Monday, August 03, 2015

'जुलै'चा विजयी चौकार (Movie Review - Drishyam)

सध्या हिंदी चित्रपटाच्या सागरात दोन प्रकारच्या लाटाच जास्त उफाळून येत आहेत. रिमेक आणि चरित्रपट. कारण स्पष्ट आहे. अशीच एक लाट म्हणजे 'दृश्यम'. इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ह्यापूर्वीच्या दृश्यमांत (मल्याळम - द्रिश्यम आणि तमिळ - 'पापनाशम') काम केलं होतं मोहनलाल (मल्याळम) आणि कमल हसन (तमिळ) ह्यांनी. त्यांच्यासमोर हिंदीने उभं केलं आहे 'अजय देवगण'ला. ही तिघांची तुलना अजय देवगणसाठी दुर्दैवी आणि अन्यायकारक होते.

प्रसिद्ध पटकथा-संवाद लेखक जोडी 'सलीम-जावेद' (सलीम खान आणि जावेद अख्तर) ह्यांनी एकदा एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'आमच्या स्क्रिप्ट्स इतक्या बारकाव्यांसकट लिहिलेल्या असतात की दिग्दर्शकाने फक्त जसं लिहिलंय तसं केलं तरी पुरेसं आहे.' हा खरं तर यशाचा उन्माद होता. पण एका अर्थी खरंसुद्धा होतं. शोले, दीवार, जंजीर, शान, डॉन, मजबूर आणि असे सलीम-जावेदचे अजूनही काही चित्रपट पाहताना ती कथानकं गच्च आवळलेली असल्याचं जाणवतंच. मात्र म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिग्दर्शक दुय्यम ठरत नाही. उत्कृष्ट कथानकांची अनेकदा माती होत असते आणि उत्कृष्ट दिग्दर्शक सामान्य कथानकातूनही असामान्य चित्रपट बनवू शकतोच.

मूळ मल्याळम भाषेतल्या 'द्रिश्यम' चा हिंदी रिमेक 'दृश्यम' बघताना मला सलीम-जावेदचं वरील वक्तव्य आठवलं. गच्च आवळलेलं, वेगवान कथानक ज्यात बारीक-सारीक तपशिलांची बऱ्यापैकी काळजी घेतलेली आहे, हे 'दृश्यम'चं वैशिष्ट्य. पण चित्रपट हे तर दिग्दर्शकाचं माध्यम मानलं जातं. मग ह्यात निशिकांत कामतांचं योगदान काय ? कदाचित हेच की त्यांनी त्या कथानकाची माती होऊ दिली नाही. मात्र त्याच वेळी, ते वेगळ्या उंचीवर नेलं का ? ह्या प्रश्नाचं उत्तर अप्रिय असू शकतं.

गोव्यात एका 'पोंदोलिम' नावाच्या लहानश्या गावात विजय साळगांवकर (अजय देवगण) पत्नी नंदिनी (श्रिया सरन) आणि दोन मुलींसोबत राहत असतो. त्याचा केबल टीव्हीचा व्यवसाय असतो. सुस्वभावी विजयचे गावांतल्या सगळ्याच लोकांशी चांगले संबंध असतात, अपवाद भ्रष्ट पोलीस इन्स्पेक्टर गायतोंडे. विजयची एकच वाईट सवय असते. आपल्या केबल टीव्हीच्या ऑफिसात बसून रात्र रात्रभर चित्रपट पाहत बसणे. ह्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो एके रात्री ऑफिसमध्ये टीव्ही पाहत बसलेला असताना, घरी त्याची मोठी मुलगी व पत्नी ह्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडते. साळगावकर कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं. ह्या घटनेतून स्वत:च्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी विजय एक 'प्लान' बनवतो. तो एक कहाणी बनवतो, जगतो आणि इतरांनाही जगवतो. मात्र तरी पोलीस सहजासहजी पिच्छा सोडणार नसतातच. चुघांचीही चौकश्या, दबाव, मारहाण अशी सगळी ससेहोलपट सुरु होते. विजयचा प्लान आणि त्याने त्याच्या बायको-मुलींना केलेल्या सूचना हे सगळं कुठवर यशस्वी ठरतं ?
विजय कुटुंबाला वाचवतो का ? अश्या सगळ्या उत्कांठांनी नटलेलं नाट्य रंगतदार आहे.
घटना खूप वेगाने घडत जातात आणि लहान-मोठे धक्के देत राहतात. पण तरी काही तरी कमतरता जाणवत राहते. ती म्हणजे प्रमुख कलाकार जरा कमीच पडल्यासारखे वाटतात.

'हैदर'मध्ये एका आव्हानात्मक भूमिकेनंतर तब्बू 'दृश्यम'मध्ये 'आय.जी. मीरा देशमुख' च्या भूमिकेत दिसते. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याला साजेशी आक्रमकता आणि कणखरपणा तिच्यात जाणवत नाही. ती पोलीस अधिकारी असली तरी मुलासाठी व्याकुळ झालेली आईसुद्धा आहे, असं म्हणता येईल. पण मग तिच्यातली आईच चित्रपटभर दिसत राहते, 'आय.जी.' दिसत नाही, हेच त्यातून नक्की होतं. तिचा आवाज आणि देहबोली गुळमुळीत वाटते आणि 'तब्बू'साठी चित्रपट पाहत असणाऱ्यांचा तिच्याकडून अपेक्षाभंगच होतो.

तिच्यापेक्षा कमी लांबीची भूमिका असलेल्या रजत कपूरने तिच्या पतीच्या व्यक्तिरेखेला चांगले वठवले आहे. एका दृश्यात जेव्हा तो विजयशी थेट संवाद साधतो तेव्हा एक हळवा बाप आणि खंबीर पती अशी त्याची ओढाताण तो खूप संयतपणे दाखवून देतो. मात्र 'रजत कपूर चांगला अभिनय करतो' ह्यात काही आश्चर्याची गोष्ट नसावीच ! तब्बू आणि तो समोरासमोर असताना काय होतं, हे पाहणं उत्कंठावर्धक होतं आणि लहान-लहान प्रसंगांत तो तिला अगदी सहजपणे पुरून उरला आहे.

आधीच म्हटल्याप्रमाणे 'अजय देवगण'ची तुलना दिग्गजांशी तुलना अपरिहार्यपणे होते. मात्र ते दाक्षिणात्य चित्रपट फार कमी लोकांनी पाहिलेले असावेत, त्यामुळे त्यांच्यासाठी 'विजय साळगावकर' फर्स्ट हॅण्डच आहे. त्याने नावातला एक 'A' कमी केला आहे. भारताचा तेज गोलंदाज उमेश यादवने त्याच्या आडनावात एक 'A' वाढवला आहे. देवगण आणि यादवच्या ह्या 'स्पेल-चेंज'मुळे त्यांच्यात विशेष फरक पडलेला नाही. देवगण आजही 'Director's Actor' आहे.

दिग्दर्शक निशिकांत कामत, जिथे अजय देवगणकडून समाधानकारक कामगिरी करून घेतात तिथे ते इतर पात्रांच्या बाबतीत मात्र थोडेसे कमीच पडतात. दोघी मुली व श्रिया सरनकडूनही काही 'मूल्यवर्धक' कामगिरी करवून घेता आली असती, पण तसं काही होत नाही. वेगवान कथेचा व पटकथेचा तोल ढळणार नाही, इतकीच खबरदारी त्यांनी घेतलेली आहे.

विशाल भारद्वाजच्या संगीताला फारसा वाव नाही. 'कार्बन कॉपी' आणि 'घुटता है दम' ही दोन गाणी लक्षात राहतात. गुलजार साहेबांचे शब्द एरव्हीप्रमाणे काही विशेष जादूभरे वाटत नाहीत, हा अजून एक अपेक्षा भंग.

मूळ कथा जीतू जोसेफ ह्यांची आहे. उपेंद्र शिधये ह्यांनी तिचं पुनर्लेखन केलं आहे. 'दृश्यम' चे खरे स्टार हे दोघं आहेत. जर अख्खा चित्रपट आपण श्वास रोखून पाहिला जाईल, तर तो ह्यांच्यामुळेच. चित्रपट सुरु असताना आपल्याला काही प्रश्न पडतात. थोड्या वेळाने त्या त्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळतात ! 'अमुक एक धागा सुटला', असं वाटत असतानाच अखेरीस सर्व धागे बरोब्बर जुळून येतात. लेखक हा बहुतेक वेळेस 'अनसंग हीरो' ठरत असतो. सलीम-जावेद ह्यांनी चित्रपटांसाठी लेखकाचं महत्व जगाला दाखवून दिलं. पण तरी आजही पडद्यावर दिसणाऱ्या 'दृश्यमा'लाच जास्त महत्व आहे आणि 'अदृश्य' लेखकांची कामगिरी म्हणावी तितकी वाखाणली जात नाही.

एकंदरीत दृश्यम हा 'एकदा पाहावाच' ह्या श्रेणीतला आहे.
जुलै महिना चित्रपट रसिकांसाठी पर्वणी (बाहुबली, बजरंगी, मसान, दृश्यम) ठरला आहे. 'दृश्यम' हा 'जुलै'चा विजयी चौकार म्हणवला जाऊ शकतो.
आता येणारा 'ऑगस्ट' वाढलेल्या अपेक्षांचं ओझं सांभाळतो की त्याची 'तब्बू' होते, ते पाहू !

रेटिंग - * * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०२ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...