Sunday, August 09, 2015

'सिली कॉमेडी' - 'बँगिस्तान' (Movie Review - Bangistan)


आक्रमण हा उत्तम बचाव असतो आणि विनोद ही सर्वोत्तम टीका. टीकात्मक विनोद म्हणजेच 'उपहास'ही आणि 'टोमणेबाजी'ही ! एक चित्र एक हजार शब्दांच्या बरोबरीचं असतं, असं म्हणतात. कधी कधी असंही वाटतं की, एक विनोद हा हजार शब्दांच्या लेखाइतकंच उत्तम भाष्य असतो. बहुतेक वेळेस हे टीकात्मक विनोद म्हणजे 'सिली ह्युमर' असतात आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी मानेच्या वरच्या अवयवाला काही काळ सुट्टी द्यावी लागते ! पण किंवा म्हणूनच ह्या तिरकस विनोदांचा सतत मारा झाला, तर मात्र त्याचा उबगही येतो. असे उबग आपल्याला आलोकनाथ, रजनीकांत, आफ्रिदी आणि सध्या 'ट्रेंडिंग' असलेल्या 'जान्हवी-श्री' चे येऊन गेले आहेत आणि येतही आहेत.
आजच्या जगासमोर असलेल्या सगळ्यात भयंकर समस्येवर 'बँगिस्तान' तिरकस विनोद करतो. हा विनोद 'सिली ह्युमर' म्हणता येईल. ह्याच्या आस्वादासाठी डोक्याची लुडबुड टाळायला लागेल आणि त्याचा 'उबग'ही येत नाही ! Sounds good ! Right ?
बहुतेक !

'बँगिस्तान' नावाचा एक देश ह्या भूतलावर आहे. कट्टर, धर्मांध लोकांच्या ह्या देशात मुसलमान वि. हिंदू हा संघर्ष आणि हिंसा अगदी रोजचीच गोष्ट आहे. इथले हिंदू आणि मुसलमान लहान-सहान गोष्टींवरुन हत्यारं उपसणारे आणि त्यातच आपापल्या धर्माची सेवा मानणारे असतात. सतत हिंसेत, द्वेषात धुमसणाऱ्या ह्या देशात मुसलमानांचे इमाम साब आणि हिंदूंचे शंकराचार्य हे दोघे सर्वोच्च धार्मिक नेते मात्र ह्या सगळ्या परिस्थितीमुळे अतिशय व्यथित असतात. आपसांत उत्तम मैत्रीपूर्ण संबंध असलेले हे दोघे सर्वोच्च नेते 'पोलंड'ला होणार असलेल्या १३ व्या जागतिक धार्मिक परिषदेच्या व्यासपीठावरून सर्व धर्म व देशबांधवांना शांतीसंदेश देण्याचं ठरवतात. ह्याची कुणकुण दोन्ही धर्मांच्या कट्टरपंथियांना लागताच, ते हा शांतीचा मार्ग बांधला जाण्याच्या आधीच उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान आखतात. १३ व्या जागतिक धर्म परिषदेत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं दोन्ही धर्मांचे कट्टरपंथी ठरवतात. ह्या कार्यासाठी 'हाफिज बिन अली' (रितेश देशमुख) आणि 'प्रवीण चतुर्वेदी' (पुलकित सम्राट) ह्यांना निवडलं जातं. हाफिजला हिंदू भासवून 'ईश्वरचंद शर्मा' नावाने आणि प्रवीणला मुसलमान भासवून 'अल्लारखा खान' नावाने पोलंडला बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी पाठवलं जातं. जेणेकरून 'प्रतिस्पर्धी' धर्माची बदनामीसुद्धा होईल. हे दोघे 'होतकरु' कट्टरपंथी पोलंडला जातात, एकमेकांना भेटतात आणि दिलेल्या 'ईश्वरी' जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी काम सुरु करतात.
पुढे काय होतं हे तितकंसं महत्वाचं नाही, 'कसं होतं' हे जास्त महत्वाचं आहे.



दहशतवादासारख्या भयंकर विषयावर खुमासदार 'तेरे बिन लादेन' २०१० ला आला होता. 'बँगिस्तान' त्याच्या तुलनेत कमीच पडेल, पण विनोदाच्या नावाखाली असह्य आचरटपणा, चावटपणा किंवा पांचटपणा करणाऱ्या नेहमीच्या बिनडोकपटांपेक्षा निश्चितच उजवा ठरावा. फॅकडॉनल्ड्स, दाढीची लांबी, चायनीज बॉम्ब वगैरे फंडे धमाल आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपट कुठलाही संदेश देण्यासाठी गुळमुळीत धार्मिक सलोख्याची भाषणं झोडत नाही.

मात्र चित्रपटाचा आणि लेखक-दिग्दर्शकाचा हा दृष्टीकोन जसाच्या तसा रितेश देशमुखला कळला नाही की काय, असं वाटतं. एरव्ही 'कॉमेडी' मध्ये सहजाभिनय करणारा रितेश इथे मात्र वेगळ्याच जगात असल्यासारखा वाटतो. ह्या भूमिकेतल्या रितेशकडून आपल्याला खूप जास्त अपेक्षा असते, ती तो पूर्ण करत नाही. कुठल्या तरी जटील विवंचनेत गुंतला असल्याचे भाव पूर्ण वेळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत राहतात.
तर दुसरीकडे, पुलकित सम्राट उगाच पॉपकॉर्नसारखा उडत राहतो ! ह्या दोघांना पाहून एक विनोद आठवतो.
एकदा दोघं मित्र महामंडळाच्या बसने जात असतात. तिकीट काढताना एक जण म्हणतो, 'हा माझा मित्र डोक्याने अर्धवट आहे, म्हणून आम्हाला एक फुल्ल एक हाफ तिकीट द्या!'
कंडक्टरसुद्धा महामंडळाचा असल्याने चतुर असतो. म्हणतो, 'तरी दोनच घ्यावी लागतील. मित्राचं अर्धं आणि तुमचं दीड!'
तसं काहीसं रितेश + पुलकित हे कॉम्बीनेशन झालं आहे. रितेश फिका वाटतो आणि पुलकित जास्तच रंगीन ! एक अर्धा, एक दीड ! पण कलेच्या क्षेत्रात १ + १ = २ इतकं सरळसोट गणित नसतं. त्यामुळे अर्धा + दीड = 'दोन' सोडून इतर सगळी उत्तरं मिळत राहतात.

इतर सहाय्यक अभिनेत्यांनी मात्र धमाल केली आहे. हफीजचे होतकरु 'सह-दहशतवादी' आणि प्रवीणचे होतकरु 'सह-माथेफिरू', पोलंडमधला बांगलादेशी इस्टेट एजंट, भडकावू अब्बाजान आणि गुरुजी वगैरे सगळ्यांनीच उत्तम काम केलं आहे.
इतकंच काय एरव्ही अभिनयाच्या नावाने शंख असणारी जॅकलीन फर्नांडीससुद्धा 'रोझी' म्हणून आवडून जाते !

आजकाल कानाला बरं संगीत वाटलं की 'ते प्रीतमचं असेल', अशी भीती वाटते. आनंदाची गोष्ट ही की बँगिस्तानला प्रीतमचं संगीत नसून 'राम संपत' चं आहे. ते चक्क 'उल्लेखनीय' वगैरे आहे. 'होगी क्रांती', 'इस दुनिया से लडना है', 'मौला' आणि 'सॅटरडे नाईट' ही गाणी लक्षात राहतात. गाण्यांच्या चाली जश्या प्रसंगांना साजेश्या आहेत आणि तसेच पुनीत कृष्णचे शब्दही. कुठलेच गाणे 'हे कधी संपणार आहे!' असा विचार मनात डोकावू देत नाही, ह्यासाठी खरोखर संगीतकार-गीतकार द्वयीचं अभिनंदन ! (ह्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आजकाल चित्रपटाच्या गीतकाराचं नाव बहुतेक ठिकाणी गाळलं जात आहे. हे निश्चितच स्वीकारार्ह नाही आणि ह्याचा निषेध व्हायलाच हवा.)

संवादलेखन फार काही ताकदीचे झालेले नाही. शाब्दिक कोट्यांतून विनोदनिर्मिती न होता परिस्थितीजन्य विनोदनिर्मितीवरच भर आहे. शेवटाकडे असलेल्या एका दृश्यात रितेश आणि पुलकितला अधिक चांगल्या संवादांची गरज होती, असे प्रकर्षाने जाणवते.

दिग्दर्शक करण अंशुमन ह्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अश्या विषयावर विनोदी चित्रपट बनवणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे. नवे दिग्दर्शक, नवीन चेहऱ्यांना घेऊन, आव्हानात्मक विषय हाताळतात, हे 'मसान'नंतर दुसऱ्यांदा दिसलं आहे.  'बँगिस्तान'चा मूड व विषय 'मसान'पेक्षा खूपच वेगळा असला तरी सरळसोट, सरधोपट वगैरे कॅटेगरीतला तर नाहीच आहे. त्यामुळे ह्या हिंमतीसाठी मनापासून दाद द्यायलाच हवी. फार सहजपणे ह्या कथानकाचा विचका होऊन 'बँगिस्तान' ऐवजी 'भंकस्तान' होऊ शकला असता, मात्र तसे झालेले नाही. कदाचित अजून सफाईदार झाला असता, मुख्य कलाकारांच्या अधिक चांगल्या प्रदर्शनाने आणखी खुमासदारही झाला असता, पण आधीच म्हटल्याप्रमाणे एरव्हीच्या पांचटपणापेक्षा कैक पटींनी हा तिरकसपणा चांगलाच आहे. 'सिली कॉमेडी' म्हणून एकदा नक्कीच पाहिला जाऊ शकतो !

रेटिंग - * * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०९ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...