Monday, November 28, 2016

आत्मशोधाचा काव्यात्मक प्रवास - 'डिअर जिंदगी' (Movie Review - Dear Zindagi)

एक यह दिन जब सारी सड़कें रूठी-रूठी लगती हैं
एक वोह दिन जब आओ खेलें सारी गलियाँ कहती थी

एक यह दिन जब जागी रातें दीवारों को तकती हैं
एक वोह दिन जब शामों की भी पलकें बोझल रहती थी

असं बालपण अनेकांचं असतं. 'बालपणीचा काळ सुखाचा' वगैरे वचनंही आपण अगदी सहजपणे आपल्या मनात जपली आहेत. भले ते बालपण जगत असताना मात्र, आपल्याला नेहमीच मोठं होण्याची आणि मोठ्या माणसांसाखं आपल्या मर्जीनुसार वागण्याची ओढ लागलेली असायची, पण प्रत्यक्षात मोठं झाल्यावर मात्र हे मोठेपण नकोसं होत असतं. वर उल्लेख केलेल्या जावेद अख्तर साहेबांच्या शेरांसोबतच अजून एक शेरही आहे, तो असा -

एक यह घर जिस घर में मेरा साज़-ओ-सामाँ रहता है
एक वोह घर जिस घर में मेरी बूढ़ी नानी रहती थी

मोठे झालो, स्वत:च्या मर्जीने वागतो आहोत, स्वत:चं घर आहे. पण तरी कुठे तरी आत एक अशी पोकळी राहतेच, जी कधीच भरून निघत नाही. सतत मन भूतकाळात जाऊन एखादी खपली उघडत राहतं किंवा हेच दाखवत राहतं की हे आत्ताचं सुखासीन आयुष्य म्हणजे सगळं झूठ आहे. खरं सुख तर काही तरी औरच होतं, जे आजीच्या गोष्टींत होतं किंवा अजून कुठे. लहानपण जर एखाद्या जराश्या डिस्टर्ब्ड कुटुंबातलं असेल, तर ह्या स्मृती तर पुसता पुसल्या जात नाहीत. मग तयार झालेली मानसिकता बंडखोर नसली, तरच नवल. ही बंडखोरी स्वत:खेरीज प्रत्येकाविरुद्ध असते आणि काही वेळेस तर अगदी स्वत:विरुद्धही ! कुठल्याही 'कम्फर्ट झोन' मध्ये टिकून राहावंसं वाटतच नाही. सतत पळत राहायचं. निरुद्देश. अखेरीस ह्या पळण्याचा थकवा येणार असतोच, येतोच. मग पडणारे प्रश्न मात्र आत्तापर्यंतच्या सगळ्या ओढाताणीहून जास्त तणावपूर्ण वाटतात. कारण आपलाच प्रश्न, आपणच उत्तर द्यायचंय आणि आपल्यालाच समजत नसतं की नेमका प्रश्न आहे तरी काय ?

संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी

हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचं आहे. हा गुंता शांतपणे, सावकाश, विचारपूर्वक उलगडायला हवा. गौरी शिंदेंचा 'डिअर जिंदगी' हेच करतो. ही धीमी गती ह्या विषयासाठी आवश्यकच आहे. पण जर हा गुंता ओळखीचा नसेल किंवा समजून घेता आला नाही, तर ही गती रटाळ वाटते. शाहरुख आहे म्हणून काही विशिष्ट अपेक्षांनी जर सिनेमा पाहायला जाल, तर त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीतच. कारण मुळात हा सिनेमा त्याचा नाहीच. तो आहे आलिया भट्टचा.


एक अतिशय कुशल कॅमेरावूमन, जी तिच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करते आहे आणि एकंदरीत तिचं तसं बरं चाललं आहे. तरी 'सब कुछ हैं, पर कुछ भी नहीं' अशी अवस्था असलेल्या कायरा (आलिया) ची ही कहाणी आहे. गोव्यासारख्या नयनरम्य भागात लहानाची मोठी झालेली कायरा, फक्त तिच्या करियरसाठी गोव्यातून बाहेर पडून मुंबईला आलेली नसून, तिच्या मनात तिचं लहानपण, तिचं कुटुंब आणि ह्या दोन्हीमुळे गोवा, ह्या सगळ्याविषयी एक अढी आहे. ती ह्या सगळ्यांपासून दूर जाऊ पाहते आहे. मेहनत व कौशल्याच्या जोरावर मिळवलेल्या यशातही तिला समाधान वाटतच नाहीय. ह्या सगळ्या नैराश्यामुळे सतत नवनवी अफेअर्सही सुरु आहेत. कुठल्याच नात्यात मन रमत नाहीय. ती आत्ममग्न आणि नैराश्यग्रस्त आहे. 'डिअर जिंदगी' हा 'कायरा'चा 'प्रेमात न पडण्यापासून प्रेमात पडण्यापर्यंत', 'एकटेपणापासून कुटुंबापर्यंत', 'गोवा नावडण्यापासून गोवा आवडण्यापर्यंत' आणि 'एका जिंदगीपासून दुसऱ्या जिंदगीपर्यंत'चा प्रवास आहे. हा तिचा प्रवास डॉ. जहांगीर खान (शाहरुख खान) घडवतो. अनेक दिवसांनी शाहरुखमधला चार्म त्याने कुठल्याही प्रकारचा बाष्कळपणा न करता दिसला आहे. ह्यापूर्वी तो दिसला होता 'चक दे इंडिया' मध्ये. वेगळ्या धाटणीची, स्वत:ला अधिक साजेशी भूमिका निवडणारा हा शाहरुख अतिशय आवडतो. भूमिका दुय्यम, सहाय्यक असली तरी त्याने ती स्वीकारली आहे, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर जास्त अधिकार असलेली इतर पात्रं गुदमरणार नाहीत, ह्याची खबरदारी जी 'पिंक'मध्ये बच्चन साहेबांना घ्यावीशी वाटली नाही, ती शाहरुखने इथे घेतली आहे, हे विशेष. ह्यासाठी दिग्दर्शिकेचं जास्त अभिनंदन !
गौरी शिंदेंचे 'इंग्लिश विंग्लिश' आणि 'डिअर जिंदगी' हे दोन अत्यंत भिन्न प्रकारचे सिनेमे आहेत. पण दोन्हींत दिग्दर्शिका स्वत:चं एक बेअरिंग पकडून ठेवते आणि ते कुठेही सुटत नाही. मनोरंजनात्मक मूल्य पाहिल्यास 'डिअर जिंदगी' अनेकांना नकोसा होईल, झालाही. माझ्यासमोरच किती तरी लोक अर्ध्यातून उठून बाहेर निघून गेले. ते शाहरुखचे नेहमीचे चाळे पाहायला आले असावेत. लोक स्वाभाविकपणे शाहरुखला पाहायला येतीलच म्हणून स्वत:ला जे आणि जसं सांगायचं आहे त्यावर जराही परिणाम दिग्दर्शिकेने होऊ दिला नाहीय. हा मोह आपल्याकडे फार क्वचितच कुणाला टाळता आला आहे.

अमित त्रिवेदीचं संगीत सध्याच्या बहुतांश थिल्लर लोकांपेक्षा खूप वेगळं असतं. जी काही मोजकी नावं आश्वासक आहेत, त्यांपैकी एक अमित त्रिवेदी. कहाणीला साजेसं संगीत त्याने दिलं आहे. अगदी लक्षात राहील, असं हे संगीत नाही. रात्रीपुरतं भुंग्याला कैद करून सकाळी त्याला सोडून देणाऱ्या कमळाप्रमाणे हे संगीत आहे. भुंगा जसा आनंदाने कमळात कैद होतो, तसेच आपणही त्या त्या गाण्यात रमतो. आणि दल उघडल्यावर भुंगा जसा लगेच पुढे निघून जातो, तसेच आपणही पुढे निघतो.

गोवा सुंदर दिसणार नाही, असं दाखवायचं असेल तरच काही विशेष कसब लागेल. त्यामुळे नेत्रसुखद छायाचित्रण हे 'साहजिक' ह्या प्रकारात येतं. तरीही दाद !

'फोबिया'मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसलेली 'यशस्विनी दायमा' इथेही कायराची जिवलग मैत्रीण म्हणून सहाय्यक भूमिकेत दिसते. अफाट चार्मिंग मुलगी आहे ही ! तिला एखाद्या मुख्य भूमिकेत पाहायची उत्कंठा आहे. सर्व सहाय्यक व्यक्तिरेखांत ती उठून दिसते. सळसळता उत्साह, चमकदार डोळे आणि अचूक टायमिंग. तिची 'जॅकी' लक्षात राहतेच.

आणि सरतेशेवटी, आलिया भट्ट.
केवळ मोजक्या ८-१० सिनेमांतच तिने जी परिपक्वता साधली आहे, ती अविश्वसनीय आहे. तिचा पहिला सिनेमा पाहताना असं अजिबातच वाटलं नव्हतं की ही इतकी छाप सोडेल. त्या सिनेमात तर ती 'आलिया भोगासी..' म्हणून सहन करावी लागली होती ! पण 'टू स्टेट्स', 'हायवे', 'कपूर अ‍ॅण्ड सन्स', 'उडता पंजाब' आणि आता 'डिअर जिंदगी' मुळे आलिया 'नॉट टू मिस' यादीत आली आहे. एका प्रसंगात नकाराचं दु:ख होत असतानाही, आयुष्य गवसल्याचा आनंदही तिला झालेलं असतो. एकाच वेळी रडू येत असतं आणि हसूही ! त्या वेळी आलियाने जे काम केलं आहे, त्यासाठी तिला त्रिवार सलाम ! एक असं एक्स्प्रेशन जे शब्दात सांगतानाही कठीण जाईल, ते ती प्रत्यक्षात दाखवते, हे केवळ अचाट आहे. त्या क्षणी, तिथेच सिनेमा संपायला हवा होता. तो संपला नाही, ही माझी 'डिअर जिंदगी'बाबत एकमेव तक्रार आहे. नजर लागू नये म्हणून लावलेलं गालबोट असावं बहुतेक.


'डिअर जिंदगी' हा तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही. तो तुमचा छळ मांडणारा 'कोर्ट' सारखा अनावश्यक कूर्मगतीही नाही. तो जिंदगीसारखाच आहे. 'जिंदगी' हा ज्यांचा आवडता पास-टाईम आहे, त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. 'पाहा किंवा नका पाहू, पण मी आहे हा असाच आहे', असं एक बाणेदार स्टेटमेंट हा सिनेमाच स्वत:विषयी देतो, कायरा आणि आलियासारखंच !

लव्ह यू, जिंदगी !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

2 comments:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...