Saturday, June 25, 2016

रमन राघव २.० - Welcome back Anurag Kashyap ! - (Movie Review - Raman Raghav 2.0)

इतर लोकांनी काय व कसं लिहिलं आहे मला माहित नाही. पण ह्या सिनेमाबद्दल लिहित असताना मी जाणीवपूर्वक त्याच्या कथानकाबद्दल लिहिणे टाळणार आहे. कारण जर कथानकाची तोंडओळख जरी करून दिली, तरी सिनेमाचं वेगळेपण समजून येऊ शकेल आणि ते होऊ नये, प्रत्यक्षात पाहत असतानाच हे वेगळेपण आश्चर्याचा धक्का देऊन जावं, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे जर कुणाला स्टोरी जाणून घ्यायची असेल, तर मी आधीच क्षमा मागतो !

वरील प्रास्ताविकातून हे तर समजून आलंच असेल की 'रमन राघव २.०' म्हणजे अनुराग कश्यप व कंपनीने टाकलेली कुप्रसिद्ध सिरीयल किलर रमन राघव उर्फ सिंधी दलवाई वर बेतलेली बायोपिक टाईप पाटी नाही. ती तशी नसणार हे मला त्याचे ट्रेलर पाहूनच वाटलं होतं. ट्रेलरमध्ये नवाझुद्दिन एका लहान मुलाला बांधून ठेवून त्याला बोलत असतो की, 'क्या नाम है तेरा ? 'पाकिट !' तू छोटा है ना, इस लिये पाकिट. कल आपन कोई पुछेगा की तेरेकू क्यू मारा. तो आपन बोलेगा, आपन ने सिरफ पाकिट मारा!' १९६५-६६ च्या आसपास मुंबईत अनेक खून केलेल्या रमन राघवने कधी कुणाला ओलीस धरलं नव्हतं. सिनेमा मूळ रमन राघवपेक्षा वेगळा आहे ह्याचा ह्याहून मोठा क्ल्यू हा की ट्रेलरमधून समजून येतं की ही कहाणी जुन्या काळातली नसून आजची आहे आणि सिनेमाच्या शीर्षकात '२.०' सुद्धा आहे.

मग 'रमन राघव २.०' काय आहे ? कशाबद्दल आहे ?

हा सिनेमा म्हणजे केवळ एक कथन नाही. ते एक विश्लेषण आहे. एक थिअरी त्यात मांडली आहे.
मानसिक अस्थैर्यामुळे खून करत सुटणे, ही आपल्या अंत:प्रेरणेसमोर आपल्याच सद्सद्विवेकाने पत्करलेली बिनशर्त शरणागती असते. ही प्रेरणा जितकी प्रखर असेल, तितकंच तिला शरण जावं लागणं हे अटळ असतं. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाची एक अंत:प्रेरणा (Drive) असतेच. ती जर सकारात्मक, कलात्मक, रचनात्मक, विधायक वगैरे असेल आणि वेळीच तिला ओळखलं तर उद्धार होतो. पण जसं प्रकाशाचं अस्तित्व मान्य करणं म्हणजेच अंधाराचंही अस्तित्व स्वीकारणं आलं, तसंच हीच अंत:प्रेरणा नकारात्मक, विध्वंसक वगैरेही असू शकते, हेही मान्य करायला हवं. भले, ते अमानुष असेल, मानसिक अस्थैर्य असेल, तरी 'आहे' व 'असू शकतं' हे सत्य बदलत नाही. मग अश्या अज्ञात, अनाकलनीय, विचित्र प्रेरणेपासून दूर जाण्यासाठी एक दुबळं मन इतर काही पर्याय शोधत राहतं. नशा, सेक्स, वगैरे. ते मन खरं तर 'आपली प्रेरणा काय आहे' ह्याचा शोध घेत असतं.

कई चेहरे हैं इस दिल के न जाने कौनसा मेरा

अशी काहीशी त्याची अवस्था, समस्या असते.
सरतेशेवटी, अटळ विधिलिखिताप्रमाणे जेव्हा आपली अंत:प्रेरणा समजून येते आणि तिला मन शरण जातं, तेव्हा कुणी 'ऑटो शंकर' बनतो, कुणी स्टोनमॅन आणि कुणी 'रमन राघव'.

'रमन राघव २.०' ह्या मानसिकतेचा ठाव घेतो. Which is like never before.


अनेक कारणं, वैशिष्ट्यं आहेत, ज्यामुळे 'रमन राघव २.०' एक खूपच वेगळा सिनेमा ठरतो.

१. वर सांगितल्याप्रमाणे त्या मानसिकतेचा ठाव घेणं.

२. हे कथानक त्रयस्थ व तटस्थपणे केलं गेलं आहे. सांगणारी व्यक्ती कोण चांगलं, कोण वाईट हे सांगत बसत नाही. कोण कसं आहे, हे फक्त दाखवून दिलं जातं.

३. सिनेमा थरकाप उडवेल, पण त्यासाठी नग्न हिंसाचार दाखवत नाही. जसा अनुराग कश्यपनेच 'गँग्स ऑफ वासेपूर १ आणि २' मध्ये दाखवला होता.

४. 'कहानी'मध्ये बकाल कोलकाता जितकं प्रभावीपणे दाखवलं होतं, तितक्याच प्रभावीपणे इथे 'मुंबई' दिसते. 'आमीर'मध्ये मुंबईचा हे कळकट चेहरा दाखवला होता. इथलं मुंबई चित्रण फक्त कळकटपणावर न थांबता कळकटपणाच्याही आत शिरुन त्याची व्याप्ती दाखवतं. ही मुंबई ह्या कथानकातलं एक महत्वाचं पात्र आहे. ती नसेल, तर ही कहाणीही नसेल.

५. 'बॉम्बे वेलवेट' मधून अनुराग कश्यपला नक्की काय म्हणायचं होतं, ते समजलं नव्हतं. तो एक धक्काच होता. फियास्को होता. त्यानंतर 'रमन राघव २.०' येतोय. पीछेहाट होत चाललेल्या सैन्याने निकराने जोरदार मुसंडी मारुन शत्रूची दाणादाण उडवावी, त्या जिद्दीने अनुराग कश्यपने पुनरागमन केलं आहे.

६. 'बॉम्बे वेलवेट'चा सहलेखक 'वासन बाला' इथलाही सहलेखक. कश्यपप्रमाणे 'बाला'चंही हे एक प्रकारे रिडम्प्शनच. सिनेमात मांडलेल्या थिअरीची कल्पना करणं, तिच्यावर बुद्धीनिष्ठ विचार करुन तिला मूर्त स्वरुपात आणणं ह्यासाठी कश्यप-बाला ह्या लेखकद्वयीला सलाम !

७. हा सिनेमा एक जबरदस्त थ्रिलर असला तरी मांडणीत कुठलीही गुंतागुंत नाही. सुटसुटीत मांडणी नेहमीच बाळबोध नसते आणि क्लिष्ट मांडणी नेहमीच वैचारिक नसते. कथा वाहत्या पाण्यासारखी अगदी नैसर्गिक प्रवाहीपणे पुढे सरकत जाते.

८. नवाझुद्दिन सिद्दिकी जेव्हा वाईट काम करेल तेव्हा ती बातमी असेल. ट्रेलरमधूनच त्याने त्याच्या भूमिकेची सायकोगिरी दाखवून दिली आहे आणि सिनेमातून तर सप्रमाण दाखवून देतो की 'आत्तापर्यंत जे पाहिलंत ते तर फक्त ट्रेलरच होतं !' त्याची भूमिका अमानुष, कपटी आणि विकृत व्यक्तीची आहे. हे सगळं सादर करताना he leaves no stone unturned.

९. 'मसान'मधून आपली छाप सोडलेला 'विकी कौशल' आपल्या दुसऱ्या सिनेमात पुन्हा एकदा दमदार काम करतो. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या नवाझुद्दिन सिद्दिकीसारख्या ताकदीच्या अभिनेत्यासमोर ह्या अननुभवी नवोदिताचा कसा टिकाव लागेल, ह्याचं उत्तर सिनेमा देतो. लोक बहुतेक तरी ह्या सिनेमाला 'नवाझुद्दिनचा सिनेमा' म्हणून लक्षात ठेवतील आणि विकी कौशल अनसंग राहील. पण माझ्या मते 'रमन राघव २.०' चे नवाझुद्दिन आणि विकी हे दोन पाय आहेत आणि सिनेमा लंगडा नाही.

१०. बॉक्स ऑफिसवर जमवलेला गल्ला हे दर्ज्याचं द्योतक असत नाही. कुठलाही पुरस्कारसुद्धा दर्ज्याची हमी देत नाही. 'खानावळी'चे आचरट चाळे बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवत असले आणि अनाकलनीय व कंटाळवाणे 'कोर्ट'सारखे रटाळ सिनेमे पुरस्कारांची लूट करत असले तरी इथेच अगदी वेगळा विचार करुन त्यालाही प्रभावीपणे मांडणारे कलंदरही आहेत. असे सिनेमे खोऱ्याने पैसा ओढणार नाहीत किंवा पोत्यात पुरस्कार भरून घेऊन जाणार नाहीत. ते फक्त बराच काळ लक्षात राहतील आणि ते लक्षात राहावेत इतकीच त्यांची अपेक्षाही असेल.

'रमन राघव २.०' एक असा थरार आहे, जो मी विसरू इच्छित नाही. बहुतेक तरी मी परत तो पाहणार नाही कारण पहिल्यांदा पाहतानाचा जो जबरदस्त धक्का आहे, तो दुसऱ्यांदा पाहताना कदाचित बसणार नाही.
मला डायल्युशन नकोच आहे.

रेटिंग (द्यायचंच असेल तर) - * * * * *

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...