Saturday, January 17, 2009

"तो"


असामान्य नव्हता तो
पण वेगळा मात्र होता
पहिला-दुसरा यायचा नाही
पण हुशार मात्र होता

संगीताचा छंद त्याला
बुद्धिबळाचा नाद
मी मात्र उडाणटप्पू
अंगात फक्त माज

मध्यमवर्गीय कुटुम्बातला
काकांकडे राही
काका होते अब्जाधीश
काहीच उणे नाही

दूजाभाव नव्हता तरी
बंधनं तर होती
चुलत भावा-बहिणीसोबत
तुलना होत होती

माझी सुद्धा व्यथा हीच
कथा वेगळी होती
घरीच होतो स्वत:च्या
पण तुलना 'मारत' होती..

पर्यावरण सहल आम्ही
'माथेरान'ला नेली
तिथंच जुळलं सूत आमचं
जवळीक निर्माण झाली..

कैंटीनमध्ये जोडगोळी
आमची फेमस झाली
हळूहळू स्वारी माझ्या
'कंपू'तही आली

माथेरानवर प्रेम त्याचं
अगदी जीवापाड
सहलींवर सहली केल्या
नव्हता पारावार

'फुंकणं-पिणं' आम्ही दोघं
एकत्रच शिकलो
कितीतरी बैठकिंना
मनसोक्त झिंगलो..

वर्ष होते चौदावीचे
मला पनौतीचे
हरवलेल्या प्रेमाचे अन्
भरकटलेल्या तारूचे..

इथून पुढे तो अन् मी
आयुष्याशी खेळलो
आत्ता कुठे कळतंय
जिंकलो की हरलो..

अभ्यासाच्या नावाखाली
कधी कट्टे झिजवले..
गुंड पोरांमधले सभ्य
एव्हढं नाव कमावलं

पदवीच्या निकालाने
पुन्हा सारे पालटले
काठावरती तरलो मी
त्याचे वर्ष बुडाले

व्यवसायाच्या निमित्ताने
मुंबई माझी सुटली
मैत्री राहिली कायम तरी
जोडी मात्र तुटली..

ऑक्टोबरला त्याने त्याची
पदवी पूर्ण केली
योग्य वेळी योग्य अशी
नोकरी सुद्धा 'धरली'

मला फक्त 'नाद' होते
व्यसनं नव्हती कसली
त्याच्या मात्र छंदांची
जागा व्यसनांनी घेतली

मला एक हात होता
उभं करण्यासाठी
त्याच्यासमोर पेला होता
बुडून राहण्यासाठी..

नोकरीत त्याने मेहनतीने
खूप प्रगती केली
पण गलेलठ्ठ पगाराची
फक्त दारू प्याली..

मित्राच्या ह्या अवस्थेने
मला अपराधी वाटे
त्याच्या दिवाळखोरीत मला
माझेच भांडवल दिसे

पाच वर्षे चालू होतं
त्याचं बेवडेपण
नसानसात दारूच त्याच्या
अगदी कण अन् कण

फलाटावर, ट्रेनमध्ये
जिन्यात कधी बारमध्ये
न्हाऊन न्हाऊन पडून राही
फक्त अन् फक्त दारूमध्ये

अनेक दिवस अनेक रात्री
"ब्लैक आउट" मध्ये गेल्या
माझ्यासकट सा-यांनी
सा-या आशा सोडल्या..

आई-बाबांचा एकुलता
मुलगा लाडका होता
पिळून गेल्या काळजामध्ये
नुसता गलका होता

अनेक महिन्यात त्याचा माझा
संवाद झाला नव्हता
मीच शेवटी फोन केला
चक्क शुद्धीत होता..!!

म्हटलं,"मी मुंबईला येतोय"
खूप खूष झाला
भेटण्याचा बेत ठरवून
फोन ठेवता झाला..

पोचल्या दिवशीच भेटलो त्याला
काय सांगू कथा..?
माझ्या डोळ्यासमोर त्याचा
नवाच अवतार होता

"मी दारू सोडली आता"
अभिमानानं बोलला
"कितीक वेळा सोडलीस अशी"
मी टोला हाणला

मंद स्मित करून त्याने
पुन्हा तसंच म्हटलं
'खरंच सोडली की काय'
मला सुद्धा वाटलं

खरंच माझा मित्र आता
त्यातून बाहेर पडला होता
पेल्यापाठचं जग आता
हासून पाहात होता

आनंदाने माझ्या अगदी
सीमा गाठली होती
मनामधाली उभारी त्याच्या
डोळ्यात साठली होती

डोक्यावरती कर्ज होतं
पण खांदे ताठ होते
मनामध्ये शल्य होतं
डोळ्यात पाट होते

दिसत होतं मला आता
नवं तांबडं फुटतंय
विश्वासाने बोलला "तो",
"आता जगावंसं वाटतंय.."




....रसप....
१७ जानेवारी २००८

1 comment:

  1. kiti bolki kavyakathi aahe he. is that a true story? atleast while reading it sounds very true.
    "jinklo ki harlo " ani "budun rahnyasathi" kadvi superb.
    "tyachya divalkhorit mala mazech bhandval dise"
    "piloon gelya kaljaamadhe noosta galkaa hotaa"
    ahaa!!!!!!!!!!!! concept sundar bandhlaay.
    ani shevtcha kadva agdi surekh.
    sutraat bandhlaay musta, utsooktaa khechat nete shevtakade.shevat jasa asayla pahije tasa. i like that +ive spirit and always udhavastatetoon phootlele ankur, keval ashaach pallavit karat nahit tar unmaad bhartaat. tuzi he kavykathi vachoon mala gadima athavle. tyanchya kavyakathi kadhi vachlya aahes kaa? avashya vaach tula tuzach samjel te ka athavle astil mala. i m so proud of u,
    u r reaching newer hights. 2 mitranchya jeevanpravaasatlya ek vishishtha tappyachi katha kavyachya madhymatoon taal, sur, naad, lay sarv jodat bandhaycha soppa nahi pan likhantli tuzi sahjta khoop algad kathela pudhe nete. harvoon jato vachak. ajoon khoop kahi yetay mannat pan mazi laamban faarach hotey. i m tooooooooo impressed.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...