ट्रेलर आला तेव्हा त्यातलं विकी कौशलचं 'पार्वती पतये हर हर महादेव..' ऐकून फार जबरदस्त वाटलं होतं. ते थिएटरमध्ये ऐकतानाही तितकंच भारी वाटतं. पण हा प्रसंग विकी कौशलच्या कामाचा कळस नाहीय. किंबहुना, त्याचं काम अथपासून इतिपर्यंत एकाच प्रभावीपणे इतकं अप्रतिम झालं आहे की कोणताही एक प्रसंग वेगळा काढून, 'हा सगळ्यात भारी' असं म्हणता येणार नाही. वर म्हटल्याप्रमाणे त्याने शंभूराजे साकारताना केवळ त्यांच्यासारखी वेशभूषा केलेली नाहीय. त्याच्या कामात एक प्रामाणिकपणा दिसतो. हे जाणवतं की त्याने ह्यासाठी काही मेहनत घेतली आहे, काही अभ्यास केला आहे. त्याने शिवाजी आणि संभाजी समजून घेण्याचा निदान प्रयत्न तरी नक्कीच केला आहे. अगदी पहिल्या सिनेमापासून (मसान), उरी असो वा सॅम बहादूर किंवा 'संजू'ही, विकी कौशल नियमितपणे उत्तम काम करत आला आहे. तो छावा उत्तम करेल, ह्याविषयी मला अजिबात शंका नव्हती आणि तो अजिबात निराशही करत नाही. उलट अपेक्षा अजून उंचावतो. संभाजी-शिवाजी, संभाजी-हंबीरराव, संभाजी-येसूबाई, संभाजी-कलश आणि संभाजी-औरंगजेब ही सगळी समीकरणं परस्परभिन्न आहेत. त्याने ती सगळी नीट समजून घेतली आहेत.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरचा मी ह्या आधी फक्त 'मिमी' पाहिला आहे. विशेष वाटलं नव्हता. मात्र 'छावा' करत असताना त्याने मॅग्नम ओपस असल्याप्रमाणे काम केलेलं आहे. अनेक गोष्टी मला खटकल्या आहेत, त्या वर सविस्तर मांडल्या आहेतच. सिनेमा अजूनही खूप उंचीवर जाऊ शकला असता, पण जे केलं आहे तेही नसे थोडके. 'छावा'ने अनेक पायंडे मोडले आहेत. पडद्यावर हिंसा दाखवताना भडकपणा आणि प्रभावीपणा ह्यात असलेलं अगदी एका धाग्याचं अंतर सहजपणे पार केलं जातं. इथे दाखवलेली हिंसा मला भडक वाटली नाही पण ती पाहत असताना मी निर्विकारही राहू शकलो नाही. मूळ पुस्तकातील कहाणीत आणि काही ठिकाणी इतिहासातही थोडेफार बदल केलेले असले तरी जे दाखवलं आहे त्यावर ते दाखवणाऱ्याची पकड आहे, हे लपत नाही. ही पकड हेही एक 'छावा'चं यशच आहे !
अखेरीस, बाजीराव-मस्तानी आला तेव्हा लोक म्हणत होते की कसंही हास्यास्पद दाखवलेलं असो पण त्या निमित्ताने लोकांना इतिहासाची ओळख होते, ते त्याविषयी माहिती घेऊ पाहतात, हे महत्वाचं आहे.
नाही.
लोकांना इतिहासाकडे आकर्षित करण्यासाठी, त्याची आठवण किंवा ओळख करून देण्यासाठी त्याचं विकृतीकरण, विद्रूपीकरण किंवा त्याचं भ्रष्ट सादरीकरण करणं अजिबात गरजेचं नाहीय. त्यासाठी 'छावा'सारखे सिनेमे येत राहणं गरजेचं आहे.
मराठ्यांच्या समग्र इतिहासात असंख्य कहाण्या आहेत ज्यांवर एकाहून एक सिनेमे बनू शकतील. आजची पिढी, जिला 'कोण संभाजी' हाही प्रश्न पडू शकतो त्यांच्यासाठी हा इतिहास एक कहाण्यांचं भांडार आहे. त्यांच्यासाठी हे खुलं करायला हवं. असे अजून सिनेमे बनायला हवे.
जय भवानी !
- रणजित पराडकर
अतिशय सुरेख लिहिलंय...
ReplyDeleteस्वाती छत्रे मायदेव
धन्यवाद !
Deleteजबरदस्त review लिहिला आहे.... 👌🏻👏🏻
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteमी अजून छावा पहिला नाही पॅन वरील लेख अत्यंत वास्तविक वाटतो कारण त्यात सर्व बाजू व्यवस्थित मांडल्या आहेत
ReplyDeleteवरील प्रतिक्रिया विनय जकातदार
ReplyDeleteThank you Baba !
Deleteफार छान आणि विस्तृत लिहिले आहे. आवडले
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteधन्यवाद !
ReplyDeleteRupali Kaldate 18.Feb 2025
ReplyDeleteखूप छान वर्णन केलं आणि सखोल अभ्यास केलेला आहे.
आजच बघितला आणि मुद्दामून तुझं समीक्षण वाचलेलं नव्हतं ..
ReplyDeleteपण अत्यंत योग्य परीक्षण आहे... जे मुद्दे खटकले ते वर तू नमूद केलेले आहेच..पण तुझं परीक्षण अगदी योग्य वाटत आणि आम्हालाही नेमकं हेच म्हणायचं होत ... अस वाटत..काही प्रसंग Add करता आले असते खरे पण मग चित्रपटाचा वेग,वेळ कदाचित साधता आला नसता.. पण तरीही थोडा साऊथ इंडीयन टच वाटतो चित्रपट बघताना.. रश्मिका खरंच गोड दिसली पण डब करता आला असता तिचा आवाज.. त
Anil pandit Mahajan
ReplyDelete