Showing posts with label चित्रपट विषयक. Show all posts
Showing posts with label चित्रपट विषयक. Show all posts

Monday, February 17, 2025

छावा : आवर्जून पाहावा ! - (छावा / Chhaava - Movie Review)


राजन तुम हो साँच खरे, खूब लढे तुम जंग   
देखत तव चंड प्रताप जही, तखत त्यजत औरंग !

कवी कलशाने संभाजी महाराजांना उद्देशून लिहिलेल्या ह्या ओळी. शंभूराजेंनी बुरहानपूर लुटल्यावर संतापलेल्या औरंगजेबाने ही प्रतिज्ञा केली होती की, 'जोपर्यंत संभाजीचा अंत करणार नाही, डोक्यावर ताज ठेवणार नाही.' संगमेश्वरला शंभूराजे, कवी कलश आणि इतर काही लोकांना कैदेत घेतलं गेलं आणि त्यांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं त्या वेळी खुदाचे आभार मानत आलमगीर आपल्या सिंहासनावरून उठून खाली आला. ते पाहून वरील ओळी कवी कलशाने उत्स्फूर्तपणे उच्चारल्या, असं म्हटलं जातं. काही ठिकाणी ह्या ओळी वेगळ्याही आहेत. पण मुद्दा हा की जेव्हा औरंगजेब आसन सोडून खाली आला आणि कैद केलेल्या संभाजी व कवी कलशाच्या समोर आला, तेव्हा कलशाने जखमी व जखडलेल्या अवस्थेत, मृत्यू समोर दिसत असतानाही आपलं शीघ्रकवित्व तर गमावलं नाहीच पण त्यासोबतच त्याच्यातला खमकेपणा, शंभूराजेंवरची आदर व प्रेमयुक्त निष्ठा आणि खोचक चिमटे काढणारी विनोदबुद्धीही गमावली नाही. औरंगजेबाच्या तोंडावर त्याला खिजवणाऱ्या आणि आपल्या राजाचे गुणगान करणाऱ्या ओळी फेकून मारायची ही जी गुस्ताखी कलशाने केली त्यामुळे चवताळून औरंगजेबाने कलशाची जीभ छाटायचे फर्मान सोडले. त्यावर तत्क्षणी अंमलही झाला. 
'छावा'मध्ये हे दाखवलेलं नाहीय. खरं तर बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. आता इतिहास हा विषयच असा आहे की त्याची एकाहून अनेक versions आहेत. त्यात खरं-खोटं करण्याइतका अभ्यास माझा तरी नाही. मात्र आजवर जितकं ऐकलं त्यावरून तरी माझा समज हाच होता की सर्वात आधी कलशाची जीभ छाटली गेली, मग शंभूराजेंचीही जीभ छाटली. मग दोघांचे डोळे फोडले. अंगावरची कातडी ओरबाडून सोलली. त्यावर मीठ चोळले. हे सगळं करत असताना त्यांची धिंडही काढली गेली. सरतेशेवटी दोघांचा शिरच्छेद करून ठार मारले. औरंगजेबाच्या क्रूरपणाचा हा सगळा नंगानाच जवळजवळ दीड-दोन महिने सुरु होता. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ३-४ दिवसांत उरकला नव्हता. शंभूराजेंचा औरंगजेबाशी संघर्ष अनन्यसाधारण महत्वाचा आहे. पण त्याव्यतिरिक्तही त्यांच्या ९-१० वर्षांच्या छोट्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे टप्पे आहेत. गोव्याच्या पोर्तुगीजांवर केलेलं आक्रमण हा तर साफ आणि अक्षम्य दुर्लक्ष केलेला भाग आहे. पोर्तुगीजांनी गोव्यात केलेले अत्याचार हा इतिहास कधीच कुठे ऐकायला, वाचायला मिळत नाही. ह्या अत्याचारांवर वचक बसण्यासाठी शंभूराजेंनी गोव्यावर चाल केली होती. ते आक्रमण इतकं तिखट होतं की पोर्तुगीजांची पाचावर धारण बसली होती आणि त्यांनी त्यांच्या देवाला नवस बोलून मदत मागायला सुरु केलं होतं. इतक्या महत्वाच्या भागाचा साधा उल्लेखसुद्धा 'छावा'मध्ये येत नाही.  
शंभूराजेंची जडणघडण लहानपणापासून झाली होती. आग्र्याहून पलायन, त्यानंतर काही वर्षं एक प्रकारचा अज्ञातवास. तोही असा की सगळ्या मुलुखात त्यांच्या मृत्यूची बातमी फिरवली गेली होती. मग काही वर्षांनी सुखरूप घरी पोहोचलेला युवराज संभाजी. आग्र्याला जाताना छोटं पोरगं होतं, परत आला तेव्हा अक्षरश: बारा गावाचं पाणी पिऊन, दुनियादारी पाहून, शिकून आणि तावून-सुलाखून कणखर बनलेला एक तरुण युवराज. हा प्रवास किरकोळ नाही, ही जडणघडण अदखलपात्र नाही. त्यानंतरच्या त्यांच्या आयुष्यात त्यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यापर्यंतच्या घडलेल्या घटना संदिग्ध आहेत. त्यावर वादविवाद होऊ शकतात म्हणून त्या टाळल्या, समजू शकतो. पण बाकीचं ?   

अर्थात, एखाद्या ऐतिहासिक महापुरुषाची कहाणी सिनेमात दाखवायची तर बरेच शॉर्ट कट्स मारावेच लागतील. अन्यथा इतका मोठा पसारा दोन-अडीच तासात बसणारच कसा ? पण मग, जर बाहुबलीसारखी संपुर्णपणे कपोलकल्पित आणि अचाट व अतर्क्य कहाणी ह्याच देशात दाखवताना बिनधास्त दोन भागांत दाखवण्याची हिंमत करून ते यशस्वीही करून दाखवलं जातं; तर ह्या खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक महापराक्रमांची गाथा सांगताना सगळं एकाच सिनेमात कोंबायची गरज काय आहे ? 
शिवाजी महाराज असोत वा शंभूराजे, दोघांपैकी कुणाचीही कहाणी औरंगजेबाच्या कहाणीशिवाय पूर्ण होत नाही. कारण औरंगजेब हा नीच, हलकट होता हे समजण्यासाठी त्याची ती कहाणी जाणणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्याच्याविरोधात महाराज आणि शंभूराजे का ठाकले होते, हे कळणार नाही. शिवरायांचं तरी एक वेळ जरा वेगळं आहे. त्यांच्या साधारण अर्ध्या कारकीर्दीनंतर औरंगजेबाशी त्यांचा सामना झाला असावा. पण शंभूराजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत औरंगजेबाशी लढले आहेत. हा औरंगजेबही 'छावा'मध्ये पूर्ण मांडला जात नाही. मूळ पुस्तकातही नाहीय. पण मूळ पुस्तकाशी तर अशीही बरीच फारकत घेतलेली आहेच. इथे एक सिनेमाची कहाणी म्हणून, ती व्यक्तिरेखा मांडणं आवश्यक होतं. तसं होत नाही. अक्षय खन्ना अप्रतिम काम करतो. पण व्यक्तिरेखाच अपुरी लिहिली गेल्याने त्यात खूप उणीव जाणवतेच. म्हणूनच मग असं वाटतं की अगदी सहजपणे औरंगजेबाचं दख्खनला येण्यापर्यंत एका भागात आणि त्यापुढे दुसऱ्या भागात असं हे कथानक मांडता आलं असतं का ?

असाच 'करता आलं असतं का' वाला अजून प्रश्न अनेकांनी आधीच मांडला आहे, मीही मांडतो. तो म्हणजे 'सिनेमाचे संगीत'. इथे ए. आर. रहमान इतका कमी पडला आहे की त्याच्याऐवजी दुसरा कुणी घेता आला असता का, हा प्रश्न पडतोच. वैयक्तिक सांगायचं तर रहमानचं संगीत मला पहिल्यांदा नावडलं आहे, असं अजिबात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा कंटाळा आलेला आहेच. पण छावा मात्र सगळ्यांच्या वर कडी आहे. पार्श्वसंगीत कानावर आदळत असताना अधूनमधून तर मला चक्क असं जाणवलं की हे ह्यांनी 'सिंघम अगेन' मधून कॉपी+पेस्ट केलं आहे की काय ! खास करून ते एक 'नरसिंघा..' का कायसं भयाण आरडाओरडा असलेलं गाणं(?) (किंवा पार्श्वसंगीत(?) जे काही आहे ते) तर 'सिंघम अगेन'मधल्या 'सिंघा..'चीच नक्कल वाटतं. रहमान आणि मेलडी ह्यांचं फार जवळचं नातं कधीच नव्हतं. पण ह्या नात्यात इतका प्रचंड दुरावाही कधी जाणवला नव्हता. एकंदर संगीत म्हणजे सुमार म्हणायच्याही लायकीचं नाहीय. काही वेळी तर ह्या ढणढणाटात संवादही नीट समजून येत नाहीत. शिवराय, शंभूराजे हे जिव्हाळ्याचा विषय आहेत आणि आपल्याकडच्या सिनेमात संगीताचा भाग अतिशय महत्वाचा असतो. इथे म्हणूनच एखादा असा संगीतकार हवा होता ज्याच्या गाण्यांत, संगीतात, चालबांधणीत यांत्रिकपणा कमी आणि एक 'ह्युमन टच' जास्त असेल. जो रहमानच्या संगीतात क्वचित असतो. त्यात त्याला संगीताचा मराठी बाजही अजिबात पकडता आलेला नाही. त्याच्यावर असलेली दाक्षिणात्य आणि सूफी संगीताची छाप काही केल्या पुसली जातच नाही. ह्यासाठी दिग्दर्शकही तितकाच जबादार मानायला हवा. त्याचा व्हिजन तो संगीतकारापर्यंत पोहोचवू शकला नाही, हे नक्कीच. 

अजून दोन गोष्टी खटकल्या त्या म्हणजे:
१. मराठे चिलखत, शिरस्त्राण वगैरे आपादमस्तक लोखंडी युद्धपोशाख घालून लढत असत, ह्यावर मला संशय आहे. माझ्या माहितीनुसार मराठे चपळ, काटक होते. त्यांचा वेग जबरदस्त होता. कारण युद्धपोशाखाविना ते light weight असत. म्हणूनच ते नेहमी खिंडी, डोंगराळ भागांत शत्रूला गाठत असत. दुसरं अजून एक वैशिष्ट्य होतं. दोन्ही हातांत हत्यारं घेऊन लढणे. दोन्ही हातांत तरवारी किंवा दांडपट्टा घेऊन लढणारा एकही मावळा मला अख्ख्या सिनेमात दिसला नाही. 
२. कवी कलशाला 'छंदोगामात्य' अशी उपाधी शंभूराजेंनी दिली होती. विकी कौशल ह्याचा उच्चार कायम 'चंदोगामात्य' किंवा 'चंडोगामात्य' असा करतो. Hopefully हा माझ्या ऐकण्याचा दोष असावा किंवा दणदणाटी पार्श्वसंगीतात नीट समजलं नसावं. 

हे सगळं झालं जे खटकलं, नावडलं ते सगळं. मुद्दामच आधी मांडलं. आता मी मुख्य भागाकडे वळायला मोकळा !

छावा !
शंभूराजेंचं आयुष्य कायम संघर्षाचं होतं. शिवरायांचंही तसंच. राजपुतान्यातल्या राजांसारखे हे दिवाणखान्यात पसरून कधीच हुक्के पीत बसले नव्हते. चोहोबाजूंनी शत्रूंच्या घेऱ्यात असलेल्या मराठी स्वराज्यासाठी 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' अशीच परिस्थिती नेहमी होती. त्यात शंभूराजे बालवयात घरापासून दूर, एकटे राहिले. त्यांचं आयुष्य पराकोटीच्या शक्याशक्यतांनी आणि अतिशयोक्तीने भरलेलं आहे. ह्या महापुरुषांची कहाणी सांगताना सतत थरार, वेग हवा. ठाय नव्हे, द्रुत लय हवी आणि सिनेमाचा सूर खर्जाचा, ठहराववाला नाही, टिपेचा हवा. 'छावा'ने हा सूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पकडला आहे. अगदी सिंहासोबतची जी झुंज दाखवली आहे त्यातही आणि बसल्या खुर्चीत अक्षरश: अस्वस्थ करणाऱ्या संगमेश्वरच्या युद्धचित्रणातही. 
सिनेमाची सुरुवात बुरहानपूरच्या लुटीपासून होते आणि शेवट कुठे होणार आहे, हे आपल्याला माहित असतंच. पण हा जो इथून तिथपर्यंत जायचा प्रवास आहे, ह्यात काही हातचं तर राखलं जात नाही ना ? ही भीती छावा फोल ठरवतो. Chhava breaks all the stereotypes ! मुघलांच्या थोरवी गाणाऱ्या निर्लज्ज बॉलिवूड सिनेमांच्या भाऊगर्दीत छावा वेगळा ठरतो. ह्याआधी तान्हाजीनेही हे वेगळेपण दाखवलं पण त्यातला भडकपणा आणि उथळपणा इथे नाहीय. विकी कौशलने ही व्यक्तिरेखा साकारताना संभाजी समजून घेतला आहे. नुसतंच बॉडी बनवून, दाढी वाढवून आणि गेटअप करून ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याचा भंपकपणा इथे नाही. 
ऐतिहासिक सिनेमा म्हणजे भव्य सेट्स, चकचकीत पोशाख, दागदागिन्यांची रेलचेल; ह्याही stereotype ला छावा तोडतो. मुघल असो वा मावळे, इथे अनावश्यक दिखावे आणि देखावे नाहीत. जिथे जे जितकं आवश्यक आहे तितकंच. बादशहाचा दरबार दाखवायचा आहे, तर बादशहाचा दरबारच दाखवला आहे. तो कुठल्या महालात आहे, त्यात किती झुंबरं लटकतायत ह्याचा इथे काहीही संबंध नाहीय, दाखवलं नाही. शंभूराजे स्वप्नात शिवरायांचा आवाज ऐकतायत, लहान वयाचा शंभू अंधाऱ्या गुहेत अडकला आहे. हे स्वप्न पाहताना ते दचकून जागे होतात. तेव्हा शंभूराजे दिसले पाहिजेत, त्यांच्या शयनगृहाला खिडक्या किती, त्याची उंची किती हे सगळं अजिबात गरजेचं नाहीय, दाखवलेलं नाहीय. 

एक मोठा कालखंड हा सिनेमा अडीच तासांत दाखवतो. त्यासाठी काही सिनेमॅटिक लिबर्टी घेतो, काही भाग गाळतो पण जो दाखवला आहे त्याच्याशी होता होईल तितकं प्रामाणिक राहण्याचा प्रामाणिक प्रयत्नसुद्धा करतो. सोयराबाईंसोबत मिळून अण्णाजी दत्तो व इतरांनी केलेले कारस्थान दाखवलं जातं आणि शिर्क्यांनी केलेला विश्वासघातही. हंबीरराव मोहितेंचा शंभूराजेंवर असलेला प्रभाव दाखवला जातो आणि कवी कलशासोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंधही. स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या मुघलांना भिडणारा रासवट संभाजी इथे जसा दिसतो तसाच येसूबाईंच्या सहवासात हळवा होणारा त्यांचा पती आणि 'श्रीसखा'ही. 
सिनेमात अनेक लहानमोठ्या लढाया आहेत. मात्र अखेरची जी संगमेश्वरची लढाई आहे तिचा विशेष उल्लेख करायलाच हवा. लढाईचं असं, इतकं अंगावर येणारं उत्कट चित्रण मी आजतागायत आपल्याकडे कुठल्याच सिनेमात पाहिलेलं नाही. थोडं विचित्र वाटेल पण 'गेम ऑफ थ्रोन्स' पाहिलेल्यांना त्यातलं Battle of the bastards आठवल्याशिवाय राहणार नाही, असं हे चित्रण झालेलं आहे. हजारो लोक एका बंदिस्त जागेत घुसून एकमेकांशी लढतायत. त्यांच्यात चेंगराचेंगरी होतेय. त्यांच्या तलवारी कुठे, ढाली कुठे, एक हात कुठे, दुसरा कुठे.. मेलेले खाली पडतायत त्यांच्यात पाय अडकून जिवंतही पडतायत आणि हे सुरु असताना अजून लोक आत शिरतच आहेत. हा सगळा भयंकर कल्लोळ खुर्चीच्या टोकावर आणतो. तिथल्या सैनिकांना पाहून आपला बसल्या जागी श्वास कोंडतो, पाहूनच गुदमरल्यासारखं होतं. 
एकंदरीत हा जो शेवटचा साधारण पाऊण तासाचा सिनेमा आहे तो (चांगल्या अर्थी) असह्यपणा गाठतो. हा पाऊण तास कुणाही नर्मदिल माणसासाठी नाहीय. (थिएटरमध्ये माझ्या बाजूला बसलेला भगवा टिळा लावलेला मुलगा तोंडावर हात ठेवून मुसमुसत होता.) हा एक प्रकारचा crescendo आहे. तो गाठण्यात अनेकांचा सहभाग आहे. 

शंभूराजे औरंगजेबाच्या कैदेत गेले हे समजल्यानंतरची येसूबाई आणि एक-एक घाव सहन करणारे शंभूराजे एकत्र 'जगदंब जगदंब' म्हणतात; ह्याचा फार वेगळाच प्रभाव पडतो. रश्मीका मंदानाला येसूबाईंच्या भूमिकेत मर्यादित वाव आहे, पण त्यात ती छाप सोडते. तिने येसूबाईंचं दु:ख आणि बेचैनी दाखवताना अगदी अखेरच्या प्रसंगांतसुद्धा महाराणीपणाचा आब व्यवस्थित राखला आहे. संपूर्ण सिनेमात तिच्या वागण्या बोलण्यात जितका लाघवीपणा आहे, तितकाच घरंदाजपणासुद्धा. तिने केलेलं काम हा सुखद आश्चर्याचा धक्काच आहे 
कवी कलश हे एक खरं तर गुंतागुंतीचं पात्र आहे. हा माणूस ब्राह्मण आहे आणि कवीही आहे; पण असं असूनही एक पराक्रमी शूर योद्धाही आहे ! ह्याचं ह्या स्वराज्यभूमीशी जन्माचं नातं नाही. हा आहे उत्तरेकडचा. तो इथे आला आग्र्याहून महाराजांनी जे शिताफीने पलायन केलं तेव्हा. पण तरी तो ह्या भूमीसाठी, स्वराज्यासाठी आणि शंभूराजेंसाठी प्राणांची आहुती द्यायला तयार आहे. एकाच वेळी भावुक आणि रुद्र, उग्र असलेलं हे पात्र विनीत कुमार सिंगने ताकदीने साकार केलं आहे. इथेही कुठला टाळीबाज आवेश नाही पण जितके त्याचे शब्द बोलतात तितकेच त्याचे डोळेही बोलतात. शंभूराजेंसोबत अखेरच्या क्षणांत केलेला काव्यमुकाबला त्या प्रसंगाची उत्कटता किती तरी पट उंच नेतो. 




अक्षय खन्नाने जेव्हा जेव्हा नकारात्मक भूमिका केली आहे, तेव्हा तेव्हा त्याने केवळ कमाल केलेली आहे. त्याचा औरंगजेबाचा गेट अप मस्त जमून आला आहे आणि त्या गेट अपला तो ज्या सहजतेने वागवतो त्याला तोड नाही. चेहराभर केस आहेत आणि केवळ डोळ्यांतून भाव व्यक्त करायचे आहेत. त्यातही ते डोळे व्यक्तिरेखेशी साजेसे म्हणून मिचमिचे आहेत आणि पाठीला जरासा बाक असल्याने मानही थोडी खाली झुकलेली आहे. पण त्या तेव्हढ्या तिरक्या नजरेतही तो कधी जरब दाखवतो, कधी क्रौर्य तर कधी हताशाही. शिवरायांच्या मृत्यूची बातमी कळल्यावर 'या खुदा, जन्नत के दरवाजे खुले रखना. शेर आ रहा हैं' असो किंवा कवी कलशाच्या पंक्ती ऐकल्यावर अगदी निर्ममतेने 'मजा नहीं आया' असो, त्याचे संवाद अगदी समेवर थाप पडल्यासारखे आहेत. त्याचा हा परफॉर्मन्स बराच काळ लक्षात राहील. 
हंबीररराव मोहितेंच्या भूमिकेत आशुतोष राणा, औरंगजेबाचा मुलगा मिर्झा अकबर म्हणून नील भूपालम, सोयराबाई म्हणून दिव्या दत्ता, रायाजी शिंदे म्हणून संतोष जुवेकर, औरंगजेबाची मुलगी झीनत म्हणून डायना पेंटी हे सगळेच आपापलं काम व्यवस्थित निभावतात. आशुतोष राणाला बाकी सहाय्यकांपेक्षा थोडा जास्त वाव मिळाला असेल म्हणून का असेना पण तो लक्षात राहतो. 




ट्रेलर आला तेव्हा त्यातलं विकी कौशलचं 'पार्वती पतये हर हर महादेव..' ऐकून फार जबरदस्त वाटलं होतं. ते थिएटरमध्ये ऐकतानाही तितकंच भारी वाटतं. पण हा प्रसंग विकी कौशलच्या कामाचा कळस नाहीय. किंबहुना, त्याचं काम अथपासून इतिपर्यंत एकाच प्रभावीपणे इतकं अप्रतिम झालं आहे की कोणताही एक प्रसंग वेगळा काढून, 'हा सगळ्यात भारी' असं म्हणता येणार नाही. वर म्हटल्याप्रमाणे त्याने शंभूराजे साकारताना केवळ त्यांच्यासारखी वेशभूषा केलेली नाहीय. त्याच्या कामात एक प्रामाणिकपणा दिसतो. हे जाणवतं की त्याने ह्यासाठी काही मेहनत घेतली आहे, काही अभ्यास केला आहे. त्याने शिवाजी आणि संभाजी समजून घेण्याचा  निदान प्रयत्न तरी नक्कीच केला आहे. अगदी पहिल्या सिनेमापासून (मसान), उरी असो वा सॅम बहादूर किंवा 'संजू'ही, विकी कौशल नियमितपणे उत्तम काम करत आला आहे. तो छावा उत्तम करेल, ह्याविषयी मला अजिबात शंका नव्हती आणि तो अजिबात निराशही करत नाही. उलट अपेक्षा अजून उंचावतो. संभाजी-शिवाजी, संभाजी-हंबीरराव, संभाजी-येसूबाई, संभाजी-कलश आणि संभाजी-औरंगजेब ही सगळी समीकरणं परस्परभिन्न आहेत. त्याने ती सगळी नीट समजून घेतली आहेत. 

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरचा मी ह्या आधी फक्त 'मिमी' पाहिला आहे. विशेष वाटलं नव्हता. मात्र 'छावा' करत असताना त्याने मॅग्नम ओपस असल्याप्रमाणे काम केलेलं आहे. अनेक गोष्टी मला खटकल्या आहेत, त्या वर सविस्तर मांडल्या आहेतच. सिनेमा अजूनही खूप उंचीवर जाऊ शकला असता, पण जे केलं आहे तेही नसे थोडके. 'छावा'ने अनेक पायंडे मोडले आहेत. पडद्यावर हिंसा दाखवताना भडकपणा आणि प्रभावीपणा ह्यात असलेलं अगदी एका धाग्याचं अंतर सहजपणे पार केलं जातं. इथे दाखवलेली हिंसा मला भडक वाटली नाही पण ती पाहत असताना मी निर्विकारही राहू शकलो नाही. मूळ पुस्तकातील कहाणीत आणि काही ठिकाणी इतिहासातही थोडेफार बदल केलेले असले तरी जे दाखवलं आहे त्यावर ते दाखवणाऱ्याची पकड आहे, हे लपत नाही. ही पकड हेही एक 'छावा'चं यशच आहे !

अखेरीस, बाजीराव-मस्तानी आला तेव्हा लोक म्हणत होते की कसंही हास्यास्पद दाखवलेलं असो पण त्या निमित्ताने लोकांना इतिहासाची ओळख होते, ते त्याविषयी माहिती घेऊ पाहतात, हे महत्वाचं आहे. 
नाही. 
लोकांना इतिहासाकडे आकर्षित करण्यासाठी, त्याची आठवण किंवा ओळख करून देण्यासाठी त्याचं विकृतीकरण, विद्रूपीकरण किंवा त्याचं भ्रष्ट सादरीकरण करणं अजिबात गरजेचं नाहीय. त्यासाठी 'छावा'सारखे सिनेमे येत राहणं गरजेचं आहे. 
मराठ्यांच्या समग्र इतिहासात असंख्य कहाण्या आहेत ज्यांवर एकाहून एक सिनेमे बनू शकतील. आजची पिढी, जिला 'कोण संभाजी' हाही प्रश्न पडू शकतो त्यांच्यासाठी हा इतिहास एक कहाण्यांचं भांडार आहे. त्यांच्यासाठी हे खुलं करायला हवं. असे अजून सिनेमे बनायला हवे.

जय भवानी !

- रणजित पराडकर 

Tuesday, May 19, 2020

एका 'नोबडी'चं पाताळदर्शन ! - पाताळ लोक (Web Series Review - Paatal Lok - Amazon Original)


ह्या जगाच्या अतिप्रचंड पसाऱ्यात असंख्य लोक आपापली थोडीथोडकी जागा पकडून आहेत. हे लोक कधी आले, कुणाला समजलं नाही. हे कधी जातील, कुणाला कळणारही नाही. ह्यांची कुणीही कधीच नोंद घेतलेली नाही, घेणारही नाही. ह्यांच्यासाठी रोजचा दिवस हळूहळू करत मावळण्यासाठीच उगवत असतो. ह्या उगवतीपासून मावळतीपर्यंत दरम्यानच्या काळात हे लोक एकच एक दिवस पुन्हा पुन्हा जगतात. मालकाने पाठीवर लादलेल्या ओझ्याला गपगुमान मान खाली घालून वाहून नेणाऱ्या गाढवाप्रमाणे हे लोक परिस्थितीने पाठीवर लादलेल्या जबाबदाऱ्यांना आयुष्यभर मान खाली घालून गपगुमान वाहून नेत राहतात. फरक इतकाच की ह्यांचा प्रवास वर्तुळाकार असतो. गोल गोल फिरत राहतात. आयुष्यभर मरमर, वणवण करूनही ते कुठेही पोहोचत नाहीत. जिथून सुरुवात झालेली असते, तिथेच पुन्हा पुन्हा येत राहतात. बहुतेकदा ही व्यवस्था त्यांनी स्वीकारलेली असते आणि ह्या सत्याशी मनापासून जुळवून घेऊन ते समाधानीही असतात. 
पण एखादा 'हाथी राम चौधरी' असतो, ज्याला एक संधी मिळते, नेहमीची वाट बदलून स्वतःचा परीघ बदलायची. ही बदललेली वाट बिकट असते, तिथून जाण्यासाठी, चालत राहण्यासाठी खूप किंमत मोजायला लागणार असते. पण किती, हे त्याला सुरुवातीला माहीत नसतं. मात्र हळूहळू त्याच्या मनाची तयारी होते आणि तो आव्हान स्वीकारतो. एखाद्या मुंगीचं निरर्थक आयुष्य जगणारा 'हाथी राम' हत्ती बनतो आणि निबिड जंगलात बिनधास्त घुसतो. पुढे जे व्हायचं ते होतंच. 

दिल्लीच्या एका किरकोळ पोलीस ठाण्यातला फुटकळ केसेस करण्यात करियर गेलेला एक किरकोळ इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी (जयदीप अहलावत). त्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घटना घडते. नावाजलेला आणि वादप्रिय टीव्ही पत्रकार संजीव मेहरा ह्याच्या हत्येच्या कट उधळला जाऊन चार मारेकऱ्यांना हत्यारांसह पकडलं जातं. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून हा कट उधळला जातो आणि ही एक 'ओपन अँड शट' केस त्याच पद्धतीने हाताळण्यासाठी वरिष्ठांसमोर हाथीरामसारखा कर्तृत्वशून्य अधिकारी अनायसेच येतो. मोठी नावं जोडलेली एक 'हाय प्रोफाईल' केस प्रथमच हाथीरामला मिळते आणि तोही मोठ्या उत्साहाने ही केस 'ओपन अँड शट' करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम सुरु करतो. मात्र लौकरच त्याला ह्या केसला अजून काही कंगोरे असल्याचं जाणवतं आणि तो अजून खोलात शिरायचा प्रयत्न करतो. खोलात जाणारा हाथीराम कुठे कुठे पोहोचतो, त्याच्या हाताला काय काय लागतं, त्याला काय काय किंमत मोजायला लागते आणि सरतेशेवटी हा सगळा प्रकार त्याला कुठे पोहोचवतो, ह्या केसचं खरं रूप काय असतं, अश्या अनेक उत्कंठा ताणणारी 'पाताल लोक' सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देते. 

'जयदीप अहलावत'ला मी सगळ्यात पहिल्यांदा 'कमांडो' मध्ये पाहिला. 'विद्युत जमवाल नावाचा नवा ऍक्टर आलाय आणि तो खतरनाक स्टंट्स, फाईट्स करतो', केवळ ह्या एका कारणासाठी मी तो सिनेमा पाहिला होता आणि त्यातला क्रूरकर्मा व्हिलन जो जयदीप अहलावतने साकार केला होता, हादरवून गेला होता. चेहऱ्यावर असलेले देवीसारखे व्रण ओम पुरींची आठवण करून देणारे, पण हा अभिनेता वेगळ्या पठडीतला. खरं तर कमांडोच्या आधी 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये तो दिसला होता, पण सिनेमातला त्याचा छोटा, पण महत्वाचा रोल संपल्यावर मनोज वाजपेयी येतो आणि सिनेमा खिश्यात घालतो, त्यामुळे त्यातला अहलावत फारसा लक्षात राहणार नव्हताच. नंतर 'रईस'सारख्या सिनेमांतुनही त्याच्या दुय्यम भूमिका लक्षात राहिल्या नाहीत. पण 'राज़ी'मधला रॉ अधिकारी मात्र चांगलाच लक्षात राहिला. ह्या गुणी अभिनेत्याला प्रथमच अशी मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारायला मिळाली असावी. 'पाताल लोक' ही कहाणी अनेकांच्या असली तरी मुख्य व्यक्तिरेखा 'हाथीराम'चीच आहे आणि इतक्या महत्वाच्या व्यक्तिरेखेचं 'जयदीप अहलावत'ने सोनं केलं आहे. त्याच्या देहबोलीत होणारे अनेक बदल स्पष्ट जाणवत राहतात. हाथीराम हा एक सामान्य माणूस आहे. कुणी 'लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर' नाहीय. त्याचा सामान्यपणा त्याच्यातल्या चांगल्या-वाईटासह अहलावतने आपलासा केला आहे आणि म्हणूनच तो खराखुरा उतरलाही आहे. ह्याचं क्रेडिट लेखकांनाही जाईलच कारण नक्कीच ही एक 'ऑथर बॅक्ड' रोल आहे. 

ह्याच लेखकांना मात्र एक छोटंसं 'डेबिट'ही जायला हवं. फक्त आपलं स्वतः:चं सेक्युलर, न्यूट्रल वगैरे असण्यासाठी अनावश्यक 'ब्राह्मण आणि इतर' असा अँगल कहाणीत घुसडणे, ह्या हास्यास्पद मूर्खपणातून सर्जनशील लोकांनी बाहेर पडायला हवं. I mean, भारताच्या कोणत्या कोपऱ्यात दलितांचा नेता ब्राह्मण आहे, हे मला तरी माहीत नाही. दलितांच्या मतांसाठी त्यांना वापरून घेणं, जवळ घेणं हा भाग वेगळा आणि 'दलितांचा नेता' हीच इमेज असणं, हे वेगळं असं मी मानतो. दलितांचा नेता दलितच दाखवला असता, तरी कहाणीत तसूभरसुद्धा फरक पडला नसता. तरी ही ओढाताण कशासाठी आणि का, हा प्रश्न लेखक-दिग्दर्शकांनी स्वत:लाच विचारायला हवा. हे प्रपोगंडा आता लोकांना समजून येत असतात, आताचा सोशल मीडिया साक्षर प्रेक्षक खूप बारकाईने सगळीकडे लक्ष ठेवून असतो आणि मोकळेपणाने व्यक्तही होत असतो, हे आता लक्षात घ्यायला हवं.

अर्थात, हा एक प्रपोगंडाचा छोटासा भाग वगळता 'पाताल लोक' अगदी बांधीव आहे, असंही नाही. नऊ भागांच्या वेब सीरिजमध्ये कहाणी सांगण्यासाठी आणि तरीही तिला उत्कंठावर्धक ठेवण्यासाठी काही अनावश्यक भागसुद्धा ह्यात आहेच. उदाहरणार्थ, हाथीरामच्या मुलाचं उपकथानक. तसेच अटक केलेल्या चार आरोपींचे पुर्वायुष्य वगैरे भागही. मला असं वाटलं की मूळ कथा ही एका चित्रपटापुरतीच आहे. तिला प्रत्येकी ४०-४२ मिनिटांच्या नऊ भागांमध्ये मांडण्यासाठी पसारा वाढवत नेला आहे. चांगली बाब इतकीच की पसारा वाढवल्यावर तो आवरण्यासाठी अनेक मालिकांच्या अखेरच्या भागांमध्ये जी उरकाउरकी केली जाते, तशी घिसाडघाई इथे केलेली नाही. काही भाग आहे तसाच सोडून दिला आहे. प्रत्येकच उपकथानक त्याच्या पूर्णत्वाला आलंच पाहिजे असं काही आवश्यक तर नाहीच. 

'अहलावत'व्यतिरिक्त अजून एका महत्वाच्या भूमिकेत - पत्रकार 'संजीव मेहरा'च्या भूमिकेत - 'नीरज कबी' हा एक तगडा ऍक्टर पुन्हा एकदा आहे. संजीव मेहराला पाहताना टीव्हीवर झळकणाऱ्या एका पुरस्कारप्राप्त वरिष्ठ पत्रकार महोदयांची आठवण सतत येत राहते. पत्रकारांच्या ढोंगीपणा उघड करणारी ही व्यक्तिरेखा आहे. आणि कबी पुन्हा एकदा त्याची कुवत दाखवून देतो. इतर सहाय्यक भूमिकांत हाथीरामचा सहकारी 'इम्रान अन्सारी'च्या भूमिकेतला 'ईश्वक सिंग' लक्षणीय आहे. 
'अभिषेक बॅनर्जी'ने साकारलेल्या 'हथोडा त्यागी'चा प्रभाव इतका जबरदस्त आहे की त्याची पूर्णकहाणी सविस्तर दाखवणारा एक स्पिन-ऑफ करायला हवा, असं वाटतं. थंड डोक्याने थरकाप उडवू शकेल असे खून पाडणारा 'हथोडा' अंगावर येणारा आहे. 
'गुल पनाग'ने एक अतिशय क्षुल्लक भूमिका केली आहे. ह्या लोकांना घर चालवावं लागतं, बिलं भरायची असतात, असं समजून घ्यायला हवं बहुतेक. राजेश शर्मा, स्वस्तिका मुखर्जी, विपीन शर्मा वगैरे माहितीतले चेहरे, नावं आपापली कामं करून जातात. त्यांना फार विशेष असा काही वाव नाहीय.  

'किल्ला' चे दिग्दर्शक अविनाश अरुण आणि 'परी'चे दिग्दर्शक प्रेषित रॉय ह्या द्वयीने कहाणीवरची पकड कुठेही ढिली पडू दिली नाहीय. थ्रिलर पाहताना ही पकड माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकांसाठी - ज्याचा फार पटकन रसभंग होऊ शकतो - फार महत्वाची असते. गेल्या काही दिवसांत अनेक थ्रिलर्स पाहत असताना दिग्दर्शकाची एक छोटीशी डुलकी सगळा खेळ बिघडवून गेल्याचे अनेक अनुभव मला आले आहेत. 'पाताल लोक' मात्र इथेच वेगळी ठरली. 
एक निर्माती म्हणून आपलं वेगळं पण अनुष्का शर्माने ह्यापूर्वीही दाखवलं आहे. खरं तर सीरिज पाहण्याचं प्राथमिक कारण हेच होतं की, अनुष्का शर्माने प्रोड्युस केली आहे. हा कन्टेन्ट वेगळा असणार, चांगला असणार असा विश्वास आधीच निर्माण झाला होता. हे एका निर्मात्याचं यशच म्हणायला हवं !  

एकूणात गेल्या काही महिन्यांत आलेल्या काही उल्लेखनीय वेब सीरिजच्या ओळीत 'पाताल लोक'ही नक्कीच आहे. आवर्जून पाहावी, असा हा कन्टेन्ट आहे. 

टीप - सबटायटल्स चालू करून पाहायला लागू शकते कारण बऱ्याचदा लोक तोंडातल्या तोंडात बोलल्यामुळे संवाद नीट समजतच नाहीत. 'चांगलं काम करणं म्हणजे तोंडातल्या तोंडात बडबडणं' हा सध्याचा एक विचित्र पायंडा आहे, अशीही एक समजूत होत चालली आहे. असो.  

- रणजित पराडकर 

Thursday, May 16, 2019

गेम ऑफ थ्रोन्स - सीजन ८ - Game of Thrones - Season 8 - (With Spoilers!) - (भाग १/२)

'गेम ऑफ थ्रोन्स' ह्या महामालिकेचा आठवा आणि शेवटचा सीजन सुरु झाला आहे. २०११ मध्ये सुरु झालेल्या ह्या मालिकेचे प्रत्येकी १० भागांचे सहा आणि ७ भागांचा एक असे आत्तापर्यंत सात सीजन्स झाले आहेत. आठवा सीजन ह्या सातही सीजन्सपेक्षा वेगळा ठरतो आहे. कारण आत्तापर्यंत ह्या मालिकेने प्रेक्षकांना निराश अनेकदा केलं, त्यांचे अंदाज अनेकदा चुकवले. मात्र तरी अपेक्षाभंग मात्र कधी केला नव्हता. आणि ह्या शेवटच्या सीजनचे आत्तापर्यंतचे भाग त्यांचा अपेक्षाभंग करणारे ठरले आहेत. 


माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर, हो.. माझाही थोडासा अपेक्षाभंग झाला आहे. मात्र तरी मला हा आठवा सीजन इतकाही टाकाऊ वगैरे वाटलेला नाही. असे अनेक लोक असतील ज्यांनी GoT बद्दल ऐकून ऐकून अखेरीस ही मालिका पाहायला सुरुवात केली असेल. त्यांना सोशल मीडियावर लोकांचा वैफल्यग्रस्त आणि चिडचिडा उत्सर्ग पाहून असं वाटत असेल की पुढे पाहावं की नाही ! मी त्यांना सांगू इच्छितो की, लोकांचा अपेक्षाभंग फक्त गेल्या काही एपिसोड्समुळे झाला आहे. त्याआधी एकूण ६७ एपिसोड्स आहेत, जे अख्ख्या जगाला आवडलेले आहेत. शेवटच्या सीजनच्या सहा एपिसोड्समुळे हे ६७ एपिसोड्स मी तरी विसरू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे, अपेक्षाभंग काही लोकांचा झाला आहे म्हणजे तुमचाही होईलच असं नक्कीच नाही. त्यामुळे ज्यांनी GoT पाहिलेलं नाहीय आणि पाहायची इच्छा आहे त्यांनी ते नक्कीच पाहावं. रु. १९९/- महिन्याचे भरून हॉटस्टारवर ते पाहता येऊ शकेल. क्रिकेट वर्ल्ड कप जवळ येतो आहे.तोसुद्धा हॉटस्टारवर दिसेलच. ही वेळ १९९/- अगदी पूर्णपणे वसूल होण्याची आहे.

आता आठव्या सीजनबाबत बोलू.
तत्पूर्वी ज्यांनी GoT पाहिलेलं नाहीय, त्यांच्यासाठी पटकन कथानक सांगतो. 'Throne' म्हणजे 'सिंहासन'. 'गेम ऑफ थ्रोन्स' म्हणजे अर्थ सुस्पष्ट आहेच. ही कहाणी मूलत: सत्तासंघर्षाची आहे. ह्या संघर्षात अनेक घराणी उतरली आहेत. GoT च्या भाषेत घराण्यांना 'House' म्हणतात. टार्गेरियन, स्टार्क, लॅनिस्टर आणि बरॅथिअन ही चार प्रमुख हाऊसेस ह्या संघर्षात आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त ग्रेजॉय, टायरेल, मार्टेल, बोल्टन आणि अशी अनेक लहान-मोठी घराणीही आहेत. ह्या कथानकाचा पसारा प्रचंड मोठा आहे. उत्तरेकडे जिथे कायम शून्याखाली तापमान असतं, अश्या बर्फाच्छादित भागापासून दक्षिणेकडे समुद्र आणि साधारण आग्नेय दिशेला रखरखीत वाळवंटापर्यंत हा भौगोलिक पसारा आहे आणि त्यासोबतच त्या त्या जागांच्या स्वत:च्या लहान-मोठ्या कहाण्या आहेत. पण अनेक उपकथानकांना एकत्र आणणारं एक मुख्य कथानक म्हणजे 'सत्तासंघर्ष'. जवळजवळ सात सीजन्सपर्यंत हा पसारा असाच दूर दूरपर्यंत होता आणि अनेक कथानकं एकाच वेळी सुरु होती. हळूहळू करत सगळी कथानकं आणि सगळी पात्रं - काही संपली, काही उरली - आठव्या सीजनला फक्त दोन जागी एकत्र आली आहेत. ह्यावरून लक्षात यावं की आता साहजिकच उरकाउरकी होणार आहे. तीच ह्या सीजनमध्ये चालू आहे.

पहिल्या दोन भागांत 'पात्रांचा एकमेकांमधला संवाद' हाच मुख्य अजेंडा आहे. 'हा ह्याला भेटला, तो त्याला भेटला' ह्यामध्ये दोन भाग खर्च केले गेले, इथून प्रेक्षकांच्या अपेक्षाभंगाची सुरुवात झाली. मात्र मला असं वाटतं की, भेटीगाठी आणि गप्पांत दोन भाग खर्च होणे आवश्यकच होतं. कारण अनेक पात्रं पहिल्यांदाच एकमेकांसमोर आली होती आणि अनेक पात्रं बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांना भेटत होती. त्यामुळे त्यांच्यात संवाद साधला जाणं साहजिक होतं. प्रॉब्लेम हा होता की हे संवाद GoT च्या स्वत:च्याच पातळीचा विचार करता फारच सपक होते. सात सीजन्समध्ये एकापेक्षा एक वनलायनर्स आणि मोनोलॉग देणाऱ्या लेखकांनी इथले संवाद त्या मानाने फारच उथळ लिहिल्यासारखे वाटले.

तिसरा भाग म्हणजे Most Awaited युद्धाचा भाग होता. नाईट किंग, त्याची आर्मी ऑफ डेड विरुद्ध सगळे सजीव. ह्या युद्धासाठी अवेक जाती, जमातीचे लोक, वेगवेगळ्या भागांतले लोक आपापले मतभेद, इतिहास विसरून जीवितासाठी एकत्र आले होते. प्रेक्षक ह्या महासंग्रामाची वाट गेले अनेक सीजन्स पाहत होते. Winter is coming and the Dead are coming with it अशी भीती घालून, गूढगम्य चेहरा करून कायम चिंतीत चेहऱ्याने वावरणारा जॉन स्नो ह्या एका कारणासाठी ग्रेट वाटत होता कारण त्याला एकट्याला जाणीव होती की भविष्यात काय आव्हान आपल्यासमोर असणार आहे.
मात्र ह्या युद्धाने प्रेक्षकांच्या अपेक्षाभंगाचा कडेलोट केला ! 
एक तर रात्री झालेलं युद्ध असल्याने सगळीकडे अंधार अंधार ! त्यात मारामारी आणि कापाकापीची गती इतकी भयंकर की त्या अंधारात, त्या गतीने नेमकं चाललं काय आहे ह्याची टोटल लागतच नव्हती.अनेकांनी स्क्रीन रिजोल्युशनही बदलून पाहिलं. कुणी 'मोबाईलवर कळत नसेल' म्हणून मोठ्या स्क्रीनवर पाहायचा प्रयत्न केला, पण तरी अंधार काही उजळेना ! मोस्ट अवेटेड युद्ध अश्याप्रकारे झाकोळलेलं पाहावं लागल्याने वैताग येणं स्वाभाविकच होतं. मलाही आलाच. 
GoT मध्ये ह्याआधी अनेक लहान-मोठी युद्धं, मारामाऱ्या, कापकाप्या झाल्या आहेत. ती सगळीच रोमांचक, उत्कंठावर्धक होती. मृतात्मे विरुद्ध सजीव, हे युद्ध सगळ्या युद्धांचा बाप ठरणारं असायला हवं होतं. ते तसं झालं नाही. ह्याचं कारण फक्त अंधारातलं चित्रीकरण इतकंच नाही. त्याहून महत्वाचं आणि जरासं विचित्र कारण म्हणजे ह्या युद्धात अपेक्षेपेक्षा कमी पात्रं मेली ! आमची अशी अपेक्षा होती की जिंकणाऱ्या सैन्यालाही ह्या युद्धाचा एखादा मेजर सेटबॅक बसेल. त्या मानाने तेव्हढा मोठा सेटबॅक बसला नाही. 

प्रेक्षकांसाठी हा एपिसोड अपेक्षाभंग करणारा ठरला तरी मला त्यात काही गोष्टी फार आवडल्या.
त्यांत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 'आर्या स्टार्क'. तिचे सगळे प्रसंग केवळ जबरदस्त झाले आहेत. ह्या ग्रेसफुली ती लढते ते केवळ पाहत राहण्यासारखं आहे. सिरिओ फॉरेल, जॅकन हेगार, द हाउंड ह्या सगळ्यांकडून आणि स्वत:ची स्वत:च ती जे जे शिकली आहे, ते तिने ह्या भागात दाखवलं आहे. एका विशिष्ट प्रसंगी जेव्हा तिचं मनोधैर्य खचायला लागतं, तेव्हा 'रेड वूमन' तिला सिरिओचे शब्द आठवून देते. 'What do we say to the God of Death? 'Not Today!' हा प्रसंग फार महत्वाचा आहे. (Will come back to this)**


दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे जोराह मॉरमोन्ट. ह्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवणारा कुणी असेल तर तो जोराह. शत्रूवर सगळ्यात आधी तो चाल करून जातो. त्याच्यासोबतची सैन्याची भलीमोठी तुकडी ठार मारली जाते, तेव्हा तो योग्य वेळी माघार घेऊन मागे उरलेल्या सैन्यासोबत जखमी अवस्थेत पुन्हा लढायला उभा राहतो. आपल्या राणीसाठी जीवाची बाजी लावतो. शिवाजी महाराजांच्या मुरारबाजी, तानाजी, बाजीप्रभू, प्रतापराव अश्या अनेक सरदारांनी जसं शौर्य गाजवलं, तसा हा जोराह मॉरमोन्ट शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राणीच्या जीवाचं रक्षण करतो आणि अनेक वार झेलूनही तो प्राण तेव्हाच सोडतो, जेव्हा ती सुरक्षित झाल्याचं त्याला समजतं. एकतर्फी प्रेमी जोराहचा असा अंत खूप भावनिक होता. जिच्यासाठी त्याने अनेकदा आयुष्य पणाला लावलं, त्या त्याच्या प्रेमासाठी, राणीसाठीच तो धारातीर्थीही पडला. 'मेरी ख़तम कहानी बस तुम तक' असं त्याचं आयुष्य संपतं. इयान ग्लेन ह्या स्कॉटीश अभिनेत्याने 'जोराह मॉरमोन्ट' अविस्मरणीय करून ठेवला आहे.


तिसरी आवडलेली गोष्ट म्हणजे जोराहची पुतणी 'लिआना मॉरमोन्ट'. अंदाजे १२-१४ वर्षांची ही चिमुरडी खतरनाक असते. तिच्या घराण्याला शोभेल असा बाणेदारपणा आणि निडरपणा तिच्यात पुरेपूर भरलेला दाखवला आहे. 'आर्मी ऑफ डेड'मधला डेड जायंट विंटरफेलच्या किल्ल्यात येऊन सगळं उद्ध्वस्त करत असताना तिला जाणवतं की ह्याला संपवणं किती आवश्यक आहे ! जखमी अवस्थेत लंगडत लंगडत ही चिमुरडी तिच्यापेक्षा अनेक पट महाकाय दानवावर धावत जाते. तो तिला एका हातात उचलून अक्षरश: चुरडतो आणि तोंडासमोर आणतो. तिला तेच हवं असतं. हातातून सुटू न दिलेलं ड्रॅगनग्लासचं शस्त्र ती त्याच्या डोळ्यात खुपसते आणि स्वत:च्या जीवाचा सौदा करून आलेलं संकट परतवते. 


आता coming back to आर्या.
**'What do we say to the God of Death? 'Not Today!' ह्यातला 'गॉड ऑफ डेथ' म्हणजे आत्ताच्या प्रसंगी 'नाईट किंग' आहे. तो किल्ल्यात शिरतो आहे आणि ब्रानकडे पोहोचणार आहे. 'Not Today' हे मी त्याला सांगायला हवं. आर्मी ऑफ डेड तर मरणार नाहीच, संपणारही नाही. त्याला संपवणं हाच एकमेव उपाय आहे. - हे सगळं आर्याला त्या प्रसंगी समजतं आणि मग ती उडी..
ह्या उडीबाबतही प्रेक्षकांनी अनेक प्रश्न केले. कुठून उडी मारली, हे कळायला काहीच मार्ग नाही. शक्य आहे की 'विअरवूड'मधल्या एखाद्या झाडावरून तिने उडी मारलेली असावी. पण हे सगळीकडे पसरलेल्या वाईट्सना कळत नाही, नाईट किंग आणि त्याच्या सरदारांनीही कळत नाही, हे अचाट आहे. पण मला तेव्हढी सिनेमॅटिक लिबर्टी द्यायला हरकत नसावी. 
मागे एका एपिसोडमध्ये आर्या जेव्हा ब्रियानसोबत तलवारबाजीचा सराव करत असते, तेव्हा अगदी अखेरच्या क्षणी ती दुसऱ्या हाताचा वापर करून ब्रियानला चित आणि चकित करते. तेव्हा ब्रियान तिला कौतुकाने विचारते, 'Who taught you this?' त्यावर आर्या 'Noone!' असं उत्तर देते. आर्याकडे असे युद्धकौशल्य आहे, जे इतर कुणाकडेही कदाचित नाहीय. ती निडर आणि शूर तर आहेच, पण चलाख आणि कुशलही आहे. तिच्या कौशल्याची चुणूक आणि एक प्रकारे हिंट त्या भागात दिली होती. जे कौशल्य वापरून ती ब्रियानसारख्या एका ताकदवान, यशस्वी आणि शूर तलवारबाजाला शरण आणते, तेच कौशल्य वापरून ती नाईट किंगला संपवते.


अनेकांची अशी अपेक्षा होती आणि ती गैरही नव्हती कारण बिल्ट अपही तसा केला गेला होता की कुठे तरी, केव्हा तरी नाईट किंग आणि जॉन स्नोमध्ये वन-ऑन-वन युध्द होईल. पण तसं काही न होता अचानक आर्याच 'हिरो' बनते ! एका प्रसंगी ते जोन आणि नाईट किंग समोरासमोर येतातही. मात्र स्वत: नाईट किंग तेव्हा जॉनशी लढण्यापेक्षा मृतांना जिवंत करून त्याच्यावर पाठवायची चाल खेळतो. नेहमीप्रमाणे बावळट जॉन जे करायचं ते सोडून दुसरीकडेच गुंतून राहतो आणि नाईट किंग ब्रानपर्यंत पोहोचतो. 
जॉन आणि नाईट किंगमध्ये आमनासामना न होणं, हा मला अपेक्षाभंग वाटला नाही. जे आपल्याला वाटतं ते होणार नाहीच, सयाची सवय मला GoT ने ६७ भागांतून लावली आहेच ! ध्यानीमनी नसताना अचानक आर्याने नाईट किंगला संपवणं हेही मला आचरट वाटलं नाही. कारण धक्कातंत्र वापरून कधीही काहीही घडवणं, हेही GoT ने अनेकदा केलं आहे. 

माझा अपेक्षाभंग दोन बाबतींत झाला.
एक म्हणजे नाईट किंगचं मुख्य लक्ष्य 'ब्रान' आहे. तो त्यालाच संपवायला येणार आहे, हे सगळ्यांना माहित असतं. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी थिऑन ग्रेजॉय स्वत:कडे घेतो. पण ह्यासाठीचं नियोजन ? थिऑन आणि त्याचे साथीदार धनुष्य-बाण घेऊन अविरतपणे येतच राहणाऱ्या वाईट्सचा सामना करणार होते ? धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नसतो. त्यांना हत्यार असं हवं, जे शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहील, इतकी साधी गोष्ट  लक्षात येऊ नये, हे हास्यास्पद नव्हे तर मूर्खपणाचं वाटलं. शेवटी बाण संपल्यावर थिऑन भालाच घेतो. तलवारी आणि भाले बाकीच्यांकडे का नव्हते ? 
दुसरी अपेक्षाभंग करणारी गोष्ट म्हणजे 'नाईट किंग' चा काही आगापिछा शेवटपर्यंत कळतच नाही. त्याला लॉंग नाईट आणायची आहे, त्यासाठी अख्ख्या जगाच्या मेमरीजचं मोर्र्तीमंत क्लाउड स्टोरेज बनलेल्या 'थ्री आय्ड रेव्हन' 'ब्रान'ला मारणं आवश्यक आहे, हे सगळं समजलं. पण मुळात तो कोण आहे/ होता ? लॉंग नाईट आणायची अफलातून आयडीया त्याला सुचली कशी ? मृतांना जिवंत करणारी ताकद त्याच्यात कुठून आली ? हे सगळं अनुत्तरीतच राहिलं. पहिल्या दोन भागांत अनेकविध पात्रांचं जे हळदी-कुंकू सुरु होतं, त्यातच कुठे तरी ह्याचीही कहाणी उलगडता आली असती. ते काही न होणं, एक महत्वाचा धागा मोकळाच सोडून देणं प्रचंड खटकलं.
  
ह्या भागाचा शेवट नाईट किंगच्या शेवटाने होतो. पण तत्पूर्वी थिऑनचाही शेवट होतो. अतिशय विचित्र, गुंतागुंतीचं आणि मरणप्राय यातना सहन करणारं, अनेक अप्स-डाऊन्स असणारं थिऑन ग्रेजॉय हे पात्र आहे. त्याच्याकडे कुठलंही अतुलनीय कसब नाही. एका मोठ्या घराण्यात जन्माला आला खरा, पण जवळजवळ सगळा जन्म दुसऱ्या एका मोठ्या घराण्यात - जरी घरच्यासारखाच होता तरी - बंदी म्हणून घालवलेला थिऑन. त्याचा मनावरचा ताबा अनेकदा सुटतो. कारण तो माणूस असतो. स्वत:ची शरम वाटत असतानाही तो स्वत:विरुद्धही लढतो आणि केलेल्या चुकांची भरपाई करण्यासाठी झटतो. त्याच प्रयत्नात जीवही देतो. अखेरच्या क्षणी 'ब्रान' निर्विकार चेहऱ्याने का होईना त्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन 'Theon, you are a good man. Thank you!' असं म्हणतो, तेव्हा फक्त थिऑनच्याच डोळ्यात पाणी येत नाही, आपल्याही पापण्या अंमळ ओलावतात. 


भागाचा शेवट अतिशय आवडलेल्या ह्या दोन गोष्टींनी होतो. 'नाईट किंगवर उडी घेणारी आर्या' हे चित्र तर कधीच विसरता येणार नाही आणि आपला शेवट समोर दिसत असतानाही नाईट किंगवर जीवाच्या आकांताने भाला घेऊन धावत जाणारा थिऑनसुद्धा कधी विसरता येणार नाही. 

एकूणात पहिले तीन भाग अपेक्षेपेक्षा जरा कमी वाटले, हे जरी खरं असलं तरी there were a few moments of brilliance too. ह्या लेखात बरेचसे लिहायचे राहून गेले आहे. उदाहरणार्थ - सर्सी, सान्सा, टिरीयन आणि जेमी अश्या महत्वाच्या पात्रांचा उल्लेखही आला नाही, जॉन आणि डॅनीने केलेला ड्रॅगन्सचा केलेला बावळट वापर, बेरिक डँडेरियनचा मृत्यू, दोथ्राकी आर्मीचा जवळजवळ विनाश, स्पेशल इफेक्ट्स, तिसऱ्या भागाच्या शेवटच्या दृश्याचं अफलातून पार्श्वसंगीत (The Night King) असं सगळं आत्ता हा शेवटचा परिच्छेद लिहिताना आठवत आहे. पण अतिविस्तार टाळणं आवश्यक असल्याने लिहित नाही.


पुढील तीन भागांबाबत काही दिवसांनी लिहीनच.

- रणजित पराडकर

Saturday, March 23, 2019

'नॉस्टॅल्जिया' - बधीर करणारं एक ड्रग !

प्रत्येक सिनेमामध्ये किमान एक तरी गाणं रिमिक्स करून टाकण्याचा ट्रेंड सध्या दिसून येतो आहे. 
ह्या मागचं व्यावसायिक गणित समजण्यासारखं आहे. पैसा रोटेशनमध्ये राहिला तर त्यातून जास्त फायदा. म्हणजे कमी मिळाले तरी चालेल, पण ताबडतोब रिटर्न्स मिळाले पाहिजेत. ह्यासाठी पैसा गुंतवण्याची आणि त्यानंतर वाट पाहण्याची जी प्रोसेस असेल, ती अधिकाधिक लौकर उरकली पाहिजे. जेणेकरून लौकरात लौकर 'मीटर डाऊन' होऊन रोटेशन सुरु होईल. 
मग साहजिकच - 'संगीत' ज्याबाबतची लोकांची एकंदरीतच जाण आजकाल कमी कमी होत चालली आहे, त्याच्या निर्मितीसाठी जास्त वेळ का दिला जावा ? - असा प्रश्न येतोच. कालच्या उरलेल्या भात किंवा पोळ्यांना फोडणी देऊन झटपट फोडणीचा भात किंवा पोळी करून नाश्ता उरकल्यासारखं पूर्वीच्या एखाद्या गाण्याला फोडणी देणं चटकन उरकणारं आहे. कुठे माथापच्ची करून नवीन धून बनवा, त्यावर शब्द लिहा. मग कच्च्या गाण्यात अजून बदल करा. मग त्याचं संयोजन, मिक्सिंग वगैरे वगैरे करा ! त्यापेक्षा उचला कुठून तरी, कोंबा काही तरी आणि मिक्स केल्यासारखं करून व्हा मोकळे ! काही तासांत एक गाणं तयार. मीटर डाऊन, रोटेशन सुरु ! दिलेल्या फोडणीत जर चिमुटभर 'नॉस्टॅल्जिया'सुद्धा असला, तर मग सुटणारा घमघमाट दूरवर पोहोचू शकतो !

करोडो रुपये टाकणाऱ्या लोकांनी त्याच्यावर मिळणाऱ्या फायद्याचा असा विचार केला तर त्यात नैतिकदृष्ट्या काहीच गैर नाही. मात्र, विकत घेणाऱ्यांनीच जर आपली आवड विकणाऱ्या लोकांच्या फायद्याशी जुळवून घेतली असेल, तर त्यात चूक कुणाची असणार ? खरं तर उलट व्हायला पाहिजे. लोकांना काय आवडतं ते विकायला ठेवलं गेलं पाहिजे. मगर आजकल गंगा उलटी बह रही हैं ! 
दुसरं काही विकत घ्यायला नाहीच त्यामुळे त्यातल्या त्यात 'कमी भुक्कड' जे असेल, ते विकत घेतलं जातं. हे फक्त देशाच्या राजकीय क्षेत्रातच घडत आहे, हा एक मोठा गैरसमज किंवा अज्ञान असावं. कारण जेव्हा अभिजातपणा, दर्जा अश्या मूलभूत संकल्पनांनाच आव्हान देण्याइतका उथळपणा 'बंडखोरी'च्या नावाखाली बळावतो, तेव्हा सगळ्याच क्षेत्रांमध्ये दुय्यम-तिय्यम दर्ज्याचे लोक उच्च पदावर पोहोचतात. दर्जात्मक अधोगती कुठल्या एका विशिष्ट क्षेत्राशीच मर्यादित नसावीच. एकाच वेळी अनेक, किंबहुना प्रत्येक पातळीवर समांतरपणे कमी-अधिक प्रमाणात (गतीने) ती सुरु असते. मग ते कलेचं क्षेत्र असो वा विज्ञानाचं, व्यावसायिक क्षेत्र असो वा राजकीय. एकदा आपला स्वत:कडूनच काही विशिष्ट दर्ज्याच्या निर्मिती व आस्वादाचा आग्रह संपुष्टात आला की आपण काहीही विकू शकतो आणि काहीही खरेदीही करू शकतो.

कलेचे बहुतांश पैलू हे शास्त्राने सिद्ध होत असतात. त्यामुळे 'दर्जा सापेक्ष असतो', हा युक्तिवाद जर कुणी करणार असेल, तर तो अगदीच तकलादू आहे. कारण अनुभूतीला मोजमाप नसलं, तरी अनुभवाला असतं. कलाकृतीचा आस्वाद घेणं आणि कलाकृतीने प्रभावित होणं, ह्यात फरक आहे. हा फरक अनुभवातून कळतो आणि अनुभव माहिती, ज्ञान, अभ्यास व काही प्रमाणात साधनेतून येतो. 
उदाहरणार्थ - लहान मुलाला थोडं सुरात कमी-जास्त असलेलं एखादं बालगीत अद्वितीय आनंद देत असतं. ती त्या लहान मुलाची अनुभूती. मात्र तेच मूल मोठं झाल्यावर त्या बालगीताचा आस्वाद घेताना भूतकाळात, आठवणींत रमतं, तो त्याचा अनुभव असतो; कलाकृतीचा दर्जा नाही. दर्जा हा शास्त्रसिद्धच असतो आणि कलाकृतीची महानता अश्या सिद्धतेनेच ठरते. अनुभूतीच्या पातळीवर ती ठरत नाही कारण अनुभूती वैश्विक असत नाही, व्यक्तीपरत्वे बदलत जाते.

म्हणूनच चित्रपट आणि चित्रपटसंगीताच्या बाबतीत भुक्कड, सुमार 'नव्वदी'च्या दशकाचं उदात्तीकरण आता पुरे करायला पाहिजे. 
मला जाणीव आहे की, सोशल मिडियावर सक्रीय असणाऱ्यांत मोठ्या संख्येने एक अशी पिढी आहे, जिच्या लहानपणाची किंवा तारुण्याची जोडी नव्वदीतल्या चित्रपट व चित्रपटसंगीताशी जोडलेली आहे. (माझीही आहे !) त्यामुळे त्या सगळ्याशी असलेली भावनिक जवळीक समजून येण्यासारखी आहे. मात्र केवळ नॉस्टॅल्जियाच्या नशेपायी लोक फार वाहवत चालले आहेत. आंख मारे लडकी आंख मारे.., ये खबर छपवा दो अखबार मे.., इ. टुकार ओरिजिनल्सची महाटुकार रिमिक्स, ती भिकार आहेत हे समजत असतानाही केलीही जात आहेत आणि स्वीकारलीही जात आहेत. ह्या सगळ्यात कुठे तरी आपला सारासारविवेक आपण स्वखुशीने गहाण ठेवतो आहोत.

नव्वदीच्या दशकाच्या उजळणीने मिळणाऱ्या नॉस्टॅल्जिक किकसाठी सामान्यत्वाचा असामान्य गौरव करण्याची एक प्रकारची अहमहमिका चालू असलेली दिसून येते. हे असंच जितकं सुरु राहिल, तितकं आपल्या माथी अजूनाजून सामान्यत्व मारलं जाणंही सुरुच राहिल. 'नॉस्टॅल्जिया' नावाचं 'ड्रग' आपल्याला बधीर करतंय आणि हे एखाद्याच्या बाबतीत नाही, तर एका मोठ्या समूहाच्या बाबतीत होत आहे. जिथे तिथे सामान्यत्वाचा 'उदो उदो' आपण करतो आहोत कारण काही असामान्य करण्याची कुवत आपल्यात नाहीय आणि ह्याचाच अभिमान मिरवण्यात आपण धन्यता मानतो आहोत. 
'चांगलं काय आहे, हे माहित नसणं आणि त्यामुळे एखादं सुमारपण, सुमार असल्याचं न समजून येणं', हा अज्ञानातला एक आनंद आणि त्या आनंदात हुरळून जाऊन एखाद्या टुकारकीतही असामान्यत्व दिसणे, हा न्यूनगंडाचा एक भाग असतो. 
हा न्यूनगंड झटकायला हवा, प्रयत्नपूर्वक. 
नाही तर अजून काहीच वर्षांनी लोक रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' सिरिजची किंवा even worse, इंद्रकुमारच्या 'मस्ती' सिरीजची आठवण काढून व्याकुळ होतील आणि त्या काळात रिमिक्स होऊन येणारी गाणी कोणती असतील, ह्याचा तर विचारही करवत नाही.

- रणजित पराडकर

Saturday, November 24, 2018

नाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)

चालून आलेलं ऐश्वर्य, सत्ता असतानाही केवळ स्वत:च्या नाकर्तेपणाने त्यावर बोळा फिरवण्याची अनेक उदाहरणं इतिहासातही आहेत आणि आपल्या अवतीभवतीही. 
सर्व तऱ्हेची मोकळीक, मुभा असताना, चांगले रिटर्न्स मिळत असताना आणि बजेटचीही विशेष चिंता नसतानाही भारतीय सिनेमेकर्स वेब सिरीजच्या क्षेत्रात कशी चवीचवीने माती खात आहेत, ह्याचं अगदी ताजं ताजं उदाहरण म्हणजे 'अ‍ॅमेझॉन प्राईम'वरची 'मिर्झापूर' ही सिरीज. 
'मिर्झापूर'च्या पहिल्या सीजनचे ९ भाग प्राईमवर एकत्रच प्रदर्शित झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील 'मिर्झापूर' शहर. ह्या शहरावर वर्षानुवर्षं 'त्रिपाठी' ह्या बाहुबलींचं राज्य आहे. आधी सत्यानंद त्रिपाठी (कुलभूषण खरबंदा) आणि आता अखंडानंद त्रिपाठी उर्फ 'कालीन भैया' (पंकज त्रिपाठी). गालिच्यांच्या निर्मितीआड अफीम आणि देशी कट्ट्यांचा व्यापार करणाऱ्या कालीन भैयाचा बिगडेदिल शहजादा मुलगा म्हणजे 'फुलचंद उर्फ मुन्ना त्रिपाठी' (दिव्येंदू शर्मा) हा ह्या साम्राज्याचा पुढचा वारसदार. मुन्नावर एका खूनाचा गुन्हा दाखल होतो आणि एक इमानदार सरकारी वकील रमाकांत पंडित (राजेश तैलंग) त्याच्याविरुद्ध वकिली करायला उभा राहतो. पंडितजींचे दोन मुलगे गुड्डू (अली फझल) आणि बबलू (विक्रांत मासी) आणि एक मुलगी असते. गुड्डू वर्चस्व आणि सत्तालोलुप असतोच आणि बबलूकडे थोडा सारासारविचार असतो. मुन्नाविरुद्धची केस ह्या दोघा मुलांना वर्चस्वाच्या, इर्ष्येच्या संघर्षात ओढते आणि सगळ्या मिर्झापूरचा चेहरामोहरा बदलतो.


ही सगळी कहाणी आजकालच्या टिपिकल गँगवॉर फिल्म्ससारखीच पुढे पुढे सरकत, पसरत जाते. अनावश्यक भडक चित्रिकरणामध्ये मात्र 'मिर्झापूर' आजपर्यंतच्या सगळ्या भारतीय सिनेमा व सिरीजच्या अनेक पाउलं पुढे आहे. अतिरक्तरंजितपणा जागोजाग भरलेला आहे. एखाद्याला गोळी घातली आणि तो मेला, इतकं सरळसोट तर काहीच नाही. त्याची लिबलिबणारी आतडी पोटातून बाहेर लोंबली पाहिजेत, फुटलेला डोळा बाहेर लटकला पाहिजे, रक्ताचे फवारे तर उडलेच पाहिजेत पण सोबत मांसाचे तुकडेही आलेच पाहिजेत, गळा चिरतानाच्या चिळकांड्या साक्षोपाने दिसल्या नाहीत तर माणूस मेल्यासारखा वाटणारच नाही अश्या अत्यंत कल्पक डिटेलिंगवर भरपूर वेळ घालवला आहे. 
जोडीला अनावश्यक आणि अगदी हास्यास्पद सेक्सची दृश्यंसुद्धा आहेत. मग लायब्ररीत बसून मुलीने केलेलं हस्तमैथुन असो किंवा कुणाचे अनैतिक संबंध, एकाही प्रसंगाचा मूळ कथेशी काही एक संबंध नाही आणि ते केवळ धाडसीपणा, बिनधास्तपणा म्हणून चित्रित केलेले असावेत, असंच जाणवतं, कारण झाडून सगळी दृश्यं फसलेलीही आहेत ! 
इतकी भडक हिंसा आणि उथळ सेक्स दृश्यं असल्यावर शिव्यांनीच काय पाप केलंय ? त्यामुळे त्यामुळे प्रत्येक वाक्यात विरामचिन्हं वापरावीत इतक्या सढळपणे परस्परांच्या माता-भगिनींचं आदरपूर्वक स्मरण केलं जातं. हे तर इतकं अति आहे की ह्या व्यक्तिरेखा सकाळी झोपेतून जाग आल्यावर मनातल्या मनात स्वत:लाही 'उठ की आता मायघाल्या' असं म्हणत असाव्यात. त्याशिवाय त्यांची सकाळच होत नसावी किंवा त्यांना प्रेशरच येत नसावं कदाचित. संवादांतले बहुतांश 'पंचेस' आणि विनोद हे केवळ शिव्यांमुळे आहेत. सर्जनशीलतेच्या दिवाळखोरीचं ह्याहून मोठं दुसरं उदाहरण बहुतेक तरी नसावंच. 
['ब्रिजमोहन अमर रहे' नावाचा 'नेटफ्लिक्स' ओरिजिनल सिनेमाही ह्याच पंथातला असावा. मी तो पूर्वी पाहायला घेतला होता आणि पहिल्या काही मिनीटांतच ह्याच सगळ्या दिवाळखोरीचा उबग येऊन बंद केला होता.]

ह्या सगळ्यावरून एक स्पष्टपणे लक्षात येतं की स्वातंत्र, मोकळीक मिळून काही उपयोग नसतोच. उलट ती एक अजून मोठी जबाबदारी असते. पिसाळल्यासारखं, वखवखल्यासारखं अनावश्यक चित्रण करत सुटणं म्हणजे त्या स्वातंत्र्याला ओरबाडणं झालं. ह्याच्या आधी हा अनुभव 'सेक्रेड गेम्स'मध्ये आला होता. अनुराग कश्यपच्या बहुतांश सिनेमांमध्ये येतच असतो. मोकळीक मिळाली की भडक हिंसा आणि सेक्स दाखवणं, हा अगदी सोपा मार्ग आहे. ह्या मोकळीकीचा वापर करून काही नाविन्यपूर्ण किंवा वादग्रस्त विषय, जे एरव्ही हाताळता येणार नाहीत, ते कुणी हाताळत नाही कारण ते अवघड असेल. सोपं हेच आहे की फाडा पोटं, उडवा मुंडकी, काढा कपडे, झवा मागून पुढून ! हिंसा आणि सेक्स अगदी सहज विकले जातील म्हणून दाखवायचे, इतका सरळसाधा व्यावसायिकपणा ह्या मागे असून, त्यावर उद्या सेन्सॉरची गदा आली की मात्र ह्याच व्यावसायिकपणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवणार. 

'मिर्झापूर' हा ह्या हलक्या विकृत व्यावसायिकतेचा अजून एक किळसवाणा, तिरस्करणीय चेहरा आहे. हा चेहरा सर्जनशील वगैरे अजिबात नसून मिळालेलं स्वातंत्र्य ओरबाडून उपभोग घेण्यासाठी वखवखलेला आहे. 

अली फझल, विक्रांत मासी, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा हे चौघे मुख्य भूमिकांत आहेत. तर श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगांवकर, कुलभूषण खरबंदा अशी सगळी मंडळी सहाय्यक भूमिकांत. सगळ्यांचीच कामं जबरदस्त झाली आहेत. त्यांच्या प्रभावी कामांमुळे सिरीज पाहात राहावीशी वाटते, हे मात्र नक्कीच. कुणाही एकाचा पॉवरहाऊस पर्फोर्मंस असा इथे नसून सगळे एकाच पातळीवर दमदार आहेत, हे विशेष. 'अमित सियाल' ह्या गुणी अभिनेत्यांच्या एन्ट्रीला आपल्या भुवया अपेक्षांसोबत उंचावतात. मात्र तो सिरीजमध्ये कशासाठी आहे, हे शेवटपर्यंत समजतच नाही. त्याला पूर्णपणे वाया घालवला आहे. 
कथानकात अनेक ठिकाणी तर्क वगैरे वास्तववादी पाखरांना भुर्रकन उडवून लावलं आहे. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट पात्र अमुक एक कृती का करतो, त्या मागे त्याचा विचार काय आहे, हे अनेकदा समजत नाही. किंबहुना, हे त्या त्या वेळी अगदी स्वाभाविक घडायला हवं असतं, ते घडलं असतं तर कहाणी कधीच संपली असती त्यामुळे हा सगळा पाणी ओतून ओतून वाढवत नेण्याचा प्रकार आहे, दुसरं काही नाही. 

एकंदरीत प्रभावी अभिनय आणि हिंसक दृश्यांमुळे साहजिकपणे निर्माण होणारा थरार ह्या जोरावर 'मिर्झापूर' उभी आहे. ह्यात कुठल्याही प्रकारची कल्पकता शोधू नका आणि ती शोधणं हा जर तुमचा स्वभावधर्म असेल, तर हिच्या वाटेलाच जाऊ नका !

मिर्झापूर (An Amazon Prime Original Series)
निर्मिती - एक्सेल एन्टरटेनमेंट (फरहान अख्तर, रितेश सिधवानी)
दिग्दर्शक - करण अंशुमन, गुरमीत सिंग, मिहीर देसाई, निशा चंद्रा 
लेखक - करण अंशुमन, पुनीत कृष्ण, विनीत कृष्णन,
कलाकार - अली फझल, विक्रांत मासी, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगांवकर, कुलभूषण खरबंदा, रसिका दुग्गल, शीबा चढ्ढा, अमित सियाल 
छायाचित्रण - संजय कपूर
पार्श्वसंगीत - जोएल क्रेस्टो

- रणजित पराडकर

Friday, September 14, 2018

हार्मनी विथ ए. आर. रहमान (Harmony with A. R. Rahman)


ही 'अॅमेझॉन प्राईम'वर रिलीज झालेली पाच भागांची एक सिरीज. ह्यात ए. आर. रहमान भारतातल्या चार वेगवेगळ्या राज्यांतल्या चार कलाकारांशी संवाद साधून, त्यांच्या कलेशी ओळख करून व करवून देतो आणि पाचव्या भागात हे चार जण चेन्नईला रहमानच्या स्टुडीओत येऊन रहमान आणि त्याच्या ensemble सह एक मैफल करतात. 

हे चार भाग असे -

भाग-१. सजित विजयन - केरळ - मेळावुवादन (Mizhavu) 

भाग-२. बहाउद्दीन डागर - नवी मुंबई - रुद्रवीणा (धृपदवादन)

भाग-३. लौरेबम बेदबाती - मणिपूर - खुनुंग इशेई गायन (Khunung Esei)

भाग-४. मिकमा त्शेरिंग लेपचा - सिक्कीम - पन्थोंग पलित वादन (Ponthong Palit)


'मेळावु' हे एक तालवाद्य. साधारणपणे एका मोठ्या गोलाकार माठाच्या तोंडाला चामडे बांधून तयार केलेले हे वाद्य. नादनिर्मितीची अत्यंत संकुचित मर्यादा असल्याने ह्यात वैविध्य फारसं दिसत नाही आणि असल्यास ह्या भागातून ते धुंडाळलंही जात नाही. सिरीजचा हा पहिलाच एपिसोड, ह्या खूप मर्यादित स्कोप वाटणाऱ्या वाद्यावर आधारलेला असल्याने खरं तर पुढील भागांबद्दलची उत्सुकता जरा कमी करतो. 
'केरळ'चं अप्रतिम चित्रीकरण ह्या भागात आहे. एकूणच ह्या सिरीजमध्ये एरियल शॉट्सने अप्रतिम असं निसर्गदर्शन होणार आहे, हे ह्या पहिल्या भागातच स्पष्टपणे जाणवतं. मात्र ह्या निसर्गदर्शनाशिवाय फारसं काही ह्या भागात हाती लागत नाही. सांगीतिक बाजूबाबत बोलायचं, तर रहमान आणि विजयन ह्यांचं जेव्हा एकत्र वादन होतं, तेव्हा ते खऱ्या अर्थाने एकत्र वाटतच नाही. दोघं समांतर चालले आहेत, असंच वाटत राहतं. 

अगदी असाच अनुभव तिसऱ्या एपिसोडमध्येही येतो. त्यात रहमान मणिपूरला जातो. तिथलं लोकसंगीत, जे 'खुनुंग इशेई' ह्या नावाने ओळखलं जातं, त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतो. खुनुंग इशेई गायक कलाकार 'श्रीमती लौरेबम बेदबाती' ह्यांचा ह्या भागात सहभाग आहे. बहुतेक तरी ह्या एपिसोडमध्येही लोकसंगीताचा हा प्रकार पुरेसा धुंडाळला गेला नसावा. कारण संगीताचा जो आत्म्यापासून आत्म्यापर्यंत किंवा मनाचा मनाशी असा संवाद, भाषा आणि संस्कृतीच्या बंधनांना पार करून थेट व्हायला हवा, तो काही होत नाही. केरळ आणि मणिपूर, ह्या दोन्ही जागांच्या नैसर्गिक सौंदर्यावर ह्या दोन्ही भागांचा पाया बेतलेला वाटतो. संगीतावर नाही. इथेही रहमानचं वादन आणि बेदबातींचं गायन एकमेकांत मिसळत नाही. 

पहिल्या भागाच्या अपेक्षाभंगावर दुसरा भाग एक प्रकारचं औषध आहे. खऱ्या अर्थाने 'सांगीतिक श्रीमंती' आणि 'संगीताचं तत्वज्ञान' ह्या भागात जास्त चांगल्या प्रकारे आपल्या भेटीला येतं. कदाचित शहरी भागातलं चित्रीकरण असल्याने निसर्गदर्शनावर फोकस जाण्यासाठी स्कोपच नसल्यामुळे हा भाग मूळ मुद्दा - संगीत - बऱ्यापैकी धरून ठेवतो. ह्या भागात रहमानचा पवित्राही इतर तीन भागांपेक्षा खूप वेगळा आहे. तो खूपच बचावात्मक नम्र वाटला आहे. नम्रता तर चारही भागांत त्याच्यात जाणवतेच, मात्र इथे तो स्वत:च बॅकसीटवर जातो आणि बहाउद्दीन डागरसाहेब व त्यांचं कथन पुढे येतं. इथलं रहमानचं एकट्याचं डागरसाहेबांसमोरचं एक छोटं सादरीकरण, त्यावरून सुरु होणाऱ्या चर्चेत राग चारुकेसीचा उल्लेख येऊन नंतर त्याने 'तू ही रे..' मधलं चारुकेसीचं अंग उलगडणं, हे सगळं उत्स्फूर्त आणि सुंदर झालं आहे. त्यानंतरचं डागर साहेब आणि रहमान ह्यांचं एकत्र वादनही रंगतदार वाटतं.

चौथा भाग सांगीतिक पातळीवर दुसऱ्याच्या खालोखाल वाटला. 'मिकमा त्शेरिंग लेपचा' हे सिक्कीमचे मूलनिवासी 'लेपचा' ह्या समाजाचे प्रतिनिधी. बासरीसारखं दिसणारं पण चारच छिद्रं असलेलं 'पन्थोंग पलित' हे वाद्य, त्याचं विशिष्ट पद्धतीचं वादन व स्वत: मिकमा ह्यांचं गायन, ह्याच्याशी आपली ओळख ह्या भागातून होते. सिक्कीमच्या पहाडी भागातली 'लेपचा' ही एक पहाडी, शिकारी जमात. त्यांचं हे संगीत. त्या संगीतातून एक प्रकारचं गूढ, पण हवंहवंसं कारुण्य जाणवलं. ह्या भागात सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे, मिकमा ह्यांची अतीव विनयशीलता. बिकट आर्थिक परिस्थितीतून वर आलेल्या ह्या कलाकाराच्या वागण्या-बोलण्यातून आपण सोसलेल्या प्रतिकूलतेबाबत कुठलाही विचित्र अभिमान - जो आजकाल हलाखीतून वर आलेल्या अनेकांत दिसतो - किंवा त्या काळाबाबत कसलाही असंतोष जाणवत नाही. त्यांचा हाच विनय त्यांच्या वादन व गायनातूनही दिसून येतो. 

पाचवा आणि अखेरचा एपिसोड, आधीच सांगितल्याप्रमाणे सर्वांच्या एकत्र मैफलीचा आहे. त्यासाठी सर्वांनी चेन्नईला येणं. तयारी करणं. ह्या सगळ्या प्रोसेसबाबत, रहमानबाबत त्यांना काय वाटलं, ह्याचं कथन आणि सरतेशेवटी वादन, मैफल. साधारण १०-११ मिनिटांची ही मैफल अस्सल रहमानस्पर्श झालेली संगीतनिर्मिती आहे. ही मैफल खूप आवडली, मात्र त्यात पाहुण्या कलाकारांचा सहभाग फार काही लक्षणीय वाटला नाही. खासकरून रुद्रवीणा तर सगळ्या कोलाहलात हरवून गेल्यासारखीच वाटली. 
ह्या मैफलीइतकंच मला शीर्षक संगीतही आवडलं. त्यात वापरली गेलेली छोटीशी धून खूपच मेलडीयस आहे. 

To conclude, 'हार्मनी' मला सिनेमॅटिकली जास्त आवडलं. पाचपैकी दोन एपिसोड तर म्युझिकली फारच कमी पडल्यासारखे वाटले. सर्वोत्तम एपिसोड डागरसाहेबांचा. Shows why Classical Music is the supreme. 
माझी ह्या सिरीजने निराशा झाली कारण 'रहमानसाठी पाहणं' म्हणजे 'संगीतासाठी पाहणं' असतं, छायाचित्रणासाठी नव्हे. छायाचित्रणाचं काम अफलातून झालं आहेच, पण सिरीजचं नेमकं प्रयोजन जर त्या त्या भागातील संगीत आणि त्यांचं त्या त्या भागातील निसर्गाशी नातं उलगडणं हे असेल, तर त्यात एक असमतोल नक्कीच आहे. भारतीय सिनेसंगीत एकसुरी आणि सामान्यत्वाकडे वेगाने घसरत चालले असतानाच्या काळात 'ए. आर. रहमान' एक वेगळा साउंड आणि वेगळं सृजन घेऊन समोर आला होता. He was a Knight in Shining Armour. अधूनमधून त्याने काही अदखलपात्र कामं जरी केली असली, तरी आजही 'रहमान' हे नाव संगीतास्वादकांसाठी अपेक्षांच्या एका मोठ्या उंचीवरच आहे. प्रत्येक वेळी, जसं सचिनकडून शतकाची अपेक्षा असायची, तशी रहमानकडून जादूची अपेक्षा असते. पाच भागांच्या ह्या वेब सिरीजमध्ये असे जादूचे क्षण शोधत राहावे लागले, हा माझा अपेक्षाभंग आहे. 'रहमान'ऐवजी दुसरं काही नाव असतं, तर कदाचित ह्याच निर्मितीने मला अधिक जास्त आनंद दिला असता.

- रणजित पराडकर

Thursday, July 12, 2018

थोडा है थोडे की जरुरत थी (Sacred Games - सेक्रेड गेम्स)



मुंबईवर होणार असलेल्या एका मोठ्या हल्ल्याची वरवरची खबर एका इन्स्पेक्टरला एका मोस्ट वॉण्टेड गँगस्टरकडून मिळते. मग त्या कटाचा तपास व त्या गँगस्टरच्या आयुष्याचा प्रवास दोन्ही जोडीने, आलटून पालटून उलगडत जातं. हा 'सेक्रेड गेम्स'चा मुख्य गाभा आहे. नेहमीच्या क्राईम, थ्रिलर कथांप्रमाणे हा चांगला आणि वाईटातला थेट संघर्ष नाही. इथे जवळजवळ सगळ्याच पात्रांचा रंग कमी अधिक प्रमाणात फिक्कट राखाडी ते काळा आहे. हा संघर्ष मुख्यत्वेकरून प्रत्येक पात्रासाठी 'स्व'चा आहे. 'माझ्यातही काही तरी दम आहे' हे दाखवण्यासाठी संधी शोधत असणाऱ्या कुणाला ही केस म्हणजे ती संधी आहे, तर 'मी इतकाही नालायक नाहीय' हे दाखवण्यासाठी संधी शोधत असणाऱ्या कुणाला हे कांड म्हणजे ती संधी आहे. इथे सिस्टममधल्या लोकांचा परस्परांशी असलेला संघर्ष आहे, सिस्टमशी असलेला संघर्ष आहे आणि एका सिस्टमचा दुसऱ्या सिस्टमशी असलेला संघर्षही आहे. मानवी भावभावनांच्या हळुवारपणा वगैरेला अर्थातच इथे दुय्यम स्थान आहे. महत्वाकांक्षा, वासना, लोभ, ईर्ष्या अगदी ठळक आणि बेधडकपणे पात्रांच्या मनांचा व बुद्धीचा ताबा घेत आहेत. 

'सेक्रेड गेम्स' हे एक नग्न सत्य आहे. नग्नता जितकी आक्रमक, प्रभावी, भडक आणि धक्कादायक असते, तितकं ते आहेच. 'वेब सिरीज' हा प्रकार अजून सेन्सॉर बोर्डच्या पट्ट्यात आलेला नसल्याने हिंसा, विचार आणि आचारांतली भडकता खुलेपणाने दाखवता आलेली आहे. कथानक मुंबईबाबत आहे आणि मुंबईतच घडतं, त्यामुळे पात्रंही बहुतांश मराठी आहेत. त्यांच्या तोंडी अस्सल मुंबईच्या शिव्या आहेत. चांगली गोष्ट ही की त्यांचा अनावश्यक भरणा कुठेही वाटत नाही. 

सिरीजच्या सर्व आठही भागांत लेखक-दिग्दर्शकांची कथानकावरची पकड ढिली पडत नाही. मांडणीमध्ये एकसमान वेग पहिल्यापासून शेवटपर्यंत पकडून ठेवलेला आहे. अनेक पात्रं आहेत. ती येतात, जातात. काही उपकथानकं आहेत. पण त्यांच्यात रेंगाळत बसवलं जात नाही. 

सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, जितेंद्र जोशी, नीरज कबी, गिरीश कुलकर्णी, गीतांजली थापा, आमीर बशीर अश्या सगळ्या गुणी कलाकारांची फौज इथे आहे. ह्या सगळ्यांपैकी नावाजुद्दिनवर सध्या खूप स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. मला तर तो अगदी स्टिरियोटिपिकल वाटला, अन्कन्व्हिन्सिंग आणि थोडा कंटाळवाणाही वाटला. वासेपूर, मॉन्सून शूटआउट, रमन राघव नंतर सेक्रेड गेम्स. सेम एक्स्प्रेशन्स. नो एफर्ट. उच्चार तर खूपच चुकलेले आहेत. तो एकाही प्रसंगात मराठी वाटतच नाही. स्वत:चं नाव नाव तो वारंवार 'गनेस गायतोंडे' सांगतो. इतकी वर्षं काम केल्यावर आणि मेकर्सकडेही दुनियाभरच्या लोकांची टीम असताना प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्याकडून 'श' ऐवजी 'स' च्या चुका क्षम्य नाहीत.  बरं, हा बाप भिक्षुकी करणाऱ्या बापाचा मुलगा दाखवला आहे. म्हणजे ब्राह्मण. मग तर हे उच्चार अजिबातच शोभत नाहीत. असल्या अगदीच प्राथमिक पातळीच्या ठसठशीत आणि बाळबोध चुका करूनही जर ह्या लोकांना 'क्रिटीकल अक्लेम' मिळत असेल तर कुठे तरी मोठा घोळच आहे. वास्तववादी दाखवायचं म्हणून भडक व बेधडकपणाच दाखवायचा, शिव्या पेरायच्या, नग्नदृश्यं दाखवायची का ? थोडासा अभ्यास, थोडंसं संशोधन कमी पडलं का इथे ? नवाज एक वेळ गँगस्टर म्हणून पटतो, पण 'मराठी' गँगस्टर म्हणून नाहीच पटत. त्याला मराठी दाखवायची गरजही नव्हती खरं तर. पण जर दाखवायचाच होता, तर सफाईने तरी दाखवता आला असता.

राधिका आपटे सादरीकरणात कमी पडत नाहीच, पण तिचं व्यक्तिमत्व 'रॉ एजंट' म्हणून शोभलं नाही. मात्र ही उणीव ती भरपूर उर्जा दाखवून भरून काढते. तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याभोवत तयार झालेल्या कोशातून बाहेर पडण्याची तिची धडपड ती उत्तम प्रकारे दाखवतेच.

जितेंद्र जोशी भाव खाऊन जातो. साध्या साध्या संवाद व प्रसंगांतही हा माणूस त्याच्या टायमिंगच्या जोरावर जबरदस्त मजा आणतो. त्याचा हवालदार काटेकर प्रत्येक छोट्या छोट्या बाबतीत पूर्णपणे खरा वाटतो. तेच गिरीश कुलकर्णीच्या बाबतीतही. एक आतल्या गाठीचा, टिपिकल मस्तवाल राजकारणी त्याने जबरदस्त उतरवला आहे. 

नीरज कबी हा एक ताकदीचा अभिनेता आहे. तो त्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून देतो. 
मात्र भूमिकेची लांबी सगळ्यात मोठी नावाजुद्दिन आणि सैफचीच आहे. सैफ अली खानचा इन्स्पेक्टर 'सरताज सिंग' खूप प्रभावी आहे. त्याने स्वत:ची बॉडी लँग्वेज मस्त मेंटेन केली आहे. त्याला नैराश्यग्रस्त आणि ओव्हरवेट असल्याचं म्हटलंय. कपडेही तसेच घट्ट दिलेयत. पण त्याने चाल आणि धावणं वगैरेही फोफश्यासारखं केलंय. कुठल्याही जागी तो बेअरिंग सोडत नाही. 

एकुणात 'सेक्रेड गेम्स' थरारक आहे. धक्कातंत्राचा वापर खूप प्रभावीपणे केला आहे. काही ठिकाणी खूप काही कमी पडल्यासारखं वाटतं, पण जे आहे तेही नसे थोडके. गेल्या वीसेक वर्षांत भारतीय गँगवॉर मूव्हीजने कात टाकली आहे. त्यामुळे अस्सलपणाकडे जाणारं प्रभावी चित्रण आताशा अनपेक्षित नाहीच आणि ज्या 'सत्या'सारख्या सिनेमांनी ही लाट आणली, त्यांच्या मागे 'अनुराग कश्यप' हेच नाव मुख्य होतं. त्यामुळेही 'सेक्रेड गेम्स'च्या अस्सल चित्रिकरणाबाबत खरं तर खात्रीच होती. शेवट मात्र फारसा प्रभावीपणे पोहोचल्यासारखा वाटला नाही. एक विशिष्ट पातळीचं ज्ञान व माहिती प्रेक्षकांकडे असेलच, असं गृहीत धरून केलेलं कथन मला स्वत:ला फारसं भिडत नाही. अगदी बाळबोधपणे सगळं विशद करून सांगावं ही अपेक्षा नाहीच. थोडीशी संदिग्धता हवीच. पण 'नेमकं असतं काय, होतं काय'; हे चटकन समजूही नये ह्याला संदिग्धता नाही, अनाकलनीयता म्हणतात; ती पटत नाही. 
तसेच बिनधास्तपणाच्या नावाखाली सेक्सदृश्यं दाखवणं, ह्या मानसिकतेतून आपण आता बाहेर पडायला हवं. बिनधास्तपणा तुमच्या कथेच्या उद्गारातूनही आला पाहिजे. जर एक विशिष्ट पात्र तृतीयपंथी आहे, तर त्या जागी एका तृतीयपंथीयालाच कास्ट का केलं नाही ? असाही एक आउट ऑफ द बॉक्स विचार करायला हवा. सेन्सॉरची भीती नाही म्हणून मोकाट उधळण्यापेक्षा ह्या मिळणाऱ्या मुक्ततेचा वापर प्रभावी कल्पकपणे करायला हवा. आपण प्रत्येक बाबतीत आपल्या भोवती एक चौकट आखून घेतली आहे, इतकंच नव्हे. तर त्या चौकटीबाहेर पडल्यावर काय करायचं, ह्याचीही एक चौकट आखलेली आहे. चौकटीबाहेरच्या चौकटीच्याही बाहेर पडायची वेळ आलेली आहे पण तसा प्रयत्न कुणी करताना दिसत नाही.

अस्तु !

- रणजित पराडकर

Wednesday, June 27, 2018

'संजू'च्या निमित्ताने

जेव्हा 'संजू' चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हाच वाटलं होतं की टिपिकल संस्कारी पोलिसांकडून आज ना उद्या उलटसुलट प्रतिक्रिया येतील. तश्या आल्या आहेत आणि त्यांवर जिकडे तिकडे चर्चासुद्धा सुरु आहे.
अगदी अपेक्षित आर्ग्युमेंट्स केली जात आहेत. उदाहरणार्थ - असल्या फालतू माणसावर चित्रपट बनवावासं वाटणं, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. आपल्याकडचे प्रेक्षकच मूर्ख आहेत. ते असल्या नालायक माणसांना डोक्यावर घेतात. हॉलीवूडमध्ये अम्क्यावर चित्रपट बनतो, तमक्यावर बनतो आणि आपण कुणावर बनवतो ? 'संजय दत्त!' वगैरे.



इथे एक गोष्ट लक्षात आधी घ्यायला हवी.
संजय दत्तवर एक चित्रपट येतो आहे, त्याला काही 'भारतरत्न' दिलं जात नाहीय. आणि चित्रपट हा कशावरही येऊ शकतो, कुणावरही काढला जाऊ शकतो. बायोपिक आहे तो. एखाद्या पिसाळलेल्या जनावरापासून एखाद्या हलकट माणसापर्यंत कुणाही सजीवाच्या आयुष्याला एक 'कहाणी' म्हणून दाखवलं जाऊ शकतं. कारण मुळात, कुठलाही चित्रपट बनवण्यासाठी प्राथमिक गरज असते 'कहाणी'चीच. (अपवाद - सल्लूपट)  प्रत्येक आयुष्य, मग ते एखाद्या संताचं असो वा गुन्हेगाराचं, एक कहाणी असते. ती सांगितली जाऊ शकते. मग तो अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य असो किंवा कुणी सेलिब्रिटी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, कहाणी वेगळी.

दुसरं म्हणजे, ह्यापूर्वीही अनेक ह्याहीपेक्षा अट्टल आणि भयंकर गुन्हेगारांवर चित्रपट येऊन गेलेले आहेत. त्यात काही नवीनही नाही आणि नैतिक/ अनैतिक तर अजिबातच नाही. 'अ‍ॅण्टी हीरो' असलेलेही असंख्य चित्रपट येऊन गेलेले आहेत. १९४३ सालच्या 'ग्यान मुखर्जी' दिग्दर्शित 'किस्मत' चित्रपटाने सर्वप्रथम भारतीय चित्रपटाला अ‍ॅण्टी हीरो दाखवला होता. त्यानंतर १९७५ च्या यश चोप्रा दिग्दर्शित 'दीवार' पर्यंत चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा अनेकदा लहान-मोठा गुन्हेगार असल्याचं दाखवलं आहे. अर्थात हे सगळे खूप गोड-गोजिरे, गोंडस चित्रपट होते. 'दीवार' मधला अमिताभचा विजय वर्मा एक un-apologetic गुन्हेगार असला तरी त्याला कठीण परिस्थितीने गुन्हेगार बनवल्याचं दाखवलं होतं. मात्र तरी तो 'हाजी मस्तान'वर आधारलेला असल्याचं लपलं नाहीच. शोले, शान सारख्या ब्लॉकबस्टर्समधूनही गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगत दाखवलं गेलं. राम गोपाल वर्माच्या 'सत्या'ने १९९८ साली खऱ्या अर्थाने गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगत समोर आणलं. आपल्याकडचा पहिला 'निओ नॉयर' माझ्या मते 'सत्या'च. किस्मत, दीवार आणि सत्या, हे तीन चित्रपट 'गुन्हेगार' चित्रीकरणातले मैलाचे दगड आहेत. 'सत्या'नंतर भडक बिनधास्तपणे अनेकदा गुन्हेगारांची कहाणी चित्रपटांतून दाखवली गेली आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर - १ आणि २' सारख्या चित्रपटांतून इतके रक्ताचे पाट वाहिले आहेत जितका आमच्या मराठवाड्यात पाऊसही होत नाही ! राजेश खन्नापासून शाहरुख खानपर्यंत प्रत्येक सुपरस्टारने   'अ‍ॅण्टी हीरो' रंगवला आहे. ते एक आव्हानात्मक काम आहे. 

मात्र 'चरित्रपट' ह्या बाबतीत आपल्याकडचा चित्रपट आजही खूप बचावात्मक आहे. अनेक अनुकरणीय व्यक्तींच्या चरित्रपटांतही त्या त्या व्यक्तीचे अवगुण सफाईने झाकले, टाळले गेले आहेत. इथे मला एक उल्लेख करावासा वाटतो. 

काही दिवसांपूर्वी, मी 'हंसल मेहता' दिग्दर्शित 'ओमेर्ता' पाहिला. हा चित्रपट तर 'ओमर शेख' वर आहे. जो एक कन्व्हीक्टेड दहशतवादी आहे. माझ्या मते बायोपिक कसा असावा ह्याबाबतचा 'ओमेर्ता' हा आपल्याकडचा मापदंड असायला हवा. दिग्दर्शकाने फक्त एक कहाणी सांगितली आहे. कुठल्याही ठिकाणी कोणतंही स्टेटमेंट नाही. पूर्णपणे न्युट्रल. मला स्वत:ला 'संजू'बाबत 'ओमेर्ता' सारखी अपेक्षा नाही. कारण दोघांचं 'प्लेईंग ग्राउंड'च वेगळं आहे. 'संजू' हा स्पष्टपणे एक व्यावसायिक चित्रपट आहे. त्यात संजय दत्तची कहाणी सहानुभूती ठेवून दाखवली असल्याचीच शक्यता जास्त आहे.

But as I said, चित्रपटातून गुन्हेगार, गुन्हेगारीचं उदात्तीकरण नवीन नाही आणि गुन्हेगारावर चरित्रपट काढणंही नवीन नाही. चुकीचं तर अजिबातच नाही. चित्रपट हे एक 'स्टोरी टेलिंग' आहे. कुठलीही कहाणी, कुणाचीही कहाणी ही सांगता आली पाहिजे आणि सांगितली गेलीही पाहिजे. तो संजय दत्त असो वा ओमर शेख, पानसिंग तोमर असो वा मिल्खा सिंग आणि टाटा-बिर्ला-अंबानी असो वा रणजित पराडकर, त्या त्या कहाणीला फक्त 'कहाणी' म्हणूनच पाहायला हवं. पिढ्यांवर संस्कार करणे हे चित्रपटांचं काम नसून ते पालकांचं काम आहे. ज्या पिढीच्या लोकांनी संस्कारांचा कैवार घेतला आहे, त्यांच्याच मुशीतून संजय दत्त आणि सलमान खानसारखे लोक घडले आहेत. असे चित्रपट बनतात, तसे चित्रपट बनतात वगैरे कारणांसाठी कुठल्याही पिढीवर नेम साधणं किंवा सरसकट एखाद्या समाजाला दूषणं देणं, हाच खरं तर दुटप्पीपणा आहे, दांभिकपणा आहे. हिंदी चित्रपट बदलतो आहे. धाडसी होतो आहे. त्याचा प्रेक्षकही हळूहळू करत बदलत चालला आहे. परिस्थितीला दोष देण्याचं उदात्तीकरण तरी 'संजू'च्या ट्रेलर्समधून दिसत नाहीय, जे गेल्या ७५ वर्षांतल्या चित्रपटांत सर्रास दिसून आलं आहे.

एक कलाकृती म्हणून कुठल्याही चित्रपटाकडे तटस्थपणे पाहण्याची सवय जोपर्यंत एक प्रेक्षकम्हणून आपल्या नजरेला आणि बुद्धीला होत नाही, तोपर्यंत 'चांगले चित्रपट बनत नाहीत' असं रडगाणं गाण्याचा अधिकारही आपल्याला मिळायला नको, खरं तर.

टीप - 'संजू'चं पहिल्या दिवशीच्याच तिकीटाचं बुकिंग केलेलं आहे.

- रणजित पराडकर 

Thursday, August 31, 2017

कभी हाँ, कभी ना - १

सुनील संध्याकाळी घरी परततो आणि बघतो.. घरच्यांनी सुनीलच्या जबरदस्त मार्क्स मिळवून पास होण्याच्या आनंदात मस्तपैकी पार्टी ठेवलेली असते.
गोव्यातल्या त्या छोट्याश्या शहरात, जिथे सगळेच एकमेकांना ओळखत असतात, आजपर्यंत सुनीलला सगळे कुचकामी समजत असतात. पण आज सुनीलचे वडील अभिमानाने त्या सगळ्यांना सांगत असतात की, 'नाही.. माझा मुलगा कुचकामी नाही! त्याने आज त्याच्या बापाला जिंकलंय.. आजपासून मी त्याला माझ्या गॅरेजमध्ये काम करण्याची जबरदस्ती करणार नाही.. त्याला 'म्युझिक'मध्ये काही करायची इच्छा आहे.. तो तेच करेल. माझा पूर्ण पाठिंबा आणि आशिर्वाद आहे त्याला..!'
उपस्थित सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटात सुनीलला शुभेच्छा देतात. अभिष्टचिंतन करतात. तिथे त्याचे मित्रही असतात, 'अ‍ॅना'ही असते, तिचे आई-वडील व भाऊसुद्धा आणि फादर ब्रीगेन्झादेखिल.

सुनीलचं मन त्याला खायला उठतं. खरं तर तो लागोपाठ चौथ्यांदा नापास झालेला असतो आणि घरच्यांना त्याने नकली मार्क्सशीट दाखवून फसवलेलं असतं !
'हे मी काय करून बसलो ! सगळ्यांचा माझ्यावर किती विश्वास, किती प्रेम आहे.. आणि मी? खोटी मार्क्सशीट बनवून ह्या सगळ्यांना फसवतोय..!'
स्वतःची शरम वाटत असते त्याला..
'पटेल.' 'चायना टाऊन'चा मालक. त्यानेच त्याला ही आयडिया दिलेली असते आणि बनावट मार्क्सशीटही बनवून आणून दिलेली असते. तो त्यालाच पकडतो.
'काय झालं यार हे, पटेल?'
'सुनील, मला पण वाटलं नव्हतं की इतकं मोठं प्रकरण होईल. पण आता तू खरं सांगितलंस तर काय होईल? कठीण आहे. कोण मदत करू शकेल आता ?'
फादर ब्रीगेन्झा..!! सुनीलवर खूप माया करणारे फादर. ते दिसतात सुनीलला. तो लगेच त्यांना बाजूला नेऊन सगळं खरं खरं सांगून टाकतो. फादर हादरतात ! चिडतातही..!
'अरे हे काय केलंस सुनील! तुझ्या आई-बापाच्या चेहर्‍यावर बघ कसा आनंद ओसंडून वाहतोय. त्यांना खरी गोष्ट कळेल, तेव्हा त्यांना काय वाटेल? काही तरी विचार करायचा होतास रे.. ते काही नाही.. आत्ताच्या आत्ता तू तुझ्या आई-बापाशी बोलायचंयस, त्यांना खरं खरं सांगायचंस.. हात जोडून, पाया पडून, काय जमेल ते करून क्षमा मागायचीस.. बस्स्स, हे सगळं कांड तू केलं आहेस, तुलाच ते निस्तरावंही लागेल.. चल जा.. सांग विनायकला - तुझ्या वडिलांना - आत्ताच्या आत्ता.. !'

सुनील जातो. आई-बापाला सांगतो.
एकीकडे पार्टी चालू आहे. सगळे हसतायत, खिदळतायत. दुसरीकडे पटेलच्या चेहर्‍यावर टेन्शन.. फादर ब्रीगेन्झा चिंताक्रांत.. आणि इतक्यात सुनीलच्या वडिलांचा - विनायकचा - आवाज चढतो ! ते त्याच्या एक मुस्कटात ठेवून देतात  आणि धक्के मारून दूर ढकलून देतात..
'चल निघ इथून..!! पुन्हा पाऊल ठेवू नकोस ह्या घरात.. चालता हो......!!'

पब्लिक सुन्न..
हात जोडून विनायक सांगतो -
'मित्रांनो, माझ्या ह्या मुलाने मला फसवलं. बनावट मार्क्सशीट दाखवली. तो फर्स्ट क्लास मिळवून पास झालेला नाही.. हा नालायक तर पुन्हा एकदा नापास झालाय.. मी मघाशी मोठ्ठं अभिमानाचं भाषण दिलं होतं, ते सगळं खोटंय.. हा माझा मुलगा आहे, ह्याची मला लाज वाटते.. लाज..! तुम्ही लोक इथे आलात मी तुमचे आभार मानतो..... पण मला माफ करा..!'
कुणाला काय करावं, काही सुचेनासंच होतं !
मटकन् खाली बसून टीपं गाळणार्‍या विनायककडे फादर जातात.. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणतात - 'विनायक, सुनील फेल नाही, पास झालाय.. इतक्या सगळ्या लोकांसमोर आपली चूक कबूल करायला खूप मोठी हिंमत लागते. ह्यावरून हेच दिसून येतं की ह्याचं मन किती स्वच्छ आहे ! अरे, जगात असे अनेक लोक असतात ज्यांना उद्याचा विचार करणं पटत नाही.  त्यांच्यासाठी आयुष्याचा प्रवासच जास्त महत्वाचा असतो. प्रत्येक क्षण त्यांना सोहळा करायचा असतो. सुनील त्यांच्यातला आहे. त्याला असं परीक्षांच्या निकालावर पास-फेल करू नकोस.. असं बिनधास्त आयुष्य जगायसाठी जबरदस्त मानसिक बळ लागतं. अरे तो 'स्पेशल' आहे.... तो मनाने स्वच्छ आहे, त्याला क्षमा कर.. बघ, माझं म्हणणं तुला पटतंय ना ? पटत असलं तर लगेच बोल की तू त्याला क्षमा केली आहेस..'
सुनीलची आई, अ‍ॅनाचे वडिल, पटेल सगळे विनायकच्या आजूबाजूला.. त्याला 'फादरचं ऐक' असं नजरेतून सांगत आहेत.
विनायक मूक.. शांत.

सुनील आपली सॅक उचलून घराबाहेर जाऊ लागतो.......
आणि गाणं सुरू..................

'वोह तो हैं अलबेला, हजारों में अकेला
सदा तुमने ऐब देखा, हुनर को न देखा....'

मजरूह सुल्तानपुरींचे सुंदर शब्द, जतीन-ललितचं अप्रतिम संगीत आणि हृदयाच्या गाभ्यातून येणारा सानूचा गोड आवाज..........
सगळे उपस्थित लोक एकेक ओळ गाऊन विनायकचं मन वळवतात..

'बन्सी को लकडी सदा समझा किये तुम
पर उसके नग़्मों की धुन कहाँ सुन सके तुम..'

आणि मग स्वत: विनायकही म्हणतो, 'वोह तो हैं अलबेला..!!'
तो सुनीलला जवळ घेतो, मिठी मारतो आणि सगळं पब्लिक पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट करतं.. प्रत्येक वेळेस तिथे दोन-तीन टाळ्या मीसुद्धा वाजवतो. गलबलून आल्यावर काही गोष्टी नकळत घडून जातात.


'कभी हाँ, कभी ना' मध्ये असे अजूनही काही गलबलून आणणारे क्षण आहेत. ही कहाणी एका 'नोबडी'ची आहे. शाहरुखने लोकांच्या मनात घर करण्याचं एक कारण त्याचे हे सुरुवातीचे काही सिनेमे आहेत. ज्यात तो अगदी तुमच्या-माझ्यासारखा वाटला होता. तो आपलं रिप्रेझेंटेशन बनला होता. इथला त्याचा 'सुनील' एकदम 'परफेक्ट'! त्याचं हुरळून जाणं, निराश होणं, इतकंच काय.. 'अ‍ॅना'चं 'ख्रिस'वर आणि 'ख्रिस'चं अ‍ॅनावर प्रेम असणं, ह्यामुळे त्याचा होणारा जळफळाट हे सगळं त्याला एक 'कॉमन मॅन' च बनवतं. खरं तर इथली सगळीच कॅरेक्टर्स अशीच 'जमिनीवरची' आहेत. खऱ्याखुऱ्या आयुष्याशी नातं सांगणाऱ्या लोकांनी विणलेलं हे कथानक फक्त एक विरंगुळा देत नाही, तर आपल्यातल्या अस्तित्वहीन सामान्य माणसालाही काही कहाणी असते, ही सुखावह भावना चाळवतं.


'कुंदन शाह'च्या 'जाने भी दो यारों' ने 'ब्लॅक कॉमेडी' मध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान बनवलेलं आहे. पण माझ्या मते 'जाने भी दो यारों' पेक्षाही कैक पटींनी सरस काम 'कभी हाँ, कभी ना' आहे. ह्यात काही मेसेज वगैरे नाहीय, तो असायलाच का हवा ? पण एक-एक पैलू काळजीपूर्वक पाडलेला आहे. सुरुवातीला वर्णन केलेला गाणं आणि त्याच्या आधीचा पूर्ण प्रसंग हे एक उदाहरण. प्रत्येक गाणं असंच खूप विचारपूर्वक चित्रित केलं आहे. 'आना मेरे प्यार को ना तुम..' आपल्याला गुदगुल्या करतं, 'ऐ काश के हम..' आपल्याला झुलवत झुलवत नाचवतं, तर 'दीवाना दिल दीवाना..' गायलाच लावतं. गाण्यांच्या उत्कृष्ट चित्रीकरणासाठी हा सिनेमा एक परिपाठच ठरावा.

'कभी हाँ, कभी ना' सारखे सिनेमे शाहरुखला 'शाहरुख'बनवून गेले आहेत. आज त्याचा राग येतो कारण त्याच्या 'सुनील', 'राजू' वर आम्ही जीवापाड प्रेम केलं आहे आणि करतोही. जो चेहरा कधी आम्हाला 'आमचा' वाटायचा तो आता वाटेनासा झाला आहे, हे खरं दु:ख आहे, हा खरा राग आहे.
हरकत नाही.
आयुष्यभर एकच एक काम कुणी कलाकार करत नाही, करूही नयेच. त्यानेही स्वत:ची इमेज बदलली, टिकवली आता ती पुन्हा बदलायची वेळ आली आहे. मला तो पुन्हा एकदा आपला वाटून घ्यायची इच्छा होते आहे. त्यासाठी त्याने परत बदलावं. सुनील, राजू नको, इतर काही बनावं. त्यात मला 'मी' दिसावा, तो मला 'माझा' वाटावा. कारण तोसुद्धा 'अलबेला' आहेच, नि:संशय !

- रणजित पराडकर

(क्रमश:)

Thursday, June 29, 2017

गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)

'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. जवळजवळ इरेला पेटून सगळेच्या सगळे सीजन्स मिळवले. माझं इंग्रजी खूपच चांगलं असल्याने मला सबटायटल्ससुद्धा हवीच होती. तीही मिळवली आणि सगळं काही हाती आल्यावर पोटात भुकेचा गोळा उठलेला असताना ज्या पवित्र्यात आपण चारी ठाव वाढलेल्या पानासमोर बसतो, त्याच पवित्र्यात मी पीसीसमोर बसलो. पहिल्या बैठकीत ३, दुसऱ्या बैठकीत ४ आणि तिसऱ्या बैठकीत उरलेले तीन, असा पहिल्या सीजनचा फडशा पाडत असतानाच माझ्या लक्षात आलं की हे अद्भुत आहे.

आता सहाच्या सहा सीजन पाहून झाले आहेत. त्यांवर बराच विचारही करून झाला आहे. आता काही तरी लिहिणं भाग आहे !

------------------------------------------------------------------------------------

सात प्रांत. त्यांचे सात मांडलिक राजे आणि सगळ्यांचा मिळून एक राजा. ह्या सगळ्या ठिकाणी एक-एक करून माजत गेलेली अनागोंदी, अराजक.
सत्तापालट, बंड, गद्दारी, मुत्सद्देगिरी सगळं एकाच वेळी सुरु आहे.
युद्धखोर आहेत, कट्टरवादी आहेत, धर्मांध आहेत, समाजकंटकही आहेत.
कुणी समजूतदार आहेत, कुणी कपटी, कुणी तत्वनिष्ठ, कुणी दांभिक, कुणी नीच, कुणी निष्पाप, कुणी शूर, कुणी पुचाट.
मेहनती, ऐतखाऊ, हुशार, मूर्ख, कर्तबगार, नालायक, श्रद्धाळू, अंधश्रद्ध, निष्ठावंत, विश्वासघातकी असे सगळे आहेत.
युद्धखोर आहेत. शांतताप्रिय मुत्सद्दी आहेत. महत्वाकांक्षी आहेत. अल्पसंतुष्टही आहेत.
ह्या सगळ्याच्या जोडीने चमत्कार, अद्भुत, अमानवी, अवास्तव घटना व व्यक्तीसुद्धा आहेत.

हा एक प्रचंड मोठा पसारा आहे. दूरवर पसरलेला. बर्फापासून समुद्रापर्यंत आणि पर्वतरांगांपासून वाळवंटांपर्यंत. ज्यात माणसाच्या जोडीने कावळे, कुत्रे, लांडगे, घोडे, हत्ती, ड्रॅगन्स, भूतं, राक्षस हे सगळेच आहेत.
माणसंसुद्धा हर तऱ्हेची आहेत. उच्च जातीची, कनिष्ठ जातीची, गरीब, श्रीमंत, विकसित, रानटी, औरस आणि अनौरस !

हा एक शोषक वि. शोषित असा अनादीकाळापासूनचा संघर्षही आहे. एका मोठ्या प्रतलावर. भरपूर उपकथानकांचं मिळून एक कथानक बनत आहे.
कथानक बदल्याचं, संघर्षाचं, जीवन-मरणाचं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्तित्वाच्या लढाईचं.
भरमसाट व्यक्तिरेखा आहेत. त्या प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वत:ची एक शैली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा एक आलेख आहे. चढता-उतरता. कुणाचं महत्व वाढत जातं, कुणाचं घटत जातं, तर कुणी सगळ्या गदारोळात आपलं स्थान व महत्व शिताफीने टिकवूनही आहे. ह्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाला छटा आहेत. पांढऱ्यापासून काळ्यापर्यंत जाणाऱ्या रेषेवर वेगवेगळ्या जागांवर ह्या व्यक्तिरेखा उभ्या आहेत. त्या अधूनमधून आपली जागा बदलतातही !
नितीमत्ता, माणुसकी वगैरे काहींच्या ठायी आहेत. मात्र अस्तित्वाचा संघर्ष असा काही पेटला आहे की स्वत:च्या नकळत किंवा मनाविरुद्ध त्यांना दाबून ठेवायला लागत आहे. इतक्या विविध व्यक्तिरेखा असूनही प्रत्येक व्यक्तिरेखा व्यवस्थित उभी राहते. ह्यासाठी लागणारा वेळ त्यांनी घेतला आहे. कुठलीही घिसाडघाई केलेली नाही.

हे एक महानाट्य आहे. त्याच्यासाठी मोठा पडदा हवा.
ह्याची तांत्रिक सफाई अतुलनीय आहे. अविश्वसनीय घटना खऱ्याखुऱ्या वाटतात. व्हीएफएक्सचं ओझं पडद्यावरची प्रत्येक व्यक्ती लीलया वागवते. हे त्यांचं एकमेकांशी एकरूप होणंसुद्धा एक अद्वैतच आहे !
पार्श्वसंगीतात स्वत:चा एक आत्मा आहे. खासकरून शीर्षक संगीत तर काळजाचं ठाव घेणारं आहे.

ह्या सगळ्याला दोन गालबोटं आहेत -
१. 'अतिरंजन' - अनावश्यक हिंसा व नग्न दृश्यांची भरमार केली आहे. इतकी जास्त की त्याचं अप्रूपही वाटेनासं व्हावं. हा भडकपणा म्हणजेच प्रभावी चित्रण, असा एकंदरच आजच्या फिल्ममेकिंगचा प्रामाणिक समज असल्याने कंठशोष वृथाच आहे, तरी !
२. शीर्षक - 'गेम ऑफ थ्रोन्स' पेक्षा चांगलं नाव सुचू नये, हे दुर्दैव. मला स्वत:ला हे एखाद्या व्हिडियो गेमचं थिल्लर नाव वाटतं. कथानकातली काव्यात्मक भव्यता ह्या नावात औषधापुरतीसुद्धा जाणवत नाही. लेखक जॉर्ज रेमंड मार्टिनच्या ज्या पुस्तक-मालिकेवर ही मालिका आधारलेली आहे, त्या 'अ सॉंग ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर' मधल्या सगळ्या पुस्तकांची नावं खूपच आकर्षक आहेत. (इच्छुकांनी गुगलावे.)

असो.
अजूनही काही उणीवा आहेत. कथानकात अगदी सोयीस्करपणे काही सुटे धागे आहेत, काही खड्डे किंवा भगदाडंसुद्धा आहेत. पण उणीवा आहेत म्हणून आवडू नये, असं असलं, तर त्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी ! आपल्याला स्वत:सकट अखिल विश्वातलं काही म्हणता काहीच आवडायला नको, नाही का ? उणीवा सहजपणे स्वीकारल्या जातील इतकी ताकद उर्वरित भागात असली पाहिजे. ती असली, तर ती निर्मिती यशस्वी म्हणायला हरकत नसावी.
हा 'गेम ऑफ थ्रोन्स' त्याच्यातल्या उणीवांसह आवडतो. त्यातले चांगले-वाईट सगळे लोक आपल्याला आवडतात. त्यांचे जय-पराजय, त्यांचे अंत हे सगळं आपण एकाच उत्सुकतेने पाहतो. त्याची भव्यता थक्क करते. हे एक अद्भुत सांघिक कार्य आहे, हे पदोपदी जाणवत राहतं.

१६ जुलैपासून पुढचा सीजन सुरु होतो आहे. आत्तापर्यंत सहा सीजन झाले आहेत. प्रत्येक सीजनमध्ये १० भाग. प्रत्येकी साधारण ५०-५५ मिनिटांचे. सुट्टीच्या दिवसांचा योग्य उपयोग व उर्वरित दिवसांत थोडंसं जागरण करून हा बॅकलॉग भरून काढता येऊ शकेल. मेहनतीचं काम आहे. पण एकदा लिंक लागली की आपोआप होत जाईल आणि पूर्ण झालं की दिलेल्या वेळेचं चीजच झालं आहे, हीच भावना असेल. प्रयत्न करून पहा. जरी जमलं नाही, तरी हरकत नाही. जसे सहा बाकी आहेत, तसेच सात बाकी राहतील. आठवा सीजन सुरु होईपर्यंत तरी हे नक्कीच पाहून होऊ शकेल. आत्ता फक्त सुरुवात तरी कराच !


दिग्दर्शन, लेखन, निर्मिती, अभिनय, तंत्रज्ञान, संगीत वगैरे सर्व बाबतींतली फौज भली मोठी आहे. मी कुणाचंच नाव घेणार नाही कारण कुणाचंही नाव न घेणं अन्याय असेल आणि सगळ्यांचा उल्लेख करायचा तर पाल्हाळ संपणार नाही !
मुद्दामच कथानकाविषयीही काहीही नेमकं लिहिणं टाळतो आहे ह्याची दोन कारणं -
१. साथ भागांचं कथानक एका लेखात लिहिणं अशक्य आहे आणि लेख-मालिका लिहिण्यासाठी सध्या वेळ नाही.
२. बऱ्याच लोकांनी अजून पाहिलेलं नाहीय, त्यांनी पाहावं अशी इच्छा आहे.

आणि अर्थात, सातव्या भागापासून मालिका सुरु करता येईलच !

- रणजित पराडकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...