पूर्वी शाळेत मराठी, हिंदीप्रमाणेच इंग्रजीच्या पेपरमध्येसुद्धा पाठ्यपुस्तकातील धड्यांवरचे प्रश्न असायचे. नंतर ही पद्धत बदलली आणि इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतच एक उतारा दिला जाऊ लागला, ज्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ लागले. अर्थात, हे प्रश्न त्या त्या वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार, पाठ्यपुस्तकानुसारच असत. पण मुलांना इंग्रजीत अधिक गुण मिळायला लागले. चित्रपटांचे रिमेक करणं, हे असंच काहीसं वाटतं मला. पूर्णपणे वेगळी कथा, विषय घेऊन त्यावर चित्रपट बनवणे, त्यातही आव्हानं स्वीकारणे आणि ती पेलणेही, हे करणारे नवीन दिग्दर्शक मला दिसतात आणि त्याच वेळी प्रश्नपत्रिकेतच येणाऱ्या उताऱ्यावर आधारित प्रश्न अचूक सोडवणारे, रिमेक्स करण्यावर अधिक भर देणारे दिग्दर्शकही दिसतात. ह्यातले काही जण दक्षिणेकडे गाजलेल्या मसालापटांना त्यांच्या पांचटपणा, बिनडोकपणा आणि भडकपणासकट पुनर्चित्रित करतात, तर करण मल्होत्रासारखे काही जण पूर्वी येऊन गेलेल्या चित्रपटांना नव्याने सादर करतात. करण मल्होत्रा ह्यांनी दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल टाकताना नव्वद सालच्या सुपर फ्लॉप 'अग्निपथ'चा रिमेक केला होता आणि आता २०११ चा हॉलीवूड चित्रपट 'वॉरियर'चा रिमेक. संदर्भाचा उतारा समोर असल्यामुळे जसे मुलांचे गुण वाढले, तसे 'अग्निपथ' सोडवताना मल्होत्रानी चांगले गुण मिळवले. 'वॉरियर' सोडवताना मात्र मल्होत्रा तितके गुण मिळवू शकत नाहीत, पण अगदी नापासही होत नाहीत किंवा काठावर पासही. सरासरी गाठतात !
मूळ इंग्रजी 'अॅक्शन स्पोर्ट मूव्ही'चा हिंदीतला रिमेक म्हटल्यावर 'अॅप्पल टू अॅप्पल' तुलनेत हिंदी कमी पडणारच, कारण चित्रपटातल्या 'अॅक्शन'कडे पाहायचा आपला दृष्टीकोनच भिन्न आहे. तसेच, चित्रपटात म्हटल्याप्रमाणेच, 'फायटिंग' कडे एक 'खेळ' म्हणून पाहणे आपल्याकडे मर्यादितच आहे. त्यामुळे एक इंग्रजी 'अॅक्शन स्पोर्ट मूव्ही' आणि एक हिंदी 'अॅक्शन स्पोर्ट मूव्ही' ह्यांच्यात तोच फरक आहे जो घरच्या मैदानावर खेळणारा भारतीय क्रिकेट संघ आणि परदेशात खेळणारा तोच संघ ह्यांच्यात असावा. त्यातही, जर तो 'रिमेक' असेल, तर पितळच उघडं पडतं. त्यामुळे शक्यतो ही तुलना न करता ह्या चित्रपटाकडे पाहायला हवं. ते शक्य होणार नाहीच आणि वाईट गोष्टींना आपण 'हा हिंदीचा एकंदरच प्रॉब्लेम आहे' म्हणून ठळक करू आणि चांगल्या गोष्टींना 'मूळ चित्रपटामुळे हे सोपं झालं' असं म्हणून पुसट करू. काय करणार मल्होत्रा साहेब, तुम्ही रिमेक केला आहे तर आता हे त्याचे 'बाय-प्रोडक्ट'च समजा !
भारतात प्रतिबंधित असलेल्या 'स्ट्रीट फाईट्स' महानगरी मुंबईत रात्रीच्या काळोखात आणि पोलिसांना चुकवून किंवा 'मॅनेज' करून चालत असतात. ही एक समांतर इंडस्ट्रीच असते समजा. ज्यावर अनेक फायटर्स, सटोडिये व इतर काही लोक गुजराण करत असतात आणि शेकड्याने लोक ह्या मनोरंजनासाठी पैसाही टाकत असतात. ह्या 'स्ट्रीट फायटिंग इंडस्ट्री'तला एके काळचा एक स्टार 'गॅरी फर्नांडीस' (जॅकी श्रॉफ) तुरुंगातून, आपल्या एका गुन्ह्याची शिक्षा भोगून बाहेर पडतो. (कुठला गुन्हा, हे सांगणे जाणीवपूर्वक टाळतो आहे.) बाहेरच्या जगात त्याचे दोन मुलगे आपापलं आयुष्य जगत असतात. मोठा 'डेव्हिड' (अक्षय कुमार) आणि लहान 'मॉण्टी' (सिद्धार्थ मल्होत्रा). गॅरी तुरुंगात गेल्यापासून एकटाच राहणारा मॉण्टी, बापाप्रमाणेच एक 'स्ट्रीट फायटर' असतो आणि भाऊ व बापापासून वेगळा राहणारा, त्यांचा तिरस्कार करणारा 'डेव्हिड' पत्नी 'जेनी' (जॅकलिन फर्नांडीस) आणि सहा वर्षांची मुलगी 'मारिया'सोबत एक पूर्णपणे वेगळं आयुष्य जगत असतो. एका शाळेत शिक्षकाची नोकरी करणारा डेव्हिड आणि त्याची पत्नी जेनी कर्ज घेऊन, पै पै जोडून, वाचवून मुलीच्या किडनीच्या इलाजासाठी आणि भविष्यातल्या अटळ 'ट्रान्स्प्लॅण्ट' साठी सोय करत असतात. डेव्हिडही पूर्वी 'स्ट्रीट फायटर'च असतो, पण जेनीसोबत नवं आयुष्य सुरु करताना त्याने 'फायटिंग' सोडलेली असते.
दुसरीकडे, पीटर ब्रागेन्झा (किरण कुमार) हा एक मोठा उद्योगपती, आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवलेल्या 'राईट टू फाईट' (R2F) ह्या 'फायटिंग चॅम्पियनशिप' ला भारतात घेऊन येतो. बापाच्या नजरेत डेव्हिडपेक्षा जास्त किंवा त्याच्याइतकीच आपली कुवत सिद्ध करण्यासाठी 'मॉण्टी' ह्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतो आणि नोकरी सुटलेला, बँकेने कर्ज नाकारलेला डेव्हिड मुलीच्या इलाजासाठी पैसा उभारण्यासाठी पुन्हा रिंगणात उतरतो.
पुढे काय होणार हे सांगायची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. कारण इंग्रजी असो वा हिंदी, चित्रपट काही बाबतींत एकसूत्रीपणा अवलंबतात आणि एका विशिष्ट वळणावर कथानक आलं की पुढची वळणं तसेच अंतिम स्थानसुद्धा बहुतेक वेळी लक्षात येतंच.
संपूर्ण चित्रपटभर एका राखाडी छटेचा झाकोळ आहे. ही छटा रंगाची नाही, तर 'मूड'ची आहे. कुठेही त्याचा मूड फारसा बदलत नाही. ना कुठे काही हास्यविनोद आहेत, ना अनपेक्षित धक्क्याने येणारी अगतिकता आहे, ना नाट्यमयतेचा कडेलोट करणारे संवाद कुणी एकमेकांच्या तोंडावर मारतं. एका संयमित गतीने चित्रपट पुढे सरकत राहतो आणि अध्येमध्ये रखडतोही. खासकरून मध्यंतरानंतर, जेव्हा 'R2F' सुरु होते, तेव्हा रटाळपणा वाढतो. चक दे इंडिया, मेरी कोम, लगान, भाग मिल्खा भाग वगैरेंमध्ये दिसलेली पायरी-पायरीने चढत जाणारी उत्कंठा आता आपल्याला इतकी सवयीची झालेली असते की चॅम्पियनशिप सुरु झाल्या झाल्याच आपल्याला वाटतं की, 'डायरेक्ट दोन भावांमधली अटळ फायनल सुरु करा यार!'
सिद्धार्थ मल्होत्राने 'नकटं असावं पण धाकटं असू नये' ह्या उक्तीतली धुसफूस चांगली दाखवली आहे. त्याला दाढी शोभते आणि अक्षय कुमारची दाढी मात्र 'दाढी' न वाटता हिरवट, पांढरट, पिवळसर 'बुरशी' वाटते. तो पडद्यावर आला की पडद्यालाही अंघोळ घालावीशी वाटते, इतका तो कळकट दिसतो. त्यात परीक्षेला कॉपी करणारी पोरं जशी अंगावर टिप्पण्या लिहितात, तसलं ते गोंदकाम (Tattoo) त्याच्या कळकटपणाला आणखी कळकट बनवतं. सिद्धार्थसाठी अभिनयाच्या संधी म्हणजे वडिलांसाठीची तळमळ आणि मोठ्या भावाशी होणाऱ्या तुलनेने होणारी कुचंबणा आणि अक्षयसाठी अभिनयाच्या संधी म्हणजे आपल्या लहानग्या मुलीला वाचवण्यासाठी परिस्थितीशी झगडा, ह्याच आहेत. दोघांनी त्या त्या संधींना न्याय नक्कीच दिलेला आहे.
जॅकलिन फर्नांडीसला खूप छोटीशी भूमिका आहे. ती पुन्हा एकदा सुंदर दिसते आणि दिलेलं काम पूर्ण करते.
मात्र, चित्रपट खिश्यात घालतो तो जॅकी श्रॉफ. गॅरीच्या व्यक्तिरेखेला अनेक कोन आहेत, छटा आहेत. एक फायटर, एक बाप, एक व्यसनाधीन, एक पश्चात्तापदग्ध अपराधी ह्या सगळ्या छटा त्याने खुबीने रंगवल्या आहेत. बेचैनी, नैराश्य आणि एकूणच मानसिक असंतुलन दाखवताना जॅकीने आजवर त्याच्यात क्वचितच दिसलेल्या उत्तम अभिनेत्याचं दर्शन घडवलेलं आहे. आजपर्यंतच्या त्याच्या कारकीर्दीतली ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असू शकते. अर्थात, मूळ चित्रपट 'वॉरियर' मध्ये 'निक नोल्टे' ला ह्याच भूमिकेसाठी अकादमी पुरस्काराचे नामांकन मिळाले असल्याने, ते काम कदाचित जॅकीला संदर्भ म्हणून समोर ठेवता आलं असेल, तरीही त्याचं श्रेय कमी होणार नाहीच.
शेफाली शाहने गॅरीच्या पत्नीची व्यक्तिरेखा अप्रतिम उभी केली आहे. 'दिल धडकने दो' मधली उच्चभ्रू आई आणि इथली आई ह्यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. ह्या दोन्ही भूमिका एकच अभिनेत्री करते आहे आणि एकाच ताकदीने, हे निश्चितच वाखाणण्यासारखं आहे. एका प्रसंगात तिने चेहऱ्याच्या सावलीतूनही भावना दाखवल्या आहेत.
अजय-अतुलचं संगीत श्रवणीय आहे. मात्र 'ये गो ये, ये मैना' चं हिंदीकरण 'मेरा नाम मेरी है' साफ फसलं आहे. 'मेरी सौ टक्का तेरी है' ही हास्यास्पद ओळ लिहिल्याबद्दल अमिताभ भट्टाचार्यला, नेहमीच्या गुणी विद्यार्थ्याने चुकीचं उत्तर दिल्यावर जसं रागे भरलं जातं, तसं कुणी तरी अधिकारवाणीने रागवायला हवं. त्या गाण्यावरचं करीना कपूरचं भिकार नृत्य अविस्मरणीय आहे. 'चिकनी चमेली' ची नक्कल म्हणून हे गाणं घुसडलं आहे. पण त्याला ना श्रेया घोशालची सर आहे ना कतरिनाची. करीनाने ह्या गाण्यावर जे काही केलं आहे, त्यावरून तिला नृत्यासाठी एक जीवनगौरव पुरस्कार देऊन टाकावा, जेणेकरून ती परत नृत्य करणार नाही.
चित्रपट 'ब्रदर्स' असला, तरी तो आहे 'फादर'चाच आणि तो 'फादर'मुळेच लक्षात राहतो. ह्या निमित्ताने जॅकी श्रॉफ ह्यापूर्वीच्या क्रॅपी आठवणी पुसून ताकदीचा अभिनेता म्हणून पुढे येईल, असा विश्वास वाटतो. हा रिमेक तोकडा पडला असला, तरी स्वतंत्र चित्रपट म्हणून जेव्हढ्यास तेव्हढा तरी होतोच. 'ब्रदर्स' हरले, तरी 'बाप' जिंकतो, जॅकी लक्षात राहतो. त्याच्यासाठी तरी नक्कीच पाहता येईल.
रेटिंग - * * १/२
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये १६ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!