Sunday, May 24, 2015

एक आग्रहाचे सहपरिवार निमंत्रण (Movie Review - Tanu Weds Manu Returns)

असं म्हणतात की एका व्यक्तीचे, एकाच आयुष्यात दोन जन्म होत असतात. एक आईच्या पोटातून बाहेर येताना आणि दुसरा घराच्या कोषातून बाहेर पडताना, दुनियेत स्वबळावर, स्वत:च्या पायावर उभं राहाण्याचा प्रयत्न सुरु करताना. पण हे अर्धसत्य असावं. कारण (बहुतेक) लोकांचा अजून एक जन्म होतो. लग्नाच्या नोंदणीपत्रावर सही केल्यावर रजिस्ट्रार मिश्किलपणे हात मिळवत असताना किंवा गळ्यात लग्नाची माला पडताना. डोक्यावर अक्षता पडतेवेळी म्हटलं जाणारं 'शुभ मंगल सावधान' मधलं 'सावधान' म्हणजे खरं तर 'अतिसावधानतेचा इशारा' असतो. भटजी शक्य तितक्या कठोर, रुक्ष आणि उच्चरवात 'सावधान' उच्चारून तो इशारा पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात, हे आंतरपाटाच्या दोन बाजूंना उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना आप्तेष्टांच्या अतीव कौतुकानंदाच्या झगमगाटात समजुन येत नाही आणि त्यांच्या नकळतच त्यांचा तिसरा जन्म होतो. 'अमुक वेड्स तमुक'.
पण कधी कधी ही जन्मशृंखला इथे खंडित होत नाही. एका लग्नाचा अतिशय वाईट अनुभव आल्यावर एखादा हिंमतवान 'मनू' असाही असतो की तो स्वत:च्या चौथ्या जन्माचासुद्धा घाट घालतो. अर्थात त्याला कारणही तसंच असतं.
सांगतो.

तनू (कंगना राणावत) आणि मनू (आर. माधवन) लग्न करून लंडनला स्थायिक होतात. पण लग्नानंतर चारच वर्षांत एकमेकांना नकोसे होतात. भांडणं इतकी विकोपाला जातात की अखेरीस ते वेगळेही होतात. दोघेही परत भारतात आपापल्या 'माहेरी' परततात आणि एक नवीन आयुष्य सुरु करायचा प्रयत्न करतात. लग्नापूर्वीचा स्वत:चा विक्षिप्त आणि बिनधास्त स्वभाव तनूने लग्नानंतरही जपलेला असतोच आणि लग्नापूर्वीचा आपला बुजरा स्वभाव मनू लग्नानंतरही बदलू शकलेला नसतो. सारं काही नव्याने सुरु होणार इतक्यात मनूला 'कुसुम' दिसते. कुसुमचा चेहरा तनूशी खूपच मिळता-जुळता असतो. दिल्ली युनिवर्सिटीत अ‍ॅथलीट कोट्यातून प्रवेश मिळवणाऱ्या हरयाणवी कुसुमशी त्याची ओळख होते, वाढते आणि मनू शादीचा दुसरा लड्डू खाण्याचा निर्णय घेतो.
मात्र रणरणत्या उन्हात घश्याला कोरड पडलेली असताना आणि डोळ्यांची आग होत असताना दूरवर दिसणारा पाण्याचा साठा नुसताच एक आभास असतो किंवा वरवर शांत दिसणाऱ्या पाण्याच्या आत बऱ्याचदा भोवरेही असतात. हा आभास किंवा हे भोवरे तनू आणि मनूला बरंच काही फिरवून, दाखवून आणतात.
फक्त ह्या दोघांनाच नाही, तर ही सफर घडते राजा अवस्थी (जिमी शेरगिल), पप्पी (दीपक दोब्रीयाल), चिंटू (मोहम्मद झीशान अय्युब) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'कुसुम' (कंगना) लाही !

जिमी शेरगिल सहाय्यक भूमिकांचा बादशहा बनत चालला आहे. त्याचा राजा अवस्थी, इतर अनेक चित्रपटांमधल्या त्याच्या ह्याच लांबीच्या भूमिकांप्रमाणेच लक्षात राहतो. खरं तर हा एक चांगला अभिनेता आहे, असं माझं मत. पण चांगल्या, आव्हानात्मक प्रमुख भूमिका त्याला कधी मिळणार आहेत कोण जाणे !

दीपक दोब्रीयालला आपण अनेक चित्रपटांत पाहिलेलं आहे पण लक्षात आलेलं नसेल. 'दबंग - २' मधला गेंदासिंग त्यातल्या त्यात स्मरणात असावा. जुन्या काळात हिरोचा मित्र किंवा भाऊ चित्रपटातला मुख्य कॉमेडीयन असायचा. तो फॉर्म्युला दीपकच्या रुपात इथे परत आला आहे. जबरदस्त टायमिंगच्या जोरावर तो अनेक जागी खळखळून हशा पिकवतो.

'चिंटू'च्या भूमिकेतला मोहम्मद अय्युब दिग्दर्शक आनंद रायच्याच 'रांझणा'त आपण 'मुरारी' म्हणून पाहिला होता. तोच मुरारी नव्या नावाने इथे आला आहे, असं वाटतं. दीपक आणि चिंटू दोघे मिळून प्रेक्षकाला सतत उसळवत ठेवतात !

माधवन त्याच्या टिपिकल शैलीत 'मनू' उभा करतो. समंजस, मितभाषी व मनातल्या मनात धुमसणारा मनू का कुणास ठाऊक माधवनच्या व्यक्तिमत्वास साजेसा वाटत राहतो. संयत अभिनय आणि विश्वासपूर्ण वावर हे माधवनचं अगदी सुरुवातीपासूनचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर तो उत्तम काम करतो, ह्यात नवल असं वाटतच नाही.

कंगना राणावत बिनधास्त तनू आणि हरयाणवी कुसुम ह्या परस्परभिन्न व्यक्तिरेखा जबरदस्त साकारते. खासकरून 'कुसुम'. विना मेकअप आणि पुढे आलेले दात व लहान केस ह्यामुळे अगदी अनाकर्षक दिसणाऱ्या कुसुमबद्दल आपल्या मनातही एक हळवा कोपरा निर्माण होतो, ह्यातच तिचं यश सामावलं आहे. काही ठिकाणी तिचे उच्चार सफाईदार वाटत नाहीत, मात्र ते किरकोळ.

मध्यंतरानंतर जराशी धीमी गती, जरासं भरकटणं आणि शेवटाकडे बऱ्यापैकी रखडणं वगळल्यास 'त.वे.म.रि.' एक अस्सल मनोरंजनाचं पूर्ण पॅकेजच आहे. पूर्ण पॅकेजमध्ये अर्थातच 'संगीत' समाविष्ट नाही. चित्रपटातला 'संगीत' विभाग हा शाळेच्या अभ्यासक्रमातल्या भाषाविषयाप्रमाणे दुय्यम, तिय्यम झालेला आहे. त्यामुळे गाणी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने शांतपणे सोडून देताना मधल्या भागात ढणढणाट होऊन भिरभिरलं नाही, तरी आजकाल मनापासून समाधान वाटतं ! मग लक्षात ठेवण्यासारखं काही नसलं तरी ठीक ! (काय ही वेळ ! सज्जादपासून रहमानपर्यंत सगळ्यांची हात जोडून क्षमा मागतो !)

खुसखुशीत संवाद आणि अनेक परिस्थितीजन्य विनोदांना पडद्यावरील कलाकारांच्या उत्तम टायमिंगची जोड मिळाल्याने धमाल येते. भावनिक दृश्यंही अतिरंजन न करता खूपच संयतपणे हाताळली असल्याने एकंदरीतच, जरी कथा बऱ्याच योगायोगांवर आधारित असली तरी, बाष्कळपणा व पांचटपणा कुठेच वाटत नाही.

दिग्दर्शक आनंद राय ह्यांचे विशेष अभिनंदन ह्यासाठी करायला हवे की फार क्वचित एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा जास्त चांगला जमून येतो आणि तेच इथे झालं आहे. किंबहुना, पहिला भाग पाहिला नसला तरी दुसरा पाहताना काही विशेष फरक पडत नाही. पात्रांची पूर्वीची ओळख एखाद-दोन संवादांतून लगेच होऊन जाते आणि वेगवेगळ्या प्रसंगांतील वेगवेगळे संदर्भ नकळतच आपण जोडतो आणि सगळी पार्श्वभूमी लगेच लक्षात येते. उदा. चिंटू तनूला म्हणतो, 'सूना हैं दो-दो बारातें आयी थी आपकी शादी में. गोली-वोली भी चल गयी थी !' आणि जरा वेळाने राजा अवस्थीची 'एन्ट्री' होते त्यावेळी तो तनूला म्हणतो, 'आपसे दिल हटाया तो पूजा-पाठ में लगाया !' लगेच कनेक्शन जुळतं की दुसरी बारात राजा अवस्थीची होती आणि त्याच्या एकंदर आविर्भावावरून गोळी का व कशाला चालवली गेली असेल, हेही उलगडतं.

थोडक्यात, 'तनू वेड्स मनू' रिटर्न येण्याचं प्रयोजन सफल झालं आहे, असं म्हणण्यास हरकत नसावी. दोन अडीच तासांचं ग्यारंटीड मनोरंजन आणि तेही वास्तव व सभ्यतेच्या सर्व मर्यादा पाळून, ह्याहून अधिक काय हवं असतं आपल्याला ?
त्यामुळे ह्या चौथ्या पुनर्जन्माच्या कौतुकानंदसोहळ्यासाठी सर्वांना आग्रहाचे, सहपरिवार निमंत्रण ! अवश्य येणे करावे. अहेर वा पुष्पगुच्छ न आणता पॉपकॉर्न व सॉफ्ट ड्रिंक्स आणावीत.

रेटिंग - * * * १/२


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२४ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-



No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...