Saturday, September 22, 2012

हलकट जवानी - बोरिंग कहाणी - (Heroine Movie Review)

आजची तुमची जी स्वाक्षरी आहे, ती पूर्वी कशी होती ? आठवतं ? माझ्या बाबतीत सांगतो. माझ्या स्वाक्षरीत माझ्या नावाचं संक्षिप्त स्वरूप होतंच, पण ते प्रत्येक अक्षर अगदी सुस्पष्ट नाही, तरी हलक्यानेच पण असायचं. नंतर, रोज रोज तीच स्वाक्षरी करता करता काही अक्षरं आपोआपच पुसट-पुसट होत जाऊन, आज तर त्यांची जागा सरळ रेषेनेही घेतली आहे !
एखादा पार्श्वगायक, त्याचं एखादं अत्यंत गाजलेलं गाणं त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात गात असतो. वारंवार तेच ते गाणं गाता गाता त्या गाण्यातील काही जागा तो जरा 'हलक्यानेच' गायला लागतो. हे तुम्हाला कधी जाणवलं आहे का ?
थोडक्यात काय... तर एकच कृती तुम्ही वारंवार करत असाल तर त्या कृतीत एक सफाई येते आणि सफाईदारपणे तीच कृती वारंवार करता करता त्यात शॉर्ट-कट्स येतात.. परिपूर्णता ओलांडल्यानंतर परिपूर्णतेचा आभास येऊ लागतो.
'हिरोईन' पाहिल्यावर दिग्दर्शक मधुर भांडारकर ह्याच आभासापर्यंत पोहोचला आहे, असं जाणवलं. पेज थ्री, कॉर्पोरेट, सत्ता, चांदनी बार, फॅशन सारख्या सिनेमांतून त्या-त्या आयुष्याची, समाजाची गडद बाजू(च) रंगवणारा हा दिग्दर्शक 'हिरोईन'मध्येही चंदेरी दुनियेची गडद बाजू(च) रंगवायचा एक प्रयत्न करतो, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्याच आधीच्या काही सिनेमांची प्रेरणा आणि 'डर्टी पिक्चर'चा प्रभाव दाखवत राहतो.  

'माही अरोरा' (करीना) एक प्रस्थापित 'हिरोईन' - अभिनेत्री नव्हे, 'हिरोईन'च. चेन स्मोकर, दारुडी आणि मानसिकरीत्या अस्थिर. माहीच्या सिनेक्षेत्रातील कारकीर्दीमधील उच्चपदापासून उतरणीच्या काळाला चित्रित करणारा हा सिनेमा. अगदी अपेक्षित घटनाक्रमांच्या कमजोर कुबड्यांचा आधार घेत हा प्रवास आपल्यासमोर मांडला जातो. विवाहित, पण घटस्फोट होऊ घातलेल्या एका सुपरस्टारसोबत (आर्यन - अर्जुन रामपाल) प्रेमप्रकरण, त्यांचे शारीरिक संबंध, मग पार्टीतील विक्षिप्त वर्तणूक, नशेतील तमाशे, मग 'ब्रेक-ऑफ', मग आघाडीच्या क्रिकेटपटूशी लफडं, नंतर त्याच्याशी ब्रेक ऑफ, कारकीर्दीची घसरण, इतर सहकलाकारांशी रस्सीखेच आणि एकमेकांवर कुघोडी करण्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत खाली उतरणं असं सगळं होत होत अखेरीस हा सिनेमा एका अत्यंत अस्वीकारार्ह शेवटाला पोहोचतो, तेव्हा प्रेक्षकाला पावणे तीन तास वाया गेल्याची पक्की पावती मिळते.

सलीम- सुलेमान ह्यापेक्षा वाईट संगीत देऊ शकतील, असं मला तरी वाटत नाही. शीर्षक गीत तर इतकं बंडल आहे की सुरुवातीलाच डोकं फिरावं ! 'धूम'च्या चोरलेल्या धूनवर बेतलेल्या धूनचं बहुचर्चित 'हलकट जवानी' सुद्धा अगदीच पिचकवणी. 'सांईया रे..' हे एकच गाणं त्यातल्या त्यात सुसह्य वाटलं आणि कानांवर अत्याचार झाला नाही.

'दिल तो बच्चा हैं..' डब्ब्यात गेल्यावर कदाचित मुद्दाम आपल्या 'होम पीच'वर येण्याचा मधुर भांडारकरचा हा प्रयत्न त्याच्या दरज्याला अनुरूप वाटतच नाही.

राहता राहिला प्रश्न खुद्द 'हिरोईन'चा. तिच्यावर सारी मदार येते. ह्या व्यक्तिरेखेत मूलभूत असलेल्या हळवेपणामुळे ती बऱ्यापैकी छाप सोडते. पण अधिक विचार केल्यास, करीनाच्या अभिनयात तिच्या धूम्रपान आणि मद्यपानाचा महत्त्वाचा 'रोल' आहे. ते वगळल्यास ती काही विशेष चमक दाखवत नाही. जो काही परिणाम साधला जातो, तो त्या व्यक्तिरेखेमुळे व गेट-अपमुळे, असं मला वाटलं.

कधी कधी अतिविचार केल्यानेसुद्धा काम फिसकटतं, अति-प्रयत्न केल्यानेही नेमका उलट परिणाम साधला जातो, कदाचित तसं काहीसं ह्या 'हिरोईन' चं झालं असावं. ह्यात कुठलाही Casual दृष्टीकोन नसावा असं म्हणून मी माझ्या मनाची समजूत घालून मधुर भांडारकरला क्षमा करतो आणि लौकरात लौकर सावरण्याची शुभेच्छा देतो. 

रेटिंग  - *१/२ 


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...