Tuesday, July 03, 2018

सिम्प्लीफाईड संजू - (Movie Review - Sanju)

लिहायला उशीर झाला आहे, तरी 'संजू'बाबत लिहिणं खूप आवश्यक आहे कारण हा एक मोठी आर्थिक उलाढाल करणारा चित्रपट असणार आहे आणि वैचारिक उलाढाल तर आधीच सुरु झालेली आहे. 

संजय दत्तचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. त्याची शेकडो अफेअर्स असोत, ड्रग्स आणि दारूच्या आहारी जाणं असो किंवा १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला त्याचा सहभाग असो, हे सगळं टपऱ्या आणि नाक्यांपासून न्यायालयांपर्यंत, कमाल मर्यादेपर्यंत चर्चिले गेले आहे.  
पण मुन्नाभाई १ व २, थ्री इडियट्स, पीके सारखे चाकोरीबाहेरचे विषय हाताळूनही हेवा वाटेल असं व्यावसायिक यश मिळवत असतानाच जाणकारांकडूनही पसंतीची पावती मिळवणाऱ्या राजकुमार हिरानींना, इतर काही समकालीन दिग्दर्शकांप्रमाणे एक 'सेफ बेट' म्हणूनदेखिल कुठलाही चरित्रपट करायची काहीच गरज नाही. असं असूनही हिरानी हा विषय का हाताळतात ? 
कारण मुळात संजय दत्तच्या आयुष्याची कहाणी 'असामान्य' आहे. असं, इतकं पराकोटीचं आयुष्य आपल्याकडे इतर कुणीही जगलेलं नसावंच. लोकांना वाटतं की असल्या माणसावर फक्त भारतातच चित्रपट बनू शकतो. माझं मत विरुद्ध आहे. ह्या आयुष्यावर भारताबाहेरील एखाद्या चित्रपटकर्त्याने कदाचित एखादी चित्रपटमालिकाच बनवली असती. एका आदर्श व्यावसायिक चित्रपटासाठी आवश्यक असलेला सगळा मसाला - उदाहरणार्थ, रोमान्स, क्राईम, अॅक्शन, देशभक्ती, थरार, दोस्ती, कौटुंबिक ओढाताण, इ. जे म्हणाल ते - ह्या कहाणीमध्ये 'रेडी मिक्स' स्वरुपात उपलब्ध आहे! ह्या सगळ्या मसाल्याचा पुरेपूर आणि चविष्ट उपयोग हिरानी करतील, ह्याची व्यावसायिक खात्री चित्रपट पाहण्याआधीपासूनच वाटत होती आणि तसंच झालंही आहे!

'संजू'ची ही कहाणी सांगणं म्हणजे खरं तर खूप धोक्याचं काम आहे. कुठल्याही एका बाजूला आपला तोल झुकला तर ते कथन कोलमडून पडेल इतकं हे आयुष्य व्यामिश्र आहे. Living on the edge म्हणता येईल, असं हे आयुष्य. ही कहाणी सांगताना काही भाग मात्र सोयीस्करपणे गाळला आहे. माधुरी दीक्षितसोबची जवळीक, बाळासाहेब ठाकरेंची सुनील दत्तनी घेतलेली भेट व नंतर हललेली पानं, संजय दत्तच्या मान्यता दत्तव्यतिरिक्तच्या इतर दोन पत्नी, तसेच कुमार गौरव आणि त्याचे वडील राजेंद्र कुमार ह्यांचं दत्त बाप-लेकांच्या आयुष्यातलं स्थान, लहानपणी हॉस्टेलमध्ये राहणं, शिक्षा भोगत असताना कायद्यातील 'फर्लो' आणि 'पॅरोल'सारख्या पळवाटांचा खुबीने उपयोग करून, बाहेर येऊन चित्रपटांचं चित्रीकरण व इतर कामं उरकणं ह्या सगळ्या काही महत्वाच्या घटना, पात्रं व भागांना चित्रपटात स्थान नसल्याने कहाणी खूप सरळ सोपी केलेली आहे. हे आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे, इतकं सरळसाधं नक्कीच नाही की झाल्या घटनांचं खापर सरसकटपणे वृत्तपत्रांच्या आणि माध्यमांच्या माथ्यावर फोडता येईल. 
अर्थात चित्रपट माध्यमाची मर्यादा लक्षात घेता संजय दत्तच्या आयुष्याचा गुंता थोडासा सोडवून ठेवून मगच ते मांडणं एका प्रकारे नाईलाजाचंही असू शकतं. त्यामुळे हे 'सिम्प्लिफिकेशन' करण्यामागे 'ग्लोरिफिकेशन' करण्याचा हेतू नसावा. कारण, संपूर्ण चित्रपटात असं कुठेही दाखवलं नाही की ड्रग्स, मुलींची प्रकरणं किंवा बॉम्बस्फोटाचा कट ह्यांपैकी कशातही अडकलेला संजय दत्त स्वत: प्रत्यक्षात अगदी सुतासारखा सरळ वगैरे होता. लाडावलेला, दुर्लक्षही झालेला एक बिघडलेला रईसजादा, एक कलाकार आणि माणूस म्हणूनही अत्यंत सामान्य असलेली एक व्यक्ती जिने गैरकृत्यं करण्यासाठी स्वत:च लहान-मोठी निमित्ते शोधली आणि ती कृत्यं केली, अशी संजय दत्तची छबी हा चित्रपट तयार करतो. सार्वजनिक आयुष्यातील संजय दत्तने प्रत्यक्षातही कधी स्वत:ला 'निष्पाप, निरागस, साधा, सरळ' म्हणून प्रेझेंट केलेलं नाहीच, त्यामुळे चित्रपटातूनही त्याची तशीच इमेज बनणं स्वाभाविकच.


मात्र, 'संजू' ही कहाणी फक्त संजय दत्तची नाही. ती एका अश्या असामीचीही आहे जिला उच्चभ्रूंपासून गरीबांपर्यंत, फिल्म इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंत, घरच्यांपासून बाहेरच्यांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या लोकांमध्ये नेहमीच एक आदराचं, मानाचं स्थान होतं. एक अशी व्यक्ती जिच्याविषयी जेव्हा कुणी काही बोललं आहे, चांगलंच बोललं आहे कारण त्यांनी कधी कुणाचं वाईट कधी केलंच नसावं. ही व्यक्ती म्हणजे 'सुनील दत्त.' 
वाया गेलेल्या मुलाला पुन्हा माणसांत, योग्य रस्त्यावर आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करणारा एक बाप जे जे काही करेल ते सगळं सुनील दत्त साहेबांनी केलं होतं. कायदेपंडितांची मदत घेणं, स्वत:च्या राजकीय वजनाचा वापर करून पाहणं, त्यासाठी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांसमोरही जाणं हे सगळं तर सर्वश्रुत आहेच. त्याशिवायही मुलाला पुनर्वसन, व्यसनमुक्ती केंद्रात पाठवणं, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्नही एक प्रकारे करणं असं सगळं दत्तसाहेबांनी केलं आहे (असावं). हे बाप-मुलाचं नातं चित्रपटात खूप प्रभावीपणे सादर झाले आहे. 

'परेश घेलानी' नावाचा संजय दत्तचा अतिशय जवळचा मित्र चित्रपटात 'कमलेश कपासी' नावाने आहे. हे पात्र 'विकी कौशल'ने साकारलं आहे. संजय आणि कमलेश ह्या दोघांची मैत्री चांगली रंगली आहे. विकी कौशलने ह्यापूर्वीच स्वत:ची कुवत मसान, रमन राघव 2.0 मधून दाखवली आहेच. सहाय्यक भूमिकेत असूनही त्याने साकारलेला कमलेश खूप भाव खाऊन जातो. माझा मित्र व्यसनांत वाया चालला आहे, मरतो आहे; हे त्या मित्राच्या वडिलांना सांगतानाचा प्रसंग भावनिक करणारा आहे. विकी कौशलने पकडलेला गुजराती अ‍ॅक्सेन्टही खूप सहज आहे. 

प्रेक्षकाला भावनिक करून डोळे पाणावणं, हे हिरानींना अचूक जमतं. दत्त बाप-लेकांचे काही प्रसंगही असेच भावनिक करतात. सुनील दत्तंच्या भूमिकेत 'परेश रावल' कुठल्याही गेट अपशिवाय कमाल करतात. बहुतांश भागात त्यांना बापाची घुसमटच दाखवायची होती, त्यामुळे ह्या भूमिकेला अनेक पैलू होते, असं नाही म्हणता येणार. ज्या तोडीच्या भूमिका त्यांनी ह्यापूर्वी केल्या आहेत, त्यांच्या तुलनेत this was an easy job for him. पण निराशा दाखवतानाही हताश दिसणार नाही, मदत मागत असला तरी लाचार वाटणार नाही; खमकाच वाटेल, असा सुनील दत्त त्यांनी खूप संयतपणे उभा केला आहे.

'संजय दत्त'च्या भूमिकेत 'रणबीर कपूर' आहे, हे फक्त श्रेयनामावलीपुरतं. एरव्ही चित्रपटात स्वत: संजय दत्तच आहे, ज्याने रणबीर कपूरसारखं दिसायचा प्रयत्न केला आहे, असं वाटतं. ह्याहून वेगळं आणि जास्त मी रणबीरच्या कामाविषयी बोलूच शकत नाही.

अनुष्का शर्मा, मनीषा कोईराला, सोनम कपूर, बोमन इराणी, सयाजी शिंदे ह्यांच्या भूमिका छोट्या छोट्या आहेत. पण सगळ्यांनीच आपापली कामगिरी चोख बजावली आहे. चक्क सोनम कपूरनेसुद्धा !

थोडासा मेलोड्रामा कमी केला असता ('कर हर मैदान फतेह..' गाण्याचं चित्रीकरण), थोडंसं कमी सिम्प्लीफिकेशन केलं असतं (अनेक पात्रं, घटना पूर्णपणे गाळणं, सगळं खापर माध्यमांच्या माथ्यावर फोडणं) तर 'संजू' व्यावसायिक चरित्रपट म्हणून मापदंड ठरू शकला असता. तसा तो दुर्दैवाने ठरत नाही. कारण हा चत्रपट, 'संजय दत्त कुणी निष्पाप, निरागस नव्हता; तो एक नालायकच होता, ज्याने व्यसनाधीनतेपायी स्वत:चं आयुष्य बरबाद तर केलंच आणि इतरही आयुष्यं नासवली', हे भडकपणे नसलं, तरी संयत प्रभावीपणे दाखवत असला तरी, 'याकुब मेननसोबत जर तुलना केली, तर पैसा, सत्ता आणि कायद्यातील पळवाटा ह्यांचा फायदा घेऊन संजय दत्त काहीच्या काही स्वस्तात सुटलेला एक गुन्हेगार होता', हे सत्य म्हणावं तितक्या ठळकपणे चित्रपटातून समोर येत नाही. 
असं असलं तरी एक सुंदर चित्रपट म्हणून 'संजू' पुरेपूर जमला आहे. पडद्यावर असणाऱ्या सर्वांचं काम अप्रतिम झालं आहे. जोडीला अभिजात जोशींचे खुसखुशीत, खुमासदार व अर्थपूर्ण संवाद आहेत आणि सगळ्यावर हिरानींची मजबूत पकडही आहे.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...